नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

के रुस्तमकडचे सर्वच प्रकार बेताचे गोड असतात. ते नॅचरल्स च्या आधी पासून आहेत ( मीच त्यांच्याकडे १९८१ पासून जातोय Happy )

मी गेल्या विकेंडला सीताफळाचं ट्राय केलं चव मस्त होती पण इथे बर्‍याच जणांनी लिहिल्याप्रमाणे बर्फाळ झालं थोडनेक्बाकीचे म्हणतयत तसं सेट होत आलं की परत एकदा मिक्सरमधून काढलं तर होतय का बघायला हव

आता सगळ्यांना उपयोगी पडेल हा धागा म्हणून वर काढते.
काल एका कलीगने बरका फणस दिला. मी लगेच हे आपले स्पेशल आइस्क्रीम केले आणि आज आणुन तिला दिले. खुप आनंद झाला तिला.
फार यम्म्म्मी लागत आहे. थँक्स मुग्धटली.......................

गेल्या आठवड्यात सीझनचं पहिलं आंबा आईसक्रिम घडलं... नेहमीप्रमाणेच मस्त झालं होतं. पुन्हा एकदा, थँक्यू मुग्धटली!

मी एकुणातच पहिल्यांदा घरी करणार आहे आईस्क्रीम. माझ्या मुलीला गाईचं दूध चालत नाही, त्यामुळे नेस्लेची मिल्क पावडर चालणार नाही कारण त्यात "cow milk solids" असा उल्लेख आहे. तर पर्याय म्हणून काय वापरू? हापूस, साखर आणि म्हशीचं दूध हे सध्या मुख्य घटक असणार आहेत. साय नेमकी विरजणात घातली. १००% खात्रीचं क्रीम आहे का ज्यात गायीच्या दुधाचा अंशही नसेल? घरी म्हशीचं दूध तापवून नीट आणि पुरेशी साय यायला २ दिवस लागतील मला.
बाहेरचे मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे पुन्हा टेन्शन. कसं करू? (शेवटचा पर्याय म्हणजे २ दिवसांनीच करणं - तो सोडून काही करता येईल का?)

मी एकदा आंबा आइसक्रीम केले पण मिक्सरमधून घूसळायचे विसरले. जो पदार्थ तयार झाला तो बर्फाळ वगैरे नव्हता पण आइसक्रीमचा फिल अजिबात आला नाही. मिल्क पावडर आंब्याच्या मिसळून खाल्ल्यासारखे वाटले. आता परत एकदा करेन मिक्सरमध्ये घुसळून.

९, दोन काय चार दिवसांनी कर की! बाहेरच्या प्रॉडक्ट्सची खात्री नसेल तर मुलीच्या आरोग्याशी खेळ कशाला आणि त्यात चर्चा काय करायची?

अचानक उद्भवलेली सर्दी कधी कमी होतेय त्याची वाट बघतेय... टेंडर कोकोनट, आंबा, चिकू, बनाना आणि ओरिओ (व्हाईट) फ्लेवर्स ट्राय करून झालेत गेल्या सिझनला. सगळेच यम्मी झालेले पण आंबा आईस्क्रीमला मस्त क्रिमी फ्लेवर येतो त्याला तोड नाही!! टेंड्र कोकोनट, बनानाला वरून बोर्नव्हिटा आणि ओरिओ फ्लेवरला ओररिओचीच बिस्कीटे चुरून घातलेली वरून. चार तासात मस्त फ्रीज होत असल्याने आणि जास्त वेळ ठेवण्याचा पेशन्स संपल्याने बाहेर काढलेले तर क्रिस्टल्स झाले नव्हते. तसंही दूध दोनदा गरम केल्याने थोडे आटलेले, सो पाण्याचा अंश कमी झाला असणार. म्हणून मिक्सरमधून पुन्हा फिरवावे लागले नव्हते. पण मिक्सरमधून पुन्हा फिरवल्यास आणखी मऊसूत होत असणार. तसं ट्राय करणारेय यावेळी!

मध्यंतरी या पद्धतीने आईस्क्रिम केले होते. मस्त झाले.

मुग्धटली, धन्यवाद.

हा फोटो...
ice cream.jpg

मुग्धा, आज तू दिलेल्या आईस्क्रीमचा मुहुर्त करतेय. पण वर जे तू प्रमाण दिले आहेस, त्यात ते किती जणांना पुरते ते लिहीलेले नाहीये. तू आता मायबोलीवर असशील तर कृपया हे सांग. किंवा बाकी मुलींनी ( ज्यांनी या पद्धतीने केले आहे ) लिहीले / सांगीतले तरी चालेल. आगाऊ धन्यवाद!

रश्मे किती लोकांना खायचंय आईस्क्रिम? तिने वाटी चं प्रमाण दिलंय तु कपाने घे हाकानाका.
मी सगळं एकेक कप घेऊन केलं होतं (एक मिडियम साईज चा बाऊल पाऊण भरून आईस्क्रिम होतं) त्यात ३ जणांनी आरामात खाल्लं. आणि पहिल्यांदाच करणार असलीस तर वाटीचं च प्रमाण घ्यावस हे उत्तम.
माझा एक अनुभव सांगते की सेट करायला ठेवताना हे मिश्रण अशा डब्यात ठेवायचं ज्यात अजिबात जागा उरणार नाही. नाहीतर बर्फ वर साठतं..

दक्षु , धन्यवाद गं! मी वाटीनेच प्रमाण घेतलेय. तुझा मेसेज उशिरा बघीतला. पण डब्यावर ( ज्यात आईस्क्रीम सेट करायला ठेवलेय ) त्यावर झाकण ठेवलयं. हे बाहेर काढुन मिक्सर मधून फिरवुन परत सेट करायचे का? की खाण्याच्या तासभर आधी फ्रिझर मधुन काढुन फ्रिझ मध्ये ठेवावे. कारण आधीची आईस्क्रीम्स मी एकदा मिक्सीतुन काढुन परत सेट करत होते.

खाण्याच्या तासभर आधी फ्रिझर मधुन काढुन फ्रिझ मध्ये ठेवावे. ----मग आईस्क्रीम कसं राहील? मिल्कशेक नाही का होणार! किंवा मस्तानी होईल!

अरे लाईट गेल्याने तुला उशिरा उत्तर देतेय सॉरी. झाकण घट्ट नाहीये. पण आईस्क्रीम मात्र घट्ट झालेय. अजून चव बघीतली नाही, पण मस्त कलर आलाय. मी आज हापुसचे केलेय. बाकी प्रमाण तेच.

राजसी त्याचा मिल्कशेक नाही होणार, मी सावलीची पोस्ट बघीतली होती , म्हणूनच मला तसे करुन बघायचे आहे.

तयार आईसक्रिम मिक्सर मधे फिरवलं तर मिल्क्शेक नक्कीच होत नाही. आणि ते खायला जास्त चांगलं लागतं. एकदम स्मूथ होतं.
काकू असं आईस्क्रिम करायची. वर दिलेली पद्धत न वापरता, ती तिच्या पद्धतीनं प्लेन आईसक्रिम करायची. मग हव्या त्या फळाचे थंडगार केलेले तुकडे + हे प्लेन आईसक्रिम अस ब्लेंडरमधून फिरवून मग लगेच खायला द्यायचं. ही शेवटची कृती फटाफट झाली पाहीजे. खायला द्यायचे बोल्स-चमचे आधीच घेऊन ठेवायचे.
ब्लेंडेड ताज्या फळाची चव मस्त लागते यात. मी चिकू, पेरू, आंबा आणि अननस यांची आईसक्रीम्स खाल्लीत तिच्या हातची.
वर दिलेल्या कृतीतही हे करता येईलच Happy

योकु मी आईस्क्रिम स्मूद करायला मिक्सर मध्ये घातले पण अती थंड् असल्याने मोटार बन्द होत होती सारखी.

मुग्धा थॅन्क्स, आईस्क्रीम मस्त झाले या सोप्या कृतीने. फोटो काढायला वेळ झाला नाही कारण १ मेंबर अचानक आल्याने खाण्या-बोलण्यात वेळ गेला. दक्षु तुला पण थॅन्क्स वेळेवर उत्तर दिल्याबद्दल.

Pages