नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चारचौघी पाहिलं. खूप ऐकलेलं नाटकाविषयी, सर्वात महत्वाचं म्हणजे रोहिणी हट्टंगडी मुक्ता बर्वे कांदबरी आणि पर्ण पेठे यांना प्रत्यक्षात बघायला मिळणे आणि त्यांचा अभिनय पाहायला मिळणे .चौघी जणींचं काम चांगलं आहे.तसही मुक्ताचा अभिनय पाहायला मिळणं पर्वणी असते रोहिणी हट्टंगडी बद्दल मी काय बोलणार एवढ्या सशक्त जेष्ठ अभिनेत्री आहेत. कादंबरीचं एवढं काम पाहिलं नाही एका सिरीयल मध्ये थोडं पाहिलं होतं पण इथे आवडली उलट पर्ण पेठेचा रोल जरा प्रोग्रेसिव्ह न वाटता गोंधळलेला वाटतो अभिनयही ठीकठाक कदाचित ज्यून्या जमान्यात फार फॉरवर्ड वाटत असावं .

नाटक मला ठीक ठाक वाटलं उलट थोडा अपेक्षाभंगच झाला मी जरा जास्तच अपेक्षा घेऊन गेले होते पण हल्ली जुनी नाटकं नव्या संचात तरी पाहायला मिळतायत हे आपलं भाग्य आहे .त्यामुळे नाटक पाहा रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय आणि मुक्ता कादंबरीचा मोनॉलॉग फार उत्तम जमून आलाय .

मी वर्षभरापूर्वी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये चारचौघी पाहिलं तेव्हाची एक आठवण. मुक्ता बर्वेचं ते फोनवरचं मोठं संभाषण कम स्वगत आहे त्याच्या एखाद मिनिट आधी नेमका प्रेक्षकातील कोणाचा तरी मोबाईल वाजला. त्याबरोबर स्टेजवर असलेल्या इतर दोघीजणी जागच्याजागी फ्रीझ झाल्या आणि मुक्तानं भुमिकेतून बाहेर येत प्रेक्षकांना संयत शब्दांत उपदेश केला. तिनं त्यात सांगितलं की नाटक सुरू असताना असा मध्येच मोबाईल वाजला तर एकाग्रता भंगते. आता पुढे तिचं मोठं स्वगत आहे तर असा अडथळा येऊ देऊ नका इ. इ.

तिचं हे बोलून झाल्यावर नाटक थांबलं होतं तिथून पुन्हा सहज सुरू झालं.

हे खूपच शिस्तशीर झालं. पण याचा अर्थ असा की ही परिस्थिती नेहमी येत असणार. प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी पाळायला हवी इतकं साधं सुशिक्षित लोकांना कळू नये याचा खेद वाटला.

मी वर्सेस मी - क्षीतिश दाते, शिल्पा तुलस्कर आणि ह्रिशिकेश जोशी. एक वेगळा विषय आणि नेपथ्य बघायला मिळाले. नक्की बघा.

चारचौघी दोन अंकी करून जरा सुटसुटीत करता आलं असतं. पहिले दोन अंक चांगले आहेत. तिसरा पर्ण पेठेचा खूप कंटाळवाणा वाटतो. तेव्हाच्या काळात ते शॉकींग वगैरे वाटलं असेल पण आता नाही तसं वाटत. आधीच्या संचातही (दीपा श्रीराम, वंदना ) हे नाटक पाहिले आहे आणि ते जास्त सरस वाटले होते. अर्थात नाटक पाहिलेला तो काळ त्या वेळचा, अनेक वर्षांपूर्वीचा होता हेही एक कारण असू शकते.
मधल्या बहिणीला अजून थोडा वेळ द्यायला हवा होता थोडा तिसर्‍या बहिणीवरचा वेळ कमी करून असं वाटलं.

गेल्या आठवड्यात मुलीसोबत आजीबाई जोरात नाटक बघितले. खूप आवडले. नाटकाची थीम मस्त आहे. मुलांना सोबत घेऊन नक्की बघा. नाटक संपल्यावर मुलांना नाटक बघितल्याबद्दल सर्टिफिकेट आणि वही दिली.

काही दिवसांपूर्वी शिकायला गेलो एक पाहिले. खूप उत्साहाने मैत्रिणी मिळून शुभारंभाचा प्रयोग पाहायला गेलो. १० मिनिटे खूप निर्मळ हसू आले. नंतर मात्र नाटकाने पातळी सोडली असे वाटले. पिंजरा सिनेमा चा सद्य स्थितीतला अवतार वाटला, पण त्या मास्तरांची सद्-असद् विवेकबुद्धी इथे नाही. उलट जे बदल झाले ते justify केलेत नाटकात. विनोदी न वाटता सवंग वाटले.

पिंजरा नाही. द.मा. मिरासदारांच्या व्यंकुची शिकवणी या कथेचं नाट्यरूपांतर.

हो, ते नाटकात पण सांगतात. ती कथा अनेक अनेक वेळा वाचली आहे. ती अशी सवंग नाही वाटत.
ह्या नाटकातून काही लोक उठून गेले.

आजीबाई जोरात मलाही फार आवडलं, मागच्यावर्षी बघितलं. निर्मितीताई आणि अभिनवची एनर्जी कसली आहे, सहीच एकदम. जाम एन्जॉय केलेलं.

काल झी नाट्य गौरव 2025 बघितलं त्यात त्यांनी अनेक नाटकांचे छोटे-छोटे प्रवेश सादर केलेत. खूप सुंदर होता. त्यात आजीबाई जोरात चा एक प्रवेश केलाय अतिशय आवडला. तो बघूनच असं वाटलं की नाटक खूप छान वाटत असेल.

शिकायला गेलो एक चा सुद्धा प्रवेश होता. तो प्रशांत दामले आणि त्यांच्या शिष्याने, दोघांनीही धमाल सादर केला.
पण कदाचित पूर्ण नाटकात सवंगपणा तुम्ही म्हणताय तसं वाढत गेला असेल. अजूनही एक-दोन ठिकाणी असंच ऐकायला मिळालेल.

शिकायला गेलो एक नाटक पाहिले नाही पण ते ज्या कथेवरून घेतले आहे ती मिरासदारांची कथा फारच मस्त आहे. कथेत मास्तर तसा तरूण आणि अविवाहित दाखवला आहे त्यामुळे जे काय घडतं ते कुठेही सवंग वाटत नाही. नाटकात दामलेंना मुलगी दाखवली आहे आणि वयानेही मोठे दाखवले आहेत त्यामुळे रुपांतर करताना योग्य ते बदल केले नाहीत तर सवंग नक्की वाटू शकेल.
प्रशांत दामले यांनी त्यांच्या नेहमीच्या पठडीतील नाटके सोडून जरा वेगळ्या काही भूमिका कराव्यात अशी इच्छा आहे...ते बहुतेक एक स्वप्नच राहाणार आहे Happy

प्रशांत दामलेला तरूणपणी पिक्चरमधे तशा वेगळ्या भूमिका मिळायला हव्या होत्या.
रूपडं भारी होतं तेव्हांचं..

शिकायला गेलो एक नाटक पाहिले नाही पण ते ज्या कथेवरून घेतले आहे ती मिरासदारांची कथा फारच मस्त आहे. कथेत मास्तर तसा तरूण आणि अविवाहित दाखवला आहे त्यामुळे जे काय घडतं ते कुठेही सवंग वाटत नाही. नाटकात दामलेंना मुलगी दाखवली आहे आणि वयानेही मोठे दाखवले आहेत त्यामुळे रुपांतर करताना योग्य ते बदल केले नाहीत तर सवंग नक्की वाटू शकेल. >>>

व्यंकूची शिकवणी आज ऐकली... आवडली. दळण, माझ्या बापाची पेंड वगैरेच्या अंगानी जाणारी विनोदी पण कुठेही तोल न ढळणारी..

गोष्ट ऐकल्यावर मलाही तसंच वाटलं, की कदाचित नाट्यरूपांतर करताना तो समतोल राखता आला नसावा , तसेच आधुनिकीकरण किंवा नागरिकरण करण्याच्या प्रयत्नातही काही अंशी अयशस्वी झाला असू शकतो.

पण हे बऱ्याच वेळा बघितलंय की पुस्तक किंवा गोष्टीत जेवढा चांगला अनुभव मिळतो पण त्याचं नाट्यरूपांतर किंवा सिनेमा किंवा मालिका करतात तेव्हा ते तेवढं प्रभावी होत नाही.

इंग्लिश मध्ये ही असं जाणवलं आहे.

मला वाटतं अपवाद फक्त श्रीयुत गंगाधर टिपरे चा असावा.. त्यांना मालिकाही मस्त जमली होती.

पण हे बऱ्याच वेळा बघितलंय की पुस्तक किंवा गोष्टीत जेवढा चांगला अनुभव मिळतो पण त्याचं नाट्यरूपांतर किंवा सिनेमा किंवा मालिका करतात तेव्हा ते तेवढं प्रभावी होत नाही.>>

ते रूपांतर कसं केलंय त्यावर ते अवलंबून आहे. सत्यजित रे यांनी अनेक प्रसिद्ध बंगाली कथांवर चित्रनिर्मिती केली होती. पाथेर पांचाली, चारुलता, तीन कन्या ही काही उदाहरणे. त्यातील मूळ बंगाली कथांचे अनुवाद मी वाचले आहेत आणि रे यांनी चित्रपटात त्याला पूर्ण न्याय दिला आहे. मराठीतही 'न पटणारी गोष्ट' या कथेवरून कुंकू हा अतिसुंदर चित्रपट निर्माण झाला होता. स्वामी जुनी मालिकाही पुस्तकाला न्याय देणारी होती. woman in white वरून श्वेतांबरा ही जुनी मराठी मालिकाही चांगली जमली होती.

पण ही जुनी उदाहरणं आहेत हे ही खरंच. हल्ली नवीन अशी उदाहरणं पटकन डोक्यात येत नाहीत Sad

श्वेतांबरा आजच्या काळात असती, तर मीमचा पाऊस पडला असता. कदाचित पहिलाच डेली सोप म्हणून हवा झाली असेल. पण शेवट पाहिल्यावर आम्ही तरी केस उपटले होते.

मराठी कथांवर दूरदर्शन आणि झी मराठीने मालिका केल्या होत्या. व्यंकुची शिकवणी हिंदीत डब केलेला भाग दूरदर्शन यु ट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. निखिल रत्नपारखी आणि अंशुमन विचारे प्रमुख भूमिकांत.

तुम्ही दिलेली उदाहरणं मी त्याचा विचार केला नव्हता.. पण माझ्या डोळ्यासमोर अलीकडेच आलेले बरेच नेटफ्लिक्स शोज, वेब सिरीज, काही नाटकं आणि त्याची ओरिजिनल पुस्तक यांची तुलना होती.

खरंतर अद्वैत दादरकर चांगलं काम देतो पण काय माहिती..
नाटक बघितल्यावर कळेल /ठरविता येईल.

असेन मी, नसेन मी. __ मराठी नाटक
निर्मिती आणि दिग्दर्शन - अमृता सुभाष
लेखन - संदेश कुलकर्णी
प्रौढपणी होणारे विस्मरण, डिमेंशन ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. विषयामुळे, त्यातील कलाकारांच्या नावांमुळे बरेच दिवस ऐकून होते या नाटकाबद्दल. त्यामुळे पाहिले.
नीना कुलकर्णी यांचा अभिनय उत्तम झाला आहे. प्रयोगात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाताना बदलणारी देहबोली आणि संवादफेक अचूक पकडली आहे. शुभांगी गोखले यांच्या अभिनयाला पण दाद द्यावी असा चांगला आहे. अमृता सुभाष मला फार कधी आवडली नाही , तशी यात पण नाही. तिचा अभिनय बऱ्याचदा मला थोडा बटबटीत वाटतो (आवाजाची चढ उतार, हावभाव आणि हातवारे सगळेच जास्त प्रमाणात करते असं वाटतं).
पण नाटकाचा एकूण प्रभाव पडत नाही. विस्कळीत वाटलं. एक दोन प्रसंग सोडले तर नाटक किंवा संवाद मनाला भिडत नाही. याचे मूळ नाट्यलेखन आणि संहिता बांधण्यात असावे.
विस्मरण हा मूळ गाभा असला तरी इतर कमीतकमी १०/१२ गोष्टीना घुसडून संहिता पातळ झाली आहे. ( See spoiler below).
नेपथ्य चांगले आहे पण तीनही खोल्या passage मध्ये उघडतात, एकाही खोलीतून दुसरीकडे थेट जाता येत नाही आणि जा ये पुष्कळ आहे. ते जरा विचित्र वाटले. दोन प्रवेशांमध्ये, मध्यंतरानंतर पण blackout जरा जास्त वेळ असतो त्यामुळे थोडा रसभंग होतो. कपडेपट चांगला आहे पण अमृता सुभाष खूपच विविध कपड्यांमध्ये दिसते( अती जाणवण्याइतके कपडे बदलले आहेत)
हल्ली २/३ नवीन नाटकात असे पाहिले आहे की नाटकातील व्यक्तिरेखा या त्या पात्राचे ठाशीवपण दाखवण्यापेक्षा जे कलाकार ती व्यक्तिरेखा साकारणार आहेत त्याच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन कसे जास्त होईल या विचाराने लिहित असावेत. अमृता सुभाष आणि शुभांगी गोखले यांनी साकारकेलेल्या पात्रांच्या बाबतीत असे काहीसे झाले असावे असे वाटते.
एकूण नाटक ठीक आहे. एकदा बघायला हरकत नाही.
(### छोटासा स्पॉयलर - - अनेक कोंबलेले विषय असे - व्यसन, इतर दुखणी, नवरा बायको यांच्यामधले ताण , एकल पालकत्व, मतिमंदत्व, घटस्फोट, मुलगा मुलगी भेद, आई मुलीच्या नात्यातले तणाव, ऑफिस आणि मॅनेजमेंट आणि त्यातील male dominance, नवऱ्याचे possessive वागणे, सासूच्या संसारातील दुःखे......)

असेन मी नसेन मी वाटलं होतं चांगल असेल.. (जमलं तर) बघायच्या यादीत टाकायचं होता... अर्थात एक किंतू अमृता सुभाष कितपत झेपेल हा होताच.. Happy

******
जर तरची गोष्ट..

हे नाटक लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप या भोवती फिरणारं आहे.

लग्न असो किंवा (लिव्ह-इन) रिलेशनशिप, ती एक ठराविक/ मर्यादित(?) कमिटमेंट , देवाण - घेवाण (गिव्ह and टेक), सुसंवाद, आणि मुख्य म्हणजे एकमेकांना आवश्यक तेव्हढी दिलेली स्पेस यावर उभी असते. जर एखाद पारडं कमी/जास्त भझालं की त्या नात्याचा तोल बिघडला जाण्याची शक्यता वाढते.. हा नाटकाचा गाभा.
आशुतोष गोखले, प्रिया बापट, उमेश कामत आणि पल्लवी अजय चढत्या भाजणीत स्वतः च्या स्पेस विषयी जागृत किंवा less dependant दाखवलेत.

उमेश आणि प्रियाच्या साखरपुड्यापासून नाटकाला सुरुवात होते.
लगेचच पुढच्या प्रवेशात उमेश आणि पल्लवी जमिनीच्या व्यवहारासाठी एक हॉटेलवर येतात, तिकडेच प्रिया आणि आशुतोष येतात. तेव्हा प्रेक्षकांना कळते की उमेश आणि प्रियाचे लग्न होऊन, घटस्फोट होऊन काही काळ गेला आहे. तिथून मग पुढील नाटकाला सुरुवात होते. फ्लॅशबॅक मध्ये प्रिया उमेश च्या घटस्फोटाचे (संभाव्य) कारण अगदी थोडक्यात सांकेतिकपणे दाखवले आहे. त्यानंतर मग ही जर तर ची मालिका सुरू होते.. जर आपण एकमेकांना सगळं सांगितलं असतं तर, जर आपण वेळेत मदत मागितली असती तर, जर मी खूप पझेसीव्ह झालो नसतो तर.. वगैरे वगैरे

सगळ्यात लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे, उमेश कामत म्हणतो,
“ म्हणजे बघ हं जर हे लग्न वगैरे ठरलं / झालं की लगेच डोळे मिटून परत उघडले की डायरेक्ट लग्नाला दहा वर्ष होऊनही गेलीयेत.. आणि सुखाने संसार सुरू आहे असं झालं तर… “ - म्हणजे इन्स्टंट (noodles/) रिझल्ट सारखे..सुरुवातीचे टक्के टोणपे, मुलांच्या खस्ता वगैरे सगळे चढउतार बायपास करून थेट रेडीमेड संसार २ मिनिटात तयार.. Happy

नाटकाची सुरुवात थोडी ढिली वाटली पण मग हळू हळू नाटकाने पकड घेतली. काम सगळ्यांचीच तशी चांगली ते ठीक या रेंजमध्ये आहेत. काही बाबतीत बारकावे चांगले दाखवलेत - उमेशच्या हाताची खाज मधून दाखवलेला त्याचा स्ट्रेस, आशुतोषचे स्ट्रेस आला की मोठ्या आवाजात न कळणारे संगीत ऐकणे, त्याचा पॅनिक अटॅक, प्रिय बापटची देहबोली विशेष करून ज्यावेळी ती सतत आधार शोधत असते, पल्लवी अजयचा बिनधास्तपणा.
उमेशने वाजवलेलं गिटार आणि प्रियाने म्हंटलेले गाणे ही सम पण चांगली जमवली आहे. उमेशने अजूनही स्वतःला खूप चांगल मेंटेन केले आहे आणि त्याचा प्रेझेन्सही त्यामुळे सुखावह वाटतो. प्रिया बापटची एकंदर छाप थोडी टिपिकल जशी ती मुलाखतींमध्ये वगैरे बोलते तशीच जाणवत राहिली. उमेशचा शेवटचा रडण्याचा सीन थोडा नाटकी किंवा ओव्हर वाटला. आशुतोष ही कधी कधी थोडा लाऊड किंवा आक्रस्ताळी वाटत होता पल्लवी अजय चे काम मी पहिल्यांदा बघितले.. तिने आत्मविश्वासु, बिनधास्त, करियर माईंडेड, स्वतःच्या स्पेसचा आग्रह धरणारी अशी व्यक्तिरेखा अतिशय सहजपणे उभी केलीये.

मी प्रिया उमेश यांच्या अलीकडे आलेल्या नाटकापैकी पाहिलेलं हे पहिलंच नाटक.
आतापर्यंत लग्न किंवा नातेसंबंध या भोवती फिरणारी अनेक नाटक येऊन गेली आहेत. सुरुवातीला हुंडा पद्धती, एकत्र कुटुंबपद्धती, सासू सुनेचे खटके - नोकरीवरून , कामावरून त्यात मुलाची होणारी ससे होलपट, राजा राणी चा संसार, त्यातला/ ली तिसरा/ री, मुल होणे/ न होणे वगैरे वगैरे असे मुद्दे कालपरत्वे येत गेले. परतू या पलीकडे जाऊन नात्यात लागणारा ( वर म्हटल्या प्रमाणे) सुसंवाद, एकमेकांप्रती विश्वास, एकमेकांना मिळालेली किंवा राखलेली स्पेस पण त्या बरोबरच असलेली आणि दाखवलेली कमिटमेंट या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर भाष्य करणारी ही कलाकृती आजच्या काळाच नाटक - बदललेल्या समाजाचा आरसा - वाटते. अर्थात ही नाटकाची एक जमेची बाजू झाली

एकंदर नाटक चांगलं/ ठीक आहे एकदा पहायला हरकत नाही.

जाता जाता अजून एक -

बे एरियातील प्रयोगाविषयी, नेपथ्य छान होतच. पण महत्वाच म्हणजे ते येथील स्थानिक @CALAA कारांनी केले होते. उमेश कामत ने स्वतः केलेल्या कौतुकामुळे त्यामागे या सगळ्यांनी केवढे कष्ट घेतले ते कळले. तसेच प्रकाश संयोजक म्हणून टेक्सास मधील एका व्यक्तीने (मी नाव विसरले) अमेरिकेतील तिन्ही प्रयोगांचे काम बघितले. इकडे ही सर्व नाटकं/ कार्यक्रम आम्हाला बघायला मिळतात त्यामागे बऱ्याच नाट्यप्रेमी / कलाप्रेमी स्वयंसेवकांचे एकत्रित परिश्रम असतात.

PXL_20250505_021216321~3.jpg

ईकडे एका मराठी संस्थेच्या कृपेने वाडा चिरेबंदी नाटक पाहायला मिळालं आणि आवडलं. वडिलोपार्जित वास्तू, जमिनी, दागदागिने त्यातले हेवेदावे, भावा बहिणींमधे त्यावरून असलेली तेढ, हे सगळं मी अनुभवलं आहे त्यामुळे रिलेट झालं बर्‍यापैकी. कलाकार संच पण सगळा उत्तम होता. निवेदिता जोशी खास करून आवडली. करतील स्गळ्यांसाठी सगळं पण तोंडाने बोलून घालवणार अशी वहिनी तिने उत्तम साकारली आहे. मुंबईत राहात असलेल्या जावेबद्दल थोडी असुया, इर्षा, दिरावरचं प्रेम सगळे एक्प्रेशन्स तिने बोलण्याच्या लकबीतून बरोबर दाखवलेत. वैभव मांगले, प्रसाद ओक तर बेस्ट आहेतच.
बाकी ३५ वर्षापूर्वीचा लहानशा गावातला काळ पण चांगला उभा केला आहे. पूर्ण नाटक फक्त वाड्यामधेच घडतं. तिथल्या वेगवेगळ्या खोल्या, त्याच्या जाण्या येण्याची रचना, माजघर, अंगण, ओटी सगळं बघायला फार छान वाटलं. एका सीनमधे सगळा अंधार आणि वैभव मांगले हातात कंदील घेऊन माजघरात जातो ती फार परक्फेट प्रकाशयोजना वाटली. ओव्हरॉल मस्त!

शिकायला गेलो एक .. !

दहावीच्या वाऱ्या केलेला, आमदाराचा मुलगा श्याम (वय २१), आदर्श पुरस्काराने सन्मानित साने गुरुजींकडे शिकवणीला येतो. आता शिकवणी कोण कुणाची घेतो, कशी घेतो आणि त्यातून काय काय निष्पन्न होतं हे गौडबंगाल म्हणजे " शिकायला गेलो एक" नाटक.

शेवटचे गुरुजींचे मनोगत म्हणजेच ह्या नाटकाचा गाभा आहे. आदर्श वागण्याचं ओझं घेऊन जगताना आयुष्य जड/ विरस होऊन जातं. मग कधीतरी इतर गोष्टी मनासारख्या ( आदर्श / थोड्या ऑफबीट असल्या तरी) स्वतः साठी म्हणून ( मर्यादेत राहून) कराव्यात आणि आयुष्य छान मजेत जगावे.

सुशांत शेलारने श्यामच्या भूमिकेत सिक्सर मारलीये. गुरुजींच्या भूमिकेत द प्रशांत दामले ही त्यांच्या शैलीत धमाल आणतात.

ह्या नाटकाची कथा व्यंकूची शिकवणी या द. मा. मिरासदार ह्यांच्या गोष्टीवर बेतलेली आहे. ह्या गोष्टीतील मास्तर नुकताच नोकरीला लागलेला तरुण असतो तर शिष्य एका इयत्तेत बरीच वर्ष काढलेला.. त्यामुळे त्यांच्यातील वयाची गॅप खूपच लहान असते.

त्या छोट्या २०-२५ मिनिटांच्या गोष्टीचे २ अंकी नाटक तेही वेगळ्या (आताच्या) काळात करतानाचा हा प्रयत्न तोकडा वाटला.
काही काही प्रसंग बरेच लांबवल्यासारखे वाटले, किंवा उगाच लाऊड वाटले.
शिव्या ( मूर्ख, बावळट.. वगैरे) आणि श्लोक ह्यांची केलेली हेटाळणी वजा तुलना , किंवा ठराविक आहार करणारे म्हणजे कचखाऊ वगैरे बऱ्याच गोष्टींचं जे सरसकटीकरण केलं आहे अशा गोष्टी अनेकाना आक्षेपार्ह वाटू शकतात. प्रशांत दामलेंच्या दिसण्यावरूनही खूपच जास्त पंचेस टाकलेत तेही थोडे खटकले.

साने गुरुजी , प्रार्थना हे विषय उगाच बाष्कळ विनोद करून किंवा त्याचा विपर्यास करून त्यावर टाळ्या/ हशा मिळवण्याचे नाहीत. या मर्यादांच भान लेखक/ दिग्दर्शकाने राखायला हवं होतं.

एकंदर तुमच्याकडे वेळ असेल, हलकं फुलकं काही बघायचं असेल आणि सहज जमलं तर एकदा बघायला हरकत नाही.

प्रशांत दामल़ेंनी शेवटी "सुखं म्हणजे नक्की काय असतं.. " च एक कडवं गाऊन प्रेक्षकांना एक बोनसही दिला. आजचा त्यांचा १३३१९ व प्रयोग होता.

असेन मी नसेन मी हल्लीच बघितले. वर punekarp यांन लिहिलेल्या परिक्षणाशी सहमत. शुभांगी गोखलेंनी काम मस्त केलेय पण त्या पात्राचे प्रयोजन काय हा प्रश्न पडला. त्यामुळे मुळ कथेला काय मदत… असो. नीना कुलकर्णींचे काम चांगले झालेय. अमृता मलाही अजिबात आवडत नाही पण यात सुसह्य आहे. नाटक पाहताना सतत ‘भाई, नक्की कहना क्या चाहते हो‘ वाटत राहते. Happy

भूमिका' ' हे सचिन खेडेकर, समिधा गुरु अभिनित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित मराठी नाटक पाहिले. आवडले. एक सुंदर, आशयघन नाटक.. !

टिव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका प्रथितयश अभिनेत्याला त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशी एका महान व्यक्तिमत्वाची म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारायची संधी लाभते. त्या संधीच सोनं करताना, महामानवाची भूमिका साकारताना, अभ्यासताना तो अभिनेता खऱ्या आयुष्यात ती भूमिका आपल्या परिने जगू लागतो. टिव्ही मालिकेत वैचारिक भूमिका साकारत असताना खऱ्या आयुष्यात त्याच्या विचारांना धार येऊ लागते. त्याचे विचार ठाम होऊ लागतात. त्याच्या ह्या बदलेल्या विचारांमुळे त्याच्या वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक आयुष्यात कसे बदल घडतात आणि काय परिवर्तन घडतं.. त्याच्या बदलेल्या भूमिकेमुळे काय परिणाम होतात अश्या गोष्टींवर हे नाटक प्रकाश टाकते.

सचिन खेडेकरांचा अभिनय अप्रतिम.. समिधा गुरु आणि इतर कलाकारांच्या भूमिकाही उत्तम..!

भूमिका पुढच्या आठवड्यात बघणार आहे..

संगीत देवबाभळी!
७६० नॉट आउट Happy

ही गोष्ट खरी तर दोघींची - विठोबामय झालेल्या संत तुकारामांची पत्नी आवली आणि साक्षात विठोबारायाची रखुमाई (लखुबाई) या दोघींची.

देहवान हरपून विठ्ठलाच्या नामात दंग राहिलेल्या आणि त्यापायी स्वतःच्या वाटणीच्या सावकारीवर पाणी सोडलेल्या तुकारामांवर सतत करदावलेली आवली विठुरायाच्या नावाने अखंड बोटे मोडत असते.

एका संध्याकाळी भंडाऱ्याच्या डोंगरात तुकारामांना शोधत गेलेल्या गर्भवती अवलीच्या पायात काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. जाग येते तेव्हा आपल्या चुलीशी भाकर भाजणाऱ्या अनोळखी स्त्रीला बघून तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते.
ही चुलीवर स्वयंपाक करणारी ती लखुबाई (म्हणजे खरंतर रखुमाई) तिची शंका दूर करत, आवलीचा पाय बरा होईपर्यंतच ती इकडे राहणार असल्याचं सांगते.

विठ्ठलावर रुसून आलेली रखुमाई आणि विठू नामाच्या वेडात व्यवहार,घरदार सारं काही मोडीत काढलेल्या तुकारामांना अखंड साथ देणारी आवली. या दोघींची भेट हा निव्वळ योगायोग नव्हता. आवलीची बाजू ऐकताना, तिचा आक्रोश समजून घेताना लखुबाई सारखंच आपलंही मन द्रवतं.
“जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” या उक्तीची प्रचिती नाटक बघताना येत राहते.

लेखन, दिग्दर्शन, संगीत, पार्श्वगायन, नेपथ्य, प्रकाशयोजना, गायन, (दोघींचाही) अभिनय, कलाकारांचे प्रत्यक्ष वादन सर्वकाही अप्रतिम!

विशेष लक्षात राहिलेलं किंवा मनात घर करून राहिलेलं असं काही -
> प्रकाश योजना / नेपथ्य/ संगीत -
जुन्या काळच्या घरातील खिडक्या, त्या झरोक्यातून आत येणारा मंद प्रकाश, फुकणीने फुंकल्यावर चुलीतून येणारा धूर सगळच अगदी नैसर्गिक आणि अशाच एखाद्या घराच्या पडावीत/ माजघरात/ स्वयंपाकघरात घेऊन जाणारं.

> केवळ अभिनय आणि साउंड इफेक्ट्स मधून होणारा इंद्रायणीचा आभास, आनंद भाटेच्या आवाजातील पार्श्वगायनाने आणि कलाकारांच्या अभिनयाने जणू बुवा खरेच अंगणात बसून विठूनामाचा गजर करतायत असं वाटून गेलं.
त्या दोघीही स्टेजवर लाईव्ह गातात हे माहित होतच पण त्या व्यतिरिक्त समोर बसून वादकांची टीम त्यांना अप्रतिम साद देते. त्यातून फार इतका सुंदर माहोल उभा राहतो.

> अभिनय / संवाद -
खटकेबाज संवाद, त्याला असलेली घातलेली विनोदाची झालर, भाषेचा लहेजा सगळच लाजवाब!.

आवलीचा सात्विक संताप, आक्रोश, हबलता, अवचित उपटलेल्या स्त्री प्रति सुरुवातीला वाटणारा संशय, गैरसमज दूर झाल्यावर तिच्या बद्दल वाटणारी कृतज्ञता अशा अनेक छटा शुभांगी सदावर्तेमनी लीलया दाखवल्या आहेत.

लखुबाईचा/ रखुमाईचा मनातील सल, रुसवा, आवलीने विठ्ठलाच्या नावाने खडे फोडल्यावर रखुमाईला येणारा लटका राग पण ती नाराजी लपवण्यासाठी केलेली धडपड असे अनेक बारकावे मानसी जोशीने मोठ्या खुबीने सादर केले आहेत.

सर्वात महत्त्वाचा म्हणजे संघाचा कर्णधार, प्राजक्त देशमुख - ज्याने ही सर्व मोळी इतकी मस्त बांधली आहे .

> गाणी- तुकारामांचे अभंग - जे कथेला पुढे नेतात किंवा उठाव आणतात. इतके चपखल अभंग (शोधून) संहितेत आणल्याबद्दल लेखकाच ( सध्या अभावाने आढळणाऱ्या त्याच्या अभ्यासु वृत्तीच) कौतुक वाटलं.

मी पाहिलेला वर्किंगडेला असलेला साडेचारचा 760 वा प्रयोग हाउसफुल होता यावरून नाटकाला मिळालेला लोकांचा उदंड प्रतिसाद लक्षात येतोच.
संगीत देवबाभळी तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर संधी मिळाली तर जरूर बघा.

अतिशय सुंदर आणि परिपूर्ण असं नाटक आहे.

भूमिका

एक विचार करायला प्रवृत्त करणारं नाटक!

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, क्षितिज पटवर्धन लिखित नाटकात सचिन खेडेकर काम करणार हे ऐकल्यावर जमलं तर हे नाटक बघायचं अस ठरवलं होतं. आणि (मैत्रिणीबरोबर जाण्याची) तशी संधी चालूनही आली.

एका प्रस्थापित नटाच्या आयुष्यावर बेतलेलं, आजच्या काळातलं,आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारं हे नाटक आहे.

विवेक जयंत ( सचिन खेडेकर) या नटाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील मालिकेत खुद्द बाबासाहेबांची भूमिका साकारण्याची संधी चालून येते.
(अर्थात) कसलेल्या अभिनेता असल्याने तो त्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करू लागतो. तस इतके दिवस पूर्ण अनभिज्ञ असलेल्या विषयाची - बाबासाहेबांच्या विचारांची, राहणीमानाची, कार्याची, संघर्षाची फक्त ओळखच न पटता त्यांचा त्याच्या वैयक्तिक जीवनावर, विचारांवर प्रभाव पडू लागतो.
हे बदलेलं रूप त्याच्या कौटुंबिक जीवनात वादळ निर्माण करतं. त्याचे बरे वाईट परिणाम त्याच्या घरी काम करणाऱ्या मदतनीस, नातलग यांच्या संबंधावरही होतात.
त्याच्या मुलीच्या हुकलेल्या वैद्यकीय प्रवेशानिमित्ताने पलीकडील बाजूही मांडण्याचा/ ऐकण्याचा प्रयत्न होतो. शासनाकडून काढण्यात आलेल्या क्रिमी लेअर सारख्या काही तोडग्याचाही उल्लेख होतो. पुढे मुलीच्या शिक्षणासाठी आफ्रिकेला जाण्याच्या अनोख्या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या प्रक्रियेत त्याच्या ह्या विचारात आलेल्या सुस्पष्टतेचा आणि प्रगल्भतेचा महत्वाचा वाटा ठरतो.
मालिकेच्या दरम्यान हळू हळू त्याला निर्मात्याच्या (फक्त) व्यवहारी हेतूंचाही अनुभव येतो आणि भूमिकेत शिरलेल्या त्याला आता ही कॉम्प्रेमायझेस करणे पटेनासे होते. तो बेगडीपणा पूर्वीसारखा नजरअंदाज करणे अशक्य होते असे साधारण कथानक आहे.

एक भूमिका मनापासून करायला बघणारा नट, ते करताना समाजातील, आयुष्यातील आपली भूमिका ठामपणे घ्यायला आणि मांडायला सुसज्ज होतो/ शिकतो.
लेखन, दिग्दर्शन, ( सर्व कलाकारांचा ) अभिनय अशा सर्वच बाजूंनी चांगल झालं आहे.

हे नाटक मला अनेक स्तरांवर जाणवलं/ दिसलं.
पण मुख्य विषयाची हाताळणी - सध्या इतकी दुही जाणवते, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप, हेटाळणी, द्वेष, प्रत्येक गोष्टीच केलं जाणारं जातीयिकरण ( आणि राजकारण) अशा परिस्थितीत- बऱ्यापैकी संयतपणे केलेली आहे.
शतकानुशतके मूलभूत सुविधांपासून,शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेलेल्या समाजाला, शासनाकरवी सुविधा/ सवलती देऊन
वर काढण्याचे प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाले. ज्याच्या सहाय्याने त्या समजातील काही घटक प्रगतीपथावर आले परंतु पूर्ण समाज त्या एका पातळीवर आला आहे का?
या समाजाला दिलेल्या सवलतीमुळे दुसऱ्या समाजाला वाटणारी डावलल्याची भावना, त्यातून तयार झालेला रोष कितपत योग्य आहे? शर्यत करायची असेल तर सर्व स्पर्धकांना एका समान पातळीवरून सुरुवात करायला मिळावी हे खरंतर गृहीतक आहे. आत्ता दिल्या जाणाऱ्या सवलतीं म्हणजे सर्वांना एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न आहे हे किती जण समजून घेऊ शकतात?

कुसुमाग्रजांची शहरातील पाच पुतळे या कवितेची प्रकर्षाने आठवण आली.
खरंच गांधी, टिळक, सावरकर, आंबेडकर, फुले ही सगळी खरंतर लोकोत्तर माणसं - यातल्या कोणावरही टीका करायची आपली पात्रताच नाही. पण आज दुदैवाने एकेका समाजाने आपापसात वाटून घेतली आहेत.
त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे कर्तुत्व हे खरंच मुळापासून अभ्यासून बघितलं पाहिजे हा विचार बळावला.

गेल्या दोन आठवड्यात दोन नाटके, एक सांगितिक कार्यक्रम आणि एक मराठी चित्रपट बघायला मिळाले. ह्या वर्षीची सुरुवात एकदम सांस्कृतिक झाली आहे. Happy

Pages