बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे पा. कृ दिली तर चालेल का?

थोडक्यात देते. उकड आणि आंबील करायच्या पद्धती बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या आहेत.

तांदुळाची उकड करताना मी आंबट ताक आणि पाण्यात जरा पातळसर पीठ भिजवते. पिठातच थोडासा ओवा, मीठ आणि किंचित मिरपूड टाकते. खूप तेलाची फोडणी करून भरपूर लसूण, थोडे मिरची तुकडे आणि आले असेल तर तेही तुकडे टाकते, कडीपत्ता असला तर. मग ते कालवलेले पीठ घालून परतत राहते आणि ते आळलेकी झाकण ठेवते, दोन मिनिटांनी परत परतून gas बंद करते आणि थोडावेळ झाकण तसेच ठेवते. कोथिंबीर असली तर शेवटी घालते. वरून परत तेल घालून खातो पण तुम्हाला पथ्याला एवढं तेल चालणार नाही. मी नाचणी आणि गव्हाची पण सेम केली होती एकदा पण मला तांदुळाच्या पिठाचीच आवडते.

मी नाचणी आंबील पण जरा वेगळ्या प्रकारे करते. थोड्याश्या तूप-जिरे-हिंगाची फोडणी करते. लसूण- आले तुकडे टाकते. मग नाचणीचे पीठ त्यात थोडे खमंग भाजते. मग उकळलेले पाणी घालून ढवळते, गुठळ्या होऊ नयेत म्हणून आणि शिजले की मीठ, तिखट, मिरपूड, ओवा घालते आणि सर्वात शेवटी ताक घालते.

बरेच जण नाचणीचे पीठ ताकात कालवून त्यात मीठ, ओवा, तिखट,हिंग घालून शिजवतात. पातळ आपल्याला हवी तशी करायची. सांगतील अजून काही जण वेगवेगळ्या पद्धती.

नाचणीची किंवा नाचणीसत्त्वाची गंजी (नाचणी / सत्त्व पाण्यात शिजवून चवीपुरते मीठ घालून गरमागरम घेणे.)
साळीच्या लाह्या किंचित तुपावर भाजून, वरून मीठ, तिखट / मेतकूट / मिरपूड आवडीनुसार.
ताकात राजगिरा लाह्या भिजवून त्यात किंचित मिरची / ठेचा, मीठ, भरपूर कोथिंबीर घालून (काहीजण राजगिरा लाह्या शिजवूनही घेतात.)
साळीच्या लाह्यांची भेळही करता येते. लाह्या जरा शेकून घ्यायच्या. वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पथ्यात चालत असेल तर कैरी, हिरवी मिरची ठेचा, लिंबाचा रस.
चुरमुऱ्यांची सुशीला (कृती आठवत नाहीये, पण फोडणीत चुरमुरे परतून त्यांवर पाण्याचा हबका मारून ते शिजवायचे, मीठ, तिखट इ. अशीच असावी बहुतेक.)
तांदळाच्या पिठाची / नाचणी पिठाची / ज्वारी पिठाची उकड
मिश्र पिठांची धिरडी
वेगवेगळ्या डाळी वापरून व निरनिराळ्या कृतीने तांदळाची खिचडी (पोंगल, महाराष्ट्रीयन पध्दत, बंगाली, गुजराती प्रकार, आंध्र - तमिळनाडू - कर्नाटक वगैरे प्रांतांतील खिचडीचे प्रकार)
आमसुलाचे सार
कढीचे वेगवेगळे प्रकार
ताकातला चाकवत (नुसती सूपसारखी ही भाजी प्यायलाही चविष्ट लागते) किंवा ताकातला पालक.
बाजारात नाचणी / गहू / वरई वगैरे धान्यांच्या बेक्ड लाह्या / पफ्स आजकाल मिळतात. ते पफ्स थोडे शेकून तिखट, मीठ, तूप घालून... किंवा त्यांना फोडणीवर परतून / नुसते / ताकातून / दुधातून / सूपमध्ये घालून.
दुधी भोपळ्याची भाजी / भरीत / सूप
दुधी + मूगडाळ शोरबा

पथ्यात दही चालत असेल तर भाज्या उकडून त्यांची रायती
ओट्स चालत असतील तर ओट्सचा उपमा
ताकात किंवा दह्यात वा दुधात लाह्यांचे पीठ कालवून. (ताकात असेल तर मीठ, जिरेपूड, हि मि किंवा मिरपूड किंवा तिखट व कोथिंबीर. दुधात असेल तर साखर, गूळ,वेलचीपूड)
एग व्हाईट चालणार असेल तर ते फेटून त्याचे स्क्रँबल्ड / ऑम्लेट.

अरुंधती, म्या पामराचा साष्टांग दंड्वत स्वीकारावा. (खूप दिवसांपासून मनात होते, फक्त या पोस्ट्ससाठी असे नव्हे)

सातूचे पीठ चालत असेल पथ्याला तर सातूचे पीठ दुधातून, गोडीला गूळ किंवा साखर.
दलिया खिचडी / उपमा
होल व्हीट ब्रेडचा भाजून टोस्ट.
पाचक आवळा
दुधी वाफवून मिक्सरमधून काढायचा. मऊसूत झाला पाहिजे. त्या प्युरेत मीठ, मिरपूड, किंचित जिरेपूड घालून गरम / गार घेणे. अशाच प्रकारे पथ्यात बसणाऱ्या इतर भाज्याही प्युरे फॉर्ममध्ये घेता येऊ शकतात. पालक + दुधी + टोमॅटो प्युरे अशी कॉम्बोही करता येतील. स्वादाला पुदिना, आले, लिंबू रस, मिरपूड वगैरे.

सहेली Lol

वास्तुशांत साठी गोड पदार्थ काय ठेवावा? ३००-४०० लोकं असतील. जिलेबी आणि गुलाब जामुन नको म्हणतायत घरचे.
रबडी/अंगुर मलाई अथवा बासुंदी चा पर्याय आहे.
दुसरा कुठला गोड पदार्थ ठेवता येईल काय?

अननसाचा किंवा आंब्याचा शिरा किंवा कणकेचा नॉर्थ इंडियन स्टाईल गरमागरम शिरा
साटोरी
बुंदीचे किंवा मोतिचुराचे राघवदासी लाडू
पायसम् (नारळ, तांदूळ, सुकामेवा वगैरे वापरून बनवलेली दाक्षिणात्य कृतीची खीर) किंवा शेवयांची सुकामेवाजडित खीर
पाकातल्या पुऱ्या / मालपुवा
आम्रखंड
ओल्या नारळाच्या करंज्या

अरे थांबा की किती लाळगाळू लिस्टा द्याल... पैकी किती पदार्थ कित्येक वर्षात खाल्ले नाहीत मालपुवा अन मुगाचा शिरा अन नारळाच्या करंज्या....उप्स...मीच तेच लिहून र्हायले व्हय Wink

अकु तुस्सी ग्रेट हो !! मान गये !! किती सुचत ग तुला . कोणी मेन्यु विचारला इथे की मी आता तु काय काय लिहीतेस यातच इंटरेस्ट असतो मला

गरम गरम साजुक तुपात निथळलेला मुगाचा हलवा/शिरा कसला अप्रतीम लागतो! वर रबडी यम्मी!
रादर हे गरम + थंड सगळेच कॉम्बोज मस्तच लागतात.
गरम गुलाबजाम + आईसक्रीम
गरम गुलाबजाब + कुल्फी
गाजराचा हलवा + रबडी/ आईसक्रीम
जिलेबी + रबडी
मिरची हलवापण भारी लागतो. मिर्चीचा निसता सुवास असतो याला.

सीमा, दिसायला काही वेगळा नाही दिसत. बेस कसलातरी नेहेमीचाच असावा (मूग, हरबरा, गहू इ आणि सुकामेवा). रंग मात्र हिरवा (अर्थातच कृत्रिम) आणि मिरचीचा अरोमा असतो.

साधारण असाच दिसतो (फोटो गूगल इमेजेस वरून घेतलेला आहे)
mirchkahalwa.jpg.

या दिवसांत मटका कुल्फीची मजाही औरच असते. बुफे स्टाईल जेवण असेल तर कुल्फीचेही एक काऊंटर ठेवता येईल. फ्रूट सलाडचाही पर्याय आहे.

एका शेजारणीला अडिच वर्षाच्या मुलाच्या पाठीवर जुळे झाल्याने आम्ही सगळे पाळीपाळीने डबा देत आहोत. तिला नट अ‍ॅलर्जी आहे. ती, तिचा नवरा आणि अडीच वर्षीय मुलगा अश्या तिघांसाठी जेवण द्यायचे असते. सहसा तिघांना सारखेच (म्हणजे मुलामुळे बिनतिखट आणि आईमुळे बिनदाण्याचे) पदार्थ. मी आत्तापर्यंत अनेक भाज्यांसह पुलाव/ व्हेज बिर्यानी + ग्रेवीवाली भाजी (एकदा माखनी, एकदा साधी कांदा टॉमेटो, एकदा चक्क लीक आणि गाजराची ग्रेवी केली!) दिली आहे. तर आणखी पर्याय काय?

इंग्रज कुटुंब असल्याने पोळी-भाजी (हाताने) खातील का कल्पना नाही.

आज बिनमिरचीचे पण थोडे आलेलसूण आणि भरपूर खोबर्‍याचे वाटण घालून चवळीची उसळ आणि जीरा राइस/ मटारभात द्यायचा विचार आहे.

देसी स्टाइलमधे पास्ता देता येईल.

वरणफळांचे त्यांच्या चवीला जमेल असे असे व्हर्जन करता येईल. त्यासाठी गव्हाचीच कणिक हवी असे नाही. मिळत असतील तर मिक्स पिठे (नाचणी, राजगिरा, सोया, ज्वारी, बाजरी वगैरे) वापरून करता येईल.

सुक्या भाज्या किंवा सॉटे भाज्या भरपूर सॅलडमधे मिक्स करून देता येतील. बरोबर हवे तर ब्रेड/ पोळी/ टॉर्टिया

स्प्राऊट भेळ (विदाऊट दाणे)

सीमंतिनी मला विचारतेस का?
नाही गं..
इंग्रज आयडिया म्हणजे सँडविच हा दुपारच्या जेवणाचा (लाइट स्नॅक) पदार्थ. डिनर म्हणजे गरम आणि दणदणीत (!) काहीतरी. मी सूप किंवा भरपूर भाज्यांचे स्ट्यू + ब्रेड द्यावे काय असे एका दुसर्‍या शेजारणीला सहज बोलता बोलता म्हटले. तर तिने एकदम अवघडून 'ते अगदीच हल्के नाही का होणार' असे उत्तर दिले. भात+भाजी चालेल असे समजल्याने तेच ३ वेळा रिपीट केले आहे. शिवाय आजही ऑल्मोस्ट तेच होईल. पण पुढच्या आठवड्यात तरी काहीतरी वेगळे करावे असे वाटते आहे.

--
नी, पास्ता चांगला पर्याय आहे. हाताशी ठेवते. भरपूर भाज्या घालून पास्ता + होममेड पास्ता सॉस.

Pages