होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तश्याही त्या आया घरातल्या घरातही काही वेगळे करताना दिसत नाहीत. दिवसभर चहा, पूजा, स्वयंपाक, सकाळी श्रीला नाश्त्याचा आग्रह, अजून काय? गाड्या धूळ खात पडणार नाही तर काय......आणि प्रत्येकीला एक खोली मान्य...पण घरातच असतात तरीही प्रत्येकीला फिरायला वेगळी गाडी.

हो....अंजली.....मलाही तो प्रकार बरा वाटला. विचार केला की शरयूने बरे पकडले त्या बेबीआत्याला. पण प्रत्यक्षात तो डाव तिच्याच अंगलट आला. कारण बेबीने उलट तिचीच झडती घ्यायला सुरुवात केली की, मी तुला आले होते सांगायला पण तूच रात्री कुठे गेली होतीस आणि तुझा फोन बंद का होता ? शरयू नित्याप्रमाणे गडबडली आणि सरसूमावशीकडे गेली मदतीसाठी.

जान्हवीबाबतीत काल खटकलेली एकच गोष्ट म्हणजे.....गाडीबाबत तिची भूमिका...."मी बसने येजा करणार !". खरेतर आहे सोय सासुरवाडीत शिवाय घरातील स्त्रियांनी तिची नोकरी करणार या इच्छेचा मान ठेवला आहे आणि गाडीसमवेत ड्रायव्हरही देत आहेत, तर आपल्या तत्वाला मुरड घालणे योग्य दिसले असते.... आता ही गोखले झाली आहे तेव्हा तेथील रितीप्रमाणे तिने वागायला हवे ही परंपरा असेल तर कशाला तो बसचा हट्ट ?

पण तुम्हीआम्ही बोलून काय फरक पडणार ? शेवटी दिग्दर्शक आणि लेखिका ठरवतील तेच.

हो मामा... काल गाडीच्या बाबतीत जान्हवी थोडी आडमुठी वाटली.... काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या केल्या तर चालतील ना....मन जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये ही स्टेप पण महत्त्वाची आहे.

एक भा.प्र. - या घरात सगळ्या बायका सतत घरातच असतात. एकही जण (आजी सोडून) घरकाम सोडून का-ही-ही करताना दाखवली नाहीये, तर मग घरी उशिरा येण्याबद्दल, जेवायला नसण्याबद्दल कळवण्याचा नियम कधी-कसा-का बनला असेल?

एक भा.प्र. - या घरात सगळ्या बायका सतत घरातच असतात. एकही जण (आजी सोडून) घरकाम सोडून का-ही-ही करताना दाखवली नाहीये, तर मग घरी उशिरा येण्याबद्दल, जेवायला नसण्याबद्दल कळवण्याचा नियम कधी-कसा-का बनला असेल?>>>>> जान्हवीच लग्न झाल्यावर. आणि हो हा नियम फक्त तिलाच आहे बर! आठवतय का मागे लग्नानंतर एकदा श्री जान्हवीच्या माहेरी गेला असताना दोघही तिकडेच मस्त जेवले होते आणि गोखल्यांकडे कळवायच विसरले होते, तेव्हा नाही एवढा इश्यु झाला, पण हिच्याकडुन अस काही झाल्यावर त्यावर २-२ एपि खर्ची घातले.

एका गोष्टीचे आभार माना की या सिरियलमधली एकही बाई विनाकारण भडक मेकप, जरिच्या साड्या किंवा भरमसाठ दागिने घातलेली दाखवली नाहिये.

हो ग दक्स, अजुन एक तुझ्या पोस्टीमुळे आठवल. श्री आणि जान्हवीलासुद्धा उगाच मिठ्या मारताना दाखवल नाहिये. नवीन लग्न होउन, बेडरुममध्ये एकांतातले सीन्स भडकपणे मांडले नाहियेत....

श्रीची जाम गोची होणार आहे. इकडे आड अन तिकडे विहीर...बिचारा चांगलं काम करायला गेला आणि आता स्वतःच फसलाय...आणि गेले काही दिवस आजी बाईंचा चेहरा पण नाही दाखवलेला नै???

मंगळवार दि. १० डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजची सुरुवात काहीशी नरमगरम वातावरणाची होती. दोन्ही मैत्रिणी संसार याच विषयावर संभाषण करीत आहेत. कामाच्या फाईल्स समोर आहेत....अधुनमधून कामही सुरू आहेच. चहावाला शिपाई परत जान्हवीलाच चहा देतो आणि गीताला टाळतो....'तुम्हाला दोन वेळा दिला आहे...' असा शेरा देतो. गीता चिडते, जान्हवी हसते. बोलणे मग पुन्हा संसाराच्या ट्रॅकवर गीता आणते. जान्हवी आपल्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची खबरदारी घेते. गीता "नवर्‍याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर" हा मुद्दा छेडते आणि म्हणते, "पुष्करशी माझे लग्न झाले तरी तो बाहेरख्याली कधीच होणार नाही....त्याचे दुसरे अफेअर असणार नाही....". जान्हवी उत्तरते, "गीता, नवर्‍याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा एकच विश्वासाचा मुद्दा असत नाही. विश्वास म्हणजे त्याने तुमचा मान किती ठेवला....एक गोष्ट मला पसंत नाही, आवडत नाही, ती त्याने माझा मान बाजूला ठेऊन परस्पर केली म्हणजे एकमेकाचा एकमेकावरील विश्वासाला तडा दिला असेच मानले पाहिजे.." बोलताबोलता गंभीर झालेली जान्हवी पाहून गीता गोंधळात पडते. हसतहसत सुरू झालेली चर्चा अशा वळणावर का आली ? हे न समजल्याने ती जान्हवीला खोदूनखोदून विचारण्याचा प्रयत्न करते, पण ती तिला दाद न देता..."ते राहू दे...काम किती पेंडिंग आहे ते बघ...." म्हणते.

गोखले गृह उद्योगच्या ऑफिसमध्ये नंदन श्री ला असा चुपचाप बसलेला पाहून मॅडमना फोन करा असा सल्ला देत आहे, पण श्री त्याला नकार देतो. तो म्हणतो, 'सकाळपासून फोन करीत आहे....कामात असेल तर ठीक आहे. पण काम संपल्यानंतर मिस्ड कॉल्सची नोंद येते त्यावरून तिने मला फोन करायला हवा होता..." यावर नंदन "आता बाकी तुम्ही नवराबायकोसारखे वागायला सुरू केले आहे....माझ्याबाबतीतही असेच झाले होते..' असे म्हणत श्री ला हसविण्याचा प्रयत्न करतो....पुन्हा एकदा फोन करा मॅडमना असेही सांगतो...पण श्री त्याला नकार देतो...."सायंकाळी पाहू...' असे म्हणतो.

सायंकाळी ऑफिस संपल्यानंतर जान्हवी बस स्टॉपवर येऊन थांबली आहे...विचारमग्न आहे....आणि तोपर्यंत श्री तिथे येतो...'हाय...' म्हणतो...पण जान्हवी त्याला प्रत्युत्तर तर देत नाहीच, उलट त्यालाच म्हणते, "श्री तू रोज येत जाऊ नकोस." यावर चमकलेला श्री म्हणतो, 'अगं, नवरा आहे मी तुझा...तुला न्यायला आलो आहे." जान्हवी उत्तर देते, "होय, पण माझ्या कामाच्या सवयी बदलू नकोस....मी अशीच ठीक आहे...." यावर काय बोलायचे ते न सुचलेला श्री इकडेतिकडे नजर टाकत असतानाच जान्हवी म्हणते, "आपण इथून जाऊ या. नको थांबायला...." श्री म्हणतो, "चल जाऊ या...पण घरी गेल्यावर बोलायचे आहे..." जान्हवी जास्त काही न बोलता गाडीकडे जाते.

गोकुळ बंगल्यात चार सासवांपैकी इंदूबाईचे रडण्याचे मोठे नाटक.....[हा भाग इतका रटाळ झाला की पाहाणार्‍यांचे डोके उठले असेल नक्कीच....] का रडत आहेत ? तर ही बाई सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी गेली होती व तेथील शॉपमधील मुली हिच्याशी इंग्रजीमध्ये बोलल्या आणि इंदुबाईला इंग्रजी येत नाही म्हणून अपमान वाटला....आणि तो घरी आल्यावर धो-धो रडून दाखवित आहेत....मग सरसू मावशी, शरयू 'उगी उगी...' चा धावा करीत आहेत....बेबीआत्या येते....तिला पाहून इंदूला आणखीनच मोठा उमाळा... मग इंग्रजी महत्वाचे की मराठी ? यावर खल....इंग्रजी शिकायलाच पाहिजे हा निर्णय....मग मी श्री कडे शिकणार असे इंदूबाई म्हणते तर मी जान्हवीकडे शिकणार असे शरयूने सांगताच बेबीआत्याच्या मस्तकाची शीर तडतडते.

काहीही अर्थ नव्हता या चार बायकांच्या बोलण्याला....काय साधले दिग्दर्शकाने हे त्यालाच ठाऊक.

दुसरीकडे पिंट्या मध्यरात्री गावाबाहेरील एका निर्जन स्थळी...झाडाखाली कुणाची तरी वाट पाहात उभा आहे. अधुनमधून तो खिशात हात घालून चंद्रहार बाहेर काढतो...त्याकडे पाहतो...परत खिशात ठेवून देतो. त्याचा मोबाईल वाजतो. फोनवर संभाषण, "होय, मी आलो आहे तुम्ही सांगितलेल्या जागी....आणि माल आहे माझ्याकडे....तुम्ही काळजी करू नका त्याबद्दल, तो आमच्या घरातीलच आहे....पण पैसे घेऊन या....काय? उद्या येतो म्हणता ? ठीक आहे...मी आता जातो...उद्या परत या वेळेला येईन मी इथे..." असे काहीबाही फोनवर बोलून परत एकदा चंद्रहार काढून पाहतो व तिथून निघून जातो.

रात्री श्री व जान्हवी त्यांच्या रुममध्ये आहेत. जान्हवी गाऊन घालून केस विंचरत आहे तर अस्वस्थ झालेला श्री तिला बोलती करण्याच्या प्रयत्नात आहे.....एक क्षण जान्हवी अत्यंत थंडपणे त्याच्याकडे पाहते आणि बेडवर ठेवलेल्या आपल्या पर्सकडे जाते....उघडते आणि त्यातून पन्नास हजाराचा तो गठ्ठा काढते....श्री च्या जवळ येते... गोंधळलेला श्री तिच्याकडे पाहात असताना त्याचा हात आपल्याकडे ओढते आणि त्यावर ते पैसे ठेवते, "तुझेच आहेत....".

श्री पुतळ्यासारखा स्तब्ध.

मामा वाचले, तो विंग्रजीचा सीन बघितला आणि पिंट्याचापण बघितला, पिंट्याने निदान बहिणीला तरी सांगायला हवे होते हाराचे.

होय अन्जू....काही दिवसापूर्वी मी देखील अशीच कल्पना केली होती की ज्या अर्थी पिंट्याला तो हार मामाच्या ट्रंकेत सापडला त्या अर्थी त्याने ओळखायला हवे की आपल्या ताईचा हा हार असून तिला जाऊन दिला पाहिजे. इतका तो आपल्या बहिणीवर प्रेम करणारा भाऊ दाखविला गेला आहेच....शिवाय असा हार आपल्याजवळ ठेवला तर काहीही घडू शकते. हे तर काही झालेच नाही, उलटपक्षी हा पठ्ठ्या तो घेऊन रात्रीच्या वेळी कुणातरी एजंटची वाट पाहात उभा आहे.

अजिबात पटलेले नाही...!

अजिबात पटलेले नाही...!>>>>+११११११
असा कसा बदलला पिंट्या अचानक?

पिंट्याच्या बाबतीत सस्पेन्स असेल, आपल्याला दाखवतील तो बिघडतोय पण काहीतरी चांगले काम करेल असे उगाचच वाटतेय मला, तो स्वार्थी असता तर अनिलबरोबर ताईच्या लग्नाला विरोध नसता त्याचा. बाबांनीपण त्याला आपुलकी, प्रेम द्यायला हवे होते.

खूप कौतुक ऐकले होते या सिरीज चे. बहुधा पूर्वी चांगली असावी. काल एक भाग पाहिला/ऐकला तो रटाळ वाटला. पहिली दहा मिनीटे त्या तीन बायका काहीतरी त्या बेबीच्या नियमांबद्दल बोलत होत्या. मग एक पुरूषी आवाज ऐकू आला - जुने रीसायकल्ड विनोद ("बायको म्हंटली बर्‍याच दिवसांत गेलो नाही अशा ठिकाणी जाऊ, तर मी तिला म्हंटले किचनमधे जाऊ" ई.ई), मागे "इथे विनोद झालेला आहे, हसा" असा क्यू देणारे टॉइंग, टूऊऊऊंग आवाज असे थोडा वेळ झाले. मग नंतर उरलेली दहा मिनीटे तो एक फोन - "तू गाडीने ये", "नको मी बस ने येते" हे सुमारे १०० वेगवेगळ्या पद्धतीने बोलणे. एकूण दोन मिनीटात होणारी चर्चा दहा मिनीटे चालवणे अशा पद्धतीने चालू होते सगळे.

फारएंड, बरोबर आहे तुमचे, खूप रटाळ झालीय मालिका, क्वचित एखादा एपिसोड चांगला होतो, मी क्वचितच बघते, इथे अशोकमामा अपडेट्स टाकतात ते मालिकेपेक्षा चांगले असतात, ते वाचायला येते त्यावरून काही इंटरेस्टिंग वाटले तर रिपीट टेलीकास्ट बघते.

मी ही किन्वा अजून कोणतीच मालिका बघत नाही पण ती उत्साहाने बघणारे आहेत त्यांना एक प्रश्न - या अशा सुजलेल्या चेहऱ्याच्या बायका बघताना आणि त्यांचे निर्बुद्ध, बालिश संवाद रोज रोज ऐकताना तुम्हाला कन्टाळा कसा येत नाही? फारच बुवा patience आहे तुमच्यात.

आता त्या जान्हवीचे जिथे-तिथे प्रत्येकाला लेक्चर देणे फारच बोअर वाटते....आणि हि जर ...गाडी मला परवडणार नाही, मी बसनेच जाणार, माझा स्वाभिमान, तत्वे असे काही आईआजी/बेबी समोर बोलली तर... फारच धिंगाणा होणार. कारण लग्नात सोन्याच्या जरीची साडी आणि चंद्रहार तर जाऊदे(ते तिला माहित नाही म्हणुन)...पण आपल्या आईने घेतलेल्या साड्या, दागिने कोठुन आले तर याची साधी माहितीही काढावीशी वाटली नाही तिला.

पन्नास हजार बघून बाबांनी अन्न-पाणी सोडले...पण लाखो रुपयाचे दगिने अन साड्या ब-या चालल्या त्यांना.

आता श्रीवर फुगुन बसली आहे....आधि हिच्या आईने येऊन पैसे मागायचे आणि जानूला सांगू नका म्हणून सांगायचे.....मग हि पैसे परत करणार आणि यालाच ओरडणार....एव्हढ्या वर्षात आईला ओळखले नाही का तिने?

आपल्या आईने घेतलेल्या साड्या, दागिने कोठुन आले तर याची साधी माहितीही काढावीशी वाटली नाही तिला.>>>> हो बघ ना. तेव्हा कुठे गेली हिची तत्व/स्वाभिमान?

sonalist..अंजली१२: अगदी बरोब्बर.... तेव्हापासूनच जाह्नवी डोक्यात जाते माझ्या. सगळ्यांना ती प्रचंड आवडते पण तिने जेव्हा स्वतःच्या आईने केलेल्या खरेदीची उलटतपासणी केली नाही तेव्हाच भ्रमनिरास झाला तिच्याबद्दल. ३-४ वर्षे तीच नोकरी करून घर चालवते असं एकीकडे दाखवायचं आणि दुसरीकडे आईने अवाच्या सवा खर्च केलाय हे तिच्या लक्षात आलं नाही असं दाखवायचं. ही मालिका लेखकांच्या हातून गल्लत झाली..
तसंच आजच्या एपिसोडमध्ये नवरा बसस्टॉप वर न्यायला आला तर एवढा भाव खायचा?....बरं तो कळकळीने विचारतोय काय प्रॉब्लेम आहे....तर उत्तर नाही....अरे लग्नाआधी एवढे मित्रबित्र होतात ना....तेव्हा गप्पा संपायच्या नाहीत..खरंतर जाह्नवीच्या दाखवलेल्या स्वभावानुसार तिने त्याला तिथेच किंवा फारतर कारमध्ये सरळ स्वच्छ सांगून टाकायला हवे होते की ही गोष्ट मला पटलेली नाही. घरी जाऊन सुद्धा नवर्याने दहा वेळेला खोदून खोदून विचारल्यावर मग बाईसाहेबांनी विषयाला हात घातला. मान्य आहे बाई तू दुखावली गेली आहेस, पण समोरच्याची बाजू न ऐकताच हुप्प करून बसणे म्हणजे मग त्या बेबीआत्या आणि तुमच्यात फक्त फटकळपणाचाच काय तो फरक उरतो. आजपर्यंतच्या जाह्नवीच्या स्वभावविशेषाला पूर्णपणे विसंगत असं तिचं वागणं दाखवलं गेलं आज.

काहीही अर्थ नव्हता या चार बायकांच्या बोलण्याला....काय साधले दिग्दर्शकाने हे त्यालाच ठाऊक. >>>>>

आज जान्हवी-श्री चं भांडण ती मोठी आई बाहेरून ऐकणार - ती इंग्रजी शिकव किंवा तत्सम बिनमहत्वाचं सांगायला आली असणार आणि तिला हे वाक्य ऐकू येणार - आई हा माझ्यासाठी सेंसिटिव विषय आहे, मला बदलायचा प्रयत्न करू नकोस - हे अर्धवट ऐकून ती काहीतरी चुकिचा निश्कर्ष (शब्द चुकलायं बहुतेक) काढणार....................

प्राजक्ता...

"...आज जान्हवी-श्री चं भांडण ती मोठी आई बाहेरून ऐकणार...."
~ होय, ते तर आहेच; कारण इंग्रजीसाठी ती श्री च्या रुमकडे धावत निघाल्याचे दाखविले होते [हाही एक मूर्खपणाचाच भाग...असो]....तर ही इंदूबाई एकतर संवादावरून आपले तर्कशास्त्र लढविणार किंवा जान्हवी श्री ला देत असलेले पन्नास हजार रुपये पाहाणार....आणि त्याबद्दलही स्वतःचे मत तयार करून गोंधळ आणखीन् वाढविणार.

~ एकूण मालिकेतील रंगत वा नाट्य खालच्या पातळीकडे झुकू लागल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

मला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस ....या भरत वाक्यावर दोघेही ठाम दिसताहेत.

आत्मसन्मानाचा फीवर चढला असताना मनीष तिला सांगतो ...अगं या सगळ्यावर श्रीची पण काही बाजू असेल ..बोल त्याच्याशी...पण जान्हवी तेही ऐकत नाही.

मुलीला श्रीमंत सासर मिळाल्यावर स्वतःचे रहाणीमान न बदलण्याबद्दल सदाशिवरावांची भूमिका पटते.
पण जान्हवीच्या भूमिकेबद्दल उलट्सुलट मते असू शकतात.

अजून एक..

जान्हवीच्या प्रकट चिंतनासाठी घेतलेले मैत्रिणीचे गीताचे पात्र बरोबर.....पण श्रीच्या मदतीसाठी घेतलेले नंदन हे पात्र मात्र लहान तोंडी मोठा घास वाटते.

जान्हवीच्या प्रकट चिंतनासाठी घेतलेले मैत्रिणीचे गीताचे पात्र बरोबर.....पण श्रीच्या मदतीसाठी घेतलेले नंदन हे पात्र मात्र लहान तोंडी मोठा घास वाटते.>>> हो अवनी.

तसही तिचा आत्मसन्मान जरा डोक्यात जायला लागला आहे. ती श्रीची बाजू ऐकूनही घेत नाहीये.

Pages