ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

ववि वृत्तांत.. थेट दिल से.. !!
 

मायबोलीवर येऊन तीन महिनेही झाले नव्हते जो हे वर्षाविहार प्रकरण उपटले.. शॉर्टफॉर्म करायचा झाला तर ववि... काय पण एकेक.. आधीच माबो, बाफ, डुआयडी, असल्या कधीही न ऐकलेल्या शॉर्टफॉर्मचा एकेक करून अर्थ लागत होता त्यात आणखी एकाची भर, एवढेच काय ते पहिल्यांदा वाटले.. पण वर्षूदीने एकदा मेल वर याबाबत सविस्तर सांगितले आणि समजले, अरे ही तर पावसाळी सहल.. तसा मी मुळातच पावसाळी कबूतर असल्याने असा मौका सोडणार्‍यातील नव्हतो.. पण तिथे जाऊन करायचे काय.. ना कोण ओळखीचे ना पाळखीचे.. आता आता कुठे चार आयडींची नावे ओळखू लागलो होतो.. त्यातील काही जणांचे आयडीमागील चेहरे दिसू लागले होते.. त्या चेहर्‍यांमागील व्यक्ती समजू लागल्या होत्या.. पण त्यातही एखादा आयडी मात्र... असो..

.... जावे की न जावे हा निर्णय होत नव्हता.. आदल्या वर्षीची धमाल एकदा नजरेखालून घालावी म्हणून जुन्या वृत्तांताच्या लिंक मागवल्या.. वाचून, बघून बरे वाटले.. मनाने तेव्हाच मी त्या रीसॉर्टला पोहोचलो.. पण अजूनही ती येते की नाही.. आपल्याला तिथे ती भेटेल की नाही यावर माझे जाणे न जाणे अवलंबून होते..

कोण कोण येणार आहे याची लिस्ट लागली होती.. त्यातही तिचे नाव कुठे नव्हते.. असणे अपेक्षितही नव्हते.. पैसे भरायची मुदत संपायला काहीच दिवस शिल्लक होते... माझे जाणे कॅन्सलच झाल्यात जमा होते.. आणि अचानक.. एके दिवशी खबर लागली की ती येणार आहे.. मुंबईहूनच.. आमच्या बरोबरच.. जर ती पुण्याहून येणार असती तर मी पुण्यालाही गेलो असतो.. फक्त तिच्यासाठीच.. पण नशीब तर बघा.. ती मुंबईहूनच येणार होती.. एवढेच नाही तर आठवडाभर आधी शिवाजी पार्कातही भेटणार होती..
पण दुसर्‍याच क्षणी बायको आठवली.. ती बरोबर असताना आमची मनासारखी भेट होऊ शकली नसती.. तिने आम्हाला कधीही एकत्र येऊ दिले नसते.. दूरवरून तिला डोळे भरून पाहण्यात समाधान मानावे लागले असते.. आणि हेच बहुधा माझ्या नशीबात होते.. बायकोला वरवरच विचारले.. येतेस का ग..!!

का? कुठे? कधी? यावेळी मात्र एकही प्रश्न न विचारता तयार झाली.. एवढेच नाही तर पैसे भरायला म्हणून शिवाजीपार्कात जे गेट-टू-गेदर होणार होते त्यालाही यायचेय असा हट्ट धरून बसली.. निदान तिथे तरी तिला बायकोच्या गैरहजेरीत मनसोक्त भेटता यावे म्हणून मुद्दामच ऑनलाईन पैसे भरायचा साधासोपा मार्ग नेटबॅंकींगचा पासवर्ड विसरलो या बहाण्याने टाळला होता.. पण.....

माझी ववि १५ तारखेपासूनच सुरू होणार होती.. पार्कातल्या आमच्या भेटीपासून..!!

पण बायकोने मात्र माझ्या मनातले ओळखून माझा एकूण एक डाव हाणून पाडायचा नुसता चंग बांधलेला दिसत होता.. उशीरा उठण्यापासून, नाश्ता, जेवण निघायची तयारी, सार्‍यात उशीरच केला.. परीणामी पार्कात पोहोचायलाही उशीरच झाला... इथे तिथे दूरवर नजर भिरभिरली.. ना ती होती ना तिच्यासारखे दुसरे कोणी... सहज म्हणून चौकशी केली असता समजले की ती येऊन गेली.. हाह..!! जिच्यासाठी आलो तीच मी येण्याआधीच निघून गेली.. तेव्हा मला पहिल्यांदा जाणवले की ही ववि मी इतर कोणासाठी नाही तर फक्त तिच्या भेटीच्या ओढीपायी जात होतो.. पार्कातना घरी कोरडे मन घेऊन परतताना एकच दिलासा होता, या रविवारी नाही तर पुढच्या रविवारी..... पुढच्या रविवारी तरी ती मला नक्की भेटणार होती..

आता मला खर्‍या अर्थाने वविचे वेध लागले होते...

पुढचा आठवडाभर बायकोची काय घ्यायचे काय नाही याचीच धावपळ चालू होती. आई तर सार्‍या कॉलनीच्या लोकांना कौतुकाने ओरडून ओरडून सांगत होती की, "माझा मुलगा यु.के.ला जातोय, माझा मुलगा यु.के.ला जातोय.." ... पण मुलगा मात्र वेगळ्याच दुनियेत पोहोचला होता.. आदल्या रात्रीही काही वेगळी स्थिती नव्हती.. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता.. तिला स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात भेटायची ओढ लागली होती..

रात्री न झोपताच सकाळी उठलो.. आंघोळपाणी नेहमीपेक्षा निम्म्या वेळेतच उरकून तयारी आटोपली... बायकोने मी आज काय घालणार हे आधीच ठरवले होते ते कपडे मुकाट्याने अंगावर चढवले... आणि महिन्याभरानंतर केलेल्या तुळतुळीत दाढीवरून हात फिरवत, स्वताला न्याहाळत आरशासमोर उभा राहिलो.. सिनेमांसारखा स्पेशल इफेक्ट होऊन त्या आरश्यात "ती" कुठे दिसते का हे शोधू लागलो तर पाठीमागे बायकोच कंबरेवर (स्वताच्या) हात ठेऊन उभी दिसली... संशय संशय संशय.. हेच तीन शब्द तिच्या नजरेत दिसत होते.. त्या नजरेला शिताफीने टाळून आईचा आशिर्वाद घेऊन बाहेर पडलो तर सार्‍या आसमंताने ती आज तुला भेटणारच याची ग्वाही दिली..

ती येणार, आपल्याला भेटणार म्हणून मी एक खास वस्तू बरोबर घेतली होती.. ती हलकेच तपासून घेतली आणि टॅक्सीला हात दाखवला..

मी जुईनगरवरून चढणार होतो... ती मात्र बोरीवली, मुलुंड की जुईनगरलाच आमच्या सोबत येणार होती हे मला ठाऊक नव्हते.. खरे तर तिचा अंदाज घ्यायला पण बस कुठवर आलीय याची चौकशी करतो असे बायकोला सांगून आनंद चव्हाणला फोन लावला.. बस कुठवर आलीय हे तर त्याने सांगितले पण तिच्याबद्दल काही विचारणार याच्या आतच फोन कट... अर्थात कानावर जे आवाज पडत होते ते पाहता, किंवा ऐकता, बसमध्ये बराच दंगा चालू होता हे समजले, त्यामुळे त्यालाही दोष देण्यात अर्थ नव्हता..

जुईनगरला बसमध्ये चढल्याचढल्याच बसभर नजर फिरवली.. पुढच्या काही तुरळक रिकाम्या सीट आणि पाठीमागे सार्‍यांचा कोंडाळा जमला होता.. गडबड, गोंगाट, कल्ला नुसता... पण या सार्‍यात ती कुठेच नव्हती... त्या गडबडीपासून दूरच मग पहिल्या सीटवरच बसलो.. इतक्यात कोणाला तरी आठवले की मी जुईनगरला चढणार होतो म्हणून, हाक मारून अरे तो अभिषेक चढला का म्हणून कन्फर्म केले आणि मी हा बोलताच बस पुढे निघाली.. आपण अगदीच क्षुल्लक व्यक्ती नाही आहोत हे बघून जरा बरे वाटले.. पण आता पुढे खोपोलीपर्यंत ती किंवा कोणीही येणार नव्हते हे मी समजून चुकलो..

कोणीतरी मग घरगुती केक वाटप केले.. बायकोला आवडला केक.. पण माझ्या तोंडाची चव गेली असल्याने माझ्या वाटणीचा ७० टक्के तिलाच दिला... (तसेही ४० टक्के ती नेहमीच घेते..) अर्ध्या-पाऊण तासाने, बहुतेक पनवेलच्या जवळ चहापानासाठी गाडी थांबवली.. केक गोड नाही लागला तिथे चहाची काय चव लागणार असा विचार करून उतरणार नव्हतोच.. पण याचा खर्च संयोजक आपल्याच पैशातून करणार असल्याने ते वसूल करायला म्हणून नाईलाजाने उतरलो.. बरेच झाले म्हणा ते.. कारण चहा बरोबर चिवडाही मिळाला.. हा मात्र गोड नसून तिखट असल्याने चवही लागली..

मुक्कामात प्रत्येक ठिकाणची टॉयलेट-बाथरूम हटकून चेक करायचीच हा माझा पहिल्यापासूनचा नियम असल्याने तशी काही फारशी लागली नव्हती तरीही एक’च नंबर उरकून घेतले आणि गाडी पुढच्या मार्गाला लागली.. आणि पुन्हा एकदा सुरु झाला तो बसमधला कल्ला जो मला माझ्या एकटेपणाची जाणीव जास्त करून देत होता.. गाणीही त्यांना कशी काय कोणास ठाऊक माझ्या आवडीचीच सुचत होती.. त्याबद्दल इतर वृत्तांतात वाचालच, कारण मला तर तेव्हा दर्दभरे नगमेच सुचत होते जे गायला गेलो असतो तर इतरांनी मला मारलाच असता..

मजल दरमजल करत इतरांसाठी धमालमस्ती पण माझ्यासाठी उदासवाणा झालेला तो प्रवास अखेर संपला आणि गाडी यूकेजच्या दारात पोहोचली... पुण्याची अगोदरच पोहोचली होती.. पण अर्थात.. ती मात्र येणार येणार म्हणून अजूनही आली नव्हतीच..

तोंडाला चव नसली तरी भूक मात्र सडकून लागली होती.. रूममध्ये बॅग टाकून काहीतरी खाऊन घेऊया म्हणून हॉलमध्ये आलो.. तर पदार्थही माझ्याच आवडीचे.. इडली आणि बटाटावडा सोपस्कार पार पाडल्यासारखे म्हणून खाल्ले पण कांद्यापोह्याचा पहिला चमचा तोंडात टाकताच मी पुढच्या दहा मिनिटांसाठी तिला विसरून गेलो आणि त्यांचा मस्त समाचार घेतला. पोटभर हादडले, वर कडक चहा प्यायलो, तृप्तीचा ढेकर देणार तोच ती परत आठवली.. पुन्हा नजर चोहीकडे भिरभरली..

इतक्यात कोणीतरी शिट्ट्या मारून सर्वांना स्टेजजवळ जमवले.. आणि एकमेकांशी ओळख करून घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला.. मी आणि माझी बायको एकत्रच उभे होतो.. अर्थात, माझ्या बायकोला वविचे ठरल्यापासून माझ्याबद्दल संशय आल्यामुळे ती मला एकट्याला अशी सोडतच नव्हती.. पण याचा इतरांनी "आमचे एकमेकांवर जरा जास्तच प्रेम आहे" असा भलताच अर्थ काढलेला दिसत होता.. याचा फटका म्हणजे उगाचच्या उगाच तिला माझे नाव घ्यायचा आग्रह केला गेला.. जिने लग्नानंतरच्या दोन वर्षात माझे प्रेमाने "अभि" असे नाव घेतल्याचे मला आठवत नव्हते तिच्याकडून ही अपेक्षा जास्तच होती.. म्हणून मग मीच प्रसंगावधान राखून शायरीची टांग तोडून काहीतरी बनवून म्हटले.. त्या ओळखपरेड मुळे एकेक आयडीमागची खरी नावे समजली, अनोळखी चेहर्‍यांना नावे आल्याने ते ओळखीचे वाटू लागले..

सर्वात महत्वाचे, "मामा" म्हणजेच "मायबोलीचे मालक", सर्वेसर्वा कोण हे मला तेव्हाच पहिल्यांदा समजले.. त्यांचे काहीतरी भरमसाठ आयडी आहेत हे ही समजले आणि ऑर्कुटवर आपले ८०+ प्रोफाईल आहेत हा अहंकार गळून पडला..

त्यानंतर खरे तर माझ्या आवडीचा म्हणजे पाण्यात डुंबण्याचा कार्यक्रम होता.. कॉटनचे कपडे नाही चालणार अशी वारंवार दिलेली सूचना ऐकल्याने कंबरेच्या खालची तर सोय केली होती, पण वर मात्र सॅंडो बनियान असल्याने नाईलाजाने ती काढून उघडबंब अवस्थेतच पाण्यात उतरावे लागले. लहानपणापासून कमावलेल्या आणि लोकांच्या नजरेपासून जपलेल्या शरीरसौष्टवाचे बायकोच्या परवानगीने प्रदर्शन मांडायला तयार झालो. पण पाण्यात पहिली डुबकी मारताच पुन्हा ती आठवली.. पाण्याच्या बाहेर डोके काढून पाहिले असता ती तर कुठे नाही दिसली पण बायकोच समोर उभी म्हणून पुन्हा दुसरी डुबकी मारली.. त्यानंतर बायकोने मला इतर मुलांबरोबर बागडायचा सल्ला देऊन स्वता इतर बायकांबरोबर उंदडायला गेली.. ती काय काय खेळली ते तिच्याच वृत्तांतात वाचा, आमच्या इथे मात्र मस्त पैकी बॉल बदलून बदलून वॉटर-व्हॉलीबॉल चालू होता.. तर काहीजण आपल्याच नादात स्लाइडसचा आनंद घेत होते. त्यातले काही सुरुवातीला घाबरत होते पण फोटोग्राफरने त्याच दिशेने कॅमेरा सरसावला आहे हे बघून फोटोत येण्यासाठी डेअरींगही करत होते..

मध्येच कोणाला तरी पाणकबड्डी सारखे अशक्य खेळ खेळायचेही सुचले होते.. पण आपण जलचर नाही आहोत याचे वेळीच भान आल्याने मग तो बेत रद्द करून पाणहंडी उभारली गेली.. मी अजूनही तिच्या विरहात होतो, आणि तिच्या आठवणीत माझा सारखा सारखा तोल जात होता, हे ध्यानात न घेता मी नको नको बोलत असतानाही मला एकदोनदा वर चढवायचा प्रयत्न झाला.. काय तर म्हणे मी वजनाने हलका आहे.. अरे वजनाने हलके असणारे सारे सर्कसमध्ये असतात का जे झरझर वर चढत जातील.. मग मीच काढता पाय घेतला आणि दुसर्‍या कोणाचातरी पाय खांद्यावर घेऊन त्याला वर चढवले.. हंडी फोडल्याची अ‍ॅक्शन आणि त्या पोजमध्ये चारपाच फोटो काढून संपवला हा खेळ एकदाचा..

त्याच दरम्यान रेनडान्स नावाचा दुर्दैवी प्रकारही झाला.. दुर्दैवी अश्यासाठी की त्या चोहीकडून उडणार्‍या तुषारधारांमध्ये माझे रडणे कोणाला समजत नव्हते आणि जोडीला लागलेल्या पॉप-पंजाबी अर्थहीन संगीतावर पाय कोणाचे थिरकत नव्हते. काय तर म्हणे चार बज गये फिर भी पार्टी अब भी बाकी है.. खरे तर दुपारचे बाराच वाजले होते पण तिचा अजूनही कुठेच पत्ता नसल्याने मला वर्षाविहार बाकी असूनही नसल्यासारखाच वाटत होता.. तरी काही नृत्यसम्राटांनी मुन्नी बदनाम वर थोडासा व्यायाम करून घेतला पण मराठी गाण्यांची फर्माईश पुर्ण होऊ न शकल्याने आता वाजले की बारा बोलत सार्‍यांची पावले तिथून बाहेर पडली..

दुपारी साडेबारापर्यंत सर्वांनी जलक्रीडा आटोपती घेतली, आणि कपडे बदलतो न बदलतो तोच जेवणाची शिट्टी वाजली.. आताच तर नाश्ता केला, आता काय भूक लागणार असा विचार मनात आणि भूक लागल्याची जाणीव एकाच वेळी पोटात झाली. आज ती भेटली नसल्याने, मूड ऑफ झालेला असताना, या शुद्ध शाकाहारी जेवणाचा घास भर श्रावणात माझ्यासारख्या मांसाहारप्रेमीच्या गळ्याखाली कसा उतरणार, हा विचार करेकरेपर्यंत दोन-चार रोटीचे तुकडे लाल-हिरव्या भाजीच्या संगतीने पोटातही पोहोचले होते. मग मनातील सारे विचार बाजूला सारून दालतडका आणि जीरा राईसवरही ताव मारला.. गुलाबजाम मात्र एका वाटीत दोनच ठेवलेले बघून लिमिटेड आहेत की काय अशी शंका येऊन आता बायकोचे कसे होणार ही चिंता वाटली. पण आणखी घेऊ शकतो हे समजले तसे दोघांनी दोन-दोन वाट्या घेतल्या. अच्छे काम की शुरुवात मीठे से म्हणत मी एक गुलाबजाम तोंडात टाकून बायकोला शुरुवात करून दिली आणि तिने चटचट करत उरलेले सात संपवून टाकले..

दंगागाणी, नाश्तापाणी... जलक्रिडा आणि जेवणखानी... आटोपल्यावर आता पुढे काय...... याची कल्पना आधीच आली होती. माझ्या दु:खावर आणखी मीठ चोळायला म्हणून आता सारे खेळ खेळणार होते. प्रत्येकाच्या छाताडावर चार रंगांचे बिल्ले लाऊन चार संघ बनवले होते.. प्रत्येक संघाला चार नावेही दिली होती... वर्षा, वरूण, वृष्टी आणि पर्जन्य... पण मला मात्र का माहीत नाही यातील प्रत्येक नाव पुकारताना तिचेच नाव घेतल्याचा भास होत होता..

पहिला खेळ.. शब्दमेघ बहुधा.. आजवर सिनेमांच्या नावाच्या वाकुल्या करत बरेच खेळलो होतो.. पण हावभाव करत मराठी म्हणी आणि गाणी ओळखण्याचा खेळ वेगळा वाटला.. पहिलीच म्हण आम्हाला च्यामारी.. देव तारी त्याला कोण मारी.. एवढी सोपी आली.. पण पुढच्यांच्या म्हणी पाहता खरेच देवाने आम्हाला तारण्यासाठीच आमच्या पदरात अशी सोपी म्हण टाकली होती असे वाटून गेले.. कशी काय ठाऊक मलाही त्याच्यापुढची चाकरी-भाकरीची म्हण ओळखता आली आणि याचा कौतुकमिश्रित आनंद माझ्यापेक्षा माझ्या कॉन्वेंट शाळेत शिकलेल्या बायकोलाच जास्त झाला..

एव्हाना सर्वांना समजले असेलच की मी विजेत्या वर्षा गटात होतो... काय पण माझे नशीब.. माझा मूड जेव्हा उदास होता तेव्हा माझे साथीदार प्रत्येक फेरीगणिक विजयाचा जल्लोष करत होते.. जाहीरातींची घोषवाक्ये ही फेरी तर आमची ताकदच होती.. त्यात बरेच पॉईंटस कमावून आम्ही इतरांच्या पुढे गेलो.. काय पटापट एकेक जण एकेक जाहीरात ओळखत होता.. माझी तर ती ईंग्लिशमध्ये लिहिलेली स्लोगन, अल्फाबेट अल्फाबेट जोडून वाचून होईपर्यंत यांनी आणखी पुढच्या दोघांची उत्तरे शोधलेली असायची.
पुढची फेरी तर भल्याभल्यांना घेरी येईल अशी होती. क्रिकेटमध्ये जसे कधीकधी खेळपट्टी खराब असल्याने सामना रद्द करण्यात येतो तसे कोणाला हा प्रकार झेपणार नाही हे बघून रद्द करण्यात येतो की काय अशी भिती वाटू लागली. तरी पहिल्याच ग्रूपने अंदाजापेक्षा छान सुरुवात केली आणि इतरांनाही बळ आले.. आमचा ग्रूप या फेरीत शेवटी होता हे सुदैवच.. आमची टीम निवडताना माझे वाचन जर ठीकठाक असल्याने या साठी आपण उपलब्ध आहे हे कळवण्यासाठी मी हुशारीत पुढे गेलो तर तिथे वाचनाच्या बाबतीत माझी आई असलेली आधीच तयारीत होती.. आणि मग मला यात भाग घेऊन फुकट फसलो असे वाटू लागले.. कारण माझी स्मरणशक्ती अशी की त्यावर एक वेगळा लेख बनू शकेल.... अर्थातच विनोदी... पण पहिल्याच जोडीने जी कमाल केली की त्यानंतर आम्हाला काही करायला ठेवलेच नाही... वाट लावण्याव्यतीरीक्त... ती मी अपेक्षेप्रमाणे लाऊनही कसाबसा आमचा लीड कायम राखण्यात यशस्वी झालो..

शेवटी तर काय.. माळेत मणी गुंफा.. डोक्यात जातो हा प्रकार अक्षरश: जेव्हा आई मला सुईमध्ये धागा ओवून दे राजा असे बोलते तेव्हा.. पण त्या दिवसाची जादूच अशी होती म्हणा किंवा खेळीमेळीचे एक वातावरण तयार झाले होते म्हणा, मी न वैतागता माझ्या वाटणीच्या दोनाच्या जागी तीन मणी आत टाकले.. हा एकच राऊंड आम्ही पहिल्या क्रमांकावर येऊ शकलो नाही तरी कोणत्याही प्रकारे कॅल्क्युलेशन करता अंतिम विजेते आम्हीच होणार होतो हे आम्हाला अगोदरच माहीत होते.. त्यामुळे सावधगिरीनेच खेळलो आणि स्पर्धा विजेत्यांच्या थाटातच पार पाडली..

सारे खेळ सांघिक होते आणि टीमभावनेने खेळायचे होते म्हणून जास्त मजा आली.. याचे नाव त्याला होणार याची हमखास खात्री असल्याने मी कोणाचेही नाव वर घेतले नसले तरी आम्ही सार्‍यांनीच यात योगदान दिले.. पण स्पर्धा संपल्यावर जेव्हा बक्षीस म्हणून मिळालेले चॉकलेट घेऊन सारे जण फोटोसेशन करत होते तेव्हा मात्र मी पुन्हा एकटाच या जल्लोषभर्‍या वातावरणापासून दूर कुठेतरी तिच्या आठवणीत रमलो होतो. आज ती आली असती तर.... दिवस संपता संपता असे प्रकर्षाने वाटू लागले पण मायबोलीकरांचा दिवस अजून संपायचा बाकी होता.. नुसता दिवसच बाकी नव्हता तर दिवसातील सर्वात स्पेशल सरप्राईज आयटम ज्याची मी तरी कल्पना केली नव्हती ते म्हणजे संगीत वस्त्रहरण नाटकाचा प्रवेश अंक जो मायबोलीचे कलाकारच सादर करणार होते..

त्या नाटकाचा किंवा त्याच्या परीक्षणाचा वृत्तांतात समावेश करण्यासाठी माझी कलाबुद्धी खूप तोकडी आहे.. पण तरीही सर्वांचे अप्रतिम, जिंदादिल अभिनय वगळता माझ्या लक्षात राहिले ते घारूअण्णा आणि त्यांची ती उलट्या होडीसारखी टोपी.. सेम टू सेम रणबीर कपूर.. रॉकस्टार स्टाईल..!

माझ्या बायकोला वस्त्रहरण हे नाव केवळ ऐकून माहीत असल्याने आणि तिने ते नाटक कधी पाहिले नसल्याने तिने जरा जास्तच एंजॉय केले..

बस मग काय.. दिवस संपला.. बॅग वगैरे पॅक करून जायची तयारी करू लागलो.. परत हॉलवर येऊन बघतो तर गर्दी जमली होती.. मालकांना भेट म्हणून दिवा द्यायचा कार्यक्रम पार पडला होता.. मी नेहमीसारखे हे ही लांबूनच पाहिले.. त्यानंतरही बराच वेळ गर्दी हटत नव्हती हे बघून पुन्हा डोकावून पाहायचा प्रयत्न केला तर कोणीतरी मुलगी भाषण देत आहे एवढेच समजले.. शब्द काही ऐकू येत नव्हते पण आवेश मात्र कलमवाली बाईसारखा भासत होता.. तिचे आटोपले आणि गार्‍हाणे घातले गेले.. की तिचे आटपावे म्हणून गार्‍हाणे घातले गेले माहीत नाही.. पण गार्‍हाणे ऐकून आजोबांची आठवण मात्र आली..
एकमेकांचा निरोप घेऊन सारे परतीच्या प्रवासाला निघाले.. पुढच्या वेळी तरी ती येईल या आशेवर मी देखील सर्वांना पुढच्या वेळी नक्की येण्याचे वचन देऊन निघालो..

परतीच्या प्रवासात गाडीत तोच कल्ला... दिवसभराचा थकवा कुठेही न जाणवता.. पण मी मात्र पुन्हा माझ्या कोषात.. यावेळी चहा प्यायलादेखील उतरायची इच्छा नाही झाली.. तासाभरातच जुईनगर आले.. आमच्याबरोबर सामी आणि तिचा नवरा देखील ट्रेनने जायला म्हणून तिथेच उतरले.. दिसायला बोलायला दोघेही स्मार्ट.. बरे वाटले त्यांच्याशी निरोप घेता घेता चार गप्पा मारून.. दिवसभर ज्याची वाट बघत होतो ते ही तिच्याकडून झाले.. माझ्या बायकोसमोर कोणीतरी माझ्या लिखाणाची तारीफ केली..

एक ट्रेन पकडून ते निघून गेले, एक ट्रेन पकडून आम्ही घरचा रस्ता पकडला.. ट्रेनचा प्रवासही मी गप्पगप्पच.. डॉकयार्डला पोहोचल्यावर टॅक्सीला हात दाखवला आणि टपटप करत हातावर दोनचार थेंब पडले.. पुर्ण ववि जिच्या वाटेवर डोळे लाऊन बसलो होतो ती पावसाची सर आता आली होती.. टॅक्सीला दाखवलेला हात तसाच खाली केला.. आणि तिच्या सोबतीनेच घरी जायचे ठरवले.. दिवसभर कुठे होतीस म्हणून तिच्यावर बरेच रागवयाचे होते.. पण त्या आधीच ती माझ्या कानात येऊन म्हणाली, "अरे वेड्या, तू इतरांमध्ये मिसळावे म्हणून मी तुझ्यापासून दूर राहिले, आणि तू मात्र..... चल आता मला वचन दे.. पुढच्या वविला असे काही करणार नाहीस.. मग बघ.. माझी आठवण काढताच मी कशी तिथे हजर होते ते..."

बस... आता मला वेध लागलेत ते पुढच्या वविचे..
काही मिसलेले क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी..!
काही अर्धवट राहिलेले पुन्हा जगण्यासाठी..!
काही अधूरी राहिलेली नाती नव्याने जोडण्यासाठी..!

.
.

...तुमचा अभिषेक

किती गोड.. इतके दिवस वाट पाहायला लावून मस्त लिहिलंस रे अभिषेक.. Happy
एक भाप्र.. 'पावसाच्या सरीचीच वाट पाहात होतास ना नक्की??? ' Proud

अभिषेक तू तिच्या विचारात पारच बुडून गेला होतास.. कारण ती येऊन गेली तरी तुला पत्ताच लागला नाही>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Proud हो हो हे बाकी खरे.............. कशी येईल ती तुझ्या हाकेला धुवुन? ती आली...... नाचुन बरसुन गेली आणि तुला पत्ताच नाही, काय हक्क रे तुला तीच्यावर रागवायचा? Proud

वविला मिस केलं तुला>>>>>>>>>> ४९ गुलाब जाम खाल्ले आणि पन्नासावा खाणार इतक्यात तुझी आठवण झाली म्हटलं या वेळी वर्षु असली पाहीजे होती.... मग काय तो पन्नासावा गुलाबजाम तुझी आठवण म्हणुन अर्धाच खाल्ला Proud (वाया घालवलंस ना माझं अर्ध शतक)

हाय वैभव.. मी पण तुम्हा सर्वांना खूप मिस केलं.. पण तुम्हा सर्वांच्या वृतांतामुळे वविला हजर असल्यासारखं वाटलं.. पुढच्या वर्षी नक्की येणार Happy

अर्धं शतक Lol Lol .. तुला अर्ध्या गुलाबजामच्या एक्स्ट्रा कॅलरीपासून वाचवलं ना..

एक भाप्र.. 'पावसाच्या सरीचीच वाट पाहात होतास ना नक्की???
>>>>>>>>>>

वर्षूदी, या भाबड्या प्रश्नाचे भाबडे उत्तर बायकोला काय देऊ ते तूच सांग.. Proud

आणि कधी आलेली ती?
मला खरेच नाही समजले.. बायकोलाही नाही समजले.. ती देखील मला काही बोल्ली नाही.. Sad

अभिषेक, तो हाक मारून विचारणारा मी होतो रे...

>>>>>>>>>

वाटलेच मला... तूच माझा खरा मित्र.... Proud

अरे अभिषेका, गंडलास की रे, तुझी 'ती' आल्याचं संयोजकांनी माइकवर पण अनाउंस केलं होतं ! लक्ष कुठे होतं तुझं? म्हणजे तू जिची वाट पहात होतास ती पावसाची सर नसावीच कारण मग तू तिचा छोटासा उल्लेखही जीवाचे कान करून ऐकला असतास... आणि एकदाच नाही, चांssssगली दोन वेळा येऊन गेली ती Lol

अस्मिता काहीच वाचत नाहिये... वाचूही शकत नाही कारण अजून मी तिला तिच्या प्रोफाईलचा पासवर्ड सांगितला नाहीये... Lol
आणि सांगणारही नाही कारण आधीच ती विचार करतेय की हा मुलगा कधी कोणात पटकन मिसळत नाही तरी वविला जायला तयार कसा झाला.. Proud

आणि मला खरेच माहीत नाही ती छोटी-मोठी जशी काही आली असेल ती कधी केव्हा आली... कदाचित तिच्या विरहात माझ्या पापण्या पाण्याने डबडबल्या असतील म्हणून तीचे वेगळे अस्तित्व जाणवले नसेल.. Sad

आणि नील ते रीयाताई बोलू नकोस रे... खारुताई ऐकल्यासारखे वाटते.. Proud

Pages