सोलाणे घालून वांग्याची रस्साभाजी

Submitted by तृप्ती आवटी on 22 November, 2010 - 13:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ लहान वांगी, १ मध्यम आकाराचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, १ वाटी सोलाणे.

१ चमचा धणे पावडर, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, १ डाव तेल, मीठ, फोडणीसाठी हळद-हिंग-मोहरी.

वाटणः ३-४ लाल मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे स्पू तीळ, २ टे स्पू सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती: 

तीळ, खोबरं कोरडच भाजून वाटणासाठी दिलेले इतर जिन्नस वापरुन कोरडेच वाटून घ्यावे. तिळातल्या तेलाने घट्ट गोळा तयार होतो.

कांदा, कोथिंबीर बाssssरीक चिरून घ्यावे. हरभर्‍याचे ताजे घाटे सोलून एक वाटी सोलाणे काढावेत. वांगी धुवून स्वच्छ पुसून नाकं काढून चार खाचा द्याव्यात. पसरट बुडाच्या कढईत तेल गरम करुन वांगी तळून (शॅलो फ्राय) घ्यावीत. त्याच तेलात हळ्द-हिंग-मोहरीची फोडणी करुन तेलात आधी तिखट घालावे आणि मग कांदा परतायला घालावा. कांदा नीट परतला गेला की त्यातच अर्धी कोथिंबीर, वाटण, धणे पावडर, काळा मसाला पण घालावा. छान खरपूस वास सुटेपर्यंत सगळे एकत्र परतावे. मग सोलाणे आणि वांगी घालून मसाला एकसारखा लागेल असे हलवून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ काढावी. आता दाटसर रस्सा होइल इतपत कढत पाणी घालावे आणि उकळी काढावी. वरुन उरलेली कोथिंबीर घालावी. वांगी फार गाळ होउ देऊ नयेत.

बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा हा रस्सा अप्रतीम लागतो.

vaangee.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोन जणं
अधिक टिपा: 

_शक्य असल्यास कांदा, खोबर्‍याच्या वाटीचा तुकडा हे चुलीत अथवा गॅसवर भाजून घ्यावे. तसे केल्यास कांदा परतायची गरज नाही.
_वाटी लहान असल्यास दीड ते दोन वाटी सोलाणे घ्यावेत.
_खोबरे न घालता तीळ एखाद चमचा जास्त घेतले तरी छान लागते.
_तीळ अजिबात न घालता नुसते खोबरे घातले तर ह्याच रश्शात वांगी आणि सोलाणे न घालता उकडलेली अंडी घालून एग करी होते.
_काळा मसाला नसल्यास गरम मसाला, द ते म, गोडा मसाला घाला. (चव तशी येत नाही पण आता नाहीच्चे म्हंटल्यावर काय करणार :फिदी:)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कसले सही फोटो आहेत सगळ्यांचे. मस्त रेसिपी सिंडरेला.
काल एडिसन मध्ये २-३ दुकानं फिरले त्या सोलाण्यांसाठी पण कुठ्ठे म्हणून मिळाले नाही Sad आता पुढचे ४ महिने तरी जर्सी ट्रीप नाही. काय बरं घालावं सोलाण्यांच्या ऐवजी ? भाजी करून तर पाह्यचीच आहे.

सावनी, एडिसनमध्ये सुखाडियाच्या समोर जी मोठी सब्जी मंडी आहे तिथे मी पाहिले आहेत सोलाणे. पण काय कराय्चं माहित नाही म्हणून घेतले नव्हते आधी कधी.
वाल लिल्वा घालून येईल का तीच चव?

मटार घालता येतिल का? (पण, नकोच गुळचट व्हायची भाजी!)
मी पण आणलेत सोलाणे आणि वांगी! भाजी करणार उद्या परवाकडे.
सगळे फोटो झकास तरी सिंडिचा माझ्यामते सगळ्यात बेस्ट.

अगं मी पाहिले तिथे पण सायो. नाही मिळाले. मला पण एकदा वाटलं होतं की मटार घालावेत पण मटार अगदीच गोड गोड असतात म्हणून नको वाटतायेत. शँकी, हरभर्‍यांची आयडिया चांगलीये पण ते तरी मिळायला हवे नं.
वांगी आहेत, अगदी "दतेम" सुद्धा कधीचा घरात येऊन पडलाय Happy पण सोलाणे नाहीत Sad

सावनी, तुझ्या इथल्या इं. ग्रोसरीत अशोकाचे फ्रोझन 'काला चना' आहे का बघ. तेच घोडेवाले हरभरे.
शँकी, सोलाणे नाही मिळाले तर नक्की घालून बघेन हरभरे.

आज करून पाहिली गोडा मसाला घालून .. छान झाली होती .. Happy

(फोटो काढणं काही झालं नाही .. पुढच्या वेळी आठवणीने काढेन .. पण रस्सा मिळून आला, वांगी शिजली आणि चवही छान होती म्हणजे मी (माझ्याच :p) परिक्षेत पास!)

लेकासाठी फार तिखट, मसालेदार केली नव्हती मुद्दाम .. तर माझं मत असं की फार मसालेदार नको असेल तर आलं लसूण वगळून थोडा गूळ हवा (हे म्हणजे अगदी टिपीकल ब्राह्मणी पद्धत झाली पण आदत से मजबूर!) ..

पण आहे तशा रेसिपीने करायची असेल तर चांगली मसालेदार आणि तिखट हवी .. थंडी पळून जाईल अशी आणि भाकरी बरोबर छान लागेल अशी .. गूळ वगैरे अजिबात नको आणि गोडा मसालाही नको! Happy

सशल
हरभर्‍याच्या शेंगा पहिल्यांदा इकडे बघितल्या तेव्हा खुप मस्त वाटलं होतं .. >>>> Lol Lol
हरभर्‍याच्या- "शेंगा" नसतात, त्यांना मराठी जनता "हरभर्‍याचे घाटे" असं म्हणते !

कालच ही भाजी केली होती. एक्दम यम झालेली !! जरा जास्तच केली. दुसर्‍या दिवशी मसाला मुरल्यावर आणखी छान लागत होती. एकदिवस भाताबरोबर आणि १ दिवस पोळीबरोबर ओरपली!! धन्स रेसीपीबद्दल!!!

आज सोलाणे आणि छोटी वांगी मिळालित. बाकीचे सामानही आहे घरी. आज दूपारी किंवा रात्रीसाठी ही भाजी नक्की. Happy खूप दिवसांपासून सोलाणे मिळायची वाट बघत होते.

IMG_2165.JPG
हा आज केलेल्या भाजीचा फोटो. आज फक्त बाजरीच्या भाकर्‍यांची कमी आहे. बाकी ठेचा, पुलाव वैगरे आहे भाजीच्या सोबतीला. Happy

Pages