माझे शाकाहार पुराण!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 15:43

मांसाहाराशी ओळख

मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.

माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.


मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.

आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.

पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.

मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.

शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:

आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.

जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.

पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?

याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.

माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.

(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)

गुलमोहर: 

शाकाहाराचा टेंभा मिरवून माणसाला माणसासारखे वागवू शकत नसाल, तर काय उपयोग त्या भूतदयेचा?

अगदी १०१ % अनुमोदन. शाकाहारी पंथातील लोक घोटाले करन्यात कमी नाहीत. यावरुन हे सिद्ध होते की अन्नाचा आनि सात्विकतेचा स्म्बंध नाही.

मांसाला वेगळी चव असते. तेच मसाले वापरुन शाकाहारी पदार्थांना तीच चव येत नाही. > >लालूच्या पोस्ट्मधे पुढे, बहुतेक जणांना मसाले घातलेली मासांची चव आवडते. बहुतेक जण (भारतात तरी) तसेच खात वाढलेले असतात. परदेशामधे बर्‍यापैकी रेअर (दुर्मीळ नाहि तर भारतीय परिभाषेमधले "पूर्ण" न शिजवलेले) वरायटी मधे खातात (कारण तसे केल्याने मूळचा flavor राहतो). त्यामुळे कच्चेच का खातात नि शिजवलेले का खातात ह्याला अर्थ नाहि.

>>> मास्तुरे, कोंबडी काही नैसर्गिक रित्या आढळणारा पक्षी नाही. ते पुर्णपणे मानवाने निर्माण केलेले प्रॉडक्ट आहे. मला सांगा, असा भरमसाट अंडी घालणारा, (जवळ जवळ दिवसाला एक ) फारसा उडू न शकणारा "पक्षी" निसर्गात तग धरू शकेल का ?

दिनेशदा,

हा तुमचा मुद्दा फारसा पटला नाही. सर्वच पशूपक्षी हे निसर्गाने निर्माण केले आहेत. घोडा, कुत्रा, म्हैस, कोंबडा इ. मूळच्या रानटी अवस्थेत असलेले प्राणी (रानकुत्रा, रानकोंबडी इ.) माणसाने पाळून त्यांना पाळीव बनवले. कोंबडी माणसाच्या मदतीशिवाय सुध्दा निसर्गात नक्कीच तग धरू शकेल. ससा, गोगलगाय असे अत्यंत निरूपद्रवी प्राणी अजूनपर्यंत तग धरून आहेत, तर कोंबडी का टिकणार नाही?

महेश, (खरच माहिती हवीये असं समजून लिहितोय)
>> कोणत्याही प्राण्याच्या मांसाला चांगली चव असते का ?
हो. ('चांगली' ला objection, its subjective, वेगळी असं हवं होतं)
>> की त्याचे पदार्थ बनविताना त्यामधे अनेक गोष्टी (मसाले, इ.) घातले जातात त्यामुळे जी चव येते ती चांगली असते ?
मसाल्याने चव बदलते. (पुन्हा 'चांगली' ला objection)
भारतीय मांसाहाराबाबत उत्तर वेगळं असेल किंवा नसेल (माझा अनुभव नाही... ). फ्रान्समधे बघतोय ते सांगतो. इथे मसाले नगण्य वापरतात. मांस जास्त शिजवत नाहीत. शिवाय मांसाहारात बरीच विविधता असते. मटन, बीफ, पोर्क, कांगारू, ससा, चिकन, डक, टर्की, बर्‍याच प्रकारचे मासे व इतर समूद्री खाद्य ह्याचा आहारात सहभाग असतो.. गाय/डुकराच्या शरिरातील वेगवेगळ्या भागांचा देखिल वेगळेपणा आहे. शिवाय मांसाचे बरेच forms देखिल आहेत जसे मांस, रिब्स, सॉसेज. शिवाय हे सगळं शिजवण्याचे वेगवेगळे प्रकार वाफवून, भाजून वै. यामूळे चवीत बरीच विविधता येते. (एखाद्या खवय्याला ही यादी तोडकी वाटेल)

[हे वाचून 'इइइइ' असं मनात आलं तरी इथे लिहिलं नाही तर बरं होईल... आपलं मसालेदार, तेलाचे तवंग असलेलं अन्न बघून इथल्यांना देखील तसच वाटतं]

कच्चे मांस पचायला अवघड असते, हे विधान देखिल प्रादेशिक आहे. भारतातील गरम हवेमुळे अन्न लवकर दूशीत होउ शकते त्यामुळेही आपल्याकडे व्यवस्थित शिजवाच लागते.

मास्तूरे,
>> हा तुमचा मुद्दा फारसा पटला नाही.
पटायला अवघडच आहे. वरती प्राण्यांचीच उदाहरणे दिली असली तरी धान्य, फळं, भाज्या यांनाही ते लागू आहे. अधिक माहिती इथे वाचा.

The domestication of wheat provides an example. Wild wheat falls to the ground to reseed itself when ripe, but domesticated wheat stays on the stem for easier harvesting. There is evidence that this critical change came about as a result of a random mutation near the beginning of wheat's cultivation. Wheat with this mutation was harvested and became the seed for the next crop. Therefore, without realizing, early farmers selected for this mutation, which would otherwise have died out. The result is domesticated wheat, which relies on farmers for its own reproduction and dissemination.[2]

दुसरं उदाहरण कुत्र्याच,
French bulldogs frequently require caesarean section to give birth, with over 80% of litters delivered this way.[3] [4] As well, many French bulldog stud dogs are incapable of naturally breeding. This is because French Bulldogs have very slim hips, making the male unable to mount the female to reproduce naturally. Typically, breeders must undertake artificial insemination of female dogs.

आभार सॅम.
मांसाहाराच्या चवीबाबत, माझ्या आठवणी.
माश्याच्या बाबतीत, वास हा पण एक घटक आहे. काहि जणांना तो भूक चाळवणारा वाटेल तर काही जणांना नकोसा वाटेल. फारसा वास नसणारा पापलेट, म्हणूनच अनेक मस्यप्रेमींना तितकासा आवडत नाही.

मटणाच्या बाबतीत, टेक्स्चर पण महत्वाचे. संकरीत कोंबड्यांचे मांस, त्याच्या भाजीसारख्या टेक्स्चरमूळे अनेकांना आवडत नाही.

सॉरी पुराणाचा पार खिमा करून टाकलाय >> Lol

लिहू का नको? लिहू? का नकोच?

मज्जा आली, तरी दोन्ही बाजुने पुरेसे मुद्दे मांडले गेले नाही आहेत, अजुन चर्चा व्हायला हवी.

माझ्या मते आपण कोळसा, पेट्रोल, दगड वगैरे खायला हवं, म्हणजे कुठल्याच सजिवाची हत्या होणार नाही. व्हेगन काय, जैन काय,शाकाहार काय, मासांहार काय मला सगळचं न पटण्या सारखं आहे.
थोड्या दिवसाने बायोफ्युअल आलं की गाड्या, मशिनरीपण ह्या चर्चा करु लागतिल अर्थात त्यासाठी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स ची गरज आहे.
आर्टीफिशीयल इंटेलिजन्स आणि आपला इंटेलिजन्स यात नक्की काय फरक आहे? दोन्ही इंटेलिजन्स पुर्वानुभवा वरच (डेटा) अवलंबून आहेत तरी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स म्हणणे हे किती तर्कसंगत आहे?

अनेक प्रश्न, किती बीबी काढू? कीती लिहू? किती प्रश्न?

**मला विनोदी लिखाण आवडतं म्हणुन मी विनोदी असणं गरजेच आहे का?**

सत्यजित विनोदी नाही आणि मी पण नाही.. त्यामूळे मी सिरियसलीच लिहितोय.

पेट्रोल किंवा पेट्रोलियम पासून निघालेले बहुतेक पदार्थ माणसाच्या पचनशक्तीच्या पलिकडचे आहेत. (अनुभव हिच खात्री, गरजूंनी अनुभव घ्यावा... व इथे लिहावे.)

पण मूळात हे सर्व पदार्थ, कधीकाळी सजीव असणार्‍या प्राणी आणि वनस्पति यांच्यापासूनच तयार झालेत. शिवाय दगडाच्या आतही जिवाणू / शैवाल असू शकते.. मग पापपुण्याचा हिशेब कसा करायचा ?

मी अजून टाइमपासच करतोय.. नाहीतर लोक माझे नाव बघून काहितरी सिरियस लिहिलेय असे समजायचे.

कधीकाळी सजीव असणार्‍या प्राणी आणि वनस्पति यांच्यापासूनच तयार झालेत. शिवाय दगडाच्या आतही जिवाणू / शैवाल असू शकते >> करेक्ट...:) ये तो मैने सोचाही नही Happy गुंता वाढत चालला आहे खावं तर काय खावं?

प्रण्यांबद्द्ल प्रेम असणारे व्हेगन, बिचार्‍या झाडांबद्दल कुणालाच प्रेम नाही Sad क्रूर, अति क्रूर.. बिचार्‍या मुक्या झांडाना मुळासकट उपटून, जिवंतच चिरडुन तुकडे तुकडे करुन, कधी कच्चेच तर कधी शिजवुन खातात हे लोक. बिचारे प्राणी पळून जाउ शकतात, आरडा ओरड करू शकातात, पण बिचार्‍या मुक्या झाडांच काय? क्रूर अति क्रूर लोक आहेत हे... Sad प्राणि काय नी झाडं काय हत्या हे कॄर कर्मच...!!! म्हणुन मला जैन धर्म जे सांगत ते थोड्या प्रमाणात पटतं. ज्यांना खरच कुणाच्या हत्ये बद्दल खरच वाईट वाटत असेल तर त्यांनी जैन धर्माचा विचार नक्की करावा. सिरियसली सांगतो आहे.

उपरा शाकाहार हे थोतांड आहे.!!!

ह्या चर्चेमुळे एक तरी मांसाहारी मतपरिवर्तन होऊन शाकाहारी झाला असण्याची शक्यता या चर्चेत ध्वनित होत नाहीय ! उलट, कांही शाकाहारीना कुतूहलातून मांसाहाराचं आकर्षण निर्माण तर नाही ना होत आहे, अशी मात्र शंका यायला लागलीय ! Wink

भाउ माझ्या मनातलं बोललात Happy मांसाहार करुन शाकाहारी झालेली व्यक्ती ही खरी शाकाहारी असते.
माझ्या मते ज्याने कधी मांसाहार केलाच नाही तो कधीच शाकाहारी असु शकत नाही.

मांसाहार करुन शाकाहारी झालेली व्यक्ती ही खरी शाकाहारी असते. >>>>> १००% अनुमोदन. हे वाक्य म्हणजे ह्या लेखाचे अनुमान म्हणायला हरकत नाहि. एकदम मान्य.

काही म्हणा
पण पुरणा वरणाचा हा शाकाहारी धागा या आठवड्यातला हिट्ट धागा आहे.
आणि प्रतिक्रियांनी त्याची लज्जत आणखीनच वाढली आहे.

चुलीवरचा रस्सा रटरटतोय म्हटलं. लेखिका शांतीसुधा बहुधा क्षुधाशांतीकरता गेलेल्या दिसतात. Light 1

चुलीवरचा रस्सा रटरटतोय म्हटलं. लेखिका शांतीसुधा बहुधा क्षुधाशांतीकरता गेलेल्या दिसतात. >>>

Biggrin

@ मामी, आता माबोकरांनी ठरवलं की काहीही होतं. त्यामुळे जे चालू आहे ते वाचते आहे आणि शक्य तिथे आनंद लुटते आहे. बाकी तुमचं काय पुरण-वरण, रस्सा रटरटवणं चालू द्या. Happy

>>> मांसाहार करुन शाकाहारी झालेली व्यक्ती ही खरी शाकाहारी असते. माझ्या मते ज्याने कधी मांसाहार केलाच नाही तो कधीच शाकाहारी असु शकत नाही.

म्हणजे ज्याने भरपूर खून पचवून आता खुनाखुनी करणे थांबवले आहे, तोच खरा अहिंसक असतो व ज्याने कधीच खून केला नाही तो अहिंसक असूच शकत नाही ! Rofl

मास्तुरे Lol

शांतीसुधा - तुम्ही पिल्लू सोडलेलं आहेत, ते वयात येऊन. मोठं होऊन, वृद्ध होऊन अ‍ॅडमीनतर्फे मरेपर्यंत जगणार आहे, शक्य तिथे सगळेच आनंद लुटत आहेत. Lol (मीही एखाद दिवा देऊनच टाकतो)

-'बेफिकीर'! (ओरिजिनल)

@ बेफिकीर, दिवा म्हणजे धोक्याचा दिवा दिसतोय. म्हणजे एखाद्या लेखाला जर प्रतिक्रीयांत जास्त दिवे मिळाले तर तो लेख अ‍ॅडमीनतर्फे मारला जातो का? तुमच्या आनंदावरून तसेच वाटते आहे. खुशाल द्या दिवा......एकच का हवे तेवढे द्या. Happy
मी काही पिल्लू सोडलेलं नाहीये. मी व्यवस्थीत लेख लिहीला आहे. ज्याला जसं घ्यायचं तसा तो घेतोय. व्यक्ती तितक्या प्रकृती. शेवटी आपल्या धाग्याचं एका वाक्यात संकलन म्हणजे "ज्याला जे हवं ते, पचेल ते खा." हे तर माझ्या लेखाच्या शेवटी आहेच. Happy

मांसाहार करुन शाकाहारी झालेली व्यक्ती ही खरी शाकाहारी असते. माझ्या मते ज्याने कधी मांसाहार केलाच नाही तो कधीच शाकाहारी असु शकत नाही. >> Rofl

बरं झालं तुमच्या मताला काही किंमत नाही ते.

मास्तुरे Rofl

>>> शेवटी आपल्या धाग्याचं एका वाक्यात संकलन म्हणजे "ज्याला जे हवं ते, पचेल ते खा." हे तर माझ्या लेखाच्या शेवटी आहेच.

हे वाक्य असे हवे.

"दुसर्‍या सजीवाला न मारता, ज्याला जे हवं ते, पचेल ते खा."

@ मास्तुरे, हो मला एकदा वाटलं होतं तसं लिहावं पण धाग्याने पुन्हा वर्तुळाकार रिंगण चालू केलं असतं ना....म्हणजे भाज्या आणि वनस्पतींना नाही का मारत इ. इ. म्हणून आटोपतं घेण्यासाठी तसं वाक्य लिहीलं. Happy

"दुसर्‍या सजीवाला न मारता, ज्याला जे हवं ते, पचेल ते खा"
बरं झालं सांगितलंत.
तुमच्या माहितीसाठी वनस्पती सजीव असतात. आणि गहू तांदूळ डाळी या बिया असतात, म्हणजे तर चक्क भ्रूणहत्याच.

>>> @ मास्तुरे, हो मला एकदा वाटलं होतं तसं लिहावं पण धाग्याने पुन्हा वर्तुळाकार रिंगण चालू केलं असतं ना....म्हणजे भाज्या आणि वनस्पतींना नाही का मारत इ. इ. म्हणून आटोपतं घेण्यासाठी तसं वाक्य लिहीलं.

तुमचा अंदाज अगदी खरा ठरला. वर्तुळाकार रिंगण परत सुरू झालंय.

>>> शांतीसुधा - तुम्ही पिल्लू सोडलेलं आहेत, ते वयात येऊन. मोठं होऊन, वृद्ध होऊन अ‍ॅडमीनतर्फे मरेपर्यंत जगणार आहे,

आपल्या बेताल प्रतिसादांनी कोणताही धाग्याचा हमखास अकाली मृत्यु घडवून आणणार्‍या "नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना" हा धागा मारण्यासाठी पुरेसा स्कोप मिळालेला नाही. त्यामुळे हा धागा बरेच दिवस जिवंत राहिल आणि बरेच दिवस तरूण सुध्दा राहिल. "सचिनला भारतरत्न", "ब्राह्मण वि इतर जाती", इ. लोकप्रिय धागे हमखास बंद पडणारे काही यशस्वी कलाकार या धाग्यावर येऊन हजेरी लावून गेले. पण हा विषयच असा आहे की, त्यांचं इथं फारसं काहि चाललं नाही.

>> "दुसर्‍या सजीवाला न मारता, ज्याला जे हवं ते, पचेल ते खा."
जवाब नही!! एवढ संकूचित समालोचन अपेक्षित नव्हतं. (माझा दोशः अवास्तव अपेक्षा ठेवल्या)
हे वाचून हेन्री फोर्ड (founder of the Ford Motor Company) यांच एक वाक्य आठवलं,
Any customer can have a car painted any colour that he wants so long as it is black.

सॅम, मुळात शाकाहार उच्च आणि मांसाहार हा नीच प्रतीचा असतो अशी धारणा असलेल्यांना सांगूनही काही उपयोग नाही. हि एक प्रकारची मानसिक विकृतीच आहे.

आपल्या बेताल प्रतिसादांनी कोणताही धाग्याचा हमखास अकाली मृत्यु घडवून आणणार्‍या "नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना" हा धागा मारण्यासाठी पुरेसा स्कोप मिळालेला नाही.>>>>

मास्तुरे, हे आपण मला उद्देशून म्हणाला आहात काय?

Pages