उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

Submitted by HH on 8 September, 2010 - 19:10

उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
1.JPG

२. या गोळ्याची वाटी बनवा.
2.JPG

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
3.JPG

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
4.JPG

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
5.JPG

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
6.JPG

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
7-a.JPG7-b.JPG

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
8-a.JPG8-b.jpg

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------

टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर मोदक. हि प्रक्रिया कितीही वर्णन केली तरी प्रत्यक्ष बघितल्याशिवय जमणे शक्य नाही. ते काम इथे झालेय.

१६ पाकळ्या ??? हवे अशक्य आहेस तू. खरच तुझ्या पायांचा फोटो टाक, आम्ही इथुनच नमस्कार करतो. कसले देखणे मोदक वळलेस. माझ्या जेमतेम ५-६ येतात. जरा घाबरतच फोटो टाकत्ये. मागच्या वर्षीचं नैवेद्याचं ताट.
DSC00456.JPG

अगागागा ! काय त्या पाकळ्या!
मोत्याचा कंठा बक्षीस द्याव्या इतक्या सुबक.

आईSSSS शपथ!! जर स्टेप्स टाकल्या नसत्या ना तर मला यंत्रातून काढलेत असं वाटलं असतं... इतके सारखे झालेत..

अमेझिंग... विशेषतः मागच्या वेळेला स्वतःचे स्वतः मोदक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वरच्या मोदकांच्या मागचं स्किल जास्त कळतय Proud

खरच मस्त!

वाव !!!!!!!!!!!!! कित्ती छान्.....माझ्या साबा पण अगदी अश्याच बनवतात.
मला पण नाही येत १६ पाकळ्या Sad
अगदिच ८-९ होत असतील..

कसले सुबक , देखणे मोदक बाई.
अस्सा मोदक सुरेख बाई तबकी ठेवावा. (या बीबी वर मोदक मोदक म्हणून ज्याचा उल्लेख केलाय त्याचं इथे मोदक आयडीशी काही देणं घेणं नाही. Wink )

मोदक कोरडे वाटतायत. पिठ लाउन सोप जातं का वळायला. मी नेहेमी पाणी आणि तेल ह्यांचाच वापर करते मोदक वळताना >>> मी पण.

मला मोदकाची पारी कधीच नीट जमत नाही. अगदी गाठोडी वळल्यासारखे दिसतात मी बनवलेले मोदक. Sad
अगदी मोदकाचा साचा वापरूनही पाहिला. तरी नीट जमेलच याची गॅरंटी नाही. असो.

गुळ खोबरे एकत्र करून गॅसवर ठेवायचे. मधून मधून हलवायचे. >>>
गूळ आणि खोबर्‍याचे प्रमाणही लिहा ना. म्हणजे जितके खोबरे तितकाच गूळ कि अजून नाही?? Uhoh

१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे. >> हे काय दिलंय की वरच. >>>>

ओह ओ. Uhoh
मी मोदकांच्या फोटोलाच इतकी भुलून गेले की प्रमाण पाहिलंच नाही हेड पोस्ट मध्ये. धन्स गं, आशूडी Happy

मस्त माहिती. या वर्षी पहिल्यांदाच मी मोदक करणार आहे गणपतीत, त्यामुळे हे फोटो अगदी कामी येतील.....

हह म्हणाली म्हणुन मी आपली टाकते. हे गेल्या वर्षीचे गणपतीतले मोदक. तुझ्या सारख्या पाकळ्या कधी जमतील देव जाणे. ह्यावेळी तुझ्या स्टाइलने पिठ लाउन जरा मोठा मोदक ट्राय करेन. Happy

modak_0.jpg

प्रचंड सुबक आणि निगुतीचे मोदक हह!!!! इतकी व्यवस्थीत, पायरीपायरीने आणि सचित्र माहिती टाकल्याबद्दल आभार!

सोळा कळ्या करायला कौशल्याबरोबरच किती नाजुक बोटं हवीत. Proud

>>सोळा कळ्या करायला कौशल्याबरोबरच किती नाजुक बोटं हवीत
सोळा नाही लागणार. Proud

सुंदर, नेटके आहेत मोदक. धन्यवाद हवाहवाई!

मी कध्धीच केलेले नाहीयेत, फोटो आणि टीपा वाचून नक्कीच प्रयत्न करायचा उत्साह आलाय.
(मी सध्यापुरते ५ पाकळ्यांचे ध्येय ठेवतेय Proud )

१६ पाकळ्या... सही आहे HH
माझी आई गुळा ऐवजी साखरेची चव (आतील सारण) बनवते. त्यामुळे मोदक आतून गोल्डन-ऑरेजं च्या ऐवजी सिल्वर-व्हाईट बनतात.

मगाशी आईला ह्या फोटोंबद्दल सांगण्यासाठी फोन केला तर तिने एक टीप दिलीये. मोदक वाफवायला ठेवायच्या आधी गार पाण्यात बुडवून काढून मग जाळीवर ठेवायचे. त्याने वाफवताना मोदक फुटत नाहीत. Happy

राईट पन्ना. मोदक बनला की मी लगेच त्याला पाण्यात बुडवते आणि ताटलीत ठेवते. म्हणजे वाफवायला ठेवेपर्यंत तो कोरडा होत नाही.

हे फोटो बघून मला अगदी म्हणावंसं वाटतंय "ये हात मुझे दे दे हह" Proud

म्हणजे बाप्पाच्या खाऊला पण तुम्ही पाण्यात बुडवता होय.

Pages