सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
अखेर नेफ्लिवर बघितला one time
अखेर नेफ्लिवर बघितला one time watch सिनेमा पेक्षा संजयजींचे परिक्षण जास्त आवडले.
मस्त आहे सिनेमा - पण
मस्त आहे सिनेमा - पण थेटरमध्ये बघण्यातच मजा आहे.
खूप जास्त हिंसाचार आहे असे ऐकत आलो होतो त्यामुळे बघायचा फारसा मूड नव्हता. पण पुस्पासारख्या चित्रपटापुढे यातला हिंसाचार खूप कमी वाटला. बर्याच दिवसांनी बॉलीवूडवरची दक्षिणी मळभ दूर झाल्यासारखे वाटले. कितीही फालतू असला तरी हिंदी सिनेमात कथेच्या अनुषंगाने हिंसाचार असायचा. पण गेल्या काही वर्षात मात्र दक्षीणी सिनेमांसारखी हिंसाचाराभोवती ३-४ टाके घालून कथा रचली जात होती. ती प्रथा धुरंधरने मोडून काढली. अप्रतिम स्टोरी टेलींग आहे.
दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे ध्वनीमुद्रण! "हम आपके है कौन" पासून सुरू झालेला डॉल्बीचा प्रवास या सिनेमात शिगेला पोहचला आहे. त्या काळात आवाज मोठा करणे आणि वेगवेगळ्या स्पीकर्समधून आवाज पाठवणे याला डॉल्बी म्हणायचे. मग तंत्र सुधारत गेले. साऊंड इफेक्ट्स खरे वाटायला लागले. पण ते होते फक्त इफेक्ट्स - १-२ सिन्सपुरते मर्यादीत. आणि ते साउंड इफेक्ट्स वाले सीन्स आणि इतर सीन्स यातला फरक सहज जाणवून यायचा. पण या सिनेमात तो फरक अगदी कमी आहे. सगळ्यात कळस गाठला आहे तो 'रंबा हो' गाण्यात. गाणं जुनंच आहे आणि पूर्ण हिंसाचार भरला आहे. पण त्या गाण्याचा आवाज आपल्या ९ दिशांनी ऐकू येत राह्तो - खास करून उर्ध्व दिशेने - आणि गोळीबारीचा आवाज समोरून / पडद्याच्या दिशेने. या एका गाण्याकरता सिनेमा थेटरमध्ये बघणे वर्थ आहे. फक्त या तंत्रामुळे चित्रपटाचा साउंड बराच लाऊड झाला आहे. एका मर्यादेपलीकडे कान आणि मेंदू यांना एक प्रकारचा थकवा आल्यासारखे वाटले मला.
तिसरी आवडलेली गोष्ट संगीतातली दृक-श्राव्यता. "ना तो कारवा" ही प्रचंड आवडती रोमँटीक कव्वाली. या सिनेमात ना ती कव्वाली आहे ना रोमँटीक आहे. "गाण्याचा बट्ट्याबोळ केला आहे" हाच एक विचार यायचा डोक्यात ते गाणे ऐकल्यावर. आणि वरताण म्हणजे तो टिपेचा सूर. पण सिनेमा बघताना ते गाणे, त्याचा सूर, त्यातले शब्द हमझाची मनोवस्था तंतोतंत प्रतीत करते. खूपच आवडले ते गाणे तेंव्हा. दुसरे ते अगम्य शब्दांचे गाणे - ना ते शब्द कळायचे ना ती चाल काही खास वाटायची. पण सिनेमात त्यावरच्या स्टेप्स बघताना ते गाणे मस्त वाटले.
चौथी आवडलेली गोष्ट म्हणजे रणवीर आणि राकेश बेदीचा अभिनय. रणवीर बेंबाबा नंतर पहिल्यांदाच इतका आवडला. घार्या लेन्सेसचे त्याने चीज केले आहे. प्रत्यक्षात नसली तरी घार्या डोळ्यांची माणसे अनेकदा बेरकी वाटतात. इथे त्या डोळ्यांचा बेरकीपणा अचूक दाखवला आहे रणवीरने. राकेश बेदी तर अफलातून आहे या सिनेमात.
इतर पात्रांच्या अभिनयापेक्षा संजय दत्तचा अभिनय खूप 'नाटकी' वाटला. पण त्याहूनही सुमार अभिनय आहे तो अक्षय खन्नाचा. त्याचे ते ओठ चावणे आता खूपच डोक्यात जायला लागले आहे. त्याचे पात्र पण अगदीच ढिसाळपणे उभे केले आहे. तो सिनेमाचा खरा खलनायक, पंण ना त्याचा राग येतो ना त्याची जरब जाणवते.
इतरही काही निगेटीव्ह बाबी आहेत पण त्या न जाणवू देता चित्रपट पुढे जातो हेच त्याचे यश.
छान लिहिले आहे माधव.
छान लिहिले आहे माधव. सर्वांच्या अभिनयाबात मीही अगदी हेच लिहिले होते. अक्षय खन्ना आणि संजय दत्तच्या कामाचे एवढे का कौतुक होत आहे माहीत नाही. त्यांच्यापेक्षा राकेश बेदी आणि रणवीरचाच अभिनय सरस आणि आव्हानात्मक होता. ध्वनीमुद्रणाबाबतची निरीक्षणं अचूक वाटली. मलाही परत पहायचा आहे.
पण गेल्या काही वर्षात मात्र
पण गेल्या काही वर्षात मात्र दक्षीणी सिनेमांसारखी हिंसाचाराभोवती ३-४ टाके घालून कथा रचली जात होती >>>
माधव छान लिहीले आहे. इथे थिएटरमधे पाहताना एका ट्रेलरला इतका आवाज आला की साडेतीन तास हा असाच आवाज येणार का असा प्रश्न पडला. पण प्रत्यक्ष पिक्चर चालू झाल्यावर आवाजाची लेव्हल ओके वाटली. कानठळ्या बसत आहेत असे वाटले नाही. भारतात जेथे एसी असतो तेथे एसीचे बिल दुसरे कोणीतरी भरणार असल्यासारखे कमालीचे थंड करून टाकतात तसे आवाजाचे करत असतील तर माहीत नाही.
संजय दत्तबद्दल - ते मुद्दाम स्टायलाइज्ड केले असावे असे वाटले. थोडा कॉमिक टचही आहे. कुर्बानी मधला अमजद आहे तसा (अर्थात तो फारच मस्त होता)
ते अरेबिक का काय ते गाणे इतके काही खास वाटले नाही. आता आपल्याकडे हळदीकुंकू समारंभाला एण्ट्री करताना ते वाजवून त्यावर नाचत रील बनवतात ते पाहिल्यावर तो रॅपर माउण्ट सिनाई का कोणता जवळचा एखादा पर्वत शोधून तिकडे निघून जाईल. अफगाण असेल तर हिंदुकुश.
फा, आम्ही ३ दा वेगवेगळ्या
फा, आम्ही ३ दा वेगवेगळ्या थिएटरला पाहिला आणि तीनही वेळा साऊंड इफेक्ट वेगळा होता. तेव्हा थिएटरवर डिपेंड करत असावं.
सगळ्या कार्यक्रमात एंट्रीला इनक्लुडिंग हळदीकुंकु लोकं अक्षय खन्नाच्या गाण्यावर नाचत येतायत. एकेक वेडेपणा.
सगळ्या कार्यक्रमात एंट्रीला
सगळ्या कार्यक्रमात एंट्रीला इनक्लुडिंग हळदीकुंकु लोकं अक्षय खन्नाच्या गाण्यावर नाचत येतायत. एकेक वेडेपणा.>> अगदीच !! काहि रिल मधे गाण अरेबिक आणी स्टेप्स "नाच रे मोरा लेव्हलच्या "
बायकांच्या फोटो ऑब्सेशनबरोबरच
बायकांच्या फोटो ऑब्सेशनबरोबरच आता रिल करुन पकवतात.
काल नेफ्लिवर पाहायला सुरवात
काल नेफ्लिवर पाहायला सुरवात केली. खुप मोठा आहे, संपता संपेना.
कोणे एके काळी तिन तासांचे चित्रपट असत, आता तो ट्रेंड परत येतोय बहुतेक.
चित्रपट अतिशय वेगवान आहे. जास्त विचार करायला सवड मिळत नाही. तरीही त्यात हमझाची प्रेमकथा खटकली. तिच्या बाजुने तर खटकलीच पण एक हेर जो घरात बसुन डायरीत सगळे लिहुन ठेवतोय तो घरात दुसर्या व्यक्तीला जागा देतो हे खटकले. ती व्यक्ती स्त्री असेल तर ती कधीतरी घर आवराआवरी करणार आणि त्यात आपले गुपित तिच्या हाती लागणार एवढे तरी त्याला कळायला हवे.
(त्याने हिंदी चित्रपट तितके पाहिले नसणार
)
हेराला सिस्टिममध्ये वर जाणे आवश्यक आहे. तो बाहेर राहुन आतली बातमी कशी मिळवणार? हमझा तितका विश्वास संपादन करतो आणि आतल्या सर्कलमध्ये जातो म्हणुन तर त्याला मोठा हल्ला होणार हे कळते. तो दुकानात चहा ओतणाराच राहिला असता तर कसे कळले असते?? सगळे यशस्वी हेर अगदी व्यवस्थित सिस्टिममध्ये घुसले होते असे इतिहास सांगतो.
हमझा बलोच प्रांतात पहिल्यांदा जातो तेव्हा त्याला तिथे ओळखणारे कोणीच कसे नाही हा प्रश्न सलमान डकैतला पडेल का असे तो प्रसंग पाहताना वाटले होते.
इथल्या काही लोकांचे प्रतिसाद वाचुन माझा भलताच गैरसमज झालेला. खुपच ग्लोरिफाईड देशभक्ती वगैरे दाखवलीय वगैरे वाटले होते. प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. जे प्रत्यक्षात घडले ते तसेच दाखवले त्याला ग्लोरिफिकेशन म्हणायचे??
२६/११ला जे थेट प्रक्षेपण आणि कमेंटरी माध्यमे दाखवत होती ते बघुन तेव्हाच चिड आली होती. ते बघुन पाकिस्तानातले हँडलर्स इथल्यांना गाईड करत होते हे तेव्हाही पेपरात आले होते. तेच दाखवले चित्रपटात.
भविष्यात तसे सरकार येईल हा संवाद वर प्रतिसादात जोरकसपणे लिहिलाय त्यामुळे तो चित्रपटातही जोरकसपणे येईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे वाटले नाही. दोन कलिग्स सरकारी प्रायोरिटिजवर बोलताहेत, यांच्या प्रायोरिटिज वेगळ्या आहेत ज्याला महत्व भविष्यात कधी मिळेलही असे ते बोलताहेत असे मला वाटले.
२६/११ हे सरकारी अपयश आहे असे चित्रपट सुचित करत नाही. देशात हल्ला होणार हे गुप्तचर यंत्रणा सांगते पण नेमके ठिकाण तिला सांगता येत नाही. वेगवेगळी ठिकाणे सांगितली जातात हे हाइलाईट केलेय की. टाळलेले दहा हल्ले कोणाला कळत नाही पण झालेला एक हल्ला हायलाईट होतो ह्या अर्थाचे वाक्य चित्रपटात आहे.
असो. आपण जो चश्मा घालुन जग पाहतो तसे ते दिसते हे सत्य ह्या चित्रपटावरच्या प्रतिक्रिया वाचुन परत एकदा पटले.
सत्य व कल्पिताची अद्भुत सांगड चित्रपट घालतो आणि त्यामुळे ही हेरकथा खरी वाटते हे चित्रपटाचे यश आहे. कोणाला सत्यही खटकत असेल तर काय करणार…
अक्षय खन्ना आणि संजय दत्तच्या
अक्षय खन्ना आणि संजय दत्तच्या कामाचे एवढे का कौतुक होत आहे माहीत नाही. त्यांच्यापेक्षा राकेश बेदी आणि रणवीरचाच अभिनय सरस आणि आव्हानात्मक होता>>>
सहमत. अक्षय खन्ना तितका प्रभावी वाटला नाही जितका उदो उदो होतोय. संजय दत्तला तर वेगळे काही करायची गरज पडलीच नाही आणि तसे वेगळे काही लिहिलेलेही नाही. त्याचे असणे पुरेसे झालेय.
चित्रपटाचा आवाज खुपच श्रवणीय आहे हे मोबाईलवर ईअरफोन लाऊन ऐकताना जाणवते. माधव यांच्या प्रतिसादाशी सहमत.
हआहैकौ न्यु एक्सेलसियरमध्ये पाहिलेला. तिथे गाणे सुरु झाले की डॉल्बी सुरु करत
धुरंधर विथ डॉल्बी थेटरात जबरदस्त वाटला असणार यात शंका नाही.
सायो, आता आयुष्यातली प्रत्येक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यासाठी घडते. चार बाया घरात आल्या आणि त्यांनी हळदकुंकू लाऊन घेतले यात काय मजा?? बाजारच करायचा असल्यामुळे आपण कसल्या पार्श्वभुमीवर काय दाखवतोय हा विचार कोणी करत नाही. ज्याला लाइक्स व शेअर जास्ती ते आम्ही करणार
आता आपल्याकडे हळदीकुंकू
आता आपल्याकडे हळदीकुंकू समारंभाला एण्ट्री करताना ते वाजवून त्यावर नाचत रील बनवतात ते पाहिल्यावर तो रॅपर माउण्ट सिनाई का कोणता जवळचा एखादा पर्वत शोधून तिकडे निघून जाईल. अफगाण असेल तर हिंदुकुश

अरेबिक गाणं आणि नाच रे मोरा स्टेप्स
>>>
ठसका लागून चहा सांडला ना माझा…
रीळ मधील बालिश स्टेप्सला
रीळ मधील बालिश स्टेप्सला पर्याय नसतो. ते हौस म्हणून केले जाते पण अंगात नाचाची कला सर्वांच्याच नसते.
मला खरे तर ज्यांना नाच येत नसूनही जे नाचायची हिंमत दाखवतात त्यांचे कौतुक वाटते. मी लग्नाच्या वरातीत किंवा गणपती मिरवणुकीत देखील अश्यांचेच निरीक्षण करत असतो. हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. काढतो कधीतरी..
@ धुरंदर, दुसरा भाग लवकर येत आहे म्हणजे पहिला रिलीज होताना जवळपास तयारच असेल.
पहिल्यात अक्षय खन्नाची हवा झाली आहे. आता दुसऱ्यात त्याला पब्लिक डिमांड वर फ्लॅशबॅकमध्ये छोटा मोठा कॅमिओ करायला आणतात का याची उत्सुकता..
तसेच दुसऱ्यात अजेंडा प्रोपोगांडा वगैरे जे काही असते ते सुद्धा जोरदार असेल अशी शक्यता बरेच जण वर्तवत आहेत. त्याचीही उत्सुकता राहील.
मला खरे तर ज्यांना नाच येत
मला खरे तर ज्यांना नाच येत नसूनही जे नाचायची हिंमत दाखवतात त्यांचे कौतुक वाटते.
>>>>
नाचायला कुणाचीच हरकत नाहीये हो...
पण सोमिवर ते व्हिडीओ टाकून आमच्यावर इमोशनल अत्याचार का?
त्यात परत परिचयातल्या लोकांचे व्हिडीओ असले तर जबरदस्तीच्या लाईक टाकावा लागतो ना.
आणि मग भारंभार तसलेच रील्स दिसत राहतात.
आणि मुळात हळदी कुंकवाला कसली एंट्री? म्हणजे जिने आमंत्रण दिले ती करते की पाहुण्या बायका करतात?
नाच येत नसून नाचणारे असतात
नाच येत नसून नाचणारे असतात तसे गाता येत नसून गाणारेही असतात. येत नसेल तरीही चांगले मानुन घ्या यावरून करा-ओके शब्दाचं सार्थक झाल्या सारखे वाटते. पाहायला नको वाटत असेल तर डोळे बंद करता येतात , दुसरीकडे पहाता येते. पण कानांचे तसे नाही. एक प्रकारची निर्वणावस्था प्राप्त करावी लागते. सोमीवर अर्थात न ऐकण्याचा, न पाहण्याचा पर्याय असतो, न पाहता, न ऐकता आवश्यक तिथे लाईक देऊन टाकता येतो.
सध्या आपण सोशल मीडियासाठीच तर
सध्या आपण सोशल मीडियासाठीच तर जगतो. कॅमेरा नव्हता किंवा सहजसाध्य नव्हता तेव्हा लोक कुठे गेले तर तिथे पाहिलेलं डोळ्यांत आणि मनात साठवून घेत. कॅमेरा आला तसं कॅमेर्याच्या डोळ्यांनी पाहून अल्बम छापून आपल्या परिचितांना छळू लागले. (आठवा पु ल). लग्नाचे अल्बम आणि व्हिडियो दाखवून छळ नाही का करायचे?
आता मोबाइल फोनने फोटो व्हिडियो काढणं सोपं झालं.
तसंच इंटरनेट मुळे आपण जगतो ती प्रत्येक गोष्ट जगाला दाखवणं सोपं झालं. रोज काय खाल्लं प्यालं ल्यालं केलं हे सगळं आपण आपल्या सोशल अकाउंटवर दाखवतो.
फार कशाला. पूर्वी लोक सिनेमा बघून आले की फार तर मित्रपरिवारात चर्चा करत. आता सिनेमा बघायला जेवढा वेळ लागला असेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा करण्यात घालवतो.
तर त्या रील बनवणार्या तुम्हांलाही विचारू शकतील, तुम्ही असं का करता? ज्याची त्याची हौस, आनंद मानायची पद्धत आणि कल्पना. तसंही हळादीकुंकू म्हणजे आपल्या साड्या दागिने क्रोकरी इंटरियर एकमेकांना दाखवण्यासाठीचं गेट टुगेदरच ना?
>>>"आता आपल्याकडे हळदीकुंकू
>>>"आता आपल्याकडे हळदीकुंकू समारंभाला एण्ट्री करताना ते वाजवून त्यावर नाचत रील बनवतात">>>
फा, आज सकाळी सकाळी तुमचा हा प्रतिसाद आणि त्याला उद्देशून असलेल्या सायो आणि प्राजक्ता ह्यांच्या कॉमेंट्स वाचल्या. माझ्या पाहण्यात अशा रिल्स आल्या नव्हत्या त्यामुळे उत्सुकता चाळवली म्हणून इंस्टा वर मुद्दाम शोधली तर 'ही रील सापडली'. जाम हसू आले आणि हा 'कहर' प्रकार आमच्या मातोश्रींनाही दाखवला तर त्यावर तीची प्रतिक्रिया ऐकून अजूनच करमणूक झाली "करुदेत रे... तुला आचरटपणा वाटला तरी त्या निमित्ताने आजच्या पोरी हळदी कुंकवाची परंपरा पाळत आहेत ते बघ की!" 😀
प्राजक्ता - >>>"काहि रिल मधे गाण अरेबिक आणी स्टेप्स "नाच रे मोरा लेव्हलच्या">>>
😂 😂 😂
एखादी लिंक द्या ना प्लिज... आम्हालाही मजा घेऊद्यात थोडी...
सगळे रीलच बनवतात असे नाही.
सगळे रीलच बनवतात असे नाही. काही धुरंधर स्त्रिया समाजोपयोगी माहिती प्रसारित करतात.

नाचायला कुणाचीच हरकत नाहीये
नाचायला कुणाचीच हरकत नाहीये हो...
पण सोमिवर ते व्हिडीओ टाकून आमच्यावर इमोशनल अत्याचार का?
>>>>>>
नाही बघायचे.
मी तेच करतो
पण ज्यांना नाचायचे आहे, अपलोड करायचे आहे आणि ज्यांना ते आवडीने बघायचे आहे या सर्वांना आपण केवळ आपल्याला ते आवडत नाही म्हणून विरोध करू किंवा नावे ठेवू शकत नाही ना.
हो, पण वल्गर असेल तर नक्कीच आक्षेप घ्यायला हवा.
एखादी लिंक द्या ना प्लिज...
एखादी लिंक द्या ना प्लिज... आम्हालाही मजा घेऊद्यात थोडी...>>> सन्जय तुम्ही दिलिये साधारण त्याच लेव्हलची होती..सापडली तर देते.
@ धुरंदर, दुसरा भाग लवकर येत
@ धुरंदर, दुसरा भाग लवकर येत आहे म्हणजे पहिला रिलीज होताना जवळपास तयारच असेल.>> १९ मार्च !!
यशराजच्या स्पाय युनिव्हर्सला अक्षरशः चुड लावलिये धुरंधरने.
अक्षय खन्ना बाबत माधव आणी अस्मिताशी सहमत ... सन्जय दत्तसाठी हा हातखन्डा रोल आहे नविन काही जाणवले नाही किबहुना पठाणी ड्रेस पण त्याने घरुनच आणला असेल.
नाटकी' वाटला. पण त्याहूनही
नाटकी' वाटला. पण त्याहूनही सुमार अभिनय आहे तो अक्षय खन्नाचा. त्याचे ते ओठ चावणे आता खूपच डोक्यात जायला लागले आहे. ........ माधव, एकदम बरोबर.
अरेबिक गाणे आणि नाच रे मोराच्या स्टेप्स.......
प्राजक्ता, नाच रे मोरा
प्राजक्ता, नाच रे मोरा
यशराजच्या स्पाय युनिव्हर्सला अक्षरशः चुड लावलिये धुरंधरने. >>>> मला फार बरे वाटले. आदित्य धर कशातही अडकला नाही, आर्थिक यशाचे रेकॉर्ड ब्रेक केले, शिवाय आऊटसायडर आहे. तसेच पाहिजे ईनसायडर्सना!
नाच रे मोरा >>>
नाच रे मोरा >>>
आज शेवटी धुरंधर पाहीला, खरोखर
आज शेवटी धुरंधर पाहीला, खरोखर अक्षय खन्ना काही इफेक्टिव वाटला नाही, रणवीरसिंह चा लुक नी अभिनय पहिल्यांदाच आवडले, पाकिस्तान छानपणे दाखवलंय, खर्या घटना नी सिनेमाची उत्तम सांगड घातलीय, ३ तास लांबी फाय वाटली, २ तासात आटोपता आला असता, आर माधवनने भाजप
कार्यकर्त्याचा रोल छान वठवला आहे.
रणवीरने हे पोस्टर जस्ट पोस्ट
रणवीरने हे पोस्टर जस्ट पोस्ट केलय … कान्ट वेट !
वॉव!! कान्ट वेट फॉर १९ मार्च
वॉव!! कान्ट वेट फॉर १९ मार्च
ग्रेट.. मी तर असाही दरवर्षी
ग्रेट.. मी तर असाही दरवर्षी १९ मार्चची महिनाभर आधीपासून वाट बघत असतो
उरी आणि धुरंधर मधले मोदीजी
उरी आणि धुरंधर मधले मोदीजी आणि डोवाल धडा धड निर्णय घेतात आणि प्रत्यक्षात लष्कराचे जनरल म्हणतात की ऐन वेळेस निर्णय घेता आला नाही. खरं काय खोटा काय काहीच कळत नाही आजकाल.
>>>"रणवीरने हे पोस्टर जस्ट
>>>"रणवीरने हे पोस्टर जस्ट पोस्ट केलय … कान्ट वेट !">>>
डिसेंबर 2024 मध्ये चित्रपटाच्या 'धुरंधर' ह्या शीर्षकाची घोषणाही रणवीरनेच केली होती... आता दुसऱ्या भागाचे पोस्टर...
एकंदरीत लीड रोल बरोबरच चित्रपटाच्या PR विभागाचाही तो प्रमुख असावा असे वाटतंय 😀
सहसा 2-3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त गॅप नंतर दुसरा भाग येत असेल तर तो बघण्याआधी पाहिल्या भागाची उजळणी करण्याची सवय लागली आहे. इथे फक्त साडेतीन-पावणेचार महिन्यांच्या अंतराने दुसरा भाग येत असल्याने पाहिला पुन्हा बघावा लागेल असे वाटत तर नाहीये, पण बघावासा वाटलाच तर 18 मार्चला नेटफ्लिक्स वर पुन्हा बघीन कदाचित.
गँग्स ऑफ वासेपूरच्या वेळी तर दोन भाग प्रदर्शित होण्यात फक्त चौदा की पंधरा दिवसांचेच अंतर होते त्यामुळे अनुराग कश्यपचा तो प्रयोग आवडला होता. धुरंधरचेही एकूण सात तासांचे चित्रीकरण पाहिला भाग प्रदर्शित होण्याच्या आधीच झाले असल्याने दोन भाग प्रदर्शित होण्यात खूप अंतर नाहिये हे बरं आहे. शक्यतो 19 मार्चलाच 'फर्स्ट डे -लास्ट शो' बघायचा प्रयत्न करणार आहे 😀
बाकी ती पहिल्या भागानंतर सोशल मिडियावर 'कैलास जीवन जास्त प्रभावी आहे की बरनॉल' अशी काहीतरी वाद-चर्चा रंगली होती तिचा निष्कर्ष काय निघाला ह्याची माहिती द्याल का कोणी? एक-दोन धुरंधद्वेषी मित्र आहेत, 19 मार्चपूर्वी त्यांना जास्ती प्रभावी काय आहे ते सुचवायला ती माहिती उपयोगी पडेल 😂
आला टिझरhttps://youtu.be
आला टिझर
https://youtu.be/CN0lNff-zm0?si=MJDWR1b4mJDEE-ph
काही भाग पार्ट १ मधले आहेत तरी भारी वाटतय !
धुरंधद्वेषी मित्र >>> असे
धुरंधद्वेषी मित्र >>> असे काही नसते. ते कुठल्यातरी राजकीय पक्षाचे द्वेषी असतील. ज्यांचा स्वतःचा काही राजकीय अजेंडा असतो त्यांना दुसऱ्यांच्या राजकीय अजेंड्याचा त्रास होतो. सामान्य चित्रपट प्रेमी जनता केवळ पिक्चर बघते. तो चांगला असेल तर एन्जॉय करते. बंडल असेल तर इग्नोर मारते.
तुम्ही पहिल्याच दिवशी बघा आणि त्याच वीकेंडला तुमचा लेख येऊ द्या. लोकं पहिल्याच आठवड्यात मोठ्या संख्येने बघणार तो चित्रपट आणि त्यावर लिहायला बोटे शिवशिवत असणार. ते एकाच धाग्यात लिहितील.
Pages