माझे शाकाहार पुराण!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 15:43

मांसाहाराशी ओळख

मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.

माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.


मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.

आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.

पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.

मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.

शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:

आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.

जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.

पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?

याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.

माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.

(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)

गुलमोहर: 

१. भाऊ, नेहमीप्रमाणेच तुम्ही रेखाटलेले व्यंगचित्र धम्माल आहेत! Proud

२. (बींविषयी पूर्ण आदर ठेवून) चातक आणि चाणक्य यांच्या पोस्टस वाचून खुपच हसू आले! Lol

३. मामी, नेहमीप्रमाणेच तुमच्या विनोदबुद्धीला माझा सलाम! Biggrin

४. बाबु, तुमची मांसाहार करण्याची दोन्ही कारणे आवडली... Proud

५. मला ह्या विषयावर विचार करायला वेगवेगळे दृष्टीकोन देणार्‍या सर्वांचे आभार! Happy

चला ... उद्या नरभक्षण कसे उत्तम असते ह्यावर चर्चा करू मग Proud
त्या चीन मध्ये आणि कुठेतरी कुठेतरी human fetus खाण्याचेही फॅड आलेय म्हणे ! हेल्थ रेस्टोरंट स्पेशल Sad
Ref: http://urbanlegends.about.com/od/horrors/a/eating_babies.htm (Caution: Disturbing image )

अहो .. आहार कोणता घ्यावा आणि कोणता नाही हा वैयक्तिक विषय आहे. इथेही जे लोक मांसाहार करतात किंवा त्याची भलावण करतात ते फक्त चिकन मटण खाणारे आहेत.

भूक लागण्याच्या आधी शिकार करणारा किंवा शिकारीची चक्क पैदास करणारा एकुलता एक प्राणी माणूसच आहे नाही ? Lol
असो ..

माणूस हा सर्वाहारी आहे हे अ‍ॅनॅटॉमिकल आणि इव्होल्युशनरी सत्य आणि सर्व माणसे शाकाहारी झाली तर त्यांना पृथ्वी पोसू शकत नाही पर्यावरणीय सत्य >>> इथेच सगळा विषय संपतो. अंडे नाकरून कोंबडीवर अन्याय करू नये. सगळ्यांच अंड्यातून पिले आली तर डालग्यांचा प्रश्न अवघड होईल. वळू बोकडांचा उग्र वास घेत ऑफिसला जाणे असह्य होईल. आपल्याला शाकाहारी राहण्यास मदत करणार्‍या मांसाहारी लोकांचे आभार मानावे लागतील. आपण पचेल तो, जिवीतास (आपल्या) धोकादायक नसणारा आहार घ्यावा. फक्त त्या डिस्कव्हरीवरच्या माणसाईतका भंपक आहार मला तरी झेपणार नाही. किडे मकोडे पकोडे असल्यासारखा खातो तो...

चायनात वेगळे उपाय योजतात वाट्टं !!!

मामींनी निबंधाचे विषय सूचवले आहेत. निबंध स्पर्धा घ्य्याच्ची का ?

काय खायचय ते मस्त खा राव!!!!!!!!!
हेच चांगलं न तेच चांगलं म्हणून उगाच एकमेकांची डोकी कशाला खाताय?

हेच चांगलं न तेच चांगलं म्हणून उगाच एकमेकांची डोकी कशाला खाताय? >>> भेजा फ्राय बहुतेकांची आवडती डिश असावी Proud

>>> ज्या भागात जे आवश्यक आहे, गरज आहे ते खाणे शास्त्र संमत आहे.

अन्नधान्ये, फळफळावळ इ. ची पुरेशी उपलब्धता असलेल्या भागात मांसाहाराची कितपत गरज आणि आवश्यकता आहे?

>>> सगळ्यांच अंड्यातून पिले आली तर डालग्यांचा प्रश्न अवघड होईल.

पोल्ट्रीफार्मवर मारण्यासाठी प्रचंड प्रमाणात केली जाणारी कोंबड्यांची पैदास थांबविली की इतक्या अंड्यांचा म्हणजेच पर्यायाने डालग्यांचा फारसा प्रश्न उदभवणार नाही.

खरं तर माझ्याकडे आता मांडण्यासारखे मुद्दे नाहीत. तरी पण निव्वळ टाईमपास म्हणून काही कमेंट्स करतोय.

मास्तुरे, कोंबडी काही नैसर्गिक रित्या आढळणारा पक्षी नाही. ते पुर्णपणे मानवाने निर्माण केलेले प्रॉडक्ट आहे. मला सांगा, असा भरमसाट अंडी घालणारा, (जवळ जवळ दिवसाला एक ) फारसा उडू न शकणारा "पक्षी" निसर्गात तग धरू शकेल का ?

अन्नधान्ये, फळफळावळ असली तरी प्रथिनांसाठी प्राणिज पदार्थांवर काही प्रमाणात अवलंबून रहावेच लागते. तेवढ्या दर्जाची प्रथिने देणारे शाकाहारी अन्न, नेहमीच उपलब्ध असते असे नाही.

खरं तर माझ्याकडे आता मांडण्यासारखे मुद्दे नाहीत. तरी पण निव्वळ टाईमपास म्हणून काही कमेंट्स करतोय.
कोंबडी काही नैसर्गिक रित्या आढळणारा पक्षी नाही. ते पुर्णपणे मानवाने निर्माण केलेले प्रॉडक्ट आहे. <<<

दिनेश, (तुम्ही मला उलट्या क्रमाने प्रतिक्रिया वाचायला भाग पाडलंत :फिदी:) हे विधान तुम्ही टाईमपास म्हणून करताय की हे सत्य आहे? कोंबडीची निर्मिती माणसाने केली असेल तर कोंबडी आधी की अंडे हा प्रश्न निकालात निघाला म्हणायचा!

गजानन, निसर्गात आढळणार्‍या काही प्राण्यापक्ष्यांना माणसांने अनेक पिढ्या माणसाळवले आणि आताचे प्राणी पक्षी निर्माण झाले. उदा कुत्रा. सध्याचा घरगुति कुत्रा, माणसाच्या सोबतीशिवाय जगूच शकणार नाही. अगदी भटका जरी असला तरी तो मानवी वस्तीच्या जवळपासच राहणार. स्वतः शिकार करुन पोट भरायची क्षमता आता त्याच्याकडे नाही. असे अनेक प्राण्यांच्या बाबतीत झालेय. निसर्गात गायीला इतके दूध निर्माण करायची गरजच नाही. त्यांचे मूळ जंगली अवतार आता असतील किंवा नसतीलही.

असो नाहीतरी बीबी भरकटलाच आहे, त्यात माझी भर.

पुराण वाचले. चांगले मांडलेत अनुभव.

(आता प्रतिक्रिया वाचणार) >>>>

गजानन तुमचा पेशन्स मोठा आहे. मी लेख वाचतच नाहि आजकाल प्रतिक्रियाच वाचतो.

दिनेशदांनी टाईमपास म्हणुन मांडलेला मुद्दा 'हा' खुपच महत्त्वाचा आहे... (कोंबडी एक प्रॉडक्ट). आणि या बद्द्ल मला सविस्तर (म्हणजे एक मोठ्ठा प्रतिसाद :स्मित:) लिहुन इथे ते स्पष्ट करायचे आहे....पण वेळे अभावी शक्य होत नाहीय्.....पण करेन जरुर.
त्यातीलच एक उदाहरण..

साबण, शँपु, बिस्कीटे, कपडे, मेडीसिन...वैगरे वैगरे.... ही सर्व उत्पादने माणसाने माणसाला उपयोगात आणता येण्यासाठी...अतिरीक्त गरजा भागवण्यासाठी....थोडक्यात जास्त फायदे घेण्यासाठी...आपल्या सोयीसुवेधेसाठी उत्पादीत केली आहे..., संपुर्ण जगात मोठ्याप्रमाणावर मुळ 'क्लोन' केलेल्या कोंबड्यांचे मांस वापरले जाते. ब्रॉयलर आणि तत्सम प्रकाराच्या मानवनिर्मित पक्ष्यांचा प्रकार आहे तो.
अर्थात यांची पैदास ही नैसर्गिक नाही. सांगण्याचा अर्थ असा की, या श्वास घेणार्‍या प्राणि-पक्ष्यांचे मुळात अस्तित्त्वच नाहीय. यांना मानवाने निर्माण केले मानवाच्याच हितासाठी...आणि मानवाची ही किमीया निसर्गानेच मानवास प्रदान केली आहे. हिच क्रिया/पध्दत इतर 'प्राण्यांच्या फार्मवर' ही चालते.

{ मला रस्त्यावर एखादा जखमी माणुस/कुत्रा दिसला तर..... जिव कळवळुन उठतो... Sad त्याची मलम पट्टी करावी असंही मन होतं....जमेल तशी मदत मी करतोच..)

दिनेशदा, चातक, तुमचे मुद्दे योग्यच आहेत... आणि म्हणूनच प्राण्यांचा सुळासुळाट होऊ नये, यासाठी आम्ही मांसाहारी आहोत, असे म्हणणार्‍यांचा मुद्दा अजिबात पटत नाही... माणसाने प्रामाणिकपणे मला चव आवडते म्हणून मी खाते/तो म्हणावे... निसर्गाच्या चक्रासाठी आम्ही हे करतो वगैरे युक्तिवाद म्हणजे स्वतःच्या मनाचे समाधान करण्याचा प्रकार वाटतो!

साने फक्त यासाठी असं कधी गं म्हणालो..? दिनेश्दा ही नाही म्हणाले.... Uhoh

एक आहे, आपल्या देशात जास्त करुन कुत्र्यांचा/माणसांचा सुळसुळाट आहे..... हे मी तर खात नाही...दिनेशदा तर शाकाहारी.

चातक, मी हे तुझ्यासाठी नाही लिहिले, ते एक जनरल स्टेटमेंट होते... कारण मांसाहार करणारे बरेच लोक असा युक्तिवाद करतांना दिसतात.

एक आहे, आपल्या देशात जास्त करुन कुत्र्यांचा/माणसांचा सुळसुळाट आहे..... हे मी तर खात नाही...दिनेशदा तर शाकाहारी.>>> Rofl जोक ऑफ द डे!! Biggrin

समस्त मांसाहारी लोकांना माझा एक सवाल आहे. चवीसाठी खातो असे जे म्हणले जाते, ते नक्की काय आहे ?
कोणत्याही प्राण्याच्या मांसाला चांगली चव असते का ? की त्याचे पदार्थ बनविताना त्यामधे अनेक गोष्टी (मसाले, इ.) घातले जातात त्यामुळे जी चव येते ती चांगली असते ?
दुसरे उत्तर बरोबर असेल तर मसाले वगैरे घालून तशीच चव शाकाहारी पदार्थांना देखील येऊ शकेल का ?
पहिले उत्तर बरोबर असेल तर लोक कच्चे मांस जास्त प्रमाणात का खात नाहीत (अपवाद मासे)

या लेखाचा उद्देश कळला नाही.

जे खायचय ते खा.... तुम्ही जे खाताय , ते तुमच्या मनाला पटतय ना... मग झालं. दुसरे काय खातात आणि ते खातात ते चुकीचे आहे की बरोबर, यावर काथ्याकुट करण्याची गरज काय हे कळत नाही.

दुसरे म्हणजे अन्न हे पुर्ण ब्रम्ह असल्याने तुम्हाला तुमचे अन्न जितके आदरणीय आहे तितकेच इतरांना त्यांचे अन्न आदरणीय आहे. एकमेकांच्या अन्नाचा आदर करणे गरजेचे नाही का?

काही विशिष्ट पंथात शाकाहार पाळला जातो, जीवजंतूंची हत्या होऊ नये म्हणून तोंडाला कापड बांधतात इ. पण त्याच पंथामध्ये मुलींना साध्वी बनवून वाईट आयुष्य जगण्यासाठी जबरदस्ती केली जाते. याच पंथातले लोक घोटाळे वगैरे करण्यात मागे नाहीत. शाकाहाराचा टेंभा मिरवून माणसाला माणसासारखे वागवू शकत नसाल, तर काय उपयोग त्या भूतदयेचा?

या धाग्यावर फारच हाणामारी झालेली दिसते आहे. जरा वातावरण हलके करतो. गृहिणींच्या स्वैपाकघरातील क्रूर व हिंस्त्र वागण्या बद्दल कवि अशोक नायगावकर काय म्हणतायत ते http://www.youtube.com/watch?v=jWdyuqhgIls&feature=relmfu खुप्ते गुप्ते च्या या भागात पहा. Happy

लेख वाचला. ज्यांना जे खायचे ते खाऊ द्यावे असे कोणी म्हटल्याप्रमाणे सगळे वागल्यास वादाचे मुद्दे, युक्तिवाद येऊच नयेत.

महेशराव, ते ज्याच्या त्याच्या जिभेवर अवलंबून आहे. लोक जसे भाज्या शिजवून खातात तसे मांसही शिजवून खाल्ले जाते. भाज्या कच्च्या खातात तसे काही लोक मांसही कच्चे (कमी शिजलेले) खातात. पण ते पचायला जड, आरोग्याला अपायकारक असू शकते. मसाल्यांचा वापरही ठिकाण, लोकांनुसार कमी-अधिक असतो. मांसाला वेगळी चव असते. तेच मसाले वापरुन शाकाहारी पदार्थांना तीच चव येत नाही.
धन्यवाद.

-अन् सात्त्विक, अन्कॅनी.

महेश,
<< कोणत्याही प्राण्याच्या मांसाला चांगली चव असते का ? >> प्रत्येक मांसाला वेगवेगळी चव असते.

<< की त्याचे पदार्थ बनविताना त्यामधे अनेक गोष्टी (मसाले, इ.) घातले जातात त्यामुळे जी चव येते ती चांगली असते ? >> म्हणूनच वेगवेगळे मसाले वापरुन मांसाहारी पदार्थ बनवले जातात. (शाकाहारी पदार्थही.)

<< दुसरे उत्तर बरोबर असेल तर मसाले वगैरे घालून तशीच चव शाकाहारी पदार्थांना देखील येऊ शकेल का ? >>

तश्याच प्रकारची, पण तशीच नाही. किंबहुना सगळ्याच शाकाहारी पदार्थातही सारखेच मसाले वापरत नाहीत. नाहितर सगळ्याच भाज्यांचीही रेसिपी एकच असती ना ? Happy

<<पहिले उत्तर बरोबर असेल तर लोक कच्चे मांस जास्त प्रमाणात का खात नाहीत (अपवाद मासे)>>

भाज्या कच्च्या खातो का आपण ? कच्चे मांस पचवायची सवय आपल्याला नाही. ती केली तर नक्कीच खाउ.

आणि चवीबद्दल म्हणाल तर कारल कडू असतं आणि काही भाज्याही आंबट, तुरट, तिखट असतात. त्यांच्या चवी खुलतील अश्या प्रकारे त्या बनवल्या जातात. मांसाचही तसच आहे.

चला आता....एक एक चिकन तंदुरी, मटण मसाला, प्रॉन्स डिप फ्राय इन शेझ्वान ई. ची रेसिपी येउद्या...

इट्स रिअल टाईम टु 'विषयांतर'... Wink

अरे ए.. गपा की! खायचे ते खा.. नाय तर उपाशी र्‍हा.. आपले डोस्के खाऊ नका..!

किती वेळ ही पकाऊ चर्चा.. ?
१. जगातले सगळे मासे, सुके मासे, कोंबड्या नि बकरे संपत नाहीत
२. मी पंचत्वात विलीन होत नाही

ह्यापैकी पहिले जे होईल तेंव्हा मी सध्याचा आहार थांबवेन. Proud

>>कोणत्याही प्राण्याच्या मांसाला चांगली चव असते का ? >> प्रत्येक मांसाला वेगवेगळी चव असते <<
उदा: कोंबडीच्या ब्रेस्ट पीसची चव थाय पीस पेक्षा चांगली असते. तसंच बांगड्याच्या शेपटाकडील भाग जास्त चवदार असतो...
माझे (आता दुर्मिळ होणारे) चार आणे. Happy

Pages