अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

je pahilay te avishvasaniy ahe.. details somvar paryant lihoto..>> सही... वाचण्यास प्रचंड उत्सुक !

शुक्रवारी संध्याकाळी नगर मधील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ मंदिरात गेलो होतो. इथे भुत बाधा निवारण्यासाठी अनेक लोक येतात किंवा त्यांचे आप्तजन घेऊन येतात. चैतन्य श्री कानिफनाथांनी सर्व प्रकारची भुते वश करून घेतलेली असल्याने इथे भूतांचा जोर चालत नाही असे अनेकजण मानतात.

इथे पोचलो तेंव्हा अनेक लोक दर्शन घेऊन संध्याकाळच्या आरतीसाठी मंदिराबाहेर पटांगणात बसले होते. कुठल्याही मंदिराबाहेर दृश्य असते तसेच साधारण दृश्य होते. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यावर काही मिनिटात आरती आधीचे नगारे सुरू झाले. जस-जसे त्यांचा आवाज वाढत गेला तास-तसे अनेक लोकांच्या विचित्र हातवारे सुरू झाले. अंआत्ता पर्यंत शांत बसलेली अनेक लोक अचानक झपाटल्यागत मंदिराकडे सरकू लागली. कोणी उठून, कोणी बसून सरकत तर काही चक्क रांगत-लोळत. काही पळून जाऊ पाहत होती पण त्यांना ते करता येईना.

ही सर्व लोक (त्यांच्यातील भुते?) असंबंध बोलू लागली. ओरडू लागली आणि चक्क हे शरीर सोडून जाऊ, आमची चूक झाली अशी भाषा बोलू लागली. माझं तर अजिबात विश्वास बसत नव्हता. पण मी अश्या अनेक लोकांच्या २-३ फुटावर बसून हे सर्व पाहत होतो. हे काय सुरू आहे मला आधी समजेना... असे काही पाहिल्यावर आपला अमानवीय गोष्टींवर विश्वास का बसणार नाही?

कोणाला हा अनुभव घ्यायचा असल्यास कुठल्याही अमावास्येला संध्याकाळच्या आरतीसाठी श्री क्षेत्र मढी (पाथर्डी, नगर) येथे जाऊन खात्री करून घ्यावी...

सेनापती, ते ठिकाण अभ्यास करण्या सारखे आहे...रोजरोज तीचतीच मणसे असतात का? ते पहावे लागेल. त्यासाठी रोज तिथे जावे लागे...सलग १५-२० दिवस तरी....बधीत लोकांवर नजर ठेवावी लागेल... त्यांचे चेहरे लक्षात घावे लागतील. शक्य असल्यास कॅमेर्‍यात 'शुट' करुन ठेवा.

बाकी नंतर....

एखाद्या ठिकाणी अस्वस्थ उदास वाटत असेल तर तिथे नक्कीच अमानवीय वावर असण्याची शक्यता असते अश्यावेळी कुलदेवतेचे नामस्मरण करावे व तिथुन लवकरात लवकर निघावे असे माझे आजोबा सांगायचे.अमावस्या जवळ आली की अनेकदा आजोबांना आमच्या रानात विचित्र आकाराचे मोठ्या पायाचे ठसे दिसायचे. गावातले अनेक जाणकार लोकसुद्धा ते ठसे कोणत्या जनावराचे आहेत हे सांगू शकले नाहित.शेवटी देवार्यातले पाणी तिथे शिंपडायला सुरवात केल्यावर हा प्रकार बंद झाला.आता आजोबाही हयात नाहीत व ते रानसुद्धा आम्ही विकले.

अंगात येणे सायकोलॉजीकल आहे. >>> म्हणजे? थोडे अधिक स्पष्ट कराल का? मला समजले नाही.
>>>>>>

अनेकदा मनावर अनेक ताण असतात. ते सांगण्या सारखे नसतात. किंवा व्यक्त केले जात नाहीत. ज्या व्यक्ती ला हे ताण असतात त्यालाही ते जाणवत नहीत. मग देवाचा आधार घेतला जातो. नकळत पणे तो माणुस त्यालाच आपले खरे रुप समजायला लागतो. मग, आजुबाजुचे जग बदलते. लोक जास्त काळजी घ्यायला लागतात. भुतबधा हा ही एक स्प्लिट पर्सनॅलिटीचा प्रकार आहे. भास होणे, आपल्यात कोणाचे तरी अस्तित्व आहे असे वाटणे, हे सगळे मनावरील ताणा मुळे होते. त्या वेळी अंगात प्रचंड उर्जा येते. खुप शक्ती येते. माणसे अघोरी आणि अचाट पराक्रम करु शकतात. येत नसलेल्या भाषा बोलतात. मेंदुचे अनेक व्यापार आपल्याला अनाकलनीय आहेत.( संदर्भ : डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट ह्यांचे लेख व पुस्तके)

सगळ्याच भुतबाधा अश्या असतात असे मी म्हणणार नाही. पण ९०% वेळा ते मानसिक असंतुलनच असते. जसे व्यसन हे मानसीक असते तसेच. देवावर किंवा भुतावर विश्वास ठेवणे खुप पटकन आपल्या समाजात होते. त्या मुळे त्या व्यक्ती च्या मताला किंमत येते. हे जाणुन बुजुन होत नाही. नकळत होते. त्याला स्वतःला सुध्धा ते समजत नाही.

मी अश्या दोन केसेस बघीतल्या आहेत. माझ्या मैत्रिणिच्या आईच्या अंगात देवी येत असे. त्या वेळी ती अक्षरशः रणचंडीका होत असे. एरवी एकदम साधी. नंतर कळले तिच्या आईच्या अंगात येत असे. आणि ती आई मरताना म्हणायची की हा वारसा माझी मुलगी चालवेल. दुसर्‍या केस मध्ये एक मुलगी घरात चालताना कधीही भेगेवर पाय देत नसे. म्हणजे टाईल ला टाईल जोडताना होणारी भेगही तिला चालत नसे. चुकुन जर पाय पडला तर ती तो धुवत असे. हा एक चाळाच लागला होता तिला. नंतर समजले की तिची आई तिला फारसे महत्व देत नसे, ते मिळवण्या साठी हा चाळा. आर्थात खुप मानसोपचार करावे लागले.

अंगात येणे सायकोलॉजीकल आहे. >>> पण मग त्यांना आपल्या काहि गोष्टी कशा समजतात?

माझा १ अनुभव देते. नवरात्रीत अष्टमीला घागरी फुंकतात ते पहायला मी व आई गेलो होतो. योगायोगाने माझ्या मैत्रीणीची आईच तेथे होती. आईने काकुंना कुंकु लावले व निघालो तर त्यांनी आईला थांबवुन सांगीतले की, तु गजानन महाराजांचे पारायण करायचे थांबवले आहेस तु परत सुरु कर. (आईने खरच काही कारणाने थांबवले होते तेव्हा).

मलाही काही उपदेश मिळाला होता. (जो उपदेश मला का केला हेही मला माहिती आहे पण, जनरलाईझ्ड वाटु शकतो म्हणुन येथे देत नाही).

त्यानंतर काही दिवसांनी, मी मैत्रीण व काकु दोघींजवळ देखिल हा विषय काढला. मैत्रीणीचे सोडा पण काकुंना याआधी आईच्या पारायणाबद्दल माहिती नव्हते व मी विचारले तेव्हा त्या प्रसंगाबद्दल काहि आठवत नव्हते. मैत्रीणिनेही सांगितले की त्यांना अंगात येते त्यावेळेचे नंतर काहि आठवत नाही.

हा एक योगायोग असु शकतो. बहुतेकदा ते जनरल असते. मला पण माझ्या मैत्रिणिच्या आई ने सांगीतले होते की "तुझ्याच क्षेत्रातला नवरा मिळेल." तेंव्हा तर मी कॉलेजात होते. नंतर खरच झालं. मला माझ्याच क्षेत्रातला नवरा मिळाला. पण हा एक योगायोग होता.

खरच झालं. मला माझ्याच क्षेत्रातला नवरा मिळाला. पण हा एक योगायोग >>> म्हणुनच मला जे सांगितले ते मी लिहिलेच नाहिय. पण आईला जे सांगितले ते नक्कीच स्पेसिफिक होते. कारण आईचे पोथी वाचणं सोडण्याचेही काही कारण होते.

नवरात्रात तर बायकांच्या सामुदायिक अंगात येते. माझ्या साबांच्या अन त्याआधी त्यांच्या नणंदेच्या अंगात येत असे. (?) Sad
हे लक्ष वेधून घेण्यासाठी अथवा घरच्यांवर वचक बसवण्यासाठी बहुतांशी असते. असो. मला एक सांगा कुणीतरी अंगात येणारीचे अंगात येणे पतीनिधनानंतर कसे काय बटन बंद केल्यासारखे थांबते? ऑ ? हो, ह्या दोघींचे ही तसेच थांबले. Happy मानसिक रोग हा. विकृती हा शब्द मी वापरणार नाही कारण आदरवाईज दोघी नॉर्मल होत्या. (एकीबरोबर १५ वर्ष काढली अन दुसरी (साबा) यांच्याबरोबर गेली १८ वर्ष आहे.) अन गंमत म्हणजे आत्याबाईंच्या अंगातले पतीनिधनानंतर संपले अन साबांच्या अंगात नंतर यायला लागले. याला काय म्हणायचे ? साबू निवर्तल्यानंतर हे अं.येणे बंद तर झालेच अन मला त्यांनी सांगितले की हे नवरात्र नवसाचे होते , अन तुला करायची गरज नाही.. कारण नोकरीमूळे अखंड दिवा वगैरे जमणार नाही.. इ.इ. इलेक्ट्रिक दिव्याची आयडिया पटली नाही. असोच.. Happy भूतगप्पा चालू द्या.. Happy

मग कदाचित त्यांन्ना असे काही इंटुएशन झाले असेल. असे होते कधी कधी. आपल्याला खुप स्ट्राँगली वाटते. आतला आवाज. जी अशी लोक असतात, त्यांचे अंतर्मन प्रचंड जाग्रुत असते. त्यांचा स्वतःशीच झगडा चाललेला असतो. अंतर्मनाची शक्ती अगाध आहे. (संदर्भ : मनोहर नाईक यांची कार्य शाळा, त्यांची पुस्तके, तसेच ह्या विचारधारे वरील अनेक पुस्तके)

अंतर्मन, हा एक अगाध विषय आहे. ज्यावर अनेक मान्यवरांन्नी लिहिलेले आहे. स्वतः स्वामी विवेकानंदा ना ही त्याच्या शक्तीचा प्रत्यय आला होता. त्यांच्या गुरुंन्नी त्यांन्ना त्याची प्रचिती दिली होती.

अनेकदा आपण "अत्यंतिक इच्छा" धरतो आणि ती पुर्ण करण्या साठी जिवाचे रान करतो. तेंव्हा हेच आपले अंतर्मन आपल्याला मदत करत असते.

>>अनेकदा आपण "अत्यंतिक इच्छा" धरतो आणि ती पुर्ण करण्या साठी जिवाचे रान करतो. तेंव्हा हेच आपले अंतर्मन आपल्याला मदत करत असते.

अनुमोदन.

पतीनिधनानंतर कसे काय बटन बंद केल्यासारखे थांबते? ऑ ?>>>

ह्याचाच अर्थ ते मानसीक असते. अनघा ...अनुमोदन.

अनेकदा घरच्यांवर वचक बसवणे, आपलं महत्व वाढवणे इ. कारणे ह्या मागे असतात. आपल्या कुटुंब पध्धती मध्ये अनेकदा अनेक जण कुढत आणि मन मारुन जगत असतात. त्याचं पर्यावसन कधी कधी अशा गोष्टीं मध्ये होतं. बरं त्यांन्ना डोक्यावर चढवण्यात आपला समाज आघाडीवर असतो. कधी कधी घेतलेले सोंग ही असु शकते.

वैष्णोदेवीच्या दर्शनास गेलेलो असताना एक बाई गाभार्‍यात पोचण्यासाठीच्या लाईनीत उभी राहता खेपीस तिच्या अंगात आले, एरवी तास दोन तास लागले असते दर्शनाला, तिला लोकांनी आपच वाट करून दिली. ती थेट आत गेली घुमत घुमत. मला तिचा असला राग आला, चढताना का आले नाही अंगात? आणि सहसा दर्शनानंतर आले असते तरी समजु शकतो पण अगदी लाईन बघताच, देवीला न पाहताच बरे अंगात आले हिच्या Angry

एकदा आम्ही वणीला गेलो होतो. त्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. त्यानिमीत्त तेथे मोठी यात्रा असते. (हे आधी माहिती असते तर गेलोच नसतो. जनरली आम्ही अश्या गर्दीच्यादिवशी जाणेच टाळतो)

एकतर तिथे अनेक पायर्‍या चढून जावे लागते. त्यात ही गर्दी, ढकलाढकल. हे कमी काय म्हणून दर मिनीटाला कोणा बाईच्या अंगात येत होते. मधेच पुरुषांच्यापण अंगात देवी येत होती.
आणि ह्याच "देव्या" आम्हा लोकांना ढकलून, चेंगराचेंगरी करत वर धावत जात होत्या. प्रसंगी कोणी चुकुनही त्यांच्या वाटेत आले तर त्यासाठी त्यांच्याहातात चाबुक, वेत, त्रिशुळ इ. आयुधे होती. लोकांना त्याचा "प्रसाद "भरपूर मिळत होता. सुदैवाने त्रिशुळाने कोणाला इजा नाही झाली. त्यांना मार्ग द्या तर मागुन अनेक माणसे "आई आली" करत पुढे घुसत होती, नाही रस्ता मोकळा सोडला तर वरुन हा "प्रसाद"!!

अखेर आम्ही दर्शन न घेताच तिथून परत आलो (शेवटी आपला जीव महत्वाचा). पण एक कळले नाही जी देवी "सर्वभुतेषु मातृरुपेण संस्थिता" आहे, ती आपल्याच लेकरांना चिरडत, मारत, तुडवत का जात होती.
(लेकरं म्हणजे आम्हीच नाही तर त्या गर्दीत अनेक तान्ही बाळे, लेकुरवाळ्या स्त्रिया, वृद्ध ही होते.)

मला वाटतं अमानवीय अनुभवकथनाकडे वळलेलं बरं. श्रद्धा-अंधश्रद्धांचे फाटे फोडू नयेत.

>>मला वाटतं अमानवीय अनुभवकथनाकडे वळलेलं बरं. श्रद्धा-अंधश्रद्धांचे फाटे फोडू नयेत.<<
अमानविय हे प्रकरण पण 'श्रद्धा-अंधश्रद्धां' यातच येतो.
ज्याने असे अनुभव घेतलेत त्याला वाटते की काहीतरी अमानविय शक्ती आहे. आणि ज्यानी नाही त्यांच्यासाठी केवळ भास किंव्हा अंधश्रद्धां.

मला म्हणायचंय स्वतःला आलेले अमानवीय अनुभव टाका. हे अंगात येणे वगैरे गोष्टींनी धागा भरकटेल.

मला म्हणायचंय स्वतःला आलेले अमानवीय अनुभव टाका. हे अंगात येणे वगैरे गोष्टींनी धागा भरकटेल.<<<< हो त्यासाठी जामोप्या धार्मिक मधे नविन धागा काढतील ना अंगात येणे....उगाच अमानवीय मधे कशाला वेगळा विषय घुसवता Proud

मी अनेक अमानवीय किस्से ऐकले आहेत त्यापैकी एक.माझा मित्र रत्नागिरीत एका ठिकाणी ऐक दिवसासाठी उतरला होता .दुसर्या दिवशी सकाळी त्याला लवकर जायचं होतं मुंबईकडे. परंतु दुसर्यादिवशी जेव्हा तो उठला तेव्हा दुपारचे दिड वाजले होते.तो पुर्ण निर्व्यसनी आहे त्यामुळे पिऊन झोपला होता असेही नाही.त्याच्यामते तो काहितरी पिशाच्चबाधेचा प्रकार होता.

या गोष्टीवर विश्वास ठेवायला कठिन वाटेल पण घटनाक्रम असा आहे . २० वर्षे झालीत पण अर्थ लागत नाही . माझ्या २ नंबरच्या बहिणीचे लग्न ठरले होते ती (४ बहिणीमध्ये) माझ्या पेक्षा 7 वर्षानी मोठी होती. Statistics मध्ये post graduate केले होते आणि कॉम्पुटर मध्ये बरेच कोर्सेस केले होते. तिचे mister PhD करून भारतात परतले होते . शिक्षण देण्याचे कारण कोणीही अंध्श्राधाळू नव्हते. तिच्या लग्नाआधी अशाच एका सरत्या दुपारी ती आणि मी अंगणात बसलो असताना ती म्हणाली तिकडे बघ , साप आणि सापाचे पिलू आकाशाकडे बघून रडत आहे . ती असे दोनदा म्हणाली. मी ९ व्या वर्गात होते. मला काहीही दिसले नाही अथवा रडनेही एकु आले नहीं. घरी आई आल्यावर तिला सांगितले . तिने थोडे आश्चर्य व्यक्त केले . जाणकारांना विचारले. तिथे मला काहीही दिसत नसताना ती नेमके काय बघत असेल ह्याचे अजुनही आश्चर्य आहे. २९ डिसेंबर ला लग्न झाले. नोवेंबर मध्ये मुंबईला बाळंतपण झाले . मुलगा गेलेला होता आणि पुढे १५ दिवसांनी बहिणीने माहेरी यायचे म्हणून हट्ट धरला . आल्यावर अवघी २ तास घरी होती . उलटी झाली म्हणून दावाखान्यात नेले तिथे तीन दिवसात ती गेली. मुंबईला तिला दरवाजात उभी असताना एक बाई आम्बा पुरताना दिसली अणि तुझेही माझ्या प्रमाने होइल असे ति बहिणीला म्हणाली. तिचे दिवस करताना नदीच्या वाळूत एक साप आला आणि संपूर्ण क्रियाकर्म होत पर्यंत तो तेथे होता असे बहिणीचे मिस्तर सांगतात. ति गेल्यानंतर आमचे घर एकदम मूक झाले . प्रथमच लिहित असल्याने बर्याच चुका आहेत . कृपया ,आशय लक्षात घ्यावा. चुकांकडे दुर्लक्ष करावे.

सेनापति, गोष्टी पटल्या नाहीत तर हरकत नाही. पण बहिणला zopalu बाधा नक्कीच नव्हती .माझ्या आइने घरात तीसरा आकस्मिक मृत्यु बघितला आहे . प्रथम १३ वर्षीय मुलगा नन्तर ३४ वर्षी विधवा अणि ४५ व्य वर्षी ही बहिण . आज आई ७५ वर्षांची घट्ट उभी आहे .यात कुठेही अथिशयोक्तिने सांगितलेले नाही अणि प्रसंगाचे समर्थन करीत नाही. कितेक वर्ष्ण दाबुन ठेवलेले लिहले.
आकस्मिक मृत्यु दुःख काय असते ते अनुभव येतो तेंव्हाच कालतो

Pages