'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

धुरंदर २ teaser फुल रणवीर आहे.
शेवटी जो डायलॉग आहे – ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी.. यातून चित्रपट कसा असणार हे समजून जाते. फुल ऑन राडा शिट्या आणि माहोल असणार थिएटरमध्ये.. मजा येईल.. जवान चित्रपटानंतर असा माहोल अनुभवला नाही.

यशराजच्या स्पाय युनिव्हर्सला अक्षरशः चुड लावलिये >> धुरंधर सुद्धा चालावा आणि यशराजचे सिनेमेही. शेवटी धुरंधर च्या यशात सर्वात मोठा वाटा यशराजचाच आहे.

पब्लिक जे आवडेल ते सगळे बघते. त्यांना काही एकाच छापाचे पिक्चर नको असतात. व्हरायटी हवी असते. दोन्हीकडचे पिक्चर चालतील.

बाकी इतक सगळं होत असताना ते आर माधवनच पात्र फक्त सिगारेटी फुंकत का बसलेलं असत? बहुतेक सरकारने आपल्याला पगार फक्त सिगारेटी फुंकण्यासाठी दिला आहे असा त्याचा गैरसमज असावा! पगाराच्या पगार घेऊन एकही हल्ला थांबवू शकला नाही नुसत्या बड्या बड्या बाता नी ** खाये लाथा!

दुसऱ्या भागात जनाची नाही तर मनाची पण नाही पण पिक्चर पाहायला आलेल्या पब्लिकची तरी लाज वाटून थोडफार देशहिताचं काम आर माधवनच्या पात्राने करावे! टिप देऊनही मुंबईवर हल्ला थांबवू शकला नाही म्हणून धुरंधर ने नक्कीच आर माधवनच्या पात्राच्या आईची आठवण काढली असावी असे वाटून गेले जेव्हा धुरंधर पुलावर संताप करत ऊभा होता. Happy

या नावाचा पिक्चर आलाय हे माहीत होतं पण तुम्हाला तो का बघावासा वाटला असं विचारतेय. का शिंडलर्स लिस्ट बघितल्यावर उतारा पाहिजे होता काहीतरी?

ऋन्मेषजींची कमेण्ट वाचली नाही म्हणजे.
ही रेंज असते एकेकाची. गोंद्या पासून ते शिं लि सगळे एका मापात आवडतंय.
आधीच्या जन्मात तमाशा आणि संगीत सौभद्र एकाच वेळी बघितलं होतं.

मी पण पाहिला धुरंधर. चांगला आहे पण पठाण इतका नाही.
अभिनयाच्या बाबतीत संजय दत्त एक नंबर.
दुसर्‍या नंबरला सारा अर्जुन. ही भारतियांच्या डोक्यातून मधुबालाची आठवण पुसून टाकणार. अभिजात सौंदर्य कशाला म्हणतात हे समजलं.
बाकीच्यांनी पाट्या टाकल्यात. त्यातल्या त्यात अर्जुन रामपालचं नाव घ्यावं लागेल.

रणवीर सिंगच्या जागी सलमान खान हवा होता.

वरचा पार्ट २ चा टीजर आहे तो नेटफ्लिक्स वर आताच्या सिनेमाच्या एन्ड क्रेडिट्स नन्तर इन्क्लुड केलेला आहे.

ठोकळाच घ्यायचा तर सलमान का नको ?
अभिनय पाहीजे होता तर आज तरी शाहरूख खानला पर्याय नाही. हेअर स्टाईल त्याचीच कॉपी मारलीय.
स्टोरी टेलिंग ल्युडोची कॉपी मारलीय.

ये नया हिंदुस्तान है घर मी घुसेगा भी मारेगा भी! ते ठिकाय पण ह्या भागात आर माधवानच्या पात्राने देशासाठी काही केले नाही व सिगरेट फुकट आणखी दोन चार डायलाग हाणले तर आर माधवन जिकडे दिसेल तिकडे मी त्याला चप्पल फेकून मारेन!

>>>'आला टिझर'>>>
बघीतला आत्ता... मस्त आहे 👍

संजयजी, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, त्याप्रमाणे मी पाहिला आणि आता तुमच्याच धाग्यावर लिहीतो.

आदित्य धर ने ही स्टाईल ल्युडो मधून घेतली आहे. ल्युडोची सिनेराईटिंग एक्झॅक्टली अशी आहे. या शिवाय वेब सिरीज बनवण्याचा प्रयत्न होता पण ऐन वेळी चित्रपट बनवायचं ठरलं असावं असं वाटलं.

अभिनयात नो डाऊट अक्षय खन्ना सर्वात टॉप आहे. क्रिटिक्सने अक्षय खन्नालाच व्होट केलं आहे. सुचरिता त्यागी ने an all-time Akshaye Khanna performance, म्हटलंय.

इंडीया टुडेने " धुरंधर ऑफ अ‍ॅक्टर्स" म्हटलंय. आमडीबी वर तर हजारो युझर्स अक्षय खन्नाची तारीफ करत आहेत. सोशल मीडीयात तर विचारूच नका.

मुकेश खन्ना काही ग्रेट अ‍ॅप्रिशिएटर नाही पण त्याने “the one actor who is being praised for his performance,” आणि “ate all the competition” असं म्हटलंय. गब्बर सिंगशी केलेली तुलना पटली नाही. गब्बर सिंग च्या रोल मधे अमजदखानने जी छाप सोडली आहे ती लाजवाब आहे. अमरीश पुरी यांचा मोगँबो हा लोकप्रिय व्हिलन आहे पण गब्बरने जी दशहत बसवली ती पुन्हा कुणालाच जमली नाही. अगदी अमजदखान ला सुद्धा तो करिष्मा जमलेला नाही. शोलेशी तुलनाच नको.

सगळ्यांच्या प्रतिक्रिया देत बसत नाही.

खरं सांगायचं तर जितका पब्लीकने डोक्यावर घेतलाय तेव्हढा काही तो आउटस्टँडींग नाही. मात्र धुरंधर मधे तो सगळ्यांमधे बेस्ट आहे.
जे जे पावरफुल लोक असतात ते खालच्या टोनमधेच बोलतात. अक्षय खन्ना पूर्वीपासून अंडर प्ले करत आलाय. त्यामुळे त्यात चुकीचं काही नाही. अमिताभ सुद्धा पूर्वी रिझर्व्ड वाटायचा पण नंतर त्याने स्वतःला बदललं. अक्षय खन्ना चा अभिनय त्याचं रिझर्व्ड व्यक्तीमत्व सांगतं. त्याच्या तब्येतीला झेपेल असा अभिनय त्याने केलाय . पण त्याने जो टोन लावला आहे तो बिघडू देत नाही. रेहमान डकैतला त्याने डायमेन्शन दिलेय. त्याचं तोंड वाकडं आहे कि जबडा खराव आहे हे बघायची काय गरज ? त्याने ते कॅरेक्टर मस्त डेवलप केलंय. दोष आहे तो स्क्रीप्टचा.
( पण रेहमान डकैत ने दी हुई मौत .. हा संवाद सहज वाटला नाही. विचार करून बोलल्याप्रमाणे आहे ).

यातल्या कुठल्याही पात्राबद्दल ममत्व वाटत नाही किंवा राग येत नाही. देशप्रेम वगैरे खूप गप्पा झाल्या. पण पिक्चर बघताना "येस ही इज राईट " कुणीही तिथे असतं तर हेच केलं असतं असंच वाटत राहतं. यात सिनेमाचा दोष नाही, त्याचं मार्केटिंग तसं झालं आहे. देशप्रेम, पाकिस्तानला धडा शिकवला वगैरे. असं काही वाटलं नाही. उरी मधे नक्की धडा शिकवलाय किंवा बॉर्डर मधे.

रेहमान डकैत, जमील आणि बाबू डकैत हा त्रिकोण एव्हढा तपशीलवार घेतला आहे कि आपण त्यात गुंगतो आणि कराचीवर ताबा मिळवायचा तर हेच योग्य होतं ( तक्रार नाही). त्यातच रेहमान डकैतचा मुलगा मारला गेलाय आणि तो बदला घेणार कि नाही यात स्क्रीप्ट एव्हढी खर्ची झालीये कि रेहमान डकैतचं कौर्य अंगावर येण्याऐवजी न्याय झाला असं वाटतं. धुरंधरचं मार्केटिंग तसंच व्हायला हवं होतं. दुर्दैवाने हेटर्स आणि लवर्स दोघांनीही फेक पिक्चर उभं केलं आहे.

आता पुढे जमीलला फायनान्स करणारे ते दोन भाऊ जेव्हां रेहमान ला भेटतात तेव्हां रेहमान त्यांचं उत्पन्न काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला नकली नोटा, शस्त्रं यांची माहिती मिळते. अर्जुन रामपालचं पात्रं बंदूका मागवतं तेव्हां त्या बंदूका कशाला हव्यात हे माहीत नसतं. आपण भारतीय म्हणून राग येण्यासारखा हा सिक्वेन्स घेतलेलाच नाही. पाकिस्तानच्या राजकारणात वजीर बनण्यासाठी हे धंदे करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण पटलो जातो.

पुढे रेहमानचा एण्काउंटर झाला काय न झाला काय काहीही वाटत नाही. धुरंधरने तरी त्याला का मारावे कळत नाही. मारलं ? ठीक आहे. नाही मारलं ? तरी ठीकच आहे. त्याला रेहमानच्या गँगमधून की पोस्टवर काम करण्याची संधी मिळण्याशी मतलब आणि त्याने काही तरी मोठी माहिती क्रॅक करावी आणि इंटेल पुरवावी हा आपला इंटरेस्ट.

असे काही घडत नाही. सिनेमा गँगवॉरमधेच भयानक अडकून पडला आहे. स्पाय मूव्ही पेक्षा गँग्ज ऑफ वासेपूरचं लियारा वर्जन बघतोय हा फील आलेला. राजी मधे ती इंटेल पोहोचवण्यासाठी रिस्क घेते आणि त्यात कशी फसते हे अंगावर येतं. तसं इथे काहीही होत नाही.

तो आयएसआयच्या संपर्कात आला आहे तर त्याचं बॅकग्राऊंड कोण तपासणार नाही ? त्याने बलुचिस्तानचा संदर्भ दिलाय तर रेहमान च्या गँग मधे किंवा लियारा सिटीत त्याला तू कुठला हे कसं विचारत नाही ?

मायबोलीवर पण ड्युआयडी प्रोफाईल भरताना शहराचं नाव सांगत नाही, नाहीतर एखादा उपटासुंभ नवी मुंबईत नेमका कुठे विचारतात. अजमल कसाबचं घर शोधून आला आपला मीडीया. बरं ते जाऊ द्या. पण आय एस आय चा बलुचिंवर विश्वास नाही हे सर्वांना माहीत आहे. ते त्याची चौकशी करणार नाहीत ? कदाचित पुढच्या भागात येईल ते.

रेहमानला एकदा एण्काऊंटरमधून वाचवल्यानंतर दुसर्‍या वेळी तो संशय कसा काय घेईल ? एव्हढा सजग असता तर पहिल्या वेळी का फसला ? अर्जुन रामपालने पाट्या टाकल्या आहेत. संजय दत्त फक्त वावरलाय. तो आता मोठ्या स्टार्सच्या पंक्तीत पोहोचलाय. रजनीकांत फक्त वावरतो. तसं.

अक्षय खन्ना पेक्षा रणावीर सिंग चाम्गला दिसतो म्हणाला तर सारा अर्जुन मधुबालापेक्षा सुंदर दिसते असे म्हणायचे सर्व हक्क राखून ठेवलेले आहेत. स्त्रियांनी पुरूष अ‍ॅक्टर कसे दिसतात याचा निकाल लावला, मग स्त्री अ‍ॅक्टर्स कसे दिसतात हे पुरूषांना ठरवू द्या.

रणवीर सिंग ने त्याच्या आधीच्या भूमिकांच्या मानाने उत्तम कामगिरी केली आहे. पण धुरंधर मधे तो बेस्ट आहे म्हणणं धाडसाचं आहे. इथेच थांबतो.

बरं, आत्ता असलेले नसलेले सगळे ड्युआयडी माझेच आहेत.
पण सारा अर्जुन ने मधुबालाची छुट्टी केली हे सत्य स्विकारावेच लागेल.

Netflix वर पाहिला चित्रपट
वेगवान आहे मात्र मध्येच 2 ठिकाणी वेग कमी होतोय
मध्ये मध्ये पेरलेली जुनी गाणी छान वाटली
2 की 3 वेळा हमझा संधीचा फायदा घेताना अजिबात मागेपुढे बघत नाही उदाहरण म्हणजे रेहमानच्या थोरल्या मुलावर अटॅक होतो तेव्हा

डायरी लिहिणे,
मेजर इकबाल।ला संशय न येणे विशेषतः बलुची लोकांवर,
राजकारणी माणसाची मुलगी घर सोडून ह्याच्यासोबत राहायला सुरवात करते आणि तिचा बाप तिला परत नेण्यासाठी काही करताना दिसत नाही
असे काही वेळा खटकते म्हणा
पण हिंदी सिनेमा आहे
त्यामुळे हे सोडून दिले आणि एन्जॉय केले
हिंसाचार दृश्ये अंगावर येणारी आहेत

राजकारणी माणसाची मुलगी घर सोडून ह्याच्यासोबत राहायला सुरवात करते आणि तिचा बाप तिला परत नेण्यासाठी काही करताना दिसत नाही
>>>>>>>>>>>

हो ना,
ते सुद्धा पाकिस्तानमध्ये...
मुलींना इतकी सूट मिळते का खरेच त्या देशात? त्या धर्मात?

हा चित्रपट पाहिलेला नाही. पण हा किंवा अशा प्रकारच्या चित्रपटांना उचलून धरणारा एक विशिष्ट वर्ग आहे.
तो वर्ग पूर्वीपासून हिंदू मुसलमान ख्रिस्ती भाईचारा दाखवला कि अस्वस्थ होत असतो. पण प्रतिक्रिया नेहमी उपहासात्मक देत असतो. एखादं मुसलमान पात्रं महान दाखवलं कि याला वेदना होतात. म्हणजे समाजाचं स्वास्थ नीट ठेवणारा अजेण्डा चित्रपटातून दिसला कि याला मूळव्याध होतो. पण तेच जर मुसलमान कसा अन्याय करतो पण हिंदू त्याला माफ करतो हे दाखवलं कि हा आनंदाने उड्या मारतो.

बॉर्डर मधे सुनील शेट्टी मुसलमानाचं कुराण वाचवतो तेव्हां हिंदू कसा सेक्युलर आहे हे सांगतो. आता तर हिंदू सेक्युलर असण्याला सुद्धा विरोध दिसतो. यांना मुसलमान म्हणजे दानव दाखवायचा असतो. आता सत्ता आल्यावर तेच सुरू आहे. पण थेट मुसलमान दानव दाखवण्याऐवजी पाकिस्तान विरूद्ध भारत दाखवले कि धार्मिक द्वेष शत्रूराष्ट्राच्या नावाने खपवता येतो आणि विरोध करणार्‍याला देशद्रोही म्हणता येतं.

पूर्वी टीव्ही वर थोडं जरी सेक्युलरिजम दाखवलं कि हे लोक तक्रार करायचे. पण आता कोणतीही मराठी मालिका घ्या. प्रत्येक सण डिटेल मधे दाखवला जातो. यात अन्य धर्मियांचा कोणताही सण नसतो. इतकेच काय खंडॉबा, म्हसोबा या ग्रामदेवतांशी संबंधित परंपरांना फाटा दिलेला असतो. गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी या परंपरा गायब असतात. सगळा एकजातीय मामला असतो. एक जात म्हणजे हिंदू परंपरा का ?

मालिकेत सगळे एकजातीय असतात. त्यांची आडनावे एकजातीय असतात आणि त्यांची लग्ने पण एकजातीय असतात. याचा परिणाम म्हणून आता खेडेगावात काही ठिकाणी सीमान्तपूजन बघायला मिळालं. लग्न लागल्यावर किंवा काही भागात लग्नाच्या आधी जागरण आणि गोंधळ असायचा. सीमान्तपूजन कुणाकडे असायचं ?

या अजेण्ड्याबद्दल पूर्वीचे उपहासवीर चिडीचूप का असतात ? धुरंधर मधे काय अजेण्डा आहे माहीती नाही. पण उचलून धरणारे लोक पाहीले कि बघावासा वाटत नाही.

Pages