सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
पुढच्या भागात एलपीजी गॅस
पुढच्या भागात एलपीजी गॅस सिलिंडर चा काळा बाजार रोखणे आणि इंडक्शन वापर वाढवणे यासाठी इराण इस्त्राएल अमेरिका युद्ध कसे घडवून आणले ते येईल. कदाचित तो चौथा किंवा पाचवा भाग असेल.
त्या आधी operation सिंदूर, पुलवामा हे येईल.
काश्मीर फाईल्स वाल्याचा एपस्टीन फाईल्स मधल्या काळात येऊन जाईल.
पल्लवी जोशी मराठी असल्याने कॅप्टन फाईल्स सुद्धा येईल.
सेन्सॉर यू सर्टिफिकेट देईल.
इथे हा मुद्दा आधी आला य का
इथे हा मुद्दा आधी आला य का माहीत नाही. इश्क जलाकर ज्या ना तो कारवाँ की तलाशवरून घेतलं आहे, त्याचंही मूळ पाकिस्तानीच आहे. ना तो बुतकदे की तलब मुझे ही कव्वाली नुसरत फतेह अली खां यांचे वालिद फतेह अली खान यांनी गायली होती.
--
बरं एवढ्या देशभक्तीपर पिच्चरमध्ये संजय दत्तला का घेतलं आहे? आणि राष्ट्र प्रथम - वाल्यांना तो खटकला नाही? त्याला पापाचं प्राय श्चित्त म्हणून हा चित्रपट मिळाला का? आणि त्या प्रायश्चित्तावर तीर्थ म्हणून १०० वर्षे जुन्या संघटनेचं कौतुक करायला लागलं?
संजय दत्तला संजू चित्रपटात
संजय दत्तला संजू चित्रपटात आधीच क्लीन चीट मिळाली आहे.
तसेच यात तो पाकिस्तानी आणि व्हिलन दाखवला आहे. कदाचित हेच त्याचे प्रायश्चित असावे.
Dhurandhar २ मध्ये, विरोधी
Dhurandhar २ मध्ये, विरोधी पक्ष, सरसकट upa हा आतंकवाद्यांचा पक्ष होता हे मला खूप आक्षेपार्ह वाटले.
तसेच धुरंधर १ मध्ये आडून आडून स्पेसिफिक नेत्यांवर भारताच्या नोटांच्या प्लेट्स पाकिस्तानी अतिरेक्यांना विकल्याचे आरोप आहेत तेही आक्षेपार्ह वाटले होते.
बाकी इन जनरल मोदींचे कौतुक, मास्टरस्ट्रोकीफिकेशन मला व्यक्तिगत रित्या कंटाळवाणे वाटले तरी माझा त्याबाबत आक्षेप नाही.
मोदींवरचा पिच्चर चालला नाही
मोदींवरचा पिच्चर चालला नाही. बिचाऱ्या विवेक ओब्रॉयला पुन्हा मस्ती करावी लागली. देशभक्तीचा ऑर्गॅझम यायला द्वेष लागतो. नुसतं आपल्या बाळाचं कौतुक केलं तर त्यातलं तथ्य आपल्याला माहीत असतं. म्हणजे रडार बिडार कधी कसे चालतात, यातलं तथ्य माहीत असतं तसं.
आणि ते "नोटांच्या प्लेटांचं मंत्री आणि त्याच्या पुत्राने केलं हे सग्ग्ळ्यांना माहीत आहे" असं अभ्यासू आयडीने इथंच लिहिल़य. या किंवा चिकवा वर. म्हणजे खरंच असणार.
धुरंधर १०
धुरंधर १०

*************स्पॉयलर*********
*************स्पॉयलर***********************
काल पाहिला. पहिल्या पार्ट इतका आवडला नाही कारण लांबलाय बराच. पण तरी मला बर्यापैकी आवडला. एकदा बघायला एन्टरटेनिंग आहे.
यात हिंसा जशी इतकी तपशिलात चवी चवीने दाखवल्यासरखी आली आहे पण कथा नायकाच्या बहिणीवर बलात्कार हा हिंदी सिनेमावाल्यांचा आवडता प्रकार कथेत असूनही तो यात २-३ सेकंद तोही सूचक पणे येतो. बाकी रहमान डकैत बायको कडून थोबाडीत खातो, तिच्याशी प्रेमाने वागतो, पार त्या मेजल इक्बालचाही डाउन सिन्ड्रोम असलेल्या त्याच्या लहान मुलीसोबत एक टेन्डर मोमेन्ट येतो! हे सीन्स आवर्जून का घातले असावेत ते कळले नाही, कथेत फार संबंधही नाही पण ते आहेत हे खरे! 
पॉझिटिव -
जितका असेल असे वाटले होते तेवढा प्रचारकी नाही. पूर्ण फोकस अननोन गनमेन आणि अॅक्शन ही स्टोरीलाइन ठेवली आहे. नोटबंदीची बातमी झटकन येते, ते अनिवार्य होतेच पण मोदींचा जयजयकार नाही, तो त्यांचा मास्टरस्ट्रोक वगैरे आहे असेही येत नाही. फक्त टिव्ही वर ती बातमी येते आणि मग तो खानानीचा सीन आहे डायरेक्ट. मुळात पॉलिटिकल बाजू विशेष नाहीच दाखवलेली, सिनेमाचे नाव रीव्हेन्ज आहे त्यामुळे तेच आहे सिनेमात. भुट्टोवी, खानानी, आयसी ८१४ चा तो हायजॅकर, एस पी चौधरी, आयएसाअय चा मेजर इक्बाल, वगैरे चा सूड. दाऊद चे प्रकरण हुशारीने घेतले आहे. त्याला मारले असे तर दाखवता आले नसते कारण मग बाकीचे सगळेच फिक्शन वाटले असते! इथे सिनेमाच्या बाकीच्या घटना खर्या घटना + फिक्शन ची मिसळ आहे, तसा दाखवण्याचा उद्देश आहे आणि ते तसेच ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे.
रणवीर ने अक्षरशः कमाल! कमाल !!केली आहे , अॅक्शन, इमोशन्स , लुक्स सगळ्याच आघाड्यावर जबरदस्त !! लार्जर दॅन लाइफ!! रणवीर कायमच त्या त्या सिनेमातल्या कॅरेक्टर जगतो , कधीच तो "रणवीर" वाटत नाही तर बाजीराव, खिलजी, गलीबॉयच वाटतो. धुरंधर मधे त्याची परमावधी बघायला मिळते!! अर्जुन रामपाल , माधवन, जमाली पण मस्त काम करून गेलेत. आणि अनपेक्षित रित्या तो बलोच सरदार शिरानीही मला यात फार आवडला! काय स्वॅग!! रेट्रो गाण्यांचे रीमिक्स ट्रॅक यातही आवडले पण गाणी कमी होती यात.
निगेटिव-
डीजेने लिहिले तसे, जस्सी ची बॅक स्टोरी जरा जास्त चालली असती. त्याच्या परिवाराची आपली काहीच ओळख, अटॅचमेन्ट होतच नाही, त्यांच्यावरचा अन्याय फारसा रजिस्टरच होत नाही त्यामुळे त्याच्यातला तो पहिल्या सीन मधला रेज फार रीलेट होत नाही.
हिंसा आणि शिवीगाळ खूप आहे. त्यातल्या त्यात संजय दत्त फार बोअर होतो बघायला आणि ऐकायला. वायलन्स असणार होताच पण अगदी पाशवी, रक्तरंजित हत्येचे १०१ प्रकार म्हणावे अशा पद्धतीचे हिंसक सीन्स खूप आहेत, आणि ते बरेच डीटेल्ड आणि लांबलचक ही आहेत, ते खूपच कमी करता आले असते. त्याने सिनेमाची लांबी बरीच कमी करता आली असती किंवा तो वेळ इतर कुठे तरी वापरता आला असता. इक्बाल आणि हमझाच्या मारामारीवर २०-२५ मिनिटे तरी घालवली असतील. अरे हे काय अनब्रेकेबल रोबॉट आहेत की काय असे वाटले. शेवटचा इन्टेन्स भाग संपला तरी सिनेमा चालूच रहातो. तो भारतात परतला इथे संपवला असता तरी चालले असते. त्याच्या पुढचा भाग, तसेच पोस्ट क्रेडीट सीन्स काही फार वॅल्यू अॅड करत नाहीत.
लास्टली, आता हे पॉझिटिव असे म्हणता येत नाही आणि निगेटिव असेही नाही - पण मजेशीर ऑब्जर्वेशन म्हणू - मी हे नोटिस केले की दोन्ही सिनेमात संधी (!) असून स्त्रियांबद्दलचा वायलन्स दाखवलेला नाही. उलट सर्व कॅरेक्टर्स अगदी पाकिस्तानी व्हिलन्स , जास्तीत जास्त निगेटिव कॅरेक्टर्स पण स्त्रियांना फार आदराने वागवताना दिसतात!!
कट्टर धार्मिक मुसलमान असणारे
कट्टर धार्मिक मुसलमान असणारे बरेचसे व्हीलन ह्यात दारू पिताना पण दाखवले आहेत. म्हणजे पितही असतील पण मला आश्चर्य वाटले. म्हणजे काफिर को मारुंगा खतना करौंगा वैगरे घोषणा देत दारू पण पितायत.
पिक्चरची लांबी मारामार्या
पिक्चरची लांबी मारामार्या जरा कमी करुन नक्कीच कमी करता आली असती. तसंच अर्जून रामपालच्या घरच्या स्टोरीची काहीही गरज नव्हती. तसंच रणवीर आणि आलम दूधसोडावाला त्या चहाच्या दुकानात पर्सनल गप्पा मारतात ते आणि रणवीर बायकोला गेटवर पासपोर्ट देतो ते प्रचंड खटकलं. असो, बाकी चांगला जमला आहे. पहिल्यात स्टोरी बिल्डींग, गाणी वगैरे असल्यामुळे पहिला भाग जास्त आवडला होता.
त्या उल्फत रहमान जेंव्हा
त्या उल्फत रहमान जेंव्हा जेंव्हा पडद्यावर येतात, तेंव्हा तेंव्हा, त्या त्या वेळच्या अल्फामेलला थोबाडीत मारुनच मग रडायला सुरु करतात! साला, बायको असावी तर अशी!
त्या उल्फत रहमान जेंव्हा
.
मीही पाहिला काल. एकूण पहिला
मीही पाहिला काल. एकूण पहिला भाग पाहिल्यावर दुसरा जसा असेल असं वाटलं होतं अगदी तस्साच निघाला.
एक शेवटचा ट्विस्ट वगळता - जो 'जस्ट फॉर द सेक ऑफ ट्विस्ट' वाटला.
मोदींचं दर्शन झालं दोनदा आणि 'इस चायवालेने...' असा उल्लेख दोनतीन वेळा. अगदी ऐतिहासिक सिनेमांत मुघलांना वैतागाने 'ये सिवा का बच्चा' वगैरे म्हणताना दाखवतात तस्संच.
शेवटी अगदी संपता संपत नाही सिनेमा असं झालं - 'अॅसेट इज मिसिंग' तर अगदीच येडचॅप. त्याला फॅमिलीला भेटायचं होतं तर तो संन्यालला तसं सांगू शकला असता, नव्हे इतका कसलेला(!) स्पाय सांगेलच.
प्रगती काय नुसती शस्त्रास्त्रं तयार करण्यापुरतीच झाली का? एक कॅमेरा आवारात लावून बघता आलं असतं त्यांचं काय चाललंय ते! असो. आड्यन्सला रडवायला लागतात असल्या गोष्टी.
वेपनरी तर अबब आहे! फक्त पडद्यावर तोफ आणायचीच शिल्लक ठेवली आहे.
आणि तरीही पहिल्या भागाप्रमाणेच वन ऑन वन अनार्म्ड कॉम्बॅटला पर्याय नाही. त्याशिवाय कोणाचंच समाधान होत नसावं.
साडेतीन तासांच्या सिनेमात साडेतीन स्त्रीपात्रांना सगळी मिळून वट्ट साडेतीन मिनिटं स्क्रीनटाइम दिला आहे. बाकी सगळी टेस्टोस्टेरॉन-फेस्ट!
बाकी रणवीरबद्दलच्या वरच्या सर्व पोस्ट्सना सहर्ष सबदाम अनुमोदन! दुसर्या कोणालाही हा रोल कॅरी करता आला असता असं वाटत नाही!
>>> त्या उल्फत रहमान जेंव्हा जेंव्हा पडद्यावर येतात, तेंव्हा तेंव्हा, त्या त्या वेळच्या अल्फामेलला थोबाडीत मारुनच मग रडायला सुरु करतात!
हो!
>>> णवीर आणि आलम दूधसोडावाला त्या चहाच्या दुकानात पर्सनल गप्पा मारतात ते आणि रणवीर बायकोला गेटवर पासपोर्ट देतो ते प्रचंड खटकलं
हो, ते अगदीच येडचॅप. आणि इतक्या उघड हे प्रकार करायचे तर आधी कागदावरचे संदेश वाचून कागद खाऊन वगैरे टाकायची नाटकं कशाला करतात?!
चहाच्या दुकानात पर्सनल गप्पा
चहाच्या दुकानात पर्सनल गप्पा मारतात ते आणि रणवीर बायकोला गेटवर पासपोर्ट देतो ते प्रचंड खटकलं. >>> हो अगदी
मला तर ती हस्तलिखित डायरी हवी कशाला तेही कळले नव्हते पहिल्या भागापासूनच.
फक्त पडद्यावर तोफ आणायचीच शिल्लक ठेवली आहे. >>> आणलीच आहे ऑलमोस्ट. त्या मुरीदके मधल्या सीन मधे तो रिझवान मोटरसायकल वरचे कव्हर काढवे तसे मोठ्या तोफे सारख्या डबल फायरिंग गन चे कवर काढून दणाणा सुरु करतो ना.
--------स्पॉयलर अॅलर्ट!-----
--------स्पॉयलर अॅलर्ट!------
धुरंधर, द रीव्हेंज बघितला!
हा एकदा बघायला आवडला. थिएटर मध्येच बघण्याची मजा आहे!
पहिला भाग जास्त आवडला होता.
रणवीर सिंग, त्याची अॅक्टिंग यात कमाल आहे! पोरगेला जसकिरत, त्याच्यातला बदलाव, हमझाचा स्वॅग सगळच कमाल!!!
जसकिरत जेव्हा बहिणीला त्या शेड मध्ये बघतो, तेव्हाचे रणवीरचे एक्सप्रेशन्स अमेझिंग!
हमझाला त्याचा मित्र पिंदा ओळख दाखवतो तो बाथरुम मधला सीन, तेव्हा रणवीरची घालमेल, आलमचा शेवट एकदम पॉवरफुल सीन!
राकेश बेदीचे सिन्स या सिनेमात कमी आहेत पहिल्या पेक्षा, त्याची अॅक्टिंग आवडली.
बाकी कलाकार संजय दत्त, अर्जून रामपाल, माधवन, सारा त्यांच्या त्यांच्या रोल मध्ये ठिक!
शेवटचा ट्विस्ट अनपेक्षित होता.
काय आवडले नाही -
१. प्रचंड व्हायोलंस, मारामारीचे काही प्रसंग अगदी अंगावर येणारे डिटेल्ड आहेत, तेवढे कमी करुन पण तो ईफेक्ट आदित्य धर सारख्या हुशार दिग्दर्शकाला नक्कीच दाखवता आला असता. आता हे असले न बघवणारे हिंसक प्रसंग नॉर्म नको व्हायला!
२. गाणी रिमिक्स चांगली आहेत काही, पण पहिल्या भागा एवढी मजा नाही आली गाण्यात. ( गहरा हुआ, शरारत मस्त ओरिजीनल गाणी पण होती पहिल्या भागात)
३. जसकिरतच्या फॅमिली फोटो घेताना शॉट आहे, नंतर लगेच मारधाड सुरु. पण त्या आधी त्यांचे असे कौटुंबिक प्रसंग दाखवले असते तर अजून कनेक्ट झालं असतं.
सिनेमाची लांबी अजून कमी करता आली असती तर चालले असते.
मेजर ईक्बाल ( अर्जून रामपाल) च्या घरच्या काही प्रसंगाना जरा कात्री लावली असती तरी चालले असते. (त्या ऐवजी जसकिरतच्या फॅमिलीचे अजून काही सीन्स दाखवलेले चालले असते)
सर्वात लांबलचक कंटाळवाणा मेजर ईक्बाल आणि हमझाचा शेवटचा फाईट सीन, कधी संपतोय असं झालं होतं.
सिनेमाची १५,२० मिनीटे कमी करता आली असती.
मला सिनेमाची सुरुवात फार
मला सिनेमाची सुरुवात फार आवडली. त्यानंतर पुन्हा lyari मध्ये जाणे almost disappointing वाटले!
त्यानंतर मला शेवट म्हणजे अगदी शेवट, आवडला. त्याबद्दल बोलणे स्पॉयलर होईल. रणवीर सिंगने कमाल केली आहे सुरुवातीस आणि शेवटी.
पण त्या अगदी शेवटानंतर पण शेपटीसारखे काही सीन येतात तिथे वाटते की कशाला राव इतका भावनिक शेवट केलाय कशाला अजून पुढे काहीतरी जोडताय...
बाकी सुरुवात, मध्यंतरापूर्वीचा सीन, आणि क्लायमॅक्स नंतरचा शेवट वगळता मला इतर ३ तास प्रचंड बोअरिंग वाटले. मुख्य पहिल्या सिनेमाचे टेन्शन गायब आहे. तिथे एक रेहमान मारायला हमझा इतकी योजना करतो इथे मोदीकृपेने रोज पंधरा आतंकवादी ठोकली जातायत. पूर्वी एक हमझा आणि आलम होते तर आता प्रत्येक दुसरा माणूस भारतीय एजंट आहे.
खेरीज केवळ बोरिंग नाही तर आक्षेपार्ह वाटलेल्या गोष्टी वर टाकल्या आहेतच.
जान से गुजरते है हे गाणे विशेष आवडले. अर्जीत सिंगचे पण छान आहे.
आदित्य धरचं एक स्टेटमेण्ट
आदित्य धरचं एक स्टेटमेण्ट फिरतंय.
२६/११ का बदला हमने धुरंधर से लिया. हे त्याचंच स्टेटमेण्ट असेल तर .
उरी हा सिनेमा युद्धानंतर नव्हता काढायला पाहीजे होता. थेट पिक्चरच बनवायचा होता आणि ऑपरेशन सिंदूरचीही गरज नव्हती.
अमेरिकेने निर्बंध तरी घातले नसते. जगात त्या वेळी देशाची लाजिरवाणी परिस्थिती झाली होती. व्हिसा बंद, भारतियांना हाकलले, रोज टेरीफ वाढवत नेला. ही नाचक्की एकीकडे आणि दुसरीकडे बाळाला जसं खुळखुळा देतात तसं धुरंधर मधून सेल्फ प्लेजरचा अनुभव एकीकडे.
एक कमेण्ट फार आवडली. "धुरंधर हा मेकर्सने भयंकर विनोदी सिनेमा बनवला आहे, पण काही जण सिरीयस होऊन बघताहेत. हर्षवायूने जर जीव गेला तर निर्माते जबाबदार नाहीत. कवटीत काही तरी भरून जावे"
*धुरंधर १ आणि शक्यतो २ पण
*धुरंधर १ आणि शक्यतो २ पण स्पॉयलर*
बाकी, गाण्यांच्या सुरेख प्लेसमेंट मुळे गाणी इतकी छान वाटतात. गेहरा हुआ हे एक प्रेम गीत खरोखर युगल गीत आहे. बाकीचे प्रेमगीत आहेत ते सगळे जसकिरतच्या देशभक्तीवर आहेत.
नाजो अंदाज से कहते हैं क़ि जीना होगा
जहर भी देते हैं तो कहते हैं क़ि पीना होगा
जब मैं पीता हूँ तो कहते हैं क़ि मरता भी नहीं
जब मैं मरता हूँ तो कहते हैं क़ि जीना होगा
>>>> हे मृत्युदंडातून वाचवून पुन्हा मरायला पाठवलेल्याचे गाणे...
दिल पे ज़ख़्म खाते हैं, जान से गुज़रते हैं
वो जो फेर कर नज़रें पास से गुज़रते हैं
(वो जो फेर कर नज़रें पास से गुज़रते हैं)
ऐ ग़म-ए-ज़माना, हम तुझको याद करते हैं
>>>> प्रेमाची अवहेलना (भारतात न्याय न मिळणे) झाल्यावरच गाणे.
गहरा हुआ गहरा हुआ रंग आशिकी
गहरा हुआ गहरा हुआ रंग आशिकी गहरा हुआ...
गाणं जाम आवडलं होतं. रोज किमान एकदा तरी गुणगुणण्यात येतं.
दुसरा भाग रणवीर साठीच सगळं
दुसरा भाग रणवीर साठीच सगळं काही. आत्तापर्यंतचा बेस्ट रोल हमझा! छा गया है गुरू!
फ्लॅशबॅक पुरताही अक्षय खन्ना यात दिसला नाही. आश्चर्य वाटलं.
म्युझिकने मात्र साफ निराशा केली भाग २ मधे आरी आरी सोडलं तर. पण तेही इतक्या पटकन येऊन गेलं की मजा नाही घेता आली समहाऊ!
जुनी गाणी मात्र चपखल सिचुएशन ला वापरली आहेत.
धुरंधर - २ पाहिला. त्याला ‘द
धुरंधर - २ पाहिला. त्याला ‘द रिवेंज’ ही शेपटी सुट होते.
स्पॉयलर अलर्ट
काय आवडलं नाही?
चित्रपट कधी रेंगाळतो तर कधी जास्तच वेग पकडतो.
उदा. हमझाचा ल्यारीवर कब्जा स्पेशली अर्शद पप्पू प्रकरण लवकर आटपलं पाहिजे होतं. उझैरला अडकवण्यापलीकडे त्याचा तसा काही उपयोग नव्हता.
तर पिंडा प्रकरण, चौधरी अस्लमचा मृत्यू वगैरे फास्ट पेस्ड आहेत.
स्पाय थ्रिलर म्हणून पाहताना बरंच सस्पेंशन ऑफ डिस्-बिलीफ करावं लागतं. काही गोष्टी प्रेक्षकांची अगदी बिगरी लेव्हल धरून सांगितल्या आहेत.
विशेषतः एनएसएने स्वतः हेराला भेटणे आणि पुढच्या सुचना देणे, हमझाने स्वतः प्रत्येकाला मारणे व त्यापूर्वी मरणाऱ्याला कल्पना देणे.
हमझाने त्याचं सिक्रेट समजल्यावरही बायकोला जीवंत ठेवणे.
बडेसाबला सगळेच इनक्लुडिंग आयएसआय डोक्यावर घेतात आणि तो काश्मिरपासून युपीपर्यंत सगळीकडे कारवाया घडवतो हे तर हास्यास्पद आहे. एवढा पॉवरफुल तो भारतात असताना तरी होता का?
मेजर इक्बालच्या बापाचा रोल का आहे?
रक्तपात - तेवढं रक्त वाहिलं तर माणूस शॉकमधेच मरेल.
काय आवडलं?
रणवीर सिंग. हा पूर्णपणे त्याचा पिक्चर आहे. त्याच्या बहीणीला सोडवताना पाहिल्यावर, पिंडाला पाकिस्तानात पहिल्यांदा पाहिल्यावर आणि मग त्याने ओळखल्यावर, आलमला ‘जला दो’ म्हणताना रणवीरने कमाल केलीय.
आरी आरी, तम्मा तम्मा, हवा हवा वगैरे गाण्यांचा योग्य वापर. पण नवी गाणी लक्षात राहत नाहीत.
सारा अर्जून, आलम, राज झुत्शी छोट्याश्या भुमिकेत चमकतात. आतिफ अहमदला शोधून आणणाऱ्या कास्टिंग डिरेक्टरची कमाल आहे.
आलमसारखे हेर जे स्वतःचं अस्तित्व पुसून टाकतात आणि परदेशात मरतात ज्यांच्यासाठी कुणी अश्रूही ढाळू शकत नाही हे फार छान दाखवलंय.
अज्ञात मारेकरी भाग खुलवता आला असता अजून.
राकेश बेदीचा ट्विस्टही मस्त.
दुसऱ्या क्रेडीट सीनमध्ये जसकीरतचं ट्रेनिंग दाखवल्यामुळे हाणामारी बिलीव्हेबल वाटली.
मोदींचा उल्लेख किंवा नोटबंदी प्रकरण कथेच्या ओघात खटकलं नाही.
रेको - हेर आणि सुड म्हटलं की म्युनिक आठवतो आणि त्यातला कोल्ड मारेकरी डॅनिअल क्रेग. हा त्या लेव्हलची नाही. धुरंधरच्या पहिल्या भागाएवढा एन्गेजिंग नाही पण कंटाळा येत नाही. मोठ्या पडद्यावर बघा. ओटीटीवर मजा नाही.
ही पोस्ट वायरल होत आहे.
.
Spoiler ॲलर्ट
ही पोस्ट वायरल होत आहे.
हे जर खरे असेल तर यानुसार धुरंदर मधील व्हिलन पात्रे ज्यांच्यावर बेतली आहेत ते 2014 आधीच काँग्रेसचे राज्य आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच मारले गेले आहेत. आणि भारतीय गुप्तहेर सुद्धा त्या आधीच पाठवले गेले आहेत.
मग धुरंदरमध्ये हे जिवंत दाखवले असताना मोदींचा शपथविधी आणि नोटबंदी कसे आले?
धुरंधर २ ची गाणी लक्षात
धुरंधर २ ची गाणी लक्षात राहिली नाहीत असं वाटलं होतं पण स्लो पॉयझन आहेत. फिर से आणि जाईये सजणा.
माझेमन+११
माझेमन+११
जाईये सजणा आणि जान से निकलते है रिपीट वर ऐकतोय
जान से निकलते है कालपासून
जान से निकलते है कालपासून पुन्हा पुन्हा ऐकते आहे! इट ग्रोज ऑन यू!! जाइये सजणा कोणाचा आवाज आहे, पॉवरफुल आहे एकदम.
जाइये सजणा कोणाचा आवाज आहे >>
जाइये सजणा कोणाचा आवाज आहे >>> जस्मिन संदलास - खतरा आवाज आहे हिचा + सतिंदर सरताज
बरं ते हमझा ने ५०० रू. लपवले
बरं ते हमझा ने ५०० रू. लपवले खनानीला मारायच्या आधी त्याचं काय?
घर की याद नही आयी जस्सी? तुफान गाजतोय डायलॉग...
म्युझिकमध्ये पाट्या टाकल्यात.
म्युझिकमध्ये पाट्या टाकल्यात.
एक नवा आल्बम म्हणून पुन्हा
एक नवा आल्बम म्हणून पुन्हा ऐका असे सुचवेन. कारण सिनेमा मधे गाण्यांना जस्टिस केलेला नाही. त्यात ती अर्धवट ऐकू येतात तेव्हा नोटिसच झाली नाहीत पण आता नीट ऐकल्यावर मला अॅक्चुअली दुसर्या भागाची गाणी फार आवडली आहेत!! पहिल्यात फक्त २ आवडती होती, या सिनेमाची आरी आरी ,दिल पे जख्म खाए है ही तरी रीमिक्स आहेत. पण ओरिजिनल गाणी फिर से नैना भरे , जैयो सजणा नंतर वारी जावा पण आवडत आहे मला , मजा येते आहे ऐकायला! जस्मिन संदलस, बॉम्बे रॉकर्स , कोणीतरी खान, अरीजित, रीबेल ,शाश्वत सचदेव ही यंग टीम भारी जमून आली आहे!
कदाचित दुअर्या भागाची गाणी
कदाचित दुअर्या भागाची गाणी चढत जातील. म्हणजे मनावर गारुड होत जाईल.
मला पहील्या भागात, 'मोनिका ओ माय डार्लिंग' आवडलेले.
धुरंधरची बरैच गाणी
धुरंधरची बरीच गाणी बॅकग्राऊंडला वाजत असतात. आपण मारामार्या बघण्यात बिझी असताना तिकडे अजिबातच लक्ष जात नाही. मग त्याकरता पिक्चर बघावा लागतो परत
Pages