टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हापासुन टेनिस बघणे चालु केले त्या काळापासुनचे माझे आवडते..
१० पुरुष टेनिसपटु...

१: बोरिस बेकर
२: स्टिफान एडबर्ग
३: पिट सॅन्प्रास
४: रॉजर फेडरर
५: आंद्रे आगासी
६: राफिएल नादाल
७: गोरान इव्होनेव्हिक
८: पॅट्रीक राफ्टर

५ महिला टेनिसपटु....
१: स्टेफी ग्राफ
२: मार्टिना नवरातिलोव्हा
३: जस्टीन हेनिन
४: मारिया शारापोव्हा
५: सेरेना विलियम्स

माझीही कारणे पुढच्या पोस्ट्मधे... Happy

काल स्टेफी ला सेंटर कोर्ट वर प्रदर्शनीय सामन्यात जोशपुर्ण खेळताना पाहुन खुप आनंद झाला.. तिचा फोरहँड अजुनही मस्तच Happy नि बॅकहॅन्ड मात्र अजुनही तसाच विक वाटला.. काहीही असो.. तिला मैदानावर हसत हसत खेळताना बघायला मिळाले तीच खरी मजा.. Happy

योगी,कोणाबरोबर होता स्टेफीचा प्रदर्शनीय सामना ?

सालाबादपणे याही वर्षी मे महिना उजाडला व मला पॅरिसला जाण्याची स्वप्ने पडु लागली आहेत... हे जग सोडुन जाण्यापुर्वी पुरी व्हावीत अशी माझी काही माफक स्वप्ने आहेत... उदाहरणार्थ...एखादे तरी ऑलिंपिक्स याची देही याची डोळा पाहावे(हे स्वप्न मात्र अ‍ॅट्लांटा ऑलिंपिक्सला पुर्ण झाले अहे!),तसेच विंबल्डनला जाउन एकतरी विंबल्डन फायनल पाहता यावी.. झालच तर लंडनला जाउन लॉर्‍ड्स वर जाउन टेस्ट मॅच बघावी.. आणी ऑगस्टा.. जॉर्जिया ला एकदा तरी फायनल राउंडमधे.. अझेलिया व र्‍होडेडेंड्रॉन फुलांच्या पार्श्वभुमीवर... टायगर वुड्सला गॉल्फची.. मास्टर्स टुर्नामेंट जिंकताना पाहायला मिळावी...इत्यादी इत्यादी.. हे पॅरीसला जाण्याचे स्वप्नही त्यातलेच एक! कशासाठी? तर रोलँड गॅरसच्या तांबड्या मातीवर फ्रेंच ओपन फायनल बघायला मिळावी म्हणुन!...तसे जरी मी तिथे प्रत्यक्ष गेलो नसलो तरी..१९७४ च्या ख्रिस एव्हर्ट -ओल्गा मॉरिझोव्हा मधील फायनल्स पासुन ते गतवर्षिच्या रॅफिएल नादाल्-रॉजर फेडररच्या फायनल पर्यंतच्या असंख्य लढती टिव्हिसमोर बसुन पाहताना मी रोलँड गॅरसशी एकरुप होउन गेलेलो आहे. त्या तांबड्या मातीशी व त्या सर्व खेळाडुंशी माझे घनिष्ट नाते आहे असेच मला वाटते...तसे वाटण्याचे कारणही माझ्याजवळ आहे... कारण त्या सगळ्या लढती बघत असताना मी ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा,अरांचा सँकेज व्हिकारिओ,मॉनिका सेलेस्,स्टेफी ग्राफ,जस्टिन हेनन व झालच तर आपले बिऑर्न बोर्ग साहेब्,इव्हान लेंडल्,खुद्द जॉन मॅकेन्रो,मॅट्स विलँडर्,बोरिस बेकर,सर्जे ब्रुगेरा,गुस्टॉव्ह क्युरेटन्,रॅफिएल नादाल व नन अदर दॅन.. रॉजर फेडरर.. या सर्वांना.. .. न मागीतलेले.. मनातल्या मनात... कसे जिंकावे किंवा कसे हरु नये ... याबाबत फुकटचे सल्ले दिलेले आहेत!

तसे मला सगळेच खेळ प्रिय आहेत पण क्रिकेट,स्विमिंग व टेनिस हे माझे सगळ्यात आवडते खेळ.. मुंबईत जन्म झालेला असल्यामुळे व लहानपण सुनिल गावस्करच्या कारकिर्द्रित गेले असल्यामुळे क्रिकेटचे वेड अंगात भिनले नसते तरच नवल... पण टेनिस? माझ्या लहानपणी मुंबईत(एकंदरीत सर्व भारतातच) टेनिस तसे फारसे खेळले जात नसे. पण लहानपणचे कित्येक रविवार शिवाजी पार्कवर टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यात घालवले असल्यामुळे नाही म्हटले तरी शिवाजी पार्क जिमखान्यावर असलेल्या ४ टेनीस कोर्टवर.. उच्चभ्रु घरातल्या माणसांना व मुलांना.. पांढर्‍या शुभ्र अर्ध्या विजारी व टि शर्ट घालुन.. हातात टेनिसची रॅकेट घेउन खेळताना.. अलबत कोर्टला चारी बाजुने लावलेल्या झावळ्यांच्या मागुन लपुन लपुन... पाहीलेले मला आठवते. तसेच रेडिओवर प्रेमजित लाल, जयदिप मुखर्जी, विजय अमृतराज व आनंद अमृतराज यांच्या डेव्हिसकपच्या जॉन न्युकोंब व केन रोझवॉल सारख्या ऑस्ट्रेलियन टेनिसपटुंबरोबर होत असलेल्या सामन्यांचे धावते समालोचन सुद्धा ऐकलेले आठवते. त्या कुतुहलाचे मग ख्रिस एव्हर्ट्,जिमी कॉनर्स्,बोर्ग व मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या टेनिसच्या जागतिक रंगमंचावरच्या आगमनाने प्रेमात कधी रुपांतर झाले ते मला कळलेच नाही..त्याच दरम्यान माझा मोठा भाउ १९७२ मधे अमेरिकेत गेला व तिथुन तो मला १९७३-७४ पासुन नियमित टेनिस व ऑलिंपिक्सच्या व्हिडिओ टेप्स पाठवु लागला.. मला वाटते व्हिडिओवर पाहिलेल्या त्या पहिल्या वहिल्या टेनिस मॅचेस सुद्धा मी टेनिसच्या प्रेमात पडण्यास जरुर कारणीभुत असाव्यात्.खासकरुन मला आठवते.. १९७४ मधली विंबल्डन फायनल..त्यात नव्या दमाच्या तरुण जिमी कॉनर्सने.. कुठलीही दयामाया न दाखवता.. आपल्या फ्लँबॉयंट खेळाने.. पिकल्या केसांच्या केन रोझवॉलला हरवले..हरवले कसले? धुव्वा उडवला त्याने रोझवॉलचा... व त्याच वर्षी फ्रेंच ओपनमधे एका तरुण ब्लाँड मुलीने माझे हृदय काबीज केले व माझ्या टेनिसप्रेमावर तिने रितसर शिक्कामोर्तब केले...रशियाच्या ओल्गा मोरोझोव्होला त्या वर्षी फ्रेंच ओपन मधे (व त्याच वर्षी नंतर विंबल्डन फायनललासुद्धा तिलाच!) हरवणारी १८ वर्षाची ती मुलगी होती.. ख्रिस एव्हर्ट! हिच मुलगी पुढे जाउन.. माझ्या मते तरी क्ले कोर्टची व रोलँड गॅरसची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली...

तर मंडळी.. या वर्षीची रोलँड गॅरसवरची फ्रेंच ओपन स्पर्धा पुढच्या सोमवारी सुरु होत आहे. त्यानिमित्त हे लेखनपुष्प ख्रिस एव्हर्टच्या चरणी...

टेनिसच्या इतिहासात महिलांमधे जी नावे अजरामर झाली आहेत त्यात अग्रगण्य नाव घेण्याचा मान मी ख्रिस एव्हर्ट हिलाच देइन. मला माहीत आहे की कुठल्याही खेळात लेजेंडरी खेळाडुंमधे अग्रगण्य नाव कोणाचे घ्यायचे यात दुमत असु शकते. आता हेच पाहाना.. क्रिकेटमधे कोणाला ब्रॅडमनचा धावांचा पाउस
पाडायचे कौशल्य भाउन जाते तर कोणाला गार्फिल्ड सोबर्सचा अष्टपैलु खेळ आवडुन जातो तर अजुन कोणाला विव्ह रिचर्ड्सचा घणाघाती झंझावात मोहीत करतो तर कोणाला तेंडुलकर्-गावस्करची विक्रमी कारकिर्द्र तोंडात बोटे घालवणारी वाटते. टेनिसच्या बाबतीतही महिला खेळाडुंमधे कोणाला मार्टिना नवरातिलोव्हा,इव्हॉन गुलगाँग कॉलि ,बिली जिन किंग व विलिअम्स भगिनींचा वेगवान्,ताकदी व सर्व्ह अँड व्हॉलीचा खेळ आवडुन जातो तर कोणाच्या मते स्टेफी ग्राफचा सर्वांगीण खेळ तिला अग्रगण्य ठरवण्यास पुरेसा ठरतो.पण आज या लेखात ख्रिस एव्हर्टला मी तो मान का देत आहे याचा मी उहापोह करणार आहे.

वडिलांकडुन टेनिसचे जिन्स घेउनच ख्रिस एव्हर्ट जन्माला आली. तिचे वडिल एक उत्तम टेनिसपटु होते त्यामुळे लहानपणापासुनच तिला टेनिसचे बाळकडु मिळाले नसते तरच नवल होते. बघता बघता वडिलांच्या प्रशिक्षणाखाली तिने वयाच्या १५ व्या वर्षि प्रोफेशनल टेनिसपटु बनण्यापर्यंत मजल मारली व वयाच्या १७ व्या वर्षी १९७३ मधे तिने फ्रेंच ओपन व विंबल्डन फायनल्सस पर्यंत धडक मारली. त्या वर्षी त्या दोन्ही फायनल्समधे ती हरली .. पण कोणाकडुन? फ्रेंच ओपन मधे मार्गारेट कोर्टकडुन(जिने २४ ग्रँड स्लॅम सिंगल्स जिंकल्या आहेत) व विंबल्डनमधे बिलि जिन किंग कडुन...(जिने १२ ग्रँड स्लॅम्स जिंकल्या आहेत) . पण त्या वर्षी तिच्या या कामगिरीमुळे या चिमुरड्या मुलीने सगळ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतले.

पुढच्या वर्षी.. १९७४ मधे मात्र तिने फ्रेंच ओपन व विंबल्डन या दोन्ही स्पर्धा जिंकुन आपल्या दिर्घ व यशस्वी कारकिर्द्रीची तोफ डागली. तिच्या १७ वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्द्रित तिने करुन ठेवलेल्या सगळ्या विक्रमांची जंत्री जर इथे मी दिली तर ३ पानेही पुरायची नाहीत.. किंबहुना या लेखामागचा उद्देशही तो नाही. पण तिच्या खेळातल्या सातत्याची जाणिव व्हावी म्हणुन तिच्या कारकिर्द्रितली काही निवडक आकडेवारी इथे नमुद करणे मला क्रमप्राप्त वाटते. आपल्या कारकिर्द्रित ती जवळ जवळ १४५० सामने खेळली व त्यातले १३०० च्या वर सामने.. म्हणजे ९० टक्के.. ती जिंकली. हा जिंकण्याच्या टक्केवारीचा विक्रम.. पुरुष व महिला.. या दोघातही अजुन अबाधित आहे. तसेच तिने एकुण २९० स्पर्धांमधे भाग घेतला होता व त्यातल्या १५७ मधे ति विजयी ठरली .. म्हणजे कुठलिही स्पर्धा ती जिंकण्याची शक्यता ५०% असायची. त्याहीपेक्षा अमेझिंग म्हणजे २९० पैकी २२५ स्पर्धात् ती उपांत्य फेरीत पोहोचली होती.. सातत्य म्हणजे काय याचे ती मुर्तिमंत उदाहरण होती. ग्रँड स्लॅम स्पर्धेतले तिचे विक्रम तर तोंडात बोटे घालण्यासारखेच आहेत.. तिने भाग घेतलेल्या ४९ ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ४८ मधे ती कमीत कमी सेमि फायनल पर्यंत पोहोचली होती(फक्त १९८३ च्या विंबल्डनच्या क्वार्टर फायनलमधे फुड पॉइझनिंग झाल्यामुळे तिला सामना फोरफिट करावा लागला होता:() व ३४ मधे फायनल्समधे! त्यातल्या १८ ग्रँड स्लॅम फायनल्स तिने जिंकल्या व १६ मधे ती हरली. त्या हरलेल्या १६ पैकी १० ग्रँड फायनल्स ती एकट्या मार्टिना नवरातिलोव्हाकडुन हरली.. आणी क्ले कोर्टवरचा तिचा विक्रम ऐकाल तर चाटच व्हाल.. १९७३ पासुन १९८१ पर्यंतच्या ९ वर्षात ती क्ले कोर्टवर फक्त एकदाच हरली.. त्या दरम्यान तिचा क्ले कोर्टवरचा रेकॉर्ड होता...१९७-१! आता बोला..!

पण या आकडेवारीपेक्षा मला तिच्या खेळातली नजाकत व तिचे ते धिरोदात्त टेंपरमेंट खुप आवडायचे. फक्त ५ फुट ६ इंच व ५७ किलो वजन असलेल्या या नाजुक मुलीने मार्टिना नवरातिलोव्हा,इव्हॉन गुलगाँग व बिली जिन किंग सारख्या तगड्या व पॉवरफुल प्लेयर्सशी मुकाबला करता यावा म्हणुन डबल हँडेड बॅक हँडचा शॉट पर्फेक्ट केला होता. तसेच तिच्याइतके हलक्या हाताचे व अचुक ड्रॉप शॉट्स मी अजुन परत पाहीले नाहीत. विंबल्डन व खासकरुन फ्रेंच ओपन स्पर्धेत तिने तश्या ड्रॉप शॉट्सचा सढळ हस्ते उपयोग करुन मार्टिनाला व इतरांना.. नेट ते बेसलाइन व परत नेट.. असे मागेपुढे नाचवलेले... मी असंख्य वेळा पाहिले आहे.

तिच्या त्या अमेझिंग कारकिद्रित तिने बहुतेक सगळ्यांना पराभवाची धुळ चाखवली. फक्त इव्हॉन गुलगाँग व मार्टिना नवरातिलोव्हा.. या दोघींनीच काय ती तिला बर्‍यापैकी टक्कर दिली. एक मार्टिना सोडली तर बाकी सगळ्यांबरोबर तिचे विनिंग रेकॉर्ड आहे. तिच्यात व इव्हॉन गुलगाँग मधे विंबल्डन व यु एस ओपन मधे..मिड ७० मधे झालेल्या चुरशीच्या लढती माझ्याच काय पण असंख्य टेनिसप्रेमिंच्या कायमच्या लक्षात राहिल्या आहेत... पण ख्रिस एव्हर्ट बद्दल लिहीताना.. तिच्यात व मार्टिनामधे झालेल्या असंख्य लढतींबद्दल व त्यांच्यातल्या रायव्हलरीबद्दल लिहीले नाही तर ते रास्त होणार नाही... इट वॉज सिंपली अ प्लेजर्,हॉनर अँड फॅसिनेटिंग टु वॉच दिज टु लेजेंडरी टेनिस प्लेयर्स.. विथ टोटली काँट्रास्टिंग यट इक्वली कंपेलिंग स्टाइल्स... गोइंग अ‍ॅट इच अदर! या दोघी तब्बल १४ ग्रँड स्लॅम फायनल्समधे एकमेकांविरुद्धा खेळल्या. त्या प्रत्येक फायनल सामन्यांबद्दल एक एक स्वतंत्र पोस्ट होउ शकेल अश्या त्या अविस्मरणिय लढती होत्या...

तर मंडळी.. या वर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या निमित्ताने.. व ख्रिस एव्हर्टला आदरांजली म्हणुनही...या दोन लेजेंडरी टेनिसपटुंमधे झालेल्या.. रोलँड गॅरसवरच्या.. तश्याच एका अविस्मरणिय अंतिम सामन्याच्या रजत जयंतिप्रित्यर्थ.. त्या अंतिम सामन्याबद्दल मी तुम्हाला माझ्या पुढच्या पोस्टमधे सांगणार आहे.. स्टे ट्युन्ड!

वॉव.. जबरी मुकूंद !!!!!!!!!
आता हे होऊन जाऊ दे.. .आमची कारणं-बिरणं नंतर बघू.. Happy
लवकर येऊ द्या.. !

मुकुंद,सहीच.. लवकर टाका पुढ्चा भाग.. वाट पहातोय..

मुकुंद.. मस्तच.. ! वाट बघतोय !

मयुरेश.. अरे किम क्लिजर्ट्स (वय = २५ वर्षे ) बरोबर होता सामना.. फक्त एक सेटच खेळवला होता.. पण त्यातही स्टेफीने चमक दाखवली.. पहिल्या दोन गेममध्येच आघाडी घेतली पण नंतर वयाची मर्यादा आडवी आली.. Happy पण तिने नेहमीप्रमाणे आपल्या बहारदार खेळाने सगळ्यांची मने जिंकली ! या सामन्याबरोबरच आंद्रे आगासी वि. टिम हेनमन यांचाही सामना होता (तो नाहि मिळाला पहायला).. स्टेफी नि आंद्रे मिश्र दुहेरी सामना पण खेळले म्हणे (तो पण मी मिस केला) :(.. या सामन्यांचे निमित्त हे सेंटर कोर्ट चे नुतनिकरण होते.. (अधिक माहिती कळु शकली नाही..)

विंबल्डन च्या सेंटर कोर्ट ला सरकत छप्पर बसवलं त्या निमित्त प्रदर्शनीय सामने होते... एकेरी पण होते हे माहित नाही... मिश्र दुहेरीत आगासी दांपत्य वि. टिम हेन्मन आणि किम हा सामन होता हे माहित होतं...

मयुरेश.. अरे किम क्लिजर्ट्स (वय = २५ वर्षे ) बरोबर होता सामना.. फक्त एक सेटच खेळवला होता.. पण त्यातही स्टेफीने चमक दाखवली.. पहिल्या दोन गेममध्येच आघाडी घेतली पण नंतर वयाची मर्यादा आडवी आली.. >>>>>> Lol अहो प्रदर्शनीय सामना होता नका एव्हडे हळहळू.. Happy

यो,आदमा.. मिश्र दुहेरीत स्टेफी आणि आंद्रे ७-६ ने किम आणि हेन्मन यांच्याकडुन हरले.. अधिक सविस्तर बातमी अशी आहे की स्टेफी आणि आगासी यांनी खेळण्याचा आनंद लुट्ला.. ते खेळताना हसत होते आणि अधुन मधुन एकमेकांना आलिंगन देत होते :).. सामन्यानंतर आगासी म्हणाला की सेंटर कोर्टवर खेळताना मी पहिल्यांदाच इतका हसलो असेन. आम्ही फक्त खेळण्याचा भरपुर आनंद लुटला.. Happy

मया.. पेपर मधली बातमी जशी च्या तशी "छापू" नको इथे.. Happy

नाही कै, जशीच्या तशी नाही छापलिये. अ‍ॅडमा, परत एकदा वाच बातमी Wink

ती मॅच इथे बघता येइल.

मला आवडणारे टेनिस खेळाडू. (कारणे वेगवेगळी, पण लिहायची गरजच नाही. तुम्हाला कळतीलच :))
१. रॉजर
२. पीट
३. विजय
४. रामनाथन क्रूष्णन
५, लिअ‍ॅडर व महेश (एकत्र)

१.सानिया
२.अ‍ॅना Happy
३.मारीया Happy

मुकुंदराव,
तुमचा ख्रिस एव्हर्ट वरचा लेख आवडला. छान.

फ्रेंच ओपन सुरू झाली आणि एक ही पोस्ट नाही इथे?????
कालची राफा ची मॅच थोडीशी पाहिली.. मस्त झाली एकदम.. Happy

सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती फ्लॉप बार्टोली हरली.. ! नाहितरी उगिच सिडेड प्लेयर्स ना हरवून स्वत: पुढच्या राऊंड मधे हरते.. !

नाहितरी उगिच सिडेड प्लेयर्स ना हरवून स्वत: पुढच्या राऊंड मधे हरते.. !
>>>
अगदी अगदी...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

काल साफीन आणि क्वाना यान्ची ५ सेटर चान्गली झाली.
व्हीनस सॅफेरोवा कडुन हारणारच होती काल, मॅच मध्येच थाम्बवल्याचा फायदा झाला तिला.

कालची त्सोंगाची मॅच पण मस्त झाली.. त्सोंगाची थोडी दमणूक झाल्यासारखी वाटली.. आणि फेडेक्सला पण बर्‍यापैकी दम लागला. ४ सेट म्हणजे.. त्यात तिसरा सेट टायब्रेक.. नशीब जोरावर होते त्याचे..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

फ्रेंच ओपनमधला यावर्षीचा मेजर अपसेट.. गेली चार वर्षे सतत ही स्पर्धा जिंकणारा राफेल नदाल स्वीडनच्या रॉबिन सोडर्लिंगकडुन चार सेटमध्ये पराभूत.. आज एकुणच राफाचा खेळ आणि त्याची शरीरभाषा त्याच्या नेहमीच्या खेळाला साजेशी नव्हती... अर्थात सोडर्लिंग मस्तच खेळला...
जाँकोविच तिसर्‍या फेरीतच गारद झालाय.. इव्हानोविच पण हरली चौथ्या फेरीत.. आता उद्या फेडेक्स कसा खेळतो ते पहायचे...

हरला का नदाल... वाटलंच... कालच कुठेतरी वाचलं की तो खूप थकल्यासारखा वाटतोय, यावर्षी खूप क्ले कोर्ट स्पर्धा खेळलाय वगैरे..

जाँकोविच तिसर्‍या फेरीतच गारद झालाय >>
मयुरेश, तो जोकोविच आहे... जॅंकोविच ही महिला टेनिसपटू आहे... Happy

मरे, फेडरर, त्सोंगा आणि गोंझालेझ हे बरे खेळाडू उरले आहेत आता... त्यात मरे आणि गोंझालेझ पैकी कोणीतरी बाहेर होणार पुढच्या फेरीत..

मयुरेश, तो जोकोविच आहे... >> सचिन, टायपिंग मिश्टेक यार.. भावना समजुन घ्या Happy

उपांत्यपूर्व फेरीच्या पुरुषांच्या दोन जोड्या ठरल्या आहेत पहिली सोडर्लिंग आणि डेवियांको , दुसरी
मरे आणि गोंझालेझ... यातील विजेत्यांमध्येच उपांत्य फेरीतील दोन लढतींपैकी एक होईल...

उद्या फेडेक्सला टॉमी हास प्रतिस्पर्धी आहे चौथ्या फेरीत... अँडी रॉडिक आणि मॉनफिल्स मध्ये सामना आहे.. या दोन सामन्यातील विजेते उपांत्यपूर्व फेरीतील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील.. शिवाय उद्या जुआन मार्टिन डेल पोट्रो आणि त्सोंगा यांच्यात चौथ्या फेरीतील लढत आहे .ती पण चांगली होईल अशी अपेक्षा आहे..

या वर्षी फेडररचा करीयर ग्रँड स्लॅम व्हायला चांगली संधी आहे. फ्रेंच जिंकून .
बोर्ग् चाही झाला नव्हता. आगासीचा झाला होता का आठवत नाही. त्याचा नसेल तर मग एकदम रॉड लेवर पर्यंत मागे जावे लागेल. पण त्याने चार वेळेला केला होता. दोनदा हौशी तर दोनदा व्यावसायीक म्हणून.
विक्रम

विक्रम,आगासीचा करीयर ग्रँड स्लॅम झालाय... रॉड लिव्हरनंतर तोच एकमेव पुरुष खेळाडु आहे ज्याने आपल्या करियरमध्ये चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत.. त्याने ऑलिंपिकचेही विजेतेपेद मिळवले आहे .. थोडक्यात त्याचं करियर गोल्डन ग्रँड स्लॅम झालय असं म्हणायला हरकत नाही.. Happy

बोर्गला हार्ड कोर्टवर विजेतेपद मिळवता आले नाही कधी.. तो फक्त फ्रेंच आणि विंबल्डनमध्येच जिंकलाय..

दुखवटा... दुखवटा.. :(:(... >>>आदमा,मी तुझ्या दु:खात सहभागी आहे हो Happy

खरा गोल्डन ग्रँड स्लॅम स्टेफीचा. १९८८ मध्ये चारही ग्रँड स्लॅम शिवाय ऑलिंपिक.
सॅम्प्रास आणि लेंडल पण अनेक वेळा थोड्क्यात करीयर ग्रँड स्लॅम पासून दूर राहिले. सॅम्प्रास फ्रेंच हरायचा आणि लेंडल विंबल्डन.

तो सोडर्लिंग जबरदस्त खेळतोय.. काल डेव्हियांकोला किरकोळीत हरवला त्याने.. काल मरेही हरला गोंझालेझ कडुन आणि शारापोव्हाही हरली.. साफिना जिकली खरी पण तीन सेटमध्ये..

आज फेडी आणि मॉनफिल्समध्ये सामना आहे उपांत्यपूर्व फेरीचा.. मॉनफिल्स चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.. चौथ्या फेरीत रॉडीकला सहज नमवलय त्याने.. फेडररला आज फार चुका करून चालणार नाही..

ओह मारिया... Sad Sad हीचा सामना जेव्हा जेव्हा मुकतो, तेव्हा तेव्हा ती पराभव स्विकारते.. Sad

फेडेक्स काय जादु करतोय ते बघायचेय.. खुप कठीण उद्दीष्ट आहे !!

हो मयुरेश, तो सोडर्लिंग एकदम सुटला आहे... मला वाटलं होतं की तो डॅविडेंको आरामात जिंकेल... हरला पण.
गोंझालेझ हा चांगला खेळाडू आहे. तो ताकदवान फोरहँडसाठी फेमस आहे. फेडररला तो नक्की त्रास देऊ शकतो. हा मॉन्फिल्स एकदम चित्रविचित्र हावभाव करत असतो कोर्टवर.. Happy

रॉडिक आणि सामन्याचा पंच यांच्यात झालेली 'बाचाबाची' बघितली का? Proud

डेल पोट्रो -फेडरर ही मस्त होणार मॅच, पोट्रो सुद्धा फॉर्म मध्ये आहे
सेरेना-कुझ्नेत्झोवा मस्त झाली एकदम,
मोन्फ्लिस ने अपेक्षाभन्गच केला, एकही सेट नाही घेतला म्हणजे काय??
गोन्झालेस ने एकदा हरवले आहे फेडीला, बघुया कोण येते पुढच्या फेरीत..

चला दोन चांगल्या उपांत्य लढती बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे पुरुष गटात...
पहिली सोडर्लिंग आणि गोंझालेझ , दुसरी फेडरर आणि डेलपोट्रो...

फेडीचे या तिघांविरुध्दही मागचे रेकॉर्ड चांगले आहे.. डेलपोट्रोबरोबर ५-०,सोडर्लिंग बरोबर ९-० आणि गोंझालेझबरोबर १२-१.. तेव्हा फेडीला मस्त संधी आहे टायटल जिंकण्याची... तो त्याच्या पूर्ण आत्मविश्वासाने उरलेले सामने खेळेल आणि पहिलेवाहिले फ्रेंच ओपन जिंकुन सँप्रासच्या १४ ग्रँड स्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करेल ही एक फेडरर चाहता म्हणुन अपेक्षा Happy

Pages