माझे शाकाहार पुराण!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 15:43

मांसाहाराशी ओळख

मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.

माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.


मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.

आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.

पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.

मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.

शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:

आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.

जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.

पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?

याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.

माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.

(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)

गुलमोहर: 

दुसर्‍या सजीवाला न मारता, ज्याला जे हवं ते, पचेल ते खा >>>

मग तर या जगातल्या प्रत्येकाला उपाशीच रहावे लागेल. कारण मग शेती करणेहि शक्य नाहि. शेती करताना जमीनीतील हजारो जीवजंतु मारले जातात. आणी झाडेही सजीवच असतात. एकदा एक पिक घेतले शेतात की ते काढता येणे शक्य नाहि. शेतात किटकनाशके फवारणे शक्य नाहि. तसेच किडके धान्य खावे लागणार. Proud

मास्तुरे, हे आपण मला उद्देशून म्हणाला आहात काय? >>> ते मलाहि म्हणाले असावेत!

पण हा विषयच असा आहे की, त्यांचं इथं फारसं काहि चाललं नाही. >>> मास्तुरे challenge देताय का काय ? Proud

>>> मास्तुरे, हे आपण मला उद्देशून म्हणाला आहात काय?

बेफिकीरभाऊ, हे तुम्हाला उद्देशून नाही. तुम्ही पूर्वी कुठले धागे बंद पाडल्याचे मला स्मरत नाही.

>>> क्लासिक केस - चोरांच्या मनात चांद्णे. तो मीच का? हा प्रश्न किती लोकांना पड्ला आहे बघा मास्तुरे.

Rofl Rofl Rofl

>>> Vegetarianism - This is the practice of only killing and devouring living things that can't scream or fight back and feeling morally superior because of it.

मासे, गोगलगाय, कासव इ. प्राणी मारले जात असताना किंचाळत नाहीत व ते प्रतिकारही करू शकत नाहीत. तसेच कोंबड्या, टर्की, शेळ्या-मेंढ्या, गायी, ससा, हरीण इ. प्राणी मारले जात प्रतिकार करू शकत नाहीत. त्यामुळे हे प्राणी मारून गट्टम करणारे वरील व्याख्येनुसार शाकाहारीच ठरतात. Biggrin

>>> and feeling morally superior because of it.

Some non-vegetarians feel that they are macho and manly due to their diet. Light 1

मग तर या जगातल्या प्रत्येकाला उपाशीच रहावे लागेल. कारण मग शेती करणेहि शक्य नाहि. शेती करताना जमीनीतील हजारो जीवजंतु मारले जातात. आणी झाडेही सजीवच असतात. एकदा एक पिक घेतले शेतात की ते काढता येणे शक्य नाहि. शेतात किटकनाशके फवारणे शक्य नाहि. >>>>

मास्तुरेंनी नेहेमीप्रमाणे माझा प्रश्न टाळला. Proud
आता तुमच्याकडे लोजिकल उत्तरे नसतील तर इतरांवर धागे बंद पाडले असे का म्हणता ?
Proud

बरे , उद्यापासुन धान्य खाणे बंद का मग मास्तुरे ? किटकनाशके फवारुनच धान्याची वाढ केली जाते . शाळेत शिकवत असाल ना ? Biggrin

म्हणजे ज्याने भरपूर खून पचवून आता खुनाखुनी करणे थांबवले आहे, तोच खरा अहिंसक असतो व ज्याने कधीच खून केला नाही तो अहिंसक असूच शकत नाही !
>>>

मास्तुरे तुम्ही कितीही विचारी असलात तरी.., मला माहीत होतं तुम्ही सर्व साधारण वरवर दृष्टी कोनातुनच विचार करणार Biggrin
जरा स्पष्ट करतो, मग मत द्या (तुमच्याच उदाहरणाने) Happy

म्हणजे ज्याने भरपूर खून पचवून आता खुनाखुनी करणे थांबवले आहे, >> हो, बरोबर हे ही माझ्या मते बरोबरच. कारण खुन करताना त्याने मरणार्‍याच्या चेहर्‍यावरील भाव टिपले आहेत..त्यातिल दु:ख, भय, थरार त्याने अनुभवला..त्याच्या यातना त्याने डोळ्याने पाहील्या असतात्...त्याने मरणार्‍यामध्ये 'मृत्यू पुर्णपणे' अनुभवला असतो.
आणि कालांतराने एकदिवस जेव्हा त्याच्या मनातील/स्व:भावातील कृरता कमी होउ लागते तेव्हा त्यात अमुलाग्र बदल होउ लागतात. दया आणि करुणता मनात रुजु लागते. ती दया खरी दया... कारण 'राग' करुन सोडलेला असतो म्हणजेच अनुभवुन सोडलेला असतो (ऊदा. वाल्याकोली,अंगुलीमाल), अशा व्यक्तिची गॅरंटी देता येता की हा आता रागावणार नाही. जो कधी रागावला नाही तो रागवणार कधी ना कधी नक्कीच.नो गॅरंटी.

मास्तुरे आता तुम्ही स्व:तालाच घ्या ना...की तुम्ही कुणाचा खुन केला नाहीय...आणि पुढेही करणार नाही...काय गॅरंटी आहे..?
*****************************************************
व ज्याने कधीच खून केला नाही तो अहिंसक असूच शकत नाही ! >>> हो, बरोबर हे ही माझ्या मते बरोबरच. Lol कारण तो एक तर मनातुन भित्रा असतो, सर्व 'अतयाचार' सोसुन घेतो. Sad तरी मनातुन त्याने अत्याचार करणार्‍या व्यक्तिचे हजार वेळा मुडदे पाडलेले असतात...किंवा पुर्ण जन्मात त्याच्यावर अशी वेळच येत नाही की कुणाचा खुन करावा. सर्व सुख लाभलेले असते.
तुम्हाला एखादा डास चावला तर त्याला मारायला हात उगारणार नाहीत का..?
मग तुम्ही अहिंसक कसले..? जरी आज पर्यंत माणासाचा खुन केला नाही.... Biggrin

मास्तुरे, जो जन्मापासुन आंधळा आहे त्याला अंधारही दिसत नाही...., अंधार पहायला आधी उजेड पहावा लागतो. ज्याने कधीच उजेड पाहीला नाही,तो अंधार पाहु शकत नाही. अंधार अनुभवण्याधी उजेड अनुभवावा लागतो.
ज्याने कधीच मांसाहार केला नाही.., जो जन्मापासुन शाकाहारी आहे...तो बंधनात आहे...फक्त प्रावृत्त आहे.... समाजाच्या, परंपरेच्या, नाहीच तर..., स्वत:हाच्या स्वार्थी स्व:भावाच्या... आम्ही शाकाहारीचा टेंभा मिरवायला. जर तेही नसेल तर अशी व्यक्ती फक्त 'आहारी' असु शकते 'शाकाहारी' नाही. अशा व्यक्तित शाकाहार आणि मांसाहार अशा भावनाच/स्वाद/आवड नसतात.

मास्तर यावर आपले मत अपेक्षित/आणि ते देशी तर नेहमी फुलट्टुच असतात म्हणा.. हाकानाका:फिदी:

भूषणराव, आपलेही मत अपेक्षित (जाणुन घ्यायला आवडेल...) वाट पाहत आहे Happy

म्हणजे ज्याने भरपूर खून पचवून आता खुनाखुनी करणे थांबवले आहे, >> हो, बरोबर हे ही माझ्या मते बरोबरच. कारण खुन करताना त्याने मरणार्‍याच्या चेहर्‍यावरील भाव टिपले आहेत..त्यातिल दु:ख, भय, थरार त्याने अनुभवला..त्याच्या यातना त्याने डोळ्याने पाहील्या असतात्...त्याने मरणार्‍यामध्ये 'मृत्यू पुर्णपणे' अनुभवला असतो. कालांतराने एकदिवस जेव्हा त्याच्या मनातील/स्व:भावातील कृरता कमी होउ लागते तेव्हा त्यात अमुलाग्र बदल होउ लागतात. दया आणि करुणता मनात रुजु लागते. ती दया खरी दया... कारण 'राग' करुन सोडलेला असतो म्हणजेच अनुभवुन सोडलेला असतो (ऊदा. वाल्याकोली,अंगुलीमाल), अशा व्यक्तिची गॅरंटी देता येता की हा आता रागावणार नाही. जो कधी रागावला नाही तो रागवणार कधी ना कधी नक्कीच.नो गॅरंटी. >>>>>>>>
>>

Rofl बकवास! स्टॅन्ड करेक्टेड बरं झालं तुमच्या मताला किंमत नाही ते. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी काहीही लिहायचा अट्टहास का करायचा.

अहो शाकाहारी असा किंवा नॉनव्हेज खा नाही तर नका खाऊ, हे सगळं वैयक्तीक असतं कोणाला पटवून देण्याची गरज काय? इथे नॉनव्हेजवालेच उलट शाकाहार्‍यांबद्दल जास्त बोलत आहेत. गंमतच आहे सगळी.आणि वर हे असे मौलिक विचार, म्हणे खून करणारे अहिंसक होतात. बिन लादेन म्हणजे खरा अहिंसक. वा वा!! (हो नाहीतरी त्याला इतरांच्या मृत्यूचे भय डोळ्यात दिसल्यामुळे, तो पस्तावून स्वतःस दंड करायला त्याने स्वतःला बंदिस्त केले होते ना? ) . अरे हो म्हणूनच अतिरेकी लोकं भारतात मोकाट फिरतात ना? कारण तुमच्या थेअरी नुसार एक दिवस ते बदलतील. ते बदलणे महत्त्वाचे! लोकं काय पैदा होतात आणि मरतात. अश्या अंहिसेचा विजय असो!! ( काय लिहिताय काय? अहो हे विचार बदला कृपया, प्लिजच म्हणतो मी, प्लिज, कृपया!! )

आणि हे असे उदात्त, धिर गंभीर विचार असणारा वर अनेक फालतू पोस्टी (उदा मी पिऊन लिहितो) कश्या काय टाकतो हा प्रश्न मला पडला. पण तो महत्त्वाचा नाही. Happy दांभीकता सगळीकडे. देश्या अरे, खरे तर अशांशी वाद देखील का घालावा? रस्ता चुकला तुझा!! श्री राम श्री राम!

नॉनव्हेज वाल्यांमध्ये पण गंड, चिकन खाणार, गाय नाही खाणार, मंगळवारी नाही खाणार, अरे तिच्या! खातोस ना? मग खा की! धर्म कशाला मध्ये? असे करणारे गंडलेले लोकं आहेत !! दांभिक !!

(गाय, डुक्कर इ प्राणी चवीष्ट आहेत असे मानणारा) देशी!

मी माझ्या घरात लहान आहे. मला बालपणी सर्वांनी खूप बळजबरीने मास खाऊ घातले. कैकदा धपाटे देखील खाल्ले आहेत मास खात नाही म्हणून. मला कधीचं मास हे अन्न आहे असे वाटले नाही. अगदी पहिली मासाची फोड ताटात आली तेंव्हापासून. मी पाचवी नंतर धीट बनलो आणि मग घरच्यांनी माझ्यावर मास खाणे लादले नाही. मी खरा शाकाहारी आहे ह्याचा मला अभिमान आहे.

मला बालपणी सर्वांनी खूप बळजबरीने मास खाऊ घातले. कैकदा धपाटे देखील खाल्ले आहेत मास खात नाही म्हणून. मला कधीचं मास हे अन्न आहे असे वाटले नाही. अगदी पहिली मासाची फोड ताटात आली तेंव्हापासून. मी पाचवी नंतर धीट बनलो आणि मग घरच्यांनी माझ्यावर मास खाणे लादले नाही. मी खरा शाकाहारी आहे ह्याचा मला अभिमान आहे. >>> बी, आता मलाही तुमचा अभिमान आहे Happy (कुणी कितीही म्हटले की, कुणाला पटवुन देण्याची गरज काय..? तरी आपण पटवुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.....छान..!) पण, फक्त आवडत नाही म्हणुन मांसाहार घेत नाही... हे कारण...मला तरी जरा..अस्वस्थ करते, म्हणजे पुर्ण वाटत नाही...खरे असुनही.

देशी, आपल्या कडुन अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती Happy
धिर गंभीर विचार असणारा वर अनेक फालतू पोस्टी (उदा मी पिऊन लिहितो) कश्या काय टाकतो हा प्रश्न मला पडला. पण तो महत्त्वाचा नाही.>> लाईट घ्या राव Wink

मांसाहार करुन शाकाहारी झालेली व्यक्ती ही खरी शाकाहारी असते. >>>>> १००% अनुमोदन. हे वाक्य म्हणजे ह्या लेखाचे अनुमान म्हणायला हरकत नाहि. एकदम मान्य.
>>> चाणक्य, आपल्याला 'तर्कात' कुणीच पकडु शकत नाही :स्मित:...आपण एखाद्या गोष्टीचा आरपार-सारासार-सनातन विचार करता....! जाणुन छान वाटले. आपल्याशी बोलताना काळजी घ्यावी लागेल म्हणतो Wink

चला मास्तरांनी डु आय उतरवला आता रणभुमीवर नेहमीप्रमाणे.मास्तर पेटले आता. Proud

मास्तर उगीचच देशीच्या नावाने login करण्याचे कष्ट का घेता ? Proud

इथे नॉनव्हेजवालेच उलट शाकाहार्‍यांबद्दल जास्त बोलत आहेत >>>

अहो देशी , आज पण देशी घेउन आला का ? धागा कोणी चालु केला आहे ते वाचा नीट. वाचता येत नसेल तर मास्तरांकडुन शिकुन घ्या वाचायला.

>>> नॉनव्हेज वाल्यांमध्ये पण गंड, चिकन खाणार, गाय नाही खाणार, मंगळवारी नाही खाणार, अरे तिच्या! खातोस ना? मग खा की! धर्म कशाला मध्ये?

हे अगदी खरं. माझा एक सहकारी दर मंगळवारी व गुरूवारी उपास करायचा (म्हणजे खिचडी, केळी वगैरे खायचा, पण भात, पोळी इ. वर्ज्य) आणि म्हणून तो दर बुधवारी नियमाने नॉनव्हेज हाणायचा.

अजून अंदाजे ३ आठवड्यांनी आखाड (आषाढ अमावास्या) येईल. श्रावणात महिनाभर नॉनव्हेज वर्ज्य करणारे भरपूर नॉनव्हेज चापून (आणि बरेचजण पिऊन सुद्धा) आखाड साजरा करतात. (या दिवशी बरेच जण पिऊन गटारात पडलेले असतात. म्हणून या अमावास्येला "गटारी" अमावास्या असे सुध्दा नाव आहे.) नंतर महिनाभर उपास करून भरपूर पुण्य कमवतात आणि श्रावण संपला रे संपला की लगेच दुसर्‍या दिवशी उपास सोडतात!

>>> चातक | 9 July, 2011 - 20:59

चातक,

तुम्ही या प्रतिसादात काय लिहिले आहे आणि तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, ते काही नीटसं कळलं नाही.

खुन्याच्या मनात दया निर्माण होऊन तो खून पाडणे थांबवतो, त्याने राग सोडलेला असतो, तो यापुढे कधीच खून पाडणार नाही किंवा रागावणार नाही . . . हे नक्की काय आहे ते काहि समजलं नाही.

>>> अंधार अनुभवण्याधी उजेड अनुभवावा लागतो.

बरोबर. पण शाकाहार मांसाहारापेक्षा श्रेष्ठ का हे समजण्यासाठी प्राणी मारून खाण्याची व त्यांना झालेल्या यातना बघून मगच शाकाहाराचे महत्व पटण्याही गरज नाही. स्वतःला साधी टाचणी टोचली किंवा चटका बसला तर किती वेदना होतात ते कळते. त्यामुळे एखाद्या प्राण्याची मान कापताना किंवा त्याला जिवंतपणी उकळत्या पाण्यात टाकल्यावर कितीतरी जास्त प्रमाणात वेदना होतील हे लगेच लक्षात येते. त्यामुळे शाकाहाराचे महत्व कळण्यासाठी आधी मांसाहारीच असले पाहिजे अशी काहि गरज नाही.

>>> व ज्याने कधीच खून केला नाही तो अहिंसक असूच शकत नाही ! >>> हो, बरोबर हे ही माझ्या मते बरोबरच. कारण तो एक तर मनातुन भित्रा असतो, सर्व 'अतयाचार' सोसुन घेतो. तरी मनातुन त्याने अत्याचार करणार्‍या व्यक्तिचे हजार वेळा मुडदे पाडलेले असतात...किंवा पुर्ण जन्मात त्याच्यावर अशी वेळच येत नाही की कुणाचा खुन करावा. सर्व सुख लाभलेले असते.

ही मला नवीनच माहिती मिळाली. या माहितीनुसार सर्व संतमहात्मे, गांधीजी, विनोबा भावे इ. मनातून भित्रे होते व त्यांनी मनातून अत्याचार करणार्‍या (म्हणजे गांधीजींनी व विनोबांनी इंग्रजांचे, संत तुकारामांनी मंबाजीचे, संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनी आळंदीच्या ब्राह्मणांचे इ.) व्यक्तींचे हजार वेळा मुडदे पाडलेले होते असा अर्थ निघतो. आणि हे समजा खरं मानलं तरी प्रत्यक्षात हजार लोकांना मारण्यापेक्षा निव्वळ मनातल्या मनात मारणे कितीतरी कमी वाईट. नाही का? या तर्कानुसार कसाबने मुंबईत येऊन २०० लोकांना मारण्यापेक्षा घरच्या घरी एखाद्या कॉम्प्युटर गेममध्ये २०० लोकांना मारलं असतं तर लोकांनी त्याला अहिंसक म्हटलं नसतं. पण खरोखरच २०० नागरिक मारल्यामुळे तो खरा अहिंसक आहे.

>>> ज्याने कधीच मांसाहार केला नाही.., जो जन्मापासुन शाकाहारी आहे...तो बंधनात आहे...फक्त प्रावृत्त आहे.... समाजाच्या, परंपरेच्या, नाहीच तर..., स्वत:हाच्या स्वार्थी स्व:भावाच्या... आम्ही शाकाहारीचा टेंभा मिरवायला. जर तेही नसेल तर अशी व्यक्ती फक्त 'आहारी' असु शकते 'शाकाहारी' नाही. अशा व्यक्तित शाकाहार आणि मांसाहार अशा भावनाच/स्वाद/आवड नसतात.

शाकाहारी व्यक्ती फक्त आपण शाकाहारी आहोत हा टेंभा मिरविण्यासाठी शाकाहारी असते, हे देखील नव्यानेच समजले. प्राण्यांना न मारण्यामागे देखील स्वत:ची स्वार्थी भावना आहे हा देखील नवीन शोध लागला. जर शाकाहार हे बंधन असेल आणि मांसाहार म्हणजे बंधनातून मुक्तता असेल तर मला आयुष्यभर ह्या बंधनात रहायला आवडेल.

नॉनव्हेज वाल्यांमध्ये पण गंड, चिकन खाणार, गाय नाही खाणार, मंगळवारी नाही खाणार, अरे तिच्या! खातोस ना? मग खा की! धर्म कशाला मध्ये? >>>>

शाकाहारांध्ये ही गंड असतोच की. उपवासाच्या दिवशी फक्त साबुदाणा . अरे खा की सर्व शाकाहार मग! कोणाला मारत नाहि ना तुम्ही!

. श्रावणात महिनाभर नॉनव्हेज वर्ज्य करणारे भरपूर नॉनव्हेज चापून (आणि बरेचजण पिऊन सुद्धा) आखाड साजरा करतात >>>> आयुष्यभर शाकाहार असणारे पित नाहित असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?

पण शाकाहार मांसाहारापेक्षा श्रेष्ठ का >>>> मास्तर इथे मला, श्रेष्ट कोण ? हे पटवुन द्यायचे नाहीय....! कोणते ही अन्न, जे बिन दिक्कत कुणाच्याही पोटाची आग शमवते ते 'श्रेष्ट'.

मांसा,शाकाहारी कोण? हा मुद्दा आहे Happy

स्वतःला साधी टाचणी टोचली किंवा चटका बसला तर किती वेदना होतात ते कळते. त्यामुळे एखाद्या प्राण्याची मान कापताना किंवा त्याला जिवंतपणी उकळत्या पाण्यात टाकल्यावर कितीतरी जास्त प्रमाणात वेदना होतील हे लगेच लक्षात येते. त्यामुळे शाकाहाराचे महत्व कळण्यासाठी आधी मांसाहारीच असले पाहिजे अशी काहि गरज नाही. >>> सामान्यपणे....भौतिक विचार.........ठिक आहे.

या माहितीनुसार सर्व संतमहात्मे, गांधीजी, विनोबा भावे इ. मनातून भित्रे होते व त्यांनी मनातून अत्याचार करणार्‍या (म्हणजे गांधीजींनी व विनोबांनी इंग्रजांचे, संत तुकारामांनी मंबाजीचे, संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनी आळंदीच्या ब्राह्मणांचे इ.) व्यक्तींचे हजार वेळा मुडदे पाडलेले होते असा अर्थ निघतो. >>>पाडलेले नव्हते.... ते सर्व म्हणुनच 'महात्मे' होते. शाकाहारी मांसाहारी या बाबींच्या पार होते. या सर्वांच्या जिवनात कुठे ना कुठे हिंसेचा प्रत्यय आला आहे.

कुणीच जन्मता संत नव्हता...आणि असुच शकत नाही.

धन्यवाद मास्तर Happy

>>>>>मी पाचवी नंतर धीट बनलो
बी, हा तू लहानपणी केलेल्या मांसाहाराचा परिणाम असावा. Wink

किरु Biggrin

जोक्स अपार्ट, पण मला एक प्रश्न नेहमी सतावतो... झाडांना भावना असतात, खोडं, फांद्या, मुळांवर घाव घातल्यावर झाडांना वेदना होतात, हे विज्ञानाने दाखवून दिलेलं आहेच... पण फळं, फळभाज्या, पानं, ह्यांनापण तशा संवेदना असतात का? की जसे आपले केस, वाढलेली नखं कापली तरीही दुखत नाहीत तसे असते ते? फळं आपण जर नाही तोडली, तर कालांतराने गळून पडतातच ना? त्यामुळे त्यांना संवेदना असण्याबाबतीत मी जरा साशंक आहे. या उलट जे प्राणी आपण मारतो, ते आपल्यासारखेच जीव असतात आणि त्यांना वेदना होतात, हे तर कोणीही मान्य करेलच...

सानी, जे झाडावरुन गळून पडतं ते पक्व झाल्यानंतरच गळून पडतं. म्हातारपणाने आलेला मृत्यू आणि हत्या यातल्या फरकासारखच आहे हे.

बी, जबरदस्तीने केलेल्या मांसाहाराची चव चांगली नव्हती कॉय ? Wink मे बी दे नीड सम गुड रेसिपी.

मे बी दे नीड सम गुड रेसिपी.>>> Lol

धन्यवाद बागुलबुवा, पण आपण खरंच ह्या झाडांना आणि माणसांना एकच नियम लावू शकतो की नाही, हा प्रश्न मनात राहतोच...

जे झाडावरुन गळून पडतं ते पक्व झाल्यानंतरच गळून पडतं. म्हातारपणाने आलेला मृत्यू आणि हत्या यातल्या फरकासारखच आहे हे.>>>

जशी झाडावरुन फळे गळून पडतात, तसेच डोक्यावरचे केसही गळून पडतात... ते आधीच कापले तरीही दुखत नाहीत. नखांचेही तसेच.... मग फळांना, फुलांना तोडल्यावर त्रास खरंच होत असेल का? ती झाडाची बाय-प्रॉडक्ट्सच तर आहेत ना? त्यांना इतर सजीव किंवा त्यांची पिल्ले यांचा नियम लावता येईल का खरंच?

बरं, झाडांची फळे आणि माणूस यांना सारखा नियम लावायचा ठरवला, तर तुमचे हे मत (<<<म्हातारपणाने आलेला मृत्यू आणि हत्या यातल्या फरकासारखच आहे हे.>>> ) एकवेळ मानता येईल, पण मग माणसाच्या पेशींचा काळाच्या ओघात र्‍हास होतो आणि तो म्हातारा होऊन मरतो, तसे झाडांचे कुठे होते? (बरीचशी)झाडं तर काळानुरुप वाढतच जातात, त्यांची मुळं जमीनीत खोलवर जात राहतात... त्यांना नवीन नवीन पानं, फुलं, फळं येतच राहतात....

त्यामुळेच हा प्रश्न उरतोच, की झाडाची फळे, फुले आणि माणसाची मांसाहाराच्या समर्थनार्थ ह्या प्रकारे तुलना होऊ शकेल का?

झाडंही म्हातारी होउन मरतात सानी, आपल्या कुटूंबव्यवस्थेसारखीच त्यांनाही नवीन्न रोपं फुटतात.

शेवग्याच्या झाडाला जखम झाली तर त्यातून चीक येतो. झाडांना मधुर संमधुरैवल्यास त्यांची वाढ व फळे फुले येणे जोमाने होते. झाडांना माणसेही आवडतात आणि आवडत्या माणसांचा दुरावा ही जाणवतो

Pages