वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !

Submitted by अगो on 3 October, 2009 - 23:35
weight loss apple

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी. आमच्या जवळच्या नात्यात ओबेसिटी आणि वेट लॉस कन्सलटंट तज्ञ डॊक्टर असल्याने त्यांच्या बोलण्यातूनही काही गोष्टी कळल्या होत्या. त्यावर शांत बसून विचार करुन माझ्यासाठी आहाराची एक दिशा ठरवून घेतली आणि वजन कमी करायच्या दॄष्टीने पावलं उचलली. सुरुवात केल्यापासून पहिल्या पाच महिन्यांत जवळजवळ पंधरा किलो वजन कमी झालं. त्यानंतरच्या तीन महिन्यांत तो वेग थोडा मंदावला पण तरीही वजन कमी होतंच राहिलं. या २६ सप्टेंबरपर्यंत अजून तीन किलो उतरुन एकूण अठरा किलो वजन कमी झालं. लग्नाच्या आधी जे वजन होतं त्याहीपेक्षा एक किलो कमीच झालं आणि अजूनही थोडं कमी करायचा माझा प्रयत्न असेल. मायबोलीवर एक-दोन जणींनी ह्या प्रवासाबद्दल लिही असं सुचवलं आणि खरंच वाटलं की हा अनुभव लिहावा. ह्यातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.

वजन कमी करताना कळीच्या गोष्टी म्हणजे आहार आणि व्यायाम. या पैकी लहानपणापासून व्यायामाची शरीराला फारशी सवय नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की व्यायाम अशा प्रकारचा निवडायचा जो आपल्याला व्यवस्थित झेपेल आणि वजन कमी केल्यानंतरही त्यात सातत्य राखता येईल. दिवसातला साधारण पाऊण ते एक तास व्यायामासाठी काढायचा असं ठरवलं. त्यात सकाळी दहा ते पंधरा मिनिटं थोडं स्ट्रेचिंग आणि हळूहळू वाढवत नेलेले सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार घालताना त्यातलं प्रत्येक आसन सावकाश, योग्य रीतीने होतंय ना याकडे मुद्दाम लक्ष दिलं. आणि सूर्यनमस्कारासारखा सर्वांगसुंदर व्यायाम नाही असं का म्हणतात ते अगदी पुरेपूर कळलं. माझा मुलगा लहान असल्याने संध्याकाळी नवरा घरी आल्यावर सातला जिमला जायचं असं ठरवलं. सुरुवातीला एलिप्टिकल करायचा प्रयत्न केला पण ते फार जड जातंय असं वाटलं. मग ट्रेडमिलवर पन्नास मिनिटं चालायचं ( साधारण साडे-तीन मैल प्रती तास या वेगाने ) असं ठरवलं. साधारण तीन मैल ( ४.८ किमी ) होतील इतका वेळ चालता आलं तर उत्तम.( बरेचदा घरी परतायची घाई असायची ) पण ते नाही जमलं तरी रोज एकाच वेळी जिमला जाणं आणि किमान अर्धा तास तरी चालणं हे झालंच पाहिजे अशी खूणगाठ बांधून घेतली.

व्यायाम कुठल्या प्रकारचा आणि किती वेळ करावा ह्या बद्दल नेटवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती की गोंधळून गेल्यासारखं होत होतं. साधं ट्रेडमिलवर चालायचं तरी वेट-लॊस झोन मध्ये ( कमी वेगाने ) चालायचं की कार्डीयो झोन मध्ये ( जास्त वेगाने ), किती वेळ, चढ ठेवून की नुसतंच असे अनेक प्रश्न. वजन उचलायच्या प्रकाराबाबतही तेच. किती किलो वजन उचलावे. किती वेळा उचलावे ह्या बद्दल संभ्रम ! पण जसजसं व्यायाम करायला लागले तशा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या.

१. व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.
२. स्नायूंवर भार न पडता चरबी जाळण्याच्या योग्य मार्गावर व्यायाम आहे हे कसे ओळखावे ? माझ्यापुरता मी निकष लावला की जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल मास बर्न होत असल्याची शक्यता जास्त. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.
३. चालताना हलका श्वास वाढेल पण खूप धाप लागणार नाही अशा वेगाने चालायचे ( माझ्यासाठी हा वेग साधारण साडेतीन मैल प्रति तास ) चालताना दोन्ही हातही शरीराला समांतर ठेऊन हवेत पुढे मागे स्विंग केले तर जास्त चांगला व्यायाम होतो. ( क्रॊस कंट्री स्किईंग मध्ये दोन्ही पोल्स हाताने जसे पुढे मागे ढकलतात तशी पोझिशन )
४. नियमित व्यायामाने तीव्रता वाढवता येते. सुरुवातीला मला एलिप्टिकल करणे जमायचे नाही. पण चालण्याचा व्यायाम करायला लागल्यावर काही दिवसांतच एलिप्टिकल जमायला लागले. नंतर ते अर्धा ते पाऊण तास करणेही जमायला लागले. ( जमायला लागणे म्हणजे व्यायामानंतर दमल्यासारखे न वाटणे ) चालण्याचा वेगही हळूहळू वाढतो.
५.व्यायामात सातत्य राखले तरी आठवड्याचे सलग सातही दिवस व्यायाम करायची गरज नाही. उलट एक दिवस सुट्टी घेतल्याने स्नायूंना आवश्यक विश्रांतीच मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीतकमी चार दिवस आणि जास्तीतजास्त सहा दिवस जिम.
६. वेट्स उचलताना कमी वजन सावकाश लयीत जास्त वेळा उचलले तर चरबी जाळून मसल मास वाढवायला जास्त उपयोग होतो. ( उदा, पाच पाऊंड वजन प्रत्येक हातात प्रत्येकी बारा वेळा उचलायचे, थोडं थांबून ( ३० से. ते एक मिनीट ) सोळा वेळा उचलायचे, परत थोडं थांबून वीस वेळा उचलायचं ) सरावाने नंतर वजन उचलायची क्षमता वाढवता येते. स्ट्रेंग्थ ट्रेंनिंगची जी लेग प्रेस वगैरेसारखी मशिन्स येतात त्यावरही हाच नियम लागू.
७.शरीरातले फॆट कमी होऊन मसल मास जसे वाढत जाईल तशी कॆलरीज जाळायची शरीराची क्षमता वाढते. चयापचय ( metabolism ) सुधारतो. त्यामुळे वजन वाढण्याची एक टेंडन्सी झालेली असते त्यातही बदल होतो.

व्यायामातली ही पथ्ये मला खूप फायद्याची ठरली. व्यायामाइतकंच किंबहुना जास्तच महत्व मला आहार ठरवून घेण्याचं होतं. मी डाएट सुरु करायच्या सुमारास माझ्या नवऱ्याचं कॊलेस्टेरॊल थोडसं वाढलेलं टेस्टमध्ये आलं होतं. त्यामुळे आहार ठरवताना तो कॊलेस्टेरॊल कमी करायलाही मदत करेल असा ठरवून घेतला. आहार आखताना खालील गोष्टी विचारात घेतल्या :

१. माझे वय, उंची वजन यानुसार जर मला दिवसाला दोन हजार कॆलरीज लागत असतील असे धरले ( हे चार्ट्स इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध असतात ... how many calories do i need ? असा गुगल सर्च करुनही मिळतील. ). त्यापैकी निदान पाचशे कॆलरीज तरी कमी घ्यायच्या असे ठरवले.
२. दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे खाणे. मी दुपारी झोपत असल्याने दिवसातून चार वेळा खायचे असे ठरवून घेतले. दुपारी न झोपणाऱ्यांना साडे-तीन च्या सुमारास एक छोटे स्नॆक खायला हरकत नाही.
३. तळ्कट, तुपकट, चीज वगैरे घातलेले हेवी खाणे शक्यतोवर टाळायचंच. पण बरेचदा आपण घरीही हाय कॆलरी पदार्थ करतो जसे आलू पराठे, बिर्याणी,श्रीखंड, ग्रेव्ही / तेल थोडे जास्त असलेल्या भाज्या. त्यावर मला डॊ.बंगंच्या पुस्तकात वाचलेली ओर्निश मेथड अतिशय आवडली. एखाद्या पदार्थाचा मोह टाळता येणे शक्य नसेल तर मी त्याचे मोजून दोन-तीन घास बाजूला काढून घ्यायचे आणि माझ्या डाएटवाल्या जेवणात ते सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक असे खायचे. ते खाताना अगदी सावकाश तोंडात घोळवत आस्वाद घेत खायचे. खरोखरच तो पदार्थ पोटभर खाल्ल्याचे समाधान मिळते. त्यामुळे नवऱ्याला काही चांगलेचुंगले करुन घातले तरी माझे डाएट कधी मोडले गेले नाही.
४. जे व्यायामाच्या बाबतीत तेच आहाराच्या बाबतीत ! सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही ! म्हणून आठवड्यातून एकदा एक पोर्शन जे मनाला येईल ते खायचे असे ठरवले.
५. सगळ्यात महत्वाचे जे डाएट करतानाही आणि आत्ताही माझ्या उपयोगाला येते ते म्हणजे ’पोर्शन कंट्रोल’ ... प्रमाणात खाणे ! खाताना नंतर पाणी प्यायचे आहे या हिशेबाने खावे. म्हणजे भूक भागल्यासारखी वाटतेय पण पोट हलकेच आहे अशा स्टेजलाच थांबावे. पाणी प्यायल्यावर तड लागेल इतक्या प्रमाणात जेवण घेऊ नये. आपल्या हातून ओव्हर इटिंग इतकं सहज होते की त्यातही आपण जास्त कॆलरीज पोटात ढकलत असतो ह्याचा आपल्याला पत्ताही नसतो.

ह्या गोष्टी पाळून माझा आहार साधारण असा होता :

उठल्या उठल्या दोन-तीन ग्लास कोमट पाणी पिणे. चहा-कॊफी नाही. ( पाण्यात लिंबू पिळून घेतले तर जास्त फायदा होतो असे वाचले आहे पण मी नुसतेच पाणी पित होते ) वेट लॊस पूर्ण झाल्यावरही आता इतकी सवय झाली आहे की अजूनही मी चहा-कॊफी घेत नाही.

साधारण साडे-आठ नऊ च्या सुमाराला ब्रेकफास्ट. अर्धा कप क्विक कुकिंग ओटस आणि दोन चमचे ओट ब्रान एकत्र करुन ते व्यवस्थित बुडेपर्यंत 1% दूध, चिमूटभर मीठ ( याशिवाय ओटमीलला चवच येत नाही ), थोडेसे अगोडच राहील इतपत साखर ( पाऊण ते एक चमचा )घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणे. बाहेर काढल्यावर त्यात दोन अक्रोड चुरुन आणि एक ओंजळ ब्लू-बेरीज घालून खाणे. ब्लू-बेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॊबेरीज, सफरचंद किंवा दोन चमचे बेदाणे घालून ! केळं मात्र नाही.

बारा-साडेबाराला जेवण. जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर ! काकडी, गाजर, टोमॆटॊ यापैकी काहीतरी. हे रोजचे कॊमन फॆक्टर्स !
उरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे :
दोन फुलके, अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ, कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी. ( बटाटा, सुरण, छोले सोडून )
ब्राऊन राईसची जिरं,मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत )
उकडलेली अंडी दोन-तीन पण फक्त पांढरं. ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे. कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही. ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून
अंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆट चीझ घालून बेक केलेलं कीश
सॆलड बोल बनवून. त्यात लेट्यूस सारखं सॆलड, लो फॆट ड्रेसिंग, क्रुटॊन्स, थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( ५/६ ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन. खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे.
आठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन.
मल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या, दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून.
एकंदरीत तेल, तूप कमी ( दिवसाला एक-दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी/ आमटीला घालणे ) , पण लसूण, आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर. ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा-टोमॆटोचीच ग्रेव्ही. नारळ-काजू वर्ज्य !
भाज्या, चिकन, मुगाचं पीठ, तांदूळ-उडदडाळीचे २/१ प्रमाण असलेली इडली. काहीही चालेल. फक्त कॆलरीजचा विचार करुनच. भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही. या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला. आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते. मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते.

संध्याकाळी पाच-साडेपाचला अर्धा कप पाणी / अर्धे १ % दूध या मध्ये बनवलेला व्हे प्रोटीन शेक ( व्हे प्रोटीन वॊलमार्ट / टारगेट मध्ये सहज मिळते. प्रत्येक स्कूप मध्ये अंदाजे २३ ग्रॆ. प्रोटीन असते ) + लो फॆट होल ग्रेन क्रॆकर्स. खूपच भूक असेल तर एखादे फळ ( केळं, आंबा सोडून ) व्हे प्रोटीन हे आहारात प्रोटीन वाढवायचा उत्तम मार्ग आहे. हे मी प्रेग्नन्सीतही घेतले होते. प्रेग्नन्सीत घ्यायचे असेल तर आधी डॊक्टरांना विचारावे.

साडे-आठच्या सुमारास रात्रीचे जेवण.
सकाळसारखेच. फळ खाऊनच सुरुवात करणे. ( खरं तर संध्याकाळी सातला जेवून घेतले तर वजन कमी करायला मदत होते असे वाचले होते पण मला जिमला जायला तीच एक वेळ मिळत असल्याने जेवणाची वेळ उशीराच ठेवावी लागली. )

या व्यतिरिक्त दिवसाला नऊ ते दहा ग्लास पाणी

मल्टीव्हिटॆमिन आणि कॆल्शिअमच्या सप्लीमेंट्स.

जेवल्यानंतर दहा-पंधरा मिनिटं शतपावली. ( जी हल्ली घातली जात नाही Happy )

आहारात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त राहील हे पाहिले पण त्याचा अर्थ असा नाही की कार्ब्स पूर्ण वर्ज्य केले. पण कार्ब्स फक्त फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स यातून जातील हे पाहिले. मैदा,तांदूळ, बटाटा जवळजवळ बाद.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

डाएट चालू करायच्या सुरुवातीला खूप निराशा आली होती की वजन कमी होणार की नाही ( खरं तर त्या आधी कधी प्रयत्नच केला नव्हता कमी करायचा ) त्यावेळी नेट्वर GM डाएटची भारतीय आवॄत्ती सापडली होती ( बीफ ऐवजी पनीर + मोड आलेले मूग ) एक धक्का मिळाला तर हवा होता म्हणून GM diet ( 7 day crash diet ) केले होते. ते खालीलप्रमाणे :

दिवस १ : फक्त फळे ( केळं सोडून ... शक्यतो मेलन ग्रूप मधली कलिंगड, कॆंटलूप वगैरे )
दिवस २ : सकाळी ब्रेकफास्टला एक बटाटा उकडून ( थोडे मीठ, मिरपूड आणि किंचित बटर घालून ) नंतर दिवसभर फक्त भाज्या ( बटाटा, सुरण, छोले, राजमा, चणे नाही )
दिवस ३ : फळे + भाज्या ( केळं, बटाटा, छोले, राजमा इ. सोडून )
दिवस ४ : ८ केळ्यांपर्यंत केळी + ४ ग्लास साय काढलेले दूध ( मी सहा केळीच खाल्ली होती )
दिवस ५ : मोड आलेले मूग + १% दुधाचे पनीर घरी करुन. ( एकूण २८० ग्रॆ. पर्यंत ) + ६ टोमॆटो
दिवस ६ : मोड आलेले मूग + १% पनीर पाहिजे तितक्या प्रमाणात.
दिवस ७ : बाऊन राईस + भाज्या + फळे ( बटाटा, केळं इ. नाही )
रोज किमान दहा ग्लास पाणी.

मी कधीही उपास करत नसल्याने ह्या डाएटचे पहिले तीन दिवस अक्षरश: जीवघेणे होते. वजन दोन कि. कमी झाले ( पाच पाऊंड ) फक्त. एक धडा मात्र मिळाला की long term diet करायचे तर खाणे आवडीचे असले पाहिजे आणि त्या सात दिवसांत सतत वाटत होते की हे असे खाण्यापेक्षा साधे फुलके आणि मुगाचं वरण म्हणजे स्वर्ग आहे Happy वजन व्यवस्थित कमी होत असतानाही मे च्या अखेरीस मला परत अजून जास्त वजन कमी करायची घाई झाली आणि परत एकदा हे GM diet केले. ह्या वेळी फक्त १ पाऊंड ( अर्धा कि. ) वजन कमी झाले. आणि खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर माझा जो छान ताबा आला होता तोही जातो की काय अशी भिती वाटू लागली. थोडक्यात GM diet मला फारसे फायदेशीर वाटले नाही. long term मध्ये तर नाहीच नाही. मात्र नेहेमीचं डाएट खूप एंजॊय केलं आणि त्यानेच वजनही कमी झालं.

टीप : मी काही कुणी आहारतज्ञ नाही. व्यायाम आणि आहार मी संपूर्णपणे माझ्या आकलनाप्रमाणे आखून घेतला होता ह्याची कॄपया वाचकांनी नोंद घ्यावी.

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
खाऊन पिऊन वजन कमी करा !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

white rice - 1cup cooked (158g) - 205 cal
शैलजा, लिव्हस्ट्राँगवर आठवडाभर रोजचा डाएट ट्रॅक कर म्हणजे नुसत्या कॅलरीजच नाही तर इतरही न्युट्रीशन किती घ्यायला हवं अन किती घेतल्या जातं याचा अंदाज येईल. त्यानुसार तुलाच तुझा डाएट मॅनेज करता येईल. अर्थात काही मेडिकल कंडिशन्स असतील तर आहारतज्ञच बेस्ट.

वजन वाढणे अनुवांशिक असते. एकदा वाढले कि कमी होत नाही ,शेवटपर्यंत राहते.माझा वैयक्तिक अनुभव आहे. हाय प्रो डाएटने थकवा यायचा, पुन्हा कार्ब चालू केले, वजन वाढले .गुडघे डॅमेज झाले.

मी स्वतः चहा सोडला(मध्ये मध्ये सोडते, धरते(पिते)).
पन मला एक आढळून आले, की जी वस्तू जरा काळ सोडली ती परत कधी कधी सुरु केली की त्रास होतो.
मी चहा २ महिने पुर्ण सोडला मग परत सुरु झाला(आई, वडील आले मग त्यांच्याबरोबर्).
मला तलफ यायची , मी मस्त चहा बनवायची मग प्याले की तीच चव व मजा नाही यायची व पोटात मळमळायचे.
असे कोणाला झालेय का कोणाला? कोणाचा अनुभव?

(माहितीय, बीबी चुकीचा आहे पण वजन कमी करायला चहा सोडा असे कोणीतरी सांगितले होते).

डाएट करताना उश्णता वाढते शरीर गरम होते कारण कळेल का
त्यावर उपाय आहे का आहार काय घ्यायचा क्रुपया माहीती द्याल तर बरे होईल

आर्चना... रुजुता चा प्लान जरी २ तासांचा असला तरी मी पावणेदोन- सव्वदोन तास असा फ्लेक्सीबल ठेवला आहे..
शेवटी जे आपल्याला सर्वात सोप्प तेच योग्य अस मला वातत. त्यामुले सातत्य ठेवायला जमतं.
तर माझा प्लानः
सकाळी ६:३० - कोमट पाणी मध + लिंबू / चिमुट्भर हळद (एक दिवसाआड)
७.०० चहा (हा मी नाही सोडू शकत) Happy
८.४५ नाश्ता - पोहे/ उपमा/ ओट्स/ खीरी/ पोळी.. जे असेल ते.
१०.३० एखादे फल / लाह्या / दूध
१२.३० जेवण
२.४५ - ३.०० ताक / सरबत
५.०० दाएट भेळ/ पोहे/ शीरा/ थालीपीठ + चहा
७.३० - ८.०० जेवण
९.३० - १० दूध
जे खाशील ते मनापासून खा. अगदी पदार्थ करुन / शिजवून खाण शक्य नसेल तर लाह्यांचा चिवडा, फुटाणे, काकडी इ. 'फिंगरफुड' पण चालेल. व्यायाम साधारण २-३ दिवसात एकदा.
सुरुवातीला जरा कठीण गेलं वेळा पाळायला.. पण मग सोयीच वाटायला लागल.
माझे स्वतःचे काही आहाराबद्दल नियमः
१. जे कराल ते मनापासुन करा. म्हणजे सातत्य ठेवायला सोप जाईल.
२. कुठलाही पदार्थ शक्यतो पूर्ण वर्ज्य नको. करायचाच असल्या हळू हळू कमी करावा.
३. बाहेरच खाणं किंवा चमचमीत १००% बम्द करायला मला तरी जमत नाही. मी प्रचंड खादाड आहे. . मग साधा बदल.. जे बाहेर जाऊन खायचय ते घरी बनवणे. सुटीचा दिवस खादाडीसाठी राखीव!!!!!!!!!!! पण जे काही मसालेदार खायच ते शक्यतो दुपारी.

सध्या इतकच !!!!!!! माझी लेक लहान असल्यामुळे तिच्या निमित्तानी आपोआपच साध अन वेळेत जमत.

अजुन काही सुचल तर लिहिते!!!!!!!!!!!१

मी सध्या पुन्हा वजन कमी करतेय. २ वर्षांपुर्वी एकूण ९.५ किलो वजन कमी केले होते. त्यातले पुन्हा ३ किलोने वाढले होते. ते कमी केलेय. अजून ८ किलो कमी करणार आहे. (अगदी आयडीयल पर्यंत पोचायचंय म्हणून)

माझे चार आणे.

जेवणा आधी सॅलड भरपूर खावे (दोन्ही वेळेस) त्यात काकडी, टोमॅटो आणि गाजर यांचा समावेश असावा. याने फॅट लॉस भरपूर होतो, पर्यायाने इंच लॉस शरिरावर दिसतो. याच बरोबरीने ग्रीन टि सुद्धा अत्यंत उपयुक्त.. (फॅट लॉस साठीच)

मुळा/लाल भोपळा हे कमी केलेलं वजन मेंटेन करायला उपयुक्त ठरतात.
अर्धा लिंबू आणि गरम पाणी असं दिवसातून दोनदा घेणं अतिशय उपयुक्त..
खरबूज्/डाळिंब्/पपई ने वजन कमी होते.
कलिंगड आणि खरबूजाने शरिरातले पाण्याचे प्रमाण (वॉटर लेव्हल) वाढते.

पण हे वजन कमी करणं वगैरे योग्य व्यक्तिच्या देखरेखीखाली करणं जास्ती योग्य.. पुस्तकं वाचून किंवा कुणाचं तरी ऐकून (ती व्यक्ती फॉलो करते तेच आपण) फॉलो करू नये. प्रत्येकाची तब्येत्/ठेवण वेगळी असते. त्यामुळे आपल्याला सुट होईल ते इतरांना होईलच असं नाही.

कोणतेही डाएट जास्तीत जास्त १५ दिवस करावे, त्यानंतर त्यात थोडा तरी बदल केला पाहिजे हे माझं निरिक्षण आहे. संध्याकाळचं फळ, सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण यात मुख्यत्वे बदल केले की रिझल्ट्स मिळतात. अगेन प्रत्येक माणसाच्या कन्सिस्टन्सीवर अवलंबून आहे ते. माझ्या बरोबरीने डाएट सुरू केल्याच्या आठवड्याभरात दुसर्‍या बाईचे (मूळ वजन १०७ का १०४ किलो) एकूण साडेचार किलो वजन कमी झाले, माझे फक्त दिड किलो. आत्तापर्यंत त्या बाईने टोटल ९.५ किलो लूज केलेत (नोव्हेंबर पासून) माझे ३.५ च झालेत, त्यातही परवा ३०० ग्रॅम वाढले. (वॉटर लेव्हल आणि मसल मास वाढल्याने.)

पण हे वजन कमी करणं वगैरे योग्य व्यक्तिच्या देखरेखीखाली करणं जास्ती योग्य.. पुस्तकं वाचून किंवा कुणाचं तरी ऐकून (ती व्यक्ती फॉलो करते तेच आपण) फॉलो करू नये. प्रत्येकाची तब्येत्/ठेवण वेगळी असते. त्यामुळे आपल्याला सुट होईल ते इतरांना होईलच असं नाही. >>>> +१

संध्याकाळचं फळ, सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण यात मुख्यत्वे बदल केले की रिझल्ट्स मिळतात. >>> हे कसं करायचं ते उदाहरणं देऊन लिहीशील का ?

मी हा प्रवास लिहिल्यानंतर माझेही वजन कमी केलेल्या वजनापेक्षा चार किलो जास्त आहे. पण ते पूर्वीइतके जास्त नसल्याने म्हणावा तसा निश्चय टिकत नाही. माझ्या उंचीला चार किलो वजन वाढलेले तितकेसे जाणवतही नाही. चारहून थोडे जास्त वाढले की मला जाग येते आणि एखाद-दीड किलो कमी करते. तेवढे झाले की ढेपाळते आणि परत हायकॅल खाणे सुरु होते. गेल्या साडे-तीन वर्षांत दोन-तीनदा असे केले.
खरे तर जेवढे कमी केले होते तोच आकडा टिकला तर ते हवंय. एखाद-दोन किलो मार्जिन ठेवायचे पण त्याहून जास्त वाढू द्यायला नको.

अगो,

माझ्या अल्प निरिक्षणशक्तीनुसार..... डाएट म्हणजे बहुधा एकसुरी खाणं हा प्रकार नसावा (नाहिये) आपलं शरिर हे विविध गोष्टींनी बनलेलं आहे. (सॉरी फॉर माय लेमॅन लँग्वेज :)) त्यातल्या उपयुक्त गोष्टी वाढवणे आणि नको त्या वस्तू कमी करणे या दोन्ही साठी प्रयत्न झाले पाहिजेत. फक्त काटा हालून कमी वर गेला म्हणजे हुश्श! नव्हे. तो लॉस सायंटिफिक झाला पाहिजे. असो..

कार्बस हे उपयुक्त आहेत आणि गरजेचे सुद्धा त्यामुळे तिन्ही त्रिकाळ फायबर्स खाऊ नयेत. दुपारी कंपल्सरी कार्ब्ज घ्यावेतच.
वजन कमी करताना पहिल्यांदा मला नाश्त्याला
पालेभाजीचा पराठा... भरपूर पालेभाजी त्यात पीठ वगैरे घालून खाणे. पहिला आठवडा दिड पराठा, मग एक . हा खाल्ल्यावर एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून ... मग एक संत्र.... किंवा मोसंब... (सायट्रिक अ‍ॅसिड फॅट/वेट लॉस करता उत्तम)
रात्रीच्या जेवणात एक दिवस पोळी भाजी आणि त्या आधी सॅलड...
डाएट मध्ये कॉमन गोष्टी सकाळच्या काळ्या मनुका/२ बदाम भिजवून्/अर्ध अक्रोड
अर्धा कप चहात मारी गोल्ड ची ४ बिस्किटे.
नाश्त्यानंतरचे फळ संत्र/मोसंब/ पेरू एकच आठवडा दिला होता.
जेवण कॉमन २ फुलके, ताक भाजी सॅलड. सॅलड खाऊन मग पोळीभाजी खाणे. मी काकडीची साले काढत नाही. त्यातून जास्तीचे फायबर मिळते.
दुपारी पुन्हा अर्धा कप चहा (साखर कमी) २ बिस्किटे.
मग साळिच्या/ज्वारिच्या लाह्या किंवा चुरमुर्‍यात फुटाणे मिक्स करून्/खाकरे २
७.३० ला बोलभर कलिंगड्/खरबूज/ पपई मग एक ग्लास पुन्हा गरम पाणी लिंबू.
रात्रिच्या जेवणात - सॅलड कॉमन... सूप+२ ब्राऊन ब्रेड्+व्हाईट एग
किंवा मूग चाट कधी फुलका भाजी... सुद्धा.

नाश्त्याला मी विविध पदार्थ खाल्लेत
नाचणीच्या पिठाचं धिरडं/पराठा
लाल भोपळा किसून घालून भाजणीचं थालिपीठ
पालेभाजीचा पराठा
कोबी/मुळा पराठा
टोमॅटो घालून बेसनाचं घावन

पोहे उपमा इडली अजिबात नाही.

दक्षिणा ,
पोहे उपमा इडली अजिबात नाही. का ते चालत नाहि का डायट मध्ये.
मला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे.

पोहे उपमा इडली अजिबात नाही.>>>ते कार्ब्ज्स आहेत संपुर्ण.>>> कोणत्याही पदार्थाच पोषणमूल्य आपण थोडी कल्पनाशक्ती वापरून वाढवू शकतो. किंबहुना पदार्थ बनवताना सजवताना(गार्निश = मराठीत काय? ) हाच विचार आपल्या अनेक पदार्थांमधे केलेला दिसून येतो. विदर्भ खानदेशात पोह्यांमधे शेंगदाणे घालतात तर कोकणात वर ओला नारळ किसुन घालतात वर कोथींबीर तर असतेच.मध्यप्रदेशात एकदा मी मस्त डाळींबाचे दाणे वर घातलेले पोहे खाल्लेत. भिजवलेली चणा/ मूग डाळ घालून केली जाणारी दुधी भोपळ्याची भाजी
गाजर व शिमला मिर्ची बारीक चिरून इडली च्या पिठात घालून केलेली इडलीची रेसीपी याचच उदाहरण म्हणता येइल. अधिक उष्मांक ग्रहण केले जातील अस वाटत असेल तर आपण पदार्थ कमी प्रमाणात बनवू व खाऊ शकतो.
रोज तेच तेच काय खायच? आहारात एकसुरीपणा असण हे ही डाएट करू पहाणारांना असफल बनवत असा अनेकांचा अनुभव आहे. मायबोलीकरांना तर फक्त दिनेशदांचे धागे उघडून पहायचीच काय ती देर असे शेकडो पदार्थ / पेय सरबत सापडतील जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या लोकांना उपयोगी पडतील.

पोहे उपमा इडली अजिबात नाही >> अगं पण हेच मिळ्तं ऑफीसमधे.. सकाळी मी ब्रेक्फास्ट नाही बनवु शकतं
अजुन काय ऑप्शन आहे?

ऐकीव माहितीवरुन "अमुक खाणं वाईट अन अमुक म्हणजेच फार उत्तम" वगैरे ठरवणार्‍या सगळ्यांनी प्लीजच एकदा हा ब्लॉग नजरेखालून घाला.
http://rujutadiwekar.blogspot.in

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या आगाऊ शुभेच्छा Happy

श्रीकांत, १००% अनुमोदन. रोजचे पदार्थ क्रिएटिवली करुन त्यांची लज्जत अन पोषणमुल्य दोन्ही वाढवता येतं. मी स्व्तः पोहे, उपमा करताना त्यात वेगवेगळ्या भाज्या, कडधान्य घालते. त्यामुळे ते खायला ही छान अन नवे वाटतात. जे घरी रोज सहज उपलब्ध असत, त्यातूनही उत्तम डाएट सांभाळता येऊ शकतं असा माझा अनुभव आहे. बस्स थोडी क्रीएटीविटी हवी!!!!!

थँक्स दक्षिणा Happy

इडलीत असतं की भरपूर प्रोटिन ( २: १ प्रमाणाने केलेल्यात जास्त ), पोहे हातसडीच्या तांदळाचे खाल्लेले चांगले असं ऋजुताच्याच पुस्तकात वाचलं. ते बरोबर आहे पण इथे मिळत नाहीत.

या धाग्यावरील अनेकांना ठाउकच असेल, http://kharedi.maayboli.com/shop/Aahar-Gatha.html आहारगाथा हे डॉ. कमला सोहोनींच पुस्तक डाएट करणारांनी (अन अर्थातच न करणारांनी ही ) जरूर वाचाव अस आहे. http://rohanprakashan.com/index.php/health/item/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4...

Pages