सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
नाही नाही गाण्यासाठी सिनेमा
नाही नाही गाण्यासाठी सिनेमा नका बघू. त्यात ती अर्धीच येतात. म्यूजिक आल्बम च चांगल्या साउंड सिस्टिम वर वेगळा ऐका
आता नीट ऐकल्यावर मला अ
आता नीट ऐकल्यावर मला अॅक्चुअली दुसर्या भागाची गाणी फार आवडली आहेत >>> हो. कथानकात परफेक्ट ब्लेंड होतात गाणी आणि आपण पडद्यावर एवढे गुंतलेले असतो की गाणी म्हणून त्यांच्याकडे दूर्लक्ष्य होतं काहीसं. पण नंतर ऐकली की ही जास्त अपील होतात. ‘आरी आरी’चा तर पिक्चर बघितल्यावर अर्थच बदलून जातो.
परत ऐकून बघाच.
तम्मा तम्माचा एवढा परफेक्ट वापर मुळ पिक्चरमधे पण झाला नव्हता..
मग त्याकरता पिक्चर बघावा
मग त्याकरता पिक्चर बघावा लागतो परत Wink? > खरंय त्यामुळे आम्ही पहिला पिक्चर दोनदा बघितला. दुसरा पण आवडला पण "हम प्यार करने वाले ' हे गाणे apt नाही वाटले. उगीच आल्यासारखे वाटले. दुसरी चूक हि केली कि पहिला पिक्चर दोनदा iMAX मध्ये बघितला आणि वेळ न्हवता आणि बघायची घाई होती म्हणून हा नॉर्मल थिएटर मध्ये बघितला ....खूप खूप फरक पडतो ... उगीच नॉन iMAX थेटरात बघितला असे वाटले.
तम्मा तम्माचा एवढा परफेक्ट वापर मुळ पिक्चरमधे पण झाला नव्हता..> perfect
एक इंस्टावर ट्रेंड झालेली
एक इंस्टावर ट्रेंड झालेली गाण्याची ओळ आवडली होती. काल मला स्वतःला एक एडिट बनवताना त्यात ती ओळ वापरायची होती. Lyrics टाकून शोधू लागलो तर धुरंदर गाणी येऊ लागली. आधी डोक्याला शॉट लागला. जिथे तिथे काय धुरंदर प्रचार चालू आहे. मग पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी सर्च देऊन सुद्धा पुन्हा धुरंदर 1 मधील गहिरा हुआ येऊ लागले तेव्हा संशय आला आणि ते गाणे पूर्ण ऐकले तर त्यातच ती ओळ सापडली
लाखों फ़रिश्तों की है तु जान
वो पूछते हैं रहती कहाँ
मेरी बाँहों में रहती, उनको बता...
वा!
....
मी खबरे आझम नावाच्या प्रोग्रम ची लिंक द्यायचा प्रयत्न करतो आहे पण एरर येते आहे.
इथे कोणी कुणाल कामरा ROFL गांधी यांचा खबरे आझम प्रोग्रॅम कुणी बघाताय का? अगदी हहपुवा आहे.
त्यांच्या धुरंदर २ वरच्या लेटेस्ट एपिसोड ची लिंक आहे
https://www.youtube.com/watch?v=Q5a7MIxEAZc
Modi ji in DHURANDHAR 2? Demonetization Masterstroke?
मी पण एक स्पाय बनून
मी पण एक स्पाय बनून पाकिस्तानात गेलो होतो. पहिले मी गेलो आणि नंतर हमजा आला. माझं मिशन अजून सुरू आहे. धुरंधरमध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खरोखर घडलेल्या आहेत. तेनू शरारत सीखावा हे गाणं पण खरं आहे त्याचा डान्स मी बसवला होता. तेव्हा मी खूपच लहान होतो.
सर तुम्ही अजूनही लहान आहात.
सर तुम्ही अजूनही लहान आहात.
हमझाचं सगळं व्यवस्थित सुरू
हमझाचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. तो तिकडेच अक्षय खन्नासोबत हातमिळवणी करून सेटल व्हायला पाहिजे होता. विनाकारण जीव तोडून इकडच्या लोकांसाठी करत होता. इकडची लोकं पण तंबाखू खाऊन पचापच पिचकाऱ्या टाकताहेत, जुगार खेळताहेत, तीन पत्ती ड्रीम इलेव्हन रमी खेळताहेत, भ्रष्टाचार करून देशाची वाट लावताहेत. त्यांच्या तुलनेत अक्षय खन्ना काहीच नुकसान करत नव्हता. हमजा चुकला.
इकडची लोकं पण तंबाखू खाऊन
इकडची लोकं पण तंबाखू खाऊन पचापच पिचकाऱ्या टाकताहेत >>>
मग हमझाला सिंगापूरात पाठवायला पाहिजे होते ना? पण तिकडे जाऊन सूड कुणाचा घेणार? दुरीयान खाणाऱ्यांचा?
आज बघितला...मला दुसरा पार्ट
आज बघितला...मला दुसरा पार्ट पहिल्या पेक्षा आवडलाय . स्पेशली अस्लम चा पाठलाग होताना तम्मा तम्मा मागे वाजते.. खतरनाक जुळून आलय ते..
दुसरा पार्ट पहिल्या प्रथम कंटाळ वाणा वाटेल पण स्लो गारूड होतय त्याचं.
नोट बंदी नंतर पाकी भागात माजलेला गोंधळ अजून नीट टिपायला हवा होता..
सगळ्यात टुकार पात्र म्हणजे ईक्बाल चे वडील..
(No subject)
दुसऱ्या पार्टमध्ये हमझा आलमला
दुसऱ्या पार्टमध्ये हमझा आलमला मारतो त्या गोळ्या खोट्या असतात. आलम चाचाला कुणकुण लागलेली असते म्हणून तो गाजराचा लाल ज्यूस घेऊन बाथरूममध्ये येतो आणि हमझाला बोलतो जा बाहेर, येताना खोटी बंदूक आण आणि मला मार म्हणजे मी मेल्याचं नाटक करतो. माझं रक्त म्हणजे गाजराचा ज्यूस असेल घाबरू नको. नंतर तो भूमीगत होऊन भारतात येतो. हमझा विमानात बसून भारतात येत असतो तेव्हा त्याच्या बायकोला पाकिस्तानात थांबायचं असतं पण शेवटच्या क्षणी ती निर्णय बदलते आणि विमानाच्या पाठीमागे धावत सुटते. शेवटी ती विमानाच्या चाकावर बसून भारतात येते आणि सगळे मजेत जगतात.
जैश-ए-मोहम्मद दहशतवादी
जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वर याचा पाकिस्तानमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.
धुरंधर ३ साठी ची स्क्रिप्ट आदित्य धरला घरी बसल्या बसल्या मिळतं आहे.
(No subject)
काल पाहिला धुरंधर २.
काल पाहिला धुरंधर २. जबरदस्त परिणामकारक आहे. पूर्णवेळ म्हणजे चार तास आपण अक्षरशः बाकीचं जग विसरून जातो. खूनखराबा आहे मात्र कथेच्या ओघात आपण तो स्विकारतो. तरीही काही दृष्यात मान फिरवलीच मी. झेपत नाहीत एका मर्यादेनंतर. पण हे जग वेगळं आहे, आपल्या नेहमीच्या आणि अतिमर्यादित विश्वाच्या परिघावरचं आहे, पण हे जग खरोखरीच अस्तित्वात आहे याची जाणीव ठेवली तर ही दृष्य अविश्वसनीय वाटत नाहीत.
मोदींचं दर्शन कथेच्या गरजेनुसार बातम्यांतून होतं पण मोदीद्वेषींना त्यामुळे पोटशूळ उठू शकतो. भारताची नवी भुमिका unapologetically ठामपणे मांडली आहे "ये नया भारत है. ये घरमे घुस के मारेगा" हे वाक्य इतकं बिंधास्तपणे दाखवलंय. म्हणजे या आधीही आपले धुरंधर पाकीस्तानात कार्यरत होतेच पण हे बोलून दाखवण्याची राजकीय हिंमत, परिस्थिती नसावी. असो. ही बदलेली भुमिका बघून जीव सुखावला.
दुसरं म्हणजे पात्रं इतकी हुबेहूब दिसणारी निवडली आहेत. आतिफ अहमद, झरदारी आणि विशेषतः नवाझ शरीफ. नवाझ शरीफ तर अगदीच हुबेहूब. नाही म्हणजे तेवढाच तेलामीठाला आधार असा विचार करून खरंच त्यांनी स्वतःच चित्रपटात काम केलंय की काय असं वाटतं. आणि आपल्या हिरोबद्दल काय बोलावं? ही भुमिका केवळ त्याची आणि त्याचीच. जबरदस्त डोळे आणि देहबोली. आपुन तो और भी फॅन हो गया!
मला फक्त एक आक्षेप आहे. धुरंधर १ आणि २ वर. रहिमान डकैत आणि मेजर इकबाल यांना जरा जास्तच ग्लोरिफाय केलंय. शिवाय काही प्रश्न आहेत. मुजाहिदीनांना भारतात जाण्यासाठी निवडल्यावर त्यांचे केस कापले हे ठीक पण हमजाचं सत्य कळल्यावर त्याला ठार करायचं तर मेजर का डोकं भादरतो? तो रिझवान कोण असतो? तो ही भारतीय हेर असतो का? कारण तो पूर्णपणे हमजाच्यासोबत ठाम उभा असतो.
आणि सर्वात शेवटी म्हणजे क्रेडिटसनंतर जे सरप्राईज आहे म्हणतात ते काय असं मोठं सरप्राईज वगैरे नाहीये. त्याआधीच मूळ धक्का येऊन जातो (जो चित्रपट उशीरा बघितल्यानं माहीत झाला होता).
btw, तो नवाझ शरीफ झालेला अ
btw, तो नवाझ शरीफ झालेला अॅक्टर काय हुबेहुब तस्साच दिसतो ! >>> अगदी अगदी. मी ही हेच लिहिलंय वर. स्पॉयलर लिहिलं होतं म्हणून आज वाचला हा रिव्ह्यू .
ट्रेलरमध्ये मला अमीरखानच्या मुलाला सहन करावं लागलं.
त्या उल्फत रहमान जेंव्हा
त्या उल्फत रहमान जेंव्हा जेंव्हा पडद्यावर येतात, तेंव्हा तेंव्हा, त्या त्या वेळच्या अल्फामेलला थोबाडीत मारुनच मग रडायला सुरु करतात! साला, बायको असावी तर अशी! >>>>
भारी. ऑब्झर्वेशन.
रिझवान कोण असतो? तो ही भारतीय
रिझवान कोण असतो? तो ही भारतीय हेर असतो का? कारण तो पूर्णपणे हमजाच्यासोबत ठाम उभा असतो.
<<<
हो, दाखवलाय कि पार्ट १ मधेही, धुरन्धर २ मधे एन्ड क्रेडिट्स येतात तेंव्हा रणवीर आणि रिझवान चे भारतात एकत्रं ट्रेनिंग झाल्याचा सीनही आहे !
अच्छा हो काय. मिसलं तर ते मी.
अच्छा हो काय. मिसलं तर ते मी.
>> विशेषतः नवाझ शरीफ. नवाझ
>> विशेषतः नवाझ शरीफ. नवाझ शरीफ तर अगदीच हुबेहूब. नाही म्हणजे तेवढाच तेलामीठाला आधार असा विचार करून खरंच त्यांनी स्वतःच चित्रपटात काम केलंय की काय असं वाटतं.>>
कास्टिंग परफेक्ट आहे.
Pages