सफरचंद + नारळ वडी

Submitted by आरती on 14 October, 2011 - 21:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सफरचंद - २
नारळाचा चव - १ वाटी
साखर - २ वाट्या
साजुक तुप - १ चमचा

क्रमवार पाककृती: 

सफरचंद किसुन घ्यावे. २ सफरचंदांचा साधारण २ वाट्या किस होतो.
नारळाचा चव, साखर, सफरचंदाचा किस नॉनस्टीक पॅनमधे एकत्र करुन गॅसवर ठेवावे. मंद आचेवर ठेवावे.
Mix1.jpg

हे मिश्रण हलवत रहावे लागते. १० ते १५ मिनीटांनी आपोआपच पॅन स्वच्छ होते आणि मिश्रण एकत्र होउन गोळा तयार होतो. पाक अटुन घट्ट गोळा तयार होतो. असा गोळा तयार होईपर्यंत हलवत रहावे. शेवटी गॅस मोठा केला तरी चालतो.
gola.jpg

ताटाला थोडेसे तुप लावुन गरम असतानाच वड्या थापाव्या.
wadya.jpg

गार झाल्यावर वड्यापाडुन डब्यात भरुन ठेवाव्या Happy
daba.jpg

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ फक्त :)
अधिक टिपा: 

१.सफरचंद पुरेशी गोड असतील तर साखर १ वाटीच घ्यावी.
२.सफरचंद किसताना पाठीकडुन किसावे, म्हणजे साल नीट किसली जाते. उलटे किसलेतर गर किसला जाउन साल हातात निघुन येते. किसलेले साल, छान केशराच्या काड्यांसारखे दिसते.
३.वेळ वाचवण्यासाठी, स्वयपाकाला सुरुवात करताना हे मिश्रण गॅसवर ठेवावे, साधारणपणे स्वयपाक होईपर्यंत मिश्रण आळुन येते आणि वड्या थापायला तयार होतात.

माहितीचा स्रोत: 
या वड्या आईने मला शिकवल्या की मी आईला ते आठवत नाही :). वडी हा प्रकार मात्र आईची देणगी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
एरवी आपण सुवासासाठी वेलदोड्याची पूड घालतो. ह्यात दालचिनी छान लागेल. सफरचंद + दालचिनी कॉम्बो छान जातो एकमेकांबरोबर.
नॉनस्टिकमध्ये ठेवायचे लक्षातच नाही आले आत्तापर्यंत! कढईपेक्षा नक्कीच चांगल्या होतील असे केले तर!

आरती, ही जुन्या मायबोलीत लिहिली होतीस का पाकृ?
तिकडे वाचून मी केल्या होत्या सफरचंद घालून नारळाच्या वड्या.. स्वाद मस्त लागला होता सफरचंदाचा, पण रंग नाही आवडला Sad

गार झाल्यावर वड्यापाडुन डब्यात भरुन ठेवाव्या

आणि खायच्या कधी??? की फक्त गडावर गेल्यावरच खायच्या???? Light 1

रेसिपी मस्त आहे, करुन बघणे नी नंतर खाणेही मस्ट Happy

मस्त!

लाजो, अनु ३, अमया, मंजिरी, आश, पौर्णिमा, मंजूडी, सुलेखा, दिनेश, साधना, अरुंधती, सुजा
सगळ्यांनाच धन्यवाद Happy

पौर्णिमा,
दालचीनीने याची खास 'फृटी टेस्ट' रहाणार नाही. मी तर काजु पण घालणे बंद केले.

ही जुन्या मायबोलीत लिहिली होतीस का पाकृ?>> मला पण असे आठवत होते, बरीच वर्षे झाली त्याला Happy पण सर्च मधे काही सापडले नाही. लालू आणि दिनेश असे दोनच धागे दिसतात 'सफरचंद' सर्च ला टाकल्यावर, म्हणून टाकली.

नलिनी, लवकर आण आणि फोटो पण पाठव Happy

ही बघ Happy
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/84802.html?1218407518
ते 'सफरचंदाची साल केशराच्या काडी सारखी भासते' वगैरे लिहिलं होतं असं आठवत होतं. थोडसं खणून पाहिलं जुन्या हितगुजात आणी सापडलीच लिंक. पण नव्याने परत लिहिलंस ते छान केलंस. पूर्वी करून पाहिल्या होत्या या वड्या. आता परत करून पाहीन.

एक नंबर झाल्या, चव अतिशय आवडली. आरतीचा सल्ला ऐकून दालचिनी, वेलदोडा काहीच घातले नाही. 'फ्रूटी टेस्ट'- अगदी अगदी!