मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षी पाहिलेल्या होमफ्रंट या सिनेमातली हि क्लिप थोडी ग्राफिक आहे; मवाळ धोरण वाल्यांनी आपापल्या जबाबदारीवर पहावी... >> मस्त, काश सगळे मुले अस करु शकले असते, मुलीला नक्की दखवेल.

आधी ते हिन्सक व्हिडीओ गेम पोराना देण बन्द करा म्हणाव. हे असले पाहुन त्यान्च्यात लढायची खुमखुमी येते. नातेवाईकान्च्या मुलान्मध्येच पाहीलेत हे प्रकार.

मागे मैत्रिणीच्या मुलीचा डान्स प्रोग्राम होता म्हणून बघायला गेलो होतो. स्टेजमागे तिचे काम होते म्हणून तिच्या सोबत गेले तर त्या हॉलमध्ये मस्त धुमश्चक्री चालू होती. अगदी सिनीयर केजीतले मुले मुली एकमेकाना हातात येईल ते ( खोटे वाटेल पण एकाच्या हातात खुर्ची होती, तो मुलगा चक्क पहिलीतला वाटावा एवढा उन्च होता) फेकुन मारत होती. मुली एकमेकीना धरुन पाडापाडीचे निरागस खेळ करत होत्या, तर काही मुलाना मार बसल्याने ती मोठ्याने रडत होती.

हे पाहुन मैत्रिण आणी मी अवाक. ती जेव्हा मोठ्याने किन्चाळली तेव्हा पोरे चिडीचुप आणी शाळेचा शिपाई व बाकी टिचर्स ( बाकी मुलीना मेक अप करत होत्या) धावत आल्या, तेव्हा कुठे मुले शान्त बसली.

मुले काय अन मुली काय, धुमाकुळ घालतातच.

राज, क्लिप पाहिली. जबरी आहे.
फक्त तुम्ही 'मवाळ धोरणवाले' हे लेबल लावलेले आवडले नाही. त्या क्लिपमधली मुल बर्‍यापैकी मोठी आहेत, १०-१२ वयोगटातली असावीत. त्या वयातल्या मुलांनी प्रतिकार केला तरच नवल!
इथे चर्चा चालू आहे ती साधारण इयत्ता पहिली आणि आसपास, म्हणजे ४-७ वयोगट (आणि त्यांचे पालक!) त्या वयोगटासाठी थेट पोलिसात नेण्याची धमकी देणे, पालकांनी त्रास देणार्‍या मुलांना ढकलणे/ मारणे, हग्या दम देणे, त्या वयोगटातली मुलं मारत असतील तर त्यासाठी 'मारहाण', 'भविष्यातील बालगुन्हेगार' असे शब्दप्रयोग करणे हे अतिच आहे.

=====> त्या वयोगटासाठी थेट पोलिसात नेण्याची धमकी देणे, पालकांनी त्रास देणार्‍या मुलांना ढकलणे/ मारणे, हग्या दम देणे, त्या वयोगटातली मुलं मारत असतील तर त्यासाठी 'मारहाण', 'भविष्यातील बालगुन्हेगार' असे शब्दप्रयोग करणे हे अतिच आहे.=====>

असे तुम्हाला वाटते. असे तुमचे मत आहे. इतर अनेकांना तसे वाटत नाही. धन्यवाद.

हिंसक बेकार गेम बद्दलही अगदी. ते डोरेमॉनपण बंद करा म्हणतात. सगळ्या पोरांचा मसीहा झालाय तो. असं प्रत्यक्शात काही गॆजेट बिजेट नसतं हे सतत सांगावं लागतं. त्यापेक्षा देशी भीम बरा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय...

रश्मी - गेम्सबाबत अनुमोदन!

(हॉटेलमध्ये स्वतःची ऑर्डर स्वतः देणारी चिमूरडी इतरांच्या कौतुकाचा विषय बनत असली तरी त्यांनी वेटरला काकाही न म्हणता खाडखाड ऑर्डरी सोडणे कसेसेच वाटते. बहुधा एखादे मूल आक्रमक होण्याची प्रक्रिया घरातूनच प्रामुख्याने सुरू होत असावी - अवांतर वाटल्यास क्षमस्व)

तुम्ही एखाद बॉल कुठल्या सरफेस वर आदळता त्यावर त्याची उसळी अवलंबून असते. जर तो कडक गोष्टीवर आदळला तर तेव्हढ्याच जोरात परत येईल.. पण जर एखाद्या कापडावर आदळला तर तो कदाचित तिथेच थांबेल किंवा थोडासाच उडेल. किंवा जर ते कापड ताणलेले असेल तर जोरातच परत येईल.

पाल्याला कडक बनवायचे की कापडासारखे सारखे बनवायचे की ताणलेल्या कापडा सारखे हे फार महत्त्वाचे आहे...

लहान मुलांच्या बाबतीत शक्यतो पालकांचा हस्तक्षेप न होता त्यांच्या पातळीवर गोष्टी मिटल्यास फार उत्तम असते. लहान मुलंच ती.. आत्ता भांडतात आणि परत पुढच्या ५ व्या मिनिटांला सगळं विसरुन गळ्यात गळे घालून खेळतात..

जेव्हा त्रासची व्याप्ती वाढते तेव्हा तिथे पालकांनी हस्तेक्षेप करणे योग्य आहे.. रोजच एखादा पाल्य त्रास द्यायला लागला तर त्याला योग्य त्या पध्दतीत समज देणे गरजेचे आहे.. पण ते शाळेतील शिक्षकाने करणे महत्त्वाचे.. बर्‍याचवेळा मुलं घरी ऐकत नाहीत पण शिक्षकाने सांगितले की ऐकले जाते.. आणि त्यासाठी सुद्धा आपल्या पाल्यानी तक्रार केल्या केल्या न जाता प्रथम पाल्यालाच शाळेत शिक्षकाला सांगायला सांगणे इष्ट.. त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर मग पुढच्या स्टेप्स घेता येतात.

तुम्ही एक दिवस शाळेत जाल.. तुमच्या पाल्याला रोज शाळेत जायचे आहे आणि दांडगट पाल्याबरोबर रोज वावरायचे आहे.. जर मुळातच वात्रट, दादागिरी करणे डोक्यात असेल तर धाक दपटशा दाखवून तात्पुरता उपाय होऊ शकतो. पण परत ती वृत्ती उफाळून येऊ शकते... आणि ह्याला त्रास द्यायला हरकत नाही असे होण्यापेक्षा ह्याला त्रास दिला तर हा आपल्याला पण त्रास देऊ शकतो हे डोक्यात बसले तर त्रास देण्याची प्रवृत्ती कमी होईल..

=====> त्या वयोगटासाठी थेट पोलिसात नेण्याची धमकी देणे, पालकांनी त्रास देणार्‍या मुलांना ढकलणे/ मारणे, हग्या दम देणे, त्या वयोगटातली मुलं मारत असतील तर त्यासाठी 'मारहाण', 'भविष्यातील बालगुन्हेगार' असे शब्दप्रयोग करणे हे अतिच आहे.=====>

असे तुम्हाला वाटते. असे तुमचे मत आहे. इतर अनेकांना तसे वाटत नाही. धन्यवाद. >> + १००

त्या वयोगटासाठी थेट पोलिसात नेण्याची धमकी देणे, पालकांनी त्रास देणार्‍या मुलांना ढकलणे/ मारणे, हग्या दम देणे, त्या वयोगटातली मुलं मारत असतील तर त्यासाठी 'मारहाण', 'भविष्यातील बालगुन्हेगार' असे शब्दप्रयोग करणे हे अतिच आहे.>>+१
मुलाना, इतरांच्या चुकीच्या वर्तनाला प्रतिकार करता येतो/करावा अस शिकवून सबल (मानसीक) करण जास्त योग्य ना? इथे मुलांची सुरक्षितता ह्या लेबल खाली लहान मुल विरुद्ध मोठ्यांचे इगो अस चित्र दिसतय. Sad

.................आणि इथे आमच्या भीतीला इगोचे लेबल लावले जात आहे.
सबलीकरण हे सुरूच असते. पण प्राधान्याने आणि तत्काळ मुलांची सुरक्षितता हे चित्र आहे. इगो नव्हे. आयुष्यात प्राधान्यक्रम विसरले की जन्माची अद्दल घडते. ते आम्हाला आमच्या मुलांच्या बाबतीत व्हायला नको आहे.

मुलाना, इतरांच्या चुकीच्या वर्तनाला प्रतिकार करता येतो/करावा अस शिकवून सबल (मानसीक) करण जास्त योग्य ना?>>> इन्ना अगदी बरोबर..

आयुष्यात प्राधान्यक्रम विसरले की जन्माची अद्दल घडते.>>> जरा विस्ताराने सांगाल का तुम्हाला काय म्ह्णायचे आहे ते???

आयुष्यात प्राधान्यक्रम विसरले की जन्माची अद्दल घडते.>>> जरा विस्ताराने सांगाल का तुम्हाला काय म्ह्णायचे आहे ते???

====>>

अहो कसला विस्तार. आत्तापर्यन्त तीन वेळा सांगितले. आमच्या मुलांची सुरक्षितता हे प्रथम प्राधान्य आहे. ते सोडून आधी दुसर्याचे बिलिफ सिस्टिम वगैरे सुधारत बसलो (जे वेळखाऊ आहे) आणि तेवढ्यात त्या त्रासदायक मुलांनी आमच्या मुलीला/मुलाला काही शारिरिक इजा केली तर त्याची भरपाई कशानेही होणार नाही.
म्हणजेच आधी:
(१) मुलांची सुरक्षितता - मग त्यासाठी
(अ) मुख्याध्यापकांना भेटणे
(ब) संबंधित मुलांना हग्या दम देणे
हे सगळे आलेच आणि तेच योग्य आहे. (जे मी केले तेच लिहीले आहे, बाकी गोष्टी हतोडावाला यांनी लिहील्याच आहेत)

(२) मगच तथाकथित विधायक कार्य. मी आणि माझा नवरा म्हणजे आजकालच्या जगात नवरा बायको दोन्ही नोकरी करणारे असताना आम्हाला आमच्यासाठी आणि मुलांसाठीच २४ तास पुरे पडत नाहीत, तर त्या त्रासदायक मुलांची "बिलिफ सिस्टिम" वगैरे विचार आम्ही का करावा? जास्तीतजास्त मुख्याध्यापकांना भेटल्यावर उल्लेख करता येईल. नोकरी धंदा सोडून प्रश्न गुडी गुडी मार्गाने सुटेपर्यंत रोज मुख्याध्यापकांना जाऊन भेटावे अशी अपेक्षा ठेवणे हा शहाणपणा निश्चितच नव्हे. (हो, रोज. तसा उल्लेख वर कुणीतरी केला आहे)

(३) दांडगाईचा/अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा ते मुलांना शिकवणे: ही प्रक्रिया चालूच असते. पण म्हणून त्यासाठी आधी सुरक्षितता खुंटीला टांगून ठेवता येत नाही. पुन्हा, हे शिकवता शिकवता तेवढ्यात आमच्या मुलांना गंभीर शारिरिक इजा झाली म्हणजे? [मुद्दा (१)].

रोज मुख्याध्यापकांना हे एकच कारण घेऊन भेटणे<<<

हे वाचून अंमळ करमणूक झाली. रोज शाळेत जायला वेळ काढता येईल का? आणि मुख्याध्यापक आठवदाभर आजारी पडले आणि त्यात एखाद्या दाणगटाने आपल्या पाल्याचे कानशील सुजवले तर काय करणार?

बालमानसशात्राची थट्टा वगैरे मुळीच करायची नाही आहे. पण छापील पुस्तकी उपायांनी जगात जगता येईल हा भ्रम वाटतो. मुले फार निरागस वगैरे असतात असा समज दृढ करून काही उपाय सांगितले गेलेले दिसत आहेत व ते सर्वानुमते योग्यही ठरवले गेलेले दिसत आहेत.

संगीता कोल्हटकरांच्या मूळ मुद्याशी सहमत!

(अवांतर - आता ह्याला खरंच अवांतर म्हणायची वेळ आली बुवा! प्रत्येक केसमध्ये समूपदेशन, पालकांचे समूपदेशन, मेडिकेशन हे प्रकार करणे शक्य आहे का, ते विपर्यास नाहीत का? कित्येकदा गोष्टी सरळ सरळ डील कराव्या लागतात हे मान्यच होत नाही इतके आपण ह्या शास्त्रांच्या आहारी गेलो आहोत का?)

>>त्या क्लिपमधली मुल बर्‍यापैकी मोठी आहेत, १०-१२ वयोगटातली असावीत. त्या वयातल्या मुलांनी प्रतिकार केला तरच नवल! <<
मंजुडी - अहो ती क्लिप प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. पॉइंट इज, रिगार्डलेस ऑफ द एज, पाल्याला अन्यायाचा विरोध/प्रतिकार करायला शिकवणं जरुरीचं आहे.

>>फक्त तुम्ही 'मवाळ धोरणवाले' हे लेबल लावलेले आवडले नाही. <<
नाइलाजाने वापरला आहे तो शब्दप्रयोग. बर्‍याचदा पालकांच्या भित्र्या, भिडस्त स्वभावाचा इंपॅक्ट त्यांच्या पाल्यांवर होतो. याचा अर्थ असा नाहि कि पालकांनी हिंसक संस्कार करावेत, किंवा मुलांच्या प्रत्येक भांडणात पडावे. मागच्या पानावर म्हटल्या प्रमाणे मुलांना योग्य शिकवण देउन अशा परिस्थितीचा सामना करण्यास तयार करावे...

बहूतांशी वेळा मुल वयानी /उंचीनी /बांध्यानी मोठं आहे म्हणून सोबतच्या मुलांवर दांडगाई करत असतं. त्याला उत्तर म्हणून स्वतःच्या मोठं असण्याचा फायदा घेवून त्या मुलावर दांडगाई करणं म्हणजे आपल्या मुलांना हे असं दांडगाई करणं योग्य असतं असंच शिकवल्यासारखं नाही का होणार?

संगीता कोल्हटकरांशी कहि अंशी सहमत ़काहि वर्षांबाबतीतची घटना आठवली ़ मैत्रणिच्या मुलीच्या डोळ्यात एका अश्याच दांडगट मुलाने कंपासच टोक खुपसले ़ डाॅक्टरांनी सांगीतले डोळा थोडक्यात वाचला ़ शाळेत मुख्याध्यापकां पर्यंत प्रकरण नेले ़ बाय द टाईम काऊन्सेलर व ईतरांचे गुडि गुडी प्रकरण काऊन्सेलिंग चालु असताना त्या मुलाने सेम प्रकार केला फक्त एका मुलीच्या मांडित खुपसला ़

<<मैत्रणिच्या मुलीच्या डोळ्यात एका अश्याच दांडगट मुलाने कंपासच टोक खुपसले ़ डाॅक्टरांनी सांगीतले डोळा थोडक्यात वाचला ़ >>

बापरे! ती मुलगी फार म्हणजे फारच लकी आहे. कंपास...डोळ्याला कायमची जखम किंवा विद्रुपता आली असती.

यात दोष कोणाचा? मुलं तर निरागस असतात. शिक्षकांनीच नीट लक्ष दयायला हवे आणि पेरेन्ट्सनी आपली दांडगट मुलं कन्ट्रोल करायला हवीत.

यावरुन एक किस्सा आठवला- एकदा आम्ही पुण्यनगरीत एका गंभीर विषयावरचं मराठी नाटक बघायला गेलो होतो. विषय गंभीर, नाटक गाजलेलं, त्या वर्षातली सगळी नामांकनं मिळवलेलं, थिएटर भरलेलं. आणि नाटक ऐन रंगात आलेलं असताना एक लहान मुल जोरजोरात रडायला लागलं. त्यानंतर नाटक संपेपर्यंत ते मूल रडणं, त्याच्या पालकांपैकी एकाने ते बाहेर नेणं, थोडया वेळाने पुन्हा मुलासकट आत येणं, मूल पुन्हा रडू लागणं- हा क्रम चालू होता. सगळ्यांना खूप disturb होत होतं. ते जोडपं मात्र अगदी निर्विकार- त्यांना जराही लाज वाटत नव्हती. उलट दोघं अगदी proudly मुलाकडे बघत होते! त्या जोडप्याने त्यादिवशी इतक्या पुणेरी प्रेक्षकांचे शाप मिळवलेत! मुळात आपल्या मुलामुळे दुसर्‍यांना त्रास होऊ शकतो, तो कंट्रोल करणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे, दुसर्‍यांनी समजून घ्यावं ही अपेक्षा चुकीची आहे हेच या लोकांच्या डोक्यात शिरत नाही.
अश्याच पालकांची मुलं शाळेत गेल्यावर violent होत असावीत.

अश्याच पालकांची मुलं शाळेत गेल्यावर violent होत असावीत.>>> काहीही जनरलायझेशन होत आहे हे..

ते पालक मूल रडू लागल्यावर बाहेर जात होते ना? की नाटकगृहात बसून त्याला रडू देत होते? त्यांनी तुम्हा इतर प्रेक्षकांचा विचार करणं मस्ट आहे, पण मग तुमच्यावरही ही जबाबदारी येते त्यांच्या बाजूने विचार करण्याची. काही नाही तर इतकं सरसकटीकरण तरी नका करू! Sad

बस्के अहो लाईटली लिहिलं होतं ते! इतकं सिरीयसली नका घेऊ Happy
त्यांच्या बाजूने मी काय विचार करु शकते ते बाकी कळलं नाही. ते पालक मूल रडू लागल्यावर त्याला तिथेच बसून चुचकारुन वगैरे शांत करायचा प्रयत्न करायचे. मुलाचं रडणं आणि पालकांची मोठयाने कुजबूज अश्या दुहेरी आवाजाने आसपासचे प्रेक्षक रागारागाने वळून बघायला लागले की मग ते नाईलाजाने मूल घेऊन जायचे. जाताना लोकांना डिस्टर्ब करायचेच कारण नेमके सेंटरला बसले होते. परत पाच मिनिटांनी शांत मूल घेऊन हजर. पण ते मूल आत आलं की परत थोडया वेळाने रडायला लागायचं. त्यांनी मुळात इतकं लहान रडकं मूल घेऊन गंभीर डार्क विषयावरच्या नाटकाला यायलाच नको होतं. कदाचित त्यांना वाटलं असेल की मूल झोपूनही जाईल वगैरे. पण ते सतत रडतंय हे कळल्यावर पहिल्या एकदोन एपिसोड्सनंतर तरी त्यांनी तिथून गाशा गुंडाळायला हवा होता.

संगिता +१

मंजूडी, तुमची मतं अजिबातच पटत नाहियेत. जेंव्हा मुद्दा आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा येतो, तिथे असं नरमाईने वागलं तर १००% दुखापत पुन्हा दुसर्या मुलांच्याही बाबतीत उद्भवते.

तुम्हिच सांगा, एखाद्या खोडकर मुलाने तुमच्या मुलाला/मुलीला पट्टीने मारले/फोडून काढले तर तुम्ही त्याला रागे भराल की समजाऊन सांगत बसाल?

@ संगीता कोल्हटकर

तुमचे प्राधान्यक्रम मान्य आहेत. तुमच्या वेगळ्या मताबद्दल आदर आहे. एक आई म्हणून मला तुमची काळजी खूप महत्वाची वातते. अर्थातच माझेही माझ्या मुलीबद्दल हे प्राधान्यक्रम आहेत.

या मुलांचे बिलीफ बदला असे मी पालकांना म्हटले नाही. ते त्यांचे कामही नाही. दांडगाई करणार्‍या मुलांच्या वर्तनामागची बाजू मी सांगितली. त्या वर्तनाचे कुठेही समर्थन केले नाही.

उपाय लिहिताना तातडीने करण्याचे उपाय वर सुचवले आहेत. त्यात रक्त येईपर्यंत इजा करणे वगैरे प्रकारांची गंभीर दखल शाळेला तातडीने घ्यावीच लागते. त्या केस मध्ये ती चूक करणार्‍या मुलाच्या पालकांना लगेच बोलावले जाते. जो काही दम वगेरे ( अगदी हग्या दम जो तुम्ही म्हणताय) तो त्या पालकांनी आपल्या मुलाला द्यावा.
एक सहा वर्षाचे मूल दुसर्‍या मुलांच्या पालकांचे ऐकणार नाही. त्याचा तात्पुरता परिणाम दिसेलही. पण भविष्यात दिसणार नाही. तुमच्याच मुलावर 'रडूबाई, गेला आईला बोलवायला' वगेरे कायमचे शिक्के त्याच्याच मित्रांकडून बसतिल ते वेगळे.
म्हणून 'आपल्या सर्वस्व असलेल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी' अशी इजा करणार्‍या मुलाला सस्पेंड ( काही काळ) करण्याचा आग्रह तुम्ही प्रशासनाकडे धरू शकता.
कोणतीच कारवाई शाळेकडून झाली नाही तर तुम्ही 'शाळेला' बदनामीची भिती घाला ना !
आपलं मूल आजारी असेल तर त्यासाठी नाही रोज जावं लागलं तरी डॉ कडे जात ? तसंच इथे दोन दिवस जावं लागलं तर काय फरक पडतो. माझे आईबाबा माझ्यासाठी वेळ काढतायत हे तुमच्या मुलासाठी आपण ज्याला त्रास दिलाय त्याचे आईबाबा 'आपल्यामुळे' आणि आपल्याविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून रोज शाळेत येतायत या गोष्टीचे दूरगामी परिणाम निश्चितच जास्त सकारात्मक आहेत. एका चापटेपेक्षा, एका अपमानापेक्षा, क्षणिक भितीपेक्षा आणि कोडगेपणापेक्षा हे जास्त विधायक नाही का ?

आणि हे उपाय तुम्ही म्हणताय ती तुमची प्राधान्ये जपण्यासाठीच आहेत. त्यात कुठेही अन्याय सहन करायला सांगितले जात नाही. तातडीच्या उपायांमध्ये --
मुलाने केलेल्या चुकीच्या कृतीबद्दल कडक शब्दात त्याच्याच पालकांकडून दम दिला जावा. ( त्या पालकांनी त्यांच्या मुलाला इतरांना जखमी करणे या चुकीबद्दल मारले तरी ठीक. तुम्ही मारण्यापेक्षा ते जास्त योग्य)

शाळेने तातडीने कारवाई करावी असा आग्रह धरण्यात यावा.

कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍याच्या मुलावर तुम्ही हात उगारणे कायद्याला धरून नाही.

प्रत्येक वर्तनसमस्या वेगळी असते. ती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावी लागते. मुलाचे वय,व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक पार्श्वभूमी, झालेल्या चुकीची इंटेन्सिटी, शाळेची संवेदनशीलता यानुसार उपायही बदलतात. इथे अनेक प्रकारच्या केसेस वाचतेय. सगळ्यांना लागू पडतील असे जनरल उपाय इथे बोलले जातायत. अनेक केसेस्मध्ये यापेक्षा वेगळ्या उपायांची गरज पडू शकते.सो या जनरल चर्चेत बोलायची थांबते.

@ बेफिकीर
प्रत्येक केसमध्ये समुपदेशन शक्य नाही. आवश्यक्ताही नाही.
तुम्ही म्हणताय तसे काही गोष्टी सरळ स्वच्छ संवादातून सुटू शकतात. त्यासाठी दोन्ही बाजूंची तयारी असणे, इतरांच्या प्रश्नाबद्दल संवेदनशीलता असणे आणि भिन्न मताबद्दल आदर असणे अपेक्षित असते. माझ्या पाहाण्यात काउन्सेलिंग शिवाय सुटलेल्या केसेसच अधिक आहेत.
इथे अनेकांनी अनेक उपाय सुचवले आहेत. पालकांचे प्राधान्य मुलांच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यालाही असावे एवढाच माझा आग्रह. या आग्रहाला तुमच्याकडून मनोरंजक वगैरे आणि इतर काही जणांकडून पुस्तकी भ्रमात राहणे वगेरे म्हटले गेले याबद्दल खेद वाटला.

@ इनोची
काउन्सेलिंग हा केवळ 'गुडी गुडी' बोलण्याचा प्रकार आहे हा समज चुकीचा आहे. तुमच्या पाहण्यातले काउन्सेलर्स फक्त तेच करत असतिल तर त्यालाही मी मालप्रॅक्टिसच म्हणेन. कारण ते स्वतःची प्रतिमा जपत, क्लायंटला बरे वाटेल असे बोलत राहून त्याची स्वतःवरची डिपेन्डन्सी वाढवत आहेत + पैसा,वेळ्,श्रम यांचा दुरूपयोग करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समर्थांनी काउन्सेलिंग साठी 'शुद्धोपदेश' असा शब्द वापरला आहे. त्यात समतोल, पूर्वग्रहदूषित, साक्षीभाव बाळगणारे, तटस्थ , संवेदनशील आणि तरीही आलिप्त असे असणे अपेक्षित आहे.
हे गुण असणारा कोणीही उत्तम समुपदेशक होऊ शकतो.
हे सहज जाता जाता आठवले म्हणून... Happy

एकच गोष्ट किती वेळा सांगू? परत सांगते. कारण सहमत व्हावे असा आग्रह नाही पण समजूनही घेतले जात नाही तेव्हा बोलणे भाग आहे.

मितान,
आपलं मूल आजारी असेल तर त्यासाठी नाही रोज जावं लागलं तरी डॉ कडे जात ? तसंच इथे दोन दिवस जावं लागलं तर काय फरक पडतो.

====>>>

तुम्ही आता दोन दिवस म्हणताय. दोन दिवस नाही. कुणीतरी वर लिहीलेले आहे की समस्या सुटेपर्यंत रोज जा. रोज? प्लीजच.

===============================================================

एक सहा वर्षाचे मूल दुसर्‍या मुलांच्या पालकांचे ऐकणार नाही. त्याचा तात्पुरता परिणाम दिसेलही. पण भविष्यात दिसणार नाही. तुमच्याच मुलावर 'रडूबाई, गेला आईला बोलवायला' वगेरे कायमचे शिक्के त्याच्याच मित्रांकडून बसतिल ते वेगळे.

=====>>>

माझ्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी मी काय करायचे ते माझे मला ठरवू द्या. तिच्यावर असले कोणतेही शिक्के बसणार नाहीत याची खात्री आहे कारण मी व तिचे बाबा तिला तयार करतोच आहोत हळू हळू. Ground level reality काय आहे हे मलाच माहीत आहे. तुम्ही नका काळजी करु.

===============================================================

म्हणून 'आपल्या सर्वस्व असलेल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी' अशी इजा करणार्‍या मुलाला सस्पेंड ( काही काळ) करण्याचा आग्रह तुम्ही प्रशासनाकडे धरू शकता. कोणतीच कारवाई शाळेकडून झाली नाही तर तुम्ही 'शाळेला' बदनामीची भिती घाला ना !

माझे आईबाबा माझ्यासाठी वेळ काढतायत हे तुमच्या मुलासाठी आपण ज्याला त्रास दिलाय त्याचे आईबाबा 'आपल्यामुळे' आणि आपल्याविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून रोज शाळेत येतायत या गोष्टीचे दूरगामी परिणाम निश्चितच जास्त सकारात्मक आहेत. एका चापटेपेक्षा, एका अपमानापेक्षा, क्षणिक भितीपेक्षा आणि कोडगेपणापेक्षा हे जास्त विधायक नाही का ?

आणि हे उपाय तुम्ही म्हणताय ती तुमची प्राधान्ये जपण्यासाठीच आहेत. त्यात कुठेही अन्याय सहन करायला सांगितले जात नाही. तातडीच्या उपायांमध्ये -- मुलाने केलेल्या चुकीच्या कृतीबद्दल कडक शब्दात त्याच्याच पालकांकडून दम दिला जावा. ( त्या पालकांनी त्यांच्या मुलाला इतरांना जखमी करणे या चुकीबद्दल मारले तरी ठीक. तुम्ही मारण्यापेक्षा ते जास्त योग्य)

शाळेने तातडीने कारवाई करावी असा आग्रह धरण्यात यावा.

====>>>

अग्गबाई? सस्पेंड? कारवाईचा आग्रह? मी वर काय लिहीले ते वाचलेच नाहीत की वाचून दुर्लक्ष केलेत? हग्या दम, बालगुन्हेगार हे शब्द चालत नाहीत पण मूल सस्पेंड करणे हे शब्द अती होत नसावेत. बरे तो मुलगा सस्पेंड होईपर्यंत आणि तसा प्रेमळ आग्रह धरेपर्यंत आणि केलीच तर कारवाई होईपर्यंत काही कालावधी जातो ना? तो जाईपर्यंत माझ्या मुलीला काही इजा झाली तर? किती वेळा सांगू? शी कंटाळा आला परत परत सांगून.

कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍याच्या मुलावर तुम्ही हात उगारणे कायद्याला धरून नाही. ====>>>

तुमच्या बाकीच्या impractical विधानांना वर उत्तर दिलेच आहे. ह्यालाही देते. Let me tell you once and for all. आणि मी कुठल्याही मुलावर हात उगारलेला नाही. फक्त हग्या दम दिला आहे. घरी येऊन आईवडिलांना सांगेन असा. आणि मग मुख्याध्यापकांकडे तक्रार करुन आले आहे. So please do not push your words into my mouth.

इनोची | 27 August, 2014 - 22:16
धन्यवाद इनोची. तुमच्या ह्या हकिकतीने my point is proved. समजून घेणारे अनेक आहेत हे बरे झाले.

बेफिकिर व aashu29 तुम्हालाही धन्यवाद.

=============================================

आता मला खरेच कंटाळा आला आहे. परत तेच बोलणार नाही. आग्रहपूर्वक मतप्रदर्शन केल्याने कुणाला वाचताना कंटाळा आला असेल तर माफी मागते.

मितान ताई - मी जे लिहीले आहे ते स्वताच्या मुलीला त्रास झाला तर मी काय करीन अश्या भुमिकेतुन लिहीले आहे, सल्लागार म्हणुन नाही. सल्लागार म्हणुन मोठा आव आणणे फार सोप्पे आहे.

मी असे बरेच सल्लागार ( फुकटचे, किंवा फी लावणारे ) स्वतावर पाळी आली की एक्दम १८० डीग्री वळुन वागू लागतात हे ही बघितले आहे.

शिक्षेची भीती ही एक गोष्टच मनुष्याला दुसर्‍यांना त्रास देण्यापासुन प्रवृत्त करू शकते. आधी शिक्षा आणि मग काय काउंसलिंग वगैरे करायचे ते. चोराला आधी तुरुंगात टाका, तिथे पाहीजे तर त्याचे काउंसलिंग करा. पण त्याला मानसिक आजार आहेत म्हणुन तुरुंगच नको वगैरे हे लाड आहेत आणि ग्रस्त माणसावर अन्याय आहे.

मितान,

आपण दिलेल्या मूळ (पहिल्या) प्रतिसादाकडे थोडा वेळ वळूयातः

>>>मुळात प्रत्येक वेळी मुलांच्या प्रत्येक वर्तनामागे निश्चितच काहीतरी बिलिफ सिस्टिम कार्यरत असते. ती समजून घेऊन त्यात बदल केला की मुलांचे वर्तन बदलते. <<<

१. बिलिफ सिस्टिम समजून घेण्याचे काम कोणी करायचे? त्याच मुलाच्या पालकांनी, बळी पडलेल्या बालकाच्या पालकांनी, शाळेच्या व्यवस्थापनाने की संपर्क करून आपली केस सोपवलेल्या काऊंसेलरने?

२. हे सगळे केव्हा करायचे? आपल्या मुलाला भयंकर इजा झालेली असली तर हे प्राधान्य असू शकेल का?

३. बिलिफ सिस्टिम समजून घेण्यासाठी जो वेळ लागतो तो इजा झालेल्या पाल्यावरील तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरणे हे अधिक योग्य नाही का?

४. बिलिफ सिस्टिम कार्यरत असते, ती समजून घेऊन त्यात बदल केला की मुलाचे वर्तन बदलते हे गृहीतक दोन्ही पाल्यांचे पालक, शाळेचे व्यवस्थापन ह्या सर्वांनी एकाचवेळी मान्य करून त्यावर कार्यवाही करावी ही अपेक्षा भाबडी नाही काय?

===================

>>>हे करण्यासाठी वेळ लागतो हे मान्य. पण हाच योग्य उपाय आहे. असे मुलांचे मानसशास्त्र सांगते. ( ते मानणे कोणालाही बंधनकारक नाही; त्या शास्त्राची टिंगल करणार्‍यांविषयी माझे काहीच म्हणणे नाही<<<

१. हाच योग्य उपाय आहे पण हा दीर्घकालीन उपाय आहे हे तरी मान्य आहे ना?

२. जो पाल्य आपल्या पाल्याला भीती दाखवून भयंकर इजा पोहोचवत आहे, पोहोचवू शकणार आहे त्याचे वर्तन ह्या शास्त्राच्या आधारे इव्हॅल्युएट करत बसणे आणि त्याला स्वत:लाच यापुढे असे वागताना भीती / दहशत वाटावी ह्यासाठी खबरदारी घेणे ह्यातील कशाला अधिक प्राधान्य मिळायला हवे?

=====================

>>>तातडीने काय उपाय करावे ?
१. बुलिंग झालेल्या मुलाला 'तुला झालेला त्रास मला समजतोय हे सांगणे, यावर पालक/शिक्षक्/कोणतीही अथॉरिटी म्हणून नक्कीच दखल घेतली गेली आहे हे पोहोचवणे. हेस सेम बुलिंग करणार्‍या मुलापर्यंतही पोहोचवणे.<<<

कंपासचे टोक डोळ्यात खुपसले गेल्यानंतर किंवा यापुढेही तो मुलगा कंपासचे टोक असेच कोणाच्यातरी शरीरात खुपसेल ह्याची पूर्ण शक्यता असता सर्व संबंधितांना ह्या अश्या जाणिवा वगैरे करून देणे हा तातडीचा उपाय आहे का चंपकपणा आहे? नो वंडर पूर्वी लहान मुलांना पालक दोन थोबाडात लावायचे कारण ती मुले कोणत्याही बिलिफ सिस्टिममधली असली तरी सरळ व्हायची. (ती सरळ होत नाहीत असे भक्कम पुरावे शास्त्राकडे आज असतीलही, पण वाट्टेल ते फाजील प्रकार सहन करून शास्त्राच्या मार्गावर जाणे अजिबातच पटत नाही).

>>>२. मुलांचा स्वतःचा सपोर्ट ग्रुप असावा. या वयाला तसेही गँग एज म्हणतात. मुलांनी गटात असणं, त्यांचे ग्रुप असणं हे खूप स्वाभाविक असते. त्या ग्रुपला मदतीसाठी बोलावणं.<<<

समजा ग्रूपपैकी आसपास कोणी नसलेच तर? समजा अख्खा ग्रूप तिथेच असताना क्षणार्धात कंपासचे टोक डोळ्यात खुपसले तर?

>>>३. बुलिंग करणार्‍यांनाही पीअर प्रेशर असतेच. तशाच प्रेशरचा उपयोग बुलिंग न करण्यासाठी एक चांगला शिक्षक करून घेऊ शकतो.<<<

पुन्हा वरचाच प्रश्न!

>>>४. मोठ्या माणसांची मदत मागणं. यासाठी 'आपण जे बोलतोय ते यांना कळतं' असा विश्वास निर्माण केलेले लोक भोवताली असणं.<<<

पुन्हा वरचाच प्रश्न!

>>>५. शारी. इजा कोणी करू लागला तर मोठ्याने ओरडणं, प्रतिकार करण्यासाठी शारी. बळाचा वापर करणं. ( अब्युजमधल्या कित्येक केसेस मध्ये ' असं ओरडायचं नाही, असं मारायचं नाही... इ कंडिशनिंग असलेली मुलं इच्छा असूनही हात उचलत नाहीत. चावत बोचकारत नाहीत, ओरडतही नाहीत अरेरे )<<<

काही समजले नाही. म्हणजे शास्त्रानुसार आपल्या मुलांना 'असं चावायचं नाही, असं मारायचं नाही' हे शिकवणे 'इत्यादी कंडिशनिंग' ह्या सदरात मोडते का? प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून प्रतिकार करणे किंवा पळ काढणे हे कोणताही सजीव करणारच! मग आपल्या मुलांना शास्त्राच्यामते असे शिकवायचे का, की एरवी चावूबिवू नकोस, पण कोणी काही करू लागला तर मात्र चाव! असे करून त्या मुलाला आणखीन गोंधळात टाकायचे का?

>>>६. हो आपल्या मुलांना मारता ओरडता चावता बोचकारता आलं पाहिजे. ते कुठे करायचं हे मात्र पक्कं शिकवलं गेलं पाहिजे. <<<

आपल्या मुलाची बिलिफ सिस्टीम चुकून माकून काही कारणाने आपल्या नकळत बदलली आणि 'कुठे करायचे' हे आपण आपल्यामते पक्के शिकवलेले असतानाही अचानक त्याला वाटले की एका निरपराध मुलाला आत्ता चावणे हे योग्यच आहे तर पुन्हा बिलिफ सिस्टीमचा अभ्यास करायला घ्यायचा का?

प्रतिकाराची प्रवृत्ती जोपासणे हे केव्हाही योग्यच! पण ह्या सर्व तातडीच्या उपायांपैकी एकाही उपायात 'कंपासचे टोक दुसर्‍याच्या डोळ्यात खुपसणार्‍याला तसे करण्याची स्वतःलाच भीती वाटेल' असा एकही उपाय दिसलेला नाही. करून मोकळे झाल्यानंतर तातडीचे काय आणि दीर्घकालीन काय, सगळे उपाय म्हणजे पोस्ट मॉर्टेमच!

असे कंपासचे टोक खुपसण्याची प्रवृत्ती बाळगणार्‍याला (इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द एज) आणि त्याच्या पालकांना सरळ स्वच्छ शब्दात 'हग्या दम' भरणे हा एकमेव योग्य उपाय वाटतो. ह्याशिवाय (पुन्हा इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एज) पोलिसकेस करणे वा तशी धमकी देणे हाही!

=================

दीर्घकालीन उपायांबाबत तूर्त बोलण्यात मला राम वाटत नाही आहे.

=================

>>>लेबलिंग, चिडवणे, टिंगल या सगळ्या गोष्टी आपण लावून घेतल्या तरच लागतात हे मुलांच्या मनावर अवश्य ठसवावे. तसेच आपले मूल्यमापन करण्याचा अधिकार जगात कोणाला आहे व कोणाला नाही हे ही वारंवार सांगितले जावे. ( यात पालक विवेकी असणे गृहित धरले आहे) <<<

१. मुले म्हणजे परिपक्व व्यक्ती किंवा संतप्रवृत्तीचे आत्मे नव्हेत. ह्या सर्व गोष्टींचा सर्वाधिक त्रास त्यांनाच होतो. हे ठसवणे म्हणजे त्यांना अजाणत्या वयात अहं सोडायला लावायला सांगण्यासारखे आहे.

२. मुलांच्या मनावर हे ठसवण्यापूर्वी एक रँडम सँपल म्हणून पन्नास मायबोलीकरांचे वर्तन तपासले तरी हे लक्षात येईल की 'आपण मनाला गोष्टी लावून घेतल्या तरच त्या लागतात' हे सत्य पचवलेले पन्नासमध्ये एकदोघे निघतील. ही अपेक्षा मुलांकडून करणे अचंबीत करणारे वाटते.

३. पालक विवेकी असणे गृहीत धरले आहे, पण कोणाचे पालक? इजा झालेल्या मुलाचे? इजा करणार्‍या मुलाचे पालक किंवा शिक्षक विवेकी नसतील तर? किंवा सगळेच विवेकी असले तरीही चार मुले मिळून एखाद्या मुलाला (उदाहरणार्थ) त्याच्या चकणेपनावरून सर्वांच्या नकळत चिडवत असतील तर? आणि कोणीतरी विवेकी असणे हे गृहीत धरून असलेले उपाय शास्त्राने का सांगावेत? सगळेच अविवेकी असले तर काय करावे हे शास्त्राने सांगायला हवे ना? विकसित केलेली शास्त्रे ही वर्स्ट कंडिशन्स गृहीत धरून विकसित व्हायला हवीत ना?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

केलेली दांडगाई किती त्रासदायक आहे त्यावर त्याची शिक्षा काय असावी असे वाटत नाही का कोणाला?

करकट खुपसणे वगैरे नक्कीच मोठ्या प्रमाणात शिक्षेस पात्र आहेत.. आणि तश्याच स्टेप्स घ्याव्या लागतील..

Pages