उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावट तुम्ही क्षमा मागु नका मला राग नाही Happy
मला पटवून म्हणजे उदा. देउन सांगा असे म्हणायचे होते आणि मि खरचं अज्ञानी आहे तुमच्या कडुन ज्ञान घेते आहे.
तुम्हीच माझं काही चुकलं तर क्षमा करा.
तुमच्या एवढ अधात्मचं ज्ञान आणि वाचन ही नाही पण आवड आहे. तुम्ही मदत करालच

आता तुम्ही भगवंतानी अर्जुनाला काय उत्तर दिले ते सांगा Happy

अश्विनी,:)
हरि ॐ... 'ही' बोलीभाषा छान आहे...धन्यवाद!

हसरी,

"हे निट पटवुन सांगा ना? मला नाही कळलं!" हे तुम्ही विचारलेल बरोबरच आहे...यातल 'पटवून' म्हणजे 'समजावून' असाच अर्थ होतो.

आपण जे बोलत होतो ते 'मला पटत नाही' याबद्द्ल....यात, "मला जे वाटत,, तेच बरोबर आहे," असा अर्थ ध्वनीत होतो.... हे अस वाटण ... तेही श्रीसंतांच्या वचनाबद्द्ल... म्हणजे 'दोष' माझ्यात आहे हे परमार्थात 'मी'लक्षात घ्यायला पाहीजे.

परमार्थात, 'मी' अज्ञानी आहे हे कळण का महत्त्वाच आहे, हे पाहील्यावर ...वरचे म्हणणे पटेल.
जो अज्ञानी आहे...तो स्वतः..अज्ञानात वावरत असल्यामूळे...खर ज्ञान काय आहे हे माहीत नसल्यामूळे...त्याला 'मी' अज्ञानी आहे हे 'लक्षातच' येत नाही..त्याला त्याचा 'बोध' होत नाही...त्याचे त्याला 'ज्ञान' होत नाही. आता मला माझ्यातील 'दोष' कळलाच नाही, तर तो दूर न होता..वाढ्तच जातो.

याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की, 'मी अज्ञानी आहे', याच 'ज्ञान' मला आहे...म्हणजेच खर 'ज्ञान' मिळण्याची प्रक्रिया माझ्या ठिकाणी सुरू झाली आहे.... कारण दोष माझ्यात आहे..याच 'ज्ञान' मला झाल आहे.

'जा 'मोहन' प्या' नी त्यांच्या अवलोकन सदरात..श्रीसंत कबीरांचा एक सुंदर दोहा सांगितला आहे...

बुरा ढुंढने मै चला,बुरा न मिलीया कोई |
अपने अंदर झांकता,मुझसे बुरा न कोई ||

हेच ते 'ज्ञान' आहे... आणि तरच 'बुरे' पणा दूर करण्याचा 'मार्ग' मिळेल... अजून स्पष्ट करायच तर .. श्रीसंतानी सांगितलेला..त्यांच्याकडून मिळालेला मार्ग 'कळेल' !नाहीतर, मिळूनसुद्धा..जसे आंधळ्याला पायात पडलेला... चिंतिलेले फळ तात्काळ देणारा... 'चिंतामणी' नावाचा दगड... ठेचकाळलातरी.. त्याचे 'ज्ञान' न झाल्यामूळे, उपयोगात आणता येत नाही... तसेच 'माझे' होईल.

असो..

तुम्ही 'योग्यच' विचारल आहे...पण 'अयोग्य' काय आहे हे जर कळाल, तर आपल्यातल्या 'योग्यपणाची' किंमत आपल्यालाच कळते..आणि आपण 'योग्य' मार्गावरच आहोत अशी 'श्रद्धा' बळकट होते आणि पुढची 'मार्गक्रमणा' लवकर होते...बस्स हाच 'तो' मनस्थ हेतू.:)

खर सांगायचे तर जसजसे 'ज्ञान' होत जाते...तसतसे आपल्यातलेच 'दोष' कळू लागतात.. आणि आपण अजूनच त्या 'दोषरहीत' परमात्म्याला शरण जातो.... आणि आपल्यातले 'दोष' संपतात..तेंव्हाच श्रीसंतानी सांगितलेली 'अनन्यशरणागती' साधली जाते. :)(अन्यथा नाही)

परत एकदा क्षमा असावी!
धन्यवाद!

हसरी,

>>>आता तुम्ही भगवंतानी अर्जुनाला काय उत्तर दिले ते सांगा.

श्रीपार्थांची शंका आहे...

हें मन कैसें केवढें| ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें| एऱ्हवीं राहाटावया थोडें| त्रैलोक्य यया ||४१२||
म्हणौनि ऐसें कैसें घडेल| जे मर्कट समाधी येईल| कां राहा म्हणतलिया राहेल| महावातु ? ||४१३||

अतिचंचळ असे 'मन' स्थिर कसे होईल?

यावर श्रीभगवंत फारच अर्थपुर्ण सांगत आहेत....

श्रीभगवानुवाच ।

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥श्रीमद भ.गी.६.३५॥

तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।
यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥ श्री ज्ञा.६.४१८ ॥
परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥ ४१९ ॥

श्रीभगवंत म्हणतात,
खर आहे अर्जुना... चपळपणा-चंचळपणा हा मनाचा 'स्वभाव'च आहे. पण जर 'वैराग्या' चा आधार मिळून, जर असे 'मन' अभ्यासाला लागले तर... कधीतरी..योग्य वेळी अवश्य 'स्थिर' होईल. (स्थिर- याचा अर्थ मनाचा संकल्प-विकल्प करण्याचा स्वभाव नाहीसा होईल.)

कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ४२० ॥

श्रीभगवंत मनाच्या आणखी एक महत्त्वाच्या स्वभाव वैशिष्ठ्याबद्द्ल सांगत आहेत...
मनाची एक सवय आहे..ती म्हणजे ..त्याला जी गोष्ट आवडते...त्याच्यावर मन सारखे घुटमळते. म्हणूनच श्रीभगवंत सांगत आहेत... अशा चंचळ अशा मनाचे... 'हे' वैशिष्ठ लक्षात घेऊन्...त्याला कायम स्वप्रचितेचे...स्वतःला आलेल्या 'अनुभवाचे' ...त्यातील गोडीचे.... सुख दाखवावे.... म्हणजे त्याला त्याची 'चटक' लागेल...आणि ते त्या 'अनुभवामूळे' हळूहळू 'स्थिर' होईल.

श्रीभगवंत पुढे म्हणतात...

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६॥

एर्‍हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं ।
तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥ ४२१ ॥
परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे ।
केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥ ४२२ ॥
यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं ।
तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ? ॥ ४२३ ॥

एर्‍हवी जर 'विरक्ती-वैराग्य' अंगी नसेल... जो 'अभ्यास' करायच नाव घेत नाही.... जो बाहेरील 'विषयातच' सुख शोधत आहे.. यम-नियमांची पर्वा करत नाही... त्याचे 'मन' कसे काय 'निश्चळ' होईल?

हा जो 'अभ्यास(योग)' आहे..तो श्रीसद्गुरुकृपेनेच मिळतो.:)

धन्यवाद!

महेश,
कसे आहात?

>>>"लवकरच सविस्तर लिहू शकेन. तो पर्यंत येथे वाचन भक्ती चालू आहेच".

असा 'संकल्प' सोडून कोठे हरवलात?

तसेच आपण विचारले होते की....

>>निराकारावर' मन कसे केंद्रित होईल? एखाद्या माहित असलेल्या 'आकारावर' आपले 'मन' केंद्रित करण्याचा प्रयत्न >>केल्यास हे म्हणणे.. हा प्रश्न लक्षात येईल
माहित असलेल्या आकारावर म्हणजे काहीही चालू शकेल का ? मुर्ती तर सर्वांना माहित असलेला उपाय आहे. पण त्याऐवजी एखादी वस्तु, व्यक्ती, इ. ?

मुर्ती..देव...मोक्ष हे तात्पुरते बाजूला ठेऊन.. आपल्या मनाची जडणघडण जाणून घेणे अगोदर महत्त्वाचे!
आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही आकारावर 'मन' केंद्रित होते का? हे पहाणे जरूरी!

याविषयी आता 'आपले मत' काय आहे? हे जाणुन घ्यायला आवडेल!:)

धन्यवाद!

सावट, अज्ञातवास संपला ! Happy

अभ्यास म्हणजे परत परत योग्य दिशेने केलेला सराव, जो प्रत्येक खेपेला आपल्याला त्या विषयात समृद्ध करत रहातो. हे "अशा चंचळ अशा मनाचे... 'हे' वैशिष्ठ लक्षात घेऊन्...त्याला कायम स्वप्रचितेचे...स्वतःला आलेल्या 'अनुभवाचे' ...त्यातील गोडीचे.... सुख दाखवावे.... म्हणजे त्याला त्याची 'चटक' लागेल...आणि ते त्या 'अनुभवामूळे' हळूहळू 'स्थिर' होईल." याला चपखल लागू होते Happy

गौरी,
कशा आहात?

आता याला उपाय हाच की, ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे,

१)आता 'मी' जो 'देहरूप' बनलो आहे,

२)तो ..'मी'; त्याचा, 'परमेश्वराचा' आहे,. अशी जाणीव जागृत करणे.

३)याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे.

हे कसे साधावे ? तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली, त्याचे 'स्मरण'करणे.

हे कळाल्यानंतर(पटल्यानंतर) हे 'स्मरण' कसे करायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे ना? Happy आपल्याला काय वाटते..?

नमस्कार सर्व साधक/भक्त जनहो. कधी कधी मी चुकुन इथे येतो. तुमच्या अध्यात्म चर्चेत रंगतो.

थोडस विषयांतर करुन विचारतो इथे मानस पुजेवर चर्चा होते का ? झाली आहे का ? मला त्या बाबत आणखी जाणुन घेण्याची इच्छा आहे. ती इथे आणि आत्ता करणे बरोबर नसेल तर किमान कोणत्या पुस्तकात्/ग्रंथात याबाबत वाचयला मिळेल हे संपर्कातुन कळवावे.

नितीन,
नमस्कार!
'मानसपुजा' हाच विषय इथे समजावून घेणे, चालले आहे..तुमचा 'विषय' योग्यच आहे.

त्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे... "जग हे बंदीशाळा", हे संपुर्ण गाणे, कृपया तुम्ही इथे लिहाल काय? Happy

धन्यवाद!

'मानसपुजा' हाच विषय इथे समजावून घेणे, चालले आहे..तुमचा 'विषय' योग्यच आहे.

त्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे... "जग हे बंदीशाळा", हे संपुर्ण गाणे, कृपया तुम्ही इथे लिहाल काय?
>>>>> नितीनचिंचवड, आता सावट, आपले मास्तुरे तुमच्याकडूनच तुमच्या प्रश्नाचं उत्तर वदवून घेतील त्यांच्या खास हातोटीने Happy तुम्हाला ते गाणं लिहायला सांगणे ही त्याचीच सुरुवात आहे.

सावट, खरंच तुम्ही हाडाचे शिक्षक असणार ! Happy

जग हे बंदीशाळा ...२

ज्याची त्याला प्यार झोपडी
झोपडीतले सखे सवंगडी
भातुकलीची अवघड बेडी
प्रिय हो ज्याची त्याला

जग हे

कुणान माहित कसा इथे रे
कोठुन आलो हे नच कळते
सुटकेलाही मन घाबरते
जो आला तो रमला

जग हे

धन्यवाद नितीन!
ही झाली बंदीशाळा... या बंदीशाळेत बंदी असलेल्या 'बंदीवानाच' तुम्ही केलेले वर्णन खालील प्रमाणे...

बंदीवान

भोगुनी प्राक्तने सारी मी बंदीवान झालो
माझ्याच पिंजर्‍याला मी शिकार झालो

छ्प्पन्न भोग सारे राशीत रस मधाळ
भोगुन त्या रसांना मी उष्ट्या महाग झालो

स्पर्श शब्द गंध मैफिली अपार झाल्या
भोगुन त्या क्षणांना मी तृप्तीस महाग झालो

राजस महाली माझ्या मुजरे हजार पडले
नौबतीस ऐकता मी चाकरा महाग झालो

ना धर्म- दान केले, यात्रा कशी घडावी
मोजीत पाप राशी मी स्वर्गा महाग झालो

व्वा! धन्यवाद!!:)

सावट तुम्ही केलेली गझल आहे की काय ? (महान आहात !)

असो, तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याबद्दल माझे मत खालील प्रमाणे,
समजा माझे एखाद्या व्यक्तीवर निरतिशय निरपेक्ष प्रेम आहे,
त्या व्यक्तीचे विचार मनात आले की चित्त एकाग्र होऊन जात असेल,
हे प्रेम भौतिक नसून मानसिक, आत्मिक असेल, ज्यामधे मी माझी इतर जिवितकार्ये करत असताना देखील,
मनात सतत त्या व्यक्तीचे अनुसंधान असेल तर हे असे प्रेम खरे प्रेम समजावे का ?
असे प्रेम हे भक्तीची पहिली पायरी असू शकते का ?
असल्यास प्रेमाचे रूपांतर भक्तीमधे कसे आणि केव्हा होऊ शकेल ?
कोणाचीही कोणाशीही तुलना करत नाही, पण मीरेची भक्ती ही प्रेमयोग भक्तीच होती ना ?
एखाद्या वस्तु (मुर्ती) किंवा व्यक्तीवर सहजतेने चित्त एकाग्र होत असेल तर ही एक प्रकारची उपासनाच नाही का ?

नमस्कार सावट,
आपण कसे आहात?
परमात्म्याच्या कृपेशिवाय कोणतीही गोष्ट अशक्य आहे तिथे त्याचेच स्मरण त्याच्या कृपेशिवाय कसे घडावे?
मी जेव्हा इथे गुरुद्वारा मधे जाते, तिथे देवाची प्रार्थना करताना, 'नाम दी बक्षिश दे' असे परमात्म्याला विनवण्यात येते. तुझेच नाम घेण्याची, स्मरण करण्याची तुच बुद्धी दे.
आपल्याला वाटते नाही, की देवाचे नाम घेणे किती सोप्पेय? पण ते घडते का?
थोडक्यात नामसंकल्प, स्मरण ह्या गोष्टींसाठी त्याचीच कृपा हवी, ती कशी मिळवावी बरे?

त्याचीच कृपा हवी, ती कशी मिळवावी बरे?>>
मी कोण मिळवणारा/री तूच कॄपा कर आणि मला पदरात घे अशी मनाची स्थीती झाली की होते त्याची कृपा!

सावट नमस्कार!

नमस्कार, माधवा!
महेश, 'बंदीवान' हे नितीन यांनीच लिहलेल आहे... त्यामूळे 'महान' ते आहेत!:)
गौरी, अगदी खरे आहे... प्रश्न असा आहे की, स्मरणाकरिता कशाचा उपयोग होतो? Happy

बुरा ढुंढने मै चला,बुरा न मिलीया कोई |
अपने अंदर झांकता,मुझसे बुरा न कोई ||

श्रीसंत कबीर महाराजांचा हा दोहा पाहील्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते...ती म्हणजे... आपण जर आपल्यावर आलेल्या... येणार्‍या दु:खाचे ’मूळ’ कारण शोधायला जाऊ तर असे लक्षात येते की..ते कारण ’म्हणजे’ आपल्यातलेच ’दोष’ आहेत.

....याचाच सरळ अर्थ असा आहे की आपल्याला जगाची...त्यात असणार्‍या...नांदणार्‍या विविध विषयांची...ते विषय भोगल्या नंतर येणारी ... अंतिम अनुभूती ही दु:खमयच असते.... आणि अशी अनुभूती येण्याचे मूळ कारण म्हणजे आपल्यातीलच दोष आहेत.

पण जो पर्यंत आपल्याला या सुखाचा आभास निर्माण करणार्‍या... दु:खाचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व थोर संतमंडळींनी कितीही वेळा...वेगवेगळ्या प्रकारे सांगितले तरिही ते पटत नाही.( हाच तो ’दोष’ आहे.) आणि जो पर्यंत आपल्याला हे पटत नाही... तो पर्यंत आपली परमार्थाची सुरुवात काही होत नाही... असे शास्त्र सांगते.

श्रीसंत हे कायम ’पुर्णार्थानेच’ बोलत असतात... पण आपल्या तथाकथित बुद्धीचा जो ’जाणण्याचा’ गुण आहे..त्यानुसार आपल्याला ते सांगणे त्या ’अर्थाने’ समजत नाही..लक्षात येत नाही... कारण आपल्यातीलच ’दोष’!

आता समजा त्या श्रीभगवंताच्या दुर्मिळ कृपेमूळे आपल्यातीलच ’दोष’ लक्षात आहे तर... आपल्याला अजून एक ... त्या कृपेमूळे जाणवायला लागते.. ती म्हणजे.. आपल्याला आपल्या ’स्व’ प्रयत्नाने त्या ’दोषावर’ मात करता येत नाही. हे कळल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आता पुढे काय?

याच्या उत्तराकरिता आपल्याला.. जे अगोदर सारख्याच प्रश्नातून पुढे गेले आहेत.. त्यांना सापडलेल्या ’उत्तरावरच’ सर्वार्थाने अवलंबून रहावे लागते. म्हणजेच श्रीसंत काय सांगतात हेच पहायला पाहीजे..म्हणजेच श्रीसंत कबीरमहाराज, हे दोष जाण्याकरीता आपल्याला कोणता अमुल्य उपदेश करतात ते पहाणे जरूरी आहे...!

श्रीमहाराज आपल्या ’दोह्यात’ म्हणतात..

गुरु बिन ग्यान न उपजै गुरु बिन मिले न मोष ।
गुरु बिन लखै न सत्य को गुरु बिन मिटै न दोष ॥ क. सा.२.११ ॥

श्रीमहाराज एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत.... ते म्हणतात श्रीसद्गुरुशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही... जो पर्यंत त्यांची कृपा(शक्ती-माधव लक्षात घ्यायचा मुद्दा) होत नाही तो पर्यंत ’सत्याचा’.. आत्मस्वरुपाचा साक्षात्कार होणार नाही... तो पर्यंत ’मोक्ष’ ही होणार नाही... ती कृपा जर झाली नाही तर आपल्यातले ’दोष’ कदापी जाणार नाहीत.

याचाच अर्थ हे ’दोष’ हे श्रीसद्गुरुकृपेशिवाय जाऊ शकत नाहीत.. हे आपण आपल्या बुद्धीने जाणून कायमचे अधोरेखित करून ठेवावयास पाहीजे.. हे नक्कीच!

असे असताना ... असा उपदेश करत असतानाच श्रीसद्गुरुकबीर महाराज पुढे म्हणतात...

गुरु बिचारा क्या करै शब्द न लागै अंग ।
कहैं कबीर मैली गजीं कैसे लागे रंग ॥ क. सा. ३.२४ ॥

फ़ारच सुंदर..मार्मिक उपदेश आहे.. ’शब्द’ आणि त्या शब्दाचे अंग’ या श्रीसंत कबीर संप्रदायातल्या.. रामसेनेही संप्रदायातल्या फ़ार गूढ गोष्टी आहेत.. त्या अनुभवाव्या लागतात.

म्हणजेच जर आपला अधिकार नसेल..आपल्यात ’दोष’ असतील तर श्रीसद्गुरुनी करूणेने जरी कृपाकेली तरिही त्याचा अनुभव येण्याकरिता.. दोष जाण्याकरिता... मळलेल्या.. डाग पडलेल्या कपड्याला जर दुसरा रंग द्यावयाचा असेल तर.. अगोदरचे डाग-धब्बे जावे लागतील... आपल्या कपडारुपी चित्तावर.. आपल्याच पुर्वकर्मानुसार असणारे दोषरुपी संस्कार अगोदर जायला हवेत... तरच श्रीभगवत्प्रेमाचा ’रंग’ त्याला चढू शकेल.( अन्यथा नाही!)

म्हणजे ’कॄपा’ ही अधिकारानुसारच..दोषानुसारच स्थिरावते.

अजब त्रांगड आहे... आपणच दोषी आहोत जे अगोदर जाणवावयास(कृपेने) पाहीजे... हे ’दोष’ जाण्याकरीता श्रीसदगुरू भेट.. कृपा झाली पाहीजे...पण ही कृपा अधिकारानूसारच..म्हणजे दोषानुसारच होते... कशा सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतल्या आहेत.सुरुवात कोठून करायची.. शेवट काय आहे?:)

धन्यवाद!

हसरी,

>>>तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही

>>> हे निट पटवुन सांगा ना? मला नाही कळलं

आता तुमच्या लक्षात आल असेल की, आपल्यातल्या दोषामूळेच आपल्याला लोक तसे दिसतात... ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाची दुनिया... बंदीशाळा!(नितीन लक्षात घ्यायचा मुद्दा..:) )

म्हणूनच आपण मागे पाहील्यानुसार ...अहं ब्रम्हास्मि... 'मी' म्हणजे 'ब्रम्ह' आहे.. हा बोध अगोदर व्हायला पाहीजे. दुसर्‍यात 'देव' पहावा हे व्यवहारीक अर्थाने ठीक आहे.. पण शास्त्र दृष्ट्या असा अनुभव अगोदर कधीही येत नाही... अगोदर आपल्यातला 'देव' आपल्याला अनुभवता आला पाहीजे...मगच इतरत्र असणार्‍या... सर्वव्यापी 'देवाचा' अनुभव येऊ शकतो.(अन्यथा नाही.):)

म्हणूनच दुसर्‍यातले 'दोष' दिसण्याऐवजी.. ज्याला स्वतःमधील 'दोष' दिसतात तो शहाणा! म्हणजेच 'उलट' अर्थाने...

तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही. Happy

धन्यवाद!

महेश,

>>>मनात सतत त्या व्यक्तीचे अनुसंधान असेल तर हे असे प्रेम खरे प्रेम समजावे का ?
असे प्रेम हे भक्तीची पहिली पायरी असू शकते का ?

>>>कोणाचीही कोणाशीही तुलना करत नाही, पण मीरेची भक्ती ही प्रेमयोग भक्तीच होती ना ?

श्रीसंतमीराबाईंची 'भक्ती(सप्रेमा-प्रेमासहीत)' श्रेष्ठ का होती ?... आणि आपल 'प्रेम'(भक्तीरहीत) का नाही? या आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर श्रीभगवंतांच्या तोंडून ऐकू..म्हणजे शंकेला जागाच रहाणार नाही..!:)

श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये...श्री उद्धवगीतेमध्ये श्रीउद्धवांना केलेल्या
अमुल्य उपदेशात, श्रीभगवंतानी सांगितल्यानुसार... म्हणजेच 'श्री एकनाथी भागवताच्या' चवदाव्या अध्यायात 'श्रीसंत एकनाथ महाराज' म्हणतात त्याप्रमाणे...

श्रीउद्धवांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे.. तो म्हणजे..

उद्धव म्हणे गा श्रीपती । मोक्षमार्गीं साधनें किती ।?

हे समजावताना श्रीभगवंतांनी जे सांगितले आहे.. त्यातील काही भाग खालील प्रमाणे..

श्रीभगवंत म्हणतात... उद्धवा...

सांडूनि विषयावस्था । मद्‌रूपीं लागल्या चित्ता ।
भक्तासी होय मद्‌रूपता । स्वभावतां निजबोधें ॥९२॥

'विषय' सांडून माझ्याच रुपासी लागलेल्या 'चित्तास'... निजबोधामूळे... आत्म-अनुभूतीमुळे, स्वभावताच... नैसर्गिकपणे..'मजरुपता' प्राप्त होते. ( चित्ताला लाभलेल 'रुप' हे श्रीभगवंताचच पाहीजे... अन्य कोणतेही नाही.)

लोह एकांगें स्पर्शमणी । लागतां सर्वांग होय सुवर्णी ।
तेवीं मद्‍भक्त माझ्या ध्यानीं । चिद्‌रूपपणीं सर्वांग ॥९३॥

'ध्यान' हेही 'माझच' पाहीजे...तरच 'सर्वांग' सुवर्णाच(चिद्-रुपी) होईल.. ( अन्यथा नाही )

निष्काम निर्लोभ निर्दंभ भजन । निर्मत्सर निरभिमान ।
ऐशिया मद्‍भक्तांसी जाण । माझें सुख संपूर्ण मी देतों ॥१०१॥

श्री भगवंताचे 'आनंद' रुप पाहीजे असेल तर 'काम-लोभ-दंभ-मत्सर-अभिमान' रहीत 'भजन'... श्रीभगवंताचेच भजन झाले पाहीजे! (अन्य कोणाचे नाही.. अन्य कसेही नाही.)

माझे ठायीं अर्पितचित्त । ऐसे माझे निजभक्त ।
माझेनि सुखें सुखी सतत । ते अनासक्त सर्वार्थीं ॥११५॥

श्रीभगवंताच्या ठायी 'चित्त' अर्पण व्हायला पाहीजे...ते वरील सगळे चित्ताचे 'दोष' गेल्याशिवाय शक्य होत नाही... त्यावेळीच 'अनासक्ती' हा गुण प्राप्त होतो.( अन्यथा नाही)

माझ्याठायीं नित्यभक्ती । आणि लोकलोकांतरआसक्ती ।
ते भक्ति नव्हे कामासक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥११६॥

श्रीभगवंताच्याठायी नित्य-भक्ती असेल(म्हणजे आपल्याला..आपल्या मनाला.. तस वाटत असेल)... पण आसक्ती जर लोक्-परलोकातील सुखाची असेल तर त्याला 'भक्ति' न म्हणता ...ती 'कामासक्तिच' आहे.. असे जाण ..असे श्रीभगवंत, श्रीउद्धवांना निश्चीतपणे सांगत आहेत.

धन्यवाद!:)

महेश,
>>>
समजा माझे एखाद्या व्यक्तीवर निरतिशय निरपेक्ष प्रेम आहे,
त्या व्यक्तीचे विचार मनात आले की चित्त एकाग्र होऊन जात असेल,....मनात सतत त्या व्यक्तीचे अनुसंधान असेल तर हे असे प्रेम खरे प्रेम समजावे का ?
एखाद्या वस्तु (मुर्ती) किंवा व्यक्तीवर सहजतेने चित्त एकाग्र होत असेल तर ही एक प्रकारची उपासनाच नाही का ?

याविषयी श्रीभगवंत श्रीउद्धवांना काय सांगतात ते पाहू... (निरपेक्ष, प्रेम,अनुसंधान आणि भक्ति या शब्दाकडे पुर्णावधानाने पाहू)

साधूनि माझिया अनुसंधाना । परलोक नातळे वासना ।
धिक्कारी पैं ब्रह्मसदना । इतर गणना कोण पुसे ॥श्री ए.भा.१४.८७॥

साधलेले 'अनुसंधान'...श्री भगवंताचेच पाहीजे...परलोकातील...अगदी ब्रम्हलोकातील-सत्यलोकातील सुखाचा उपभोग मिळावा... अशी वासना चित्तात न उमटता( स्वभावताच)...

ऐशिया गा निरपेक्षता । माझेनि भजनें सप्रेमता ।
तेथ मी जाण स्वभावतां । प्रकटें तत्त्वतां निजरूपें ॥८८॥

अशा 'निरपेक्ष' चित्ताने... पण अजून एक अट आहे.. ती म्हणजे ... जे चित्त माझ्याच सप्रेम भजनात निरंतर दंग आहे.... त्याच चित्तात मी, माझे तात्विकरुप.. म्हणजेच 'भक्ति'.. माझ्या सहज स्वभावामुळे प्रकट करतो.

>>>असे प्रेम हे भक्तीची पहिली पायरी असू शकते का ?
>>>एखाद्या वस्तु (मुर्ती) किंवा व्यक्तीवर सहजतेने चित्त एकाग्र होत असेल तर ही एक प्रकारची उपासनाच नाही का ?

एखाद्याची जर चित्ताची एकाग्रता विनासायास होत असेल तर.. त्याला कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही.... कारण साधनाचा उपयोगच मुळी... चित्ताची स्थिरता साधण्याकरिता होतो. .... यावरून चित्ताची अखंड एकाग्रता ही फारच पुढची पायरी आहे आपण लक्षात घ्यायला पाहीजे. आपला जन्मच मुळी पाप-आणि सकाम पुण्य याच्या मिश्रणातून झालेला असतो..म्हणजेच..आपल्या चित्तात अजून वासना (सुप्त) असतातच हे ही आपण लक्षात घ्यायला पाहीजे... म्हणजेच श्रीभगवंताना अपेक्षित असणारी चित्त्-एकाग्रता ही असे संस्कारयुक्त चित्त साधू शकत नाही... हे त्या चित्ताच्या स्वभावताच-नैसर्गिकतेनेच आहे.

अस अखंड..एकाग्र चित्त्...जर श्रीभगवंताच्या चरणीच होत असेल तरच अशा चित्तात श्रीभगवंताविषयी 'प्रेम' उत्पन्न होते...आणि त्यामूळे जी भक्ती उत्पन्न होते तिलाच 'सप्रेमाभक्ती' म्हणतात. अशी भक्ती आणि त्याकरिता लागणारी 'उपासना' ही 'दानातच' मिळते.... दुसर्‍याकडून... म्हणजे अर्थात श्रीसद्गुरुकडूनच..श्रीभगवंताच्या कृपाशक्तीकडून ! अन्य कोणत्याही उपायाने कदापि नाही... हे 'सत्य' आपण लक्षात घेतले पाहीजे.

असो...! तुमचे प्रश्न छान होते! Happy

धन्यवाद!

सावट, मन:पुर्वक धन्यवाद !
तुम्ही जे स्पष्टीकरण लिहिले ते वाचून पुनश्च अंगावर रोमांच उभे राहिले. कारण मी मागे म्हणालो होतो त्याप्रमाणे वाचताना मी ते visualize करू शकत होतो. प्रत्यक्ष अनुभूतीला किती जन्म लागतील माहित नाही. तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळते आहे हे आमचे भाग्यच.

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा !

सावट, _/\_ धन्य !

तुमचं एकनाथी भागवत व इतर ग्रंथ तोंडपाठ आहेत का हो? एक एक ओवी तुम्हाला अगदी चपखल बसेल अशा ठिकाणी बरोब्बर आठवते Happy

सावट्जी,

आता तुमच्या लक्षात आल असेल की, आपल्यातल्या दोषामूळेच आपल्याला लोक तसे दिसतात... ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाची दुनिया... बंदीशाळा!(नितीन लक्षात घ्यायचा मुद्दा.. )

मला हवी आहे मानसपुजा बाबत माहिती.

वरिल संदर्भ समजला नाही.

बोला, सब संतनकी जय! त्यांच्यामूळेच आपल्याला हे सगळ कळतय! 'धन्यवाद' त्यांचेच आणि 'धन्य'ही तेच!! Happy

धन्यवाद नितीन... आपल्या प्रश्नाबद्द्ल!

'मानसपुजा' ही 'मनाने' करावयाची असते... 'मनात' नाही! म्हणजेच या पुजेत.. मन हेच 'पुजा करणारा' (साधक)कर्ता असत.. त्याच बरोबर ज्या साधनांनी पुजा करायची ती 'साधन' ही 'मनच' होत.. आणि ज्याच्याकरिता पुजा करायची ते 'साध्य' ही मनच होत!

म्हणजेच 'मनाशिवाय' ही पुजा करता येत नाही. त्याकरीता मनाची एकाग्रता साधायला पाहीजे.. हेच या 'पुजेने' साधल जात!

आपला वरिल 'विषय' हा त्याच मनाच्या-चित्ताच्या एकाग्रतेविषयीच चालला आहे.

दुनिया...बंदीशाळा वाटणे याला 'मनच' जबाबदार असत! 'मनाच संकल्प्-विकल्प करणे'.. हेच दु:खाचे...बंदीवान वाटण्याचे.. मूळ आहे, असे शास्त्र सांगते. 'मन' थांबले की श्रीभगवंताच्या 'आनंद' स्वरुपाची अनुभूती येते.

असो...

तुम्हाला मानसपुजेची 'ओढ' लागण्याचे कारण काय आहे.. हे कृपया सांगाल काय?:) आणि अजून एक विनंती आहे.. आपण 'धर्म' या नावाने लिहलेल कृपया इथे 'पेस्ट' कराल काय?

धन्यवाद!

|| उपासनेचा मोठ्ठा आश्रयो | उपासनेवीण निराश्रयो |
उदंड केल्याही जयो | होणार नाही || श्री राम || -- समर्थ रामदास ||

सावटजी कविता खाली लिहली आहे.

मला लहानपणा पासुनच भगवतभक्तीची ओढ आहे. भजन किर्तन यात मन रमते. सगुण रुपात पुजा करायला वेळ होत नाही. सध्या रोज २.५ तास प्रवास करावा लागतो. किमान सकाळी बसायला बस मधे जागा मिळते. अश्यावेळी मानसपुजा करतो. हा उपक्रम गेले सहा महिनेपेक्षा अधीक काळ सुरु आहे. या शिवाय सदगुरुंच्या मुर्तीचे दर्शन आणि त्यांच्या चरित्राचे वाचन हा उपक्रम ही गेले १८ वर्षे सुरु आहे.

मानसपुजा आणखी चांगली व्हावी या साठी मार्गदर्शन व्हावे हि विनंती.

धर्म

अजस्त्र वृक्ष जेव्हा बांडगुळ घेऊन उभा असतो.
त्याला माहित असते, ही आयुष्याला लागलेली किड आहे.
अजस्त्र वृक्षाची एक फांदी जेव्हा कुर्‍हाडीचा दांडा बनते.
त्याला माहित असत हीच आपल्या अंताची नांदी आहे.

सामवुन घेणे आणि जे जे जमेल ते ते देणे
हाच धर्म जाणुन तो वृक्ष हे करत असतो.

त्याला हे माहित असत, आपलही आयुष्य हे क्षणभंगुर आहे.
वादळाच्या लाटेत हे संपु शकत.
तोवर व्हाव सहारा, बांडगुळांचा, पक्षांचा आणि मानवाचा.

त्यांच्या लेखी नसेल कृतज्ञता म्हणुन काय मी माझा धर्म सोडायचा ?
विधात्यान मला हाच धर्म सांगितलाय, तो का म्हणुन मोडायचा ?

उगवेल तो सुदिन जेव्हा प्रत्येकाला आपला धर्म समजेल.
आपुलकी, कृतज्ञता आणि प्रेम उपजेल.
पाहिन मी वाट जन्मोजन्मी या क्षणाची
निष्ठा आहे धर्मावर, अनंत जन्म माझी.

नितीनजी नमस्कार आणि धन्यवाद,
कृपया माफ करा...!

हसरी यांना पण सुरूवातीला असाच प्रश्न पडला होता...आपणही 'मानसपुजा' ही उपासना, 'वेळेच्या अभावी' करायचे असे ठरविले आहे. पण ही 'उपासना' उपासकाने करताना... आपले 'उपास्य' काय आहे हे ठरविणे महत्त्वाचे आहे... म्हणजेच ही 'साधना' करताना आपल्याला(साधकाला) आपले 'साध्य' काय आहे हे पहील्यांदाच...सुरुवातीलाच ठरविणे भाग आहे... केवळ 'वेळ' नाही म्हणून ही 'उपासना' करतो.. हे 'कारण' ... आपल्या साध्याला सहकारी होऊ शकत नाही.... हे अति विनम्रपणे आपल्या ध्यानात आणू इच्छीतो... कृपया काही चुकल्यास क्षमा करावी.

पाहिन मी वाट जन्मोजन्मी या क्षणाची
निष्ठा आहे धर्मावर, अनंत जन्म माझी.

तो 'क्षण' लवकरच आपल्याला गवसो आणि आपली धर्मावरची 'निष्ठा' अखंडीतता धारण करो.. हीच श्रीस्वामी चरणी सविनय प्रार्थना.

धन्यवाद!

नितीनजी,

आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल...ती म्हणजे अगदी सुरुवाती पासून या चर्चेत आपण अजूनही फक्त 'साध्याचाच' विचार करत आहोत... कारण ते महत्त्वाचे आहे...त्याकरीता 'साधन' काय पाहीजे या चर्चेपर्यंत आपण अजूनही आलो नाही आहोत.:)

असो..!

श्री प.पू. सद्गुरू श्रीज्ञानेश्वरमाऊली आपल्या श्रीज्ञानेश्वरीत या 'मानसपुजे' विषयी काय म्हणतात ते थोडेसे पाहू...

आणि अभ्यंतरीलियेकडे| प्रेमाचेनि पवाडे| श्रीगुरूंचें रूपडें| उपासी ध्यानीं ||श्री ज्ञा. १३.३८५||
हृदयशुद्धीचिया आवारीं| आराध्यु तो निश्चल ध्रुव करी| मग सर्व भावेंसी परिवारीं| आपण होय ||३८६||

प्रेमाने...श्रीगुरुंचे 'रुपडे' ध्यानात उपासनारा... शुध्द अंतःकरणच्या आवारात आपले 'साध्य-आराध्य', ध्रुव तार्‍यासारखे निश्चल करून... मग आपले सर्व 'भाव' एकत्र करून श्रीसद्गुरुंचा संप्रदाय-परिवार आपणच होऊन....

आणि अशी स्थिती 'प्रेमामूळे' होत असेल तर पुढे काय होते....

ऐसें प्रेमाचेनि थावें| ध्यानचि ध्यानातें प्रसवे| पूर्णसिंधु हेलावे| फुटती जैसे ||४०२||
किंबहुना यापरी| श्रीगुरुमूर्ती अंतरीं| भोगी आतां अवधारीं| बाह्यसेवा ||४०३||

"ध्यानचि ध्यानातें प्रसवे"... अशा ध्यानातून अजून एका ध्यानाचा 'जन्म' होतो(हीच ती आपल्याला हवी असणारी मानस-पुजा)... आणि नंतरच त्याचे शरीर श्रीसद्गुरूंच्या 'बाह्य' सेवेत आवडीने-अवधानाने रमते आणि 'अंतरी' निश्चल- अखंडीत श्रीगुरुमुर्ती- ध्यान भोगले जाते.

आपल्या आता लक्षात आले असेलकी श्रीभगंताविषयी 'प्रेम' आणि अंतःकरण (आतील इंद्रिये) शुद्धी...या शिवाय हे मानस-ध्यान-पुजा सुरू होत नाही...! म्हणूनच यातून अजून एक महत्त्वाचा 'प्रश्न' समोर उभा रहातो...तो म्हणजे हे 'प्रेम' कसे उपजते? आणि आपल्याच आतल्या 'करणांची' शुद्धी कशी करायची... ?अर्थात त्याचे 'साधन' काय? Happy ही 'पुजा' जर 'मनाने'... म्हणजे मनाचा उपयोग करून... व्हायला पाहीजे... तर मग 'मनावर' आपला ताबा असतो का? जर नाही तर अगोदर तो 'ताबा' असणे, ही अवस्था कशी येईल हे पहाणे जरूरी आहे.. नाही काय? Happy

धन्यवाद!

नितीनजी,

हा अंतःकरणाचा 'शुद्ध' पणा कसा असतो..या विषयी श्रीमाऊली पुढे म्हणतात.

परिसा परिसा श्रीकृष्णु| जो भूतभारसहिष्णु| तो बोलतसे विष्णु| पार्थु ऐके ||श्री ज्ञा.१३.४६१||

लोखंडाचे सोने करणारा परिस... आणि त्या परिसास.. परिसत्व बहाल करणारा 'परिसाचा परिस' असे श्रीभगवंत...ज्यांनी सर्व भूतांचा भार आपल्या अंगच्या-उपजत सहिष्णुतेमूळे सहज धारण केलेला आहे.. असे श्रीभगवानविष्णु ..अतिकरुणेने सांगत आहेत आणि श्रीपार्थाचे अवधान- श्रवण ही त्याच तोडीचे आहे... जणू श्रीभगवंतानी सांगाव आणि श्रीपार्थाचे भाव-अवस्थाही अगदी तशीच लगेच व्हावी...

म्हणे शुचित्व गा ऐसें| जयापाशीं दिसे| आंग मन जैसें| कापुराचें ||४६२||
कां रत्नाचें दळवाडें| तैसें सबाह्य चोखडें| आंत बाहेरि एकें पाडें| सूर्यु जैसा ||४६३||
बाहेरीं कर्में क्षाळला| भितरीं ज्ञानें उजळला| इहीं दोहीं परीं आला| पाखाळा एका ||४६४||

हे शुचित्व-शुद्धता ज्याच्याकडे असते,त्याचे 'मन' कापरासारख्रे झालेले असते.. म्हणजे कसे.. बाहेरून 'विहीत-कर्मे' क्षाळणारा आणि आतून 'आत्मज्ञानाने' उजळलेला असा...

किंबहुना इयापरी| बाह्य चोख अवधारीं| आणि ज्ञानदीपु अंतरीं| म्हणौनि शुद्ध ||४६७||

म्हणूनच त्याला 'शुद्ध' म्हणायचे... अन्यथा.. एरव्ही...

एऱ्हवीं तरी पंडुसुता| आंत शुद्ध नसतां| बाहेरि कर्म तो तत्त्वतां| विटंबु गा ||४६८||
मृत जैसा शृंगारिला| गाढव तीर्थीं न्हाणिला| कडुदुधिया माखिला| गुळें जैसा ||४६९||
वोस गृहीं तोरण बांधिलें| कां उपवासी अन्नें लिंपिलें| कुंकुमसेंदुर केलें| कांतहीनेनें ||४७०||

आतील 'शुद्धता' नसताना... नुसते बाहेरून चांगलीकर्मे(?) 'मी' करतो असे म्हणणारा असेल तर... या परिस्थितीचे वर्णन करताना श्रीमाऊली म्हणतात.. की अशी 'कर्मे' म्हणजे जणू मृताला सजवल्यासारखी.. गाढवाला तिर्थाने न्हावू घातल्यासारखी.. कडू-दूध भोपळ्यास गुळाने माखल्यासारखी... ओसाड घरास तोरण बांधल्यासारखी... उपवासी माणसाच्या शरीरा बाहेरून अन्न लिंपल्यासारखी... नवरा नसणार्‍या स्त्रीने सौभाग्यालंकार धारण केल्यासारखी... निरर्थक असतात. उलट ही सर्व कर्मे 'मी' या अहंकाराने झाल्यामूळे त्याचे 'फळ' भोगावयास लावतात... असे श्रीमाउली म्हणत आहेत.

म्हणूनच आपणही हे 'शुचित्व' कसे मिळवता येईल याचाच विचार करणे महत्त्वाचे आहे, नाही काय?:)

म्हणूनच श्रीमाऊली एक महत्वाचा शास्त्रसिंद्धांत पुढे सांगत आहेत..त्याकडे पुर्ण्-अवधान देणे जरूरी आहे..

म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें| मग बाह्य लाभेल स्वभावें| वरी ज्ञान कर्में संभवे| ऐसें कें जोडे ? ||४७३||

अंतरी 'आत्मज्ञान अगोदर व्हावयास लागते.. मगच बाहेरची कर्मे आतीला स्वभावाप्रमाणेच 'शुद्ध' होतील.. अन्यथा कदापि होणार नाहीत!:)

धन्यवाद!

Pages