रवा बेसन लाडू

Submitted by सशल on 21 October, 2011 - 16:59
rava besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक रवा २ वाट्या
बेसन १ वाटी
साजूक तूप १ वाटी
साखर दोन वाट्या
पाणी (पाकासाठी) एक वाटी
भरपूर केशर आणि वेलची

क्रमवार पाककृती: 

तूपावर रवा भाजून घ्या खमंग ..

मग त्यातच बेसन घालून भाजा, खमंग, हाताला अगदी हलकं लागेल, रंगही बदामी यायला हवा ..

भाजून झाल्यावर हीट बंद करा ..

मग दुसर्‍या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करा ..

पाक झाला की तो रवा-बेसन मिश्रणात घाला, बरोबर केशर आणि वेलची पूड घाला ..

हे मिश्रण जसजसं गार होईल तसतसं आळत(?) जातं .. संपूर्ण गार झालं की लाडू वळा .. वळताना एक केशराची काडी लावा .. असं केलं तर फार सुंदर दिसतात लाडू ..

वाढणी/प्रमाण: 
छोट्या आकाराचे २०-२५ लाडू होतील
अधिक टिपा: 

सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..

ह्याच पाकाला काकू शेपूट येणारा पाक म्हणते म्हणजे चमच्याने पाक टेस्ट केला की तो भांड्यात पडताना शेपूट येतं .. Happy

ह्या रेसिपीने माझे लाडू आतापर्यंत कधीही फसलेले नाहीत, काकूने रेसिपी देताना फसणार नाहीत अशी ग्वाही दिली होती .. Happy

माहितीचा स्रोत: 
काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल, थँक्यु! पर्फेक्ट रेसिपी आहे हि.
तूप कढवल्यावर खाली राहिलेली बेरी पण घातली मी लाडवाच्या भाजलेल्या मिश्रणात. तूप कमी घेतलं ( निम्मं), बाकी सेम तू दिलेलं प्रमाण.
रंग थोडा डार्क शेड मध्ये आला बेरी घातल्याने, पण चवीला फार छान झालेत लाडू!
हा फोटो

Rava Besan Ladoo.jpeg

माझे चवीला खूप मस्त झालेत
पण पाक कमी झालाय बहुतेक,कोरड पडलं होत मिश्रण
तरी पण मी त्यात परत पाक करून घातलाय आता बघू काय होतंय नैतर दुधाचा हात आहेच Lol
पण माझे बरेच प्रकार एका झटक्यात भारी होत नाही,माकाचू च जास्त होतात,पण तरी इथल्या बाकीच्या मा पण काचू पोस्ट बघितल्या की बळ मिळतं,की नै बै सगळ्या सुगरणी नसतात,माझ्या बोटीत पण खूप आहेत Lol Lol

अरे मी पाक वाढवला तर जास्तच मऊ झाले, Uhoh आणि खडे पण झाले आहेत थोडे
काय करू आता Sad

मी मिश्रण मिक्सर मधून फिरवलं आहे,खडे गायब ,मस्त मऊ टेक्चर आलंय
फक्त आता लाडू वळता येतात का बघू ,त्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलं आहे सध्या

हुर्रे जमले।,मस्त झाले एकदम
वरचे माकाचू प्रतिसाद काढून टाकत नाही,एखादी माझ्यासारखी असेल तर होईल उपयोग

वळताना एक केशराची काडी लावा .. >>> हे असं काही करणार्‍यांना सलाम! बेसनलाडवाला वरुन एक बेदाणा लावणे पण मला कठीण जाते.त्यमुळे मी तसा कधीच प्रयत्न केला नाही आणि इथे तर १ केशराची काडी लावायची आहे!

जनहितार्थ धागा वर आणत आहे. Happy
दिवाळी फराळाची सुरवात सशलच्या या नो फेल रवा बेसन लाडूने झाली. या वेळी दुप्पट प्रमाणात केले लाडू.
तुपाची बेरी घालून रवा बेसन लाडू या आधी केले होते ती खरपूस चव जास्त आवडली.

हे या वेळचे रवा बेसन लाडू

Rava Besan Ladoo_0.jpeg

IMG_20201111_084305_LL.jpg

विनापाकाचे rava लाडू.1 kilo रव्याला 1 वाटी कणिक भाजून घातली.फोटोवर जाऊ नका.फोटो यथा तथा आहे पण लाडू तसे नाहीत.

आज मी केले रवा बेसन लाडू. याच प्रमाणाने केले. पाक वगैरे व्यवस्थित जमला. ४-५ तास लागले मिश्रण आळायला. लाडू चांगले बांधले गेले.
पण साखर थोडी जास्त वाटली मला. फार गोड झालेत.
पुढच्या वेळी करताना दीडच वाटी घालून पाहावी म्हणते. त्याने पाकावर आणि मिश्रणाच्या कन्सिसटंसीवर काही परिणाम होईल का?

मी काल तुमच्या पद्धतीने करून पाहिले लाडू. चव टेक्चर मस्त झाले एकदम. फक्त झालं काय. जरा उशीरा करायला घेतले. त्यामुळे रात्री लाडू वळत बसायचा कंटाळा आल्याने तसेच पाकात मिश्रण मुरवत ठेवून दिले. म्हटलं छान आळेल. तर आज सकाळी एक मोठा अभेद्य खडक झाला होता त्याचा. रडुच यायला लागलं माकाचु वर जावे काय वाटू लागले. म्हटलं सगळी मेहेनत गेली की काय वाया!
पण शांत डोक्याने विचार केला की गॅसच्या मंद आचेवर पातेलं थोडावेळ ठेवलं. वरून थोडं कोमट दुध शिंपडलं. झाकण ठेवून दिलं. ५ -७ मिनिटाने त्या खडकाला पाझर फुटला Proud चमच्याने टणाटण प्रहार करत तो खडक फोड्ला. आता बर्‍यापैकी चमचा घुसणेबल मिश्रण व्हायला लागलं आणी जीव पातेल्यात पडला Lol मग वळणे वगैरे सोपस्कार नीट पार पडले. अशी ही लाडवांची कहाणी सुफळ संपूर्ण!

ladu.jpg

मी पण या पद्धतीने केले. धन्यवाद. चांगले झाले. अर्ध्या/ पाऊण तासातच वळायला लागले. शेवटच्या 5/ 6 लाडवाना मात्र दुधाचा हबका मारायला लागला थोडा भगरा झाल्याने.

20201113_161623.jpgमाझ्या लाडवाची पाककृती सशल आणि अंजली_१२ दोघींची मिळून आहे.

लाडू भारी दिसत आहेत.
मी केले होते तेव्हा दगड झालेला. बत्त्याने फोडला. पण खाताना विरघळत होता. मग अजून नवे प्रयोग नाही केले. चॅाकलेटचे जसे ओबडधोबड तुकडे खायला चालतात तसेच रवाबेसनाचे तुकडे चालवून घ्या असे सांगून संपवले.

अशा वेळी तो अभेद्य खडक डब्यात घालून घट्ट झाकण लावून कुकर मध्ये ठेवायचा आणि २-३ शिट्या य़ेऊ द्यायच्या (कुकरच्या). कुकर थंड झाला की आत पाणी न पडू देता डबा उघडायचा आणि लाडू वळायचे. अजूनही घट्ट वाटल्यास दुधाचा शिपका मारायचा. हे सगळे माकाचु वरूनच आलेले अनुभव आहेत. असे चुकून मग सुधारलेले लाडू खाऊन जेव्हा लोक रेसिप्या विचारतात तेव्हा काय सांगावं असा प्रश्न पडतो. आधी चुकवायचे आणि मग सुधारायचे…

तुप थिजत आणि साखरेने घट्ट होत मिश्रण अशावेळेस मायक्रोव्हेव्ह मधे ठेवुन ३०सेकन्द गरम करायच, कोरड वाटलच तर दुधाचा शिपका द्य्यायचा .

रवा बेसन भाजताना केशर घातले की चांगला रंग येतो लाडवाला ही जुन्या पुस्तकात सापडलेली टीप.

अशा वेळी तो अभेद्य खडक डब्यात घालून घट्ट झाकण लावून कुकर मध्ये ठेवायचा >>>>>>>>>> पुढच्या वेळी चुकू नये हीच इच्छा! पण झालंच असं तर लक्षात ठेवेन. Happy

Pages