'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटते आय एस आय च्या अधिकार्याच्या तोंडी एक संवाद आहे की जर भारताने २६/११ सारखा हल्ला पाकिस्तानवर केला असता तर आम्ही प्रत्युत्तर द्यायला थेट दिल्लीत पोचलो असतो. ह्या षंढ लोकांनी (हिंदूंनी) मात्र काहीही उत्तर दिले नाही. आम्हाला थोडे आश्चर्यच वाटले!
मला वाटते ज्यांनी २६/११ घडलेले पाहिले आहे अशा बहुसंख्य भारतीय लोकांची ही अपेक्षा होती की भारत काहीतरी आक्रमक उत्तर देईल. पण त्याकरता मोदींचे सरकार यावे लागले!
२६/११ घडवून आणणारी प्यादी ही मरण्यासाठीच आलेली होती. त्यांनी अनेक दिवस मुंबई वेठीस धरून शेवटी त्यांचा निकाल लाव ला, कसाबला फाशी दिले म्हणून काँग्रेस सरकारला डोक्यावर घेणे निरर्थक आहे. ते तर किमान करायलाच हवे होते. पण शिवाय पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता.

हीच गोष्ट भाजपच्या वाजपेयी सरकारची. कंदाहार अपहरण, संसद हल्ला असले भयानक प्रकार पाक सरकारच्या द्वारे केले गेले. पण ह्या षंढ सरकारने कुठलेही प्रत्युत्तर दिले नाही.
सुदैवाने मोदी सरकारच्या काळात ह्या अमन की आशा वाल्या भाजप नेत्यांना अडगळीत फेकून दिले गेले!

लेख आवडला, अभ्यासपूर्ण व रंजक आहे. Happy
आता लक्षात आले की मी लेखाएवढाच प्रतिसाद लिहून टाकला Happy

आज थिअटरमधे पाहून आलो. मला खूप आवडला. हिंसाचार, रक्तपाताचे काही वाटत नाही गॉट पाहिल्यापासून. जाट मधे तर 'आपने मेरी इडली गिरायी' म्हणत उगाचच केला आहे तसा येथे वाटला नाही. कथेमुळेच ते येत जातो, चित्रपटाचा प्रकारच ॲक्शनपट/ मारामारीचा आहे.

मला चित्रपट खूप स्ट्रेट फॉरवर्ड, किंवा लिनिअर वाटला. खूपच क्लीन मुव्हमेंट असलेली ॲक्शन आहे. अजिबात "क्लम्जी" नाही, रक्तपात असूनही एकदम स्पष्ट आणि स्वच्छ हालचाली आहेत. वेगवान आहे पण एंगेजिंग आहे. मला सर्वात जास्त रणवीरचेच काम आवडले. अक्षय खन्नाचे चांगले आहेच पण त्याची हाईप जास्त आहे. सोशल मीडिया वर सगळ्या रील्स त्याच्याच आहेत. घाऱ्या डोळ्यांचा रगेड, मधूनच हरवल्यासारखा , कव्हर उघडे पडू नये म्हणून सहन करणारा, योग्य वेळेची वाट पाहणारा, पटत नसतानाही सहभागी होणारा, प्रसंगी आपल्याच देशातील घातपात बघून अश्रू पुसून अतिरेक्यांसोबत जयघोष करणारा - असे अनेक पदर असलेली भूमिका आहे. त्यामानाने इतरांच्या वरवरच्या आहेत. अर्जुन रामपाल त्याला जे येते ते करतो, क्रूर भूमिका आहे. पण फार आव्हानात्मक नाही. त्यामानाने राकेश बेदीची लेयर्ड आहे, कारण तो कुणाचाच नाही आणि डायरेक्ट एक्स्ट्रीमिस्ट नाही. तो धूर्त राजकारणी आहे, तो आपली प्रतिमा स्वच्छ ठेवतो. त्याने कुठे कुठे विनोदही पेरला आहे. अक्षय खन्नाची भूमिका जाणूनबुजून अंडरप्ले करून क्रूर आणि धूर्त दोन्ही असलेला, मुरलेला महत्त्वाकांक्षी ड्रग आणि गन्सचा डीलरची आहे. बलोचचे गाणं आणि त्याची एंट्री ही तो बलोची आहे हे अधोरेखित करायलाच होती. बाकी तो तितका बलोची वाटला नाही. त्यापेक्षा रणवीर जास्त वाटला आणि तो तर नकली बलोची होता. या गरीब देशांत खायला नाही, शिक्षण नाही, आरोग्यसेवा नाही आणि टीनेजर मुलांच्या हातात बंदुका देतात.

१९९९ च्या हायजॅकच्या वेळी मी कॉलेजमध्ये होते. यातील सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या व अशातल्याच आहेत. २६/११ चा मनावर अतिशय वाईट परिणाम झाला होता, तेही कोरलेले आहेच. ह्या घटना यात ओवून कथा घडत जाते तरीही पूर्णपणे खरी नसेल. कारण मधल्या छोट्या गोष्टी तपशीलातल्या गोष्टी क्लासिफाईड असतात. धुरंधर प्रोजेक्टचा आणि मोहित शर्माचा काही संबंध नाही. तो धुरंधर प्रोजेक्ट सुद्धा खरा आहे का पेरलेला आहे कल्पना नाही. कारण एक हेर जे करू शकतो तो कुणीही ध्येयहीन, मरणाच्या रांगेत उभा गुन्हेगार करू शकेल - ते धैर्य तो पेशंस किंवा ती ट्रेनिंग आणून तडीस नेईल यावर माझा विश्वास बसला नाही. पण ते आता पार्ट टू मधे कळेल.

माधवनचे काम चांगले आहे. संवाद फार प्रभावी नाहीत. कमी शब्दांचे व सखोल अर्थ नसलेली वाक्यं आहेत. सारा अर्जुन नसती तरी चाललं असतं इतकं बिनमहत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तसं आवश्यक होतं कथेसाठी, पण सबस्टंस नाही. रणवीर तिला पबमधून पोलिसांपासून वाचवतो, सहा गाड्या ह्या मुलीच्या मागे. तो सगळा सीन अनावश्यक वाटला. तिला असेही आईवडिलांचा कंटाळा आला होता म्हणून ती प्रेमात पडलीच असती. इतके पावरफुल वडील मुलीला वाचवण्यासाठी काहीच करताना दिसत नाहीत. ॲक्शनपटांमधे हिरोईन्सना काहीच काम नसतं, हे पुन्हा आढळते. एकही भारतीय इंटेलिजन्स ऑफिसर स्त्री दाखविली नाही. एक सिक्युरिटी उगाच मरायला दाखविली. बाकी स्त्रियांच्या भूमिका अगदीच नगण्य आहेत. हे काही फार जुने नाही. त्यामानाने उरीमधे दाखवल्या होत्या, ते आवडले होते.

खूपच लांब आहे सिनेमा पण सतत ॲड्रेनेलिन रश देत राहतो. तुम्ही सतत फ्लाईट ऑर फाईट मधे जाता. खऱ्या घटना intertwined करून आठवण करून दिल्या आहेत, त्यामुळे तुम्ही आपोआपच कनेक्ट होता. देश म्हटले की आस्था येऊन आपोआपच तुमचं मन गुंततं ह्याचा फार छान - सायकॉलॉजीकल वापर करून घेता येतो. तो येथे खरं रेकॉर्डिग वापरून, खरे बोलणे ऐकवून केला आहे. Revenge is the strongest emotion ! तुम्हाला आपोआपच खिळवून ठेवते ती प्रोसेस. त्यामुळे त्रुटी असल्या तरी इमोशन तुम्हाला दूर जाऊ देत नाही. कन्व्हिक्शन आणि इमोशन दोन्ही असले की सत्याशी थोडीफार फारकत घेतली तरी चित्रपट एक निर्मिती म्हणून चांगला विकला जातो. ते आदित्य धरला एकदम चांगले जमले आहे. चित्रपट प्रोपोगंडा वाटला नाही कारण तुम्ही मनात काही प्रतिमा कलुषित करून येत नाही, निदान मला तरी तसं वाटलं नाही. ज्यांच्या कलुषित व्हायच्या होत्या, त्यांच्या अगोदरच आहेत. दहशतवाद्यांचे संवाद तसे असतीलही/ नसतीलही पण आपण आक्रमक होण्याची गरज नाही. ते तर अतिरेकीच आहेत, त्यांची मतं कशीही असू शकणार. विकृत मनोवृत्तीचे लोक कुणाबद्दल काय मतं व्यक्त करतात ह्याला आपण महत्त्व देऊ नये असं आपलं मला वाटलं. आपण आपल्या देशासोबत राहावे, धर्मासोबत नाही. धर्म नंतर! अतिरेक्यांची आणि आपली मूल्ये समांतर नकोतच की कुणी डिवचले की लगेच निघाले.

संजय दत्त तो नेहमी जसा असतो तसाच आहे. ती भूमिका त्याच्या दांडगेपणाला शोभून दिसते. अर्जुन रामपाल व हा मला फक्त लूक्स मुळे पर्फेक्ट वाटले. बाकी सगळं इतर सिनेमाची camaraderie सांभाळून घेते त्यामुळे त्यात खूप आव्हानात्मक काही नाही. त्यामानाने राकेश बेदी, रणवीरचे आव्हानात्मक होते. अक्षय खन्नाचे पण तितके नव्हते. त्या कॅरेक्टर्सना तितक्या छटाच नाहीत जितके त्याचे कौतुक होत आहे. अर्जुन रामपाल "ओम शांती ओम" सारखाच पण अस्वच्छ वाटला. कामं अर्थात चांगली आहेत.

क्लीन आणि रिफाईन्ड सिनेमा आहे. पॅकेज चकाचक आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी खटकत नाहीत कारण तुम्हाला तो अनुभव मिळतो ज्यासाठी तुम्ही थिएटर मधे जाता. मी एन्जॉय केला. गाणी विशेष नाहीत, मला फक्त 'शरारत' आवडलं. कारण ते थोडे ऑथेंटिक पाकिस्तानी वाटते, त्यामुळे पहायला छान वाटले. तमन्नाच्या आणि नोराच्या गाण्यांपासून फार वेगळे आणि ब्रेथ ऑफ फ्रेश एअर वाटले. माझ्या रिपीटावर आहे, पाठ झाले आहे. बाकी गाणी आपल्याला जागी ओरिजनल नसली तरी चपखलपणे येतात व नॉस्टॅल्जिया खेळवून जातात. पण ती कथेसोबतच येतात, कथेत ब्रेक येत नाही.

सध्या खूप क्रेझ आहे या चित्रपटाची, त्यामुळेच थिएटर मधे जाऊन पाहिला. थिएटर मधेच पहावा असा नक्कीच आहे. तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा भौगोलिक, सांस्कृतिक प्रदेश पहायला मिळतो हा माझ्यासाठी महत्त्वाचा पॉईंट होता. त्यामुळे चित्रपटात कुठेही तोचतोचपणा नाही. ती सगळी ट्रिटमेंट रिफ्रेशिंग आहे. मारामारीत काटेरी झाडांवर आपटणे, वेगळ्या वाळवंटी भागातील व्हेजिटेशन वगैरे पहायला आवडले. मला कायम माझ्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीतील लोक किंवा काहीतरी वेगळं पाहायला आवडतं, अगदी घरं, कपडे, भाषा, अन्नं, जमीन, झाडं, पद्धती काहीही - तो अनुभव यातही थोडाफार मिळाला.

एक लेखक यांनी फक्त ऋन्मेशजींसाठी दिलेली लिंक पाहिली. ध्रुव राठीने पुराव्यासहीत चिरफाड केली आहे.
सिनेमा आहे म्हणून पहा असे म्हणणार्‍यांच्या कानाखाली वाजवली आहे. धुरंधर बघणे सक्तीचे असेल तर ध्रुव राठीचा व्हिडीओ सुद्धा सक्तीचा हवा.
पण ध्रुव राठीच्या पलिकडे जाऊन बरेच प्रश्न उपस्थित होतात. ते या धाग्यावर नको.
https://www.maayboli.com/node/87539 इथे त्यावर बोलता येईल.

ऋन्मेष इथल्या अनेक आयड्यांपेक्षा जास्त प्रगल्भ आहेत. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे त्यांना समजते. त्यामुळे उघड टिंगल न करता ते सर्वांची भंबेरी उडवून देतात ते कमाल मनोरंजक असते म्हणून फक्त ऋन्मेषला कोट केले होते. याचा अर्थ तुम्ही पाहू नये असा होत नाही. तरी तुम्हाला तसे वाटले असेल तर तुम्ही सॉरी म्हणू शकता. Happy

अस्मिता, पोस्ट आवडली. चित्रपटातील धागे विलग करून काय आवडलं आणि मुख्य म्हणजे ते का आवडलं ही विचार प्रक्रिया सुरेख मांडली आहेस. त्यातील बहुतेक गोष्टी तशाच वाटल्या म्हणून मलाही आवडला हा चित्रपट.
प्रोपगंडा बद्दल: काहीसा प्रोपगंडा नक्कीच आहे वाटलं, पण तो खुबीने पेरलेला आहे. इतर चर्चा करता ही हा मुद्दा म्हणालेलो. अतिरेक्यांच्या संवादात तो घालणं मला एकदम स्मार्ट वाटलं. अतिरेक्यांत लॉजिक शोधणे हा मुळात वेडाचार, त्यामुळे तिकडे प्रोपगंडा फिट्ट बसला आहे.
मजा आली पाहिजे ला चेकमार्क मिळाल्याने विषय संपला.

>>> अस्मिता, पोस्ट आवडली. चित्रपटातील धागे विलग करून काय आवडलं आणि मुख्य म्हणजे ते का आवडलं ही विचार प्रक्रिया सुरेख मांडली आहेस
+१

मीही थिएटरमध्ये पाहिला, आणि एक काल्पनिक, बॅटमॅन/गॉथम सिटीटाइप सेटअप आहे असं ठरवून पाहिलं तर एन्टरटेनिंगही वाटला.

प्रॉपगन्डा आहे, आहेच. संवाद संन्यालांच्या तोंडी घाला किंवा अतिरेक्यांच्या - एकूण 'संभवामि युगे युगे' सरकार सद्रक्षणाय खलनिग्रहणाय कधीतरी येईल आणि 'हिंदूंना' (भारतीयांना नव्हे!) अच्छे दिन आणेल हा नॉट व्हेरी सटल टोन सिनेमाभर आहे, आणि सगळी वाटचाल नोटबंदी का आवश्यक होती आणि तो कसा मास्टरस्ट्रोक होता हे सिद्ध करण्याकडे सुरू आहे हे उघड दिसतं आहे.

इन्फिल्ट्रेशनचा फॉर्म्यूला सत्या वगैरेंसारख्या सिनेमांतून ओळखीचा झालेला तोच आणि तसाच आहे.

रणवीर सिंग आवडला मला. दिसतोही भारी आणि कामही चांगलं केलं आहे. इन्टेन्स.
अक्षय खन्ना अजून औरंगझेब मोडमध्येच आहे असं वाटलं आणि संजय दत्त मुन्नाभाई.

साराचं कॅरेक्टर दुसर्‍या भागात डेव्हलप झालेलं बघायला मला आवडेल (मला एकदम ओम्कारामध्ये करीनाचा बाप 'जो लडकी अपने बाप की सगी नहीं हुई वो किसी और से क्या वफा़दारी निभायेगी' असं काहीतरी म्हणतो त्याची आठवण झाली होती), तिने तिची स्वतःची काहीतरी अ‍ॅस्पिरेशन्स डेव्हलप/उघड केलेली बघायला आवडतील - पण त्याची शक्यता शून्य आहे! व्हॉट अ शेम!

बाकी ज्या खर्‍या घटना कथेच्या संदर्भात आल्या आहेत, (कंदाहार अपहरण, पार्लमेन्टवरचा हल्ला, २६/११) त्या पाहताना मात्र अजूनही तसाच त्रास होतो. स्लॅप इन द फेस!
ते बाय डिझाइन आहे - तेच सेन्टिमेन्ट कॅश करायचं आहे - हे कळूनही बघताना त्रास होतो. बाकीची लुटूपुटूची हिंसा त्यापुढे काहीच नाही.

थॅंक्यू तिघांना.
सेंटिमेंट तर कॅश केली आहेच, ते तर अध्याहृतच असते अशा चित्रपटांसाठी. आपण आपल्या देशातील घातपातापासून अस्पर्श्य राहूच शकत नाही. पण आपण त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायच्या.

नोटबंदी आणि त्या नोटांचे मेटल टेम्प्लेट विकणे हे पुढच्या भागात तपशीलवार येईल कदाचित. पण आदित्य धरला एवढ्या क्लासिफाईड गोष्टी माहिती असतील वगैरे वर विश्वास नाही. मला आदित्य विवेक अग्निहोत्रीचा लहान भाऊ वाटायचा एकेकाळी. पण हा चित्रपट चित्रपट जास्त होता म्हणून मी कॅन्सल केले नाही. दिग्दर्शकाची पॉलिटिकल, रिलिजियस मतं धारदार असली तरी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा/ खपावा वगैरे आर्थिक गणिते सांभाळली आहेत. आजकाल अजेंड्याशिवाय काहीही नसतं एवढं कळालं आहे. पण आपण काही संस्कारक्षम नाहीत, आपलं काहीच होऊ शकत नाही हे किती बरं आहे ह्या काळात! Happy हा पिक्चर जाऊन दुसरा येईल तो अजून डीपर इमोशन्सची खेळेल पण आपण आपल्या भावनांच्या ड्रायव्हिंग सीटवर दुसऱ्यांना बसू द्यायचं नाही. कंपार्टमेंटलाईज करायचं.

मला वाटत नाही सारा पुढेही काही दिवे लावेल, हा चित्रपट पुरुषांचाच आहे. त्यामुळे वावही नाही. सौम्या टंडनला सुद्धा एक दोन संवाद होते. पण भारतीय स्त्री सुद्धा दाखवली नाही याचं मला आश्चर्य वाटलं. सगळीकडे पुरुषच महत्त्वाचे होते.

पाकिस्तानातील इस्लामी विचारांचे गँग चालवणारे, राजकारणी, दहशतवादी, इस्लामी विचारांचे बलुच टोळीवाले, आय एस आय ह्या कोंडाळ्यात मोठ्या प्रमाणात स्त्रिया अधिकार पदावर नाहीत हे आश्चर्यच आहे! इस्लामी लोक तर स्त्रीला प्रचंड स्वायत्तता देतात ना? जस्ट किडिंग!

कदाचित आदित्य धरला स्त्री पुरुष समानता वगैरे वोक मुद्दे गौण वाटले असतील आणि शक्य तितके वास्तवाच्या जवळ जाणारी पटकथा दाखवावी असे वाटले असेल.
जे प्रेमप्रकरण दाखवले आहे तेही त्या हेराने व्यवस्थित योजना आखून आतल्या गोटात प्रवेश मिळवण्यासाठी केलेले नाटक आहे असा संशय येऊ शकतो.

अस्मिता, मस्त लिहीले आहेस. तुझ्या पोस्टमधले रणवीरच्या रोलचे वर्णन विशेषतः आवडले. रणवीर ऑटाफे असल्याने बघायचा आहेच. आणि थिएटर मधे बघितलेल्या बहुतेकांनी रेको दिला आहे. पिक्चर पाहिल्यावर अजून लक्षात येतील बरेच पॉइण्ट्स.

मूळ लेखही मस्त. "चॅप्टरीकरण" आवडले Happy पिक्चर बघून अजून लिहीन.

एकूण 'संभवामि युगे युगे' सरकार सद्रक्षणाय खलनिग्रहणाय कधीतरी येईल आणि 'हिंदूंना' (भारतीयांना नव्हे!) अच्छे दिन आणेल हा नॉट व्हेरी सटल टोन सिनेमाभर आहे, आणि सगळी वाटचाल नोटबंदी का आवश्यक होती आणि तो कसा मास्टरस्ट्रोक होता हे सिद्ध करण्याकडे सुरू आहे >>>> हो नोटाबंदी १००% मुख्य फोकस असणार पुढच्या सिनेमात. पण तेवढेच. बाकी अजून काय असू शकेल हे मला अजिबात कळेना. म्हणजे अच्छे दिन, घर मे घुसके मारनेवाले सरकार आले, पण दाऊद ला, मौलाना मसूदला पकडले, २६-११ चा बदला(?) घेतला असं फिक्शन म्हणुन दाखवू तर शकत नाहीत! मग घर मे घुसके कोणाला कसे मारलेले दाखवणार ? की त्यासाठी फिक्शनल टेररिस्ट घेणार ? Happy
बायदवे बायका नाहीत म्हणणार्‍यांनो - आदित्य धर ची बायको - यामी पुढच्या सिनेमात नक्की असणार कोणत्या ना कोणत्या युनिफॉर्म मधे असे आपले मला वाटते. Happy

'घर में घुस के' म्हणजे ऑपरेशन सिंदूर. आणि बनावट नोटा छापणार्‍या खनानी की कोण त्याची आत्महत्या.
यामीचं माहीत नाही, पण. हे एक इन्स्टावर दिसलं - धुरंधर आणि उरीमधलं कनेक्शन.

>>> कीर्ती कुल्हाडीचा नवरा होता?
नाव तेच वापरलं आहे. योगायोग की 'इश्क़ जला कर आया हूँ' म्हणजे तेच, काही कल्पना नाही.

नाव उगाच तेच वापरलं असेल. तो "धुरंधर" कशाला असेल ते तर उद्दीष्टहीन व देहदंडाच्या शिक्षेच्या रांगेतील गुन्हेगार आहेत म्हणे ना? तिचा नवरा तर एअरफोर्स मधेच होता ना!
चित्रपटाच्या छोट्या, छोट्या गोष्टींना एवढी प्रसिद्धी दिली आहे, फार जबरदस्त PR आहे. अक्षय खन्नाने लग्न का केले नाही, ओशो आणि विनोद खन्ना, सौम्या टंडनची चापट, रणवीरचे दमके दमके केस, त्या बारक्या पोरीचे- साराचे तेराशे ऑडिशन्स नंतर झालेले सिलेक्शन, यामीच्या भावाने केलेले ट्रेलर कट. रीळांनी व्यापून टाकले आहे पूर्ण फीड... अगदी अनावश्यक माहितीचा भडिमार सुरू आहे. बलोचचे इंट्रो म्युझिक तर पाणीपुरी पासून लग्नापर्यंत वापरत आहेत. Happy

सहज माहिती म्हणून - उद्दीष्टहीन व देहदंडाच्या शिक्षेच्या रांगेतील गुन्हेगार किलिंग मशिन म्हणून वापरणे हा ग्रे मॅन चा गाभा आहे. वाचले नसेल तर वाचा. धुरंधर एव्हढेच वेगवान आहे Happy

चित्रपटाच्या छोट्या, छोट्या गोष्टींना एवढी प्रसिद्धी दिली आहे, फार जबरदस्त PR आहे>>> हे सगळ फक्त माउथ पब्लिसिटीवरच चालु आहे, प्रॉड्क्शन मधे मुव्हिचा टाइम आणी खर्च खुप वाढला त्यामुळे ट्रॅडिशनल पब्लिसिटी केलिच नाहिये मुव्हिची..शोज मधे किवा पॉप्युलर सिटी इव्हेन्ट्मधे..
किबहुना पहिल्या आठवड्यापासून स्वतःला "किति ग बाई मी हुशार" समजाणार्‍या अनुपमा चोप्रा ,सुचारिता त्यागी, जर्मनितुन तोन्ड वेगाडत बोलणारा कुणितरी एक युट्युबर यानी मुव्हीला पाडायच् अस धरुन रिव्ह्यु टाकले होते..काही पेड पी आर नी मुव्हीला रणविरने कान्तारा मधल्या देवीची नक्कल भोवली( ते आचरटच होत) त्यामुळे रिकामे थीयटेरचे व्हिडोओही टाकले..
(अर्थात ते काय पर्सनल ओपिनियन/अजेन्डा असु शकत निदान लोक मुव्ही बघुन तरी ठरवतायत...न बघताच प्रोपागान्डा बेटावर जावुन येणारे महान आहेत.)
पण पब्लिकने इतका डोक्यावर घेतला मी माउथ पब्लीसिटीनेच धुवाधार चाललाय मुव्हि.
बाकी इन्स्टा फिडच बाबत सहमत, प्रत्येक हिट मोमेन्ट्,सॉन्गची एक स्टोरी आहे.

बलोचचे इंट्रो म्युझिक तर पाणीपुरी पासून लग्नापर्यंत वापरत आहेत >>>> Lol

स्लीपर हिट सारखे झालेले दिसते. सुरूवातीला खूप टीका ऐकली होती यूट्यूबवर - प्रपोगंडा म्हणून आणि पिक्चर काही खास नाही असेही. पण काही दिवसांतच लोकांनी स्वतः पाहून केलेली तारीफ ऐकू येऊ लागली.

बाजीराव, खिलजी, कपिल (८३), गल्ली बॉय, दिल्ली बॉय (बॅण्ड बाजा बारात), आणि दिल धडकने दो मधला अर्बन अपर क्लास मधला तरूण - भूमिकांचे वैविध्य आणि त्यात पूर्ण शिरणे - यात रणवीरला सध्या तोड नाही. मला डान्सेस मधे काडीचा इंटरेस्ट नसूनही बाजीराव मस्तानी मधला तो तंबूतला "दुश्मनची देखो जो वाट लावली" डान्स आणि रामलीला मधला तत्तड तत्तड - हे दोन्ही प्रचंड आवडतात. त्याची संवादफेकही अफलातून आहे. बॅण्ड बाजा बारात मधला दिल्ली/जाट अ‍ॅक्सेण्ट, दिल धडकने दो मधला उच्चभ्रू, ८३ मधले कपिलचे मोडकेतोडके इंग्रजी, आणि बाजीराव मस्तानी मधले क्लिअर मराठी प्रभाव जाणवणारे हिंदी.

समजा मॅकेनाज गोल्ड हा पिक्चर आजच्या काळात बॉलीवूडने बनवला. तो पण ओरिजिनल पेक्षा भारी. त्यातले संवाद पण चटपटीत, एआय चा वापर, व्हीएफएक्स हाय क्वालिटी असे सगळे समजा. स्टोरी तीच, पण हाताळणी अजून पॉलिश्ड. यात न्युडिटीच्या जागी गाणी टाकली , आयटेम साँग टाकले. पण शेवटी सोन्याची खाण दाखवून याची इंटेल मोदी सरकारने लपवून ठेवली होती, हे सोनं घेऊन ते परदेशात पळून जाणार होते असा एखादा सीन घुसडला आणि एजंट बिलंदर ते सोनं खाणीच्या खाली भुयार खणून गरीबांना वाटून टाकतो असा शेवट केला असता तर ?

धुरंदर थिएट्रात जाऊन बघितला. एकदा बघण्यासाठी आवडला. अक्षय खन्नाच्या कामाचं इतकं कौतूक का सुरू आहे हे अजिबात समजलं नाही! प्रत्येक सिनमध्ये ओठ मुडपून आणि डोळे किलकिले करून डायलॉग म्हणतो. आत्ता काहितरी भारी अ‍ॅक्टींग करेल, मग करेल म्हणत म्हणत साडेतीन तास गेले आणि सिनेमा संपला. ह्यापेक्षा चांगली अ‍ॅक्टींग त्याने दिल चाहता है मध्ये केली होती असाही विचार आला!

रणवीर सिंगने एकदम भारी काम केलं आहे. एकदम रोलमध्ये घुसला आहे. संजय दत्त अजिबात आवडला नाही, उगीच वाटला त्या रोलमध्ये. अर्जुन रामपालने अगदी लिमिटेड स्कोपमध्येही बरं काम केलं आहे. त्या बेदीने भारी काम केले आहे एकदम आणि उझैरचे काम करणार्‍यानेही! माधवन ठिकठाक.

बाकी प्रॉडक्शन कितीही चकाचक असलं तरी शेवटची मारामारी हातापायी झाल्याशिवाय बॉलिवूडला चैन पडत नाही. अगदी उरीतही हेच झालं होतं. अक्षय खन्ना, संजय दत्त आणि रणविरची शेवटची मारामारी एके४७, बंदुकी, पिस्तुल, चाकू आणि मग लाथा बुक्के अश्या मार्गाने जाते!

अक्षय खन्नाला जअअअरा जास्तच डोक्यावर घेतले जात आहे असे मलाही वाटले. पण तो अभिनेता आणि व्यक्तीही आवडत असल्यामुळे फार खटकले नाही.
सिनेमा यशस्वी होण्यचे मुख्य कारण वेगवान, खिळवून ठेवेल अशी कथा आणि उत्तम चित्रीकरण. दिग्दर्शकाचा सिंहाचा वाटा आहे. संगीताचा प्रभावी वापर. आणि थोडी वास्तवाची, घडलेल्या इतिहासाची झलक.
अनेक पाकिस्तानी युट्युबर ह्यातील चुका काढत आहेत. हा एक विनोदी चित्रपट आहे असे सांगत आहेत.
लोकांचे उच्चार. पेशावरचा उच्च्चार असा असतो तर तसा का केला?
रहमान डकैत ३५ वर्षाचा असताना मारला गेला मग ५० वर्षाचा अक्षय खन्ना कसा काय त्याच्या भूमिकेसाठी निवडला?
ल्यारी इतका मागास भाग असताना इतकी अ त्याधुनिक हत्यारे कशी काय बनताना दाखवली वगैरे वगैरे.

असे ऐकून आहे की पाकड्यांनी धुरंधरला चोख प्रत्युत्तर म्हणून मेरा ल्यारी नामक सिनेमा घोषित केला आहे.
मेरा ल्यारी हे अफाट नाव वाचून अर्धी लढाई पाकड्यांनी नावातच जिंकली ह्याची खात्रीच झाली! Happy Happy Happy

अस्मिता परीक्षण आवडले.

रणवीर माझ्या काही फार आवडीचा नाही. इथे मात्र मला आवडला.

आदित्य धरला एवढ्या क्लासिफाईड गोष्टी माहिती असतील वगैरे वर विश्वास नाही.
>>> अगदीच क्लासिफाईड गोष्टी नाहीत. १००% खऱ्या आहेत असं मी म्हणणार नाही पण इच्छुकांनी राजकीय थ्रिलर Who painted my money white by Shree Ayyar किंवा त्याचा मराठी अनुवाद 'विघ्नविराम' वाचा.

>>"अस्मिता परीक्षण आवडले. ">>
असेच म्हणतो 👍

@ फारएण्ड
तुमचे केवळ प्रतिसाद वाचुन माझे समाधान होणार नाही त्यामुळे मला प्रचंड आवडणार्‍या तुमच्या 'खास' शैलीत, स्वतंत्र लेखाच्या स्वरुपात ह्या चित्रपटाचे परिक्षण/समीक्षण लिहावेत अशी नम्र विनंती...

'जर्मन शेफर्ड' म्हणुन ओळखल्या जाणार्‍या टिनपाट युट्युबरचे दिशाभुल करणारे फालतु व्हिडीओज पहाण्यापेक्षा AKTK चॅनल वरचे भारद्वाज ब्रदर्सचे व्हिडीओज पहायला मला बरे वाटतात.
कालचा त्यांचा "How ADITYA DHAR Is Doing for India What SPIELBERG Did for Israel" हा व्हिडीओही चांगला आहे.

जर्मन शेफर्ड' म्हणुन ओळखल्या जाणार्‍या टिनपाट युट्युबरचे दिशाभुल करणारे फालतु व्हिडीओज पहाण्यापेक्षा >>> Proud
AKTK चॅनल वरचे भारद्वाज ब्रदर्सचे व्हिडीओज पहायला मला बरे वाटतात. Rofl

ध्रुव राठीने पारच उलटापालटा केलाय Biggrin

Pages