लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

अत्यंत फालतु , अन निषेधार्ह वाटले हे विधान !>>> पंत आपण लोकांना कामासाठी एकत्र करतो आहोत. थोडी सौम्य भाषा वापरायला हवी असे वाटते. त्याने उत्साहाच्या भरात लिहीले आहे. संकल्पना. अडचणी, बोलण्याची पध्दती माहिती नसावी. समजाऊन सांगा.

रक्त एच आयव्ही दूषीत आहे किंवा नाही याची चाचणी प्रत्येक रक्तपेढीने केलेली असते.... पण ही चाचणी ( एलायझा) एच आय व्हीची लागण झाल्यावर ३ ते सहा महिन्यात पॉझिटीव येते.... जर रक्तदान ह्या विंडो पिरियड मध्ये केलेले असले तर रक्त दूषीत असून सुद्धा चाचणी निगेटीव्ह येते.. व हे रक्त स्वीकारलेला काहीही चूक नसताना एच आय व्ही पॉझिटीव्ह बनतो. >>>

डॉ., या परिस्थितीत काय करायला हवे? एक बावळट, मूर्ख, अडाणी प्रश्न विचारते---- ते रक्तपेढीतील रक्त ६ महिने प्रिझर्व केले तर नंतर त्याची चाचणी करता येते का? म्हणजे तो पिरियड घालवला तर ती टेस्ट जास्त बरोबर येईल.

वेल... रक्तदाता रक्तदान करणेस योग्य की अयोग्य हे रक्तपेढीचे तंत्र ज्ञ व डॉक्टर ठरवतातच... आणि अश्या सुयोग्य रक्तदात्यास रक्तदानाने काहीही तोटा होत नाही.....>>
खरंय, पण नुसत डॉक्टरांवर विश्वास ठेउन/विसंबुन न राहता आपल्यालाही कळायला हव ना कि प्रोसेस बरोबर चालली आहे.

डॉ., या परिस्थितीत काय करायला हवे? एक बावळट, मूर्ख, अडाणी प्रश्न विचारते---- ते रक्तपेढीतील रक्त ६ महिने प्रिझर्व केले तर नंतर त्याची चाचणी करता येते का? म्हणजे तो पिरियड घालवला तर ती टेस्ट जास्त बरोबर येईल.

अश्विनी..... ३ ते सहा महिन्यांनी पॉझिटीव्ह माणसाच्या शरीरात एच आय व्ही अँटीबॉडीज तयार होतात ज्या एलायझा टेस्टने डीटेक्ट होतात.... आत्ता घेतलेले रक्त सहा महिन्यांनी सुद्धा निगेटीव्हच येईल.

गौतमा.... ५० किलो वजनाचा निरोगी,व अ‍ॅनिमिक नसलेला कुणीही रक्तदान करू शकतो.... वय ५० च्या आत हवे.

फंगस किंवा बॅक्टेरिया जसे ब्लड अगार मधे आपण वाढवू शकतो अभ्यास करण्यासाठी तसा व्हायरसही मल्टीप्लाय होत असेल का? अँटीबॉडीज नाही तयार होणार पण ६ महिन्यांदरम्यान व्हायरसची क्वांटिटी जास्त झाल्यास डिटेक्ट करता येईल का?

व्हायरस म्हणजे अँटीजन फक्त पी.सी.आर.टेस्टने डेमॉन्स्ट्रेट करता येतो.>>> व्हायरस चा जिनोम पी.सी.आर टेस्ट ने डिटेक्ट करता येतो.. अँटीजेन म्हणजे व्हायरल प्रोटिन्स (e.g.p24), हे एलायझा ने टेस्ट करता येतात.. पण या दोन्ही टेस्ट खूप महाग असतात म्हणुन वापरत नाहीत..

नुस्ता कायदा करून फरक पडत नसतो. त्या साठी मूळ concept लोकांच्या मनात उअतरायला पाहिजे. त्या साठी द्यायला पाहिजे लोकांना 'शिक्षण' ! रोग्यांना मेडिकल सेवा देणार्या, पिडितांना न्याय मिळवून देणार्या अनेक संस्था आज सगळीकडे काम करतांना दिसतात, प्ण मुळात हा रोग होऊच नये म्हणून लोकांना, तरुणांना मनावर संयम ठेवण्यासाठी, विशिष्ट मर्यादेतच सर्व सुखांचा उपभोग घेण्यासाठी, नैतिक शिक्षण दिले गेले पाहिजे. हे काम अगदी बीन खर्चाचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना, इअतरांनी आपल्या कार्यालयातल्या सर्वांना, सोसायटी तल्या सर्वांना अशा नैतिक, अध्यात्मिक विचारांची ओळख करून दिली पाहिजे. आपण सर्वांनी हे व्रत स्विकारू या आणी कांमाला लागू या !

आणि हे प्रमाणपत्र घेणं म्हणजे, थोडक्यात दोघानीही विवाहपुर्व शारिरिक संबंध ठेवल्याचा लिखित पुरावाच नव्हे का?

आणि ज्यानी खरचं असल्या काही भानगडी केल्या नाहित, त्याला हे प्रमाणत्र सादर करावा लागणे म्हणजे त्याचा अपमान नव्हे का?

आणि हे प्रमाणपत्र घेणं म्हणजे, थोडक्यात दोघानीही विवाहपुर्व शारिरिक संबंध ठेवल्याचा लिखित पुरावाच नव्हे का? >>> हा प्रश्न तुम्हाला समजला आहे का? ते शरीर संबंधाचे प्रमाणपत्र कसे ठरू शकते?

आणि ज्यानी खरचं असल्या काही भानगडी केल्या नाहित, त्याला हे प्रमाणत्र सादर करावा लागणे म्हणजे त्याचा अपमान नव्हे का? >>> निष्कलंक चारित्र्याच्या माणसाने असे प्रमानपत्र अभिमानाने सादर करायला हवे त्यात अपमान कसला?

तुमच्या कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे ओळखपत्र विचारले तर तुम्हाला अपमान वाटतो का? ट्रेनमध्ये/बसमध्ये तिकिट विचारल्यावर तुम्हाला अपमान वाटतो का?

जेव्हा तुम्ही कार्यालयाने दिलेले ओळखपत्र स्वीकारता आणि जेव्हा जेव्हा त्याची मागणी केली जाईल तेव्हा ते दाखवता म्हणजे 'तुम्ही यापूर्वी सगळीकडे घुसखोरी करत होतात असे अप्रत्यक्षरित्या सुचवत आहात' असे तुम्हाला वाटते का?

निष्कलंक चारित्र्याच्या माणसाने असे प्रमानपत्र अभिमानाने सादर करायला हवे त्यात अपमान कसला?

याची कॉरोलरी 'ज्याच्याकडे असे प्रमाणपत्र आहे तो/ती निष्कलंक चारित्र्याचा आहे' अशी होते.

सादर करून निष्कलंक आहे असे दाखवावे असे म्हणालो नाही. निष्कलंकाना सादर करण्यात अपमान वाटू नये एवढेच बोललो. ज्याना एचआयव्ही आहे ते कलंकीत आहेत असे तर मला अजिबातच वाटत नाही.

अशा प्रमाणपत्रानी फक्त एचआयव्ही आहे की नाही एवढेच सिध्द होईल्/व्हावे. चारित्र्याच्या दाखल्याविषयी काम करण्याचा सध्या विचार नाही.

लेखात दिलेल्या संकल्पनेशी संबंधीत उपयुक्त माहिती देणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या माहिती, संपर्क, अनुभवाचा आम्हाला प्रत्यक्ष कृतीत उपयोग होणार आहे.

थोडक्यात दोघानीही विवाहपुर्व शारिरिक संबंध ठेवल्याचा लिखित पुरावाच नव्हे का>>> फक्त शारीरीक संबंधान्वयेच एडस होतो असा आपला (गैर)समज आहे कि काय राजे?

तुमच्या कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे ओळखपत्र विचारले तर तुम्हाला अपमान वाटतो का? ट्रेनमध्ये/बसमध्ये तिकिट विचारल्यावर तुम्हाला अपमान वाटतो का?
--- गजानन यांनी अगदी योग्य शब्दात वरिल मुद्दा निकालात काढला आहे.

राजे- HIV आहे म्हणजे त्या व्यक्तिला चारित्र्यच नाही असे काही नसते किंवा HIV नाही म्हणजे व्यक्ती चारित्र्यवान असेही नसते. लग्ना अगोदर दोघांनिही एक दुसर्‍यांच्या आरोग्याबाबतची माहिती करुन घेणे येथे महत्वाचे आहे.

लेखात दिलेल्या संकल्पनेशी संबंधीत उपयुक्त माहिती देणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या माहिती, संपर्क, अनुभवाचा आम्हाला प्रत्यक्ष कृतीत उपयोग होणार आहे.>>> १००% अनुमोदन, चांगल्या कामाला आपण उपयोगी कसे पडू ह्याचा सर्व लोकांनी विचार करावा आणि तशा गोष्टी सांगाव्यात.

काम सुरूही झाले आहे...काँट्रीब्युट न करता उगाच नस्त्या शंका उपस्थित करण्यात काय अर्थ आहे?

एका कवितेचा मतितार्थ सांगतो,

"अस्तमानात विलीन होत असताना सुर्यनारायणाने एक प्रश्न केला, "आता माझे काम कोण करील?", स्तब्ध झाला सारा आसमंत.....सगळे एक्दम चिडीचूप!! कोणीच बोलत नाही हे पाहून एक पणती पुढे झाली आणि उद्गारली...........मी करीन परंतु माझ्या कुवतीनुसार!!!"

आम्हाला असे स्वतःहून पुढे येणार्‍या लोकांची नितांत गरज आहे....

धन्यवाद!!

कुठे ग्रुप व्हिजीट्स द्यायच्या असतील माहिती देण्यासाठी तर येऊ शकेन (अर्थात, बाकीचे अत्यंत प्रायॉरिटीचे व्याप सांभाळून Happy )

थोडी माहिती.

एच.आय.व्ही आणि एडस्

कारणे व प्रसार

हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे हा आजार रक्तसांसर्गिकही आहे. या रोगाचे आपल्या देशातील प्रमाण वाढत आहे. पुरेशा सार्वजनिक आरोग्यसेवा नसल्याने तसेच डॉक्टरांच्या व जनतेच्या योग्य आरोग्यशिक्षणाअभावी त्याचा प्रसार आटोक्यात आणणे आपल्या देशात कठीण जात आहे. सर्वांनाच या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे.

या आजारात शरीरातील संरक्षक पेशींची यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जुलाब, ताप, न्यूमोनिया, इत्यादी आजारांनी खंगत रुग्ण दगावतो.

एचायव्ही विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीकडून, भिन्नलिंगी वा समलिंगी संबंधातून, तसेच रक्तामार्फत हा आजार पसरतो.

चुंबन, स्पर्शातून, एकत्र खाण्यातून, डासांमार्फत, अन्न-पाणी, कपडयांतून, बाळाला अंगावर पाजण्यातून हा आजार पसरत नाही.

पुरुषाच्या बाहेरख्यालीपणामुळे कुटुंबातील स्त्रीला हा आजार होण्याचा धोका वाढत आहे. यामुळे असंख्य कुटुंबामध्ये हा आजार येऊन पोचलेला आहे. लग्नाआधीचे लैंगिक संबंध सहसा गुप्त ठेवले जातात; मात्र एड्स प्रकट व्हायला वेळ लागत असल्याने लग्नाच्या वेळी सगळेच अंधारात राहतात. इथून पुढे कुंडली पाहाण्याऐवजी भावी जोडीदाराची एड्सबद्दल खात्री करणे गरजेचे होणार आहे. विवाहाबरोबर एड्सचा धोका पत्कारायचा का हा प्रश्न असेल.

प्रतिबंधक काळजी

संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.

सर्वप्रथम अनिर्बंध लैंगिक संबंध टाळणे महत्त्वाचे आहे. एकाच व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असते. लैंगिक संबंधातली व्यक्ती एड्सग्रस्त असण्याची शक्यता असेल तर अशा संबंधात निरोध वापरावा.

अनावश्यक इंजेक्शने टाळणे महत्त्वाचे. बहुतांश इंजेक्शने अनावश्यक असतात! इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा-या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात. एकदा वापरानंतर त्या मोडून टाकून द्यायला पाहिजेत.

रक्तातून हा आजार पसरत असल्याने रक्तपेढयांबद्दल कडक कायदे आहेत. आता एड्ससंबंधी चाचणी केल्याशिवाय रक्त देता येत नाही.

रक्त घेण्याची वेळ आल्यास 'निरोगी' माणसाचे रक्त घ्यावे. शक्यतो आपापल्या नात्यातल्या व्यक्ती किंवा मित्रांचे रक्त व तेही दात्याच्या रक्ताची एड्सबाबत तपासणी करूनच घ्यावे लागते. व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्त हल्ली घेतले जात नाही हे चांगलेच आहे.

इंजेक्शनद्वारे मादक पदार्थ घ्यायचे व्यसन असणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. आपल्या देशात आसाम, मणिपूर, इ. भागात या प्रकारची मोठी समस्या आहे. व्यसन सुटत नसेल तर त्यांना निर्जंतुक सुया उपलब्ध करण्याची गरज आहे.

रोगनिदान

एड्सच्या विषाणूंची लागण झाल्यावर अनेक दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. इतर लिंगसांसर्गिक आजारांप्रमाणे त्याची लक्षणे लैंगिक अवयवाभोवती नसतात, हे लक्षात ठेवा.

मुख्य लक्षणे

- वजनात सतत व मोठया प्रमाणावर (10% हून जास्त) घट होणे.
- सारखे जुलाब होणे (एक महिन्याहून जास्त काळ).
- सतत ताप येत राहणे (एक महिन्याहून जास्त काळ).
इतर लक्षणे

सतत खोकला, कातडीवर खाज, वारंवार आजार, नागीण, हर्पिस,(पुरळ) तोंडातील बुरशी वाढणे, अंगावरील गाठी सुजणे व हातापायाच्या नसांना सूज येणे, इत्यादींपैकी काही खाणाखुणा आढळू शकतात. यासंबंधी इतर कुठल्याही आजाराची शक्यता नसल्यास एड्सची शक्यता धरावी.

रक्त तपासणी

एचायव्ही साठी एलायझा तपासणीने एड्स-विषाणूंविरुध्द प्रतिकण (प्रतिपिंडे-ऍंटीबॉडी) तयार झाल्या आहेत की नाहीत हे कळते. (एड्स आजार म्हणजे तक्त्यात दिलेली लक्षणे- चिन्हे असणे) संसर्ग झाल्यापासून निदान 3-4 आठवडे तपासणीत दोष आढळत नाही, त्यानंतर आढळतो. तपासणीत दोष कळल्यानंतर प्रत्यक्ष आजार व्हायला 5-10 वर्षेपर्यंत काळ जाऊ शकतो. या तपासणीत काही वेळा चूक होऊ शकते. म्हणूनच एका तपासणीवर अवलंबून न राहता दोन तपासण्या करूनच निश्चित सांगता येते.

एचायव्ही बाधित आणि एड्सग्रस्त रुग्णाची रक्ततपासणी अत्यंत महत्त्वाची असते. यात एड्स विषाणूची संख्या आणि रुग्णाची एकूण प्रतिकारशक्ती यांचा अंदाज घेतला जातो. सध्या खालील तपासण्या महत्त्वाच्या आहेत.

1. एचायव्ही एलायझा - ही विषाणू प्रतिघटकाची तपासणी आता स्वस्त आणि ब-यापैकी अचूक झाली आहे. लागण झाल्यापासून आठवडयात ही रक्ततपासणी निदर्शक (सदोष) ठरु शकते. मात्र ही शेवटी एक अदमासे तपासणी आहे. म्हणून ती दोनदा करतात. दोनदा केल्यास ती ब-यापैकी पक्की रक्ततपासणी ठरते. एलिसा तपासणीचा उपयोग चाळणी म्हणून (स्क्रिनिंग) सर्वत्र केला जातो.

2.वेस्टर्न ब्लॉट - या रक्ततपासणीमुळे एचायव्ही-एड्सचा विषाणू आहे की नाही ते कळते आणि त्याचा उपप्रकार (टाईप) कळतो. या तपासणीत विषाणूंच्या प्रथिनांची 'ओळख परेड' केली जाते. म्हणजे विषाणू आहेत की नाही याचा परिस्थितीजन्य पुरावा मिळतो.

3. सीडी फोर/सीडी4 प्रमाण - सीडी 4 हा रक्तातील पांढ-या पेशींचा एक उपप्रकार आहे. निरोगीपणात रक्तात या पेशी 500-1400 या प्रमाणात असतात. ही तपासणी प्रतिकारशक्ती व आजाराची पायरी ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. सीडी 4 पेशींचे प्रमाण जसे खाली जात राहते तशी लक्षणे-चिन्हे दिसतात. सुरुवात (500 सीडी 4 पेशी) बुरशीदाहाने होते. यानंतर (200-500 पेशी) फुप्फुसदाह व्हायला लागतो. पेशीप्रमाण जंतुदोषाने आणखी खाली गेले की अंतर्गत आजारांचे प्रमाण व प्रकार वाढत जातात. याचबरोबर टी.बी., हार्पिस-कांजण्या वगैरे आजार दिसू लागतात.

4. विषाणू-भार - रक्तातील विषाणूभार मोजणे ही एक महत्त्वाची व थेट तपासणी आहे. सीडी 4 तपासणीपेक्षा ही जास्त चांगली असली तरी ती सध्या फार महाग आहे. विषाणू-भार कमी होणे ही आजार नियंत्रणाची महत्त्वाची खूण आहे.

5. डी-24 तपासणी - ही रक्ततपासणी एलिसा तपासणीच्या आधी विंडो पिरियडमध्येच विषाणूच्या आगमनाबद्दल सांगू शकते. मात्र ही तपासणी क्वचितच केली जाते.

6. हल्ली बहुतेक लॅबमध्ये तयार किट वापरून तपासणी केली जाते. याचे तंत्र वेगळेच आहे.

उपचार

एचायव्ही केवळ विषाणू-बाधित अवस्था आहे. एड्स म्हणजे रोगलक्षणे व चिन्हे असलेली अवस्था.

खालीलपैकी कोणतीही परिस्थिती दिसल्यास उपचार सुरु करावे लागतात.

(अ) सीडी4 प्रमाण 350 च्या खाली गेल्यास.
(ब) मूळ आजाराच्या जोडीने येणारे जंतुदोष
(क) विषाणू-भार 30000 पेक्षा वाढणे.
या आजाराचे एकूण गुंतागुंतीचे स्वरुप आणि त्यातल्या कौटुंबिक, सामाजिक समस्या लक्षात घेऊन समुपदेशनाची आवश्यकता असते. केवळ औषधोपचार करणे बरोबर नाही. सध्या सर्व शासकीय रुग्णालयात समुपदेशक उपलब्ध आहेत. समुपदेशक रुग्णाला सर्व माहिती सांगून अडचणी जाणून घेऊन, योग्य सल्ला देतात.

या आजारात मधुमेह किंवा अतिरक्तदाबाप्रमाणे कायम उपचार घ्यावे लागतात. मात्र चांगल्या उपचारांमुळे हा घातक आजार आता असाध्य राहिलेला नाही, ही मोठी शास्त्रीय प्रगती आहे.

याबरोबर दर सहा महिन्याला रक्ततपासणी करून उपचाराचा उपयोग किती होतो ते तपासावे लागते. याबरोबर औषधांचे दुष्परिणाम कळण्यासाठी इतर रक्ततपासण्या पण कराव्या लागतात.
समुपदेशन व उपचार

एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.

एच.आय.व्ही. तपासणी सदोष (पॉझिटिव्ह) आहे हे रुग्णाला सांगणे हे फार जबाबदारीचे व कौशल्याचे काम आहे. यामुळे जाणकार व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का बसू शकतो. पण काय काय करता येते याबद्दल नीट माहिती टप्प्याटप्प्याने द्यायला हवी. आजार लगेच होत नाही, त्याला अद्याप वेळ आहे हेही सांगायला हवे.

बाधित व्यक्तीच्या पती/पत्नीस (किंवा लैंगिक जोडीदारास) या संसर्गाची/आजाराची बातमी देणे आवश्यक आहे; अन्यथा प्रतिबंधक काळजी घेताच येणार नाही. मात्र हे सांगताना मानवी सहानुभूती, धीर देणे, योग्य काळजीसाठी (निरोध) नीट सल्ला देणे, इ. अनेक अंगे सांभाळावी लागतात. रुग्ण स्वतः हे करू शकल्यास उत्तमच; पक्ष समुपदेशकाची या कामात मदत घ्यायला पाहिजे.

प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार होणा-या इतर आजारांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच हा दुर्धर आजार झालेल्या रुग्णास मानसिक आधाराची गरज असते, हे ओळखून त्याच्याशी सहानुभूतीने वागणे जरूरीचे असते.

एड्ससाठी अजून चांगली विषाणू-विरोधी औषधे नाहीत. काही औषधे उपलब्ध आहेत त्याने आजार लांबू शकतो. त्यांचा खर्च सध्या जास्त आहे व त्यांचे काही दुष्परिणामही होतात. एकूण यात फायदेतोटे पाहून, खर्चाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.

रुग्णसेवेत काळजी घ्यावी

रुग्णालयात वा घरी रुग्णाची काळजी घेत असताना इतरांनी त्यापासून दूर राहण्याची काही गरज नाही. मात्र वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तसेच रुग्णाचे कपडे, अंथरुण वगैरेंवर रक्त सांडले असेल किंवा ते दूषित झाले असल्यास निर्जंतुक करून घ्यायला हवे.

एड्स आजार असताना क्षयरोग होण्याची शक्यता फार असते. कारण रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढायची भीती असते.

औषधोपचार

एड्ससाठी हल्ली बहुविध औषधोपचार पध्दती प्रचलित आहेत. यात तीन औषधे असतात. आता एकाच गोळीत तिन्ही औषधे असलेली उपचारपध्दती उपलब्ध आहे.

HAART म्हणजे अत्यंत परिणामकारक उपचारपध्दती. ही तीन औषधांची उपचारपध्दती असल्याने विषाणूभार वेगाने कमी होतो आणि सीडी 4 प्रमाण वाढते. या औषधोपचाराचा खर्च महिना हजार-बाराशे पर्यंत जातो. सर्वांना मोफत औषधोपचार अद्याप शक्य झालेला नाही.

काही रुग्णांच्या बाबतीत औषधोपचारांचा अपेक्षित फायदा होत नाही किंवा दुष्परिणाम जाणवायला लागतात. अशांच्या बाबतीत औषधे बदलावी लागतात. याशिवाय इतर आजारांसाठी उपचार करावा लागतो.

मातेपासून पोटातल्या गर्भाला संसर्ग होऊ नये म्हणून औषधोपचार - सुमारे 1% गरोदर स्त्रियांना एचायव्ही-एड्सची बाधा आढळते. अशावेळी गर्भपात करायचा की गर्भ वाढू द्यायचा याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. गर्भ वाढू द्यायचा असल्यास औषधोपचाराने गर्भाचा संसर्ग टाळता येतो. मात्र यात 50% यश मिळते. काही बाबतीत यश मिळत नाही.

एड्स आणि टी.बी.

एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीस कधी ना कधी टी.बी. जंतूंची लागण होऊन गेलेलीच असते. बहुतेकांची टी.बी. लागण बरी झालेली असते पण काही जंतू शिल्लक असतातच. ते एक प्रकारे पांढ-या पेशींच्या तुरुंगात असतात. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात. त्यांची संख्या वाढायला लागते. यातूनच टी.बी. आजाराचा पुनर्जन्म होतो. म्हणूनच टी.बी. एड्सचा एक साथीदार असतो. सध्या भारतात टी.बी. रुग्णांपैकी 15% रुग्ण एड्सग्रस्त असतात.

एड्समध्ये होणारा टी.बी. फारशी लक्षणे नसलेला, झाकलेला आजार असू शकतो. मात्र त्यांच्या फुप्फुसात टी.बी.चे पुष्कळ जंतू आढळतात. ते बेडक्यात मोठया संख्येने दिसतात. फुप्फुसे मात्र क्ष-किरण चित्रात निरोगी दिसतात आणि खोकला, बेडक्यात रक्त वगैरे टी.बी.ची नेहमीची लक्षणेही दिसत नाहीत.

एड्स रुग्णांना फुप्फुस सोडून इतर टी.बी. चा आजारही सहज होऊ शकतो. यात पाठीचे मणके, जननसंस्था, मेंदू-आवरण वगैरे जागांमध्ये टी.बी. होऊ शकतो.

टी.बी.चा आजार झाला की शरीरात एड्स वेगाने वाढायला मदत होते.

एड्सच्या रुग्णांना कमी प्रतिकारशक्तीमुळे टी.बी.ची नवी जंतुलागणही सहज होऊ शकते. जेव्हा हे रुग्ण सामान्य रुग्णालयात जातात तेव्हा इतरांचे जंतू त्यांना सहज लागू शकतात.

एड्स आणि टी.बी. रोगाचे असे विशेष नाते आहेत. यामुळे एड्स असेल तर टी.बी. ची तपासणी करावी लागते. तसेच टी.बी असेल तर एड्स ची तपासणी करावी लागते.

म्हणूनच प्रत्येक एड्स रुग्णाला टी.बी. होऊ नये म्हणून 2 टी.बी. प्रतिबंधक औषधे 6 महिने देणे उपयोगाचे आहे.

मला असे वाटते कि - एकदा का लग्न ठरवतांना एखादा HIV +ve रुग्ण मिळाला तर त्याचे फक्त तेच लग्न मोडुन न थांबता त्याच्यावर लक्ष ठेउन तो नंतर अजुन कोणाला फसवत तर नाहि ना? हे पण बघणे आवश्यक आहे... कारण जसे ह्.बा नी सांगितले कि त्यांच्या मैत्रिणीच्या सा.बा - सा.बु. ना माहित होते कि त्यांच्या मुलाला HIV आहे... तरिहि त्यांनी तसे केले

मला HIV बद्द्ल थोडी माहिती हवी होती ती मी याच धाग्यावर विचारते प्लीज मला उत्तर द्या.
आमच्या वाडीत एका जोडप्यात नवरा HIV बाधीत होता. लग्नानंतर २ ते ३ वर्षात तो मेला. त्यांना एक मुलगा आहे आणि आता तो ८ वर्षाचा आहे. नवरा मेल्यावर काही महिन्यांनी त्याच्या बायको व मुलाची HIV टेस्ट केली जी निगेटिव्ह होती.
दोन महिन्यांपुर्वी माझ्या भावाने तिच्यासोबत लग्न केले तर माझा प्रश्न असा आहे की रुग्ण HIV बाधित आहे हे किती दिवसात समजते. आणि ८ वर्षानंतर रक्तात HIV चे विषाणु सापडु शकतात का?
यादरम्यान म्हणजे तिचा पहिला नवरा मेल्यापासुन ते आतापर्यंत तिची तब्येत चांगली आहे उलट ती थोडी वाढली आहे.

नुसता एडस कशाला? त्यात सर्व एसटीडी सुद्धा हवेत एडस बरोबर.

आणि इतर पण आजार सुद्धा तपासाला हवे. मधुमेह वगैरे. काही जण मल्लीनाथी करतात की मधुमेह वगैरे लग्नानंतर झाले तर सोडणार का साथीदाराला? पण दुसर्‍याला(दुसर्‍या जोडीदाराला) असे आजार सांभाळून घ्यावे लागतात.
मातारपणी काय सांभाळणे वेगळे असते. तरुण वयात हे जोडीदाराचे सोसणे(खास करून अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये) कशाला?
नाहीतरी लग्न हा तसाही डोळस व्यव्हारच असतो.

मधुमेह मुळे दुसरेही बरेच हिडन आजार असतात.

निल्सन,

एच आय व्ही ची चाचणी इन्फेक्शन झाल्यानंतर ३ ते १२ आठवड्यानी पॉझिटिव येते. ( एलायजा अँटीबॉडी टेस्ट)

त्यामुळे,

नवरा मेला, त्यानंतर दीड वर्षानंतरचा रिपोर्ट क्लीअर असेल तर ती बायको आणि मूल निगेटिव मानायला हरकत नसावी.

तुम्ही कुठे रहाता? जवळच्या शक्ती क्लिनिक, आय सी टी सी केंद्र किंवा ए आर टी केंद्रातील काउन्सेलरला किंवा डॉक्टरला भेटा.

या औषधोपचाराचा खर्च महिना हजार-बाराशे पर्यंत जातो. सर्वांना मोफत औषधोपचार अद्याप शक्य झालेला नाही.

सरकारने जागोजागी ए आर टी सेंटर काढलेली आहेत. तिथे हा उपचार पूर्णपणे मोफत मिळतो.

इथे पहा.... http://www.naco.gov.in/NACO/

इथे हॉस्पिटलची यादी आहे... http://www.naco.gov.in/NACO/Living_with_HIVAIDS/Download_ART/

निल्सन | 11 February, 2014 - 10:53

मला HIV बद्द्ल थोडी माहिती हवी होती ती मी याच धाग्यावर विचारते प्लीज मला उत्तर द्या.
आमच्या वाडीत एका जोडप्यात नवरा HIV बाधीत होता. लग्नानंतर २ ते ३ वर्षात तो मेला. त्यांना एक मुलगा आहे आणि आता तो ८ वर्षाचा आहे. नवरा मेल्यावर काही महिन्यांनी त्याच्या बायको व मुलाची HIV टेस्ट केली जी निगेटिव्ह होती.
दोन महिन्यांपुर्वी माझ्या भावाने तिच्यासोबत लग्न केले तर माझा प्रश्न असा आहे की रुग्ण HIV बाधित आहे हे किती दिवसात समजते. आणि ८ वर्षानंतर रक्तात HIV चे विषाणु सापडु शकतात का?
यादरम्यान म्हणजे तिचा पहिला नवरा मेल्यापासुन ते आतापर्यंत तिची तब्येत चांगली आहे उलट ती थोडी वाढली आहे.

दोन वर्षापुर्वी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर मला काल मिळाले. माझी वहिनीच्या रक्तात HIV antibodies 1 & 2 detected झाले आहेत.

दोन वर्षापुर्वी जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा जामोप्यांनी मला जवळच्या शक्ती क्लिनिक, आय सी टी सी केंद्र किंवा ए आर टी केंद्रातील काउन्सेलरला किंवा डॉक्टरला भेटायला सुचविले होते तसेच विशालदाने विपु करुन डॉ. कैलास गायकवाड यांच्याशी मसलत करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार मी डॉ.ना मेल केली होती त्याला रिप्लाय म्हणुन डॉ. नी त्यांचा मोबाईल नंबर देऊन फोन करायला सांगितला होता पण यातलं मी काहीच केले नाही. फुकटच्या सल्ल्याला किंमत नसते म्हणतात ना ते खरचं आहे. मी भावाला डॉ.चा नंबर देऊन बोलायला सांगितले होते पण त्याचा पाठपुरावा नाही केला कदाचित त्यामुळे त्याने ही' गोष्ट हलकी घेतली त्यातच नव्या लग्नाच्या नव्या दिवसात त्याला 'या' गोष्टीला महत्व द्यावेसे नसेल वाटले त्यामुळे त्याने दुर्लक्ष केले.

पुढे जेव्हा २-३ महिन्यांनी वहिनी आजारी असताना माहेरी गेली होती तेव्हा मी तिच्या आईला सुद्धा तिच्या पुर्वीच्या HIV टेस्टबद्दल विचारले तेव्हा त्यापण हेच म्हणाल्या की तिची व तिच्या मुलाची HIV टेस्ट निगेटिव्ह आली होती. वरुन हा साधा ताप आहे असा टोला ही लगावला. मुळात मला सुद्धा नक्की माहित नव्हते की ही टेस्ट रिपीट करायची असते त्यामुळे मी काही बोलले नाही.

आज वहिनी २ महिन्यांनी गरोदर आहे याआधी तिचे मिसकॅरेज झाल्यामुळे मी यावेळेस तिला माझ्या गायनॅककडे घेऊन गेले होते. डॉ.ला तिची हिस्ट्री सांगितल्यावर पाचव्या महिन्यात करावयाची असलेली HIV टेस्ट तिने आताच करायला सांगितली तेही दोघा नवराबायकोची. भावाची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, आधीच्या अबॉर्शनचा खर्च, आताचा सगळा खर्च मी करत होते त्यामुळे त्याने आधी वहिनीची टेस्ट करुन घेतली.
रिझल्ट HIV antibodies 1 & 2 detected, Australia antigen : negative. Test must be confirmed with Western Blot.

क्रमश :

आता या वेस्टर्न ब्लॉटचा खर्च साधारण ४ ते ५ हजार इतका आहे. मी सुद्धा साधारण परिस्थिती असणारी आहे याआधीच मी भावाला १८-२० हजारांची मदत केली आहे पण आता मलाही सासरच्यांकडुन थोडीफार लिमिटेशन्स आहेत.

आज मी १९०७ या हेल्पलाईनला फोन करुन वरील टेस्ट स्वस्तात करण्यासाठी सरकारच्या काही योजना आहेत का असे विचारले असता त्यांनी अशी कोणतीही सुविधा नाही परंतु वर जामोप्या यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने जागोजागी ए आर टी सेंटर काढलेली आहेत. तिथे हा उपचार पूर्णपणे मोफत मिळतो असे सांगितले व इथल्या ए आर टी सेंटरचा पत्ता दिला.

आता मला इथल्या जाणकरांकडुन हिच अपेक्षा आहे की माझ्या मनात काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे निर्विकारपणे, खरी (जरी त्रासदायक असली तरी) द्यावीत.

१) जर वेस्टर्न बॉल्ट मध्ये एडसचे विषाणु सापडले तर व्यक्ती पुढील किती वर्षे व्यवस्थित जगु शकते?
२) भावाला एच आय व्ही ची लागण होण्याची शक्यता खुप आहे पण जर आता त्याच्या रक्तात विषाणु नाही सापडले तर पुन्हा रिपीट टेस्ट केव्हा करावी लागेल?
३) वहिनीने पोटातील बाळ वाढवावे की नाही? ( याबाबतीत हेल्पलाईनवाल्याने बाळाच्या संरक्षणासाठी ए आर टी सेंटर मधुन गोळ्या दिल्या जातील असे सांगितले आहे पण डॉ. गायकवाड यांच्या म्हणण्याप्रमाणे शक्यता ५०% एवढीच आहे)
४) डॉ. गायकवाड यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या एच आय व्ही टेस्ट नंतर अजुन ४ टेस्ट आहेत त्या मोफत अथवा स्वस्तात करणारे इस्पितळ वै.ची माहिती.

निल्सन, ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून एक दिवस हेल्प डेस्कला बसते तेव्हा गर्भारपणात HIV +ve निदान झालेल्या दोन केसेस पाहिल्या आहेत. दोन्ही मातांची बाळं गर्भारपणातच डॉक्टरांनी काळजी घेतल्याने निरोगी जन्मली होती. आणि त्या दोन्ही माता ठाणे सिव्हिलमध्ये ART सेंटरमध्ये उपचार घेत होत्या. तिथे कमी पैश्यांत उपचार होतील. तुम्ही म्हणता त्या टेस्टबद्दल माहित नाही. तुम्ही एकदा भाऊ व वहिनीला तिथल्या ART सेंटरमध्ये डॉक्टरांना भेटायला सांगा.

Pages