मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही स्गळे परत पाठ्यपुस्तक घेउन बसला आहात की मुलांचे पाठ्यपुस्तक वाचुन इथे लिहित आहात ..

इतके कसे लक्षात राहते/?

एक मी मध्यंतरी टीपापातही विचारली होती -

'दडिदरडी झाडीच्या संगे जंगलातल्या टपरीमधुनी
वसते आहे जीवन तेथे सातपुड्याच्या पुडा-पुडांतुनी
अनवाणी शिसवी पायांना पायवाट तर पडते अपुरी
दिवस पळे अन् रात्र भीतसे जीवनास या अशी खुमारी'

अशी - पण इतकीच - आठवते. कोणाची काय काही आठवत नाही.

एक झाशीच्या राणीवरची भा रा तांब्यांची कविता पण आवडायची

रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली..

त्यांचीच -
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
-----------------------------
कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा (रासमंडळ गोपीचंदन नावाच्या कवितेतून 'एडिट' करून उचललेला तुकडा होता तो)

ना.सि.फडक्याचा एक 'बाजार' नावाचा लघुनिबंध आठवतो - लघुनिबंधाची ती पहिली ओळख.
जी.एं.ची 'भेट' कथा होती - ते गारुड तिथे सुरू झालं.
शिल्पकार करमरकरांचा एक धडा आठवतो.
मंदिरपथगामिनीचं चित्र होतं मराठीच्या पुस्तकात हेही आठवतंय.

वरदाची वरची पोस्ट :
पहिली कविता मला नव्हती, दुसरी मला होती Uhoh
असं कसंय?
अभ्यासक्रम बदलताना सगळाच्या सगळा बदलत नसत का? Uhoh

चित्र आठवत नाहीये पण बाकीच्या तिन्ही गोष्टी आठवताहेत.
पण वरची सातपुड्यावरची कविता माहित नाही, वाचलीही नाहीये कधी.

प्राथमिक शाळेत 'खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई-राईएवढ्या' होती. 'लाडकी बाहुली होती माझी एक' होती. तेव्हाच ती 'गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या' होती.

हो, आणि ती बैलपोळ्यावरची कविता - शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली

पाडगावकरांची - गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे

आणि वनमाळी कृष्ण मित्रांबरोबर जेवतो ती एक होती (शब्द आठवत नाहीत)

स्वाती ह्या कविता मलापण होत्या लहानपणी. झाशीच्या राणीची पण होती आणि झाशीच्या राणीचा एक धडापण आठवतोय.

आनंदी आनंद गडे, टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा ह्या कविता खूप लहानपणी होत्या.

चौथीत पूर्वी कायम शिवाजी महाराजांचा इतिहास होता. सध्या माहिती नाही.

शिंगे रंगविली? नाही आठवत.
मला 'दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा, बैल माजले' अशी एक आठवते.

अन्जू, हो. Happy

नंतर ती 'मनि धीर धरी, शोक आवरी जननी, भेटेन नऊ महिन्यांनी' होती, 'गर्जा जयजयकार' होती, 'अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत' होती.

स्वाती, हो ती दिवस सुगीचे.... लेझिम चाले जोरात' ठोकळांची होती का?
बाकीच्याही होत्या

त्या बैलपोळ्याच्या कवितेचा शेवट होता -
सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायाचे

इतके दिवस कधी लक्षात आलं नव्हतं पण या सगळ्या कवितांची किमान एकेक कडवी तरी आठवतच आहेत.

स्वाती....अन्जू....

अरेच्या तुम्ही लिहिलेल्या कविता मलाही शाळेत....म्हणजे अगदी १९६७-६८.... मध्ये होत्या.

"खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या..." या कवितेसोबत जे चित्र होते ते तर आम्ही मुले ब्लेडने कापून वहीत चिकटवून ठेवल्याचे आठवते.

ग.ह.पाटील यांची ~ "शर आला तो धावुनी आला काळ विव्हळला श्रावणबाळ..." ~ ही कविता आम्हाला ज्या बाई शिकवित त्या कविता वाचू लागल्या म्हणजे हमखास डोळ्यातून पाणी येई.

कृष्णाची कविता आठवली

वनी खेळती बाळ ते बल्लवांचे
तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे
फुलांचे गळा घालिती दिव्य हार
स्वनाथासवे ते करिती विहार (बहुदा वामनपंडित)

श्रावणबाळाची कविता आम्हाला नव्हती पण माहित आहे. आत्ता एक कडवं आठवतंय

त्या ब्राह्मणपुत्रा बघुनि विस्फारित झाला नृमणि
आसवें आणुनि नयनी
मग वदला तो हा हन्त तुझ्या काळाला
मी पापी कारण बाळा

एक शिवाजी महाराज आग्र्याहून सुटकेनंतर वेष बदलून घरी जिजाऊंकडे पोचतात त्याचा नाटकासारखा संवादात्मक धडा होता असं अंधुक आठवतंय. कोणाला आठवतो का हा?

हाश! स्वाती आणि वरदा यांच्या पोस्टस वाचल्यावर मलाही मी कधीतरी शाळेत मराठीची पुस्तके वाचली आहेत हे आठवू लागले.
त्या दोघींनी सांगितल्या त्याव्यतिरिक्त :
आम्ही कोण म्हणून काय पुसता : केशवसुत आणि केशवकुमार : एकाच वर्षी.
पृथ्वीचे प्रेमगीत, गणपत वाणी, तांब्यांची नववधू प्रिया मी बावरते (हिचा दुसरा काय पहिलाही अर्थ धड सांगितला गेला नव्हता), ज्ञानेश्वरीतली सज्जनाची लक्षणे , संत नामदेवांचे पतितपावन नाम ऐकुनी, अनिलांची कोंबडा (मुक्तछंदातली), बापटांची केवळ माझा सह्यकडा
बालकवींच्या सर्वाधिक कविता असाव्यात : आनंदी आनंद गडे, औदुंबर, श्रावणमहिन्याचे गीत, फुलराणीतली काही कडवी.
कवीचे नाव आठवत नाही अश्या : मला आवडते वाट वळणाची, रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले,

ग.ह.पाटलांची गढी ही कविता होती.
कनिष्ठ महाविद्यालयात सावरकरांची स्वतंत्रता देवीची प्रार्थना.
बारावीत स्थूलवाचनाला कथा होत्या त्यात स्मशानातील सोने, किडलेली माणसे होत्या.
शाळेत दिवाकरांची एक नाट्यछटा होती : देवाला वाहिलेल्या काही वर्षे जुन्या श्रीफळासंबंधाने
त्यांचीच पोपट उडून गेला ही कथा बारावीला होती. पु.भा.भाव्यांची माणसाचा स्पर्श झालेल्या पिलाला कबुतरांनी मारण्याची एक कथा होती.
नाटकातल्या उतार्‍यांत नटसम्राट आणि एकच प्याला (यात गीता नवर्‍यांच्या नावाने बोटे मोडते तो प्रसंग)

आम्हाला नव्हती नववधू - पण त्या वृत्ताचं उदाहरण म्हणून तिचा उल्लेख व्याकरणात यायचा. Happy
दिवाकरांची आम्हाला 'बोलावणं आल्याशिवाय नाही' ही नाट्यछटा होती.

ना.सी.फडक्यांचा प्रतिभासाधन नावाचा एक टेरर पाठ होता. तो आणि पुढे टी.वाय.ला Balance sheet - true and fair view यांनी खुप छळले. अत्र्यांचा वक्तृत्वकलेच्या जोपासनेसंबंधींचा उतारा होता.
पूर्वरंगातले थायलंड म्हणजेच सयाम हे कधीही विसरणे शक्य नाही. अत्र्यांचाच साने गुरुजींवरचा मृत्यूलेख होता.
टिळकांचा एक लेख होता : अनेक गुणवंताचे गुण कसे वाया जातात (अकाली मृत्यू, योग्य परिस्थितीच अभाव) असा एक लेख होता.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या सुदाम्याच्या पोह्यांतला एक भाग होता.

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतिच काडी
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी..

याचा शेवट

गणपत वाणी बिडी पिताना
पिता पिताना मरून गेला..
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

इतकं आठवतंय. हे पिपात मेले ओल्या उंदिर वाले मर्ढेकर होते.. आय थिंक.

अन
घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परि मन खंतावतं..

ही एक. कुणाची ठाऊक नाही पण त्या कवितेची गायिलेली एक ईपी रेकॉर्ड आमच्या शाळेत होती हे आठवतंय.

दिवाकरांच्या नाट्यछटांचे वर्गात वाचन चालत असताना भाषेवरील त्यांच्या प्रभुत्त्वाचे त्या वयातदेखील कौतुक वाटायचे. म्हणजे एकच व्यक्ती संपूर्ण धडा म्हणत आहे आणि तेही समोर कुणीतरी ऐकणारे आहे या भावनेतून त्या लिखाणाकडे पाहिले जात असे. आजच्या सातवी आठवीच्या विद्यार्थ्याला "दिवाकर" आहेत की नाहीत पाठ्यक्रमात हे शोधले पाहिजे.

लघुनिबंध ह्या प्रकारात ना.म.संत याना अभ्यासिले आहे हे स्मरते. विशेषतः त्यांचा "माझा मित्र"....एका उंदराविषयीची लेख...जो लेखकाच्या खोलीत आहे वस्तीला आणि संत त्याच्याशी सलगी करीत आहेत. प्लेगच्या साथीत लेखकाला घर सोडून जावे लागते....आणि ज्यावेळी परत येतात तेवढ्या काळात हा मित्र कायमचाच निघून गेलेला असतो.

घाल घाल पिंगा वार्‍या : कृ.ब.निकुंब.

दिवाकरांची तीच ती नाट्यछटा. मी कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशा बेताने लिहिले.

वाचतेय. मलाही ह्या धाग्यावर उल्लेख केलेल्या कविता आठवल्या. पण इथे वाचल्यामुळेच परत आठवल्या. उगाचच असं आठवतच नाहीत. उगाचच असं मला कॉलेजमधलं केमिस्ट्री आणि मायक्रोबायॉलॉजी आठवतं Uhoh

स्मृतिचित्रेतला एक उतारा होता. लक्ष्मीबाई एका बाईच्या घरी जातात आणि तिथली स्वच्छता टापटीप पाहून चकीत होतात.
ना वा टिळकांची : रानात एकटेच पडलेल्या फुलास : वन सर्व सुगंधित झाले....हिचा उल्लेख आलाय बहुतेक.

>> स्मृतिचित्रेतला एक उतारा होता. लक्ष्मीबाई एका बाईच्या घरी जातात आणि तिथली स्वच्छता टापटीप पाहून चकीत होतात.
आणि टिळक म्हणतात की 'तू तर माझ्याही पुढे गेलीस'. Happy

Pages