मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ संगीता - मस्तच लिहीले आहेस. मला पण काहीतरी लिहायचे होते पण ते फार जहाल झाले असते म्हणुन गप्प बसलो.

दुसर्‍यांच्या मुलाच्या चुकीचे बिलीफ, गुन्हेगारी प्रवृत्ती , त्या मुलाच्या घरचे प्रोब्लेम समजुन घ्यायला आणि ते सोडवत बसायला मला जमणार नाही आणि तशी इच्छछा पण नाही. माझ्या मुला/मुलीची सुरक्षीतता माझ्यासाठी पहीली आणि शेवटची प्रायारीटी आहे.

हल्ली खुन्याची, बलात्कार करणार्‍याची मानसिकता समजुन घ्या, तो जन्मता गुन्हेगार नाहीये तर त्याला मानसिक आजार झालाय. त्याला गुन्हेगार म्हणु नका तर आजारी म्हणा. असले फॅड वाढले आहे.

मुळात प्रत्येक वेळी मुलांच्या प्रत्येक वर्तनामागे निश्चितच काहीतरी बिलिफ सिस्टिम कार्यरत असते. ती समजून घेऊन त्यात बदल केला की मुलांचे वर्तन बदलते.>> प्रचंड अनुमोदन!
हे वाक्य बुलींग करणार्‍या मुलाच्या अँगलने न वाचता ते सहन करणार्‍या मुलाच्या बाजूने वापरले तर काही फरक पडतो का ते पहा. कारण अन्याय सहन करणार्‍याची बिलिफ सिस्टीम बदलली की तो थांबण्याची शक्यता वाढते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

मितान खुप सुंदर प्रतिसाद. पटलेच!
काही काही वाक्य अगदी कोट करावी अशी.

मुलांना सक्षम बनवा. त्यांना ओरडणार्‍याच्या अंगावर खच्चून ओरडता आलं पाहिजे आणि मारणार्‍या, बोचकारणार्‍याला खच्चून एक ठेवुनही देता याय्ला हवी Happy
मुलांना त्यांचं त्यांना हताळू द्यात. परिस्थीती हाताबाहेर जातेय असं वाटू लागलं तरच तुम्ही हस्तक्षेप करा Happy
(हे सगळं वाटणं व्यक्तीसापेक्ष आणि परिस्थीती सापेक्ष आहे याची जाणिव आहे )

मी लिहिलेल्या केस मधे त्या मुलाचा दोष कमी आणि त्याच्या पालकांचा दोष जास्त आहे. अशा वेळेला पोलीस केस होईलाच हवी (मुला विरुद्ध नाही). शिक्षिकेने शिक्षा केली तेंव्हा पालकांनी आरेरावी केली नसती तर मुलगा सुधारला असता. आता पुढे जाऊन तो गुंडच होणार यात मला काही शंका नाही.

मितान, पोस्ट आवडले पण हे पालकाच्या दृष्टीने ( खास करून ज्यांच्या मूलांवर अन्याय होतोय त्यांच्या ) न होता, बालमानसोपचार तज्ञाच्या दृष्टीने झाले असे नाही का वाटत ?

हा बीबी अश्याच एका पालकाने सुरू केला आहे आणि त्याच्या नजरेतून, आपल्या पाल्याला अन्याय सहन न करण्यासाठी कसे तयार करता येईल, हेच महत्वाचे.. त्यामूळे त्याला ओरडता, किंचाळता, बोचकारता आले पाहिजे,
हा सल्ला जास्त महत्वाचा वाटतो मला.

वरती टोचा, संगीता सारखे पालक म्हणताहेत ते सर्वच बाबतीत महत्वाचे आहे.. अन्याय होतो कारण अन्याय सहन केला जातो. त्याला योग्य त्या वेळेस प्रतिकार झाला तर ... !

मुलां सोबत पालकांचही काऊन्सलिंग झाल पाहिजे... फक्त शाळे पुरताच नव्हे तर एकंदर समाजिक जाणिवाच बोथट झाल्या आहेत. आपल्या आडमुठ्या किंवा इगो जपणार्‍या कृती मुळे इतरांना त्रास होऊ शकतो, हेच मुळात जनता विसरत चालली आहे.

सर्वत्र attack for service धोरणं अवलंबल जात आहे. मग पाल्यही कळत नकळत त्याचच अनुकरण करतं.
<<< इंन्द्रधनुष्य छान लिहल आहे.
७-८ महिन्यापूर्वी ह्याचा अनुभव मी घेतला आहे. Sad

मी आणि माझी आत्तेबहिण दोघी थिविम स्टेशनवर ट्रेनची वाट पहात बसलो होतो. ती मला स्टेशनवर सोडायला आली होती. आम्ही जिथे बसलो होतो तिथेच एक मराठी फॅमिली ग्रुप गोवा फिरून परतीच्या प्रवासाला आमच्याच साईडला उभे होते आणि त्याच ग्रुपमधल्या दोन बायका आमच्या बाजूला येऊन बसल्या. त्यांची लहान मुल स्टेशनवरच्या दुकानातून खाऊ घेण्यासाठी हट्ट करत होती.

काहीजणींनी घेऊन दिल आणि माझ्या बाजूला जी बाई होती तिचा मुलगासुद्धा गाडी घेण्यासाठी हट्ट करू लागला जेव्हा तिने नाही म्ह्टल आणि समजावून सांगितल की का नाही देणार आहे तर त्या ५-६ वर्षाच्या मुलाने तिला मारायला सुरुवात केली आणि जोरात रडण. तो कंटीन्युअस मारत होता आणि ती त्यामुलाला काहीच बोलत नव्हती. Sad त्या मुलाची पाठ माझ्याकडे होती आणि तो आपल्या आईला जोर लावून मारत होता. मला राहवल नाही आणि मी त्या मुलाच्या पाठीत हलका थपाटा घातला तर त्याने माझ्यावर हात उगारला Uhoh पण मी त्याचा हात पकडला आणि मला मारायला दिल नाही. मी त्याला समजवायला सुरूवात केली की अरे आईला कुणी मारत का??? त्यावर त्या मुलाची आई म्हणाली की हे तर नेहमीचच आहे. तो रोज मला, त्याच्या आजीला मारतो जर आम्ही त्याच्या मनासारखे वागलो नाहीतर. आमच्याकडे लहान मुलाला मारायची पद्धत नाही आहे. त्याची मावशी जर आता इथे असती तर तिने तुझ्याबरोबर कडाक्याच भांडण केल असत. ह्याच्या मावशीने आम्हाला सांगितल आहे की मुलाला अजिबात मारायच नाही. Uhoh ह्या नंतर ती बाई तिच्या ग्रुपमधल्या इतर बायकांना सांगायला लागली की हिने माझ्या मुलाच्या पाठीत धपाटा मारला आणि पुन्हा मावशी बाईंची कॅसेट लावली.

माझ्या बहिणीने मला चांगलच झापल तुला काय करायच आहे म्हणून. तो मुलगा मोठा झाल्यावर कळेल तिला तिची चूक. तू कशाला सुधरवायला गेलीस. Sad

मी कधीच प्रवासात कुणाशी बोलत नाही जरी मी लेडीज कोटाच्या डब्यातून जात असलीतरीसुद्धा. त्यादिवशी हा प्रकार माझ्या अगदी बाजूला झाला आणि राहवल नाही म्हणून मी त्या मुलाला एकच धपाटा घातला होता पण अस काही एकाव लागेल अस वाटल नव्हत. त्यानंतरचा कहर म्हणजे त्या मुलाने थोड्यावेळाने येऊन मला मारल. त्याची आई लगेच म्हणाली हो त्याने परत फेड केली तुझ्या धपाट्याची आणि जोरात हसली. Sad

हा किस्सा माझ्या मनातून काही केल्या जात नाही अस वाटत माझच चुकल.

पण खरच वेळ आली आहे की पालकांना समजायला पाहिजे की मुलांचे लाड केव्हा करायचे आणि योग्यवेळी त्यांना धाकही दिला पाहिजे.

इथे अवांतर असेल तर उडवेन.

वरती टोचा, संगीता सारखे पालक म्हणताहेत ते सर्वच बाबतीत महत्वाचे आहे.. अन्याय होतो कारण अन्याय सहन केला जातो. त्याला योग्य त्या वेळेस प्रतिकार झाला तर ... >>>>>>>> प्रतिकार वगैरे गोष्टी बोलायला सोप्या आहेत. जर त्या त्रास देणार्‍या मुलांचे वडील गुंठामंत्री, नगरसेवक, पक्षाचे ( सो कॉल्ड ) कार्यकर्ते असतील तर हात पाय मोडुन घ्यायला लागतील ( पाल्याला आणि पालकांना ).

अन्याय सहन केला नाही पाहीजे वगैरे हे सर्व चालेल जर विरुद्ध बाजू जर थोडी जरी माणसातली असेल तर पण माणुसपणा सोडुन दिलेल्यांना काही करु शकत नाहीत.

ह्या सुचना जे लोक कायद्याच्या राज्यात रहाणार्‍यांसाठी उपयुक्त आहेत ( म्हणजे भारतात रहाणार्‍यांसाठी नाहीत )

तुम्ही लोकांनी वाकड, डांगे चौक, हिंजेवाडी, थेरगाव मधले दोन पायावर चालणारे प्राणी बघितलेले दिसत नाहीत. त्यांनी आपली गाडी ठोकली तरी आपण च सॉरी म्हणायला लागते. Sad

वर आरती यांनी सांगितलेल्या प्रमाणे प्रसंग घडला असता तर माझ्यासारख्याने त्या मुलाला चांगली ठेवून दिली असती आणि त्याच्या आईला सुनावले असते. लहान मुल अश्या प्रकारे मोठ्यांवर (घरातल्या किंवा बाहरेच्या) हात उगारत असेल तर ती खूप गंभीर बाब आहे. मुलांना योग्य वेळी दटावायला, रागवायलाच हवे. अशी शेफारलेली मुले पुढे जावून बाकी लोकांना तापदायक बनतात त्याच काय.

आरती यांनी लिहिलेल्या त्यांच्या अनुभवातील त्या मुलाचे पालक हेच खरे कारणीभुत असतात अश्या मुलांच्या वागणुकीसाठी. मुलांना न मारण्याचे कारण देऊन मुलांना शिस्त लावणे आपली जबाबदारीच नाही हा त्यांचा दृष्टीकोन ह्या समस्येच्या मुळाशी आहे.

आरती यांनी लिहिलेल्या त्यांच्या अनुभवातील त्या मुलाचे पालक हेच खरे कारणीभुत असतात अश्या मुलांच्या वागणुकीसाठी <<< नरेश, तो एक प्रकार झाला. म्हणून सगळ्या मुलांच्या बाबतीत तेच कारण नसणार ना?

गजानन, सर्व मुलांच्या बाबतीत हे कारण नसणार हे मला सुध्दा कळतयं. पण पालकांनी स्वतःच्या मुलांना शिस्त लावणे हे त्यांचे कर्तव्य आहे हे समजणे महत्वाचे.

आरतीच्या अनुभवातील त्या स्त्रीने आपल्या मुलाला साधा दमही दिला नाही जेव्हा त्याने आरतीला मारले किंवा किमानपक्षी आता पुन्हा अस करायचं नाही हे समजावले सुध्दा नाही. वर आरतीला त्याने परतफेड केली तुझ्या धपाट्याची अस सांगुन हसायला लागली. आता ह्या घटनेवरून जर त्या मुलाने आपण कुणालाही मारले तर चालते आई आपल्याला काही बोलणार नाही हा ग्रह करून घेतला आणि आपली कृती अंमलात आणण्यास सुरूवात केली तर ते मुलही इतरांसाठी त्रासदायकच ठरणार.

मितान अतिशय सुंदर पोस्ट
<<हो आपल्या मुलांना मारता ओरडता चावता बोचकारता आलं पाहिजे. ते कुठे करायचं हे मात्र पक्कं शिकवलं गेलं पाहिजे>> माझ्या आईने पण हेच शिकवले होते. हा मला मारतो/ .तो मला मारतो करत काहीही न करता रडत माझ्याकडे यायचं नाही. स्वताहून आपण कुणाचीही खोडी काढायची नाही/ कुणालाही कारण नसताना मारायचं नाही/कसलाही त्रास द्यायचा नाही . पण समोरच्याकडून त्रास झालाच तर ऐकूनही घ्यायचं नाही . त्यांनी मारलं तुही मार . त्याने पहिल्यादी स्वताहून तुझे केस ओढले तर तुही ओढ. अस कायमच सांगायची. आणि आपल मुल गरीब स्वभावाच असेल तर हे जास्तच सांगाव लागत Happy

संगीता यांचीही पोस्ट चांगली Happy

आरती., पूर्णपणे अनोळखी मुलाला समजावून सांगणं तर नाहीच, पण तुम्ही थेट त्याच्या अंगाला हात लावलात? (हलका का होईना) धपाटा घातलात?

Happy

>>>साध्या साध्या गोष्टींमध्ये समूपदेशन, पालकांचेही समूपदेशन, काही प्रमाणात मेडिकेशन असा विचार केला जाणे हा नेहमीच विकास म्हणता येईल की प्रश्नाचा विपर्यास?<<<

मी विचारलेल्या पाच प्रश्नांपैकी ह्या पाचव्या प्रश्नाचे उत्तर तरी कृपया तज्ञांकडून अथवा अनुभवी पालकांकडून मिळावे अशी विनंती! धन्यवाद! Happy

मंजुडी, अगोदर मी समजवल होत त्या मुलाला. १५ मि. हा प्रकार चालला होता. त्यानंतरच हे घडल होत. त्या बाईशी सटर फटर बोलण झाल होत. ही फॅमिली ठाण्यातील आहे. Happy
ट्रेन १ तास लेट होती त्यामूळे अशा लोकांबरोबर वेळ घालवावा लागला होता. नशिबाने ते लोक माझ्या बोगीमध्ये नव्हते.
हा प्रकार मला बघवला नाही. आणि काही आयांना हे खरच आवडत असेल तर त्यांना _/\_.

मुलांना योग्य वेळी दटावायला, रागवायलाच हवे. अशी शेफारलेली मुले पुढे जावून बाकी लोकांना तापदायक बनतात त्याच काय. <<< साकल्य हेच काही पालकांना समजत नाही आहे.

जर कुणी अनोळखी मुलगा चुकीच वागत असेल तर त्याला त्याची जाणीव करून देणे ह्यात काही वाईट नाही.

धाग्याचे नाव कसे काय बदलले. काल काहीतरी वेगळेच नाव होते.

मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, शाळा आणी इतर पालक ह्यांनी काय करावे?
<<
<<
ज्यांची मुले दांडगाईने वागतात त्याला, इतर मुले, शाळा आणी इतर पालक काय करणार. त्या मुलांचे पालक पाहून घेतील काय करायचे ते. Happy

मंजुडी, अगोदर मी समजवल होत त्या मुलाला.>> आरती., हे आधीच्या पोस्टमधे लिहिलं असतं तर गैरसमज टळले असते.

असो.
आता एकूणच या बाफचा रंग बघता इथे काही न लिहिणंच योग्य.

वरची कोक्या यांनी दिलेले संवाद अतिशयच मनोरंजक आहेत. आता मला खरोखरच महान मानसशास्त्रज्ञ वगैरे झाल्याचा फील येतोय. Happy

@ संगीता कोल्हटकर :
पण अशा त्रासदायक मुलांच्या "बिलिफ सिस्टिम" सुधारत बसणे आमचे काम नाही आणि फुकट घालवायला आमच्याकडे तितका वेळही नाही. अशा त्रासदायक मुलांना हग्या दम देणे वगैरे अत्यंत योग्यच आहे. कारण त्या मुलांना जरब बसून त्यांनी आमच्या मुलांना त्रास देणे/इजा करणे थांबवून आमची आमची मुले सुरक्षित राहणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यांची "बिलिफ सिस्टिम" सुधारण्याची वाट बघत बसलो आणि आमच्या मुलांना जर गंभीर शारिरीक इजा झाली तर ते कुठलेही मानसशास्त्र भरून देऊ शकणार नाही. >>>

मी कुठेही बुलिंग करणार्‍या मुलांच्या वागण्याचे समर्थन केले नाही. ती मुले सुधारण्याची वाट बघत अन्याय सहन करत बसा असे तर मुळीच म्हटले नाही. तातडीने करण्याचे उपाय सुचवले आहेत. त्यात काही कडक उपाय पण आहेत. उदा : वेल ने म्हटले तसे जोवर कारवाई होत नाही तोवर रोज मुख्याध्यापकाना भेटणे. हा एक्च मुद्दा घेऊन.
(पण अशा विधायक उपायांना लागणारा वेळ तुमच्याकडे नाही नं ! )
तुमचे प्राधान्यक्रम मान्यच आहेत. पण अशा मुलांचे वागणे बदलण्याची संधी तुम्ही नाकारता आहात. तुमच्या उपायांमध्ये आणि दुसर्‍या एका प्रतिसादातील गुंठा मंत्र्यांच्या वागण्यात फारसा फरक नाहीच. मुलांपेक्षा तुमचे शारीरिक बळ जास्त आहे म्हणून तुम्ही त्याला इजा करणार ????
असो. ज्याचे त्याचे मत.

@ टोच्या,
योगायोगाने तुम्ही उल्लेखलेया भागतलीच मुलं मला हाताळावी लागतात. तुमची त्यांच्याबद्दलची मते मान्य आहेत. पण अशाच काही मुलांमध्ये अतिशय चांगले नेतृत्वगुण असलेली मुलं मला सापडली. दांडगाई करण्यात जी शक्ती वापरली जात होती ती आता शाळेच्या शिस्तीसंबंधीच्या विद्यार्थी मंडळात चांगल्या पद्धतीने वापरली जात आहे. हे हेरणार्‍या आणि करणार्‍या ५५ वर्षांच्या शिक्षिका आहेत.

आणि >>>> हल्ली खुन्याची, बलात्कार करणार्‍याची मानसिकता समजुन घ्या, तो जन्मता गुन्हेगार नाहीये तर त्याला मानसिक आजार झालाय. त्याला गुन्हेगार म्हणु नका तर आजारी म्हणा. असले फॅड वाढले आहे. >>>
तुम्ही फॅड शब्द वापरताय ते तुमचे मत म्हणून मान्य. पण खुनी बलात्कारी आणि दांडगाइ करणारी मुले यांना एकाच रांगेत बसवण्याबाबतीत तीव्र असहमती.

@ बेफि
साध्या साध्या गोष्टींमध्ये समूपदेशन, पालकांचेही समूपदेशन, काही प्रमाणात मेडिकेशन असा विचार केला जाणे हा नेहमीच विकास म्हणता येईल की प्रश्नाचा विपर्यास?<<<

बरेचदा आपल्याला साध्या वाटणार्‍या गोष्टीच एखाद्याला खूप अवघड वाटत असतात. मित्रमैत्रिणींशी बोलून, पुस्तके वाचून, आपल्या अनुभवाच्या बळावर मुलांचे प्रश्न सोडवणारे अनेक पालक असतातच.त्यांना समुपदेशकाकडे जायची गरजच भासत नाही. अशी संख्या आता वाढतेय ही खूप समाधानाची बाब आहे.

एक चांगला समुपदेशक 'साध्या' प्रश्नाचा विपर्यास कधीच होऊ देणार नाही. आणि पालक / मुलांना आपल्यावर भावनिक रितीने अवलंबूनही ठेवणार नाही.
प्रत्येक व्यवसायात जशी मालप्रॅक्टिस चालते तशी आमच्याही व्यवसायात आहेच. त्यामुळे साध्या गोष्टींचे भांडवल करून पैसे उकळणारे कौन्सेलर्सही आहेत.

माझ्या ओळखीत आरोग्याबाबत अती सजग राहणार्‍या, खुट्ट झाले तरी डॉ कडे विचारायला धावणार्‍या व्यक्ती आहेत. हाच प्रकार पालकांच्या बाबतीतही होतो. पालक म्हणून माझे काहीच चुकले नाही पाहिजे असा यांचा आग्रह असतो. त्यांच्या शब्दात ' एकच एक मूल वाढवताना चुकण्याचा चान्स घ्यायचा नसतो' ! असे पालकही येतात. यात त्यांच्या मनातली असुरक्षितता कुठेतरी कारणीभूत असते. याला तुम्ही सामाजिक मानसिक आरोग्यातली एक समस्या म्हणू शकता.

एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, समजून घेण्याची इच्छा आहे अशा वेळी इगो बाजूला ठेवून ती समजणार्‍याला विचारणे हा झाला विकास. यात प्रश्न कोणता आहे हे माझ्या मते दुय्यम.
तसेच आपल्याला एखाद्या विषयातले समजते पण विचारायला आलेल्या माणसाला समजत नाही. याचा गैरफायदा घेणे हा विपर्यास !

हा ही प्रतिसाद खूपच लांबला. थांबते.

एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, समजून घेण्याची इच्छा आहे अशा वेळी इगो बाजूला ठेवून ती समजणार्‍याला विचारणे हा झाला विकास. यात प्रश्न कोणता आहे हे माझ्या मते दुय्यम. तसेच आपल्याला एखाद्या विषयातले समजते पण विचारायला आलेल्या माणसाला समजत नाही. याचा गैरफायदा घेणे हा विपर्यास ! >> सणसणीत!!!

मितान, छान पोस्ट!

आरती.,
मुलांना मारायचे नाही हे योग्यच पण त्याच बरोबर मुलानेही कुणाला मारायचे नाही ही साधी गोष्ट पालकांना कळत नसेल तर कठीण आहे.
माझा प्रश्न - वर्गातील/शाळेतील मुलांना शारीरिक दुखापत करणार्‍या दांडगट मुलांबाबत तात्पुरते प्रिवेंटिव म्हणून हल्ली शाळेत काय उपाय करतात? मी एलिमेंटरीत होते तेव्हा बाई अशा मुलांना(१-२ च असायची) त्यांच्या शेजारी बसवायच्या जेणेकरुन कुणाला दुखापत होणार नाही. जिन्यातून जाता येता त्यांनी कुणाला ढकलू नये म्हणून ( हे तेव्हा कळत नव्हते) लाईन लीडर करायच्या. Happy

माझ्या मुलाच्या वर्गात आहे/होता एक बुलिंग करणारा मुलगा. केजीमध्ये असताना आयामनी एकदा घरी तक्रार केली, माझं आइसक्रिम (शाळेतूनच जेवणानंतर मिळालेलं) अमुक अमुक ने खाल्लं. का बरं, त्याला मिळालं नव्हतं का? असं विचारल्यावर मिळालं होतं, पण तो नेहेमीच करतो असं सांगितलं. तू टिचरला का नाही सांगितलं यावर, वो मेरा फ्रेंड है और टिचरको बताउंगा तो वो सबको मेरेसे कट्टी करने के लिये बोलेगा असं सांगितलं. याच काळात (शाळा सुरु होवून महिना पण पुर्ण झाला नव्हता) आयामला चश्म्यावरुन चिडवणं, बसमध्ये गोंधळ घालणं हे ही चालू असायचं त्या मुलाचं. हे का केलंस याचं उत्तर "अबक" नी सांगितलं म्हणून, वो हमारा बॉस है यायला लागलं.

पिटीएम मध्ये मी वर्ग शिक्षिकेशी बोलले, त्यावेळी तिने मला सांगितलं की अशी तक्रार अजून ५-७ पालकांनी केली आहे आणि आम्ही त्या मुलाच्या पालकांना पण शाळेत बोलावलंय. त्याचबरोबर तिने आयामला तो तुझ्याच वर्गात आहे, तुझ्याइतकाच आहे (त्याने मी ७ वर्षाचा आहे असं सगळ्यांना सांगितलं होतं. दिसायला थोडा मोठा आहे) आणि त्याला घाबरयची गरज नाही हे समजावलं होतं.

पुढे त्या पालकांचं आणि शिक्षकांचं काय बोलणं झालं माहित नाही, पण शिक्षकांनी या मुलाला वर्गातली छोटी-मोठी कामं सोपवायला (वह्या गोळ करणं, दुसर्‍या क्लासमधून टिचरला बोलवूण आणणं या प्रकारच्या) सुरवात केली. त्या मुलात भरपूर फरक पडलाय. गोंधळ तो अजूनही घालतो, खूप मस्ती करतो, पण त्याच्यामूळे दुसर्‍यांना इजा होत नाही. मारामारी बंद झालीये. दम देणे बंद झालंय. सगळ्या मुलांशी मिळून-मिसळून राहतोय.

याचवेळी आम्ही ३-४ पालकांनी आपापल्या पाल्यांना, जर तो तुमच्याशी किंवा तुमच्यापै़ई कुणाशी बोलत नसेल तर तुम्ही एकत्र येवून त्याच्याशी बोलणं बंद करा किंवा तुम्हाला त्याने दुसर्‍या मित्र-मैत्रिणीशी कट्टी करायला सांगितले तरी तो म्हणतोय म्हणून असं करणं चुकीचं आहे हे समजावून सांगितले होते.

उत्तम चर्चा चालू आहे. मितान, कृपया प्रतिसादाच्या लांबीचा विचार करू नका. तुमच्या प्रतिसादांमध्ये qualityही तितकीच असते.

यावर उत्तम उपाय म्हणजे आपल्या मुलांना सक्षम बनवावे. मुलांनीच अन्याय सहन न करता बुलीजशी तिथल्या-तिथे प्रतिकार केल्यास प्रकरण पुढे सहसा जात नाहि.

गेल्या वर्षी पाहिलेल्या होमफ्रंट या सिनेमातली हि क्लिप थोडी ग्राफिक आहे; मवाळ धोरण वाल्यांनी आपापल्या जबाबदारीवर पहावी... Happy

माझ्या आईने पण हेच शिकवले होते. हा मला मारतो/ .तो मला मारतो करत काहीही न करता रडत माझ्याकडे यायचं नाही. स्वताहून आपण कुणाचीही खोडी काढायची नाही/ कुणालाही कारण नसताना मारायचं नाही/कसलाही त्रास द्यायचा नाही . पण समोरच्याकडून त्रास झालाच तर ऐकूनही घ्यायचं नाही . त्यांनी मारलं तुही मार . त्याने पहिल्यादी स्वताहून तुझे केस ओढले तर तुही ओढ. अस कायमच सांगायची. आणि आपल मुल गरीब स्वभावाच असेल तर हे जास्तच सांगाव लागत >>> सुजा +१.

मी हेच धोरण अवलंबते. माझा मुलगा कराटे ब्लु बेल्ट आहे पण कुणाला उगा मारणे त्याच्या स्वभावातच नाही, मग मार खाऊन येतो, फक्त शरिरावर नाहि तर मनावर सुद्धा. मग तू पण मार त्याला, तक्रार कर वगैरे सांगावेच लागते Sad

ईथे कुणा मुलावर कितीही राग असला तरी त्याला मारणे वगैरे इम्पॉसिबल आहे, त्यांचे पालक लगेच केस करतील , आपल्या मुलाला जर तो बुली असेल तरी मारणे हा योग्य उपाय मुळीच नाही. पण लोकांदेखत रागे भरणे जरा मोठ्या आवाजात , ह्याने फरक पडतो. मग त्यावर कुणी माझ्याशी भांडायला आले तर मी पण तयारीतच असते Happy

ईथे मला एक प्रश्न मितानना विचारायचा आहे ़ आपल्या सगळ्यांवरच नेचर व नर्चर काम करत असते ़ ह्यात बुलिंग हे नर्चर मुळे असेल तर तिथे काऊन्सिलिंगचा ऊपयोग होईल पण काहि मुलांचे नेचर तेच असते अश्यावेळी ह्या मुलांना शेरास सव्वाशेर मिळाला तर ती थोडी दाबली जातात ़़ ़म्हणुन बुजर्या मुलांना दोन द्यायल्या शिकवायलाच हवे ़ कारण पुढिल आयुष्यात दोघांना त्याचा उपयोग होईल

मितान,

तुम्ही मला दिलेला प्रतिसाद माझ्या प्रश्नाशी अजिबातच सुसंगत वाटला नाही. क्षमस्व! मी एक शंका विचारली आहे आणि तुम्ही वेगळ्याच शंकेचे उत्तर दिल्यासारखे झाले आहे. कृपया राग मानू नयेत.

मात्र आता ती शंका तिसर्‍यांदा विचारणे मी आवरत आहे कारण बहुधा ह्या विषयावर वक्तव्य करण्यास मी अपात्र असल्याचे काहीजणांना सुचवायचे असावे, मनाने मोठे असल्याने ते तसे करत नाही आहेत इतकेच. Happy

लोक्स आज दिवसभर प्रवासात आहे. उद्या येईन. मोठी उत्तरे फोनवर टाईप करणे शक्य नाही.
बेफि तुमचा प्रश्न समजवून सांगा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

मात्र आता ती शंका तिसर्‍यांदा विचारणे मी आवरत आहे कारण बहुधा ह्या विषयावर वक्तव्य करण्यास मी अपात्र असल्याचे काहीजणांना सुचवायचे असावे, मनाने मोठे असल्याने ते तसे करत नाही आहेत इतकेच>>>>:हहगलो:

मितान मी पण उत्तराची वाट पहात आहे. जमेल तेव्हा लिही. आम्ही वरवरचे लिहीतोय, पण तू तज्ञ असल्याने तुझ्या उत्तराबद्दल उत्सुकता आहे. बेफी मितानला तसे वाटत नाहीये, तेव्हा तुम्ही परत विचारा.

Pages