'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बाजीराव, खिलजी, कपिल (८३), गल्ली बॉय, दिल्ली बॉय (बॅण्ड बाजा बारात), आणि दिल धडकने दो मधला अर्बन अपर क्लास मधला तरूण - भूमिकांचे वैविध्य आणि त्यात पूर्ण शिरणे - यात रणवीरला सध्या तोड नाही. मला डान्सेस मधे काडीचा इंटरेस्ट नसूनही बाजीराव मस्तानी मधला तो तंबूतला "दुश्मनची देखो जो वाट लावली" डान्स आणि रामलीला मधला तत्तड तत्तड - हे दोन्ही प्रचंड आवडतात. त्याची संवादफेकही अफलातून आहे. बॅण्ड बाजा बारात मधला दिल्ली/जाट अ‍ॅक्सेण्ट, दिल धडकने दो मधला उच्चभ्रू, ८३ मधले कपिलचे मोडकेतोडके इंग्रजी, आणि बाजीराव मस्तानी मधले क्लिअर मराठी प्रभाव जाणवणारे हिंदी.
<<<<
टोटली, रणवीर फार कमालीचा अभिनेता आहे ! वर लिहिलेले सगळे मुव्हीज आवडते आहेत Happy
मिडियापुढे काहीतरी माकडचाळे करून / करण जोहर छाप रॉकी और रानी सिनेमे करून स्वतःच्या इमेजची वाट लावणे बन्दं करावे आता त्याने !

रणवीर स्तुती असेल तर त्यात तो बँडरस्नॅच अ‍ॅडवेंचर पण अ‍ॅड करा. काहीही सामान न घेता जंगलात आपण (दर्शक) सांगू तो रुट घेऊन ट्रेक करायचा. हे बाकी कोणी बॉलिवुड व्यक्तीने करण्याचा विचार देखिल केला नसता.

बँडरस्नॅच अ‍ॅडवेंचर >>> हे नव्हते माहित. बघायला पाहिजे. रणवीर आवडतोच बॅंड बाजा बारात पासून. पण डीजे इज राइट, ऑफ स्क्रीन फार छिछोरेपणा करतो Happy
त्यावरून आठवलं, शाहरुख चा ऑफ स्क्रीन वावर नेहमी अतिशय विटी आणि चार्मिंग असतो.

गल्फ प्रदेशात बंदी असून धुरंधरची कमाई ८०० कोटीच्या वरती गेली आहे. जोरदार विक्रम आहे!
सिनेमात दाखवले आहे की अर्थमंत्री चिदंबरम आणि त्याचा कार्टा कार्टीने आय एस आय ला नोट छापायच्या प्लेटा दिल्या होत्या तशा काही प्लेटा धुरंधरच्या निर्मात्यालाही मिळाल्या असाव्यात! Happy
जणू नोटा छापत चाललेत.

शाहरुखशी तुलना कराल तर रणवीर आणखी छीचोरा वाटेल.
पण तो नाही बदलणार.
कारण लोक काय म्हणताहेत याची परवा तेरवा न करता आपल्या मनासारखे जगणे त्याची स्टाईल आणि त्याचा यूएसपी आहे.

मला त्याचा छीचोरेपणा आवडतो असे नाही, किंबहुना ए आय बी रोस्ट शो मध्ये त्याने जे केले होते त्याच्या निषेधात माझा धागा सुद्धा होता जिथे घमासान चर्चा झाली होती.

पण येस, मला त्याची बेधडक बेपर्वा वृत्ती आवडते. ती त्याने बदलू नये Happy

(AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.
https://www.maayboli.com/node/52596 )

मला पण त्याचे माकडचाळे आवडतात. शारुखचा सेन्स ऑफ ह्युमर, हजरजबाबीपणा आणि रणवीरचा इंटर्व्यू मधला फालतूपणा हाच बघण्यासारखा असतो. पोक्त वगैरे झाला तर बोर होईल.

मिडियापुढे काहीतरी माकडचाळे करून / करण जोहर छाप रॉकी और रानी सिनेमे करून स्वतःच्या इमेजची वाट लावणे बन्दं करावे आता त्याने >> +१

अस्मिता फार सुरेख पोस्ट.

मी बघितला नाहीये. तू छान ओघवते लिहिलं आहेस. ओटीटी वर आल्यावर बघेन.

शाहरुख (आजकाल) फक्तं ऑफस्क्रीनच चांगला वाटतो.
पण नको इथे तो आणि त्याच्या वाइट मुव्ही चॉइसेसचा विषय.. स्पॅमिंग अ‍ॅलर्ट Uhoh
रणवीरचा खिलजी आणि रामलीला मधला रोलही फार भारी होता..
धुरन्धरचे ट्रेलर पाहून खिलजी + अ‍ॅनिमल चे काँबो असेल अशी शंका आली होती पण टोटली वेगळा रोल आहे इथे, Ranveer outdid himself Happy

धुरन्धरचे ट्रेलर पाहून खिलजी + अ‍ॅनिमल चे काँबो असेल अशी शंका आली होती पण टोटली वेगळा रोल आहे इथे, Ranveer outdid himself >>> डिजे सेम सेम ! मला वाटत टिझर किवा फर्स्ट लुक बघुन मी हेच लिहल होत पण खुप खुप वेगळा रोल निघाला...ही हॅज लिव्हड द कॅरेक्टर ओफ हमझा !! आय कॅन नॉट इमॅजिन एनीवन एल्स इन धिस रोल.

रणबिर मला कधिच आवडला नाही, जराही व्हेरिएशन देवु शकत नाही, प्रचन्ड लिमिटेड अभिनय आहे त्याचा..सगळिकडे सारखाच वाटतो मला तो.सॉरी टू से पण कपुर घराण्याच्या अभिनयातल्या लेगसी मधे तो कुठेच फिट बसत नाही.

मलाही रणबीर कपुर नाही आवडत अजिबात.. एखाद दुसरा ये जवानी है दिवानी , संजु मधे वगैरे मधे बरे काम केलय पण नाहीच आवडत अ‍ॅक्टर म्हणून आणि पर्स्नॅलिटीही नाही आवडत त्याची !

हा माझा सिरीयस प्रतिसाद.

ट्रेलर बघून अ‍ॅनिमल टाईप असेल असे वाटले होते. नंतर काही जणांचे रिव्ह्यूज वाचून बघावा असे वाटले होते. मी फारसे सिनेमे बघत नाही. घरातून थेटर मधे खेचून नेईल असे आकर्षण वाटणारे खूप कमी सिनेमे येतात. सिनेमॅटिक लिबर्टी बद्दल माझी काही मतं आहेत. एक वेळ पठाण परवडला कारण तो पूर्ण फिक्शन आहे. सध्या अनेक स्पाय वेबसिरीज सुरू आहेत. त्यात खर्‍या घटनांचा आधार घेऊन पुढे फिक्शन असते. हॉटस्टार वरची स्पेशल ऑप्स, फॅमिली मॅन, मुखबीर ,इम्रान हाश्मीची एक. या मालिकात आणि धुरंधर मधे फरक नसेल. असेल तर त्यातून एका पक्षाची जाहीरातबाजी करण्याचा.

ज्यांना ध्रुव राठीचा टीकात्मक व्हिडीओ हेल्दी स्पिरीट मधे घेता येत नाही त्यांनी सिनेमा सिनेमा म्हणूनच बघावा असले अचाट बोलू नये. सिनेमा आहे तर टीका असणारच. टीका नको म्हणणार्‍यांचे परीक्षण किंवा मत विचारात घेण्याची गरज नाही. मआ स्वतःला प्रोपोगंडा आवडत नाही. एव्हढी काही गरज नाही कि प्रपोगंडा आहे हे माहीत असताना घरातून उठून जाऊन साडेतीन तास आणि पैसे वाया घालवावेत. पिक्चर चांगला आहे म्हणून त्यातला प्रपोगंडा चालवून घ्या ही माझी गरज नाही. उद्या दुसर्‍या पक्षाचा असाच सफाईदार प्रपोगंडा आला तरी मी तो पाहणार नाही. कुठलाही हिट पिक्चर पाहिलाच पाहीजे ही काही सक्ती नाही.

रणवीर सिंग हा कुणाला आवडत असेल त्यांना सलाम. हा मला कधीच आवडला नाही. एक वेळ शाहरूख खान परवडला. त्याची आता सवय झाली आहे आणि आता त्याचा वावर परिपक्व वाटतो. पण त्याच्याहून भिकारडा अ‍ॅक्टर आता लोकांना आवडू लागला आहे हे स्विकारावे लागत आहे. सिंघम , सर्कस आणि रोहीत शेट्टीचाच अजून एक पिक्चर ज्यात तो पहिल्यांदा शेट्टीकडे हिरो होता. ते बघताना त्याचे ते मर्कटचाळे बघवत नाहीत. त्याला एनर्जी म्हणवत नाही. आवाज चिपांजी सारखा आहे. अगदी बंडल पिक्चर मधे सुद्धा बांधून ठेवणारा अमिताभ बच्चन आता पुन्हा होणे नाही.

अभिनयाच्या बाबतीत राजकुमार राव, आयुष्यमान खुराना, पंकज त्रिवेदी, नवाजुद्दीन सिद्दीकी हे लोक बाप आहेत. रणवीर सिंग सारख्या माकडाचे हिरो म्हणून पिक्चर थेटरात जाऊन बघावे इतकी वाईट परिस्थिती आली नाही. तरीही धुरंधर मधे अजेण्डा नसता तर नक्की पाहिला असता.
बाकी बाजीराव मस्तानी किंवा खिलजी मधे अभिनय नाही तर गेट अप महत्वाचा होता. दोन्ही सिनेमे वाईटच होते. फक्त बेअरिंगला अभिनय मी तरी म्हणणार नाही. बाजीराव मधे बाजीरावाचे जे बेअरिंग पकडले आहे ते भयंकर कृत्रिम आहे. सतत चेहरा ताणून वावरणे याला अभिनय म्हणायचं ? त्यातून ते अभिनयशून्य बारीक डोळे. मुळात बाजीरावावरचा सिनेमा अजिबात न्याय देणारा नव्हता. संजय लीला भन्साळीने फिक्शनल कॅरेक्टर उभे केले आहे त्याला बाजीरावाच्या जीवनावरची प्रेरित कथा म्हणावे लागेल. त्याचा गंगूबाई पण वाईटच होता. आपण नेमके काय बघितले असे वाटले. एखाद्या रिअल पात्रावरून प्रेरणा घेतलेला पण पूर्णपणे फिक्शन असलेला पिक्चर म्हणजे दीवार. त्यात कुठेच हाजी मस्तान च्या रिअल कॅरेक्टरचा क्लेम केलेला नाही. धुरंधरने रिअल फूटेज वापरले तरी एक वेळ चालेल. पण सिलेक्टिव्ह व्हायला नको होते.

असाच सॅम बहादूर. खूपच हवा केली होती. पण सॅम माणेकशा यांच्यासारखे दिसणे, त्यांची ढब हुबेहूब उतरवणे या पलिकडे हा सिनेमा अजिबात बांधून ठेवत नाही. सॅम माणेकशांबद्दल पूर्ण आदर ठेवूनही म्हणेन कि या पेक्षा त्यांच्यावरची डॉक्युमेण्टरी पाहणे किंवा पुस्तक वाचणे जास्त आवडले असते.

प्रपोगंडा पेक्षा टुकार मराठी मालिका बघणे परवडेल. भारतीय जनता पक्षाने हा सिनेमा टॅक्स फ्रीच नाही तर पूर्ण पणे फ्री करायला हवा होता. धुरंधर स्पॉन्सर्ड बाय भारतीय जनता पक्ष हे जास्त प्रामाणिक झाले असते. मनात एखाद्या पक्षाची जाहीरात हा हेतू ठेवून कितीही वर्ल्ड क्लास पिक्चर बनवला तरी ती फसवणूकच आहे आणि आपण मूर्ख नाहीत, बनायची तयारी नाही असे वाटणारा प्रेक्षक जाणीवपूर्वक फसवून घेणार नाही. हा सरकारी पिक्चर आहे असे सांगा मग आम्हाला प्रॉब्लेम नाही.

>>"रणबिर मला कधिच आवडला नाही, जराही व्हेरिएशन देवु शकत नाही, प्रचन्ड लिमिटेड अभिनय आहे त्याचा..सगळिकडे सारखाच वाटतो मला तो.">>
+१०००
'अजब प्रेम की गजब कहानी' आणि 'वेक अप सिद' ह्या दोन चित्रपटांमध्येच मी त्याला झेलु शकलो. त्यानंतर का कोणास ठाउक, पण त्याचे डोळे बघीतल्यावर सुरुवातीला संजय दत्त (अर्थात पुर्वी तो होताच म्हणा) वाटायचा तसा रणबिर कपुर पण पक्का चरसी/गर्दुल्लाच वाटु लागला 😀

जर आदित्य धर प्रॉपोगेन्डा म्हणून सिनेमे बन्वत असेल तर ध्रुव राठी आणि अनुपमा चोप्रा टाइप फेक सेक्युलर लोक तरी काय करतात ?
ते पण ठराविक पार्टीचे /बाजुच्या देशाचे पेड पी आर आहेत इतकी ऑबव्हियस गोष्टं समजत नाही का ?
बाकी धुरन्धर मधे दाखवलय त्यात चूकीचे काहीच नाहीये, काही वाक्यं आहेत प्रोपोगेन्डा वाटतील अशी पण अख्खा सिनेमा तसे नरेशन करत नाही.
बाकी प्रोपोगेन्डा टिका तर शिन्डलर्स लिस्ट वरही झाली होती , म्हणून ज्यु लोकांच्या जेनोसाइडचा इतिहास खोडून टाकायचा कि २६/११ घटना दाखवायची नाही ? कि असे सिनेमे करणे बन्दं करायचे ?

ध्रुव राठी आणि अनुपमा चोप्रा सिनेमे बनवतात किंवा तिकीट काढून ते थेटरात बघावे लागतात ही माहिती नवीन आहे. धन्यवाद,

ध्रुव राठी हा काँग्रेसचा पेड आहे हे जाणावतंच. पण म्हणून त्याने संदर्भासहीत धुरंधरचा प्रपोगंडा उघड केला तो कसा काय नाकारायचा ? धुरंधर सिलेक्टिव्ह आहे हे मी वर लिहीलेच आहे. उद्या राहुल गांधीवर आदित्य धरने सिनेमा बनवला आणि तो एखाद्या भाजपाईने उघड केला तर मला त्यातली तत्थ्य स्विकारायला काहीही अडचण असणार नाही. अनुपमा चोप्रा यांच्याबद्दल त्या कुठल्या राजकीय विचारसरणीच्या आहेत याची मला माहीती नाही.

सिनेमे नाही बनवत, डिजिटल कन्टेन्ट तर बनवतात !
सगळ्या पार्टीजचे लोक अ‍ॅजेन्डा चालवतात, नथिंग न्यु .. धृव राठीच्या व्हिडिओ बनवण्याला कुठे कोण नको म्हणतय ?
बनवु देत कि, पण त्याला विरोध म्हणूनही येणार मग अजुन व्हिडिओज आणि रिअ‍ॅक्शन्सही.. मग कॉमेन्ट्स लिमिटेड करण्या सारखी कॉवर्ड रिअ‍ॅक्शन कशाला ? नेव्हर एन्डिंग आहे हे , दोन्ही साइडने क्रिटिसिझम होणार आहे !
ऑडियन्स म्हणून मला 'देव' सारखे मोदी विरोधी सिनेमेही आवडतात आणि उरी, द्गुरन्धर सारखेही.. स्टोरी टेलिंग /नरेशन कसे अहे डिरेक्टरचे त्यावर आहे सिनेमाचे यश !

<ते पण ठराविक पार्टीचे /बाजुच्या देशाचे पेड पी आर आहेत इतकी ऑबव्हियस गोष्टं समजत नाही का ?>

Rofl

हे महान आहे.
ठरावीक पक्षाचे एकवेळ समजून घेऊ शकतो. पण थेट शेजारच्या देशाचे ? आणि ते सुद्धा obvious?

या वर लिहिण्यासारखं बरंच काही आहे. पण मग ते पर्सनल होईल.

by the way जसे चित्रपट प्रपोगंडा असतात् तशीच पुस्तकंही असतात. त्यातही वास्तव आणि कल्पित यांचं बेमालूम मिश्रण करता येतं, जसं या चित्रपटात केलं आहे. ते वाचताना आपण रंगून केलो (कथाविषय आपल्या कलाशी जुळणारा असल्यानेही ) म्हणजे त्यातलं सगळं खरंच आहे असं वाटणं हा एकतर निरागसपणा आहे किंवा बनेलपणा.

आम्ही हा चित्रपट चित्रपट म्हणून बघित , एंजॉय केला. प्रपोगंडा आहे, हे माहीत आहेच. असं म्हणणार्‍यांना अशा चित्रपटातला धोका वरचे आणि आधीचेही काही प्रतिसाद वाचून कळला असेल . अर्थात त्यात आपण काही करू शकत नाही. पण ते तसं होतं, याची जाण नोंदवलेली बरी.

मी म्हणालो कि उद्या भाजपाईने पण एखादा सिनेमा उघड केला तर मला प्रॉब्लेम नसेल.
ज्यांना धुरंधर डोळसपणे आवडतोय त्यांना शुभेच्छा. मला मूर्खात निघावे असे वाटत नाही. कदाचित इथे हे जाहीर केल्यावर मी धुरंधर बघेनही. म्हणजे मी फसलेलो नाही हे जाहीर करून बघताना मला अपराधी वाटणार नाही. Happy

ज्यांना धुरंधरवरची टीका अजिबातच झेपत नाही त्यांचे मी काही करू शकत नाही. फक्त त्यांना लवकर बरे व्हा इतकेच म्हणू शकेन. इथे कुणीही अन्य राजकीय पक्षाची छुपी जाहीरात (किंवा बेमालूम) असलेल्या सुपरहीट चित्रपटाचे उदाहरण देऊन मला टेस्ट करावे. त्यातला अजेण्डा राजकीय असेल तर नक्कीच मी त्याच्यावर बोलेन. (असा सिनेमा आहे का पण ? )

त्याचे डोळे बघीतल्यावर >> मला नीतू सिंगची आठवण येते. पण तिच्या बाबतीत ते नशिले (चांगल्या अर्थाने) वाटतात. रणबीरचे झोपाळू वाटतात. मला तो रॉकस्टारमध्ये आवडला होता.

बाकी प्रोपोगेन्डा टिका तर शिन्डलर्स लिस्ट वरही झाली होती , म्हणून ज्यु लोकांच्या जेनोसाइडचा इतिहास खोडून टाकायचा कि २६/११ घटना दाखवायची नाही ?
>>>>>
अगदी.
मान्य आहे की माधवनचे संवाद क्रिन्ज आणि बायस्ड आहेत. पण बॉलिवूडमध्ये प्रपोगंडा इतकी वर्ष चालूच आहे. त्यात काय नवीन आहे? प्रपोगंडा वाटत असेल तर बघू नये. बनवूच नये हे कशासाठी?

अगदी हैदरसारखा उत्तम बनवलेला आणि मिशन काश्मीरसारखा फसलेला पिक्चरही प्रपोगंडाच होता की. हे पिक्चर मला पीडीपी किंवा हुरियतची विचारसरणी सांगणारे वाटतात. म्हणून ते पाहिले म्हणजे मी स्वतःला फसवते आहे किंवा त्या राजकीय विचारसरणीला शरण जाते आहे असे काही नाही.

एखाद्याची मतं वेगळी असली तर त्याचा अर्थ धुरंदरवर टीका सहन झाली नाही असेही नाही. ज्याला चित्रपट काढायचा आहे त्याला काढू द्या. ज्याला पाहायचे आहे त्याला पाहू द्या. नसेल पाहायचा तर तशीही सक्ती नाही. पाहून आवडला नाही तरीही हरकत नाही. न पाहता टीका करायची असेल तर तसं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे.

अनुपमा चोप्रा कुठल्याही राजकीय विचारसरणीची वाटण्यापेक्षा अमन की आशाच्या स्वप्नाळू ग्रुपमधली वाटते. तिच्या प्रॉडक्शन हाऊसने काश्मीर समस्येवर शिकारासारखा तद्दन बुळबुळीत पिक्चर बनवलाच की. त्यावर सडकून टीका झाली पण कुणी विधू विनोद चोप्राला पिक्चर बनवू नये असे सांगितले नाही.

एखादे हत्याकांड, एखादा अन्याय याला प्रपोगंडा म्हणायचे तर म्हणू शकता. पण सिलेक्टीव्ह असणे अ‍ॅड्रेस केल्यावर त्याची तुलना अशा मानवी इतिहासातल्या काळ्या घटनांना स्पेस देणार्‍या पिचरशी कशी करणार ?
शिंडलर्स लिस्ट सारखा सिनेमा बनवायचा तर बनवा. ज्यात गुजरात दंगे किंवा शीख विरोधी दंगे हे बॅकग्राउंड असू शकेल. शीखविरोधी दंग्यांवर इतक्यात एक वेबसिरीज आलेली आहे. कुणी टीका केली का ? गुजरात दंग्यांवर पण बनवा. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर पण भीष्म साहनींच्या पुस्तकावर एक मालिका आली होती. उच्च दर्जाची होती ती. तिला सर्वांनीच अ‍ॅप्रिशिएट केले.

ती सरकारी खर्चाने सरकारच्या बाजूची नव्हती. सरकारने केलेले दुष्कृत्य मांडणारी मालिका होती. ती त्याच पक्षाच्या काळात.

गुजरात दंग्यांवर पण बनवा.
>>>
गोविन्द निहलानींचा देव बघा, चांगला घेतलाय सिनेमा.
प्रॉपर मोदींना विरोध करणारा सिनेमा आहे, कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही सिनेमावर, उत्तम कलाकृति आहे,
अमिताभ आणि ओम पुरी, सोबत करीना आणि फरदीन खान .

देव पाहिलेला नाही. त्याचं प्रमोशनही नाही झालेलं. बहुधा त्याचा हेतू राजकीय सिनेमा असाच आहे. वेड घेऊन पेडगावला जाण्यातला प्रकार नाही.
जसा सिंहासन सिनेमा. उघड उघड राजकीय सिनेमाच आहे.

नर्मदा सरोवरच्या वेळी आमीर खान मेधा पाटकरांच्या आंदोलनात सामील झाला म्हणून फना वर अघोषित बंदी होती. फना पाहून येणार्‍या एका प्रेक्षकाची हत्याही झाली होती. तीच गोष्ट आंधी आणि किस्सा कुर्सी का वर अधिकृत बंदी आणली त्या वेळी झाली. अशा असंवेदनशील लोकांची आरती ओवाळणारे चित्रपट बघणे हे आपले काम नाही.

ध्रुव राठीने कमेण्ट बॉक्स का बंद केला हे त्यावर आलेल्या कमेण्ट्स वाचून सहज समजेल. झोंबी भक्तांच्या कमेन्ट्सला बौद्धीक प्रतिवाद म्हणण्याची हिंमत कुणाच्यात असेल का ? त्याने बंद केला नसता तरी चाललं असतं कारण झोंबी यापेक्षा वेगळेपण दाखवूच शकणार नाही.

ध्रुव राठीने ज्या फॅक्ट्स मांडल्या आहेत त्या पाहिल्या तर इथल्या बर्‍याच कमेण्ट्सची गरज राहत नाही. असो मी धुरंधर पाहीन आता.
आणि नकारात्मक असेल तर राज अज्ञानी यांच्या धाग्यावर लिहीन , आवडला आणि टीका अनाठायी आहे असे वाटले तर या धाग्यावर लिहीन. कदाचित लगेच पाहीन किंवा मग ओटीटीवर आल्यावर पाहीन.

ह्या धाग्याचा विषय नाही . पण रहावत नाही. भीशम सहानीची तमस ही सिरीयल अ त्यंत पूर्वग्रहदूषित, डाव्या विचारांनी ग्रासलेली होती. त्या काळी अशा डाव्या विचारांनाच चांगले म्हणायची पद्धत होती. पण कमालीचा हिंसाचार करून मुस्लिमांनी फाळणी घडवून आणली असूनही केवळ रा स्व संघाला खलनायक म्हणून दाखवण्याची हीन डावी वृत्ती ह्या सिरियलमधून दिसली.

कालच पाहून आलो आणि दिवसभर प्रचंड डोके दुखत होते आवाजामुळे. प्रसंग नीट आठवत नाही पण त्यात बॅकग्राउंडला हरे राम हरे कृष्ण हरे राम होते. पाकिस्तानातील कथा सांगत असताना ह्या गाण्याचे प्रयोजन कळले नाही. भाग १ तर प्रचारकी आहेच पण दुसरा अजून जास्त होण्याची शक्यता आहे.
एकीकडे सांगायचे की फिक्शन आहे आणि दुसरीकडे सढळपणे ओरिजिनल फुटेज आणि रेकॉर्डिंग वापरायची. दुसऱ्या भागात पुलवामा स्फोटात दारुगोळा कुठून आला आणि पहलगामला अतिरेकी कसे आले हे पण दाखवणार का? कारण अजून तरी पुलवामाचे उत्तर कोणी दिले नाही.

समजा मॅकेनाज गोल्ड हा पिक्चर आजच्या काळात बॉलीवूडने बनवला. तो पण ओरिजिनल पेक्षा भारी. >> एक प्रयत्न करून झाला आहे, जलजला नामक सिनेमा बनला होता, धर्मेद्र, शत्रुघ्न सिन्हा, राजीव कपूर (तोच कपूर कुलोत्पन्न - राम 'तेरी गंगा मैली वाला), किमी काटकर, विजेता/विजयता पंडित अशी स्टारकास्ट होती.

मिडियापुढे काहीतरी माकडचाळे करून / करण जोहर छाप रॉकी और रानी सिनेमे करून स्वतःच्या इमेजची वाट लावणे बन्दं करावे आता त्याने

>>>
निषेध. रॉकी रानी धुरंधरपेक्षा किमान मला तरी जास्त आवडला.

Pages