सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
>>> यात युद्ध दाखवलेले नाही.
>>> यात युद्ध दाखवलेले नाही. तसे भारताने करावे असेही सुचवलेले नाही.
अजून.
'ये नया इन्डिया है, ये घर में घुस के मारेगा' हे हेरगिरीबद्दल म्हटलेलं वाटत नाही, दुसरा भाग आल्यावर ते स्पष्ट होईल.
धन्यवाद मनमोहन मावशी
धन्यवाद मनमोहन मावशी
मला काही तरी नॉन पॉलिटिकल
मला काही तरी नॉन पॉलिटिकल व धाग्याशी समांतर लिहू द्या बरं.
पुरुषांचे तेही हिरोचे सेक्शुअल ॲसॉल्ट हिंदी गल्लाभरू चित्रपटांत फारसे दाखवत नाहीत. यात तो सुरवातीला दाखवला आहे. तेही हिरो सहन करतो व रॅंडमली वाचतो. स्वतःला वाचवत नाही, ते "मर्द को कभी दर्द नहीं" होता च्या विपरीत आहे. ते मला आवडले. शिवाय अजून दाखवायला हवेत. कारण पुरुष प्रेक्षकांना जरा अंगावर येईल व हे स्त्रियांसाठी किती अपमानास्पद व किळसवाणे आहे हे कदाचित लक्षात येईल.
ही हिरो सहन करतो व रॅंडमली
ही हिरो सहन करतो व रॅंडमली वाचतो
>> मला वाटलं की दूधसोडावाला बाजूला जातो आणि पोलिसांना फोन करतो. तो स्वतः वाचवायला जात नाही.
पुरुषांचे तेही हिरोचे सेक्शुअल ॲसॉल्ट दाखवत नाहीत हे खरे आहे. नटरंगमध्ये दाखवला आहे पण तिथेही हिरो मुळातच व्हल्नरेबल दाखवला आहे.
>>> स्त्रियांसाठी किती
>>> स्त्रियांसाठी किती अपमानास्पद व किळसवाणे आहे हे कदाचित लक्षात येईल.
आय अॅम नॉट सो ऑप्टिमिस्टिक. त्यातून फक्त समलैंगिकांबद्दलचा द्वेष वाढण्याचे चान्सेस दुर्दैवाने जास्त वाटतात मला. पुरुषांच्या बाबतीत चित भी मेरी पट भी मेरी लॉजिकच लागू होतं सहसा.
पण तू म्हणतेस तशी आणखी दोन (नॉन-हिंदी) उदाहरणं आठवली त्यावरून - Shawshank Redemption आणि नटरंग.
नटरंग मलाही आठवला होता. पण हे
नटरंग मलाही आठवला होता. पण हे स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे, स्वतःला प्रोटेक्ट करण्यात किती एनर्जी जाते आपली. आयुष्यात अजून काय काय करता आलं असतं. लेकीसाठी/ भाचीसाठी पॅनिक व्हावं लागलं नसतं. जाऊ दे, असं हजारो वेळा पाहिले तर कदाचित one neuron at a time तरी होईल ही वेडी आशा !
समलिंगींविषयी का असे मत, हे तर माझ्या मनातही आलं नाही. ॲसॉल्ट करणारा बाय सुद्धा असू शकतो की. विकृती अधोरेखित केली जावी, सेक्शुअलिटी नाही. लोक कसा विचार करतील काही सांगता येत नाही पण !
पण हे स्त्रियांच्या दैनंदिन
पण हे स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे, स्वतःला प्रोटेक्ट करण्यात किती एनर्जी जाते >>> ही गोष्ट अज्ञान बालक यांना का नाही सांगत कुणी ?
(कारण पुरुष प्रेक्षकांना जरा
(कारण पुरुष प्रेक्षकांना जरा अंगावर येईल व हे स्त्रियांसाठी किती अपमानास्पद व किळसवाणे आहे हे कदाचित लक्षात येईल)
अशी एक फेसबुक की इन्स्टा रील आहे. भारतातलीच आहे.
अज्ञान बालक नाही विक्षिप्त
अज्ञान बालक नाही विक्षिप्त मुलगा.
निरुपमा राव यांच्या लेखाबद्दल
निरुपमा राव यांच्या लेखाबद्दल फा ची बहुतेक निरिक्षणे पटली.
पण लेख वाचला तर मला 'पाकिस्तान वर का सिनेमा काढला, चीन वर का नाही? हा सूर जाणवला नाही तर 'भारतीय जनमानस पाकिस्तान बद्दल इतके ऑब्सेसिव्ह का आहे ? चीनबद्दल का नाही ?' असा वाटत्ला आणी पटलाही.
त्या लेखात व्यक्त झालेली आणखी एक भिती, की अशा सिनेमामुळे पाकिस्तान च्या मनात भारताच्या भूमिकेबद्दल जे चित्र तयार होईल हीही मला अनाठाई वाटली. हा सिनेमा तद्दन प्रोपॅगंडा आहे, त्याचा टार्गेट ऑडियन्स डोमेस्टिक आहे हे पाकिस्तानलाही कळले असावे, तिथेही लग्नात या सिनेमातील गाण्यावर नाच वगैरे करतात.
हा सिनेमा तद्दन प्रोपॅगंडा
हा सिनेमा तद्दन प्रोपॅगंडा आहे, त्याचा टार्गेट ऑडियन्स डोमेस्टिक आहे हे पाकिस्तानलाही कळले असावे, तिथेही लग्नात या सिनेमातील गाण्यावर नाच वगैरे करतात.
>>>>
त्या लोकांना किंवा इथल्या लोकांना किंवा कुठल्याही लोकांना हे इतके सहजी कळत असते तर जगात कायम शांतता नांदली असती
जोपर्यंत कोणी मसीहा येऊन टाळकी भडकवत नाही तोपर्यंत सगळी जनता फार विचार न करता आवडीच्या गाण्यावर नाचून खुश राहते.
चिकवा वर मोठी पोस्ट होईल,
चिकवा वर मोठी पोस्ट होईल, आपल्या संभाजींचा धागा आहे, कनेक्शन देशावरचा पिक्चर.
बॉर्डर २ चा फक्त चार दिवसात २०० कोटी एव्हढा धंदा झाला हे बघून डोकं चालेनासं झालं. थांबा, मी बॉर्डर हेटर नाही, लगेच देशद्रोहीचा स्टँप घेऊन धावू नका. हल्ली देशप्रेमी आणि देशद्रोहीचे शिक्के घेऊन फिरणारे वाढत चालल्याने पिक्चर आवडला नाही आवडला हे सांगण्याची चोरीच झाली आहे. आणि चांगलंच आहे ना, धुरंधर चालला, बॉर्डर २ त्याच्या पेक्षा जोरात सुरू आहे.
बॉर्डर पाहिलेला असल्याने आणि आवडलेला असल्याने पुन्हा त्याच बॅनरकडून त्याच युद्धावर सिनेमा येत असेल तर तोच तोच पणा असेल असे वाटले होते. मला वाटले तसे अनेकांना वाटलेले असेल. इथे मायबोलीवर सुद्धा उत्सुकता दिसत नाही. धुरंधर मधे अजेण्डा असो वा नसो, ते स्वतंत्र चित्रपट आहे. किमान फ्रेश स्टोरी आहे. बॉर्डर २ मधलं बॅटल वेगळं आहे याची कल्पना आहे. पण प्रत्येक फौजीच्या घरची परिस्थिती दाखवणार आणि मग युद्धात समोरासमोरची सैन्यं एकमेकांना ललकारणार. हे खास सनीसाठी. सनी असला कि आरडा ओरडा आणि पेट्रोलपंपावर जळती काडी टाकावीत तसे जळजळीत डायलॉग्ज हे असणारच. विशेष म्हणजे ते त्याला अजूनही सूट होतात. जणू काही त्याचं वय वाढलंच नाही.
पण असाच गदर २ पाहिला आणि भयंकर फसवणूक झाल्याचा फील आला. पुन्हा तोच फील देऊन पैसे छापणे यापेक्षा वेगळा कुठलाही हेतू नव्हता. पण थेटरमधे तीन तास सनी फॅन्ससाठी मनोरंजन होतं हे नाकारता येत नाही. धर्मेंद्र हा भारतीय अर्नोल्ड असेल तर सनी हा भारतीय स्टॅलोन आहे. त्यामुळे अचाट शक्तीचे प्रयोग असणारच.
तर विषय काय होता ? चार दिवसात २०० कोटी.
मग बातम्या आल्या कि १४००० स्क्रीन्स वर रिलीज झालाय. पठाण ९००० स्क्रीन्स वर रिलीज झाला होता. आता हा हिशेब कसा असतो समजत नाही. म्हणजे एका स्क्रीनवर दिवसातले किती खेळ ? बुक माय शो वर पाहिलं तर एका एका मल्टीप्लेक्स ला कमीत कमी १८ शोज होते. काही ठिकाणी ३० शोज. आपण २० पकडू. एव्हढे शोज लावले कि पहिल्या दिवशी निर्मात्यांना सकाळच्या शोजला प्रिटच पोहोचवता आली नाही. प्रेक्षकांनी थेटर वाल्यांना जाब विचारला .
थोडक्यात एका पाच स्क्रीन असलेल्या मल्टीप्लेक्सला २० शोज असतील तर सरासरी एका स्क्रीनवर ५ शोज झाले. १४००० स्क्रीन्स सोडा. १०००० स्क्रीन्स धरले तर एका दिवसात ५०००० शोज. सरासरी ३०० रूपये तिकीट असे १,५०,००,००० . सरासरी प्रेक्षक संख्या १५०.
१५०००००० * १५० = २२५ ,०० ,००, ०००
हे असं गणित आहे. बाकीच्या छोट्या पिक्चरवाल्यांचं काय पण ? बॉर्डर २ चे निर्माते टी सिरीज दिसतात. मग एव्हढे स्क्रीन्स मिळाले यात नवल नाही. आठवड्यात पाचशे कोटी. दोन आठवड्यात हजार कोटी.
बडी मछली छोटी मछली को खा जाती है.
बॉर्डर २ असाच धुवांधार चालत राहिला तर मयसभा पिक्चरला किती स्क्रीन्स मिळतील ? ज्यांना तुंबाड आवडला आहे त्यांना हा बघायचाच असेल. पण त्यांना तो पहायला मिळणार का ?
वरची पोस्ट वाचल्यावर 'm
वरची पोस्ट वाचल्यावर 'm like ...... आखीर तुम कहना क्या चाहते हो भाई !
अमुक सिनेमाचा कोट्यवधींचा
अमुक सिनेमाचा कोट्यवधींचा धंदा झाल्याच्या बातम्या वाचल्या की भारतीय लोक महाश्रीमंत आहेत असे वाटायला लागते.
आता हे दोन्ही चित्रपट एकत्र नांदताहेत आणि एकत्रित कोट्यावधी छापताहेत. म्हणजे एकाच महिन्यात काही सिनेमाप्रेमींनी दोन्ही चित्रपट पाहिले असल्याची शक्यता आहे.
अजुन दोन दिवसात बजेट येईल. ते आल्यावर ‘भारतीय गृहिणीचे कंबरडे मोडले, महिन्याचे बजेट कोलमडले‘ हे वाक्य कुठलातरी पेपर हमखास छापणार. जीवनावश्यक जबाबदार्यांचा भार भारतीय गृहिणीवर मग मनोरंजनाचा भार कोणावर? ज्याच्याकडे महिन्याला दोन चित्रपट थेटरात जाऊन पाहायला वेळ व पैसा आहे त्याच्याच गळ्यात हा भार भारतीय गृहिणीने टाकलेला बरा.
भारताची लोकसंख्या १४० कोटी
भारताची लोकसंख्या १४० कोटी पार आहे. सिनेमा हिट करणारे प्रेक्षक २ कोटी पण नसतात.
असतील. पण बातम्यात
असतील. पण बातम्यात अग्रस्थानी जे दिसते त्यावरच बोलणार ना..
ते नेटकरी जे सापडेल त्याला भयंकर ट्रोल करतात ते १४० करोडात काही लाख किंवा हजारांच्या संख्येत असतील.. पण त्यांना इतके महत्व मिळते की सगळे जगच ट्रोल करते असे संबंधिताला वाटायला लागते. तसेच आहे हे.
इथे मायबोलीवर सुद्धा उत्सुकता
इथे मायबोलीवर सुद्धा उत्सुकता दिसत नाही >> एले, तो रिलीज झालाय हे ही मला आज समजले. थोडे मार्केटिंग पाहिले आहे पण नक्की कधी रिलीज होणार माहीत नव्हते. त्यात "२" चा इतिहास आपल्याकडे काही खास नाही. वरती तुमच्या गदर-२ च्या अनुभवाचेच उदाहरण. पहिला बॉर्डर आवडला होता. त्याच्या जवळपास जरी असेल तरी हा पाहायला आवडेल.
बाकी "आपण व आपल्या ओळखीतील किती लोकांनी थिएटर मधे जाउन पाहिला" ही एक फुटपट्टी धरली तर धुरंधरचे यश निर्विवाद आहे. बॉर्डर-२ तसाच निघतो का पाहू.
आपण बॉर्डर काढल्यावर ऑस्ट्रेलियाने गावसकर नावाचा पिक्चर काढला हा जोक मात्र नंतर खूप कॉमन होता
>>>"आपण बॉर्डर काढल्यावर
>>>"आपण बॉर्डर काढल्यावर ऑस्ट्रेलियाने गावसकर नावाचा पिक्चर काढला हा जोक मात्र नंतर खूप कॉमन होता">>>
😀 😀 😀
फारएन्ड, तुमचे आधीचे काही (वाचनातून सुटलेले) प्रतिसाद आज वाचले, ते छान आहेत! काही बाबतीत मतभिन्नता आहे आणि ती असावीच त्यात काही गैर नाही, कारण तुमची (आणि अन्यही काही माबोकरांची) मते ही चित्रपट पाहिल्यानंतर बनलेली असल्याने मतभिन्नता असली तरी ती महत्वाची ठरतात.
आपण बॉर्डर काढल्यावर
आपण बॉर्डर काढल्यावर ऑस्ट्रेलियाने गावसकर नावाचा पिक्चर काढला >>>

हा जोक सॉलीड होता. माझ्यापर्यंत आता आला.
हल्ली कुठल्या धाग्यावर कोणती पोस्ट लिहीली आहे हेच लक्षात न राहिल्याने भलत्याच धाग्यावर शोधून सापडली नाही कि अॅडमिनने का उडवली असेल या विचारात लॉग आउट करून बसतो.
नेटफ्लिक्स वर आताच धुरंधर
नेटफ्लिक्स वर आताच धुरंधर पाहिला. लगेचच फ्रेश मतं लिहीते. नंतर आफ्टरथॉट नको लिहायला.
मला या पिक्चरची स्टोरीटेलिंग खूप वेगळी आणि इम्प्रेसिव्ह वाटली. पण आउटस्टँडींग नाही वाटली. दोन्हीही टोकाची मतं ऐकली तितका कोणत्याही टोकाला जात नाही पिक्चर. सुरूवातीला पार्लमेंट अॅटॅक स्पे ऑप मधे आणि मुखबीर कि आणखी एका सिरीयल मधे पाहिलेला आहे. गेल्या काही वर्षात स्पाय थ्रिलर वेबसिरीज जास्त डिटेल्स मधे पाहिल्या आहेत. त्यामुळं नवीन काही वाटलं नाही. नेफ्लिने दहा मिनिटांचा पिक्चर कापला आहे. खूपच मोठा आहे. त्यात अक्षय खन्नाचा गाजलेला डान्स एडिट झाला आहे.
पण सिनेमाचा वेग भयाण आहे. तुम्हाला विचार करायला वेळच मिळत नाही. ध्रुव राठीचा व्हिडीओ सुद्धा पाहिला. त्याने सांगितले म्हणून उजवा अजेण्डा आहे हे लक्षात आलं. अन्यथा कळलाही नसता. पण इतना तो चलताही है. जो तो आपल्या मतानेच सिनेमा बनवणार. त्यामुळं इथे लिहीलेल्या अनेकांची मतं आता पटली.
अभिनयाच्या बाबतीत सर्वांचीच कामे छान झाली आहेत. क्रमच लावायचा तर सर्वात वर मी राकेश बेदीला ठेवीन. सगळेच अल्फा मेल आहेत. राकेश बेदीच्या नंतर अक्षय खन्ना. त्याचा अभिनय एकसुरी आहे असं वाटलं नाही. त्याच्या जबड्याच्या ठेवणीत दोष आहे असं वाटतं. त्यानंतर रणवीर सिंग. रणवीर सिंग पहिल्यांदाच एव्हढा आवडला. इथे लुक्सचा काहीच संबंध नाही. त्याचा आवाज मात्र मांजरासारखा आहे. या आधी सलमान, सैफ अली यांचेही आवाज अजिबात मर्दानी नव्हते. त्यांच्या डबिंगमधे बास अॅड करतात का ? असा आवाज बदलत नाही. आणी हे टेक्नीक असेल तर रणवीरसिंग ने ते वापरायला हवं.
रिअल फूटेज वापरलं यात मला आक्षेपार्ह काही वाटत नाही. काही ठिकाणी कंटाळा आला होता. पण ही माझी समस्या आहे. मला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. पिक्चर दहा पंधरा मिनिटे असा करत करत बघायची सवय लागली आहे.
सिनेमाचा लुक मात्र खूप ठिकाणी खटकला. टिव्ही सिरीजचा लुक आहे. तो बॉर्डर २ च्या ट्रेलर मधेही जाणवला. अनेक इनडोअर सीन्स मधे दृश्य क्रॉप केल्यासारखं दिसतं. हा आयमॅक्स कॅमेर्याने शूट केलाय का ? कारण हिंदीच्या बाबतीत जर आयमॅक्स ने शूट केला तर ७० एम एम वर त्याची क्रॉप केलेली प्रिंट रिलीज करतात आणि जर ७० एम एम वर शूट केला तर तो साईडने क्रॉप करून आयंअॅक्स वर उभा ताणून दाखवतात. त्यामुळं अनेक क्लोज अप्स मधे छाती पण नाही गळ्याची सुरूवात आणि मुंडकं असे दिसत राहतं.
आउटडोअर शूटींग मधे लायटिंग स्टुडीओ लुक वाली वाटते. नॅचरल लाईट मधे ज्या शॅडोज येतात त्या न येता बॅकग्राऊंड आणि चेहर्यावरचे लाईटस याचा मेळ बसत नाही. अगदी माझ्यासारख्या अडाणी प्रेक्षकाला कळून येईल असे.
धुरंधर २ मधे बरंच काही असेल. मेजर इक्बाल चा मोठा रोल असेल आणि कदाचित प्लॅशबॅक मधे रेहमान डकैत परत येईल असं वाटलं.
आर माधवन चं काम ठीक वाटलं. अजित डोवाल यांच्यावरून ते पात्र बेतलं आहे. हल्ली अनेक मालिका आणि सिनेमात तसं पात्र असतं. त्यांच्या स्टोरीज सुद्धा आता माहिती झाल्या आहेत. त्याची पारायणं होऊ लागली आहेत.
शेवटच्या चाळीस मिनिटांपर्यंत बुद्धीबळाचा डाव चालू आहे असं वाटतं. पण शेवटी हिरोच्या हातूनच रेहमान डकैत मेला पाहीजे हा अट्टाहास वाटला.
एकूणच सिनेमा वेगवान आहे. वेगळी हाताळणी आहे. साऊथ च्या बिनडोक नॉनसेन्स अॅक्शनला उत्तर दिलं आहे. एव्हढंच कि गाजावाजा झाला त्यामुळे अपेक्षा काहीच्या काहीच उंचावल्या तेव्हढा सिनेमा उच्च नाही वाटला.
संजय भावे, सिनेमा
संजय भावे, सिनेमा पाहिल्यानंतर तुमचं परीक्षण आवडलं. बघितलाच नव्हता तोपर्यंत काय करावं हेच कळत नव्हतं. मग गप्प बसणं पसंत केलं.
धुरंदर नेटफ्लिक्स वर आला आहे.
धुरंदर नेटफ्लिक्स वर आला आहे. पण मला नाही वाटत मी त्यावर तो पुन्हा बघेन.
पहिले कारण म्हणजे या पिक्चरला फार रिपीट व्हॅल्यू आहे असे मला वाटत नाही.
दुसरे म्हणजे छोट्या पडद्यावर तो बोर होईल कारण जे सीन थिएटरमध्ये तेव्हाच्या मूडला बघायला छान वाटले त्यातील फोलपणा घरी उठून दिसेल.
काल इथे लिहीताना डोळ्यांवर
काल इथे लिहीताना डोळ्यांवर प्रचंड झोप होती. त्यामुळे उरकती घेतली पोस्ट.
बघताना पडलेले काही जेन्युईन प्रश्न .
आपल्या सर्वांचा गेल्या काही वर्षात रॉ, आय बी वगैरेचा वेबसिरीज, सिनेमे यांनी खूप अभ्यास घेतला आहे.
आपल्याला हुषार करून सोडलेले आहे. हा अभ्यासक्रम पार पाडला असेल तर सांगा , कुठलाही सिने हेर पाकिस्तानात जाईल तेव्हां तो लियारीचा बादशहा बनायचा प्रयत्न करेल कि लो प्रोफाईल राहील ? रेहमान डकैतच्या इतक्या जवळ जाऊन पोलीस यंत्रणांच्या डोळ्यात येईल कि सांगकाम्या बनून राहील ?
जमीलला व्हिडीओ पाठवून रेहमान डकैतला सोडवायला सांगेल, त्याच्या मुलीशी लग्न करेल ? कोणता हेर एव्हढं डोळ्यावर येण्याचं काम करेल ?
तुमचा अभ्यास कमी पडतोय:-)
तुमचा अभ्यास कमी पडतोय:-) तुम्ही spy बघा. त्यात तो इस्राईली हेर तर सिरीयात मंत्री बनतो. ती तर सत्यकथेवर आधारित आहे.
इस्राईली हेर तर सिरीयात
इस्राईली हेर तर सिरीयात मंत्री बनतो >>> एली कोहेन
परवाच तर चीनमध्ये शी जिनपिंगच्या जवळच्या माणसाने हेरगिरी केली म्हणून पर्ज झालेत.
पूर्व जर्मनीच्या चान्सलरच्या पर्सनल सेक्रेटरीलाही हनीट्रॅप करवून हेरगिरी करवलीच होती की. तोच तर पॉईंट आहे म्हटलं तर महत्वाचा जागा पण डोळ्यात भरणार नाही अशा ठिकाणीच हेराला प्लेस करतात ना?
इथे रणवीर एकदम हिरो नाही ना बनत. दूध सोडावाल्याकडचा वेटर, मग मुलाला वाचवून गॅंगमध्ये प्रवेश, तिथेही तो उझैर किंवा डोंगापेक्षा कमी महत्वाचाच आहे की अजूनही. दुसऱ्या भागात कदाचित प्रॉमिनन्सला येईल.
बाकी हा पिक्चर एकदाच पहायचा असेल तर बिग स्रीनवरच बघावा.
रणवीर सिंगच्या आवाजाबद्दल लिहिलेलं पटलं. मलाही खटकलं होतं पण नीट मांडता आलं नाही.
तुमचा अभ्यास कमी पडतोय >>>
तुमचा अभ्यास कमी पडतोय >>>

गरीबी प्रचंड आहे हो. म्हणून भारतातच अभ्यास केला
इटलीत लो प्रोफाईल रहा असे सांगत नसावेत.
रणवीर सिंगच्या आवाजाबद्दल लिहिलेलं पटलं. मलाही खटकलं होतं >> थँक्स माझे मन.
चित्रपट आवडला. दीड
चित्रपट आवडला. दीड महिन्यापूर्वी पहिला होता.सगळ्यांची कामे उत्तम झाली आहेत. अक्षय खानचा अभिनय आवडला नाही . औरंगजेब म्हणूनही तसाच. आणि इथेही तसाच.
रणबीरसिंह , राजेश बेदी, अर्जुन रामपाल सुरेख अभिनय.
बाकी धागाकर्त्याने छान परीक्षण केले आहे.
नेटप्लिक्सवर पहिल्यांदा टॉप
नेटप्लिक्सवर पहिल्यांदा टॉप टेन मधे भारतीय सिनेमा आलाय. छान वाटलं पाहुन.
बाकी हा पिक्चर एकदाच पहायचा
बाकी हा पिक्चर एकदाच पहायचा असेल तर बिग स्रीनवरच बघावा.>> +१
धिस इज बिग स्क्रिन मार्व्हल!! रिपिट मी परत स्मॉन स्क्रिनवर बघितला..तितकाच आवडला...पहिल्यादा बघतो तेव्हा इतक्या वेगवान मुव्हित काहि डिटेलिन्ग सुटुन गेलेल ते परत बघता आल.
यु एस मधे नेटफ्लिक्सने काहिच काटछाट केलेली नाही..पुर्ण मुव्हि जसाच्या तसाच आहे..
पहिला अर्धा भाग पाहिला. अशा
पहिला अर्धा भाग पाहिला. अशा सिनेमात आजकाल 'सेम टू सेम' NSA सारखे दिसणारे पात्र असते.
कंदहार घटनेत घुसवलेले तपशील आणी पार्लमेंट अॅटॅक मध्ये वगळलेले तपशील पहाता सिनेमाचा हेतू काय हे लक्षात आलेच.
राजकारणी हे भ्रष्ट व देशद्रोही असतात व आर्मी, आयबी वगैरेचे लोक मात्र देशभक्तच असतात हा 'तिरंगा' सिनेमातला trope इथेही आहे.
असो, अधिक काही लिहून लोकांच्या देशभक्तीच्या फुग्याला टाचणी लावणे टाळेन.
Pages