मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शकुनी मस्त दिसतोय.

द्रोणाचार्य म्हणतात की माझा मुलगा मरणार नाही तेव्हा कृष्ण सांगतो की तो मेला नाहीये पण तुम्ही धर्मरक्षणासाठी आणि सत्यासाठी शस्त्रत्याग करा, अगदी तंतोतंत डायलॉग आठवत नाहीये पण अशाच आशयाचा संवांद दाखवला आहे दोघांच्यात, कृष्णाचं ऐकून द्रोणाचार्य शस्त्रत्याग करतात.

अश्वत्थामा चिरंजीवी होता असं वाचलंय. त्याला मरण येऊ शकत नव्हतं. हे द्रोणांना ठाऊक नव्हतं कां?? मग त्याच्या मृत्युची वार्ता ऐकुन ते कां सैरभैर झाले??
.

तेव्हाचे लोक धर्म -अधर्म याचा विचार फार करत. आपण अधर्म केला तर त्याची फळे आपल्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीला पण भोगावी लागतात हा विचार सर्वमान्य होता (आजही बर्याच प्रमाणात आहे). ब्राह्मण असूनही युद्धात उतरणे तेही अधर्मी कौरव पक्षाकडून हा गिल्ट द्रोणांच्या मनात असतोच. कृष्णाच्या योजनेनुसार भीम आणि इतर जण हाच विषय परत परत बोलून द्रोणाचा तेजोभंग करत असतात (आजच्या भाषेत स्लेजिंग). अश्वत्थामा 'चिरंजीवी' आहे हे द्रोणांना ठाऊक असते मात्र भीम आणि नंतर युधिष्टिर पण अश्वत्थामा मेला असे सांगतात तेव्हा ते त्यावर विश्वास ठेवतात कारण आपण अधर्माने वागलो, आपल्या अधर्माची फळ आपल्या मुलाला भोगावे लागले. आपल्या अधर्मामुळे आपल्या मुलाचे चिरंजीवत्व पण नाहीसे झाले या विचाराने त्यांचे मन त्यांना खाऊ लागते व ते शस्त्रत्याग करून ध्यानाला बसतात.

महारथी अश्वत्थामा अमर असतो म्हणून तो एकटा सर्व पांडव सैन्य संपवू शकेल असे होत नाही कारण तसे तर भीष्म पण इच्छ्चमरणाचा वर घेवून आलेले असतात मात्र त्यांना जायबंदी करण्यात पांडव यशस्वी होतातच तेव्हा अश्वत्थाम्याचा असाच उपाय कृष्णामुळे पांडवानी केलाच असता.
बाकी अश्वत्थाम्याबरोबर उरलेले कृपाचार्य आणि कृतवर्मा या लोकांनी दाखवलेच नाहीत. अश्वत्थामा शिबिरात घुसून पांडव सैन्याची खांडोळी करतो आणि हे दोघे बाहेर थांबून कुणी निसटू पाहत असेल तर त्याला संपवत असतात. अश्वत्थाम्याला त्या रात्री शिवाकडून वरदान मिळालेले असते त्या रात्री तो अजेय असतो. त्याच्या समोर पांडव आल असते तर त्यांना पण त्याने कापून काढले असते म्हणून कृष्ण पांडवांना दुसरीकडे घेवून जातो असे काहीजण म्हणतात.

धन्यवाद निमिष.
अश्वत्थामा पांडवांवर ब्रम्हास्त्र सोडतो त्याला अर्जुन पण ब्रम्हास्त्र सोडून उत्तर देतो. तेव्हा संभाव्य प्रलय ओळखून व्यास आणि कृष्ण दोघांना ब्रम्हास्त्र माघारी घ्यायला लावतात (या सगळ्या गोष्टी व्यासांच्या आश्रमात घडतात) अर्जुन आपले ब्रम्हास्त्र माघारी घेतो मात्र अश्वत्थाम्याला ब्रम्हास्त्र माघारी घेण्याचे ज्ञान नसते तेव्हा तो ते अस्त्र पांडवांच्या वंशावर वळवतो. मग पुढे अश्वत्थाम्याची निर्भत्सना, शाप वगैरे गोष्टी घडतात. या महाभारतात मात्र सुरुवातीलाच तो उत्तरेच्या गर्भावर अस्त्र सोडतो वगैरे गोष्टी दाखवल्या आहेत. मी याआधीही म्हटल आहे त्याप्रमाणे कौरव, कर्ण, अश्वत्थामा यांची प्रत्येक गोष्ट चूक किंवा घृणास्पद कशी दाखवता येईल हेच हे लोक दाखवत आहेत अस दिसतंय.

कृपाचार्य बाहेर पहारा देत होते आणि अश्वथाम्याने आग लावली असं आहे नं ते. इथे अश्वथामा तलवारीने सगळ्यांना मारतो आणि कृपाचार्य तर फक्त सुरवातीला २ वेळा दाखवले होते . नंतर गायबच झाले

अरे अश्वत्थामा अमर नव्हता आधी! त्याला अमरत्वाचा शाप दिला ना , बहुधा कृष्णाने ?
त्याच्य डोक्यवरचा मणी दिव्य होता त्यामुळे त्याचे विशिष्ट प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण होत होते एवढे मला वाचल्याचे आठवत आहे. कृष्णाने त्याला शाप दिला की काही हजार वर्षे तो मृत्यू ची याचना करत राहील पण तो येणार नाही, अनेक रोग आणी जखमा होतील ज्या कधीच बर्‍या होणार नाहीत, त्याच्या डोक्यावरचा तो मणी पण तेव्हा काढून घेतला गेला, त्याची जखम पण कधी बरी होणार नाही वगैरे.

मृत्यूंजय मध्ये असे आहे की त्याचा मणी कृष्ण मागून घेतो.त्याची ती जखम मात्र न भरता कायम भळभळतच राहील, असंही सांगतो कृष्ण.

सांप्रतकाळातील तमाम साहित्यिकांनी ‘अश्वत्थाम्यासारखी भळभळती जखम घेऊन ’ हे वाक्य आपल्या एका तरी कथा, कादंबरीत लिहिलेलं असेल, इतकं ते कॉमन आहे.

वाक्य आपल्या एका तरी कथा, कादंबरीत लिहिलेलं असेल, इतकं ते कॉमन आहे.
नि मायबोलीवर हातासरशी दहा बारा गझला.
फक्त गझलेत
भळभळती अश्वत्थाम्यासारखी घेऊन जखम
असे लिहीतील.

आज शेवटचा एपिसोड. वाईट वाटतेय!!
आपल्या सगळ्या चर्चेला, भेटीला आता पूर्णविराम मिळणार !! Sad Sad

ठीक आहे. महाभारत, रामायण यांना भारतात कधीच पूर्णविराम मिळणार नाही. त्या कथा नि त्यातून घेण्यासारखा उपदेश कालातीत आहे.
फक्त दुर्योधनाचे रेकणे थांबले म्हणून जरा शांत शांत वाटत आहे.

पांडवांचे स्वर्गारोहण आणि कृष्णाचा मृत्यु देखिल दाखवायला हवा होता, त्याची माहीती खुप कमी लोकांना आहे.

आजच एपिसोड शेवटचा होता का .. कृष्णाचा अभिनय किती सुरेख केला आहे सौरभ जैन ने ! hats of to him !!!
अक्षरश जगला आहे भूमिका . कृष्ण गांधारीला समजावताना चा प्रसंग पण लाजवाब .
आज जितके पण महाभारत पाहिले त्यात हा कृष्ण म्हणून स्मरणात राहील .
साडे आठ ला महाभारताची आठवण येईल .

आज जितके पण महाभारत पाहिले त्यात हा कृष्ण म्हणून स्मरणात राहील .>>> + १
साडे आठ ला महाभारताची आठवण येईल . >> + १
एकमेव सिरीयल जी पहिल्या पासुन शेवट पर्यंत पाहिली, आणि पहाविशीपण वाटली. ३-४ भाग बोअर झाले असतिल फार फार तर. साडे आठ ला टीव्ही लावण्याची खुपच सवय झाली होती.. Happy बरेच दिवस आठवण येत राहणार Uhoh

कृष्णाचे संवाद अप्रतिम होते. गांधारीला समजावतान आणि नंतर प्रेक्षकांशी साधलेला संवाद ज्यानं कुणी लिहिला होता त्याला सलाम...

महाभारत अगदी पहिल्या एपिसोडपासून पाहिलं, अधलेमधले झोल सोडले तरी महाभारताचा हा प्रयत्न खूप प्रामाणिक वाटला, कित्येकवेळा कथानकामध्ये असलेल्या गोष्टींन सद्य सामजिक परिस्थितीला अनुसरून केलेलं भाष्य फार परिणामकारक वाटलं.. छॉट्या छोटे प्रसंग अथवा दृष्ञे फार छान घेतली होती. (उदा: विजयी वीरांना ओवाळायला उत्तरा उभी होती!! मला ते खूप टचिंग वाटलं)

सुरूवातीला स्पेशल ईफेक्टवरचा जोर कमी करून त्याऐवजी हुमन इंटरेस्ट वर नंतर नंतर लक्ष केंद्रित करत गेले होते.

नंदिनी मलापण विजयी वीरांना ओवाळायला उत्तरा होती ते खूप भिडलं मनाला.

नितीश भारद्वाजने अप्रतिम कृष्ण केला होता त्याची छाप होती आत्तापर्यंत पण सौरभ जैननेतर त्याच्यापेक्षाही उत्तम कृष्ण उभा केला, मधली महाभारते बघायची डेरिंग नव्हते पण हे सुंदर होतं, काही अपवाद होते की जे आवडले नाहीत पण एकंदरीत चांगलं होतं.

मी रात्री १२ला बघायचे आता चुटपूट लागेल त्यावेळी.

महाभारत अगदी पहिल्या एपिसोडपासून पाहिलं, अधलेमधले झोल सोडले तरी महाभारताचा हा प्रयत्न खूप प्रामाणिक वाटला, >> +१००
फक्त शेवटच युद्ध अन कौरव म्हणजे अगदी पूर्ण व्हिलन दाखवण सोडल तर इतर गोष्टी छानच जमल्या होत्या . विशेषतः कृष्ण , कर्ण , धर्म अन शकुनीचा अभिनय आणि कृष्णाचे संवाद

विशेषतः दुर्योधनाचे अति आरडाओरडा करणे आवडले नाही. शिखंडी स्टोरी पटली नाही, अभिमन्यूवध पटला नाही. ह्या गोष्टी आधीच्या चोप्रांच्या महाभारतात चांगल्या handle केल्या होत्या.

पण त्या महाभारतात नकुल, सहदेव आणि उपपांडव यांना महत्व नव्हते दिले, ह्या महाभारतात बऱ्यापैकी त्यांना महत्व दिले गेले, हे आवडलं.

फक्त शेवटच युद्ध अन कौरव म्हणजे अगदी पूर्ण व्हिलन दाखवण सोडल तर इतर गोष्टी छानच जमल्या होत्या . विशेषतः कृष्ण , कर्ण , धर्म अन शकुनीचा अभिनय आणि कृष्णाचे संवाद >> +१
कृष्ण आणि शकुनीचा अभिनय जबरदस्त होता. आमच्या घरी शकुनीचा अभिनय सगळ्या ना खूप आवडला.

महाभारत कथेचा समारोप करताना श्रीकृष्णाचे संवाद अत्यंत उत्कृष्ट होते, विचार करायला लावणारे होते. आत्तापर्यंत अनेक मातांचा आशीर्वाद घेत आलो आहे आता तुझा शाप पण स्वीकारतो असे तो गांधारीला म्हणतो तो प्रसंग खासच जमून आला होता. अश्वत्थाम्याला शाप देणारा आणि तो शाप भोगणारा मीच, दुर्योधनाच्या मांडीवर प्रहर करणारा पण मीच आणि वेदनेने ओरडणारा पण मीच, कौरव-पांडवाकडून लढणारा पण मीच अश्या अर्थाचे तो बोलतो तेव्हा गीतेतले सारच मांडताना दाखवले आहे. योगेश्वर श्रीकृष्णाला शतशः प्रणाम!

मी दररोज सकाळी साडेआठला महाभारत पहायचो. आजही पाहिले. अनेक भाग दोन-तीन वेळा पाहूनही नवीनच वाटायचे. मी डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट आणि बातम्यांचे चॅनल सोडले तर इतर एकही मालिका पाहत नाही. पण एवढी एकच सिरीअल अशी होती, जी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत न चुकवता पाहिली. जे भाग चुकले ते रविवारी पाहिले. ज्या दिवशी सकाळी बाहेर जायचे असेल त्याच्या आदल्या रात्री जागून रात्री बारा वाजताचे भाग पाहिले. आता दररोज सकाळी मला चुकल्याचुकल्यासारखे वाटेल.

Pages