उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिबिचं नाव बदलु का ? म्हणजे आपल्याला सगळ्या चर्चा ईथेच करता येईल तुम्ही सगळ्यांनी सांगा Happy
मला ते मान्य आहे

हसरी,
एका वळणावर, जेव्हा धर्मविषयक चर्चेला सुरुवात केली त्यावेळी बाफचे विषयांतर झाले असे वाटले. पण सावट ह्यांची मागची काही पोस्ट पाहिलीत तर लक्षात येईल की अजुनतरी मुख्य विषयाला धरुन म्हणजे उपासनेविषयीच चर्चा सुरु आहे. Happy
अर्थात जर विषयांतर होऊ लागले तर जाणकार आपल्याला सांगतीलच आणि त्यासाठी वेगळा बाफ काढुया?

गौरी,
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ...तुम्हीच.. हसरी यांच्या वरील प्रश्नाला दिलेल्या उत्तरात आहे!:)

इथे 'जाणकार' म्हणजे श्रीसद्गुरू असे जाणावे आणि 'उपासना' मुख्य विषयाच्या अनुरोधाने होणे .. महत्वाचे.:)

तुम्ही ज्या दृष्टीने धर्माकडे पहात आहात..त्या दृष्टीनेच जर पाहीले तर.. त्या जीवाचे आजपर्यंत अनेक जन्म आणि धर्म होऊन गेलेले असतात...आणि हा जन्म संपला आणि ह्या जन्मातल्या 'वासना' भोगायच्या शिल्लक राहील्या तरच पुढचा नवीन जन्म... आणि त्याच मागच्या..जुन्याच वासना या नवीन जन्मातही प्रकटतात. (नवीन जन्म... नवीन शरीर.. त्याला अनूसरून..नवा वाटणारा धर्म..पण वासना जुन्याच!:))

'वासना' या अनेक प्रकारच्या असतात. शास्त्रानुसार मानवी शरीरात ७२,७२,७२,७२० इतक्या सूक्ष्म वासना नाड्या असतात.(स्त्रियांच्या शरीरात 'दोन' नाड्या कमी असतात.) आता या एवढ्या वासनांची जर कमी-अधिक प्रमाणात सरमिसळ केली..तर त्यातून किती विविध-वेगवेगळे नमुने तयार होतील याची कल्पना करता येईल आणि जशी 'वासना(भेळमिसळ)' तसा 'धर्म' ...म्हणूनच म्हणतात जेवढी मते..तेवढे पंथ!

अर्थात ही सगळी मते(पंथ) 'अज्ञानातूनच' आलेली असतात. म्हणूनच 'आत्मज्ञानी' श्रीसंतानी सांगितलेला..सर्व वासनांना पुरून उरणारा 'राजपंथ' जाणणे आणि त्या पंथानेच जाणे महत्वाचे आहे..अन्यथा उलटा प्रवास(मुख्य ध्येयाच्या उलटा) कधी झाला याचा 'पत्ता' ही लागत नाही.... प्रवास अजूनच अंधारच्या दिशेने...घनघोर तममय होतो. ( माधव- लक्षात घ्यायचा मुद्दा!:))

म्हणूनच 'जाणकार' म्हणतात..

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः॥

अविद्या, विद्या आणि आत्मविद्या यातील फरक जाणून घेतला पाहीजे.

कर्म,उपासना, भक्ती ही जीवाच्या अधिकारानुसारच मिळतात-प्रकटतात .... हे 'सत्य' आहे.

धन्यवाद!

श्रीसद्गूरू संतश्रेष्ठ एकनाथमहाराजांचा एक नितांत सुंदर 'अभंग' पाहूयात...

ना जायेचि ताठा नित्य खटाटोपा | मण्डुकीं वटवट तैसे ते गा || १ ||
प्रेमावीण भजन नाकाविण मोती | अर्थाविण पोथी वाचुनी काय || २ ||
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव | भावावीण देव कैसा पावे || ३ ||
अनुतापेवीण भाव कैसा राहे | अनुभवें पाहें शोधूनियां || ४ ||
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी | एका जनार्दनी अनुभविलें || श्री ए. ह. १८.५ ||

नुसत्या शब्दज्ञानाने केलेली 'वटवट' कशी असते हे अनुभवाने...त्यांचे प.पू.सद्गुरू श्रीजनार्दनमहाराजांनी दिलेल्या साधनेमूळे...आलेल्या अनुभवाने, कळल्यानंतर, श्रीमहाराज म्हणतात...

अशा उथळ- पुस्तकी ज्ञानाने..विद्येने, आपला ताठा-अहंकार कमी न होता.. नित्य वाढतच जातो..म्हणूनच परमार्थाला तो 'ग्रहण' लावतो.

महाराज पुढे म्हणतात जसे नाक आहे म्हणूनच मोत्याची नथ आहे...तसेच भगवंताविषयी जर मुळातच 'प्रेम' नसेल, तर त्या नुसत्या भजनाने काय होणार? 'अर्थ' न समजून घेता.. आचरणात न आणता नुसत्या पोथ्या..पुराणे..शास्त्रे वाचून काय होणार?

जसे 'आहेवपण' आहे म्हणजे स्त्रिच्या कपाळी कुंकू असतेच.. तसेच जर 'भाव' आहे म्हणजे.. तीथे 'देव' असतोच. असा हा 'भावच' जर मूळात..मनात नसेल..तर 'देव' कसा काय पावेल..त्याची अनुभूती अशी काय होईल-येईल?

असा हा 'भाव' जर स्थिर रहायचा असेल तर अगोदर श्रीभगवंताविषयी 'अनुताप' झाला पाहीजे..मग हळूहळू 'भाव' येत जाईल आणि नंतरच श्रीभगवंताविषयी 'प्रेम' निर्माण होईल.... या प्रवासाचा शोध घ्यायचा असेल तर 'अनुभवी' श्रीसंताचे चरित्र शोधून पहावे.

याचा जर शोध लागला, आणि त्या अनुभवाच्या क्रमाने जर 'साधन' झाले तर, पहाणे आणि पहाणारा हे द्वैत जावून...श्रीसद्गुरु चरणी अद्वैताचा अनुभव येतो. ( अन्यथा नाही!)

धन्यवाद!

सुंदर Happy

ह्या जन्मातल्या 'वासना' भोगायच्या शिल्लक राहील्या तरच पुढचा नवीन जन्म... >>>> ऋण, वैर आणि हत्या हे पेंडींग राहिले तरीही पुढचा नवीन जन्म आणि तोही त्या कशा फेडता येतील त्याप्रमाणेच जन्म. आणि असे आपले अनंत जन्म सद्गुरुंना आपल्यात दिसत असतात, सगळ्या प्रवासाचा जमा खर्च दिसत असतो.

धन्यवाद...अश्विनी,गौरी!

श्रीमद्भगवतगीता....अध्याय ४...ज्ञानकर्मसन्यास योग..

श्रीभगवानुवाच |
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ||१||

मग देव म्हणे अगा पंडुसुता| हाचि योगु आम्हीं विवस्वता| कथिला परी ते वार्ता| बहुतां दिवसांची ||श्री ज्ञा.४.१६||
मग तेणें विवस्वतें रवी| हे योगस्थिति आघवी| निरूपिली बरवी| मनूप्रती ||१७||
मनूनें आपण अनुष्ठिली| मग इक्ष्वाकुवा उपदेशिली| ऐसी परंपरा विस्तारिली| आद्य हे गा ||१८||

भगवंत श्रीअर्जूनांना समजावत आहेत... की हा जो 'योग' आहे...तो मी बर्‍याच दिवसापूर्वी 'विवस्वत' नावाच्या सुर्याला सांगितला आहे....त्यांनी हा 'योग' संपुर्णपणे 'विवस्वत' मनूस निरूपण केला. हा 'योग' या मनूने स्वतः अनुष्ठिला..आचरणात आणला आणि नंतर मग या 'योगाचा' उपदेश मनूने आपल्या 'इक्ष्वाकु' या मुलास केला. ( राजा हरिश्चंद्र्.. सगर.. राजा रघू...प्रभूश्रीरामचंद्र..याच सूर्यवंशात पुढे झाले आणि त्यानंतर झालेल्या 'महाभारतात' श्रीभगवंत स्वतः आपल्या शिष्योत्मास हे सांगत आहेत.) अशी ही 'योग-परंपरा' पुढे विस्तारली...आणि श्रीभगवंत पुढे म्हणतात..

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः |
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ||२||

मग आणिकही या योगातें| राजर्षि जाहले जाणते| परी तेथोनि आतां सांप्रतें| नेणिजे कोण्ही ||१९||
जे प्राणियां कामीं भरु| देहाचिवरी आदरु| म्हणौनि पडिला विसरु| आत्मबोधाचा ||२०||
अव्हांटलिया आस्थाबुद्धि| विषयसुखची परमावधि| जीवु तैसा उपाधि| आवडे लोकां ||२१||
एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं| पाटाउवें काय करावीं| सांगें जात्यंधा रवी| काय आथी ? ||२२||
कां बहिरयांच्या आस्थानीं| कवण गीतातें मानीं| कीं कोल्हेया चांदणीं| आवडी उपजें ? ||२३||
पैं चंद्रोदया आरौतें| जयांचे डोळे फुटती असते| ते काउळे केवीं चंद्रातें| वोळखती ? ||२४||
तैसी वैराग्याची शिंव न देखती| जे विवेकाची भाष नेणती ? | ते मूर्ख केंवीं पावती| मज ईश्वरातें ? ||२५||
कैसा नेणों मोहो वाढीनला| तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला| म्हणौनि योगु हा लोपला| लोकीं इये ||२६||

आता सांप्रत काळी हा 'योग' लोपला आहे..याचे कारण सांगताना ते म्हणतात..

मानवात आस्थाबुद्धी..श्रद्धा लोपली... देहसुखाची...देहाच्या विषयसुखाची कामना वाढल्यामूळे..जसा जीव...वासना..तशा त्याला चिकटलेल्या उपाधी!...जशी मागणी, तसा पुरवठा(जीवु तैसा उपाधि)..या न्यायाने त्याला 'आत्मबोधाचा' विसर पडला. जात्याच..जन्मत:च अंध असणार्‍यास 'सुर्य' काय कामाचा? बहिर्‍यास 'गीत गायनाचा' काय उपयोग? चंद्राच्या उदयाबरोबरच ज्याचे डोळे फुटतात ..तो कावळा चंद्रास कसा बरे ओळखेल? तसेच...
जे 'वैराग्य' म्हणजे काय... हे जाणत नाहीत... 'विवेकाची' ज्यांची तोंड ओळखही नाही...असे मुर्ख लोक.. 'मला'...ईश्वरास कसे काय पावतील? म्हणूनच यामधल्या काळात ... हा 'योग'...'या' लोकी लुप्त झाला!

हाच 'योग' पुन्हा.. श्रीपार्थास, श्रीभगवंत का सांगत आहेत? आणि असा हा 'योग' कोणता? हे समजावून घेण्यासारख आहे ...! Happy

गौरी..

२)>>>मग हे असे वाईट कर्म पटकन संपवता येईल, ह्या साठी भक्ती-उपासनेची काहि विशिष्ट पद्धत आहे का?
परमार्थात ही मागणी - पुरवठा तत्त्व चालते म्हणुन हा प्रश्न विचारायचे धाडस केले आहे.

या आपल्या प्रश्नाच उत्तर..वरच्या पोष्टमधे आहे!:)

माधव...

श्री यजुर्वेद(शुक्ल).. अध्याय ४० वा...श्री ईश्यावास उपनिषद... सूत्र नववे...

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते |
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः || ९ ||

याच 'कारण' ही वरच्या पोष्टमधे आहे...!:)

धन्यवाद!

जा'मोहन'प्या,
नमस्कार..कसे आहात?

>>>६)इन्द्रियांची जीवशास्त्रीय प्रगल्भता हे अध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असल्याचा पुरावा ठरू शकत नाही

मग 'अध्यात्मिकदृष्ट्या रोगी' कोणाला म्हणायचे? त्याची लक्षणे काय? हा रोग बरा होण्यासाठी 'पथ्य, औषध आणि विश्रांती' हे त्रिकूट कसे जमवायचे?

आपण याचे उत्तर दिले होते...

>>>सात्वीक जीवनाची लक्षणे गीतेत /इतरत्र पहावीत..

याविषयी अजून काही प्रश्न....

>>>इन्द्रियांची जीवशास्त्रीय प्रगल्भता हे अध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असल्याचा पुरावा ठरू शकत नाही

'इंद्रिये' म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? आणि 'इंद्रिये आणि अध्यात्म' यांचा परस्पर संबंध काय?

धन्यवाद!

प.पू.श्रीसद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील काही भाग...

एकदा श्रीउद्धवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाले, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते."

भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन.

आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे(थोरांचे) कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?'

तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ?

एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी श्रीकृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि श्रीकृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना श्रीकृष्णप्राप्तीसाठी, श्रीकृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून श्रीकृष्णांना आपलेसे केले.

खरे म्हणाल तर श्रीकृष्णांचा जन्म 'उपासनेने' हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे 'जन्मस्थान' आहे.

श्रीसंतवचने.... नेमकी वर्मावर बोट ठेवतात...आपला 'संशय' मूळापासून' नाहीसा करतात. म्हणूनच अतिव आदराने..अतिशय विनम्रतेने... श्रीचरणाशी 'स्थिर' होऊन आपण, त्याचे 'श्रवण' केले पाहीजे..

श्रीमहाराज म्हणतात...

जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही; पण म्हणून काही आपण त्या खोट्या नाही मानीत. आपण, आपल्या 'तुटपुंज्या' ज्ञानाचाही 'अभिमान' धरतो, हे चुकते आपले.

भगवंताने ज्ञान दिले, आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तरवार दिल्यावर. शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपण, आपलीच मान तोडल्यासारखे झाले !

ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही, ती विद्या नसून 'अविद्याच' होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे, हे 'अज्ञान' होय. 'अविद्या आणि अज्ञान' दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही 'जाणीव' असणे, म्हणजे 'ज्ञान' होय.

बोला, अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!भगवान श्रीपाद श्रीवल्लभस्वामी महाराजकी जय!

श्रीब्रह्मचैतन्य उपदेश करतात..

परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ति द्याव्यात, असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी ? 'देहबुद्धी 'सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का ?
शक्ति वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित् ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग ? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही, असेही म्हणता ! तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा ! तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना ? मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल.

तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.

मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल.
>>> व्हय म्हाराजा !

श्रीआईमहाराज म्हणतात...

सर्वांभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी, तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे. सोन्याचा दागिना 'मला सोने भेटवा' असे म्हणत नाही; त्याचप्रमाणे, मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू. तो आपल्याजवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.

मी 'कुणाचा' आहे हे जसे जाणले तर मी 'कोण' हे कळायला वेळ लागायला नको.

'सत्समागम' केला म्हणजे 'मी कोण आहे?' हे कळते. साक्षीरूपाने नटलेला जो 'मी' त्याला पाहायला जंगलात जायला नको. 'माझेपण' सोडावे म्हणजे 'मी' चा बोध होतो.

भगवंत चोहोकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते.

भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसर्‍यातही आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे.

'मी कर्ता नसून, राम कर्ता आहे', हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास.

श्रीआईमहाराज म्हणजे कोण? प्.पु. कलावती आई का?

'मी कर्ता नसून, राम कर्ता आहे'>>> म्हणून तर माझ्या बर्‍याचश्या पोस्ट्सच्या खाली 'इदं न मम| इदं गुरुदत्तस्य||' किंवा 'इदं श्रीरामस्य |' लिहिलेलं असतं. आपलं यावरुन कुठल्यातरी धार्मिक बाफवर बोलणं झालं होतं थोडक्यात.

श्रीसद्गुरुआई म्हणते...

हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय् दुसर्‍याचे हित आपण काय साधणार ? ज्याला स्वतःला सुधारता येत नाही, तो दुसर्‍याला काय सुधारणार ? त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते, 'आपण दुसर्‍याचे हित करून देऊ.' या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते....

आणि 'ते साधन' श्रीगुरू सांगत असतात. म्हणून, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते.

'ब्रह्म' हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसर्‍याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम श्रीसद्‌गुरू करीत असतात.

श्रीगुरूंनी दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही.

नमस्कार अश्विनी...
कशा आहात?:)

आपल, याविषयी, याच बीबी वर झालेले बोलणे खालील प्रमाणे..

अश्विनी, सांगायचा मुद्दा तुम्हाला कळला का?

>>>नेहमी वाटतं हे सर्व लिहिण्याचे आपण अधिकारी नाही. तरीही असे बाफ दिसले, अशी चर्चा दिसली की जे मनात उतरलेय ते न राहवून इथे उतरवलं जातं. मी स्वतःच जिथे परमार्थात पुर्णपणे पुढे गेले नाहिये तर मध्यातच दुसर्‍यांना मी काय म्हणून सांगतेय? म्हणूनच काही लिहिलं की तिथे लिहावंसं वाटतं इदं न मम | इदं गुरुदत्तस्य |.

तुम्ही कृपया असेच लिहित रहा..!
यालाच.. मनन आणि चिंतन म्हणतात! आपण 'सूज्ञ' आहात, आपल वाचन 'अफाट' आहे, यात शंका नाही.
आपण जे लिहितो, ते आपल्याच 'मनाच' दर्शन असत, ते चिंतनाकरिता फारच उपयोगी पडत. "इदं मम | इदं न गुरुदत्तस्य |" अस 'उलट' लिहल तरि चित्तात, एकही 'वृत्ती' खळबळ उठायला नाही पाहिजे. मग लिहल काय आणि न लिहल काय, काही फरक पडत नाही.

म्हणूनच.. श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे...

'मी कर्ता नसून, राम कर्ता आहे', हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास.

यातील 'ठळक' वाक्य महत्त्वाचे...कारण त्यामूळेच 'कर्ता' बदलतो!(अन्यथा नाही) Happy

असो..... 'श्रीआई' म्हणजे श्रीमहाराजच..!
धन्यवाद!

सावट नमस्कार Happy
कसे आहात ? बरेच दिवसांनी आलात मि तुम्हाला विपु केला होता.

मन ताब्यात ठेवण्यासाठी काय केल पाहिजे?
मि पण सोडन्यासाठीही?

श्रीमहाराज म्हणतात..

'विद्या' ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले 'अडाणी' लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण 'शहाणे' लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, 'पुस्तकी ज्ञानाचे' पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू 'सात्त्विक प्रेमाने' साध्य होणारी आहे.

हसरी..:)

'मन' ताब्यात ठेवण्यासाठी काय केल पाहिजे?
'मी' पणा सोडण्यासाठीही?

आता तुम्हाला जर विचारल... बिथरलेल्या घोड्याला ताब्यात आणण्याकरीता काय कराल? तर काय सांगाल!:)

खरतर हे दोन्ही प्रश्न... म्हणजे मूळ प्रश्न आहेत.. जगातील यच्चयावत 'धर्म' यासाठीच जन्माला आले...पण दिसत काय?

प्रत्यक्ष भगवान शिवांनी यासाठी 'सव्वालक्ष' साधने(प्रकार) सांगितली आहेत...यावरूनच हा आपला 'प्रश्न' किती महत्त्वाचा आहे..याची कल्पना येते. म्हणूनच या प्रश्नाच उत्तर खोलात जावून पहाव लागेल.:)

धन्यवाद!

तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही>>>>>>

सावट हे निट पटवुन सांगा ना? मला नाही कळलं

संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास.>>>

ह्यासाठी आपण काय करु शकतो.

हसरी,
श्रीमहाराजांचे खालील वचनामृत काळजीपूर्वक 'श्रवण' करावे...

मायेचे मूळ लक्षण म्हणजे 'मी कर्ता आहे’ असे वाटणे. 'अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल ?' असे आपण म्हणतो, आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहात नाही.

'देहबुद्धीने' केलेला 'धर्म' उपयोगी पडत नाही.

अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात.

'मी सर्व काही देवाला अर्पण केले', ही आपली आठवण काही जात नाही.

दुःखात असताना, आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो. परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून, आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही. त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल ? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच ! 'मी कसा जगलो' याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून, राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी.

हसरी,

श्रीमहाराज वर म्हणतात त्याप्रमाणे...जो पर्यंत.. 'मी म्हणजे देह आहे' आणि या देहाने जे जे केले, ते ते 'मी' केले असा 'कर्ताभाव' आहे, तो पर्यंत काहीही केले तरीही ते पुढच्या नवीन जन्माची नांदीच असते.

जो पर्यंत हा आपला 'देहभाव' जात नाही..म्हणजेच मन संन्यास घेत नाही..तो पर्यंत आपले कर्म 'निष्काम' होऊ शकत नाही.

म्हणूनच आपण जी काही 'साधना' करत असू किंवा करायचे ठरवत असू..त्यामूळे आपली 'देहबुद्धी' वाढते की कमी होते... हे यावर आपलेच बारीक लक्ष पाहीजे.

एक गोष्ट मात्र पक्की ध्यानात घेतली पाहीजे...जो पर्यंत 'देह' आहे, म्हणजे तशी 'बुद्धी' आहे...त्यावेळीच मी 'देह' नाही हे जाणता येते... म्हणजेच 'हे' न जाणता, जर हा आताच 'देह' पडला..तर नवीन 'देह' परत मिळणारच. म्हणजेच 'मी' देह नाही, हे आपण 'देहात' असतानाच कळावयास लागते...त्याच्या नंतर नाही. Happy

धन्यवाद!

हसरी,

आपण 'त्याग म्हणजेच मोक्ष' असे 'भक्ती' बीबीवर अतिशय छान लिहले आहे...
त्याविषयी थोडे बोलूयात....

>>>आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेचा त्याग केल्याशिवाय आपल्याला शांत झोप लागत नाही आणि निद्रेतील विश्रांतीचा त्याग केल्याशिवाय आपण काम करण्यास सज्ज होऊ शकत नाही.

इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'त्याग' हा करायच नसतो.. तो व्हावा लागतो. आपण असे कधीही म्हणू शकत नाही की 'मी' झोप घेतो...तर झोप ही आपोआपच येते... झोप लागते.. आणि झोप लागल्यावर... आपल्या आस्तित्वाच्या जाणीवेच 'त्याग' हा आपोआप होतो...तो आपण ठरवून करत नाही...तसे करता येत नाही.

जर आपल्या आस्तित्वाच्या जाणीवेचा त्याग जर आपण झोपेत करतो...तर मग आपल्याला शांत झोप लागली होती... हे आपण झोपेतून जागे झाल्यावर.. आपल्याला जाणवून देणारा कोण...आपल्या झोपेतही, जो जागा होता, तो कोण होता?.... ही मात्र 'विचार' करण्यासारखी गोष्ट आहे.

जागेपणी...निद्रेतील विश्रांतीचा त्याग केल्यावर...... आपल्या 'स्वतंत्र' आस्त्तित्वाची जाणीव..जो पर्यंत असते तो पर्यंत 'त्याग' होत नाही..आणि त्यामूळे 'मोक्ष' ही नाही.:)

धन्यवाद!

हसरी,

>>>मन ताब्यात ठेवण्यासाठी काय केल पाहिजे?

हा असा प्रश्न श्रीअर्जुनासही पडला होता.... तो असा...

अर्जुन उवाच |

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन |
एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात्स्थितिं स्थिराम् ||श्रीमद भ.गी. ६.३३||
चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् |
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ||३४||

तंव अर्जुन म्हणे देवा| तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा| परी न पुरों जी स्वभावा| मनाचिया ||श्री ज्ञा.६.४११||
हें मन कैसें केवढें| ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें| एऱ्हवीं राहाटावया थोडें| त्रैलोक्य यया ||४१२||
म्हणौनि ऐसें कैसें घडेल| जे मर्कट समाधी येईल| कां राहा म्हणतलिया राहेल| महावातु ? ||४१३||
जें बुद्धीतें सळी| निश्चयातें टाळी| धैर्येसीं हातफळी| मिळऊनि जाय ||४१४||
जें विवेकातें भुलवी| संतोषासी चाड लावी| बैसिजे तरी हिंडवी| दाही दिशा ||४१५||
जें निरोधलें घे उवावो| जया संयमुचि होय सावावो| तें मन आपुला स्वभावो| सांडील काई ? ||४१६||
म्हणौनि मन एक निश्चळ राहेल| मग आम्हांसि साम्य होईल| हें विशेषेंही न घडेल| याचिलागीं ||४१७||

श्रीअर्जुन श्रीभगवंताना विचारत आहेत...

मन हे कसे आहे..पाहू म्हंटल तरी सापडत नाही... त्याला त्रैलोक्यही हिंडायला थोडे होते..असे मन शांत कसे बसेल? महाचंचल माकड समाधीला येईल असे कसे घडेल? सतत घोंघावणारा वारा..महावात निवांत कसा राहील?

बुद्धीच्या निश्चयाला ...धैर्याला...विवेकाला..संतोषाला जे सहज भुलवत्...बसले तरी..चारी दिशा हिंडावयास लावते...त्याचा निरोध करावयास जावे तर उसळी मारते..त्याच्यावर संयम करावा तर अतिकष्ट होतात... असा आपला 'मूळस्वभाव' हे मन कसेबरे सांडू शकेल?

श्रीअर्जुन यामूळेच आपला 'तर्क' चालवतात...मन निश्चळ राहील आणि मला 'साम्य' अवस्था येईल असे घडणार नाही.

यावर श्रीभगवंत काय म्हणतात हे पहाण्यासारखे आहे! Happy

धन्यवाद!

हसरी,
नमस्कार!

>>तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही>>>>>>

या श्रीमहाराजांच्या श्रीवचनावर.. आपण विचारलेत....,"हे निट पटवुन सांगा ना? मला नाही कळलं!"

हे आपण समजून घेण्याकरीता श्री महाराजांचेच श्रीवचनामृत पाहू.....

आपली आपल्याला ओळख करून घ्यायला ...स्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्यप्राण्याच्याच ठिकाणी आहे.

पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा :

१)जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, 'मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.' इथपासून घसरत तो म्हणतो.....

२) 'मी'; 'त्याचा' आहे' ...

(इथेच, 'मी' आणि 'तो' परमेश्वर हा वेगळा आहे ही भावना मूळ धरते...म्हणजेच मी 'तो' आहे हे, असे अगोदरचे जाणणे जाऊन.... 'मी' हा कोणीतरी परमेश्वराहून वेगळा आहे...पण मी त्या परमेश्वराचा आहे असा जाणण्यातला बदल होतो आणि देहबुद्धी अंकूरते; )आणि अखेर ....

३)'त्याचा'... 'माझा' काही संबंध नाही' इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते.

(म्हणजेच जो 'वेगळा' जाणवतो ...'तो' आपण म्हणजे 'देह' आहे ...अशी विपरीत भावना कायम करून बसतो. हे असे नुसते वाचून... ही विपरीत भावना जात नाही...कारण ही नुसती 'माहिती' आहे... त्याच 'ज्ञान' होत नाही... Information आणि Knowledge यात मूलभूत फरक आहे.)

पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, 'आमचे स्नेही गेले!' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्‍या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्‍या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते.

असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे मानून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा 'मी' आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली.

आता याला उपाय हाच की, ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे,

१)आता 'मी' जो 'देहरूप' बनलो आहे,

२)तो ..'मी'; त्याचा, 'परमेश्वराचा' आहे,. अशी जाणीव जागृत करणे.

३)याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे.

हे कसे साधावे ? तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली, त्याचे 'स्मरण'
करणे.

श्रीमहाराज म्हणतात....खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्थाचे आहे.

{....,"हे निट पटवुन सांगा ना? मला नाही कळलं!"
( 'मला कळल नाही' असे म्हणणे आणि.. 'मला पटत नाही', असे म्हणणे यात 'मूलभूत' फरक आहे..आपण अतिशय योग्य 'शब्द' वापरलेत...धन्यवाद! Happy श्रीसंतवचने ही 'नित्यसिद्ध' असल्यामूळे ती कायम....सर्वकाळी 'सत्य' च असतात...त्यामूळे 'कळल' नाही असे म्हणणे, म्हणजे आपण 'अज्ञानी' आहोत याची जाणिव झाल्यासारखे आहे....आणि हेच अति महत्त्वाचे आहे... याउलट ... अशी 'सार्थ' वचने ...'पटत' नाहीत असे म्हणणे...म्हणजे अनाहूतपणे 'असत्य' आहेत असे म्हटल्यासारखेच होते.. हा 'दोष' आहे...! हे जाता..जाता सांगणे जरूरी वाट्ले ..कृपया 'राग' मानू नये... क्षमा असावी!)}

धन्यवाद!

श्रीमहाराज 'उपासनेविषयी' काय म्हणतात ते पाहू....

एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की, 'जीव वाचवायचा असेल, तर पाय कापायला हवा.' आता, नुसता प्राण आहे पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळयांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट, बाकी सगळे आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा, कानाने ऐकू येत नाही; नाही तर नाही ! कुठे बिघडले ?

उपासना, अनुसंधान, हे प्राणासारखे समजावे; बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे; ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे.

आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा, ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःखमूळ आहे. अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे, तीच दुःखमूळ आहे, हे समजून आपण वागले पाहिजे.

मांजर उंदराशी खेळते; ते त्याला धरील, परत सोडील, पुनः धरील, पुनः सोडील, पण शेवटी प्राण घेईलच त्याचा. तसे काळ आपल्याशी करतो आहे; आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल. ....

....नाही तर फार कठीण आहे. मी-मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे, विद्वान, शास्त्री, पंडित, सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा ' अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा. '

{किती 'सोप' करून सांगितले आहे...श्रीमहाराजांनी! :))

धन्यवाद!

सावट, अहो हसरीला ते पटवून सांगा म्हणजे कळेल असे सांगा असंच म्हणायचे असावे. मी देखिल कधी कधी नीट कळलं नाही तर नीट कुणी पटवून सांगेल तर बरं होईल असं म्हणते. अर्थात हे बोलीभाषा म्हणून आहे.

अनुसंधान साधले जाण्यासाठी काही टप्पे आपोआप पार पाडले जातात :-

१. अवधान - म्हणजे शोध लावणे. आपण कसे आहोत आणि भगवंत कसा आहे ह्याचा शोध.

२. निश्चय - अवधान या घटकाचा उचित उपयोग करुन परमात्म्याच्या सर्वोच्च श्रेष्ठत्वाची जाणीव दृढ होणे व स्वतःचे दुर्गुण, असमर्थता व दुष्प्रारब्ध दूर करण्यासाठी देवयान पंथावरुन पुरुषार्थाच्या प्रकाशात चालण्याचा निश्चय करणे.

३. दक्षता - एकदा का निश्चय झाला की उचित अंतरावर सिंहावलोकन करुन मनाला सतत निश्चयाची आठवण करुन देत रहाणे.

४. स्पष्टता - अवधान, निश्चय व दक्षता या घटकांमुळे मनातील सर्व गोंधळ नाहिसे होतात व उचित दिशा स्पष्टपणे प्रत्येक क्षणाला दिसू लागते. ही स्पष्टता भगवंताच्या नामस्मरणामुळे टिकवली जाते.

या सर्व प्रक्रियेत चैतन्य व रसरशीतपणा मिळण्यासाठी त्या रसराज परमात्म्याची कृपा मिळवणे आवश्यत. ती कृपा त्याच्या व आपल्यातले अंतर कमी कमी करुन मिळते.

हरि ॐ

इदं न मम | इदं गुरुदत्तस्य |

Pages