निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव या टोपली कारवी चे नाव आम्हाला माहीत नव्हते. साधना आणि पंकज ने त्याला मेंढी असे नाव दिले. अंबोलीला कावळेसाद पाँइटवर दिसले होते. फूललेली कारवी मी अजूनही बघितलेली नाही. तिची उमलण्याची वर्षे आणि माझी नेहमीच चूकामूक होते.
ठाण्याला त्या ठिकाणी अनेक दुर्मिळ भाज्या विकायला असतात. त्या भाज्यांचे रसिक ठाण्यात आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे.

माय गॉड, माधव ही टोपली कारवी कुठे मिळाली तुम्हाला?? आमच्या गावी ही भरपुर येते. मी फक्त त्या परिसरातच पाहिलीय. याला गावी मेंढी गवत म्हणतात कारण लांबुन पाहिल्यास हिरव्या मेंढ्यांचे कळप बसलेत असा भास होतो. दिनेशना या आंबोलीभेटीत आम्ही दाखवली तेव्हा तेही खुप खुष झाले पाहुन. या झाडाला फुले आलेली मात्र मी अजुन कधी पाहिली नाहीत. एकाच खोडापासुन निघालेल्या अनेक गोलाकार फांद्या असे याचे वर्णन करता येईल. उन्हाळ्यात सुकुन गेल्यावर फक्त काड्या शिल्लक राहतात आणि पावसाळ्यात परत पानावर येतात.

तसेच आपल्याकडे एक पपनस (पोपनस) नावाच झाड होत ते आठवतय का तुला? संत्र /मोसंब या जातीतील होत.

पपनस मुंबईलाही मिळते आता. यावर्षी गणपतीत ५० रुपयांना एक मिळाले, दरवर्षी किंमत वरवर जातेय. पण वाडीच्या पपनसाची चव नाही याला. यालाच इंग्रजीत ग्रेपफृट म्हणतात बहुतेक. वाडीला याला तोरंजन म्हणायचे.

मुंबैला मिळणारी पपनस कधीच गोड निघत नाहीत. खूपदा कडूच निघतात. आता आणणेच सोडून दिलय आम्ही.

पण वाडीच्या पपनसाची चव नाही याला. >> १००% अनुमोदन!

पपनस चा रंग पण काय सुंदर दिसतो. ते सोलताना आधी साल हाताने वेगळे काढून, हात स्वच्छ धुवून मगच पपनस सोलले पाहिजे, नाहीतर हमखास कडू लागते. गोव्यात गणपतिच्या माटोळीला ते हवेच.
पण गेपफ्रूट वेगळे. त्याचा रस बराच कडू लागतो.

आज अगदी नेटाने बसून जूने फोटो शोधले. त्यातल्य निवडक रानमेव्याचे फोटो देतोय इथे. कदाचित माझी नावे चुकली असतील.
मी ज्या काळात हे फोटो काढले त्या काळात हा सर्व मेवा माझ्या भटकंतीच्या क्षेत्रात मुबलक उपलब्ध होता. म्हणुन मी नीट लक्ष देऊन फोटो काढले नव्हते. आज मात्र ते सगळे आठवतेय.
पण आठवणींइतके फोटो स्पष्ट नाहीत. मी हे फोटो क्रॉप केले नाहीत कारण जिथे शक्य आहे तिथे झाडापानांची कल्पना द्यायची होती.

हे आहेत हाशाळे. गोव्यात मिळतात्.रुप रातांब्यासारखे असले तरी आकार बराच छोटा. चवीला गोड लागतात, आत जर कदक बिया असतात.

हे आहेत हिरडे, आंबा घाट, दाजीपूर, राधानगरी, अंबोली ला मुबलक आहेत. हरितकी चूर्ण, गंधर्व हरितकी, हवाबाण हरडे हि यापासून केलेली औषधे. त्रिफळा चूर्णात हा असतो. ज्या घरी आई नाही, त्या घरातील मूलांची काळजी हिरडा घेतो, अशी याची महानता वर्णन केलेली आहे. चामडे कमावण्याच्या कामी याचा उपयोग होतो.
चवीला अत्यंत तूरट, पण मला तसाच खायला आवडतो.

हि आहेत अंबोलीची जांभळे. आकाराने अगदी लहान पण चवीला अप्रतिम. कितीहि खाल्ली तरी समाधान होत नाही,

हे आहेत रातांबे, कोकम, आमसूल यापासूनच बनवतात. अमृत कोकम हे अप्रतिम चवीचे सरबत यापासून बनवतात. पायांच्या भेगांवर लावायचे कोकम तेल म्हणजेच मूटियाल यापासून बनवतात. हे तेल खाता येते. आणि सामान्य तपमानाला ते घट्ट असते. आगळ पण याचेच बनते.
वरची साल काढली की आत पांढर्‍या गरात बिया असतात. पुर्ण पिकलेल्या रातांब्यातला गर गोड असतो, पण तो दाताला अजिबात न लावता गिळायचा असतो.

या आहेत नेर्ल्या. ठराविक दिवसात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाबाहेर मिळतात (तिथे जे काय काय मिळते, ते दगडू बाळा भोसलेच्या पेढ्यांइतकेच अप्रतिम असते) याचा वेल असतो. रंग बघता आहातच.
आकार जेमतेम दिड सेमी. चव अप्रतिम. आंबट गोड या वर्णाच्याही पलिकडची..

हि आहेत तोरणं. आता बाजारातही क्वचित दिसतात. पुर्वी वसईला पण याची झुडुपे होती. चव पिठूळ गोड.
आकाराने करवंदापेक्षाही लहान. पण झाडावरुन तोडल्यावर थोड्याच वेळात खराब व्हायला लागतात.
हे झाड मला आणि गिरिराजला गोव्यातल्या डिचोलीमधे दिसले होते. हि तोरण इतक्या ताज्या रुपात मी कधी बघितलीच नव्हती, त्यामूळे मलाही खात्री नव्हती. पण खाल्ल्यावर मात्र खात्री पटली.

हि आहेत रानद्राक्षं. हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगात हि दिसतात. फोटोत दिसताहेत ती मात्र याची पाने नाहीत. हि फळे लागतात त्यावेळी वेलावर पाने नसतात. पण सावधान, हि फळे कितीही आकर्षक दिसली, तरी खाण्याजोगी नाहीत.

हि आहेत वेली करवंद किंवा साधनाच्या भाषेत रेडे करवंद. याचा खूप मोठा वेल असतो. साधी करवंदे कशी दिसतात ते माहित आहेच त्याचे झुडुपही अनेकजणांनी बघितलेले असते. पण हा वेल मात्र डोक्यावर असतो. तो नीट बघितला तरच दिसतो. हा फोटो जरा लहानच आहे.

पण जर नीट बघत चाललो तर हा वेल दिसू शकतो. तशी हि करवंद आकाराने जरा मोठीच असतात आणि चवीला खूपच गोड असतात. गिरिराजसारखा सांगेन त्या झाडावर चढून मला हवी ती फळे काढून देणारा मित्र सोबत असेल, तर माझी चंगळ होणारच ना !!

तर दोस्तानो, हा रानमेवा. तरी यात जगमं, अळू, काजूची बोंडे नाहीतच..

प्रज्ञा १२३, माझा १७.१२.१०(४) चा प्रतिसाद वाचलास नाही का? त्यात आपल्या बालपणीच्या काही आठवणी लिहील्या आहेत.
--पण पांगार्‍याच्या बिया आणि त्यांचे चटके अजूनही आठवतायत. (दिलेले आणि घेतलेले.) तसेच शेवरीचा कापूसही आठवतो.
--तसेच आपल्याकडे एक पपनस (पोपनस) नावाच झाड होत ते आठवतय का तुला? संत्र /मोसंब या जातीतील होत.
--लाल गुंजांचही झाड होत. काय छान दिसायच्या त्या? अंडाकॄती आकार, पाऊण भाग लाल आणि पाव भाग काळा. त्यात पण छोटयाशा डोळ्याचा आकार. आताही २ गुंजा माझ्याकडे आहेत.
--भुई चाफ्याचा वास व फूल दोन्ही मस्तच.
--काजूच्या रुजलेल्या बियाची आठवण(द्विदल)येते. चव अजूनही तोंडात आहे.
--कवठी चाफ्याच्या फुलांची तर लयलूट होती.
>>>>>>>>शोभा१२३ हे एवढे आनंदमयी दिवस विसरण कसं शक्य आहे? फक्त मध्यंतरी थोड्या काळासाठी विस्मर्णात गेलं होत. पण जागु च्या ह्या धाग्यामुळे परत सर्व लख्ख आठवायला लागले.
दिनेशदा, रातांब्याचे हे सर्व प्रकार माझी आई करायचि, आम्हि लहान असल्याने(त्यावेळि) तिला मदत करायचो.

वा वा आज खुप छान माहीती Happy ती रानद्राक्ष लहानपणी एकदोनदा खाल्लेली आहेत. खायला चांगली नाहीत पण एक दोन खायला हरकत नाही म्हटल्यावर खाल्ली Wink
हिरडे, नेर्ल्या , तोरणं हे बघितलं नव्हतं कधी.

दिनेश आज तर खूपच छान माहिती आणि ती पण फोटोंसहीत Happy मजा आली वाचायला.

पुर्ण पिकलेल्या रातांब्यातला गर गोड असतो, पण तो दाताला अजिबात न लावता गिळायचा असतो. >> असे का? त्या गराचे पन्हं करतात की!

हिरडे आणि नेरल्या पहिल्यांदा बघितले आज. त्या नेरल्या कसल्या मस्त दिसताहेत.

माधव, त्या गराचे पन्हे नाही, सरबत करतात. पण तो दाताला लागला तर दात पिवळेधम्मक होऊन जातात. तो पिवळा थर इतका चिकट असतो कि बरेच वेळा ब्रश केला तरच निघतो. तसा त्या सालातही चिकट पदार्थ असतोच.
मँगोस्टीन नावाचे फळ पण याच कूळातले. त्यातला गर जास्त गोड असतो, पण सालीचा काही उपयोग नसतो. आता हे फळ भारतात मिळायला लागले आहे.

माधव, एकदा पिकलेले रातांबे खाऊन बघा. दात एकदम गिच्च पिवळे होतात. गर मात्र मस्त लागतो.

दिनेश, तुमच्यामुळे ब-याच वर्षांनी मला नेरली खाता आली. आंबोलीला यांना नेरडा म्हणतात. आंबोलीची नेरली रंगाने अशीच असतात पण एवढी लहान नसतात. लहान मुलाच्या करंगळीएवढा आकार असतो त्यांचा. कच्ची असताना एकदम आंबट्ढोण पण पिकली की मस्तच एकदम. आंबोलीला ढवसा म्हणुन अजुन एक रानमेवा होता - बाहेरुन भगवा आणि आत त्याच रंगाचा गर आणि लांबट बिया. साधारण रातांब्यांसारखाच आकार पण तसा गोल नाही तर ओबडधोबड गोल. वरची ती भगवी सालही चांगली संत्र्याच्या सालीसारखी जाड, दातानेच ते आवरण तोडावे लागायचे. चव मात्र अतिशय सुरेख. जिथे माझे घर आहे, तिथेच आधी मिळायची ही ढवसा. आता समोरच्या जंगलात शोधायला हवीत.

साधना, कधी मिळाली तर जरुर या दोन्ही फळांचे फोटो काढ. कोकणात आटकं नावाचा पण एक रानमेवा मिळायचा, असे माझे वडील सांगायचे. पण त्यांनी देखील खूप वर्षात तो खाल्ला नव्हता. या फळांची मागणी करत राहिलो, तर कदचित परत मिळायला लागतील हि फळे.

यासंदर्भात मला सहज वाटले म्हणून लिहितो, कि टिव्हीवर जे भटकंतीचे वगैरे कार्यक्रम होतात त्यात कधी हा रानमेवा दाखवतच नाहीत. बस्तरमधल्या लाल मुंग्यांची चटणी मात्र आवर्जून दाखवतात.

यासंदर्भात मला सहज वाटले म्हणून लिहितो, कि टिव्हीवर जे भटकंतीचे वगैरे कार्यक्रम होतात त्यात कधी हा रानमेवा दाखवतच नाहीत

यांचा एक टिपिकल फॉर्मट आहे, जायचे कसे? पाहायचे काय? राहायचे कुठे? खायचे काय? झाला कार्यक्रम..... Happy जर अभयारण्याची भटकंती असेल तर वन्यजीवन.... बाकी तिथल्या फ्लोरा आणि फौना बद्दल कोणाला काय पडलेय? आणि जे काही आहे तेही नष्ट होतंय आता.

माझे एक नातलग शिरोड्याला राहतात. तिथे कुठलातरी प्रकल्प येतोय त्यासाठी लाखांमध्ये पैसे देऊन जमिनी घेतल्या गेल्या. माझ्या नातलगांनी भांडण करुन कोर्टकचेरी करुन आपली जमीन आपल्याकडेच ठेवली. त्यांना पुर्ण गावाने मुर्ख ठरवले. आता तेच लोक यांच्याकडे येऊन कंपनीने आम्हाला न विचारता आमच्या शेतातुन रस्ता काढला, विहीर बुजवली इ.इ. गा-हाणी गातात, केल्या कृत्याचा कुठेतरी पश्चाताप दिसतो बोलण्यात. पण आता काहीच करु शकत नाही कोणीही. ज्यांनी पैसे घेतले त्यांना कंपनी आता दारातही उभी करुन घेत नाही. आज लोकांना रस्ता काढला, विहीरी बुजवल्या इत्यादी लगेच दिसणारे बदल दिसताहेत आणि त्यांचा जीव हळहळतोय. काही वर्षांनी पिकांवर परिणार होणार, मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार आणि हे सगळे unreversible आहे, तेव्हा काय करणार हे लोक?

नव्या मुंबईत विमानतळ जिथे विमानतळ होऊ घातलंय तिथे आज तिवरांचे जंगल आहे. तिथले लोक आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही म्हणुन आंदोलन करताहेत. मोबदला मिळाला की ते गप्प बसतील. तिथली तिवरे गेली की अजुन २० वर्षांनी तिथल्या भागावर आणि आजुबाजुच्या मासेमारीवर जो परिणाम होणार त्याला कसे तोंड देणार लोक?? मोबदला घेऊन हे प्रश्न सुटणार आहेत का? पण आज प्रकल्पग्रस्त लोकांना मदत करणारे फक्त पैशांमध्ये मोबदला हेच अंतिम ध्येय समोर ठेऊन मदत करताहेत. कोकणात बरेच लोक पैशांसाठी नाही तर पर्यावरणासाठी विरोध करताहेत, पण पैसे देऊन तोही विरोध एके दिवशी दाबला जाईल. Sad

तिवरांबद्दल खूप लिहून झालेय, फक्त उजळणी करतो. हि झाडे खारट पाण्यात वाढतात. दिवसातून दोनदा त्यांना भरतीच्या पाण्यांचा सामना करावा लागतो. त्यामूळे त्यांच्या खोडाचा काही भाग, मूळासारखा पसरलेला असतो.
या जाळ्यांचे अनेक फायदे आहेत. दिवसातून दोनदा या जाळ्या समुद्राचे / खाडीचे पाणी घुसळतात, त्यामूळे एरवी समुद्रात जाईल असा कचरा, या जाळ्यात अडकतो.
दूसरे म्हणजे, या जाळ्यात मोठे मासे येत नाहीत त्यामूळे माश्यांना अंडी घालण्यासाठी आणि त्यांच्या पिल्लाना वाढण्यासाठी, हा भाग सुरक्षित असतो. या भागात काही झाडे इतकी खास असतात, कि त्यांचे लाकूड खूप मजबूत होते. व त्याचे अनेक उपयोग करता येतात.
हि जंगले तोडल्यास या सगळ्याला मूकावे लागेल.
सहारच्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यातील लोकांचे योग्य त्या ठिकाणी पूनर्वसन केले तर आहे तोच विमानतळ वाढवता येईल.

सावलि काय लिंक दिलीस ग ? मला शहारा आला. अग हाच माझा रस्ता आहे रोज कामावर जाण्याचा. दोन वर्षापुर्वी पर्यंत मी नेहमी ते प्लेमिंगो येता जाता पाहायचे. एकदा तर पुर्ण थवा उडताना दिसला होता. मी गाडी अगदी स्लो करुन पाहीला तो थवा. आहाहा एकदम मस्त. अग नुसते प्लेमिंगोच नाहीत तर इतर वेगवेगळे पक्षी यायचे. छोटे छोटे बदकासारखे. बगड्याचे तिन चार प्रकार यायचे. पुर्ण करडा, पुर्ण काळा एक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट, सोनेरी छटा असलेला तसेच समुद्र पक्षी, साळूंखीसारखे पण लांब चोच असणारे पक्षीही खुप यायचे. पण आता नविन पोर्ट साठी भराव केलाय तिथे आणि आता एकही पक्षी फिरकत नाही तिकडे. खुप वाईट वाटत.

दिनेशदा.. तोंडाला पाणि सुटलं... मी तोरणं लहानपणी चिक्कार खाल्लीयत... Happy

मी वरचा रानमेवा नाही पाहीलाय अजुन. फक्त रातांबे माहीत आहेत आणि अळूची फळे. कोकणात जाण्याची इच्छा आता तिव्र झाली आहे. साधनाला गाठाव लागेल आता.

बांबु तर सगळ्यांनाच माहीत असेल. ह्या बांबुचा टोपल्या, सुप, परड्या बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. गाई म्हशी व्यायल्यावर बांबुचा पाला त्यांना चरायला देतात. बांबु पासुन बर्‍याच शोभिवंत वस्तुही बनवतात.
ह्याच बांबुच्या कोवळ्या कोंबांची भाजी करतात का ? जाणकारांनी अजुन ह्याचे उपयोग सांगावे.
bambu.JPGbambu1.JPGbambu2.JPG

जागू, बांबूला हिंदीमधे बांस (त्यावरुनच बांसुरी ) किंवा बंश म्हणतात. त्याचा जो डोळा असतो, त्याच्या आजूबाजूला किंचीत असा क्षार दिसतो, तो वंशलोचन. तो सिलिकेटचा क्षार असतो. तो आयूर्वेदात वापरतात.
आपल्याकडे बांबूला फूलोरा आलेला दिसत नाही, पण साधारण ६० वर्षांनी, एका जातीचा सर्व बांबू फूलतो. आणि मरुन जातो. त्या फुलोर्‍यात तांदळासारखे दाणे असतात. ते खाता येतात. त्याची खीर करता येते.

पण बांबूचा फूलोरा आणि दुष्काळ यांचा संबंध आहे असे मानतात. तसेच या फुलोर्‍यानंतर उंदरांची प्रजा अतोनात वाढते.

बांबूच्या कोवळ्या कोंबात साइनाईड हे विषारी द्रव्य असते, हत्तीसारख्या प्राण्यांनी कोवळ्या कोंबाचा नाश करु नये, म्हणून ती निसर्गाची योजना आहे. हत्तीना ते माहीत असते म्हणून ते त्याच्या वाटेला जात नाहीत. पण माणूस मात्र ते कोंब (वासोते) खातोच. त्यातल्या साईनाईडचा अंश काढून टाकण्यासाठी, हे कोंब किमान २४ तास पाण्यात भिजत ठेवावे लागतात. बांबूची भाजी, लोणचे असे अनेक प्रकार करतात.

बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे, तसेच ऊसही.

दिनेशदा,
छान माहिती !
धन्यवाद !
वरीलपैकी फक्त करवंदे आणि जांभळे तेवढी माहित आहेत, बाकी नेर्ल्या कोल्हापुरला गेलो की ट्राय करतो
Happy

लहानपणी जांभळे, करवंदे, चिंचा, बोर, कैर्‍या, फणस, ताडगोळे, आवळे, बदाम (गावठी) खाण्यातच दिवस गेलेत. हल्लीच्या मुलांचे लेज, कुरकुरे, चायनीज खाण्यात चाललेत.

शिवणी माहीत आहेत का तुम्हाला ? आम्ही लहानपणी तोही रानमेवा खायचो. ती दगडावर घासुन फोडून खाण्याचे उद्योग चालायचे आमचे. फोटो मिळाला की टाकेन.

शिवण (गंभारी) नावाचे एक झाड असते, त्याला पिवळी / चॉकलेटी फूले येतात. त्याचे मूळ दशमूरारिष्ट मधे वापरतात, त्यालाही फळे येतात. पण ती नसावीत.

मला चक्क मुंबईत बांबूचा फूलोरा बघायला मिळाला होता. फोर्ट युनिव्हर्सिटीच्या आवारात फूलला होता तो. फोटो असणार इथे. पण ते कौतूक माझ्याशिवाय कुणालाच नव्हतं, तिथे.

तसे ते तिथे असणार्‍या अतिदुर्मिळ उर्वशीचेही नव्हते, म्हणून तर ती आता नष्ट झालीय.

जागू, याच बांबूंपासून दर दिवाळीत माझा भाऊ मोठ्ठे मोठ्ठे आकाशकंदील बनवायाचा. कधी चांदणि, कधी विमान तर कधी खरा (पूर्वीचा)आकाशकंदीलचा आकार आहे ना तसा आकाशकंदील. आम्ही तेव्हा लिंबूटिंबू म्हणून त्याला मदत करायचो.
एकदा तर त्याने त्याची बासरी बनवली होती. तसेच एक खेळणे बनविले होते. त्याचा आकार पिचकारीसारखा होता. फक्त त्याचा दट्ट्या वेगळा होता. तसेच पिचकारीच्या तळाला एक भोक ठेवले होते. त्या पिचकारीत तळाला करांद्याच्या पानांचा (कुंपणावर असलेली एक वेल.) गोळा घालून पिचकारीत दट्ट्या घालून जोरात आपटल्यावर ठ्ठो .. असा मोठ्ठा आवाज यायचा.
जागू, हा धागा चालू केल्याबद्द्ल धन्यवाद!!!!!!!!!

बांबूत जेवण शिजवताही येते. केरळकडे पुट्टू नावाचा एक प्रकार बांबू मधेच करतात. पण बांबूचा खरा वापर करतात तो आपल्या ईशान्य भारतात आणि चीनमधे.
वर्षू चे इकडे लक्ष गेले तर बरेच काही लिहू शकेल ती.

दिनेशदा तीच शिवणी त्याला चॉकलेटीच फुल येतात
वर्षूला लिंक द्या दिनेशदा.
शोभा अग धन्स काय त्यात ? ही तर आपली सगळ्यांची आवड आहे.

एक खेळणे बनविले होते. त्याचा आकार पिचकारीसारखा होता. फक्त त्याचा दट्ट्या वेगळा होता. तसेच पिचकारीच्या तळाला एक भोक ठेवले होते. त्या पिचकारीत तळाला करांद्याच्या पानांचा (कुंपणावर असलेली एक वेल.) गोळा घालून पिचकारीत दट्ट्या घालून जोरात आपटल्यावर ठ्ठो .. असा मोठ्ठा आवाज यायचा. >> शोभा १२३, त्यालाच कटकं म्हणतात ना? साधारण वाटाण्यासारखा गोळा असतो पण कपड्यावर वाईट डाग पडतात त्याचे .

शोभा / आस, कुठे बघितले हे खेळणे ? माझ्या आईच्या लहानपणी अशी पिचकारी बनवायची असे ती म्हणते. (आई कोल्हापूरजवळच्या मलकापूरची ) तिथे बांबूला चिवारी, किंवा चिवं म्हणतात. मी पण एकदा मामाकडे हट्ट करुन अशा पिचकार्‍या बनवून घेतल्या होत्या.

कधी कधी काही किटक बांबूना भोक पाडतात. त्यातून वारा गेला कि, बासुरीसारखा आवाज येतो. कदचित बासरीचा शोध असाच लागला असेल (कमळाच्या पानावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आवाजाने, स्वती ऋषींना मृदुंगाची कल्पना सूचली होती, असे म्हणतात.)

बांबूच्या खोडात कधी कधी पाण्याचा साठा पण असू शकतो. बांबूवर हाताने टिचक्या मारुन जाणकारांना आत पाणी आहे कि नाही ते ओळखता येते.

आपल्याकडे तिलारी घाटात खूप बांबूची बने दिसली होती.

Pages