माझे शाकाहार पुराण!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 15:43

मांसाहाराशी ओळख

मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.

माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.


मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.

आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.

पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.

मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.

शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:

आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.

जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.

पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?

याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.

माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.

(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)

गुलमोहर: 

आणि चातक, निसर्गा हा नैसर्गिकरित्या बरोबर निसर्गाचा समतोल राखतो. आपण मनुष्य जनावरांना मारुन उलट त्याच्या कार्यात अडथडा आणतो आहे.
>> बि, आपल्याला 'मानव हा निसर्गाचा घटक नाही' असे म्हणायचे आहे का..?

त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत.">>> शांतीसुधा, आपल्या लेखाचा मुद्दा पटला...पण हाच मुद्दा उलटुन एखाद्या मांसाहारी व्यकिचाही असु शकतो, आहे....जसे काही प्रतिसाद आहेतच. यात इतके मनावर घेण्यासारखे काही नाही.

मला वाटते झाड पालेभाज्या-वनस्पति वैगरे. आणि चालते-बोलते जनावरं इत्यादी., या सरसकट 'सजिव' निसर्गसंपदा आहे.

यांचा पुरेपुर आणि योग्य समोतल राखुन उपयोग करुन घ्यावा.
आपणास पटत आहे का हे?

पुढचा प्रतिसाद उद्या सकाळी देईन...आता निघतो...!

धन्यवाद!

माझं मत -
१ ] जे जन्मतःच शाकाहारी किंवा मांसाहारी आहेत , ते आपापल्या जिभेवरच्या मूळ संस्कारांचे गुलाम असतात; त्या दोघात उच्च-नीच असा भेदभाव असत नाही;
२ ] जे जन्मतः मांसाहारी असूनही तात्विक भुमिकेतून शाकाहारी होतात, ते वंदनीय;
३ ] जे मांसाहारी असूनही ठराविक दिवस/ महिने मनापासून शाकाहार पाळतात ,ते समजूतदार;
४ ] वर ३]मधील जे रविवारी चापून मटण खाऊन मग सोमवारी गळा काढून "आज माझा सोमवार आहे; मासे-मतणाचं माझ्यासमोर नांव नका काढूं" म्हणून मिरवतात, ते भोंदू;
व ५ ] जे मांसाहारी शाकाहार्‍याना मांसाहाराची लज्जत काय कळणार म्हणतात व जे शाकाहारी मांसाहार्‍यांकडे बघून नाक मुरडतात, त्या दोघानाही जीभेवरचे संस्कार किती गहिरे असतात तें कळलेलंच नसतं.

>> बि, आपल्याला 'मानव हा निसर्गाचा घटक नाही' असे म्हणायचे आहे का..?
>>
चातक, मनुष्य हा निसर्गाचा नक्कीच घटक आहे पण त्याला जी बुद्धी लाभली आहे त्यामुळे तो अनसैर्गिक कृत्य करतो आहे. कितीतरी गोष्टी आपण अनगैसर्गिक करतो ह्याचा तू विचार कर.

कितीतरी गोष्टी आपण अनगैसर्गिक करतो ह्याचा तू विचार कर.>> बि, हे वरवर सत्य आहे.... ही अनैसर्गिकताही निसर्गाचीच आहे. याला कुणीही रोखु शकत नाही...मानवि मन हे निसर्गानेच् निर्माण केले.... हा मुद्दा वेगळाच..!
बरं आता बोलु उद्या.... तरी आपले स्वच्छ मत जाणुन बरे वाटले Happy

मी फक्त लेख किती एकांगी आहे आणी फालतु आहे ह्यावरच मत व्यक्त केले आहे आतापर्यत. मला तरी यात काहि नवीन मुद्दे किंवा शास्त्रीय माहिती वगैरे दिसली नाहि. ज्या लोकांना हा लेख आवडला त्यांना काय दिसले हे कळले नाहि. असे हजारो लेख आंतर जालावर या विषयावर पडिक आहेत.

असो. शाकाहार किंवा मांसाहार याबद्दल ओशोंचे छान विचार आहेत -
Eating anything will not make much difference. You can be a vegetarian and cruel to the extreme, and violent; you can be a non-vegetarian and kind and loving. Food will not make much difference.

What you eat makes no difference; what you are is a totally different phenomenon. And when that changes, everything will change. Change yourself and food will change, clothes will change. But change should come from the innermost core, it should not come from the periphery.

भाऊ, मग माझी कॅटेगरी कुठली ? माझ्या लहानपणी चिकन तयार वगैरे मिळायचे नाही. लोक घरीच कापायचे. तसे कापताना मी लहानपणी बघितले. तेव्हापासून घृणा वाटली. पुढे वाढत्या वयाबरोबर घृणा गेली. त्यामूळे शिजवायला वगैरे काही वाटत नाही. पण खायची इच्छा होत नाही. शिवाय मला बहुतेक चवी माहीत असल्यामूळे, मला फसवून कोणी काही खाऊ घालू शकत नाही.

मी चिकन कधी कापली त्याची पण कथाच आहे. केवळ मानलेल्या वहीनीने डिवचल्यावर (भाभी केलिये इतनाभी नही कर सकते क्या ) मी कापली.(जिवंत नाही.)
भारतात धनधान्य विपुल पिकवता आले, म्हणून आपल्याला शाकाहार वगैरे पद्धती स्वीकारता आल्या. सौदी, ध्रुवीय प्रदेश इथल्या लोकांनी काय करायचे ?
पण आपण म्हणजे भारतीय शाकाहारी कधी झालो, तो काळ अगदी अलिकडचा आहे. त्यामूळे तसा सोवळेपणा दाखवण्यातही अर्थ नाही.

१)भारतातले८५% आणि जगातले जवळजवळ ९६% लोक मिश्राहारी आहेत.२)भारतासकट सर्व जगातले शीर्षस्थ साहित्यिक,शास्त्रज्ञ,क्रीडापटू,राजकारणधुरंधर,तत्त्ववेत्ते,धर्मसंस्थापक,कलावंत(नृत्य,गायन,अभिनय,चित्रकला,शिल्पकला,स्थापत्य इ.)हे मिश्राहारी आहेत.३)भारतातल्या आणि भारतीय वंशातल्या नोबेल लॉरिएट्सपैकी बहुसंख्य मिश्राहारी आहेत.(रवींद्रनाथ ठाकुर,अमर्त्य सेन,हरगोबिंदर खुराणा)४)बहुसंख्य नामवंत भारतीय शास्त्रज्ञ मिश्राहारी आहेत.(होमी भाभा,जगदीशचंद्र बसु,मेघनाद साहा,शान्तिस्वरूप भटनागर इ.) ५)गौतम बुद्ध,रामकृष्ण परमहंस,विवेकानंद आणि त्यांचे अनेक शिष्य मिश्राहारी होते.६) राम,कृष्ण हे मिश्राहारी असावेत.७)आपल्या प्राचीन साहित्यात मांस कसे शिजवावे किंवा अभ्यागताला कोणत्या प्रकारच्या मांसाने संतुष्ट करावे याबाबत अनेक उल्लेख आहेत.शतपथ ब्राह्मणातला याबाबतचा संदर्भ आचार्य अत्रे अनेक वेळा उद्धृत करत असत.(मा.बो. संदर्भः अन्नं वै प्राणा:) ८)आपले ऋषीमुनी मृगाजिन,व्याघ्राजिन पांघरत असत.९)शिवलीलामृतामध्ये शिवाचे वर्णन 'गळा नररुंडांची माळ,गजचर्म पांघुरले' असे आहे.
आता एक अनुभव : आमच्या ओळखीचे एक मिश्राहारी कुटुंब जिथे राहाते त्याच सोसायटीत कट्टर अहिंसावादी मानल्या गेलेल्या धर्माचे एक कुटुंब राहाते. हे लोक आमच्या ओळखीच्या कुटुंबाकडे पाणी पीत नसत.एकदा त्या सोसायटीमध्ये एक कुत्रा मरून पडला आणि दिवसभर तसाच राहिला.दुसर्‍या दिवशी त्याला दुर्गंधी सुटली.त्या कट्टर कुटुंबातल्या मुख्य बाई त्वरेने आमच्या ओळखीच्या कुटुंबाकडे आल्या, घरातल्या प्रौढ बाईंना बोलवून घेऊन कुत्र्याच्या दुर्गंधीविषयी तक्रार करू लागल्या.इतकेच नव्हे तर थोड्याश्या उद्धट आणि आज्ञार्थी भाषेत तो कुत्रा ह्यांनी हटवावा असे सांगू लागल्या. 'आप लोग तो वैसेभी खातेही हो तो कुत्ता हटानेमे क्या हुआ?'! आणखी पुढे: याच घरात एक मनोरुग्ण मुलगी(आठदहा वर्षांची) बाहेरच्या बाल्कनीत पडलेली असे.चेहेर्‍यावर अत्यंत निरागस आणि करुण भाव. तिला पाहून प्रत्येकाचे हृदय गलबले. आमच्या ओळखीच्या बाईंची काही नामांकित मानसोपचारतज्ञांशी ओळख होती.त्या या बाईंना म्हणाल्या की मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का, मी नेते हवे तर,ते डॉक्टर फारसे पैसेही घेत नाहीत,वगैरे. तर या कट्टर अहिंसावादी (आणि सुसंपन्न) बाईंनी काय सांगावे? "जाने दो. .वैसेभी लडकीही है. दवा खायेगी तो और जियेगी.इतना खर्चा क्यूं करनेका?"!! हळूहळू तिचे अन्नही कमी करण्यात आले.(तसेही ते लोक तिला भरवत वगैरे नसत.तिने खाल्ले तर खाल्ले,नाही तर नाही.) आणि मग..मग एके दिवशी..अरेरे...लिहवत नाही..

>>> माणूस हा सर्वाहारी आहे हे अ‍ॅनॅटॉमिकल आणि इव्होल्युशनरी सत्य आणि सर्व माणसे शाकाहारी झाली तर त्यांना पृथ्वी पोसू शकत नाही पर्यावरणीय सत्य शाकाहारी तरी का दृष्टीआड करतात हे माहिती नाही.

हे खरे नाही. कोंबड्या, बकर्‍या, गायी, डुकरे इ. ची फक्त कापण्याच्याच हेतूने पैदास केली जाते. त्यांना धष्टपुष्ट करण्यासाठी व भरपूर मांस येण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य खायला दिले जाते. एक कोंबडी कापली जाईपर्यंत कित्येक किलो धान्य फस्त करते असे वाचले होते. ह्या प्राण्यांची पैदास न करता ते धान्य मानवासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे सर्व माणसे शाकाहारी झाली तरी पृथ्वी त्यांना पोसू शकते.

प्राण्यांची पैदास करताना सुध्दा अतिशय क्रूरपणा केला जातो. कोंबड्यांवर संशोधन करून त्यांचा ब्रीडिंग काळ कमी करण्यात आला आहे. त्यांना अधिक मांस यावे यासाठी दिलेल्या हार्मोन्समुळे त्यांची हाडे अत्यंत ठिसूळ झाल्याचे लक्षात आलेले आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये गायी सारख्या संपूर्ण शाकाहारी प्राण्याला धष्टपुष्ट करण्यासाठी इतर प्राण्यांच्या मांसाचे एक्स्ट्रॅक्ट आहारातून दिल्यामुळे मॅड काऊ या नवीन रोगाचा जन्म झाला.

कासवांना उकळत्या पाण्यात टाकून मारण्यात येते. बदक व हंसासारख्या पक्ष्यांच्या पुढे गवत धरून ते खाण्यासाठी त्यांनी मान पुढे केल्यावर त्यांचे मुंडके उडविण्यात येते. नदीकाठावर खेकडे पकडल्यावर ते इकडेतिकडे जाऊ नयेत म्हणून पकडल्याक्षणी उसाची कांडी मोडल्यासारखे त्यांचे पाय मोडून टाकतात. मानवाने आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी क्रूरतेची हीन पातळी गाठलेली आहे. प्राण्यांना खायचेच असेल तर निदान कमीतकमी हाल व वेदना होतील अशा पध्दतीने ते मारावेत (शॉक वगैरे देऊन).

आपल्या क्रूरतेला व जिभेच्या चोचल्यांना धर्ममान्यता देण्यासाठी भारतात व इतर अनेक देशात नवस बोलून देवासमोर कोंबड्या, बकर्‍या कापल्या जातात. देवाच्या नावाने प्राणी कापल्याने आपल्याला पाप लागणार हा त्यांचा गैरसमज असावा. मुसलमान अल्लाचे नाव घेऊन हलाल पध्दतीने प्राणी कापतात. मारताना अल्लाचे नाव घेतल्याने प्राणी मारल्याचे पाप आपल्याला लागणार नाही अशी त्यांची समजूत असावी.

डॉ. कल्याण गंगवाल हे शाकाहाराचे कट्टर पुरस्कर्ते असून या विषयावर गेली अनेक वर्षे ते प्रबोधन करत आहेत.

शाकाहार काय आणि मांसाहार काय दोन्ही अन्नच.
मानव जेंव्हा जन्माला आला तेंव्हा शिजवलेले सोडाच कच्चे कच्चे मांसही खात होता. तेंव्हा स्वतःची उपजीवीका हेच ध्येय होते मानवाचे. त्यामुळे जे दिसेल ते खाऊन मानव आपली उपजीवीका चालवत होता. तेंव्हा शाकाहारी आणि मांसाहारी हा भेद करण्यासाठी ऑप्शनच नव्हते.

हिचहाईकर्स गाईड टु द गॅलॅक्सी मधील 'मला खा' असे म्हणणारी गाय चालेल का?

कॉन्शसनेस म्हणजे काय हे कळायला अजुन वेळ आहे. तो कुणाला आहे आणि कुणाला नाही हे तेंव्हाच कळु शकेल.

पुरेशी वाट पाहिली तर त्या पाल्यापाचोळ्याचे प्राणी बनतील.

झाडांना पळता येत नसुन त्यांना खाणे हे प्राण्यांना खाणे या पेक्षा मोठे पाप आहे (जर पाप पुण्य प्रकार मानत असाल तर)

Koch च्या चमुचा कॉन्शसनेस वर बराच रिसर्च सुरु आहे. त्यांचे एक जुने आर्टिकल इथे पहा:
http://www.klab.caltech.edu/~koch/crick-koch-cc-97.html
clearing the ground हा फक्त पहिला भाग वाचला तरी चालेल.
त्यांनी उल्लेख केलेले नाजेलचे आर्टिकल सापडले तर ते ही टाकेन येथे.

रच्याकने मी अंड्याचे बलक न खाणारा पेस्केटेरिअन आहे. http://en.wikipedia.org/wiki/Pescetarianism

<< भाऊ, मग माझी कॅटेगरी कुठली ? >> "वंदनीय" कॅटेगरीचंच इथलं दुसरं नांव "दिनेशदा" कॅटेगरी आहे !!
<< त्यामूळे तसा सोवळेपणा दाखवण्यातही अर्थ नाही. >> दिनेशदा, इथंच तर ग्यानबाची मेख असावी ! शाकाहाराचं महात्म्य सांगणार्‍याच्या भुमिकेत इतर सजीवांबद्दलची कणव किती व सोवळेपणाची आत्मप्रौढी किती हे गणित मांडणं कठीणच.
<< You can be a vegetarian and cruel to the extreme, and violent; you can be a non-vegetarian and kind and loving. Food will not make much difference. >> यात सारं कांही आलं !!

खायचे ते खा राव!

<<<मला तरी यात काहि नवीन मुद्दे किंवा शास्त्रीय माहिती वगैरे दिसली नाहि. ज्या लोकांना हा लेख आवडला त्यांना काय दिसले हे कळले नाहि.>>>

चाणक्य यांच्या या पोस्टशी सहमत!

-'बेफिकीर'!

आहाहाहा.. मुद्दे नाहीत म्हणून उद्यावर. वा!!!!
>>> बि, काल ऑफिस मध्ये होतो....कार्यालयीन वेळ संपल्यावर कार्यालयातुन बाहेर पडुन आपल्या स्वतःच्या घरी जाण्याची पध्दत आहे इथे.

तुम्हाला वाद घालायला आवडते असे दिसते Happy
मलाही आवडेल.

बरं...वनस्पती-झाडे, निर्जिव असतात त्यांना भावना नसतात हे मान्य आहे आपल्याला आणि आपण हे
(शिकुन सवरुन) जाणुन आहात.

तर याचे एक तरी उदाहरण द्याल का?

ह्या प्राण्यांची पैदास न करता ते धान्य मानवासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे सर्व माणसे शाकाहारी झाली तरी पृथ्वी त्यांना पोसू शकते.>> काहीपण्....आहे यार...., मास्तुरे अहो तुमच्याकडुन अश्या विधानाची अपेक्षा नव्हती.

ते धान्य म्हणजे गव्हाचा भुसा-कोंडा, उसाची चिलपाटं, आंबोण, सडुन गळत आलेल्या धान्यावर रासायनिक प्रतिक्रीया करुन टिकवलेले खाद्य. शेगदाण्यांची टरफलं, चुनखडी, हाडांचा चुरा,....ई.ई. हे सर्व मानवाच्या गरजा भागवल्या नंतर केरात टाकण्यात येणार्‍या जिन्नसांवर'ही आपण उदरनिर्वाह करणार होतात का..?
जर हो असेल तर _____________^_______________!

ते धान्य म्हणजे गव्हाचा भुसा-कोंडा, उसाची चिलपाटं, आंबोण ! Proud

अहो पण ते शाकाहारी आहे. कदाचित चालेल मास्तरांना! Wink

प्राण्यांची पैदास करताना सुध्दा अतिशय क्रूरपणा केला जातो. कोंबड्यांवर संशोधन करून त्यांचा ब्रीडिंग काळ कमी करण्यात आला आहे. त्यांना अधिक मांस यावे यासाठी दिलेल्या हार्मोन्समुळे त्यांची हाडे अत्यंत ठिसूळ झाल्याचे लक्षात आलेले आहे. >>>> अहो तो एक 'प्रोडक्ट' आहे....प्रोजेक्ट आहे...फक्त कोंबडी नाही, तिची पैदास नैसर्गिक नाही...लवकरात लवकर जस्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल यावर संशोधन चालणारच.

शांतीसुधा या रजेवर आहेत बहुतेक आज.

ओशोसारख्या माणसाने असे लिहावे की आहारावर माणसाचा स्वभाव/प्रवृत्ती अवलंबून नाही ??
आहारावरच खुप काही आधारीत आहे. निसर्गात सहज दिसून येते की जे प्राणी मांसाहारी आहेत ते हिंस्त्र आणि क्रूर असतात (उदा. वाघ, सिंह) व जे शाकाहारी आहेत ते शांत स्वभावाचे असतात. (उदा. गाय, हत्ती)
मनुष्य स्वभावाचे असेच आहे. भारत सोडून बाकीचे देश एवढे आक्रमक विचारांचे का आहेत ? पहा विचार करून

आहारावरच खुप काही आधारीत आहे >>>> जर आहारवर आधारीत असते तर सर्वच शाकाहारी माणसे गांधी (महात्मा गांधी) झाली असती.
आहारावर नव्हे तर माणसावर अवलंबुन आहे. भारतात काय हिंसा घडत नाहि का ?

जे प्राणी मांसाहारी आहेत ते हिंस्त्र आणि क्रूर असतात (उदा. वाघ, सिंह) व जे शाकाहारी आहेत ते शांत स्वभावाचे असतात >>>> तुम्हि स्वता:ला विचारुन पहा - वाघ मांसाहारि का आहे ?

प्राणी आणी माणुस यात comparison होउ शकत नाहि. प्राण्यांना बुद्धी नसते.

मांसाहार करायलाच हवा अशी गरज तर मला वाटत नाही,त्यावाचुन काही अडतय अस काही वाटत नाही.
काही लोक ताकदीसाठी याच समर्थन करताना पाहिल,पण जुन्या काळातले,मला माहिती असलेले अनेक नामवंत (कोल्हापुरी) ताकतवान पैलवान हे शाकाहारीच होते

>>> मला माहिती असलेले अनेक नामवंत (कोल्हापुरी) ताकतवान पैलवान हे शाकाहारीच होते

हिंदकेसरी सतपाल हा शाकाहारी होता असे ऐकले होते.

आहारावरच खुप काही आधारीत आहे. >>> असहमत आहे...(रजनिश यांच्या दृष्टीने पहील्यास) या साठी की तुम्ही काहीही 'खा' तुम्ही स्व:भावता हिंसक असाल तर हिंसा होणारच.

पाला पाचोळा खाल तर गलिच्छ शिव्या कोण एकुन घेईल. आणि घाबरुन घेतल्या तरी मनात हिंसक भाव निर्माण होणारच.(म्हणुन ओशो तसे म्हणतात.)

वन्य प्राणि स्व:भावता हिंसक आहेत.(पण तरीही दयावान असतात)

*****************************************

आहारावरच खुप काही आधारीत आहे.>>> रासायनिक दृष्ट्या सहमत आहे.

वन्य प्राणि स्व:भावता हिंसक आहेत >> तेदेखील अन्नासाठी आहे. (अन्न मिळवण्यासाठी) म्हणुनच मी म्हणले की प्राण्यांचा आणी माणसांची अशी तुलना करणे शक्य नाहि

Pages