बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट

Submitted by विनार्च on 20 November, 2012 - 06:17

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट" याबद्द्ल काही माहिती आहे का ? कोणी करुन घेतली आहे का ही टेस्ट ?
माझ्या लेकीच्या शाळेत "ब्रेन स्केच सोल्युशन्स" ह्याच्यातर्फे ही टेस्ट करुन घेणार आहेत. फीज आहे ५०००रु...... अजूनतरी नाव नोंदवल नाही आहे...... ह्या टेस्टची विश्वासर्हता (बरोबर लिहीले आहे ??ऑथेनटिसिटी) माहित नाही आहे आणि अशाप्रकारच्या टेस्टची फी इतकीच असते का?

(नितीनचंद्र यांच्या "मल्टीपल इंटेलिजन्स" या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण काहिच उत्तर न मिळाल्यामुळे इथे विचारत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आणि बालमानसशास्त्राचा दुरान्वयेही संबंध नाही. पण एका मुलीची आई म्हणून मला हा प्रश्न पडलेला आहे.

समजा, या तुमच्या तथाकथित शास्त्रीय टेस्टमधे असे अनुमान आले की माझ्या मुलीला नृत्यामधे खूप प्राविण्य मिळवता येऊ शकते; पण प्रत्यक्षामधे तिला गायनामधे खूप रस आहे. तर एक पालक म्हणून मी काय करावे? तिची "आवड" लक्षात न घेता तू नृत्यच शिक असे सांगायचे का? तसे असेल तर, कुठेतरी माझ्या मुलीच्या आवडीनिवडीला मी मुरड घातल्यासारखे होईल ना? तिला एखाद्या गोष्टीची अजिबात आवड नसताना मी तिच्याकडून जबरदस्तीने का क॑रवून घ्यावे? कदाचित तिला गाण्यामधे जास्त प्राविण्य मिळवता येणार नाही; पण किमान ती तिच्या आवडीचे तरी शिकत असेल ना? मग अशा टेस्ट करवून घेऊन मी काय साध्य करेन? माझ्या अद्याप शाळेत असलेल्या मुलांचं भविष्य "घडवणे" आणि त्यासाठी असल्या टेस्ट्स करवून घेणे हेच मुळात मला चुकीचं वाटत आहे. किंबहुना मला हा अधिक धोकादायक ट्रेंड वाटत आहे.

व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे डीझायनर बेबी तयार केल्यासारखे आहे का? की बुवा, टेस्टमधे आलंय तुला वाचनामधून ज्ञान संपादन करणे शक्य होणार नाही. तू दृकश्राव्य माध्यमातूनच अभ्यास करत जा. भले, तुला वाचनाची किती का आवड असेना का... तुझ्यामधे अमुक क्षमता आहे म्हणून तू तिथेच जास्त लक्ष दे आणि तुझ्यामधे ही क्षमता नाही म्हणून तुला इकडे त्याहून अधिक लक्ष देत रहावे लागेल!! माझ्या पाल्याला वाढवण्यासाठी अथवा त्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अशा कुबड्या का घ्याव्यात? माझ्या पाल्यासाठी एखाद्या विषयात गती असणे आणि आवड असणे या पूर्ण भिन्न गोष्टी असू शकत नाहीत का? अशा गोष्टीसांठी मी बालमानसशास्त्रज्ञाकडून काऊन्सिलिंग करवून घेणे जास्त इष्ट होणार नाही का?

सॉरी, पण मला तरी यामधे शास्त्रीय विश्वासार्हता फार कमी दिसत आहे. गूगलसर्चदेखील याबद्दल विशेष माहिती देत नाही. ब्रेनस्केचच्या वेबसाईटवरदेखील तुरळक माहिती आहे. अधिक माहिती दिल्यास अर्थातच त्याचा आदर राहिल.

मायबोलीवर विविध क्षेत्रातले डॉक्टर्स, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक्-शिक्षिका आणि संशोधक आहेत. त्यान्च्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला खचितच आवडेल.

हाताच्या बोटांच्या ठशाऐवजी पायाच्या बोटांचे ठसे जास्त अ‍ॅक्युरेट रीडिंग देतात. पण फी सुद्धा तशीच जास्त, साडेसात हजार रुपये असते म्हणे.

बागुलबुवा, नंदीनी, विकु जोरदार अनुमोदन.

हा धागा आला तेव्हापासूनच माझ्या फारच डोक्यात जातोय... अगदी अकांड-तांडव-नृत्य करावे वाटते आहे इथे.

लाज वाटली पाहिजे शाळेचे प्रथितयश नांव असल्या फडतूस भोंदू पैसेकाढू स्कीमांसाठी वापरताना. वशील्यावर लावलेल्या मास्तरांची/पीआरओंची कामे दिसताहेत ही. चांगल्या नावाच्या शाळा असल्या तरी बडा घर पोकळ वासा झालाय आजकाल, हे माझे स्पष्ट मत आहे.

प्रत्येक शाळेत रोज असल्या प्रकारची हजार लोकं येत असतात. कठपुतलीवाल्यांपासून, संस्कारवर्गांपासून, शाळा-शाळांत जनजाग्रुतीपर भाषणे देणारे आजोबांपर्यंत. त्यातलेच हे. अशांशी डील करायला मोठ्या शाळा पी.आर.ओ. ठेवतात आजकाल, अन त्या पीआरओला थोडे चणे फुटाणे दिले की असल्या स्कीमा पालकांच्या बोकांडी बसतात.

पालकांनाही मी ४ चव्वल फेकून मारलेत तर माझ्या पोरगा ज्ञानेश्वर होईल अशी कन्सेप्ट आवडते आजकाल. जितके जास्त फेकावे लागले, तितका जास्त हुशार निपजेल यांचा कुलदीपक. कोणत्या जाहिरातीवर विश्वास ठेवावा हेही समजेनासे झालेय. हर्बल टी प्या, स्लिम व्हा. बोर्नव्हिटा घाला, नैतर दुधाचा उपयोग नाही. जणू मनुष्यप्राणी उत्पन्न झाला ती गेली हजारो वर्षे आईच्या दुधात 'वरतून' बोर्नव्हिटाच घालून येत होता. अन गायी म्हशीचे दूध त्यांच्या बाळासाठी त्यांच्या आईनेच बनवलेले असते हेही विसरतो आपण.

असो.

मा. अ‍ॅडमिन यांना नम्र विनंती की असले भोंदू जाहिरातबाज धागे माबोच्या प्ल्याटफॉर्मवरूनतरी चालू देवू नयेत. शक्य तितक्या लवकर कुलुप लावावे.

>>लाज वाटली पाहिजे शाळेचे प्रथितयश नांव असल्या फडतूस भोंदू पैसेकाढू स्कीमांसाठी वापरताना >> + १

अरेरे आता मात्र हाइट झ्झाली.
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.... Sad

हा धागा आला तेव्हापासूनच माझ्या फारच डोक्यात जातोय>> वेल सेड

हाताच्या बोटांच्या ठशाऐवजी पायाच्या बोटांचे ठसे>>> अजुन नखे, स्किनचा पोत, रंग, दातांची ठेवण, नाकाचा शेप आणि साईझ, कानाची पाळी, केस, डोळे (हो ते आयरीस स्कॅन पन युनिक असते म्हणे).... गेला बाजार एक्स रे , सिटी स्कॅन , सोनेग्राफी काय प्रचंड स्कोप आहे अजुन Wink

kibhe.jpgvije.jpg
ह्या यांच्या जाहिराती. तो पहिला आयडी तर विसरलोच..
ravi.jpg

ही यांची जाहिरात..

सदस्य कालावधी पहा, माबोवर टाईप करणे पहा. मग सांगा काय आहे ते?

लाज वाटली पाहिजे शाळेचे प्रथितयश नांव असल्या फडतूस भोंदू पैसेकाढू स्कीमांसाठी वापरताना >> + १

बालमोहन चे नाव सार्‍या महाराष्ट्रात आदराने घेतल जायचे.

विकु, माझी मोठी बहिण तिथे शिक्षिका होती हो. मला ठाऊक आहे किती उत्तम शाळा होती ती.

(तीळपापड झालेला) इब्लिस.

इब्लिस,
मला वाटते इथे धागा काढुन चांगले झाले. चर्चेतून लोकांना यातला फोलपणा तरी कळेल. नाहीतर फुकट आहारी जातील पालक.

सुज्ञ पालकहो,
तुम्हाला तुमच्या पाल्याची काळजी आहे ते छानच, पण सारासार विचारशक्ती म्हणुन काही असते ते ध्यानात ठेवा आणि त्याचा योग्य उपयोग करा. जाहिरात व सत्य यात फरक आहे हे जाणा.

इब्लीस जोरदार अनुमोदन. बादवे धागा जाहिरातबाजीसाठी नसून हा प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी निर्माण झाल असावा असे वाटते. पण रवी१३ना हे प्रतिसादाचे आश्चर्य वाटते. वीजय यांचे सर्व प्रश्न सुटले आहेत. हे ह्या टेस्टचेच रहस्य दिसते. Happy

वीजय, << भविष्य घडवणे आणि सांगणे ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ! >>
ह्या वैश्विक सत्याच्या अनुबोधाबद्दल धन्यवाद. ह्यापैकी नक्की काय बोटांच्या ठशांद्वारे केले जाते ते लिहा.

आपल्या समोरील सर्व प्रश्न सुटले आहेत आमच्यासमोर ते आणि आणखीन काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तरीही आपल्यासमोर कुठले प्रश्न होते आणि ते कसे सुटले यावर जरुर लिहा. वाचायला आवडेलच.

बादवे धागा जाहिरातबाजीसाठी नसून हा प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी निर्माण झाल असावा असे वाटते.<<
बाबु
विनार्च हे नांव वाचताच तुमच्या या गृहितकाची सत्याता पटतेय हो. पण हे जे काय पुढे चाल्लेय त्याबद्दल संताप होता. तुम्ही अभ्यास करून लिहिलेत त्याबद्दल धन्यवाद. हेच मी लिहिले असते तर कानफाट्या इब्लिस बरळतोय;) असे झाले असते.

***
सोनू,
बरोबर!
***

धन्यवाद!

विनार्च... हे वरचं सगळं वाचून तुझ्याही सारासार बुद्धीला या टेस्ट्स चा फोलपण अलक्षात आला असेल..
ही शाळांमधे चालवलेली ,' गल्लाभरू' स्कीम आहे..

माझ्या एका मैत्रीणीने इकडे , तिच्या दोन्ही मुलांची ही टेस्ट करवून घेतली. सुंदर टाईप केलेला , घसघशीत रिपोर्ट हातात घेऊन वाचल्यावर कळलं कि हे तर तिलाच काय , मलाही तिच्या मुलांबद्दल माहीतच होते आधीपासून.. कि एकाला आर्ट मधे इन्टरेस्ट आहे, गणितात अजिबात गती नाही..इ.इ.
स्वभाव कसा आहे.. कॉन्स्ट्रेशन कसंय, वाचन आवडतं का.. असलं काहीतरी भंकसबाजीने भरलेलाय रिपोर्ट.. त्यांच्या शाळेत कुणी तरी सिंगापूर चा एक्सपर्ट आला होता म्हणे ही चाचणी करून द्यायला त्यामुळे फी ही घसघशीत .. इंडिअन करंसी प्रमाणे १०,००० रुपये प्रत्येकी)... ..मी तिला म्हटले,बरं आता तुला तुझ्या मुलांच्या स्ट्रेंग्थ आणी वीकनेसेस (कुणी तिसर्‍यानेच प्रेडिक्ट केलेल्या) कळल्या आहेत्..तर पुढे काय केलेस त्याबद्दल?? त्यावर तिचं उत्तर,' पुढे?? काही नाही!!!
पण निदान मला माहीती आहे कि कोणत्या विषयात त्यांची गती आहे ते..

मी : निराश सुस्कारा सोडला .. कपाळावर हात मारून घेतला. ..अर्थात तिचं लक्ष नसताना.. ...

हा धागा आला तेव्हापासूनच माझ्या फारच डोक्यात जातोय>> इब्लिस, तुमच्या या अख्ख्या पोस्टला माझ्यातर्फे अनुमोदन.

हस्त सामुद्रीक, फेस रिडींग, हस्ताक्षरावरुन भलत्या-सलत्या गोष्टी ओळखणे इतकेच हे ही भंपक आहे. ज्या शाळा असे काही सुरु करु शकतात त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा.

१० ठसे कशाला लागावेत? एकाच ठशात इतकी वेडी-वाकडी वळणे असतात ती समर्थ असावीत सर्व गोष्टी सांगायला.

या गोष्टीचा छुपा वापर मात्र केला जाऊ शकतो: मुलांच्या ठशांचे रेकॉर्ड शाळेकडे असेल, आणि ते चुकीच्या हाती पडले तर गुन्ह्यांमधेही वापरले जाऊ शकतात. पालक आपल्याच पाल्यांच्या आयडेंटीटी थेफ्ट्ची पुर्वतयारी करुन ठेवणार?

हे कसे शक्य आहे? ह्या चाचणीमध्ये प्रथम बोटांचे ठसे घेऊन त्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, शिकण्याची आणि काम करण्याची उपजत क्षमता यांचे मापन करण्यासाठी विश्लेषण केले जाते.>>

याबद्दल आणखीन माहिती देऊ शकाल काय ? हे विश्लेषण करणार्‍या रेफरंस डेटा साठी किती लोकांचे ठसे किती काळ अ‍ॅनलाइझ केले होते ? या अ‍ॅनलॅसिसमधे जेंडर, एज, एथनिसिटी विचारात घेतली होती का ?
एकदा रेफरंस डेटा सेट बनवला की त्याचे काँस्टंट अपडेट / रिव्ह्यू होत असतात का ? सर्व संशोधनाचि माहिती कुठल्याही विश्वसनीय जर्नलमधे प्रसिद्ध झाली आहे का ? स्टॅनफर्ड मधली डिफर्ड ग्रॅटिफिकेशन टेस्ट बरीच प्रसिद्ध आहे. त्यातल्या सब्जेक्ट्सचे अजूनही अ‍ॅनलिसिस, इव्हॅलुएशन , कंपरिझ्न होत असते.

या संस्थेचा डेटाबेस किती वर्षांचा आहे ?

हे सर्व माहिती न करुन घेता शाळा असल्या टेस्ट शाळे तर्फे करवून घ्यायला मान्यता देत असेल तर धन्य ती शाळा, अन धन्य त्यांचे चालक !

बोटांच्या ठश्यांचे परीक्षण करण्याचे कारण काय? आपल्या बोटांचे ठसे कायमस्वरूपी असतात. ते बदलत नाहीत तसेच प्रत्येक बोट हे उजव्या आणि डाव्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांशी संबंधित असून ते विविध क्षमतांचे निर्देशक आहेत.

ब्लड टाईप पण बदलत नाही, क्रोमोसोम पण बदलत नाहीत. मग त्यांची चाचणी का नको ? केसांचा रंग पण ( पांढरे पडणारे सोडल्यास ) बदलत नाही ? त्यावरुन का परिक्षण करता येऊ नये ?

काही व्याधींसाठी जेनेटिकली प्रीडिस्पोजड असणार्‍या लोकांना विमा नाकारला जातो, किंवा वाढीव हप्ते आकारले जातात. समजा या टेस्टमधे १०-१२ मुलांना गणित/ विज्ञान या विषयात अजिबात गती नाही असे निदर्शनास आले. तर या मुलांना शाळेतून काढण्याविषयी शाळा प्रेशराइझ करणार नाही याची काय हमी ? किंवा अशांच्या पालकांकडून भरमसाठ पैसे मागणार नाही याची हमी ?

मी माझ्या आधीच्याच प्रतिसादात माझ्या निर्णयाविषयी लिहीले होते पण आता इथले प्रतिसाद वाचून तो अ़जूनच ठाम झाला आहे.
तुम्हासगळ्यांचे खूप धन्यवाद!...... माझ्यासारख्या द्विधामनस्थितीत असणार्‍या पालकांसाठी तसेच शाळेने सुचवले आहे म्हणजे करायलाच हवं अशाही पालकांसाठी हे प्रतिसाद कायम आयओपनर ठरतील.
रवी१३ ,बागुलबुवा >>>> मिस्टर विनार्च नसुन ते मिसेस विनार्च आहे Happy

तेव्हा हा धागा सुटला कसा नजरेतून?
असो.
दशचक्री राज्यकरी असा वाक्प्रचार आहे.
माझा हस्तसामुद्रिक ज्यात बोटांच्या अग्रावरील रेषा बघणेही येते, विश्वास आहे. मात्र अभ्यास कमी आहे.
तरीही, कुंडलीतील ग्रहयोगांप्रमाणेच तळहातावरील रेषा व उंचवटे प्रकर्षाने दिसतात हे अनुभवले आहे.
अगदीच त्याज्य वाटत असेल त्यांनी करू नये, सक्ति नाहीये. पण उगाच "भोंदू भोंदू" म्हणून कोल्हेकुई ही करू नये.

पण उगाच "भोंदू भोंदू" म्हणून कोल्हेकुई ही करू नये.
<<
तुमच्या मता विरुद्ध असते ती कोल्हेकुई का?
मग तुमचे हस्तसामुद्रिक काय असते म्हणायचे? (अहोरूपं) अहोध्वनी? Wink

>>>>> तुमच्या मता विरुद्ध असते ती कोल्हेकुई का? <<<< नाही.
कोल्हेकुईला स्वतःचे अभ्यासपूर्ण मत नसतेच, अस्तो तो नुस्ता झुन्डीचा आरडाओरडा व त्याद्वारे भिति पसरवणे.

आताच एक माणुस येऊन फ्रँचायजी घ्या म्हणून गेला.... मी न्हाय म्हटलं ... पाच सात हजार लोकांच्याकडुन घ्यायचे, फक्त २० % आपले म्हणे....

छान माहिती वाचकान्पर्यन्त पोहोचत आहे...

बोटांच्या ठश्यांद्वारे पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स आणि करीयर मॅपिंग टेस्ट करता येत नाही, असे मॅपिन्ग कुणी करत असेल तर तुम्ही थापा एकण्याचे पैसे मोजत आहात हे लक्षात घ्या. कृपया थापान्ना, भम्पकपणाला बळी पडू नका.


आताच एक माणुस येऊन फ्रँचायजी घ्या म्हणून गेला.... मी न्हाय म्हटलं ... पाच सात हजार लोकांच्याकडुन घ्यायचे, फक्त २० % आपले म्हणे....

त्यात नाही म्हणण्यासारखे काय होते? गंदा होगा पर धंदा है ना. आमच्या शेजा-याकडे थायरोकेअरची फ्रंचायसी आहे. तिथेही २००० पासुन पुढे पॅकेजेस आहेत. त्याला मिळत असतील २०-३०%, मला सांगितले नाही. पण सगळ्यांना सुचवत असतो करुन घ्या टेस्ट्स म्हणुन.

या धाग्यावर नन्दिनी, इब्लिस, दिमा यान्च्या पोस्ट आवडल्या...

रेषा आणि मेन्दूचा सम्बन्ध नाही आहे. सम्बन्ध आहे तो तुमच्याकडे असलेला पैसा आणि रेषा यान्चा. तुम्ही आणि तुमच्याकडे असलेल्या पैशान्च्यामधे या हातावरच्या रेषा मधे येत आहेत. तुमच्या कडे पैसा नसेल तर ह्या रेषा काहीच सान्गत नाहीत... Happy

अत्ताच हा धागा वाचनात आला.... एक एक विचार ऐकुन गम्मत वाटली. जे जे नवे त्याची खिल्ली उडवलीच पाहिजे ही माबो ची खासियत झाली आहे.

प्रथमतः डी. एम. आय.टी. ( डर्मेटोग्राफिक्स मल्टीपल इन्टेलिजेन्ट टेस्ट) बद्दल थोडेसे शास्त्रीय पार्श्वभुमी

१. आपल्या बोटां वरील रेषा ज्याला आपण फिंगर प्रिंटस म्हणतो, त्या साधारण वयाच्या ६ ते ८ व्या महिन्यात निश्चित होतात. बहुतेकांच्या बोटा च्या रेषांचे पॅटर्न ५-६ प्रकारचे असतात. पण त्या रेषां मधील अंतर माणसागणीक बदलते. जसे आपले रुप माणसा गणीक बदलते तसेच.

२. ह्या बद्दल अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले. अनेक थीअरी आज प्रचलीत आहेत. जशी हॉलंड थीअरी, मॅकेंझी थीअरी इ.इ.... पण ह्याबद्दल खरे संशोधन करुन त्याचा वापर बुद्धी वा मेंदुशी जोडुन मल्टीपल इंटेलिजन्स ची थीअरी आणली डॉ. हावर्ड गार्ड्नर ह्यांनी (https://en.wikipedia.org/wiki/Howard_Gardner). पुर्वी माणसाचा बुध्यांक फक्त आय.क्यु ने तपासला जायचा. पण त्यांनी पहिल्यांदाच "इ.क्यु" "सी.क्यु"आणि अ‍ॅक्यु" म्हनजेच "इमोशनल कोशंट"
" क्रीयेटिव्हीटी कोशंट" आणि "अ‍ॅद्व्हर्सीटी कोशंट"

३. आय क्यु = भाषीक ज्ञान्+ लॉजीकल ज्ञान
इमोशनल कोशंट = एखाद्या घटनेकडे बघायचा इमोशनल द्रुष्टीकोन
क्रीयेटिव्हीटी कोशंट = कल्पकता
अ‍ॅदव्हर्द्सीटी कोशंट= एखाद्या इमर्जन्सी मधे आपण कसे वागतो किंवा प्रेशर घ्यायची कुवत

४. आपल्या मेंदुचे दोन भाग असतात. डावा व उजवा. ज्याचा डावा भाग जास्त अ‍ॅक्टीव्ह आहे तो माणुस मेमरी, भाषा, गणित ह्याविषयात एकदम उस्ताद असेल. ज्याचा उजवा भाग अ‍ॅक्टेव्ह असतो तो कला, चित्रकला, अंतरीक उर्मी, सौंदर्य ह्याकडे जास्त लक्ष देणारा असेल. आपल्या मेंदुच्या दोन्ही भागांना पच पाच लोब्ज असतात. (कंपार्ट्मेंटस) ते आपल्या हाताच्या बोटांशी जोडलेले असतात. ज्यांचा मेंदु जन्मतः वीक असतो वा मंद असतो त्यांच्या बोटांवर रेषा नसतात किंवा अती पुसट असतात.

५. ह्यावरुन आपण साधारण १० प्रकारच्या इंटेलिजन्स चा शोध घेवु शकतो
१. स्वतःला काय हवे आहे हे ओळखण्याची क्षमता
२. दुसर्‍यां बरोबर कम्युनिकेट करण्याची क्षमता
३. लॉजिकल अ‍ॅबीलीटी
४. इमॅजीनेशन अ‍ॅबीलीटी किंवा व्हीजुवलायझेशन
५ फाइन मोटर स्कील.... बारीक बारीक कामे करणे
६. ग्रॉस मोटर स्कील .... खेळ
७. भाषा ज्ञान
८. संगीत ज्ञान
९. भवतालचे ज्ञान....
१०. अंतराचे ज्ञान

६. त्याच बरोबर आपले सेन्सेस जसे " सी, लीसन, टच, स्मेल, टेस्ट" ह्या पैकी कोणते स्त्राँग आहेत, तसेच पर्सनॅलीटी कोणत्या प्रकारची आहे. तसेच ती व्यक्ती एक्झीक्युटर आहे की थींकर? ती व्यक्ती कॉन्सेप्ट ड्रीव्हन आहे की ऑब्जेक्ट ड्रीव्हन ? कोणत्या प्रकारची लर्नीग स्टाइल उपयोगी पडेल?

ह्या सगळ्याचा उपयोग काय?????

१. आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब सुटेबल आहे.
२. कोणत्या खेळात वा अ‍ॅक्टीव्हीटी मधे आपण स्ट्रेस बस्टर शोधु शकतो. कधी कधी आईवडिल मुलां ना सगळ्या अ‍ॅक्टीव्हीटीज लावतात. खुप क्लास लावतात. ड्रॉइंग, मैदानी खेळ, पोहोणे, चेस, कराटे इ.इ.इ. ते मुल बीचारं दमुन जात. कशातच प्रगती करु शकत नाही.
३. तीच गत ट्युशन ची. त्याला जर ऑडिओ इंटेलिजन्स कमी असेल तर कितीही लेक्चर ऐकवा तो मुलगा कोरडाच राहील. त्यापेक्षा त्याची स्टाईल ओळखली तर तेंव्हाच त्याला ग्रुम केले जाउ शकते.
४. कोणत्या स्ट्रीम ला जाणे योग्य. म्हणजे सायन्स, कॉमर्स, की आर्ट्स. तिकडे गेल्यावर प्रत्येक साईड्ची जी जी शिक्षणं असतात त्या त्या ठीकाणचे कोणत्या बाजुचे शिक्षण घ्यावे, उदा. मेडिकल म्हंटले तरी जर अ‍ॅदव्हर्सीटी कोषंट वीक असेल तर इमर्जन्सी चे स्पेशलायझेशन घेवु नये. मग त्याने ऑप्थोल्म्प्लोजी, फीजीयोथेरपी, इ. निवडावे. तसेच कॉमर्स आहे आणि अ‍ॅव्हर्सीटी कोशंट चांगला आहे तर मग सी.ए. वा सी.एस. व्हावे.
लॉजीकल व भाषिक बुध्यांक चांगला असेल तर अय.ए. एस, करावे.

५. मुलाच्या लर्नींग स्टाइल प्रमाणे त्याचा कल आपल्याला कळु शकतो. थोडेसे बदल त्याच्या अभ्यास पद्धतीत केले की सुरेख रीझल्स येतात.

ह्या बाबतीत माझा स्वतःचा अनुभव. माझी मुलगी सहावीत असताना अचानक भयानक आळशी झाली. उलटी उत्तारे देणे. आपल्याच मस्तीत रहाणे. अभ्यासाकडे दुर्लक्ष.इ.इ. तिला आनंद नाडकर्णींच्या आय.पी.एच. ला ही काउंसेलिंग ला नेवुन आणले. तरीही फारसा बदल झाला नाही. माझ्या एका डॉक्टर मैत्रीणीने ही टेस्ट करावयास सांगितले. ती करुन घेतली. त्या वेळेस काउंसीलर ने खुप डोळे उघडले. मुख्य म्हणजे माझी मुलगी अतिषय शार्प आहे, पण ती गर्दीत शिकु शकत नाही. तिला वन टु वन शिकवले पाहिजे. अभ्यास करताना तिला एकटे ठेवायचे नाही. तिला टर्गेट्स द्यायची आणि ती पुर्ण झाल्याने काय होवु शकत.., ते समजवायचे. इमोशन कोशंट सगळ्यात जास्त असल्याने, तिच्या बारीक बारीक शंका उडवुन लावायच्या नाहीत. इ.इ.

हे सगळे कळल्यावर मी नाहीतरी नोकरी सोडायचा विचार करतच होते. तो आमलात आणला. आणि तिचं आठवीचं वर्ष फक्त तिच्या चुकलेल्या तारुला वळण आणणयात घालवलं. त्यांच्या सुचना शक्य तितक्या आमलात आणल्या. संस्क्रुत, इतर भाषा आणि सायन्स माझ्याशी तिचं उत्तम पटायच. पण गणितात मात्र मारामारी व्हायची. ह्याचा कारण माझ्यातला पेशंन्स जायचा. म्हणुन मग एक अतिषय हुशार आय.आय.टीची मैत्रीण कामी आली. ती आठवड्यातुन फक्त एकदा येवुन ब्रश अप करुन जायची. ह्याचा एकत्रीत परिणाम म्हनुन आठवीत तिची विषयाची समज प्रचंड वाढली. आणि त्याचा परिणाम म्हणुन मार्कांची गाडी ८१% पर्यंत गेली. जी सातवीत ६५-७०% घोटाळत होती. मग नववी मधे ती तिचा अभ्यस करायला लागली आणि गाडी ८८% पर्यंत पोहोचली, ते ही अनेक उद्योग करुन.

तिच्या रीपोर्ट मधे फॉरेन भाषा शिकवावी असे होते. गेली ३ वर्ष ती फ्रेंच शिकत आहे. शाळे मधे नाही तर बाहेरुन. आता ती अलायंन्स फ्रान्सेसे च्या ए२ (अ‍ॅडल्ट) लेव्हल ला १४व्या वर्षी पास झाली. ( ही संस्था फ्रेंच कॉन्सुलेट शी संबंधीत आहे)

ही तिची प्रगती पाहुन मी स्वतः ह्या विषयाकडे ओढली गेले. त्याच्या काउंसिलींग चे रीतसर शिक्षण घेवुन आता मुलांना सल्ला देते. मी स्वतः नापास होणारी खुप मुलं आजुबाजुला बघते. ( मी सी.ए व सी.एस फायनल चे क्लासेस घेते) त्यांची गल्ली चुकली तर नाही ना. म्हणुन एक दोन रीपिटर्स चे रीपोर्ट विनामुल्य केले. आणि गल्ली चुकल्याचेच रीपोर्ट आले. त्यांना त्या प्रमाणे सजेशन देवुन त्या मुलांनी आपली लाईन बदलली. आणि सुखी झाले.

हा रीपोर्ट करण्या मधे सगळ्यात पुढे असलेला देश म्हणजे सिंगापुर. मुख्य म्हणजे ह्या थीअरी चे पेटंट घेवुन त्याचा सोफ्टवेअर बनवुन घेतले ते त्यांनी. त्यांनी त्याचा वापर वर्कर्स वापरताना ही केला. मग ह्याचा प्रसार चीन मधे वेगाने झाला. ज्यांची खेळात प्रगती आहे त्यांना लहान पणीच वेगळे प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतात. त्याचाच परिणाम मग देशाला प्रगत बनवण्या साठी होतो. आर्थात त्यांचे सगळेच निर्णय योग्य नाहीत. राजकिय चर्चा नको. तरीही आहे ते मनुश्यबळ योग्य रीतीने वापरले तर नक्कीच त्याचा फायदा होतो.

मी स्वतः अनेक मुलांचे रीपोर्ट केले आहेत. ह्याची फी जास्त असायचे कारण की मुळात सॉफ्टवेअर ची बेसिक फीच जास्त आहे. जेव्हा कोणी त्याचा पेटंट इंडियात घेइल तेंव्हा ते स्वस्त होइल.

सगळेच नाकारु नका. हे थोतांड नाही हे नक्की. त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येक माणसावर अवलंबुन आहे,

मला तरी फायदा झाला.

मी उगाचच कोणाला हे सांगत फिरत नाही. जे स्वतः हुन येतात त्यांनाच रेकमेंड करते. जी मुलं फोकस असतात त्यांच अजिबात करत नाही. ही माझी हौस आहे. आज माझ्या फ्रेंचायझी मधे मी सगळ्यात कमी रीपोर्ट कर?णारी तरीही एक उत्तम काउंसेलर म्हणुन मला आमच्या पॅरेंट ऑफिस मधुन नेहेमी लेक्चर साठी बोलावतात. गेल्या दोन वर्षात मी फक्त ४२ रीपोर्ट केले. मी काही सेल्स् मन नाही. मी काउंसेलर आहे.

इकडे लिहावसं वाटल कारण बरेच गैर्समज दिसले.

ह्या पुढचे त्यांचे संशोधन हे ह्या फिंगर प्रिंट्स चा वापर आरोग्य संबंधीत शंका दुर करण्याकडे आहे. लाईफ एक्पेक्टन्सी वाढवणे हा त्याचा उद्देश.

कृपया ही माझी रिक्षा नाही.... जाहिरात नाही....

Pages