सोलाणे घालून वांग्याची रस्साभाजी

Submitted by तृप्ती आवटी on 22 November, 2010 - 13:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ लहान वांगी, १ मध्यम आकाराचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, १ वाटी सोलाणे.

१ चमचा धणे पावडर, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, १ डाव तेल, मीठ, फोडणीसाठी हळद-हिंग-मोहरी.

वाटणः ३-४ लाल मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे स्पू तीळ, २ टे स्पू सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती: 

तीळ, खोबरं कोरडच भाजून वाटणासाठी दिलेले इतर जिन्नस वापरुन कोरडेच वाटून घ्यावे. तिळातल्या तेलाने घट्ट गोळा तयार होतो.

कांदा, कोथिंबीर बाssssरीक चिरून घ्यावे. हरभर्‍याचे ताजे घाटे सोलून एक वाटी सोलाणे काढावेत. वांगी धुवून स्वच्छ पुसून नाकं काढून चार खाचा द्याव्यात. पसरट बुडाच्या कढईत तेल गरम करुन वांगी तळून (शॅलो फ्राय) घ्यावीत. त्याच तेलात हळ्द-हिंग-मोहरीची फोडणी करुन तेलात आधी तिखट घालावे आणि मग कांदा परतायला घालावा. कांदा नीट परतला गेला की त्यातच अर्धी कोथिंबीर, वाटण, धणे पावडर, काळा मसाला पण घालावा. छान खरपूस वास सुटेपर्यंत सगळे एकत्र परतावे. मग सोलाणे आणि वांगी घालून मसाला एकसारखा लागेल असे हलवून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ काढावी. आता दाटसर रस्सा होइल इतपत कढत पाणी घालावे आणि उकळी काढावी. वरुन उरलेली कोथिंबीर घालावी. वांगी फार गाळ होउ देऊ नयेत.

बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा हा रस्सा अप्रतीम लागतो.

vaangee.JPG

वाढणी/प्रमाण: 
दोन जणं
अधिक टिपा: 

_शक्य असल्यास कांदा, खोबर्‍याच्या वाटीचा तुकडा हे चुलीत अथवा गॅसवर भाजून घ्यावे. तसे केल्यास कांदा परतायची गरज नाही.
_वाटी लहान असल्यास दीड ते दोन वाटी सोलाणे घ्यावेत.
_खोबरे न घालता तीळ एखाद चमचा जास्त घेतले तरी छान लागते.
_तीळ अजिबात न घालता नुसते खोबरे घातले तर ह्याच रश्शात वांगी आणि सोलाणे न घालता उकडलेली अंडी घालून एग करी होते.
_काळा मसाला नसल्यास गरम मसाला, द ते म, गोडा मसाला घाला. (चव तशी येत नाही पण आता नाहीच्चे म्हंटल्यावर काय करणार :फिदी:)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त... या पाकृसाठी सिंडे, आपण भेटू तेव्हा तुला स्पेशल बक्षीस देण्यात येईल. सह्ही लागते भाजी. तो मसाला परततानाच इतका मस्त वास सुटतो ना! खूप खूप धन्यवाद तुला. Happy

ही मी काल दुसर्‍यांदा केली भाजी. आलं घातलं नाही आणी कांदा-लसूण मसाला घातला थोडा शिवाय पंढरपुरी डाळं पण ढकललं थोडं वाटणात.
सगळ्यांना खूप आवडली. हमखास हिट्ट रेसिपी आहे ही.
पुन्हा एकदा धन्यवाद!

यम्मी यम्मी झाली ही भाजी. मी एकेक स्टेप वाचत केली, अतिशय व्यवस्थित कृती व पर्फेकट प्रमाण दिलेलं आहे. धन्यवाद!!!
रश्मी, धागा वर आणल्याबद्दल तुलाही धन्यवाद.

फर्मास झाली होती भाजी , वान्गी आणी सोलाणे जरा जास्तच मोठे होते आकारमानाला आणि तिळ नव्हते पुरेसे मग काय जे चमचा २ चम्चा होते ते टाकले , इन्स्टट पॉट मधे केली १५ मिनिट प्रेशर वर , वान्गी आधी परतल्याने कमी वेळ लागेल हे लक्षात नाही आले १० मिनिट पुरली असती , वान्गी थोडि गळालीच.
066A6E5B-66D0-4AEB-8308-F4705BA91A74.jpeg
(शब्दखुणा मधे वान्गी,सोलाणे अ‍ॅड कर , सापडत नव्हती रेसिपी आधी)

Pages