स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

मृदुला, तुझ्या उत्तरात मांडलेले दोन्ही मुद्दे मला पटतात व मीही विटाळ इ. पाळत नाही. ही एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. जशी पुरुषांना दाढी उगवते तशी. जसा दाढीचा विटाळ नसतो, तसाच याचाही नसावा.
तसेच मी कुठलेही सौभाग्यचिन्ह सहसा वापरत नाही, कधी वापरले तर दागिना म्हणून वापरते. कुंकू भारतीय पोशाखावर मॅच होणारे वापरते. शिवाय कुठलीही स्त्री विवाहित, अविवाहित, विधवा आहे का, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे का याची उठाठेव करत नाही आणि सगळ्यांना सारखेच वागवते.

मुळात कुंकू/मंगळसूत्र ह्याला सौभाग्यचिन्हे का म्हणतात? नवरा जिवंत असल्याची ती रुढ प्रतीके आहेत.
मला हेच आक्षेपार्ह वाटते. नवरा असला तरच स्त्रीचे सौभाग्य का? वाईट नवरा असेल तर ते खरे तर दुर्भाग्यच. आणि नवरा मेला की बाईचे सौभाग्य संपते????? आपल्या स्वतःच्या कामगिरीवर स्त्री भाग्यवान होऊ शकत नाही का?

आणि लग्न झाले की सगळे नातेसंबंध सांभाळण्याची, सगळे घरकाम करायची (नोकरी करत असली/नसली तरी), मुलांना सांभाळण्याची इ. जबाबदारी फक्त बायकांनी उचलावी असाही रुढ संकेत आहे, जरी हे चित्र बदलत असले तरी. घर स्वच्छ नसले, तर फक्त बायकांनाच जबाबदार धरल्या जाते, नवर्‍याचा कोणी याबाबतीत विचारही करत नाही.
मी आणि माझा नवरा या सगळ्या जबाबदार्‍या दोघांच्याही आहेत असे समजतो. दोघांनी बोलून आणि विचार करून हे ठरवले आहे. आता त्यात ज्याला जे चांगले जमते तो ते करते अशी वाटणी आहे. उदा. मुलांबरोबर सॉकर तो खेळतो तर त्यांना चित्र काढायला मी शिकवते.
अगदी मैत्रिणीचे घर स्व्च्छ नसले तर तिला मी तुला तुझा नवरा मदत करत नाही वाटतं असं तिच्या नवर्‍यासमोरच हसत विचारते.

आणि अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे मंगळागौर, वटपौर्णिमा इ. यांचे उपास आणि अशीच व्रतवैकल्ये.
आणि ते करवा चौथ. मी करत नाही आणि लोकांनाही त्याची महती इ. सांगत नाही.

लग्न हे बायकांनीच टिकवायचे असते, तडजोड ही त्यांनीच करायची असते असेही मला मुळीच वाटत नाही. पुरुषांनाही चांगली बायको मिळणे हे तितकेच कठीण असते.

भाग्यश्री, चांगली पोस्ट.

आपल्या इथे जास्त करून खेड्यामध्ये पूर्वी (अजूनसुद्धा असेल बर्‍याच ठिकाणी) पाळीच्या वेळेस बायकांना बाजूला बसावे लागत असे. पूर्वी स्त्रियांना या ४ दिवसांत हक्काचा आराम मिळावा असे त्याचे कारण होते असे सांगतात. ठीक आहे असेलही. पण अजूनही या प्रथा चालू आहेत हे पटत नाही. आमच्या गावातही अजून बाजूला बसतात. त्यामुळे शक्यतो गावी जातच नाही किंवा जायची वेळ आली तर तारखा बघूनच जायचं किंवा गेलंच तर मग कोणाला बोलायचं नाही. देवळात जायची वेळ फारशी येतच नाही तसंच पूजा करण्याचीही, पण या दिवसांत देवाचं नाव नक्कीच घेते.

पाळी येणं हा स्त्रियांच्या आयुष्यातील खरंतर खूप मोठा भाग आहे. आयुष्यातील पुढच्या गोष्टी त्यावर अवलंबून असतात म्हणजे खरंतर चांगलीच गोष्ट आहे व हे सर्व परमेश्वरानेच निर्माण केलेलं असताना देवळात जायचं नाही किंवा पूजा करायची नाही हे असले न पटणारे निर्बंध कां?

मंगळसूत्र भारतात असताना घालते (घरच्या लोकांकरिता) पण इथे मात्र नाही घातलं जात. कुंकू आणि माझं पूर्वीपासून कधीच सख्य नव्हतं, त्यामुळे ते तर लावलं जातच नाही. जोडवी वगैरे घालणं दूर की बात है. पण भारतात अजुनही ह्या गोष्टी पटोत वा न पटोत घातल्या जातातच. कारण समाज काय म्हणेल? आता भारताबाहेर आहोत, त्यामुळे आपल्या नवर्‍यांचेही विचार बर्‍यापैकी बदलले आहेत. म्हणजे आपण कुंकू नाही लावलं किंवा मंगळसूत्र नाही घातलं तरी त्यांना चालतं. पण देशात मात्र ही परिस्थिती बदलायला बराच काळ जावा लागेल. कारण जी कोण हे करत नाही ती घरच्यांच्या/समाजाच्या गुडबुक्स मध्ये येत नाही, म्हणजे मग भांडणांना/वादावादीला आमंत्रण.

आणखी एक अपमानास्पद प्रथा
कुठल्याही मंगल कार्यात विधवेचा वावर प्रतिबंधित असतो.

सौभाग्यचिन्ह बीबी स्वातीने डिलिट नसता केला तर तिथल्याच पोस्ट इथे लागू झाल्या असत्या. आता तेच तेच परत लिहायचा आज तरी कंटाळा आलाय. तेव्हा उद्या.
जाता जाता पाळीच्या वेळेस बाजूला बसणं आवडत नाही. फारच जुनाट प्रथा झाली. मुंबईसारख्या शहरात वन बेडरुम फ्लॅटमध्ये जे लोकं हे सगळं पाळत असतील त्यांना कोपरापासून नमस्कार. सौभाग्यचिन्हांबद्दल मलातरी प्रेम नाही. इथेही नी आता भारतातही वापरलं जात नाही.

त्यात भरीस भर म्हणुन गोद भराई नावाची बिंडोक सिरियल सुरू झालिये, प्रोमोस आदळत असतात डोळ्यांवर Sad
मी स्वतः मंगळ्सुत्र सणासुदिलाच घालते, दागिना म्हणुन. कुंकू वगैरे तर गावाकडेही बाद झालय बर्यापैकी.
सासरकडिल कुणि म्हटलेच तर म्हणते, ज्याची त्याची चॉईस आहे. आपण आपले पहावे.
मांग भरणारी, घुंगट घेणारी किंबहुना बुरख्यात वावरणारी स्त्री ही अगदी पतिव्रता च असते हे कुणि सांगीतले? कोणतेही सौभाग्य लेणे अंगावर न मिरवणारी माझ्यासारखी स्त्री अगदी वायाच गेलेली आहे, स्वतःला कुमारिका दाखवायचा प्रयत्न करतिये वगैरे कॉमेंट करणार्यांकडे किवेच्या नजरेनी बघणे हे आणि असेच करावे असे मला तरी वाटते.
१ प्रसंग सांगते:
सासरकडिल व्यक्ती: अग जोडवे नाहि घालत?
मी: नाहि, ते टोचता, मला सवय पण नाहि.
व्यक्ती: मग काय झालं , टोचुं देत. सवय पाडुन घे.
मी: ते घालून न घालून मला काहिहि फरक पडत नाही, कसलाच फायदा नाहि, मला आवड पण नाहि, सो मी घालणारच नाहि. वर गोड स्मित Happy

दुरदर्शनवर एक मालिका पाहिली होती. त्यातील ती अविवाहीत नायिका रोज बाहेर पडताना मंगळसुत्र घालायची. शेवट असा होता की मंगळसुत्रामुळे तिला आपल्याला संरक्षण मिळते आहे असे वाटायचे. यावरुन मला विचारावेसे वाटते की लग्न झालेल्या स्त्रीकडे पुरुषांच्या वाईट नजरा वळल्या तरी ते पुरुष आटोक्यात राहतात का?

सौभाग्यचिन्ह बीबी स्वातीने डिलिट नसता केला तर तिथल्याच पोस्ट इथे लागू झाल्या असत्या. आता तेच तेच परत लिहायचा आज तरी कंटाळा आलाय. तेव्हा उद्या.<<
असा बीबी होता? कधी? कुठे?

मी लिहितेय ती प्रथा फक्त स्त्रियांशी निगडीत नसून तिच्या अख्ख्या घराशी आहे.
लग्नात वरपक्ष, वधुपक्षाकडून पाय धुऊन घेतो त्या प्रथेची मनोमन चिड आहे मला.... Angry
बाकी अगदी सौभाग्यचिन्हं वापरण्यासाठी काही ना काही तरी शास्त्रिय आधार आहेत असं मानून चालू, पण या पाय धुण्यात काय लॉजिक आहे कोणजाणे. Uhoh

नी, स्वाती_आंबोळेने ह्याच विषयावर चर्चा सुरु केली होती, ४-५ पोष्टी पडल्या व तिने तो डिलीट करायला सांगितला. कां? माहित नाही.

मला माहिती आहे तीने तो बीबी का उडवला.. कारण की हा विषय आजमितीस कालबाह्य झाला आहे.. त्याचे इतके महत्त्व उरले नाही. मग तो तसा बीबी चौकटछाप झाला असता. म्हणून उडवला.

जोवर बायकांना कितपत स्वातंत्र्य असावे, स्वातंत्र्य कुठले आणि स्वैराचार कुठला, बायकांनी कसे वागावे, कश्यात समाधान मानावे, बायकांची कर्तव्ये इत्यादी मुद्द्यांवर अधिकारवाणीने बोलणारे लोक अस्तित्वात आहेत. जोवर कुठलीही व्यक्ती ही आधी एक माणूस (human being) आहे आणि मग स्त्री वा पुरूष यापद्धतीने समाजमन घडत नाही. जोवर जिथे तिथे बाईची वैवाहिक स्थिती नमूद करणे गरजेचे ठरते (नावामागे सौ लावणे, आडनाव बदलणे/ न बदलणे, नवरा गेल्यानंतर श्रीमती लावणे, आडनाव न बदललेल्या बाईला लग्नाचा दाखला दाखवावा लागणे, आडनाव बदललं नसेल तर बाळंतपणाची रजा न मिळणे... इत्यादी) तोवर हे मुद्दे कालबाह्य होऊ शकत नाहीत असं आपलं मला वाटतं.

जोडवी वापरणं, न वापरणं ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबुन आहे. पण ज्या बोटांत जोडवी घालतात त्यांवर अ‍ॅक्युपंक्चरचे पॉईंट्स असतात. चांदीची जोडवी वापरल्याने ते पॉईंट्स सतत दाबले जाऊन कंबरेचा त्रास असेल तर फरक पडतो. तसंच प्रसुतीच्या काळातही जास्त त्रास होत नाही. ही मी शास्त्रीय कारणं सांगितली.

टिकली लावणं ह्याला ही तसंच कारण आहे. आपण मस्तकावर जिथे टिकली लावतो तिथे आपलं आज्ञाचक्र असतं. मंगळसुत्र वापरणं/ न वापरणं ही एक फॅशन झालीय. पण काही स्त्रिया अजुनही संरक्षणासाठी मंगळसुत्र वापरतात भारतात. मी कितीतरी उदाहरणं पाहीलीयत ज्यात विधवा नोकरदार स्त्रियाही मंगळसुत्र वापरतात. का तर मंगळसुत्र गळ्यात असेल तर पुरुषांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

ह्यांत वैयक्तिक असं काही नाहीय. जे माहीत होतं ते सांगण्याचा प्रयत्न. Happy

विवाहित स्त्रियांवरच्या बलात्कारांची, विवाहित स्त्रियांच्या विनयभंगाची आकडेवारी खूप मोठी आहे तेव्हा मंगळसूत्रामुळे संरक्षण मिळते हे एक मिथ म्हणायला हरकत नाही. जसे तोकडे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात हे एक मिथ आहे तसेच मंगळसूत्रामुळे समाजात वावरताना मिळणारे संरक्षण हे ही मिथच आहे.

योगमहे, जोडवी वापरण्याचं तु सांगितलेलं शास्त्रीय कारण सशक्त आहे. टिकली लावण्याचं मी ऐकलेलं शास्त्रीय कारण म्हणजे पुरूष म्हणे आकर्षित होतो तिथे पाहिलं की.. Uhoh मंगळसुत्र का वापरावं तर त्यात सोनं आणि काळे मणी असतात... सोन्यावरून पाणि ओघळून अंगावरून गेल्याने कांती सुधारते, सतेज बनते... पुन्हा पुरूषांसाठीच, आणि काळ्या मण्यांनी नजर लागत नाही. मग पुरूष का नाही घालत काही? त्यांची कांती सुधारू दे थोडी, बायकांना ही गरजा आणि आवडी असतातंच की..

सुमारे १५ वर्षांपूर्वी माझ्या वडीलांचे निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची सर्व संपत्ती आईला मिळेल अशी आमची कल्पना होती, पण त्यावेळी अम्हाला असे सांगण्यात आले की, पुरुषाच्या मृत्यूनंतर, संपती मुले व त्याची पत्नी यांना विभागून मिळते, मात्र, स्त्रीच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती मागे रहिलेल्या पतीच्या नावाने होते. त्यावेळी वाद नको म्हणून आम्ही तीनही भावंडांनी आम्हाला वडीलांच्या संपत्तीमध्ये रस नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले, पण मनात आईला तिच्या हक्काच्या गोष्टीसाठी मुलांवर अवलंबून रहायला लागल्याबद्दल बोच राहिली

जोडवी वापरणं, न वापरणं ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबुन आहे. पण ज्या बोटांत जोडवी घालतात त्यांवर अ‍ॅक्युपंक्चरचे पॉईंट्स असतात. चांदीची जोडवी वापरल्याने ते पॉईंट्स सतत दाबले जाऊन कंबरेचा त्रास असेल तर फरक पडतो. तसंच प्रसुतीच्या काळातही जास्त त्रास होत नाही. ही मी शास्त्रीय कारणं सांगितली.

<<< यालाच म्हणतात scientific भोंदुगिरी,बुवाबाजी !
ज्यांना फक्त स्त्री ने हे नियम पाळायला हवेत त्या समाजानी त्याचं justification करायला शोधलेली कारणं !!
पुरुषां पासून संरक्षण म्हणून मंगळसूत्र घालणे म्हणजे अजुन एक भेकडपणा.. याची तुलना मी स्वतीने दुपारी केलेल्या त्या बीबी वर गुंडांना घाबरतात म्हणून खंडणी देणार्‍या लोकांशी केली होती ,अता पुन्हा सविस्तर लिहायचा कंटाळा आलाय, उगीच डिलिट झाला तो बीबी!

विवाहित स्त्रियांवरच्या बलात्कारांची, विवाहित स्त्रियांच्या विनयभंगाची आकडेवारी खूप मोठी आहे तेव्हा मंगळसूत्रामुळे संरक्षण मिळते हे एक मिथ म्हणायला हरकत नाही. जसे तोकडे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात हे एक मिथ आहे तसेच मंगळसूत्रामुळे समाजात वावरताना मिळणारे संरक्षण हे ही मिथच आहे.
<< अगदी.. १०० % सहमत !

यालाच म्हणतात scientific भोंदुगिरी,
>>
मी जे म्हटलंय त्याला तो खोडुन काढु शकतेस का?? कधी तुला बॅकपेनचा त्रास होत असेल तर पायाच्या बोटांचे खालचे भाग दाबुन बघ. खुप दुखतील पण त्याच वेळेस तुला कंबरेला थोड्या प्रमाणात आराम मिळेल. हे मी स्वतः करुन पाहीलंय.

तर मंगळसुत्र गळ्यात असेल तर पुरुषांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.
--- पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन मंगळसुत्र आहे/ नाही वर अवलंबुन नसतो.

माझ्या बायकोच्या पायात चांदी जोडवी असुन देखील तिला प्रसुतीच्या वेळी प्रचंड त्रास झाला. त्यामुळे जोडवी वापरण्याचा आणि आरोग्याचा संबंध आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

जोडवी वापरणं किंवा कुंकू लावणं/मंगळसूत्र वापरणं ह्यांची असतील काही अशीच कारणं.

कंबरा काय फक्त बायकांच्याच दुखतात कां, पुरुषांच्या नाही दुखत? जोडवी वापरण्याचे जर एवढे फायदे आहेत तर मग ती त्यांनीही वापरायला हरकत नाही नां? लग्न स्त्री-पुरुष दोघांचंही होतं नां, मग सौभाग्यचिन्हं ही दोघांसाठीही असावीत.

माझ्या बायकोच्या पायात चांदी जोडवी असुन देखील तिला प्रसुतीच्या वेळी प्रचंड त्रास झाला.
>>
उदय प्रसुतीच्या वेळी त्रास कमी होतो हे मी ऐकलंय. त्याबद्दल मला काहीच बोलता येणार नाही, पण अ‍ॅक्युपंक्चरबद्दल मी सांगु शकते ते खरं आहे म्हणुन.

मात्र, स्त्रीच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती मागे रहिलेल्या पतीच्या नावाने होते. <<
हि चुकीची माहीती आहे.
माझी आई गेल्यावर तिच्या सगळ्या अ‍ॅसेटस बाबांच्या नावावर करून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मला माझी हरकत नाही असे अ‍ॅफिडेव्हिट, मामलेदारापुढे जाऊन शपथेवर हरकत नाही असे सांगणे, कोर्टात जाऊन शपथेवर हरकत नाही असे सांगणे हे सगळे करावे लागलेले आहे.
विल बनवलेले नसेल तर मृत व्यक्तीचा मागे राह्यलेला जोडीदार आणि अपत्ये ह्या सगळ्यांचाच समान अधिकार असतो. विल हे केवळ स्वकमाईच्या संपत्तीबद्दल करता येते. वडिलोपार्जित मिळकतीत मागे राह्यलेला जोडीदार आणि अपत्ये (की केवळ अपत्ये?) यांचा वाटा असतोच. विल करूनही वडिलोपार्जित मिळकतीतून कुणालाही बेदखल करता येत नाही.
अधिक स्पष्ट माहीती इथे कायद्याची माहीती असलेले लोक देतीलच.

जोडवी वापरणं, न वापरणं ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबुन आहे. पण ज्या बोटांत जोडवी घालतात त्यांवर अ‍ॅक्युपंक्चरचे पॉईंट्स असतात. चांदीची जोडवी वापरल्याने ते पॉईंट्स सतत दाबले जाऊन कंबरेचा त्रास असेल तर फरक पडतो. तसंच प्रसुतीच्या काळातही जास्त त्रास होत नाही. ही मी शास्त्रीय कारणं सांगितली.

१. पुरुषांना कंबर नसते का?
२. असली तर ती दुखत नाही का?
३. बायकोने पायाची बोटं दाबून दिली की त्यांना आपोआप अ‍ॅक्यूपंक्चर ट्रीटमेंट मिळते?
४. लग्नाच्या आधी मुलीना कंबर नसते का?
५. असली तर ती दुखत नाही का?
६. लग्नाआधी मुलींना कंबरेचे काही आजार होऊ शकत नाहीत का?

Happy

दक्षिणा, तुला अनुमोदन.

मी मंगळसूत्र घालते पण सगळ्याच ड्रेसवर नाही. आणि घातलं तरी ते एक दागिना म्हणून घालते. टिकली कधी असते कधी नसते. बांगडी फक्त धार्मिक कार्याच्या वेळी घालते.

एक गंमत आठवली लहानपणीची. आम्ही दुसरी तिसरीत होतो. एका मैत्रिणीची आजी गेली तेव्हा ती १३ दिवस खाली खेळायला येत नव्हती. पण तिचा भाऊ मात्र दररोज खेळायला यायचा. तो आमच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा.. एकदा आम्ही मैत्रिणींनी तिला शाळेत गाठून खेळायला न येण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, आजी गेलीये ना म्हणून बाबा खाली पाठवत नाहीत. आम्ही म्हटलं, अगं मग दादा येतो की खाली.. तर त्यावर तिचं उत्तर, बाबा म्हणाले, तो मुलगा आहे ना? मग तो घरात कसा राहील? त्याचं खेळायचं वयच आहे. Angry तेव्हापासून हे मुलगा मुलगी भेदभाव जाम डोक्यात जातो.

मी पण मंगळसुत्र / टिकली कधी घातलच नाही लग्नानन्तर. सासरचे "ही काय स्वःतला शहाणी समजते" अशा नजरेने बघतात, पण मी आणि नवरा लक्षच देत नाही.

एकदा कोकणातल्या गावी गेले होते काकाकडे, तिथे त्याचा मुलगा (वय वर्षे ६-७) सर्रास "आई / काकू बाजूला बसल्ये" अस बोलताना बघून खूप आश्चर्य वाटत होत. पण ती काकू दिवसभर इतक काम करायची की अस वाटल ४ दिवस तरी तिला चहा / जेवण हातात मिळत असेल.

धन्यवाद नीधप. कायदा सुद्धा स्त्री पुरुष समानता पाळत नाही अशी माझी खंत होती. खरी गोष्ट तशी नाही हे कळून बरे वाटले.

मी जे म्हटलंय त्याला तो खोडुन काढु शकतेस का?? कधी तुला बॅकपेनचा त्रास होत असेल तर पायाच्या बोटांचे खालचे भाग दाबुन बघ. खुप दुखतील पण त्याच वेळेस तुला कंबरेला थोड्या प्रमाणात आराम मिळेल. हे मी स्वतः करुन पाहीलंय.
<< ज्याला काही पुरावा नाही ती भोन्दुगिरीच !
आणि जर एखाद्याला खरच तिथे तिथे दाबल्यानी काही परिणाम होत असेल तर त्याला जोडवी कशाला हवीत, सरळ हताने दाबा पॉइंट्स !
आणि जर खरच असा काही त्रास कमी होत असेल तर मग पुरुशांना का नाही, फक्त लग्न झालेल्या बायकांनाच का?मुलींना/ विधवा बायकांना का नाही, हे प्रश्न आहेतच !
दागिना म्हणून आवडत असेल तर गोष्ट वेगळी पण मुळात 'फक्त स्त्रीयांना' परम्परा/नियम म्हणून घालावं लागणे आणि वर त्याचा संबंध हे कसं स्त्रीयांच्या हिताचं आहे हे म्हणण चूक च आहे.

आणि जर एखाद्याला खरच तिथे तिथे दाबल्यानी काही परिणाम होत असेल तर त्याला जोडवी कशाला हवीत, सरळ हताने दाबा पॉइंट्स !
>>
हाताने तु दिवसभर दाबत बसशील का?? Proud
जाऊ दे मी आधीच लिहीलंय सौभाग्यचिन्ह वापरणं/ न वापरणं हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबुन आहे.

लग्नात वरपक्ष, वधुपक्षाकडून पाय धुऊन घेतो त्या प्रथेची मनोमन चिड आहे मला>>>>>
खरच.
माझ्या लग्नात हा विधी झाला तेव्हा मला इतक ऑकवर्ड वाटलेल.......(

Pages