भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ - माझी पोस्ट लिहायला वेळ लागला, तोपर्यंत तुमची आली.

ऑस्ट्रेलिया सिरीज पर्यंत त्रिकुटाला कायमच खेळवावे असे माझे मत होते. कारण इंग्लंड व ही महत्त्वाची होती. आता यानंतरच्या घरच्या सिरीज मधे तुम्ही म्हणता ते करणे योग्य होईल. कारण नवीन खेळाडूंना एकदम स्विंग किंवा बाउन्सचा सामना करावा लागणार नाही. ५-१० मॅचेस घरी खेळून बाकी गोष्टी जमू लागल्या की आणखी अवघड परीक्षा बाहेर देता येइल.

फक्त दुसरा मुद्दा हा की या त्रिकुटाकडे खेळण्याचे जास्त दिवस नाहीत. मग त्यातही त्यांचे चान्सेस कमी का करायचे? तर इंग्लंड/ऑस्ट्रेलिया सिरीज पर्यंत हा मुद्दा व्हॅलिड होता. आता यानंतर त्यांना करण्यासारखे असे काहीही नसेल जे त्यांनी पूर्वी अनेक वेळा केलेले नाही. त्यामुळे आता रोटेशन करावे.

<< पेस बोलर्सच्या १०-१५ ओव्हर्स झाल्या की एका बाजूने पूर्वी कुंबळे किंवा हरभजन जेव्हा विकेट्स काढत >> फारेन्डजी, भज्जीच्या बाबतीत तरी त्याला गोलंदाजी चे लंबे 'स्पेल' मिळत व त्यामुळेच कधीतरी विकेटसही मिळत, अशीच परिस्थिती हल्ली असल्यासारखी होती, असं नाही वाटत ? अगदीच 'स्पीनींग' खेळपट्टी असली तरच भज्जी आतां भेदक वाटायचा, असं मला तरी जाणवायचं; त्याची तथाकथित खुन्नस आत्ताशा फक्त मधेच कधी विकेट मिळाली तर सिंहाची शिकार केल्यावर टार्झन स्टाईल ओरड्याइतपतच मर्यादित झाली होती, असं वाटायचं.

अश्विनवर आत्ताच काट मारणं योग्य नाही. पण आपल्या संघात एक तरी 'लेगस्पीनर' असावाच, हे माझं तर कायमचं तुणतुणं असतंच ! निदान अधूनमधून तरी सचिनचा 'लेगस्पीनर' म्हणून उपयोग करावा असं मला नेहमी वाटतं. धोनीला 'पेस'चं वेड व फिरकीचं वावडं आहे, असाही मला दाट संशय आहे.

नाही काट नाही. फक्त तिकडे त्याला मुख्य स्पिनर म्हणून नेणे चुकीचे आहे. पुढची दोन वर्षे भारतात तोच जास्त फायद्याचा आहे, हे नक्की. त्यात त्याची बॅटिंग भारतात चालेल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आश्विन असेल तर पुढच्या दोन वर्षांत भारताने टीम चा पॅटर्न बदललाच पाहिजे. सहा मुख्य बॅट्समन घेणे आता बंद केले पाहिजे. पाच मुख्य (सेहवाग, गंभीर्/रहाणे, द्रविड्/सचिन्/लक्ष्मण/कोहली/रोहित/रैना/पुजारा पैकी तीन), धोनी आणि आश्विन हे दोघे, बाकी बोलर्स. हा पॅटर्न भारताने कधीच वापरलेला नाही. नेहमी सहा बॅट्समन घेऊन चार मेन बोलर्सवर अवलंबून राहतो आपण. परदेशात हे चार बोलर्स दमतात - त्यात जेव्हा ते विकेट्स काढतात तेव्हा सहा बॅट्समन काही करतील याची गॅरंटी नाही. आणि कोसळले तर पाच काय आणि सहा काय काहीच फरक पडत नाही. त्यापेक्षा यापुढे पाच फलंदाज पण धोनी आणि एक बोलर-बॅट्समन (आश्विन) धरून सात, आणि याव्यतिरिक्त चार बोलर्स असेच ठेवायला पाहिजे यापुढे.

सर्वांचे मुद्दे पटण्यासारखे.
पण ६+५ हा फॉर्म्युला आपल्याला ठेवता येणार नाही. किंबहुना कुणीही ठेवत नाहीत. आपली अडचण आहे ती सध्ध्याच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा अभाव. रैना, युवी, जडेजा हे फलंदाजी, गोलंदाजी पैकी एकात तरी ऊपयुक्त ठरत होते. तीघांचे क्षेत्ररक्षणही तितकेच ऊत्तम आहे हेही खरे. त्यामूळे या तीन विभागात मिळून त्यांचे योगदान संघाच्या फायद्याचे होते. धोणी कडे अधिक पर्याय ऊपलब्ध होते. सद्य संघात नेमकी त्याचीच ऊणीव आहे असे वाटते. त्यामूळे मुख्य तीन गोलंदाज थकले/दमले/पीटले गेले की सेहवाग ऊर्वरीत षटके भरून काढतो एव्हडेच.
ऊर्वरीत मालिकेत संघात आयत्या वेळी कुठलाही बदल न करता आता पुढील मालिकांच्या दृष्टीने बदल केले तर अधिक उपयुक्त ठरेल. अन्यथा आत्ताच शर्मा, ओझा, विनय कुमार यांना घेतले आणि ते ही अयशस्वी ठरले तर त्यांच्यावर निव्वळ एक दोन सामन्यातील अपयशाच्या कामगीरीवरून अन्याय होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय त्यांचा आत्मविश्वास ढासळण्याची शक्यता अधिक आहे. ऑसी, ई. हे काही "प्रयोग करून पहाणे वा संधी देवून बघणे" या कॅटेगरीतील दौरे नव्हेतच. तेव्हा जे मुळात गडगडले आहेत त्यांनाच ठेवावे.. फार तर काय अजून गडगडतील, किंवा सुधारतील. झाला तर संघाला फायदाच होणार आहे.. आणि काही चमत्कार होवून ही मालिका आपण बरोबरीत सोडवली तरी आता भविष्यात लक्षमण/द्रविड पैकी एकालाच संधी देणे योग्य ठरेल. (या मालिकेच्या अखेरीस लक्षमण आपली निवृत्ती जाहीर करेल असे मला वाटते. पाहुयात..)
गंभीर हा पुढील कसोटी सामन्यांसाठी कप्तान म्हणून कामगिरी करू शकतो. त्या साठी त्याचे ट्रेनिंग पुढील मालिकांपासून चालू करायला हवे. धोणी हा एकदिवसीय साठी सर्वोत्तम कर्णधार आहे असे मला अजूनही वाटते. बाकी इतर t20 वगैरे साठी रैना ला कर्णधार करावे.
If Sehawag is not willing to put price on his wickets (after so many years) then it is time the Board puts their price on another younger talent at least in Test Cricket!
ईशांत शर्मा मला तरी संपल्यात जमा झालेला वाटतो. गोलंदाजीत कुठलाच आवेश, धार नाही, टप्पा, दिशा या बाबतीत आनंदी आनंद आणि सापळे रचून विकेट घेण्याची प्रवृत्ती एक झहीर सोडल्यास कुठल्याही गोलंदाजात दिसत नाही. अर्थात त्या साठी अभ्यास, सराव, अचूकता व मेहेनत हे आवश्यक आहे.
अश्विन हा सद्य संघातील अर्धा अष्टपैलू खेळाडू आहे. विराट ला अधिक संधी मिळणे आवश्यक आहे. ऊमेश यादव तर आताच वयात आलाय त्याला आधार देणे, ट्रेन करणे , संधी देत रहाणे गरजेचे आहे.
तेव्हा आपल्या संघाची पुढील एक दोन वर्ष पुन:रचने मध्ये जाणार आहेत. ईं., ऑसी, आफ्रिका सर्व जण यातून गेले, आता आपला नंबर आहे एव्हडेच! तो गेल्या वर्षीच आला होता, आपण स्वतालाच RAC मोड मध्ये ठेवले होते.

बाकी त्रिकूटाचे वय हे "कमी झालेले रिफ्लेक्सेस, कमी झालेली ईंटेंसिटी, कमी झालेले सातत्य, ई." च्या अनुशंगाने मी म्हटले होते. सचिन सारखा एखादाच खेळाडू वयानुसार आपल्या खेळात परिवर्तन करतो आणी म्हणूनच दीर्घकालीन यशस्वी ठरतो. लक्षमण, सेहवाग हे कायम "नैसर्गिक कुवत" यावर मोठे झालेले खेळाडू आहेत. त्यावर वयाचा परिणाम होणारच. द्रविड च्या बाबतीत निव्वळ रिफ्लेक्स ची कमरता हे एकच कारण दिसते, अन्यथा त्याचे तंत्र, अनुभव, जिद्द आजही तितकेच टिकून आहे.
शेवटी क्रिकेट हा खेळ आहे. आणि त्यात वय कुणालाच चुकले नाही.

पेस बोलर्सच्या १०-१५ ओव्हर्स झाल्या की एका बाजूने पूर्वी कुंबळे किंवा हरभजन जेव्हा विकेट्स काढत (कधी सचिन, सेहवाग) तेव्हाच आपण परदेशात त्यांना लौकर गुंडाळू शकलो आहे. ते काम आश्विनने केले नाही. तुम्ही पोर्ट ऑफ स्पेन (२००२), लीड्स (२००२), अ‍ॅडलेड (२००३), जमेका (२००५), जोहान्सबर्ग (२००६), ट्रेन्ट ब्रिज (२००७), पर्थ (२००८), हॅमिल्टन (२००९), दरबान (२०१०) या परदेशात जिंकलेल्या टेस्ट मॅचेस ची स्कोअरकार्ड्स बघा. ही 'सपोर्ट अ‍ॅक्ट' अत्यंत महत्त्वाची आहे. ते काम कधी कुंबळे, कधी भज्जी तर कधी तेंडुलकर/सेहवाग ने केले आहे. माझ्या मते याचे कारण म्हणजे आपले पेसर्स ५-१० ओव्हर्सच एका भरात त्याच इंटेन्सिटीने टाकू शकतात. आपण तीन पेसर्स पेक्षा जास्त कधीच खेळवत नाही. आश्विनने विकेट्स काढल्याशिवाय आपण ऑसीजना लौकर आउट करणे अवघड आहे.

एक वॉर्न सोडला तर बाकीच्यांचा क्लासिकल स्पिन तेथे फारसा यशस्वी नाही. भज्जी जरा खुन्नसमुळे खेळ उंचावू शकणारा (वॉ सारखा) खेळाडू आहे. त्यामुळे तो तेथे आवश्यक आहे. २००८ मधे ते मंकी गेट झाल्यानंतर त्याचा वन डे फायनल मधे (त्या प्रकरणातील मुख्य लोक) हेडन व सायमण्ड्स च्या विकेट काढण्यात मुख्य हात होता. घरच्या सिरीज मधे (विंडीज) त्याला आधीच दणका दिलेला होता, त्यामुळे तो जागा होऊन नीट खेळला असता/खेळेल.
>> 'सपोर्ट अ‍ॅक्ट' च्या मुद्द्याला अनुमोदन पण फक्त खुन्नसच्या जोरावर भज्जी काहि करुन दाखवत असता तर ? जी व्यक्ती दहा वर्षांनंतरही वेगळा बॉल हे performance affected चे कारण सांगू शकते ती फारसा चमत्कार दाखवण्याची शक्यता कमीच वाटते रे. 2001 मधला भज्जी हा पूर्ण fluke होता बहुधा. तो लूप हरवला, control हरवला. दुसरा surprise ball ऐवजी stock ball झाला. I can go on and on ... Sad

अश्विन पूर्ण स्पिनर आहे का ? नक्कीच नाही पण सध्या देशात उपलब्ध असलेल्या talent मधे तो नक्कीच गुणवान नि मेहनती आहे. (कोणीतरी त्याच्या running between the wickets नि fielding वर मेहनत घेउ शकेल का ? ) ओझा दुसरा. राहुल शर्मा promising वाटला होता. पण ह्यापलीकडे मला कोणी पटकन आठवत नाहि. बेदी काय करतो आहे ? नुसती tabloid छाप बडबड करण्यापेक्षा इथे लक्ष का देत नाहि ?

पण ६+५ हा फॉर्म्युला आपल्याला ठेवता येणार नाही. किंबहुना कुणीही ठेवत नाहीत. आपली अडचण आहे ती सध्ध्याच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा अभाव. >> You nailed it. आपली शेपूट अजूनही चंद्रा, बेदीच्या जमान्यासारखी खेळते. तो भाग सुधरत नाहि तोवर कुठलाही कप्तान फक्त ५ बॅट्समन घेऊन खेळायची हिम्मत करणे कठीण आहे.

गंभीर हा पुढील कसोटी सामन्यांसाठी कप्तान म्हणून कामगिरी करू शकतो.>> हे वाक्या योगनेच लिहिलेय ह्याची खात्री मला पन्नासदा तरी करुन घेतली असेल Lol jokes apart, KKR साठी जो या तर्‍हेने fielding placement करत होता that was impressive. बर्‍याच दिवसांनी एखादा भारतीय कप्तान एव्हढा aggressive वाटला होता.

>>गंभीर हा पुढील कसोटी सामन्यांसाठी कप्तान म्हणून कामगिरी करू शकतो.>> हे वाक्या योगनेच लिहिलेय ह्याची खात्री मला पन्नासदा तरी करुन घेतली असेल

अर्थातच! "गंभीर" विधान होते ते! Happy

इथे संघ निवडण्याबद्दलची चर्चा वाचून एक प्रश्न विचारावासा वाटतो. कुणि मनिबॉल हा सिनेमा पाहिला आहे का?
तो सिनेमा जरी बेसबॉलबद्दल असला तरी संघ निवडण्याचे नवीन तंत्र त्यात दाखवले आहे.
आता क्रिकेट नि बेसबॉलमधे बराच फरक आहे हे माहित आहे. बेसबॉलमधे स्टॅटिस्टिक्स ला जेव्हढे मह्त्व आहे तेव्हढे क्रिकेटमधे नसावे, पण असे कोण म्हणतो त्यांनी केले तेच करावे. सामने जिंकणे महत्वाचे असे वाटत असेल तर त्याचा काही मूलभूत वेगळाच विचार करून संघ निवडता येईल का बघावे. हा माझा स्ट्रॅटेजिक सल्ला - टॅक्टिकल तुम्ही तरुण, हुषार लोक बघा!

<< तर त्याचा काही मूलभूत वेगळाच विचार करून संघ निवडता येईल का बघावे. >> झक्कीजी, माझ्या पहाण्यातला संघनिवडीविषयीचा एक मूलभूत विचार - एका कॉलेजच्या प्राथमिक संघनिवडीसाठी माझ्या मित्राला पाचारण करण्यात आलं होतं; १८५ नांवं आलीं होतीं व त्यातून २० जण निवडायचे होते. माझ्या मित्रानं त्यापैकीं जे 'ऑलराऊंडर्स' असतील त्याना हात वर करायला सांगितलं; तीन-चतुर्थांश जणानी हात वर केला व त्या सर्वाना बाहेर जायला सांगण्यात आलं. उरलेल्यांची गोलंदाजी, फलंदाजीबद्दल सखोल चौकशी करून माझ्या मित्रानं १५ जण निवडले व कॉलेजच्या प्राध्यापकाना सांगितलं " बाहेर घालवलेल्यापैकी जे खरेखुरे "ऑलराऊंडर्स" असतील तेच तुमच्याकडे कोकलत येतील व ते पांचपेक्षां अधिक असणार नाहीत याची मी खात्री देतो; त्यांची नांवं यादीत घालून २० जणांचा प्राथमिक संघ खुशाल प्रॅक्टीससाठी जाहीर करा!" मला वाटतं आपल्याकडे सध्या तरी खरेखुरे "ऑलराऊंडर्स" नाहीतच हे सत्य स्विकारून तथाकथित '"ऑलराऊंडर्स"चा विचारही न करता ६+५ ह्या फॉर्मुलाला आपण चिकटून रहावं व अर्धवेळ गोलंदाज वापरतो तें तसंच चालू ठेवावं, याला पर्यायच दिसत नाही !!!!

ठीक आहे. पण असे समजू नका, की आता काही अधिक विचार करण्याजोगे राहिले नाही.

असे म्हणतात की १८०० का १९०० साली यूरोपमधले सगळे शास्त्रज्ञ म्हणाले की जगात शास्त्राची प्रगती इतकी झाली आहे की आता नवीन काही सिद्धांत नवीन ज्ञान, नवीन विषय शोधून काढणे शक्य नाही!!

पण काही लोकांनी ते मान्य न करता, काहीतरी करतच राहिले नि मग काय काय चमत्कार झाले महाराजा!!!

तथाकथित '"ऑलराऊंडर्स"चा विचारही न करता ६+५ ह्या फॉर्मुलाला आपण चिकटून रहावं व अर्धवेळ गोलंदाज वापरतो तें तसंच चालू ठेवावं, याला पर्यायच दिसत नाही !!!!>> मलाही असेच वाटते. मूळात आडात नाहि तर पोहर्‍यात कसे येणार.

झक्की मनीबॉलची कल्पना धमाल आहे. विचार करुन बघायला हवा. दुर्दैवाने एव्हढा वेगळा विचार करुन तसे वागणारे administrator देशात cricket साठी नाहित Sad

<< पण असे समजू नका, की आता काही अधिक विचार करण्याजोगे राहिले नाही. >> झक्कीजी, हे बीसीसीआयलाच चपखल लागू होतंय व त्यानाच फॉरवर्ड करतो !!! Wink

>>> भारताची फलंदाजी परदेशात प्रचंड प्रमाणात ढासळली हे खरे आहे. पण इथे वयाचा संबंध दिसत नाही. >> मास्तुरे तेव्हढे सोपे नाहिये ते. त्याच लोकांचे त्याच्या आधीचे statistics बघा. त्यांनी ज्या मापाने आधी धावा काढल्या आहेत त्या मापात नि त्याच सातत्यात त्या आता येत नाहियेत. जेंव्हा ते काढत होते तेंव्हा साहजिक बाकीच्यआंसाठी एक buffer तयार होत होता, ज्यामधे इतरांचे loss of forms, lack of techniques लपू शकत होते (rather accomodate होत होते). आता ते होत नाहिये आणि त्यामुळे उणीवा अधिक दिसून येताहेत.

सचिनचा हा ऑस्ट्रेलियाचा ५ वा दौरा. त्याच्या पाचही दौर्‍यातील पहिल्या २ कसोटी सामन्यातल्या धावांची ही आकडेवारी

(१) १९९२, पहिल्या २ कसोटीत एकूण ७८ धावा (७,१५,१६,४०), निर्णय - पहिले दोन्ही सामने भारत हरला होता.
(२) १९९९-००, पहिल्या २ कसोटीत एकूण २२९ धावा (०,५२,६१,११६)), निर्णय - पहिले दोन्ही सामने भारत हरला होता.
(३) २००३-०४, पहिल्या २ कसोटीत एकूण ३८ धावा (०,१,३७,DNB), निर्णय - पहिला सामना अनिर्णित, दुसर्‍या सामन्यात भारत विजयी
(४) २००७-०८, पहिल्या २ कसोटीत एकूण २४३ धावा (१२,१५,६२,१५४), निर्णय - पहिले दोन्ही सामने भारत हरला होता.
(५) २०११-१२, पहिल्या २ कसोटीत एकूण २२६ धावा (३२,४१,७३,८०), निर्णय - पहिले दोन्ही सामने भारत हरला होता.

१९९२ ची त्याची पहिलीच मालिका होती. पण नंतरच्या मालिकेत (फक्त २००३-०४ चा अपवाद वगळता), त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. २००३-०४ चा अपवाद वगळता उर्वरित सर्व मालिकेत भारत पहिले दोन्ही सामने हरला होता.

ज्या मापाने सचिन पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर धावा काढत होता, त्याच मापाने याही दौर्‍यावर तो धावा काढत आहे. वाढलेल्या वयाचा निदान सचिनवर तरी फारसा परिणाम झालेला दिसत नाही. पहिले दोन्ही सामने हरण्याच्या भारताच्या इतिहासातही बदल झालेला दिसत नाही. सर्व काही जैसे थे आहे.

मी फक्त सचिनबद्दल बोलत नव्हतो,
मी फक्त पहिल्या दोन सामन्यांबद्दल बोलत नव्हतो
मी फक्त ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍याबद्दल बोलत नव्हतो.

In general तिघांच्या एकूण मुख्यत्वे away दौर्‍यांबद्दल बोलत होतो.

मला वाटतं धोणीचा परदेशातील परफॉर्मन्स हा फारएन्डाने मांडलेला मुद्दा अतिशय योग्य आहे. तो जितका पाटा विकेटवर चांगला कॅप्टन आहे, तितका उसळत्या विकेटसवर नाही. शिवाय धोणीला टेस्ट मॅच किती झेपतात ते कळत नाही. टि २० आणि वनडे मध्ये वेळ कमी असल्यामुळे त्याच्यातली मुळातली अ‍ॅग्रेसिव्ह वृत्ती दिसते पण टेस्ट मध्ये त्याने अनेक मॅचेस अ‍ॅग्रेसिव्ह न खेळल्यामुळे लेट गो केल्या आहेत. उदा विंडीजच्या दोन्ही टेस्ट वा भारत वि विंडिज (मास्तुरे, मी ह्यांनी इथेच ह्या बद्दल लिहिले होते) पण ती टीम विंडीजची असल्यामुळे चालून गेले, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ते पण त्या त्या देशात) डिफरंट बॉल गेम आहे.

सेहवागला कप्तान बनवू नये. तसेच अनेक मॅचेस नंतर कोहलीला काही दिवस थांबवावे. रोहित शर्मा हा टेस्ट मटेरियल आहे हे मला पहिल्यापासून वाटते कारण त्याचाकडे तंत्रशुद्धता आहे. तो फक्त टि २० मुळे वाया जात आहे. त्याला टेस्ट मध्ये वारंवार संधी द्यावी. बॉलर्स मध्ये मला अश्विन फारसा कधीही आवडला नव्हता, ओझाला घ्यावे. इथे असाम्याशी सहमत.

धोणी ऐवजी द्रविडला परत टेस्ट कॅप्टन करावे. व गंभीरला उपकप्तान. म्हणजे पुढे तो कप्तान होऊ शकतो. धोणीला टेस्ट मधून विश्रांती द्यावी. नेहमीसाठीच. आणि पर्यायी किपर म्हणून पटेलला घ्यावे. धोणी मला आवडतो पण तो खुद्दही टेस्टला साजेसा (बाहेर देशात) कधी खेळत नाही.

सध्या लक्ष्मणविरूद्ध जोरदार आरडाओरडा सुरू आहे. त्याला काढून रोहीत शर्माला आत घ्यावे व कोहली अजून संधी द्यावी असे काही जुन्या खेळाडूंनी सांगितले आहे. लक्ष्मण गेल्या वर्षभरात परदेशात अपयशी ठरलेला आहे. पण त्याच्या बरोबरीने (सचिन व द्रविड वगळता) इतर सर्वच फलंदाज अयशस्वी ठरले आहेत. लक्ष्मणच्या बरोबरीने सचिन व द्रविडलाही घरी पाठविण्याची मागणी सारखीच होत असते.

२००८ मध्ये गांगुली निवृत्त झाल्यावर त्याची ६ व्या क्रमांकाची जागा अजूनही भरता आलेली नाही. मग सचिन, द्रविड आणि लक्ष्मणची जागा कोण भरून काढणार? २ वर्षांपूर्वी विंडीज बोर्डाशी झालेल्या मतभेदांमुळे बांगलादेशच्या पाहुण्या संघाविरूद्ध विंडीजने गेल, सर्वन, चंद्रपाल, ब्राव्हो इ. सर्व प्रमुख खेळाडूंना वगळले होते. ती मालिका बांगलाने विंडीजविरूद्ध विंडीजच्या भूमीवर मोठ्या फरकाने जिंकली होती (कसोटी मालिका २-० व एकदिवसीय मालिका ३-० अशा फरकाने).

भारताने या त्रिकूटाला वगळायला हरकत नाही. पण पुढील २-३ वर्षे आपली विंडीजसारखी अवस्था होईल हे गृहीत धरले पाहिजे. तशी तयारी असेल तर सचिन, द्रविड व लक्ष्मणला निवृत्त व्हायला लावून रैना, रोहीत शर्मा, कोहली, युवराज, रहाणे इ. ना लगेचच संघात घ्यावे.

मला वाटते सामना जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे असे समजून वरील चर्चा चालू आहे.
दुर्दैवाने एव्हढा वेगळा विचार करुन तसे वागणारे administrator देशात cricket साठी नाहित अरेरे

एव्हढे ठाम विधान करण्याइतपत मला माहिती नाही, पण शंका येते की एक्कूण एक सामने जिंकलेच पाहिजेत असे त्या बीसीसीआय च्या व्यवस्थापकांचे उद्दिष्ट नसून खेळाडूंना संधि देणे, जुने खेळाडू खेळले नाहीत तरी त्यांचा संघात समावेश असणे याचा नवोदित खेळाडूंवर कितपत परिणाम होतो, तो चांगला आहे की वाईट, याचाहि विचार होत असावा. कारण मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममधे, सरावाच्या वेळी, हा संघ एकमेकाशी कसा वागतो, त्याचा संस्थेला, खेळाडूंना फायदा होतो का, वगैरे विचारहि करत असतील.

आता हरले तरी पैसे मिळतातच, तेंव्हा महत्वाचे उद्दिष्ट साध्य होतच आहे, तेंव्हा इतर काही चांगले करावे असेहि त्यांना वाटत असावे. शिवाय इथल्या प्रमाणे सचिन, सेहवाग इ. च्या जाहीरातीच्या उत्पन्नातला काही भाग त्या बीसीसी आय ला मिळत असेलच, तेंव्हा जोपर्यंत जनता सचिन, सेहवागला भाव देते तोपर्यंत त्यांना जनतेसमोर येऊ द्यात!
मी जरी भारतीयांच्या भ्रष्टाचाराची टिंगल करत असलो, तरी मनातून मला पक्के माहित आहे की एकंदरीत भारतातले लोक, हुषार, प्रामाणिक नि सदसद्विवेक बुद्धि बाळगून आहेत, अगदी जगातल्या इतर कोणत्याहि देशातल्या लोकांपेक्षा जास्त! खरे तर भ्रष्टाचार काय नि कसा हे जगाने आमच्या न्यू जर्सीत येऊन शिकावे असे येथील जाणकार सांगतात!! या जगात हजारो वर्षे टिकून रहाण्याचे कर्तृत्व फक्त भारतीयांच्यातच आहे, रोमन, इजिप्शियन, रोमन सगळे लयाला गेले, भारत अमर रहे.

धोणीला टेस्ट मधून विश्रांती द्यावी. नेहमीसाठीच. आणि पर्यायी किपर म्हणून पटेलला घ्यावे> >असे खुद्द पटेलसुद्धा बोलणार नाहि Lol Dhoni as a keeper will always walk in as first choice. There simply not anyone else who is better than him.

As a captain, मला नाहि वाटत कि द्रविडकडे परत जायची गरज आहे. एकदा Team building सुरू झाली कि असे मागे पुढे करण्यापेक्षा पुढच्या ५-६ वर्षांचा विचार करुन कप्तान कोण ते ठरवावे. Split Captaincy हवी का ? हा मुद्दा वेगळा आहेच परत.

एव्हढे ठाम विधान करण्याइतपत मला माहिती नाही, पण शंका येते की एक्कूण एक सामने जिंकलेच पाहिजेत असे त्या बीसीसीआय च्या व्यवस्थापकांचे उद्दिष्ट नसून खेळाडूंना संधि देणे, जुने खेळाडू खेळले नाहीत तरी त्यांचा संघात समावेश असणे याचा नवोदित खेळाडूंवर कितपत परिणाम होतो, तो चांगला आहे की वाईट, याचाहि विचार होत असावा. कारण मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममधे, सरावाच्या वेळी, हा संघ एकमेकाशी कसा वागतो, त्याचा संस्थेला, खेळाडूंना फायदा होतो का, वगैरे विचारहि करत असतील.>> झक्की individually they may have honorable intentions in mind, but as a collective unit driven by monetary goals, they surely have different priorities. त्यांच्या क्रुतिमधून, खेळाडूंच्या मुलाखतीमधून, बाकीच्या activities मधून सहज दिसतेय कि.

भारताने या त्रिकूटाला वगळायला हरकत नाही. पण पुढील २-३ वर्षे आपली विंडीजसारखी अवस्था होईल हे गृहीत धरले पाहिजे. तशी तयारी असेल तर सचिन, द्रविड व लक्ष्मणला निवृत्त व्हायला लावून रैना, रोहीत शर्मा, कोहली, युवराज, रहाणे इ. ना लगेचच संघात घ्यावे.>>असे आर या पार जायची गरज आहेच का ? त्या तिघांना उद्याच्या उद्या बाहेर काढा असे कोणीच सुचवणार नाहि. पण ति तिघे एकत्रच असायला हवेत असे जरुरी नाहि. फक्त सहावा क्रमांक शोधण्यापेक्षा पाच-सहा एकत्र शोधणे सोपे पडेल. (एका वेळी एक एक आणण्याएव्हढा वेळ आपल्याकडे आहे का ? ) शिवाय पाच नि सहा हे असे क्रमांक आहेत कि जिथे येणार्‍या खेळाडूला फारसे cushion नसते तेंव्हा establish वायला वेळ लागणे साहजिक आहे. राह्ता राहिली जिंकण्याची बात तर ती अपेक्षा नेहमीच असणार, पण फक्त त्याचा परीणाम short term goals साठी होउ देता कामा नये. पण अर्थात ह्यासाठी जे नियोजन करण्याची गरज आहे ते आपल्याकडे for whatever reasons कधीच होणार नाहि, हा नुसताच बोलाचाच भात नि बोलाचीच कढी. Sad

as a collective unit driven by monetary goals, they surely have different priorities.
आणि जिंकले काय नि हरले काय, पैसे मिळण्यावर त्याचा परिणाम होत नसेल, तर उगाच आपण तरी कशाला डोकेफोड करा?! इतर अनेक उद्योगधंदे सुद्धा पैसे मिळवणे हे ध्येय ठरवून चालतात, त्यांनी इतर काही केले नाही केले तरी आपण काही बोलू शकतो का? मग इथेच कशाला तो विषय आणायचा? भारतीय खेळाडूंचा संघ जिंकला म्हणण्या ऐवजी भारतीय क्रिकेट संस्था जगात सर्वात जास्त श्रीमंत आहे यावरच समाधान मानावे, अभिमान बाळगावा.

भारतीय खेळाडूंचा संघ जिंकला म्हणण्या ऐवजी भारतीय क्रिकेट संस्था जगात सर्वात जास्त श्रीमंत आहे यावरच समाधान मानावे, अभिमान बाळगावा.>> मी क्रिकेट खेळ म्हणून follow करतो, BCCI चे financial level नाहि करत म्हणून फरक पडतो हो. Happy

असाम्या,

बाकी तू व झक्की यांच्यातील संवाद बघता "चार दिवस सासूचे" असे काहीतरी मनात येते. आज मिठी तर ऊद्या काठी.. Happy तुझा रॉबीनहूड होवू घातलाय अशी उगाच शंका आहे!
~d
रच्याकने: "मला मध्ये आणू नका" अशी प्रेमळ तंबी माझ्या वि.पू. मध्ये दिल्यापासून मी थेट झक्कींच्या पोस्ट वर प्रतिक्रीया देणे बंद केले आहे. तेव्हा तूर्तास तूझ्यावर अतिरीक्त बाण सोडले जाण्याची शक्यता आहे!

पर्थ च्या कसोटी मधे.........सेहवाग दणकेबाज शतक करणार............अशी दाट शक्यता आतल्या गोटाने वर्तवली आहे Happy

>> सध्या लक्ष्मणविरूद्ध जोरदार आरडाओरडा सुरू आहे. त्याला काढून रोहीत शर्माला आत घ्यावे व कोहली अजून संधी द्यावी असे काही जुन्या खेळाडूंनी सांगितले आहे. लक्ष्मण गेल्या वर्षभरात परदेशात अपयशी ठरलेला आहे.

आत्तापर्यंतच्या अनुभवावरून जेव्हा लक्ष्मणविरुद्ध ओरड होते तेव्हाच तो खेळतो. पुढच्या २ टेस्टमधे तो खेळणार!

असाम्या हे बघ. चित्र पुरेसे बोलके आहे.

Dhoni_Country.PNG

१.बाहेरच्या देशातील अ‍ॅव्हरेज पिवळ्या कलरने मार्क केले आहे. त्या देशात निदान ५ टेस्ट खेळल्या अशांनाच विचारात घेतले.
२. तसेच भारतीय पाटाविकेटवर एकदम अ‍ॅव्हरेज किती जास्त येते ते पण दिसते.
३.विचार करताना केवळ धोणीने खेळलेल्या टेस्ट (एकुण कप्तान + प्लेअर) असा विचार केला आहे.

धोणी मला आवडतो. पण वनडे आणि टि २० मध्ये. मला केवळ अ‍ॅव्हरेज कडे बघायची सवय नाही. तरीही आकडेवारी बरेचदा काही सांगत असते हे लक्षात येते.

उद्य धोणीची.
धोणीची बाहेर देशातली कामगिरी ह्यावर फारएन्डने लिहिले व मी अनुमोदनाचे पोस्ट देऊन अजून पुढे लिहिले होते. त्याला सपोर्ट करणारी आकडेवारी.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंची जुनीच चाल पुनः सुरु.

हॅडिन म्हणतो, भारताची टीम fragile आहे. हॅरिस म्हणतो भारतीय संघात सेहवागने दुफळी माजवली आहे. धोणी ऐवजी त्याला कप्तान व्हायचे आहे म्हणून संघात दुफळी!

झहीर खानने हॅडिनला सडेतोड उत्तर दिले की तू आपले यष्टीरक्षण सुधार, बाकीची काळजी करू नको!

निदान तरुण खेळाडूंवर याचा काही ना काही परिणाम होईल अशी आशा ऑस्ट्रेलियाला वाटते!

आपण सभ्यपणे अश्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, मूर्खासारख्या बोलण्याकडे काय लक्ष द्यायचे असे म्हणतो.
आता पर्थमधे आपल्या खेळण्याने याला सडेतोड उत्तर देता येईल.

पण या ऑस्ट्रेलियाला सभ्यता माहित नाही. बोलून चालून चोर, दरवडेखोर, खुनी लोकांचे वंशज! असे काहीतरी भारतातल्या वर्तमानपत्रांनी, मिडियाने लिहावे. वर्तमानपत्रे, मिडिया यांना लाज, सभ्यता वगैरेची आडकाठी नाही, कारण सत्य काय ते जगासमोर आणणे हेच त्यांचे कर्तव्य!! नाहीतरी राजकारण्यांची वक्तव्ये नि करामती छापतातच! त्यात काय सभ्यता, लाज असते?
अशी माझी मनापासून इच्छा आहे!

Pages