वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)

Submitted by रसप on 1 December, 2012 - 00:42

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

talaash_350_110512050053.jpg

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता एका मराठी वाहिनी वर 'खिलाडी चं परीक्षण ऐकलं.
ऐकतानाच इतकं boer झालं, picture किती boer असेल.
अक्षयचं नाव त्यात ' बहत्तर सिंग' आहे. असलं काही नाव असतं कधी?

चांगलाच आहे मूव्ही Happy शेवट सोडला तर... डोकं बाजूला ठेऊन बघितला, कारण आधीच इथली संपूर्ण चर्चा वाचलीच होती, सो ऑप्शन नव्हता Lol

तलाश मधे मधेच एका सीनमधे करीना शशीच्या खोलीत जखमी पडलेली दाखवली. हा काय प्रकार आहे समजले नाही. ती तर रस्त्यावर पडली होती ना.

सुमेधाव्ही, बरोबर आहे. शशीच्या घरात तैमूरला जी सिडी मिळते त्यात ते जखमी करिनाला घरी आणतात असं दाखवलं आहे.

सायो...सुमेधाव्ही....

काही तरी गोंधळ होत आहे असे मलातरी वाटत आहे.

१. सीमरन सीडी तयार झालेली आहे ती हॉटेल लिडोच्या सिक्युरिटी कॅमेराद्वारे. त्यात अरमान, निखिल आणि संजय या तिघांच्या मागोमाग सीमरन जाताना दाखविले आहे.
२. चालत्या कारच्या दृश्यात तिघे तरुण दंगा करत असतात....सीमरन मागे आहे. तिच्या शेजारी असलेला निखिल धावत्या गाडीत तिच्याशी झटापट करतो आणि अर्धवट लागलेल्या कारच्या दरवाजातून ते दोघेही बाहेर फेकले जातात.
३. पुढे बसलेले संजय आणि अरमान घाईने खाली उतरून प्रथम आपल्या जखमी मित्राला...निखिलला....कारमध्ये घेतात. दुसरी जखमी सीमरन या दोघांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहते. पैकी अरमान सीमरनच्या मदतीसाठी जात असताना संजय त्याला 'सोडून दे तिचा नाद....आणि चल पळू या येथून' असा ओरडा करतो. गोंधळलेला अरमान त्याच्या मागे जाऊन कारमध्ये प्रवेश करतो.

४. सीमरन तिथेच रस्त्यावर [तेही मुंबईच्या] रक्तबंबाळ जखमी अवस्थेत लोळत पडली आहे.
५. आता प्रश्न असा की, जो शशी तिला घेऊन आपल्या घरी येतो....डॉक्टरला घेऊन येतो...ते पाहाणार्‍या तैमूरच्या अंगावर चूप बसण्यासाठी बरसतो....त्या शशीला जरी नंतर फोनवरून संजय वा अरमान यांच्याकडून झालेला प्रकार समजला तरी तो त्या अपघातस्थळी एकट्याने जातो आणि तोपर्यंत तशाच अवस्थेत पडलेल्या सीमरनला त्या पॉश एरियातून आपल्या रेड लाईट एरियामधील रूममध्ये आणतो आणि हे कुणीच पाहात नाही, हे पटणे फार फार जड जाते.

[हा भाग सीडीमध्ये येत नाही....थेट एक डॉक्टरच त्या रूममध्ये शशीसोबत आल्याचे दाखविले आहे....]

६. बरे....हॉटेल लिडोच्या अखत्यारीतील त्या सिक्युरिटी सीडीतील नेमका तेवढाच भाग शशीसारख्या एका टिनपाट दलालाला ते 'स्टार हॉटेल' कसे काय देऊ शकेल ?

[सीमरन मरणोन्मुख पडलेल्या तैमूरला 'झाले ते बरेच झाले.....तू स्वतःला माझा मित्र म्हणत होतास ना ?' असा टोला मारते. सीमरनच्या अवस्थेला तैमूर कसा काय जबाबदार ?]

....आता या शंका डोक्यात येऊ लागल्या आहेत.

५. आता प्रश्न असा की, जो शशी तिला घेऊन आपल्या घरी येतो....डॉक्टरला घेऊन येतो...ते पाहाणार्‍या तैमूरच्या अंगावर चूप बसण्यासाठी बरसतो....त्या शशीला जरी नंतर फोनवरून संजय वा अरमान यांच्याकडून झालेला प्रकार समजला तरी तो त्या अपघातस्थळी एकट्याने जातो आणि तोपर्यंत तशाच अवस्थेत पडलेल्या सीमरनला त्या पॉश एरियातून आपल्या रेड लाईट एरियामधील रूममध्ये आणतो आणि हे कुणीच पाहात नाही, हे पटणे फार फार जड जाते.

>> हा सगळा प्रकार मध्यरात्री घडलेला असतो. रेड लाईट एरिया त्या अपघातस्थळापासून जवळच असतो (तसा संदर्भ अरमानच्या अपघाताची प्राथमिक चौकशी करताना संवादांत आला आहे.)

[हा भाग सीडीमध्ये येत नाही....थेट एक डॉक्टरच त्या रूममध्ये शशीसोबत आल्याचे दाखविले आहे....]

>> कसं शक्य आहे येणं? ती सीडी हॉटेलचं सीसी टिव्ही फुटेज असतं !

६. बरे....हॉटेल लिडोच्या अखत्यारीतील त्या सिक्युरिटी सीडीतील नेमका तेवढाच भाग शशीसारख्या एका टिनपाट दलालाला ते 'स्टार हॉटेल' कसे काय देऊ शकेल ?

>> त्याचं हॉटेलसोबत 'सेटिंग' असतं.. (असाही संदर्भ एका संवादात आहे.) दलाल लोक आपल्यासाठी 'टिनपाट' असतात. हॉटेलवाले दलाल, रिक्शावाले, टॅक्सीवाले, गाईड ई. लोकांना खूप भाव देतात कारण ते नियमितपणे गिर्‍हाईकं आणत असतात.

[सीमरन मरणोन्मुख पडलेल्या तैमूरला 'झाले ते बरेच झाले.....तू स्वतःला माझा मित्र म्हणत होतास ना ?' असा टोला मारते. सीमरनच्या अवस्थेला तैमूर कसा काय जबाबदार ?]

>> तो सिमरनच्या अवस्थेस कारणीभूत नसतो, पण तिच्या मृत्यूमागचं रहस्य समजल्यावर, तिचा मित्र असूनही तिला (मरणोत्तर) न्याय न मिळवून देता/ तसा प्रयत्न न करत/, तो तिच्या मृत्यूचं भांडवल करत असतो... हा त्याचा दोष.

Happy

रसप......

सीडीच्या संदर्भातील खुलासा वर सायो यानी असा केला आहे...."शशीच्या घरात तैमूरला जी सिडी मिळते त्यात ते जखमी करिनाला घरी आणतात असं दाखवलं आहे."....त्यास उद्देश्यून मी लिहिले होते की जखमी करिनाला घरी आणले जाते तो भाग सीडी चित्रीत होत नाही. फक्त लिडो मधून ते चौघे [३ + १] बाहेर पडतानाचेच दृष्य सीडीत दिसते.

बाकी...

१. रेड लाईट एरिया वा त्यालगतचा भाग अपघाताचा असू शकेल हे मान्य.
२. लिडो हॉटेल असे फूटेज शशीसारख्या दलालांना देत असेल यावर विश्वास बसणे काहीसे कठीण आहे....पण चला, तितके स्वातंत्र्य लेखक आणि दिग्दर्शिकेला देणे गरजेचे आहे.

स्पॉयलर (ही पोस्ट मुव्ही बघून झाला नसेल तर अजिबात वाचु नका)
मला आवडला :).
आमिर जबरी , तो तेहरुम झालेला अ‍ॅक्टर छोट्याशा रोल मधे पण सहीच !
करीनानी चांगलं काम केलय पण ती क्लासी दिसते, कितीही चमकु कपडे- ग्लिटरी मेक अप केला तरी :).
इथे कोणी बिपाशा टाइप ही चालली असती पण स्टार व्हॅल्यु म्हणून करीना ला घेतलं हे समजु शकते !
(Btw, जुनी डिंपल पण फिट झाली असती या रोल मधे, उगीच आठवण आली तिची शेवटी सस्पेन्स समजतं त्या वेळी :).)
रानी ओके.

सिनेमॅटोग्राफी , गाणी सुरेख !
इथल्या प्रतिक्रिया-रिव्ह्यु आणि कुठेच तलाश बद्दल आलेलं काही न वाचता पाहिला ते किती बरं झालं !
लोकांना किमान स्पॉयलर अ‍ॅलर्ट देता येत नाही, कमाल आहे !
डबल स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
रसप,
हे टायटल तरी का दिलय तुम्ही , सिरियसली, थिंक अबाउट इट !
उगीच आपलं रिव्ह्युच्या टायटल मधे काहीतरी विशेषण लावायचं म्हणून स्टोरीच्या महत्त्वच्या गोष्टी लिहायच्या का? Uhoh

स्पॉईलर अलर्ट अलर्ट अलर्ट..

>>तो सिमरनच्या अवस्थेस कारणीभूत नसतो, पण तिच्या मृत्यूमागचं रहस्य समजल्यावर, तिचा मित्र असूनही तिला (मरणोत्तर) न्याय न मिळवून देता/ तसा प्रयत्न न करत/, तो तिच्या मृत्यूचं भांडवल करत असतो... हा त्याचा दोष.>><<
+१
करीना म्हणते ना , की तिची एक मैत्रीन गेली ती परत आलीच नाही पन कोणालाच काही पर्वा नव्हती ती कुठे गेली. तैमूर मित्र असूनही ती गेली म्हणून (खरे तर मेली हे माहित असून) तो फक्त फायदाच घेतो तिच्या बातमीचा.

>>२. लिडो हॉटेल असे फूटेज शशीसारख्या दलालांना देत असेल यावर विश्वास बसणे काहीसे कठीण आहे....प>><<
लिडॉ हॉटेलात "सेटींग" आहे , अगदी रीसेप्शनिस्ट पासून हे करीना म्हणते. शक्य आहे हे. शेवटी वेगळा "पैसा" कमवायचे साधन असू शकते हॉटेलमधील लोकांचे.

.

<<डबल स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
रसप,
हे टायटल तरी का दिलय तुम्ही , सिरियसली, थिंक अबाउट इट !
उगीच आपलं रिव्ह्युच्या टायटल मधे काहीतरी विशेषण लावायचं म्हणून स्टोरीच्या महत्त्वच्या गोष्टी लिहायच्या का? अ ओ, आता काय करायचं>>>
अनुमोदन.....
या टायटल मुळे मला रहस्य सिनेमात ते उघड होण्याच्या काही सीन आधीच समजले Sad

लिडोकडून मिळालेल्या सीडीत फक्त सिमरन आणि तिघे दिसतात इतकाच सीन आहे ना? Uhoh
बाकी तीचं रस्त्यावर पडणं, आणि तिला शशीच्या रूममध्ये डॉक्टर पहायला आलेला असतो ते दृश्य फ्लॅशबॅक मध्ये आहे बहुतेक (नीट आठवत नाही.)
आणि तैमुर तिच्या मृत्यूचं भांडवल करतो म्हणून ती 'झालं ते बरंच झालं' असा डायलॉग मारते.

पण टायटलचा संदर्भ कथेशी ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांनाच लागेल ना? उलट 'टायटल मधे संदर्भ लागतोय' या कॉमेण्ट्स मुळेच न पाहिलेल्यांना काहीतरी क्लू मिळतोय Happy

@भुंगा,

>>पण त्याचमुळे निटसे एस्टॅब्लिश होत नाही की तिने तैमूरचा जीव का घ्यावा.....<<

- ती तैमूरचा जीव घेत नाही. तो मरता मरता त्याला 'दर्शन' देते फक्त !

------------------------------------

@फारएण्ड,

>>पण टायटलचा संदर्भ कथेशी ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांनाच लागेल ना? उलट 'टायटल मधे संदर्भ लागतोय' या कॉमेण्ट्स मुळेच न पाहिलेल्यांना काहीतरी क्लू मिळतोय<<

तेच तर !

(आणि असंही आता न समजण्यासारखं काय उरलं आहे? अख्खा सिनेमा - सुरुवात, शेवट, मधले कित्येक सीन, (जसा कसा आहे तसा) सस्पेन्स - सगळंच तर सांगून झालंय!! मला तर असं वाटतं की, ज्यांनी सिनेमा अजून पाहिलेला नाही, त्यांनी हा बाफ वाचावा आणि तिकिटाचे पैसे वाचवावेत आता!) Wink

आणि शशीकडे तिला आणले असेल, तर मग त्या दिवशी शशीकडे ती दुसरी "मुलगी " पण असणारच ना. कारण खून झालेल्या रात्री ती शशीच्या बरोबरच त्याच्या खोलीतच असते :). तसेच शशी त्या रात्री त्या हीरोला ह्या संदर्भातच भेटलेला असतो कारण तो त्या मुलीला सांगतो कि अपुन ने कल उसको देखा था.....म्हणजे तो हीरो.. ह्या प्रकरणाची आवरा-सावर शशीला करायला सांगतो....म्हणजेच करीनाला ते तसेच सोडून नाही जात तर शशीकडे सोपवून जातात्....कन्फ्युझिंग ...

इथले परिक्षण आणि प्रतिसाद वाचुन बरेच प्रश्न पडलेत. त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी तरी हा सिनेमा पाहावाच लागेल.

सुमेधावी - करीना ३ वर्षांपूर्वी मेलेली आहे. मग शशीने (बहुदा) अरमानला ब्लॅकमेल करून मिळालेल्या पैश्यातुन त्या मुलीला विकत घेतले आहे. ती मुलगी अरमानच्या अ‍ॅक्सीडेन्ट च्या दिवशी शशीच्या रूमवर असते जेव्हा तीला शशी अरमानशी भेट झाल्याचं सांगतो (ब्लॅकमेलचे पैसे घेण्याकरता शशी अरमान ला त्या दिवशी भेटतो आणि मग त्या हीरो अरमानचा अ‍ॅक्सीडेन्ट होतो).

मी काल पाहिला. मला आवडला. आमीर खुपच मस्त. राणीचे फक्त आणि फक्त डोळे...., करीनाची बॉडीलँग्वेज.... खुप मस्त. ती तलाश कोणी खुन्याची नव्हतीच... ती होती सुरीच्या आत्मशोधाची.....

सतत टेंशंन मधे असणारा सुरी, हरवलेला सुरी, रोझीकडे अनामिक आकर्षणाने खेचला जाणारा सुरी, "तुम्हे दॉक्टर की जरुरत है" म्हणत स्वतःच मानसिक आंदोलनाचा शिकार असणारा सुरी, मुलाच्या मित्राच्या नजरेला नजर न देउ शकणारा सुरी, .... आमीर ने फारच ताकदीने उभा केलेला आहे. निव्वळ अप्रतिम. आमीर ची हीच खासियत आहे की तो भुवन, राजा, रेहान, निकुंभ सर, आकाश, ए.सी.पी. राठोड, सुरी, रँचो... कोणीही वाटु शकतो आणि वाटतो नाही तो "तोच" असतो. त्याला आयटम साँग, वेडा वाकडा विनोद, मागे नाचणारे ताफे, मोठी लोकेशन्स... काहीही लागत नाहीत. कारण तो त्या व्यक्तिरेखेची गोष्ट सांगत असतो, 'आमीर" ची नाही.

राणी चे डोळे खुपच बोलतात. तिने फार संयत अभिनय केला आहे. निव्वळ अप्रतिम. करीनाची बॉडी लँग्वेज तिला हाय क्लास कोलगर्ल म्हणुन छान एस्टॅब्लीश करते. तिचा नखरा, चालणं, गिर्‍हाईका बरोबर असतानाचा अलिप्त पणा... खुप मस्त.

शेवट माहित असुनही ( तुमच्या क्रुपेने) मी सिनेमा एंजॉय केला. कारण शेवटा पर्यंतचा प्रवास खुपच देखणा आहे.

Pages