Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इराचा अर्थ धरती आणि इरावती
इराचा अर्थ धरती आणि इरावती म्हणजे सरस्वती. इराचा अर्थ मला एका सुप्रसिद्ध लेखक महाशयांनी सांगितला आहे. त्यांच्याच एका पुस्तकात म्यानमारमधील इरावती नदी जवळच्या गावात बघितलेल्या सुंदर सूर्यास्ताचे वर्णन आहे. अशी वर्णनं वाचताना आपण कधीतरी हे आपल्या डोळ्यांनी बघू, अशी पुसटशी आशा असते. म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथल्या जागा, निसर्ग बघण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. अशा विचाराने जरा वाईट वाटतं.
फारच विषयांतर झालं. सॉरी.
वावे, पुस्तक परिचय आवडला. छान
वावे, पुस्तक परिचय आवडला. छान.
मागे लोकसत्तेत या पुस्तकाचे परीक्षण प्रियदर्शिनी कर्वे (त्यांची नात?) यांनी लिहिले होते बहुतेक.
नवऱ्याला त्याच्या नावाने हाक मारणारी, पुण्यात स्कूटर चालवणारी पहिली बाई असे काहीतरी वाचले होते त्यात.
मस्त लिहिलंस, वावे. हे पुस्तक
मस्त लिहिलंस, वावे. हे पुस्तक शोधते आता. धन्यवाद!
(उर्मीबद्दल तिचं 'पॅक ऑफ लाइज' वाचल्यापासून फार चांगलं मत नाही माझं खरंतर, हे तिचं एकटीचं प्रोजेक्ट नाही याचा एक प्रकारचा दिलासाच वाटला.)
इरावती कर्वे यांनी स्वतः
इरावती कर्वे यांनी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक फार पूर्वी वाचलेलं, नाव आठवत नाहीये. आत्मचरित्ररुपी छोटे छोटे लेख होते.
त्यामुळे ब्रह्मदेश, त्यांचं शिक्षण वगैरे माहितेय. कवी माधव ज्युलियनही त्यांचे नातेवाईक होते, आते का मामेभाऊ ते नक्की आठवत नाहीये. शेवटी पंढरी वारीवर ही होतं, माझा विठ्ठल नाव होतं बहुतेक त्या लेखाचे. फार ओघवते लिहिलेलं सर्व त्यांनी, आवडलेलं मला. स्कुटर प्रवास, नवऱ्याला दिनू म्हणणे, सर्व त्यात होतं.
इरावती नाव भारतात त्या आधीपासून असावं असं मला वाटतंय.
इरावती हे नाव याआधी कुणाचं
इरावती हे नाव याआधी कुणाचं नव्हतं असंच या पुस्तकात तरी लिहिलंय! 'सरस्वती' असा अर्थ माहिती नव्हता. नदीच्या नावाचं स्पेलिंग Irrawaddy असं आहे.

पुस्तकात 'सरस्वती' नावाचं प्रकरण आहे. ना. सी. फडक्यांनी इरावतीबाईंचा 'सरस्वती' असा उल्लेख करून त्यांच्या स्कूटर चालवण्यावरून जाहीरपणे काही तरी शेरा मारला होता.
स्कूटर वेगाने चालवण्यावरून पुलंच्या 'दीपमाळ'मध्ये एक किस्सा आहे! एकदा इरावतीबाई श्री. पु. भागवतांना डबलसीट घेऊन स्कूटरवरून वेगाने जात होत्या. त्यांनी श्री. पुं.ना विचारलं ' भीती नाही ना वाटत?' पुलंची खास टिप्पणी अशी की ताबडतोब मत न देण्याबद्दल श्री.पुं.ची ख्याती असूनही यावेळेस मात्र त्यांनी लगेचच सांगितलं , 'थोडीशी वाटते!'
दिनकर कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य असताना पुलं तिथे विद्यार्थी होते आणि दिनकर कर्व्यांची 'शिस्तशीर' म्हणून ख्याती होती. मुलं त्यांना घाबरून असत. अशा या प्राचार्यांना 'अरे दिनू' अशी एकेरी हाक मारणारी स्त्री, ही पुलंना इरावतीबाईंची झालेली पहिली ओळख होती. पुढे विशेषतः सुनीताबाई महाभारत वाचत असताना शंकानिरसनाच्या निमित्ताने इरावतीबाईंकडे त्या दोघांचं जाणंयेणं झालं.
बंगाली भाषेत इराबदी म्हणतात.
बंगाली भाषेत इराबदी म्हणतात.
वावे, छान परिचय!
वावे, छान परिचय!
स्वाती, अॅमॅझॉनवर आहे किंडल आणि हार्डकव्हर दोन्ही प्रकारात. आत्ताच लेकाने माझ्यासाठी ऑर्डर केले.
अवांतर - माझी आई फर्ग्यूसनच्या आठवणी सांगायची त्यातून डी. डीं चा दरारा आणि स्कुटरच्या साईडकार मधल्या इरावतीबाईंचे एक चित्र माझ्या मनात तयार झाले होते. इरावतीबाईंच्या कामाबद्दल आई सांगत असे ते समजायचे वयही नव्हते पण कुठेतरी मनात झिरपत राही मात्र स्कुटरची साईडकार कशी असते याबद्दल प्रचंड कुतुहल. आमच्या गावात सायकलीही मोजक्याच होत्या आणि तेव्हाच्या पुण्यातही स्कुटर्सचा सुळसुळाट असा नव्हताच पण सुदैवाने लगेचच्या पुणे सुट्टीत बरीच प्रतिक्षा केल्यावर एफ सी रोडवरच साईडकारवाल्या स्कुटरचे दर्शन घडले आणि माझ्या मनातले चित्र काही अंशी पूर्ण झाले.
>>> अॅमॅझॉनवर आहे किंडल आणि
>>> अॅमॅझॉनवर आहे किंडल आणि हार्डकव्हर दोन्ही प्रकारात
हो, आत्ता तेच पाहात होते. धन्यवाद.
इरावतीबाईंचा छान परिचय करुन
इरावतीबाईंचा छान परिचय करुन दिला आहे. पुस्तक शोधीन.
इरावती या नावाविषयी. कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र' या नाटकात राजा अग्निमित्राच्या राणीचे नाव इरावती आहे. म्हणजे इरावती हे नाव प्रचलित नव्हतं असं नाही.
Iru The Remarkable Life of
Iru The Remarkable Life of Irawati Karve ...पुस्तक वाचले पूर्ण. फारच आवडले. धन्यवाद @वावे.
....
इरावतींचं युगान्त पुस्तक आहे वाचनालयात पण कधी घेतले नव्हते. महाभारत/ रामायण यावर चर्चा समीक्षा किंवा मला समजलेलं.... या छापाची पुस्तकं मी वाचत नाही. त्यांचे रामावरचे विरोधी विचार पुस्तकात आले आहेत. "रामाने सीतेला सत्यापन / अग्निपरीक्षा करायला लावल्यानंतरही भारतातल्या स्त्रिया रामाचे गुणगान का गातात?"
सुंदर ओळख वावे!>>>>>> +१.
सुंदर ओळख वावे!>>>>>> +१.
इरावतींचं युगान्त पुस्तक आहे वाचनालयात पण कधी घेतले नव्हते.>>>> सुरेख आहे.शाळकरी वयात वाचले होते.द्रौपदीच्या वस्त्रहरणाबाबत त्यांचे विचार पटले नव्हते. भोवरा हा इरावती कर्व्यांचा कथा कम लेख संग्रह आवडला होता.
सुंदर ओळख वावे!>>>>>> +१.
सुंदर ओळख वावे!>>>>>> +१.
इरावतींचं युगान्त पुस्तक आहे वाचनालयात पण कधी घेतले नव्हते.>>>> सुरेख आहे.शाळकरी वयात वाचले होते.द्रौपदीच्या वस्त्रहरणाबाबत त्यांचे विचार पटले नव्हते. भोवरा हा इरावती कर्व्यांचा कथा कम लेख संग्रह आवडला होता.
शकुंतला परांजपे यांच्या काही आंबट काही गोड या लेखसंग्रहात त्यांनी इरावती कर्वे यांच्याबद्दल लिहिले आहे.इरावती दिसायला सुरेख.त्यामुळे कॉलेजची मुले शकुंतलाबाईंकडे प्रेमपत्रे द्यायची.दोघीही एकाच वयाच्या होत्या.
"सरत्या वर्षातलं, २०२५ मधलं,
"सरत्या वर्षातलं, २०२५ मधलं, वाचन"
पुस्तकांच्या बाबतीत एकंदरीत बरं गेलं हे वर्ष. वाचतानाचे काही शे तास बरे गेले म्हणजे. वाचन तसं आपापल्या गतीनं चालतच राहतं पण त्यातल्या त्यात डिसेंबर महिना परमसुखाचा. पूर्णपणे मोकळा सापडतो. या महिन्यात शेलकी शेलकी पुस्तकं एकापाठोपाठ एक विना-व्यत्यय जगून होतात.
समोरच्या चळतीकडे बघून दरवेळी वाटलेलं आहे की ह्या पुस्तकांमधून आपल्याला हमखास 'असं काहीतरी' मिळेल की लवकरच आपण पुस्तकांच्या गरजेतून पूर्णपणे मुक्त झालेला असू.! याउपर जगातलं एकही पुस्तक उघडून बघण्याची आता आपल्याला जरूरी नाही, अशा एखाद्या निर्भ्रांत निरापद अवस्थेला आपण प्राप्त झालेलो असू.!
अशा हास्यास्पद वाटण्याचे डिसेंबर्स आजवर दहाबारा तरी येऊन गेले असतील. पण हरकत नाही. मी काही आशा सोडलेली नाही. हे थोडंफार चचा गालिबसारखंच..
क़र्ज़ की पीते थे मय लेकिन समझते थे कि हां
रंग लावेगी हमारी फ़ाक़ा-मस्ती एक दिन
असो.
$$ मराठी :
1.गुरू- नितीन कोतापल्ले
2.व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ - वि ग कानिटकर
3.विठोबाची आंगी - विनय हर्डीकर
4.अखेरीस नयनाची गोष्ट - श्याम मनोहर
5.भास ११.२४- भास प्रकाशन
6.आयडियाज् आर डेंजरस - राजू परुळेकर
7.नरकातला स्वर्ग- संजय राऊत
8.डेट विथ देवदास- योजना यादव
9.छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती- रंगनाथ पठारे, सुमती लांडे
10.तीन सरसंघचालक- वि रा करंदीकर
11.ऐवज - स ह देशपांडे
12.डेथबेडवरून क्लायमॅक्स- सतीश तांबे
13.थोडाबहुत काफ्का- शकु नी. कनयाळकर
14.निळावंती- नीतीन भरत वाघ
15.तुरूंगरंग - रवींद्रनाथ पाटील
16.सुखसंवाद - निसर्गदत्त महाराज
17.शुभवर्तमान - भारत सासणे
18.आपुले आपण - जैत
19.मनुचा मासा (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)- कु. ल. महाले
20.दूर तेथे, दूर तेव्हा/सर्प - भारत सासणे
21.कळीकाळ-- बालाजी घारूळे
22.दाट काळा पाऊस -- भारत सासणे
23.भास १०.२५-- भास प्रकाशन
24.अयोध्या-- जी के ऐनापुरे
25. सिद्ध - राजन खान
26. श्रद्धांजली - विनय हर्डीकर
27. कांशीराम- डॉ पी सी थोरात
28. वाचून उरणारी पुस्तकं - नीतिन वैद्य
29. आत्मज्ञान आणि परात्मयोग - निसर्गदत्त महाराज
30. समज - निसर्गदत्त महाराज
$$अनुवादित :
1.द लायब्ररी- झोरॉन झिवकोविच (अनु. नितीन रिंढे)
2.बेलबॉय- अनीस सलिम (अनु. शुचिता नांदापूरकर-फडके)
3.कांदिद - व्हॉल्टेअर (अनु. नरेश कवडी)
4.हाऊ फॅशिझम वर्क्स — जेसन स्टॅन्ली (अनु. मुग्धा कर्णिक)
5.कलिकथा व्हाया बायपास - अलका सरावगी (अनु. जयप्रकाश सावंत)
6.तिस्ताकाठचा वृतांत- देवेश राय (अनु. विलास गिते)
7.अबुझमाडचे अनुनाद- नरेन्द्र( अनु. अवधूत डोंगरे)
8.सिंधूतील साम्राज्ये- ॲलिस अल्बिनिया (अनु. श्याम नारायण पाठक)
9.महावीर आणि अंतर्तप - रजनीश (अनु. प्रदीप निफाडकर)
10.सोनेरी स्वप्न: मिलारेपा यांची जीवनकथा- विस्डम मास्टर म्याटिसिंटीन (अनु-राजेन्द्र कुलकर्णी)
11.मनुष्य होने के संस्मरण- देवीप्रसाद मिश्र (अनु. 'माणूस असण्याच्या आठवणी', गणेश विसपुते)
12.रूह- मानव कौल (अनु. नीता कुलकर्णी')
13.नेक्सस - युवाल नोआ हरारी (अनु. प्रणव सखदेव)
14.द हाऊस ऑफ पेपर- कार्लोस दोमिंगेझ (अनु. अभिषेक धनगर)
15.महातीर्थाचा अखेरचा यात्रिक- बिमल डे (अनु. विजय शिंदे)
16.द गर्ल ऑन द ट्रेन- पॉला हॉकिन्स (अनु. उल्का राऊत)
17.व्हिक्टरी सिटी - सलमान रश्दी (अनु. वंदना भागवत)
18.ॲन आयलंड - कॅरन जेनिंग्ज (अनु. संकेत लाड)
19.कला म्हणजे काय?- टॉलस्टॉय (अनु. साने गुरूजी)
20.मधसूर्यछाया- रोन्या ओथमान (अनु. राजेंद्र डेंगळे)
21.द ऑड बुक ऑफ बेबी नेम्स - अनीस सलीम (अनु. मुग्धा गोखले, 'बाळांच्या नावांची अनोखी डायरी')
22.हेरकुन्फ्ट- साशा स्टानिसिच (अनु. 'पाळंमुळं', जयश्री हरि जोशी)
23.आरण्यक - विभूतिभूषण बंद्योपाध्याय (अनु. शंकर बाळाजी शास्त्री)
24.टॉलस्टॉयचे कन्फेशन- श्रीनिवास जोशी
25.द मास्टर ऑफ पीटर्सबर्ग-- जे एम कुट्सी (अनु. 'पीटर्सबर्गचा उस्ताद', अवधूत डोंगरे)
26.संन्याशाच्या डायरीतून -- स्वामी रामानंद तीर्थ (अनु. वि पां देऊळगावकर)
27.आयकॉन -- फ्रेडरिक फोरसिथ (अनु. डॉ. देवदत्त केतकर)
28.सत्तर तासांपूर्वी -- आयफर टंक (अनु. श्वेता प्रधान)
29. राया - श्रीनिवास रेड्डी (अनु. सायली परांजपे)
30. झेन अँड दी आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स-- रॉबर्ट एम पिरसिग (अनु. सरोज देशपांडे)
$$ हिंदी :
1.तीन सौ तीस कहावती कहानियॉं- विजयदान देथा
2.ढाई घर - गिरीराज किशोर
3.आधा हिसाब -- अजय राज सिंग
4.प्रार्थना प्रवचन संग्रह (खंड१,२)-- महात्मा गांधी
5.कई चॉंद थे सरे-आसमां-- शम्सुर्रहमान फारूकी
6.रोशनी की शिनाख्त - ज्ञान चतुर्वेदी
7.अपने अपने राम - भगवान सिंह
8.दसासमेध-- विमल चन्द्र पाण्डेय
9.छबीला रंगबाज का शहर - प्रवीण कुमार
10.नए शेखर की जीवनी: प्रस्थान (भाग२)- अविनाश मिश्र
11.ई इलहाब्बाद है भइया- विमल चन्द्र पाण्डेय
12. जिंदगी जीरो माइल - संजय शेफर्ड
13. एक ब्रेक के बाद - अलका सरावगी
14. लहरतारा- विमल चन्द्र पाण्डेय
15. कुलभूषण का नाम दर्ज कीजिए- अलका सरावगी
$$ इंग्रजी :
1.Physics of Sorrow-- Georgey Gospodinov
2. Be as you are - Raman Maharshi (edited by David Godman)
3.Media control: The spectacular achievements of Propaganda-- Noam Chomsky
4.How the world works- Noam Chomsky
5.Understanding Power -- Noam Chomsky
6.The book of Disquiet-- Fernando Pessoa
7.Oneness - John Greven
8.Why the Poor Don't kill us-- Manu Joseph
9.I hope You Die Soon-- Richard Sylvester
10.The Book of Undoing-- Fred Davis
11. Death Must Die-- Dairy of Atmananda
मस्त संप्रति!
मस्त संप्रति!
गेल्या वर्षीसारखा तुमच्या डोंगरासमोर माझा लहानसा खडा.
आधुनिक वैद्यकीची शोधगाथा- डॉ. शंतनू अभ्यंकर
मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास - पु.ल.देशपांडे
घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा - आशिष महाबळ
भित्ति - एस एल भैरप्पा (इंग्रजी अनुवाद -एस रामास्वामी आणि एल. व्ही. शांताकुमारी)
The yearling - मार्जरी कीनन रॉलिंग्ज
Heart lamp - बानू मुश्ताक (इंग्रजी अनुवाद -दीपा भस्ती)
Iru - उर्मिला देशपांडे आणि थिआगो पिंटो बार्बोसा
गाता रहे मेरा दिल - अनिरुद्ध भट्टाचारजी आणि बालाजी विठ्ठल
बहुतेक इतकीच वाचली. सध्या जिम कॉर्बेटचं ' The man-eating leopard of Rudraprayag ' वाचत आहे.
The yearling चा मराठी अनुवाद
The yearling चा मराठी अनुवाद पण चांगलाय. मराठीत बऱ्यापैकी वाचला गेलंय ते 'पाडस'.
Heart lamp मधल्या कथा एवढ्या काही आवडल्या नाहीत.
उर्मिला देशपांडे गौरी देशपांडेंची मुलगी. त्यांचं 'खोटं सांगेन' म्हणून एक वाचलेलं. अनुवादित. भारीय ते.
वा! संप्रति... यादी जबरदस्त!
वा! संप्रति... यादी जबरदस्त!
यादीतली काही पुस्तकं वाचली या
यादीतली काही पुस्तकं वाचली या वर्षात.
एक नवीन ( जुनाच पण मला नवीन) लेखकाची तीन पुस्तकं वाचली.
Farley Mowat -( त्याच्या नव्वद वर्षांत ४४ पुस्तकांपैकी लिहिलेली)
१.Never cry Wolf (पुढे लिहिलं आहे.)
२.Owls in the family( लहानपणी पाळलेल्या घुबडांविषयी)
३.People of the deer ( बर्फाळ वाळवंटात एस्किमोंची एक जमात राहते अशी)
४.Lost in the barrens ( बर्फाळ वाळवंटात हरवलेली दोन तरुण मुले कशी राहतात..)
क्रमांक २ आणि ४ मुलांसाठीच्या पुस्तकांसाठी बक्षिसं मिळवलेली आहेत.
या लेखकाच्या पुस्तकांबद्दल आणि त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर लेखक तिकडे त्या भागात त्या जमातीबरोबर राहिला. संशोधन, नोंदी केल्या. त्यांची भाषा शिकला. कॅनडा सरकारला मदत करण्याविषयी विनंत्या केल्या. सरकारने डिपार्टमेंटकडून मदत केली. पण लेखक म्हणतो की त्यामुळे जमातीची स्वतंत्रपणे जगण्याची कुवतच नष्ट झाली. जमात संपलीय जणू. बाह्य मदतीवर जगण्याचा अवलंबून राहण्याचा परिणाम. लेखकाच्या बोलण्या वागण्यावर लिहिण्यावर सरकारकडून बरीच टीकाही झाली. कारण सरकारने हरणांच्या शिकारीचा पर्यटन व्यवसाय सुरू केला त्यात कमाई होती. परंतू यूएसच्या शिकाऱ्यांची तक्रार होती की आम्हाला हवी तेवढी हरणं मारता येत नाहीत , हरणं कमी झाली आहेत. कारण लांडगे त्यांना खातात. सरकारने आदेश काढला, मोहीम काढली की लांडगे मारा, नष्ट करा. याविषयी लांडग्यांची माहिती जमवून Never cry Wolf हे पुस्तक लिहिलं आणि खरी परिस्थिती मांडली. त्यामुळे सरकारचा राग.
सर्व पुस्तकं उत्तर कॅनडा प्रदेशावर आधारित आहेत. तिकडे एस्किमो लोक स्वतंत्रपणे राहतात ( जगाशी काही संबंधच न ठेवता) असं शाळेत चारपाच ओळींत शिकलो होतो. पण समुद्राकाठी मासेमारी करून इग्लू नावाच्या बर्फाच्या गोल घरात राहणारे वेगळे आणि 'टुक्टु' ( हरीण) या हरणांवर संपूर्ण जीवन जगणारे आणि चामड्याच्या तंबूत राहणारे बर्फाळ ' वाळवंटात' ( barrens) राहणारे वेगळे हे कळलं.
मागच्या वर्षी अमिताव घोषची पुस्तकं वाचली होती.
पुढील वर्षात काय?
समुद्राशी निगडीत आयुष्य काढणाऱ्या लोकांची किंवा बोटींची पुस्तकं वाचायची आहेत. शोधतो आहे. कुणाला माहीत असल्यास लिहा.
टॉमी अभिलाषचं पुस्तक अजून मिळालं नाही. दिलीप दोंदे हासुद्धा solo trveller आहे.( जगाची समुद्र फेरी एका शिडाच्या होडीने करणारे भारतीय दोघे).
[ इंग्रजी पुस्तकं विविध साइट्सवरती फुकट मिळून जातात आणि वाचनाची हौस सांगते. मराठी पुस्तकं वाचनालयातून मिळतात. ]
समुद्राशी निगडीत आयुष्य
समुद्राशी निगडीत आयुष्य काढणाऱ्या लोकांची किंवा बोटींची पुस्तकं वाचायची आहेत. शोधतो आहे. कुणाला माहीत असल्यास लिहा.
>>>
मराठीत एम टी आयवा मारु ही कादंबरी.
विलिअम गोल्डिंगची सी ट्रिलॉजी - आता जुनी झाली आहेत, वाचायला कितपत आवडतील माहिती नाही. मी २० वर्षांपुर्वी वाचली होती नेटाने - तेव्हा लॉर्ड ऑफ द फ्लाइज मुळे गोल्डिंग भारी हे एक आणि अजून फारसे काही वाचलेच नव्हते त्यामुळे हौसेने वाचली होती.
हार्ट ऑफ डार्कनेस हे जोसेफ कॉन्रॅड चे पुस्तक - टेक्निकली समुद्रावरची सफर नाही, तर कॉन्गो नदीवरची सफर - आणि घडणारी कहाणी मुख्यत्वे जमिनीवर. एक डिवायझिव पुस्तक - आवडणार्यांना प्रचंड आवडते आणि न आवडणारे ५ पाने पण सरकवू शकत नाहीत.
endurance shackleton's incredible voyage हे आल्फ्रेड लॅन्सिंगचे पुस्तक.
धन्यवाद टवणे सर. शोधतो
धन्यवाद टवणे सर. शोधतो पुस्तके. एम टी आयवा मारु ही कादंबरी वाचनालयात दिसल्याचं आठवतंय. आल्फ्रेड लॅन्सिंगचे पुस्तक डाउनलोड करून ठेवलंय. To the Ends of the Earth: A Sea Trilogy - William Golding हेसुद्धा घेतलं. मोठं सातशे पानांचं दिसतंय. बराच वेळ लागेल वाचायला.
________________________________
Not Only Potels (नॉट ओन्ली पोटेल्स : यशस्वी गुजराथी बिझिनेसमेनच्या अदभूत चार सत्यकथा) : Shobha Bondre: Amazon.in: Books
https://www.amazon.in/-/hi/Shobha-Bondre/dp/B08PYY7Y64
किंवा
(अमेझोन : dhandha how gujaratis do business by shobha bondre)
हे पुस्तक (२०१३) वाचले. पटेल लोकांनी अमेरिकेत मोटेल्स धंदा कसा यशस्वी केला यांच्या तीन कथा मांडल्या आहेत. एक कथा नोकरी सोडून इन्शुरन्स एजंट म्हणून यशस्वी झालेल्या एका पटेलची आहे.
पटेल कुटुंबातील नवरा, बायकोच्या स्वगतांतून कथा लिहिल्याने लेख वाचल्यासारखे वाटत नाही, मजा वाटते. पटेलांवरचे लेख अगोदर आपण कुठेकुठे वाचलेले असतात पण हे पुस्तक आवडले.
The yearling चा मराठी अनुवाद
The yearling चा मराठी अनुवाद पण चांगलाय. मराठीत बऱ्यापैकी वाचला गेलंय ते 'पाडस'.>> होय.
Heart lamp मधल्या कथा एवढ्या काही आवडल्या नाहीत.>> मलाही
उर्मिला देशपांडे गौरी देशपांडेंची मुलगी. त्यांचं 'खोटं सांगेन' म्हणून एक वाचलेलं. अनुवादित. भारीय ते.>> या पुस्तकाबद्दल ( pack of lies) ऐकून आहे. वाचलेलं नाही.
या वर्षी हा धागा खूपच
या वर्षी हा धागा खूपच माहितीपूर्ण आणि रंजक होता. वर्षाखेरीस वर बऱ्याच जणांनी दिलेल्या आपापल्या वाचनयाद्या उत्कृष्ट आहेत. सर्वांना धन्यवाद !
यंदा मी खालील पुस्तके वाचली :
मराठी (छापील) :
. .
इंग्लिश (सर्व ऑनलाईन पीडीएफ) लेखकानुसार :
Candide
The death of Ivan Ilyich
Does spelling matter? (40 पानी सारांश)
कुमार१, तुमच्या यादीतील
कुमार१, तुमच्या यादीतील कालांतर चाळलंय. सॉमरसेटचे कोणतेच वाचले नाही. रशियन लेखक वाचले आहेत पण त्याला खूप दिवस झाले. आणि कम्युनिस्ट राजवटीतला समाज हा विषय असे. आताच्या गोर्बाचेवनंतर पुतिन काळातले लेखक शोधायला हवेत.
Srd , बरोबर.
Srd , बरोबर.
* . रशियन लेखक >>>
The death of Ivan Ilyich मध्ये मूलभूत तत्वज्ञान आहे.
जीवन हे मृत्यूसमान असून मृत्यूनंतरच खरे प्रकाशमान जीवन असते असा त्याचा आशय आहे.
वाचन फारसे नाही.
वाचन फारसे नाही.
मराठीत तत्वज्ञान आणि विज्ञान दोन्ही आवडते. अच्युत गोडबोले आवडतात.
अत्रे , दमा, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, चिं वि आवडतात.
हिंदीतले मोजके आवडतात.
इंग्रजी आणि इंग्रजीत भाषांतर झालेले जर्मन, रशियन.
मर्यादीत वाचन आहे. सुखी आहे.
गुड न्युझ - मेल रॉबिन्स चे
गुड न्युझ - मेल रॉबिन्स चे 'लेट देम थिअरी' पुस्तक युट्युबवरती आहे असे दिसते -
https://www.youtube.com/watch?v=uXNnoG_ecjc
या पुस्तकाची समरी भयंकर आवडली होती. या वर्षाअखेरीस हे पुस्तक वाचेन.
किंडलवर एक टाईमपास विनोदी
किंडलवर एक टाईमपास विनोदी पुस्तक वाचले - "जावईबापू 'ऑनलाईन' आहेत" छान आहे, विनोदी, हलकेफुलके, पटकन संपणारे.
सुरेश भटांचे आवडते शिष्य
सुरेश भटांचे आवडते शिष्य प्रदीप निफाडकर यांनी
{बंडखोर, संयमी, धाडसी आणि तरल जीवनकहाणी}
"गझलसम्राट सुरेश भट आणि ...."(२०१७) हे पुस्तक लिहून भटांचे विविध पैलू समोर आणले आहेत. शीर्षक असे देण्याचे कारण पुढे आणखी एक भाग लिहायचा त्यांचा विचार आहे.
लेखक म्हणतो हे भटांचे पूर्ण चरित्र नाही परंतू खूप आठवणी सांगत भटांना आपल्यासमोर आणले आहे. बऱ्याच ठिकाणी पत्रेही दिली आहेत. उर्दू हिंदी आणि मराठी या तीन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. भट म्हणतात "उर्दूचा मी गझलेचे तंत्र म्हणून वापर केला पण मंत्र मराठीचाच ठेवला."
लेखक स्वतःही गझल लिहितो. गझल म्हणजे काय आणि त्याची वृत्ते यांची संपूर्ण तांत्रिक माहिती पुस्तकात शेवटी दिली आहे.
सुरुवातीलाच भटांचे दोन शेर लिहून त्यांची मनोवृत्ती प्रकट केली आहे.
// मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले //
// जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे//
तीनशे पानांच्या या पुस्तकात अगणित गझला, कविता दिल्या आहेत. त्यांचे रसग्रहण करणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. सरत्या वर्षातील शेवटच्या पुस्तकाची नोंद एवढेच समजा.
( पुस्तक वाचनालयात सापडले परंतू ऑनलाइन सापडत नाही.
नंदिनी पब्लिशिंग हाऊस. बी-६, विशाल पार्क, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्ता, पुणे ४११०५१
nandinipublishingpune@gmail.com)
'अपने अपने राम' - भगवान सिंह
'अपने अपने राम' - भगवान सिंह
रामाचा राजकीय हेतूंसाठी वापर करण्याची प्रक्रिया पूर्ण जोर पकडण्याच्या काळात जन्मलेला आणि वाढलेला असल्यामुळे रामायणाबद्दल मन थोडं विरजलेलं. शिवाय पहिल्यापासूनच रामायणापेक्षा महाभारत आणि रामापेक्षा कृष्ण जास्त इंटरेस्टिंग वाटत आलेला असल्याने ऐकणं वाचणं ही त्याच दिशेने झालेलं.
अशात अलीकडे पुस्तक महोत्सवात 'सस्ता साहित्य मंडल' च्या स्टॉलवर 'अपने अपने राम' नावाचं एक पुस्तक दिसलं. द्विधा मनस्थितीतच ते उचलून आणलं. पण जेव्हा वाचायला सुरूवात केली आणि एकसलग मेरॅथॉन रिडींगनंतर ते मिटून खाली ठेवलं तेव्हा हे एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, असं मत झालं. रामाकडे बघण्याचा दृष्टीकोन अंतर्बाह्य बदलल्याचं लक्षात आलं. हा राम आवडला म्हणजे.! रामकथेतील ज्या चारदोन खटकणाऱ्या जागा होत्या दीर्घकाळ, त्याबद्दलच्या गाठी बऱ्याच अंशी सुटल्या. कारण यातील संदर्भचौकट प्रचलित/प्रचारित रामायणाहून वेगळी आहे. माणूस राम. भाऊ, नवरा, मुलगा, राम. द्रष्टा राम. राजा राम. राजनीतीज्ञ राम. तत्वज्ञ राम. असा हा राम मनाच्या आत आत प्रवेश करत गेला. आजवर कुणी एवढ्या मर्मज्ञ रितीने रामायण उलगडून दाखवलं नसेल, किंवा असल्यास मी अनभिज्ञ आहे.
लेखक पात्रांच्या मनाच्या तळात पार खोलवर उतरलेला आहे. कुठल्याच व्यक्तीरेखेची बाजू मांडताना अन्याय होऊ देत नाही.
तर्क-मन-बुद्धी आणि विवेक परिपुष्ट करणारं घनघोर समृद्ध असं लिखाण. चमत्कारांना यात पूर्णपणे फाटा. काही प्रसंगांचं वर्णन आतून हलवून टाकणारं आहे; विशेषतः राम वनवासाला निघतानाचा आणि लक्ष्मण सीतेला वाल्मिकी आश्रमात सोडायला जातानाचा.
भाषेची वीण, वजन, गहराई, विस्तार यांचं संमोहन असं की रामायणातील ते विशिष्ट प्रसंग डोळ्यांसमोर घडत आहेत असा भ्रम व्हावा.
आपल्यासारख्या घनघोर निधर्मी माणसाला, आता या वयात, राम नावाच्या देव वगैरे मानल्या गेलेल्या एखाद्या व्यक्तीरेखेनं डायरेक्ट क्लीन बोल्ड करावं, याचं आश्चर्य अजून ओसरलेलं नाही.!
एकूण, पुस्तकाचा इंपॅक्ट जोरदार पडला. तरीही, असं एखादं पुस्तक वाचून मिळालेली मनाची शांतता मोठी नाजूक असते, ती कधीही ढळू शकते, याची जाणीवही आहेच. असो.
अरे वा, संप्रति. वाचून बघायला
अरे वा, संप्रति. वाचून बघायला पाहिजे हे पुस्तक.
(मुळात राम ही व्यक्तिरेखा फारशी आवडत नसताना भैरप्पांचं उत्तरकांड हे पुस्तक वाचून ती आणखी आवडेनाशी झाली आहे)
छान परिचय संप्रति !
छान परिचय संप्रति ! अनपेक्षितपणे पुस्तक तर आवडलेच व रामही आवडला पाहून छान वाटले.
मला आवडतो राम, बऱ्याच गोष्टी त्याच्या नावावर घडल्या तरी कुठेतरी "राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे" म्हणत त्याच्याकडे पहाता येते. एक माणूस म्हणून! देव म्हणून नाही. कृष्णाकडे माणूस म्हणून पहाता येत नाही, तो नेहमी लार्जर दॅन लाईफ, अमर्याद पुरूष वाटला आहे. राम नेहमी मर्यादा घालून घेणारा, सोसणारा, इंट्रोव्हर्ट, तडजोडी मोठा मुलगा, संसार असूनही वैरागी आणि राजा असूनही भणंग. त्याच्या व्यक्तिरेखेला इतके गूढ लेयर्स दिसत नाहीत, त्यामुळे त्याचे कुतूहल वाटत नाही. तेच कृष्ण एकदम श्रीरंग- एक्स्ट्रोव्हर्ट, त्याचे गूढ अजूनही अबाधित आहे. त्यामुळे त्याचे कुतूहल, आकर्षण टिकून आहे. कायम द्वारकाधीश. सगळीकडे त्याचेच कौतुक, तोच मोहक मोहन. पूर्ण यादवी बुडवली तरी त्याला दुःख झाल्याचे ऐकिवात नाही. पण रामाला माणूस म्हणून राहावे लागल्याने दुःखाच्या हिंदोळ्यावर बसून आपल्या प्रमाणे अनुभतीतून जावे लागले. कृष्ण त्याला येणाऱ्या अनुभतींपेक्षा नेहमी विलग वेगळ्या प्रतलावर, खरंतर अस्पर्श्य वाटतो. आपल्याला रिलेटेबल म्हटलं तर रामच आहे. कृष्ण नाही. पण मलाही कृष्णाचीच जबरदस्त ओढ वाटते. आपल्याला नैसर्गिकरीत्या गुढाचेच आकर्षण वाटते.
Pages