अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे माबोवर पूर्वीही मी लिहिले आहे, परत लिहीत बसत नाही, पण सातारच्या पोवईनाक्याकडुन चारभिंती त्या डोन्गररांगेस ओलांडुन जायला (रजताद्रीची मागची बाजू) पूर्वी एक रस्ता होता, व तिथे चकवा आहे हे ऐकुन होतो, पण एका भल्या पहाटे मीच त्या चकव्यात चांगलाच अडकलो होतो. कुठेतरी इकडेच तपशीलवार लिहिले आहे.

कुठेतरी इकडेच तपशीलवार लिहिले आहे.>>
माबोवर सुद्धा कधी कधी असाच चकवा लागतो, लिंकच सापडत नाही, बरिच पाने खणुन सुद्धा Wink

पण सगळी स्त्रीलिंगी भुते(हडळ) साडी नेसलेल्या, केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत का दिसतात?
तो त्यांचा युनिफॉर्म आहे का?

अजून एक आठवण:
एकदा रात्रीच्या सुमारास मी आणि माझा मित्र स्प्लेंडरवर चिपळूणहून कराडला येत होतो. साधारण घाटाच्या सुरुवातीलाच एक देऊळ लागतं, मला नाव आठवत नाही आता (८-९ वर्षांपूर्वीची घटना). पण ते देऊळ ओलांडून पुढे आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक टेकाड दिसतं.
रात्रीचे नऊ वाजले असावेत. मित्र गाडी चालवत होता. अचानक माझी नजर टेकाडावर गेली. टेकाडाच्या अगदी वर एक मानवी आकृती उभी होती. दोन्ही हात डोक्यावर धरून घासत होती. समोर अग्नि प्रज्वलित केलेला. मी मित्राला सांगितलं अरे तिकडे बघ म्हणून.
त्यानं फक्त एकदाच बघितलं आणि जी स्प्लेंंडर सुसाट सोडली ते घाट चढून आल्यावर पहिलं गाव लागतं तिथंच थांबला. अर्थातच ते काय होतं, काय करत होतं आता मुळीच कळू शकत नाही.
आज कदाचित शब्दांत मांडलेलं भयानक वाटणार नाही. पण ती अंधारी रात्र, तो निर्जन प्रदेश, ते गूढ अस्तित्व, ती उद्देशहीन वागणारी आकृती हे सगळं तेव्हां त्या परिस्थितीत तरी भयानक वाटलेलं होतं.
टेकाडावर तेव्हां बर्‍यापैकी झाडीझुडोरा होता. बर्‍यापैकी अवघड आहे तिथं जाणं आणि तिथं कुणी का जाईल हे पण मला कळू शकत नाही.

>>> साधारण घाटाच्या सुरुवातीलाच एक देऊळ लागतं, मला नाव आठवत नाही आता <<<
ते सोनपात्राचे मंदिर.
तशा तर शिरगाव, पोफळी पाशीही बर्याच कथा आहेत.
ती बाई दिसली म्हणालात आधीच्या पोस्टीत, ती पोफळीकडे खाली उतरणार्या रस्त्यावर असेल... पूर्वी (चाळीस एक वर्षांपूर्वी) तोच एकुलता एक रस्ता होता, नंतर बायपास झाला व पोफळीकडे वळायची गरज पडत नाही.

हा एक प्रसंग एका परिचित स्त्रीकडून ऐकलेला आहे:

त्यांना एकदा पहाटे एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. अचानक घराबाहेरुन कुणीतरी हाका मारु लागलं. बाहेर येऊन पाहताहेत तो दरवाज्यातच त्यांची प्रिय बहीण खाली फरशीवर बसून होती.
तिला तसे बघून त्यांना धक्काच बसला. त्या तिल्या म्हणाल्या "अगं अशी का बसलीस तू? आत ये की?"
तर बहीण म्हणाली "अगं मला खूप लांब जायचं आहे. मला भूक लागली खूप म्हणून तुझ्या दारात आले. काहीतरी दे ना मला खायला?" बास्स, एवढेच स्वप्न आणि त्या जाग्या झाल्या.
अगदी योगायोग म्हणजे दुपारीच त्यांना निरोप मिळाला की त्यांची बहीण आदल्या रात्री मृत्यू पावली म्हणून.

हो! कारण चुडीदार, जीन्स वगैरे घातली तर आधूनीक भूत होईल. मग त्या भुताला चान्गली पारम्पारीक गाणी कशी गाता येतील बरे? तसेही स्त्रीचे सौन्दर्य साडीतच उठुन दिसते असे स्त्री भुताला पण पक्के ठाऊक असले पाहीजे. म्हणून त्यातल्या त्यात अन्धार्‍या अमावस्येच्या रात्री, गोठवणार्‍या थन्डीत पण साधना, नैना बरसे सारखे गाणे म्हणू शकते. वहीदा रहेमान लेसवाल्या पान्ढर्‍या साडीत झुम झुम ढलती रात गाऊ शकते.

लिंबुभाऊ, असाच चकवा सातार्‍यात बोगदा व पुढील परिसरात लागतो. खासकरुन ढबेवाडी-सज्जनगड रुटवर. ओळखीतले एकजण रात्री ११ च्या सुमारास येत होते ढबेवाडी वरुन सातारला. घरी (कलावाणिज्य जवळ) पोचले
पहाटे २ वाजता. अंतर जेमतेम २ किलोमीटर. ते म्हणाले, स्कूटर नॉर्मल स्पीडने चालवत होतो पण रोडच संपत नव्हता.

कासपठार रोडवर पण बर्‍याच जणांना पाठमोरी म्हातारी दिसली आहे (साधारण रात्री ९ च्या सुमारास). तिच्याकडे मागे वळुन पाहिले कि ती माणसाला झपाटते असे म्हणतात. पण कासला हल्ली वर्दळ वाढल्याने तीचे टायमींग चुकत असावे Happy

लिंबुभाऊ, तुम्हाला अजिंक्यतार्‍याच्या वेताळाच्या पालखीची गोष्ट माहित आहे का? असल्यास टंका इथे.
कारण बर्‍याच नवीन लोकांना ती माहित नाही

राकेशची गोष्ट

राकेशची सेकंड शिफ्ट होती. मशीन्स सेटींग्ज करण्यात तो गुंगला होता. सेकंडशिफ्टला सेटींग हलल्याने बॉल बेअरिंगच्या रिंग्जच्या ग्रूव्हजचा डायमीटर अंडरकट होत होता. एकदम सगळ्याच मशीन्स हलल्याने त्याला आश्चर्य वाटत होतं. एकामागून एक सर्व मशीन्सच्या जॉ चं सेटींग करताना किती वेळ गेला त्याला कळत नव्हतं . त्या नादात आपण काही तरी विसरतोय अशी जाणीव त्याला होत होती. सात मशीन्स त्याने केल्या आणि त्याला थकवा आला. रात्रपाळीला कुणी सेटर नसणार म्हणजे त्याला थांबावे लागण्याची शक्यता होती.

इतक्यात कुत्र्याच्या अशुभ रडण्याचा आवाज आला. कामगार दचकून बघू लागले. स्वतःला शिव्या हासडत त्याने मोबाईल काढला. चुकून मेसेजेस साठी असा अभद्र रिंगटोन सेट झालेला होता.

"वेटींग फॉर यू "

एव्हढाच मेसेज. नंबर अनोळखी दिसत होता. पाच आकडी. मार्केटिंगवाल्यांचा असतो तसा.
आपण पण काहीतरी विसरत होतो हे त्याला आठवलं. मग शेवटचं मशीन टाळण्यासाठी रिपोर्ट बनवायच्या तयारीला लागत असतानाच थर्ड शिफ्टचा सेटर आला. आज नेमकाच तो लवकर आल्याने त्याने सुटकेचा नि:श्वास सोडत त्याला ब्रीफ केलं. सुपरवायझरला लवकर निघायची परवानगी मागून तो दहा वाजताच निघाला.
त्याची शिफ्ट संपली होती.

शॉपफ्लोअर मधून बाहेर पडून पार्किंगमधे येताच पुन्हा कुत्री रडल्याचा आवाज आला.

" हेरीटेज क्लब, रेस्तराँ"

त्याने गाडी चालू केली. हेरीटेजला घेतली. बाहेर साइड स्टँडवर तिरकी करत आत पोहोचला. रेस्तराँ मधे कुणीच नव्हतं. एक कपल निघण्याच्या बेतात होतं. वेटरने त्याच्याकडे नाराजीनेच पाहीलं. त्याला शिव्या हासडण्याचा मोह होत असतानाच पुन्हा कुत्री रडण्याचा आवाज आला.

"क्रिकेट ग्राउंड "

हेरीटेज पासून पुढेच क्रिकेट ग्राउंड होतं.
गाडी तिथेच ठेवून तो ग्राउंड वर पोहोचला. आत काळं कुत्रं सुद्धा नव्हतं.
त्याची अशी चेष्टा कोण करतंय हे पहायला त्याने त्या नंबरला डायल केलं. पण पलिकडून यह नंबर मौजूद नही है अशी टेप लागली. चिडून तो माघारी वळला.
अंधार होता.

इतक्यात कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज पुन्हा घुमला.

आता पुन्हा मेसेज होता.

बोट क्लब

त्याने गाडी काढली आणि रागातच निघाला. बोट क्लब दूर होतं. पण रस्ता मोकळा. थंड वारं.
गाडीचा वेग कधी सुसाट होत शंभरच्या पुढे गेला कळालंच नाही.

अंधारात बोट क्लब भयाण वाटत होता. मागे बोटींग करताना प्रेत पण दिसलं होतं. कॉलेज सुनसान होतं. वॉचमन सुद्धा हजर नव्हता. भिंतीवरून उडी मारून आल्याने श्वास जोरात चालू होता त्याचाच केव्हढा तरी आवाज होत होता,. सोबत रातकिड्यांचं संगीत. अकराच वाजत होते.

कुणीही नव्हतं.

पुन्हा एकदा अभद्र चेष्टा केली गेली होती. या जागेबद्दलच्या सर्व गप्पा आठवल्या आणि अंगावर काटा आला.
इतक्यात त्या शांततेचा भंग करणारा कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज घुमला.

रेल्वे स्टेशनचा कॅफे टेरीया !

आता शेवटचा चान्स तो घेणार होता. त्याने गाडी बाहेर आणली . झटक्यात फोर्थ गिअरवर घेतली आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या तोंडाचा आ वासला गेला.....

किती वेळ गेला त्यालाही ठाऊक नव्ह्तं. रेल्वे स्टेशनच्या कॅफे टेरीयाकडे जायचं होतं. अचानक खूप प्रकाश आणि नंतर अचानक काळोख झाल्यासारखं काहीतरी वाटलं. वेळ न दवडता तो रेल्वे स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर धावतच पोहोचला

कोण आहे, कोण बोलवतंय असं ओरडावंसं वाटत होतं. कारण इथेही अंधार होता,
वैतागून तो निघणार इतक्यात दिवे आले आणि सगळे मित्र त्याची वाट बघत असलेले दिसले. त्याच्या वाढदिवसाचा केक !
मस्त सरप्राईझ होतं.

त्याचा राग कुठल्या कुठे पळाला.
इतका उशीर का म्हणून त्याला जो तो विचारत होता. अगदी साळसूदासारखं.
तो आता काहीच बोलणार नव्हता.

पार्टी संपली आणि राकेश आणि मनोज दोघेच राहीले.
मनोज ने पण तोच प्रश्न विचारला. मग तो उसळला,

असले अभद्र मेसेजेस पाठवून चेष्टा करण्याबद्दल कडक हजेरी घेतली.
आम्ही कुणीही तुला मेसेजेस पाठवलेले नाहीत. उलट आम्ही गेले दोन तास तुला फोन करतोय आणि तुझा फोन ऑट ऑफ रेंज लागत होता.

राकेशने अविश्वासाने पाहत त्याला सर्व मेसेजेस दाखवले.
मनोजने तो नंबर आपल्या फोन मधे टाईप केला आणि डायल केला.

तर राकेशचा फोन वाजला. आता दोघेही हैराण झाले.

इतक्यात मनोजचा फोन वाजला म्हणून त्याने तो फोन घेत चालत चालत कठड्याकडे आला.
श्रुतीचा फोन होता.

ती येऊ शकली नव्हती. मनोज तिला झापणार होता.
इतक्यात तीच काहीतरी म्हणाली
पुढे ती जे काही बोलली त्यामुळे मात्र मनोज जास्त चिडला.
फक्त तोच बोलत होता.
" आपण केली तेव्हढी बास झाली चेष्टा ! आता बास "
" हे कसं शक्य आहे ?"
"तू कुठे आहेस. थांब आम्हीच येतो तुझ्याकडे "

असं म्हणत तो राकेशकडे वळाला .

तिथे कुणीही नव्हतं. कॅफे टेरीया रिकामा होता. एक्झिटचा दरवाजा सताड उघडा होता. कॉरीडॉर मधे बजर जाईल तिथपर्यंत फक्त सन्नाटा होता.
शेवटची गाडीही गेलेली असल्याने संपूर्ण स्टेशन सुनसान होतं.
तो एकटा होता. अगदी एकटा. !!!

आणि श्रुतीच्या शब्दांचा अर्थ हळूहळू त्याच्या डोक्यात शिरू लागला
, " सॉरी अरे, फार वाईट बातमी आहे."
" बोट क्लबच्या बाहेर राकेशच्या गाडीचा अपघात झाला आणि तो ऑन द स्पॉट गेलाय. मी तिथूनच घरी येतेय "

सगळ्यांना एक विनंती आहे.

इथे फक्त अमानवीय अनुभवच पोस्टावेत. उगाच हडळी केस का मोकळे सोडतात आणि परकीय भुतांना भारतीय मंत्रांनी निवारण करता येइल का इत्यादी विषयांवर बाष्कळ चर्चा करून उत्साहानं नवीन पोष्टी वाचायला येणार्‍यांचा भ्रमनिरास करू नये.

हेमावैम!

धन्यवाद सर्वांचे.
भूताच्या गप्पांमधे ऐकलेली गोष्ट / किस्सा जरा पदरचं घालून लिहीला आहे. ओरिजिनल वगैरे काही नाही त्यात. लिहीत असताना हा उल्लेख राहून गेला. त्याबद्दल क्षमस्व !

अश्विनि दिक्षित
तुमच्य मनच्य काय काय सन्शोधक कप्यांना स्वस्ति आवर घातला तर धाग्यवरचि प्रितिइइइइइ कलुन येइल सरवान्ना.

म्हणजे काय??? :अओ /

-म्हणजे अश्विनी दीक्षित बाईंनी नाव आडनावाचं स्पेलिंग चुकवू नये. स्वतःच करेक्ट करावं मनन, संशोधन करून.
-स्वस्ति असा पण आयडी आहे का ?

रुन्मेष फिरकत नाही का या धाग्यावर ?

रुन्मेष फिरकत नाही का या धाग्यावर ?>>
विशिष्ठ नावं येइ पर्यंत तो नाही फिरकत इकडे..आता कोणती नावं ते विचारु नका..

माझ्या नाव आणि अडनावाची चर्चा इथे कशाला? तुम्हाला काय माहिती पाहिजे तर विपु करा ना राव! हा धागा अमानविय कीस्स्याचा आहे तर त्याबद्दल बोलु या. उगाच अवान्तर चर्चा नकोत..
भानुप्रिया आणि जाई ला अनुमोदन.

पांढरे धोतर. पांढरी पैरण, पांढरं मुंडासं किंवा पांढरी प्यांट , पांढरा शर्ट आणि पांढरे केस असलेला माणूस अजून कसा दिसला नाही कोणाला? ::अओ:

कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेडेगावात घडलेली हि गोष्ट. आज पंचवीस तीस वर्षे झाली असतील. गावापासून थोड्याच अंतरावर नदी आहे. नदी आणि गावाच्या मध्ये शेती. उसाचे पिक जोमात आले होते. त्या शेतांना लागून असलेल्या गल्लीतल्या त्या छोट्याश्या बसक्या घरात नेहमीप्रमाणेच भल्या पहाटे उठून लगबग सुरु होती. शेत आणि घराच्या मध्ये असलेल्या परसात बंब पेटला होता. आणि तिथेच मागच्या स्वयंपाकाच्या खोलीत आपल्या एक-दीड वर्षाच्या बाळाला खाली गोधडीवर झोपवून त्या घरची स्त्री चुलीवर चहाला आधण ठेऊन बाकीची कामे करण्यात मग्न होती. बाकी कोणी अजून उठले नव्हते. बाहेर अजूनही अंधार दाटलेला होता. गल्लीत व गावात फारशी जाग नव्हती. नेहेमीप्रमाणेच तो एक दिवस होता. नेहमीप्रमाणेच सगळे सुरु होते. चहाला उकळी आली म्हणून तिने हातातले काम बाजूला ठेऊन सांडशीने चुलीवरचे भांडे उचलले आणि कपात चहा गाळू लागली. तितक्यात मागच्या घनदाट उसाच्या उभ्या पिकातून अचानक एक धिप्पाड काळी बाई आली आणि गोधडीतून दुपट्यासहित गप्पकन बाळाला उचलून पुन्हा उसात अंधारात गडप झाली.

अचानक घडलेल्या ह्या प्रकाराने त्या स्त्रीची बोबडी वळली. हातातले चहाचे भांडे तसेच टाकून तिने बोंब ठोकली. घरातले आजूबाजूचे सगळे खडबडून जागे झाले. जमिनीवर लोळण घेत तिने सर्वांना बाळाला कोणतरी घेऊन गेल्याचे सांगितले. कोण? काय? दिसायला कशी होती? असे विचारताच तिने वर्णन केले. त्या बाईने हातात हिरवा चुडा घातला होता, हिरवी साडी नेसली होती. काळा वर्ण, मोठे डोळे, भेदक नजर आणि मजबूत बांध्याची धिप्पाड अशी ती होती, असे तिने रडत भेकत सर्वांना सांगितले. ते वर्णन ऐकताच चर्चा सुरु झाली. गावात तर अशी दिसणारी कोणतीही बाई नाही हे सगळ्यांना लक्षात आले. मग कोण असेल? तितक्यात, काल सुरु झालेली अमावस्या अजून संपलेली नाही अशी आठवण कुणीतरी करून दिली. त्याबरोबर, काही वर्षापूर्वी अशाच वर्णनाच्या एका महिलेने मुल होत नाही म्हणून सासरी छळ झाल्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती व तिचा आभास त्यानंतर त्या भागात काहींना झाला होत,, त्याची बहुतेकांना आठवण झाली. आणि सगळ्यांच्या मनात चर्र झाले. बाळाच्या वडिलाचे तर धाबे दणाणले. डोक्याला हात लावून अंगातले त्राण गेल्यासारखा तो मटकन तिथेच बसला. एव्हाना ती बातमी सगळ्या गावभर पसरली होती. बघता बघता पुरुषांचे गट तयार झाले आणि ते कामाला पण लागले. उसात शेतात वेगवेगळ्या दिशांना हातात बॅटऱ्या कंदील काठ्या कुराडी जे मिळेल ते घेऊन गटागटाने लोक पांगले. भल्या पहाटेच्या अंधारात शोधमोहीम सुरु झाली. दोन अडीच तास सगळा परिसर आणि शेते अंधारात पिंजून काढली तरी बाळाचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर चांगले उजाडल्यावर दूर एका शेतातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिकडे लोकांनी धाव घेतली तेंव्हा नदीकाठच्या स्मशानाकडे जाणाऱ्या वाटेवर एका शेतात बांधाच्या कडेला दुपट्यात ते बाळ तिथे आढळून आले. सुदैवाने त्याला काही इजा झाली नव्हती. फक्त चेहऱ्यावर आणि हातावर दोन-तीन ठिकाणी उसाची पाने लागून खरचटल्याच्या खुणा मात्र दिसत होत्या. म्हणजे, पळवून आणलेल्या व्यक्तीने वेगाने त्याला उसातून पळवत आणले असावे हि शक्यता जास्त होती.

पण ती पळवणारी व्यक्ती नक्की कोण होती याचा उलगडा आजतागायत झाला नाही. गावाच्या बाहेर काही भटक्या लोकांचा तांडा पाले टाकून उतरला होता. लहान मुले पळवून त्यांना भिकेला वा कामाला लावायचे उद्योग ते करायचे. त्यामुळे काहींच्या मते (ज्यांच्या भूतखेत या गोष्टींवर विश्वास नाही) त्यातीलच कुण्या पुरुषाने साडी नेसून हे काम केले असावे अशी दाट शक्यता होती. आणि बाळ जास्त रडू लागल्याने व आजूबाजूला लोक शोध घेत आहेत याचा सुगावा लागल्याने बाळाला तिथेच टाकून त्याने पळ काढला असावा. तर बाळ स्मशानाच्या वाटेवर सापडल्याने काहींच्या मते (ज्यांच्या भुताखेतांच्या अस्तित्वावर विश्वास आहे) स्मशानाच्या बाजूला कोणतेही बाहेरचे लोक उतरले नव्हते. त्यामुळे त्या वाटेवर बाळ पळवून नेणारी एखादी अघोरी अतृप्त शक्तीच असावी व सकाळी अमावस्या संपायची वेळ येताच तिचा प्रभाव संपल्याने तिने तिथेच बाळाला सोडले असावे (अर्थात व्यक्तिश: मला हि थियरी फार गमतीशीर वाटते. त्याला कारणेही बरीच आहेत. पण ती इथे सांगत नाही. कारण या धाग्याचा तो विषय नाही. असो.)

खरे खोटे देव जाणे !

Pages