सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
स्ट्रेट ओरिएंटेशन मुळे सर्व
स्ट्रेट ओरिएंटेशन मुळे सर्व हिरॉइन्स आवडल्या. शरारत गाण्यात तर थिएटरचा ऐसी फुल्ल करावा लागतो. अक्षय खन्नाआवडतो म्हणजे शेन वॉर्न ने सचिन ला रिस्पेक्ट द्यावं तसं आहे.
एकदा थुमाळ ने राजेंद्रनाथ ला विचारले होते "बेटे तुम्हे कौनसी लडकी अच्छी लगती है"
यावर त्याने बाणेदारपणे उत्तर दिले होते
"पापाजी मुझे तो सारी लडकियां अच्छी लगती है"
रणवीर सिंह आवडणाऱ्या मर्दांसाठी एक लाईक.
कंदाहारमधे विमानातील अपहरण
कंदाहारमधे विमानातील अपहरण केले गेलेले प्रवासी भारत माता की जय म्हणायलाही घाबरतात हे पाहून आणि अपहरण करणारा अतिरेकी जेव्हा म्हणतो की हिंदू एक कमजोर कौम है (तुम्ही षंढासारखे सगळे सहन करता) तेव्हा अजित डोवल च्या भूमिकेतल्या माधवनच्या चेहर्यावरील भाव अगदी बोलके आहेत. भयानक संताप आणि हतबलता हे दोन्ही चेहर्यावर अगदी प्रभावीपणे दाखवले आहे.
>>>>>बायकांच्या अपेक्षा
>>>>>बायकांच्या अपेक्षा देवालाच ठाऊक.
बायकांना नखरेल, अति बायकी, थोबाड-शरीराचं भांडवल करणार्या, सतत स्वतःचा सौंदर्य-अहंकार कुरवाळणार्या, बाहुली बनून फिरणार्या बायका आवडत नाहीत.
काहीतरी पर्सनॅलिटी आहे, पुरुषांच्या पुढे पुढे करत नाहीत, पुरुषांच्या नजरेमधुन स्वतःची व्हॅल्यु करत नाहीत - अश्या बायका आवडतात.
-----------
ती सारा तशी पोट्रे केली नसेलही. पण तिला अभिनय मात्र शून्य आहे.
मी ब्यागा भरल्यात. लवकरच
मी ब्यागा भरल्यात. लवकरच स्पाय बनून पाकिस्तान जाणार आहे. सरकारने एक गुप्त परीक्षा घेतली त्यात मी पास झालोय. मोदीजी बोलले कोणाला सांगू नको, मायबोलीवर लिहिलास तर चालेल.
मोदीजी भुताचा धागा वाचत
मोदीजी भुताचा धागा वाचत असावेत. तिथले तुम्हचे अनुभव वाचून तुम्हाला कायमचं भारता बाहेर हाकलून द्यायचा विचार असेल.
मी ब्यागा भरल्यात. लवकरच
मी ब्यागा भरल्यात. लवकरच स्पाय बनून पाकिस्तान जाणार आहे. सरकारने एक गुप्त परीक्षा घेतली त्यात मी पास झालोय. मोदीजी बोलले कोणाला सांगू नको, मायबोलीवर लिहिलास तर चालेल.
>>>
तिकडे जाऊन भुताच्या गोष्टी सांगू नका…
मला थिएटर मध्ये बघायला मजा
मला थिएटर मध्ये बघायला मजा आली.
खूप दिवसांनी थिएटर मध्ये असा मजेचा सिनेमा बघितला, मला वाटतं ऑपनहायमर नंतर हा आवडला असेल.
बायकांना नखरेल, अति बायकी,
बायकांना नखरेल, अति बायकी, थोबाड-शरीराचं भांडवल करणार्या, सतत स्वतःचा सौंदर्य-अहंकार कुरवाळणार्या, बाहुली बनून फिरणार्या बायका आवडत नाहीत.
>>>>>>
कदाचित त्या पुरुषांना सहज आकर्षित करण्यात यशस्वी होतात म्हणून असेल..
>>कंदाहारमधे विमानातील अपहरण<
>>कंदाहारमधे विमानातील अपहरण<<
स्पिकिंग ऑफ रियल लाइफ इवेंट्स.. रेहमानचा चुलत भाऊ, उझेरचं इराण बरोबर कनेक्शन आहे. कुलभूषण जाधव यांना पकडण्यात त्याचा हाथ आहे/होता असं वाचनांत आलं. बघुया पुढच्या भागात काहि संदर्भ देतात का...
कदाचित त्या पुरुषांना सहज
कदाचित त्या पुरुषांना सहज आकर्षित करण्यात यशस्वी होतात म्हणून असेल..>>> स्त्री म्हणून जगताना लैच ग्यान हेपाळलं!
हिंदू एक कमजोर कौम है (तुम्ही
हिंदू एक कमजोर कौम है (तुम्ही षंढासारखे सगळे सहन करता) ...
हे बरंय राव, आम्ही अमेरिकेत राहून खोर्याने पैसे ओढू, मर्सीडिझ मध्ये फिरू, आमची मुले आयव्ही लीग मध्ये शिकतील, देशातील भारतीयांनी मात्र 'भारत माता की जय' अशा घोषणा अतिरेक्यांसमोर देऊन आपली शिरकमले राष्ट्र देवतेच्या चरणी अर्पण करावीत.
ऑन अ सिरियस नोट, एखाद्या पाकिस्तानी विमानाचे बलुच सेपरेसिस्ट्न नी अपहरण केले असते तरी पाकिस्तानी लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देऊन हकनाक आपले बळी दिले नसते. Human being are rational animals.
आज अमेरिकेत एप्स्टिन फाईलस
आज अमेरिकेत एप्स्टिन फाईलस उघडणार आहेत. बरेच आयडी गायब आहेत.
अज्जिबात आवडला नाही. टोटल
अज्जिबात आवडला नाही. टोटल फडतूस. एक तर इतकी हिंसा आणि शिवीगाळ दाखवली आहे की चित्रपटाचा हेतू (जो काही असेल तो) तिथेच सपशेल आपटला आहे. शेवटी शेवटी तर थिएटरमध्ये प्रेक्षक हुर्यो उडवत होते.
>>>
>>>
हिंदू एक कमजोर कौम है (तुम्ही षंढासारखे सगळे सहन करता) ...
हे बरंय राव, आम्ही अमेरिकेत राहून खोर्याने पैसे ओढू, मर्सीडिझ मध्ये फिरू, आमची मुले आयव्ही लीग मध्ये शिकतील, देशातील भारतीयांनी मात्र 'भारत माता की जय' अशा घोषणा अतिरेक्यांसमोर देऊन आपली शिरकमले राष्ट्र देवतेच्या चरणी अर्पण करावीत.
<<
एन आर आय विषयी आंतरिक जळजळ व्यक्त करायची संधी साधून घेतलीत. आता मोकळे झाल्यासारखे वाटत असेल. अभिनंदन!
अहो, त्या सिनेमात तो प्रसंग आहे तो सांगितला.
अजित डोवालच्या भूमिकेतला माधवन अपहृत प्रवाशांना सांगतो की तुमची सुटका झाली आहे. आज रात्री विमान येऊन तुम्हाला भारतात घेऊन जाईल. "बोलो भारत माता की..." याला कुणी उत्तर देत नाही आणि तो अतिरेकी डोवालला तुम्ही दुबळे आहात म्हणून खिजवतो. ह्यात एनआरआय कुठून आले?
मी त्या प्रवाशाना कुठेही दोष दिलेला नाही. जो प्रसंग दाखवला आहे त्याचे वर्णन दिले आणि त्यात माधवन चा बोलका अभिनय आवडला एवढे सांगायचे होते ते सांगितले.
आपल्या दिव्य दृष्टीला इथे एनआरआय लोकांच्या चैनीच्या गोष्टी दिसल्या हा आपल्या दिव्य दृष्टीचा दोष!
(आणि हो, आपली लाडकी शांतताप्रेमी जमात अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथे येऊन शांततापूर्ण कत्तली करतात. त्यामुळे छान छोकीत रमलेले एन आर आय फार सुरक्षित आहेत असे समजू नका. शांततेच्या धर्माचे अनुयायी तसे होऊ देणार नाहीत. तस्मात जळजळ थोडी कमी करा! )
मुळात 'हिंदू एक कमजोर कौम है"
मुळात 'हिंदू एक कमजोर कौम है" असे त्या लोकांनी म्हणलेले कुठेच नमूद नाही.
काल्पनिक वाक्यच घुसडायचे तर 'इन्डियन्स कमजोर कौम है' असे चालले असते, पण मग प्रोपॅगंडा कसा होणार ?
>> मुळात 'हिंदू एक कमजोर कौम
>> मुळात 'हिंदू एक कमजोर कौम है" असे त्या लोकांनी म्हणलेले कुठेच नमूद नाही.>> मूळ घटनेत कोण कोणाला काय म्हणालं हे सगळं जसंच्या तसं डॉक्युमेंटेड आहे? असेल तर कुठे मिळेल वाचायला?
>>मुळात 'हिंदू एक कमजोर कौम
>>मुळात 'हिंदू एक कमजोर कौम है" असे त्या लोकांनी म्हणलेले कुठेच नमूद नाही.
आपण तिथे होतात का त्या अ तिरेक्य्यांच्या तोंडची वाक्ये टिपायला?
हे अतिरेकी स्वतःला कट्टर इस्लामी जिहादी समजतात, आपण अल्लाहच्या मार्गावर चाललो आहोत. आपण अल्लाहच्या आदेशाप्रमाणे काफिरांचा नाश करायची मोहीम सुरू केली आहे आणि त्यामुळे आपल्याला अल्लाह उच्च कोटीच्या जन्नतीत अर्थात स्वर्गात पाठवणार हे त्यांना पक्के पटलेले असते याबद्दल मला तरी काडीचीही शंका नाही.
पुरोगाम्यांना अ तिरेक्यांच्य विचारावर काय साखरपेरणी करायची आहे बरे?
काल्पनिक वाक्यच घुसडायचे तर
काल्पनिक वाक्यच घुसडायचे तर 'इन्डियन्स कमजोर कौम है' असे चालले असते, पण मग प्रोपॅगंडा कसा होणार ?
>>> किती वेळ वाळूत डोकं खुपसून बसणार आहात?
पाकिस्तानची निर्मिती कशाच्या आधारावर झाली? त्यांना काश्मिर कशाच्या बेसिसवर हवं आहे? भारताची सेक्युलर डेमोक्रॅटीक रिपब्लिकन राज्यव्यवस्था पाकिस्तान आणि काश्मिरी फुटीरतावाद्यांना पसंत नाही म्हणून चाललंय का हे सगळं?
https://www.livemint.com
https://www.livemint.com/entertainment/who-was-major-mohit-sharma-the-as...
Who was Major Mohit Sharma? The Ashok Chakra awardee at the heart of the Dhurandhar controversy
ट्रेलर पाहून मेजर मोहित
ट्रेलर पाहून मेजर मोहित शर्माची कहाणी आहे का असं मलाही वाटलं होतं पण फक्त लूक कॉपी केला आहे. तोही काश्मिरी लूक नाहीच. फक्त लांब दाढी, वाढलेले केस आणि हा गेटअप नसताना बॉयिश लूक एवढीच सिमिलॅरीटी. Major as an infiltrator could easily pass for a Kashmiri.
त्यांनी भारतातच अतिरेकी ग्रुप इनफिल्ट्रेट केले होते. कुपवाड्यात त्यांच्यावर संशय आल्यावर उडालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला.
पिक्चरमधले हमजाचे कॅरॅक्टर शिक्षा भोगताना दाखवलेले आहे तर मेजर शर्मा यांनी इन लाईन ऑफ हिज ड्युटी हेराचे काम केले आहे. त्यामुळे खरं तर कॉंट्रोव्हर्सी व्हायला नको.
@ माझेमन
@ माझेमन
>>"त्यामुळे खरं तर कॉंट्रोव्हर्सी व्हायला नको.">>
+१०००
मेजर मोहित शर्मांच्या कुटुंबियांनी न्यायालयात प्रकरण नेले तेव्हा मला हा निव्वळ एक 'चीप पब्लिसीटी स्टंट' असल्याचा संशय आला होता, पण चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसर्या की तिसर्याच दिवशी त्यांच्या भावाने एका उप्ग्रह वाहिनीला मुलाखत देउन हा गैरसमज कशामुळे निर्माण झाला होता त्याचे ऑनकॅमेरा स्पष्टीकरण दिल्यावर माझा हा संशय दुर झाला होता!
'धुरंधर'वर आजपर्यंत अनेकांनी
'धुरंधर'वर आजपर्यंत अनेकांनी भरमसाठ टीका केली! त्यापैकी कोणी फक्त 'ट्रेलर' पाहूनच रडगाणी गायली तर कोणी चित्रपट न पाहताच 'साप साप म्हणून भुई धोपटायला सुरुवात केली आणि काहींनी आपल्या उथळ राजकीय/वैचारिक भूमिकेच्या चष्म्यातून ह्या चित्रपटाकडे पहात बोंबा मारायला सुरुवात केली होती. परंतु अशा सर्व भंपक टीकाकारांना भीक न घालता 'प्रगल्भ' प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ह्या चित्रपटाला 'ब्लॉकबस्टर' बनवण्याची किमया करून दाखवली.
दुसरीकडे चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत/जाणकार मंडळींनी ह्या चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यापैकी 'राम गोपाल वर्मा' ह्यांनी काल 'X' वर ज्या पोस्ट्स केल्या आहेत त्या मला सर्वात जास्त आवडल्या.
DHURANDHAR is not a film , it is a QUANTUM LEAP in INDIAN CINEMA
Here are some unique lessons that all the so called film makers can learn from Dhurandhar
RGV च्या पहिल्या पोस्टला आदित्य धरने दिलेले उत्तरही छान आहे. आणि त्यावर रामूचे उत्तर सुद्धा
बाकी वाचकांच्या कॉमेंट्स सुद्धा झकास आहेत, शिवा, सत्या, रंगीला, कंपनी, सरकार असे उत्तम सिनेमे देणाऱ्या रामूला पुढे त्याच्या सर्जनशीलतेचा आलेख सातत्याने घसरत गेल्याबद्दलची हळहळही व्यक्त करत त्याला काही खडेबोल सुनावले आहेत त्या वाचायला पण मजा आली 😀
परंतु अशा सर्व भंपक
परंतु अशा सर्व भंपक टीकाकारांना भीक न घालता 'प्रगल्भ' प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ह्या चित्रपटाला 'ब्लॉकबस्टर' बनवण्याची किमया करून दाखवली. >> हे सोनेरी रंगात लिहा. प्रगल्भ प्रेक्षक कसे आणि भंपक कसे हे ओळखायची कसोटी यात आहे.
काश्मीर फाईल्स, केरळा स्टोरी, धर्मवीर अशा चित्रपटांना पण प्रगल्भ प्रेक्षक होता. पण हा प्रगल्भ प्रेक्षक अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, इमर्जन्सी, बंगाल फाईल्स, इंदूराज या चित्रपटांना गेला नाही.
एक प्रश्न राम गोपाल वर्मावरून
सरकार हा चित्रपट प्रगल्भ कि अप्रगल्भ ? बाळकडू हा चित्रपट आताचे प्रगल्भ प्रेक्षक पाहणार का ?
माधुरी अॅज धुरंधर !
..
चित्रपट आहे तो. बघा नाहीतर
चित्रपट आहे तो. बघा नाहीतर नसेल बघायचा तर बघू नका. मनोरंजन करणे व्यतिरिक्त त्यात काही नाही. गाणी गीणी आहेत, मारामाऱ्या आहेत, आणि सत्य घटनांचा रेफरन्स घेऊन काही फिक्षन रचली आहे. नाही आवडली तरी काही हरकत नाही, नवा अवतार आलाय काल. तो बघू आणि त्यावर बोलू. इतकं वाद वगैरे घालण्यासारखं त्यात काही नाही.
काय ती तीच तीच टेप ? बघायचा
काय ती तीच तीच टेप ? बघायचा तर बघा नाहीतर नको या वाक्याला काय अर्थ आहे ? वाचायचं तर वाचा नाही तर नका वाचू. खायचं तर खा नाही तर नका खाऊ. तुमचं तुम्ही बघा. प्रगल्भ प्रेक्षक कसा ठरवायचा याच्या कसोट्या भारी आहेत एव्हढं सांगायचं कि नाही सांगायचं ?
भाऊ बघून आला. एकदम बंडल, बकवास अर्थहीन मारामार्या. हे ऐकून बघायची इच्छाच नाही.
राम गोपाल वर्माने चांगले
राम गोपाल वर्माने चांगले लिहीले आहे पण ए आय चा वापर कळतोय
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=wWIJNCU8OOs
(फक्त ऋन्मेषजींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत )
काल युट्यूबवर स्टोरी बघितली.
काल युट्यूबवर स्टोरी बघितली. तो अक्षय खन्ना पाकिस्तानचा माणूस आहे. मला वाटलं इंडियाचा माणूस असेल. आणि रणवीर तिकडे जाऊन भारतावर हल्ले होतच राहिले. रणवीर स्पाय बनून तिकडे जातो, तिकडे खन्ना सोबत हातमिळवणी करतो नंतर शेवटी खन्नाला मारून तो बलुचिस्तान प्रांत आहे त्याचा भाई होतो. बस संपला पिक्चर. लोकांच्या आवडीनिवडी बदलल्यात आता. हे जग विनाशाच्या वाटेवर जात आहे हळूहळू.
बोकलत तुम्हीच एक स्टोरी का
बोकलत तुम्हीच एक स्टोरी का लिहीत नाही ? त्यात भूतं पण असतील.
Pages