मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी Biggrin

पण मी इथं हात धुवून घेणार आहे बरं का ! लहानपणाचे किस्से सांगायचे राहीलेत, कॉलेजचं गॅदरिंग, नेहरू स्टेडीयम आणि जसे आठवतील तसे. हे सगळं ओकून झाल्यावरच दम खाणार आहे. काळजी नसावी.

मी पण प्रसिद्धच आहे असं वाटू लागलंय कारण मला एक व्यक्ती मी देखील स्वतःला जितकं ओळखत नाही तितकी ओळखते. किती वर्षं झाली ते आठवत नाही पण ती माझ्यासोबतच राहतेय. (माझ्याशी लग्न झालंय असं सांगत असते... आठवत कसं नाही ?)

जी.ए.कुलकर्णी ~
मराठी साहित्यविश्वात नेहमी आदराने घेतले जाणारे नाव. यांच्याशी पत्रव्यवहार होताच. खूप लिहायचे, विशेषतः त्यांच्या हॉलिवूड प्रेमाविषयी. जी.ए.कुणालाही भेटत नाहीत, ते प्रसिद्धी आणि साहित्यिक घडामोडीच्या कार्यक्रमापासून दूर राहतात, एक ना अनेक प्रवाद त्यांच्याबाबत ऐकून/वाचून होतो. मित्रांसमवेत एकदा म्हैसूर सहली जात असताना धारवाड-हुबळी दरम्यान मुक्काम झाला. त्यावेळी जी.ए. धारवाडच्या माळमड्डी भागात भाड्याच्या घरात राहत होते. वेळ होता त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्यक्ष जावे अशी उर्मी दाटली होती. नित्याच्या पत्रव्यवहारामुळे संकोच वाटण्याचा प्रश्नही नव्हता. पण समजा स्वागत झाले नाही (तशा बातम्या ऐकल्या होत्या) तर दोन्ही पक्षी वाईट वाटले असते, या विचाराने मग धारवाडच्या त्या हॉटेलमध्येच एक पत्र (त्यावेळी अर्थातच मोबाईल भुंगे नव्हते) लिहिले आणि 'तुम्हाला विनाकारण त्रास होईल म्हणून प्रत्यक्ष भेटायला आलो नाही" अशीही एक ओळ त्यात लिहिली. म्हैसूर सहलीहून कोल्हापूरला परतल्यानंतर पाहिले तर जी.एं.चे नित्याच्या शैलीतील एक मोठे पत्र. अन्य बाबीबरोबरच 'तुम्ही अगदी घराजवळ येऊनही माझ्याकडे आला नाही, याचे मला वैषम्य वाटते. असे करू नका. कोणत्याही प्रसंगी धारवाडला आला की मला जरूर भेटा, मला आवडेल. फक्त एकदोन दिवस अगोदर येण्याची सूचना दिलीत की मी त्याप्रमाणे माझी इथला दैनंदिन कार्यक्रम निश्चित करू शकेन....आपला जी.ए.कुलकर्णी"

एवढ्या धीराच्या आपुलकीच्या पत्राने मी भारावलो आणि लागलीच पुढच्याच आठवड्यात एकट्याने धारवाडवारी केली. अगोदर कळविले असल्याने जी.ए.कुलकर्णी अगदी अगत्याने माझी वाट पाहात होते. संध्याकाळी ४ चा सुमार असेल. दरवाजा उघडाच असून स्वतः जी.ए.च हसतमुखाने स्वागतास दारात आले. त्यांच्या पायाला नमस्कार करण्यासाठी वाकलो तर त्यानी तो करू दिला नाही. "अरे, पोचला तुझा नमस्कार. चल आता ऐसपैस बसू". पहिल्याच भेटीत ते झटदिशी एकेरीवर आल्याने मला झालेला आनंद अवर्णनीय असाच. त्यांची धाकटी बहीण प्रभावती (मुग्धाची मावशी) यानी तितक्याच अगत्याने कोल्हापूरविषयी आपुलकीने चौकशी केली व त्या स्वयंपाकघराकडे वळल्या. प्रथम खास जी.एं.च्या साठीच खरेदी केलेले "लाईफ मॅगेझिन" चा "LIFE GOES TO MOVIES" हा गलेलठ्ठ असा विशेषांक (जो आजही अप्रतिम असा वाटतो) मी त्याना दिला, जो त्यानी अत्यंत आनंदाने स्वीकारला. त्यानंतरचे तीन-चार तास कसे अगदी मंतरल्यासारखे उडून गेले. किती बोललो, कोणकोणत्या विषयावर चर्चा करीत राहिलो, इन्ग्रीड बर्गमनविषयी बोलताना ते किती भरभरून बोलले, कडेमनी कम्पाऊंड न सोडताही सार्‍या जगातल्या घडामोडी आपल्या गप्पात ते कशा काय आणू शकतात हे मला न सुटलेले कोडे. कोल्हापूर मुक्कामास अगत्याने येण्याचे माझे निमंत्रण त्यानी तितक्याच नम्रपणे नाकारले, त्याला कारण म्हणजे कोल्हापुरविषयी त्यांच्या जीवनात घडलेल्या काही कडवट आठवणी तिथे येऊन पुन्हा जिवंत करणे त्याना नको होते. मात्र असे असूनही पुढे ज्यावेळी त्यांचा पुतण्या (शंतनू कुलकर्णी) त्याच्या एमबीएसाठी कोल्हापूरात आला त्यावेळी त्याच्या राहण्याची अन्यत्र सोय होईपर्यंत त्याला माझे घर हे 'हक्काची जागा" म्हणून देण्याविषयी त्यानी मला सांगितले त्यावेळी मला झालेला आनंद अवर्णनीय असाच होता.

(मात्र पुतण्याला आपले काका सांप्रत महाराष्ट्रदेशी किती लोकप्रिय आहेत याचा बिलकुल पत्ता नव्हता. फक्त ते 'मराठी' भाषेत लिखाण करतात इतपर्यंतच त्याचे ज्ञान होते.)

असो. त्यानंतरही वेळोवेळी पत्रांद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीही घडत गेल्या, त्या अगदी ते पुणे मुक्कामी उपचारासाठी जाईपर्यंत.

(अशाच आठवणी भालचंद्र नेमाडे, ओ.पी.नय्यर आणि गुलझार यांच्याविषयीही आहेत. पण हाच प्रतिसाद मोठा झाल्याने इथेच थांबतो.)

मी रोज आरशात भेटतो.............
>> अनुमोदन!
र्.च्या. क. ने. मी गगोकार "मंदार जोशी " यांना, आणी कट्ट्याचे मालक भिडेसाहेब यांना भेटलेली आहे.

बाबासाहेब पुरंदरे : २ वर्षांपूर्वी 'रायगड - पुरंदर' असा एक ट्रेक केला होता; तेव्हा रायगडावर छत्रपतींच्या दरबारात बसून राज्याभिषेकाबद्दल आणि महाराजांच्या न्यायनिवाड्याबद्दल काही प्रसंग ह्या 'छत्रपतींच्या भाटाकडून' [हा त्यांचाच शब्द!] ऐकले होतं. [माझ्याकडे CD आहे, कोणाला हवी असल्यास सांगा]. बाबासाहेब छत्रपतींच्या सिंहासनाच्या पायथ्याशी बसले होते आणि आम्ही त्यांच्या पायाशी.
बाकी, चित्रपटातल्या तारे-तारकांना मी जमेत धरत नाही. [त्यांच्या पंख्यांसाठी :दिवे:]

भाट हा राजाचे गोडवे गाणारा माणूस असायचा जो पूर्वीच्या काळी पदरी ठेवलेला असायचा.. अर्थात बाबासाहेब त्या काळी असते तर छत्रपतींच्या दरबारात आनंदाने भाट म्हणून राहिले असते... Happy हीच भावना असेल त्यांच्या मनात.. Happy तसेही ते बोलत आहेत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहोत हे कैकवेळा अनुभवलेले आहेच...

अशोकराव, माझीही गत पुतण्यासारखीच आहे. जीएन्बद्दल केवळ वृत्तपत्रीय लेखातुन वाचलेले तेवढेच अन्धुक अन्धुक आठवते आहे, अन जे वाचले ते त्यान्चे मृत्युपश्चात आलेले लेखच वाचले गेले Sad Sad
९४-९५ मधे मुम्बैत असताना, सांताक्रुज की पार्ल्याजवळ लिन्क रोडवरील त्यान्चा बन्गला नेहेमी बघितला जायचा. (तो बघुधा स्मारक वगैरे जाहिर केलाय) पण बाकी त्यान्चे लेखनाबद्दल, लेखन वैशिष्ट्याबद्दल फारसे माहित नाही, तुम्हाला जमल्यास त्यावर जरुर लिहा.

कै. नरहर कुरूंदकर - माझ्या आजोबांचे चांगले मित्र होते. गावच्या कॉलेजात त्यांचे व्याख्यान होते तेव्हा आमच्या घरीच उतरले होते. त्यांचे साधे बोलणे ऐकणे ही एक मेजवानीच असायची.
कै. दुर्गाबाई भागवत - कै. न.कु. व्याख्यानमालेत (जी जाने किंवा फेब मध्ये दरवर्षी नांदेडला होते) एके वर्षी आल्या होत्या तेव्हा मावशीच्या घरी पाहिले ऐकले होते (वय वर्षे १०-१२ असेल तेव्हा)
अण्णा हजारे, बाबा आमटे, अभय-राणी बंग अन अजून ३-४ मोठी समाजसेवी डोंगराएवढी माणसे आहेत. - त्यांना भेटले, ऐकले पाहिले आहे. औरंगाबादला बहिण जेव्हा मेडिकलला होती तेव्हा त्या स्टुडंटची हॅलो म्हणून सेवाभावी संस्था होती. तर त्यांनी एक अशा सगळ्याना भेटायची टुर काढली होती तेव्हा बहिण मला बरोबर घेऊन गेली होती.
अवांतर : आम्ही बा.आंच्या श्रमसंस्कार शिबीरालाही गेलो होतो. माझी बहिण तेव्हा इंटर्न होती. तेव्हा भारत जोडो ला नाव नोंदवून - १ वर्ष वाया घालवून ती गेलीसुध्दा. मलासुध्दा म्हणत होती. पण मी करंटी - आळस, आईला विचारल नाही इ.इ. म्हणून गेले नाही. असो. फारच लिहिले

मी ऑफिसमधे नुकतीच लागले होते. तेव्हा मला ठराविक बीट असा दिला नव्हता, पण जनसंपर्क वाढावा म्हणून बॉस मला वाट्टेल त्या क्षेत्रातल्या बातम्या कव्हर करायला पाठवायचे. त्यामुळे बर्‍याच दिग्गजाना भेटता आले. एका संध्याकाळी एनसीपीएमधे पं शिवकुमार शर्माचे संतूर वादन आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स होती. मला बॉसने आधीच बजावलेले की पीसीनंतर त्यांची वेगळी मुलाखत अवश्य घे. मी नवखी असल्याने बॉसने मला काही प्रश्न लिहूनदेखील दिले होते.

मुळात मी संतूर हे वाद्य कधीच लाईव्ह ऐकले नव्हते. ऐकल्यानंतर जे काही वाटले ते शब्दात लिहिणे शक्य नाही. ग्रूपमधे सर्वाने जे काय प्रश्न विचारले ते माझ्या डो़क्यावरून गेले. माझा शास्त्रीय संगीताचा काहीएक संबंध नाही. तरीदेखील मी ऑर्गनायझरला वेगळी मुलाखत घेता येइल का? हे विचारले. त्यानी मला परवानगी दिली. पीसी संपल्यानंतर अल्पोपहाराच्या वेळेला मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले. तिथेच स्टेजवर ते बसले होते. नमस्कार वगैरे केला. जुजबी ओळख झाली मग मी बॉसने लिहोन दिलेले प्रश्नाचा कागद माझी वही वगैरे काढलं. पंडितजी माझ्याकडे डोळे मोठे करून हसत बघत होते. मी आधीच गोंधळले होते. म्हटलं. "मुझे संगीत मे कुछ ज्यादा पता नही" तर ते मिश्किलपणे हासत म्हणाले. "संगीत मे होता क्या है मॅडम. सात सूर तो होते है." असं म्हणून त्यानी संतूरवरती सारेगमपधनीसा वाजवलं. "समझे?" मी आपली मान हालवली. "फिरसे देखो" म्हणत अगदी सावकाश वाजवलं. एकदम भारी वाटलं मला. नंतर त्यानी पाचेक मिनिटे मला संतूरवर राग वगैरे वाजवून दाखवले "अब पूछो." मी आपली भंजाळलीच होते. पण तरी नंतर मुलाखत घेतली. त्यानी खूप छान गमतीदार उत्तरे देत चांगली मुलाखत दिली.

ती मुलाखत दोन दिवसानी अँकरवर लागली आणि माझी पहिली बायलाईन होती. Happy

अशोकजी

तुमची जीएंशी झालेली भेट मस्तच आणि तुम्ही सांगितलेला किस्सा त्याहूनही मस्तच. आम्हाला आवडेल तुमच्या शैलीत वाचायला किंवा सरळ असं करा ना मला भेटलेली मोठी माणसे या नावाने या सगळ्या भेटी एकाच लेखात टाका. प्रेमळ सूचना समजा Happy

बाबासाहेब पुरंदरे : विश्रामबाग वाडा. लहान होते. तेंव्हा स्वामी मालिकेचं शुटींग चालु होत तिकडे. माझे मामे आजोबा त्यांचे भक्त होते आणि 'जाणता राजा" मध्ये लहान भुमिका पण करायचे. त्यांच्या मुळे तिकडे गेलो होतो.

पु.ल. : एका पुस्तक प्रदर्शनात. माझ्या हातात तेंव्हा ग्रेस आणि सुरेश भटांची पुस्तके होती. ती बघुन त्यांना आनंद झाला होता. तेंव्हा मी ९वी १०वीत असेन. खुप छान वाटलं होत त्यांच कौतुक ऐकुन

अनिल अवचटः त्यांची सासुरवाडी आमच्या इमारती मध्ये होती/आहे. त्या वेळेस पुर्ण बिल्डींग मध्ये फक्त आमच्या कडे STD फोन होता. त्या मुळे बर्‍याचदा फोन करायला येत असत. त्या वेळेस त्यांचे लेख खुप गाजत होते. गर्द मालिका पण गाजत होती. खुप मोकळे पणाने गप्पा मारत असत.

माधव गडकरी: आमच्या इमारती मध्ये अरविंद ताटके ( लेखक,समिक्षक) रहात असत. त्यांना भेटायला जाताना माधव गडकरी भेटले होते. माझ्या बाबांना त्यांच्या लोकसत्ते मधील लेखांच फार आकर्षण होत.

नारायण सुर्वे: त्यांच्या हस्ते मी माझं वक्त्रुत्वांचं पहिलं बक्षिस स्विकारलं होत. मी कॉलेजात होते. त्यांच्या कवितांचं मला फार आकर्षण होतं त्यांच्या पुस्तकावरच त्यांची सही घेतली होती. त्या वेळेस त्यांनी छान गप्पा मारल्या होत्या.

बाकी चित्रपट उद्योगाशी संबंधीत अनेक लोक
मुकुंद देव (तबला) : माझ्या शाळेत होता. माझ्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. त्याचा मुलगा माझ्या मुलीच्या वर्गात आहे.
संजय जाधव : एका शाळेत. सेम बॅच. खुप चांगला मित्र.
शिवाजी साटम : परळला आमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये रहातात. नेहेमीच गप्पा मारतात
रुतुजा देशमुख (जोशी): माझ्या नवर्‍याच्या मित्राची बायको. परळ ला समोरच्या इमारतीत रहाते. छान गप्पा मारते.
शाहिर साबळे: परळच्या सोसायटीत रहातात
माया जाधव : परळच्या सोसायटीत रहातात
जितेंद्र : आमच्या कंपनीशी त्याची पार्टनरशीप आहे. त्या संबंधात
संजय दत्त : हैद्रबाद विमानतळ. माझी मुलगी तेंव्हा १ वर्षाची होती. आम्ही माझ्या आईला रीसीव्ह करायला आलो होतो. फ्लाईट लेट असल्याने आम्ही एका टेबल वर मुलीला ठेवुन गप्पा मारत होतो. तेवढ्यात टेबलामागच्या दारातुन संजय दत्त आला. माझ्या मुलीने टेबलाला धक्का लागला म्हणुन जोरात " एय" केलं त्याने दचकुन पाहिलं तिच्या गोबर्‍या गालाला हात लावुन " सॉरी लव्ह!!" म्हणुन तो गेला. त्याच्या बरोबर संगीता बिजलानी होती. तिच्या जीम चं ओपनींग करायला तो आला होता. मला संजय दत्त आणि संगीता दोघांतही रस नसल्याने फारसे काही वाटले नाही.

विजया मेहेता: मी NCPA ची Service Tax consultant होते ३-४ वर्ष. त्या वेळेस त्या डायरेक्टर होत्या ( अजुनही आहेत बहुतेक) त्यावेळेस अनेकदा भेट झाली. मी खुप भारावुन गेले होते.

फोन वर भेटलेले लोक. ज्यांन्नी माझी पत्र वाचुन आपणहुन फोन करुन छान गप्पा मारल्या ते
लेखक : अनंत सामंत, मीना प्रभु, विठ्ठल कामत ( ऑर्किड वाले)

ज्यांन्ना पाहुन/ भेटुन मी भारावुन गेले ते ( अनेक सेमिनार, पार्टी इथे भेटलेले)
ICICI चे कामत, नारायण मुर्ती, सुधा मुर्ती, गिरिश कर्नाड, रतन टाटा, कै. डॉ. अशोक तुळपुळे.

..

नन्दे, ग्रेटच अनुभव तुझा Happy सच्चे गुरु लोक हे. (तुला सन्गितातले कळत नाही समजल्यावरही हिडीसफिडिस न करता कौतुकाने समजावुन सान्गण्यास वेळ देणे हे अशान्नाच जमु शकते)

नंदिनी
खूपच छान किस्सा शेअर केलाय इथं. चित्रच उभं राहीलं डोळ्यापुढं..?
(हे अँकर म्हणजे काय असतं ?)

तुम्ही पत्रकार म्हणजे स्वतःच सेलेब्रिटी आहात. शरपंजरी च्या निमित्ताने शैलेश परांजपे यांची भेट झालेली.. वेगळंच लाईफ आहे बुवा हे !

मीराबाई, तुमचे अनुभव छानच! Happy माधव गडकरीन्चे लेखाचा मी देखिल चाहता होतो. Happy हे आताचे येडे काय लिहीतात कुम्पणावर बसुन तळ्यात-मळ्यात करीत त्यान्चे तेच जाणे, पण गडकरी जितक्या सु:स्पष्टपणे ठोस भुमिका घेऊन तरीही संतुलित-संयमित लिहायचे त्याला तोड नाही. [आयुष्यातील एका अवघड प्रसन्गी, रविवारचे अन्कातील गडकरीन्चा लेख नियमितपणे वाचण्याच्या रिवाजाला धरुन, जेव्हा प्रश्न पडला की खिशातील शेवटच्या उरलेल्या पैशातुन काय आणायचे? रविवारचा लोकसत्ता गडकरीन्चे लेखासाठी की चहाकरता दूध, तर मी लोकसत्ता हा पर्याय निवडून , उरलेल्या पैशात जितकेसे मिळाले तितकेच दुध आणून ते आईला कारणासहित दिले, आई देखिल ठीके आहे, चान्गल केलस असच म्हणाली.]

@ स्वाती, लिम्बूटिम्बू आणि अनिल जी ~ धन्यवाद.

जी.ए. जादू आपण त्यांच्या कथातून अनुभवत असतोच. पण त्यांची प्रत्यक्ष भेट (तीही एकदा नव्हे तर अनेकदा) तशीच भारावून टाकणारी असे. पत्रलेखनाच्या त्यांच्या व्यासंगाबद्दल अनेकवेळा अनेकांनी लिहिले आहेच. पण त्यांना धारवाडमुक्कामी भेटून त्यांच्याशी साहित्याशिवायही अनेकविध विषयांवर बोलणे हा अपूर्व असा आनंद होता.

इंग्रीड बर्गमन आणि आल्फ्रेड हिचकॉक (यावरही एक मोठे पुस्तक मी त्याना नंतरच्या भेटीत दिले होते) यांच्यावर त्यांचा विशेष लोभ होता हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत असे.

(स्वतंत्रपणेही नंतर लिहितो. धन्यवाद मंडळी)

त्या वेळेस त्या डायरेक्टर होत्या ( अजुनही आहेत बहुतेक)<<<
बाई रिटायर झाल्या. आता गेल्या एक-दोन वर्षापासून दीपा गेहलोत आहेत.

मस्त धागा. सर्वांचे अनुभव वाचताना मजा आली. मामी रॉक्स Happy

मी कुणाही प्रसिद्ध व्यक्तीला ओळखत नाही Sad
एकदा श्री नंदू पोळ (नेहा रेकॉर्डिंग स्टुडियो) आणि रविंद्र साठ्ये यांना भेटले होते तेव्हढंच.

Pages