या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
माझ्यासाठी कल्पने पलिकडची
माझ्यासाठी कल्पने पलिकडची गोष्ट आहे>>> अगं ममो, प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी. त्या बाई विदेश वारी ला मिस करत अजून वयस्क झाल्या असत्या.. त्या पेक्षा त्या ती गोष्ट अचिव करू शकल्या, त्यांच्या मोबदल्यात चांदी ची अनेक वर्ष हात न लागलेल्या वस्तू विक्रिला काढल्या. मला प्रॅक्टिकल वाटते हे.
आता गुडघे दुखी/ साखर, कमर दुखी अनेक सोबती आहेत.
माझ्या ओळखीचे १ काका/काकू आहेत. खूप संपत्ती जमवली पण उपभोग नाही घेतला. आता हात पाय थकले. फिरून यायला हवे होते असे म्हणतात.
सगळ्यांचे अपडेट्स आवडले.
सगळ्यांचे अपडेट्स आवडले.
आपल्याही घरात आवराआवर करायची आहे याची आठवण होते. मध्ये मध्ये एकेक गोष्ट आवरते पण सातत्य ठेवता येत नाही.
अनिंद्य , तुम्ही कागदपत्रांबद्दल जे सांगितले ते फारच उपयोगी वाटतयं. माझ्या साबुंच्या काळापासूनची बिलं , रीसीट , कागदपत्रं पडून आहेत. जुनं लोखंडी कपाट , अर्ध फाईल्स आणि कागदपत्रे यांनीच भरलं आहे.
सगळ्यांची आवराआवर व निर्मूलन
सगळ्यांची आवराआवर व निर्मूलन उत्तम !
aashu29,
aashu29,
तुमच्या प्रतिसादावरून एक सुभाषित आठवले.
दानं भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति
दान,उपभोग आणि नाश. पैशाच्या / संपत्तीच्या बाबतीत या तीन गोष्टी घडतात. जो दान देत नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही त्यांच्या बाबतीत तिसरी गोष्ट घडते.
अवांतराबद्दल क्षमस्व.
… कपाट कागदपत्रांनी भरलं आहे…
… कपाट कागदपत्रांनी भरलं आहे….
आणि महत्वाचा / कामाचा कागद मागितला तर तो चार तास सापडणार नाही 😀
कहानी घर घर की.
अतिसंचयात हेच होतं. सगळेच “कामाचे कागद” मग “खरे” कामाचे कधीच पटकन सापडत नाहीत. कपड्यांचे पण हेच, खाण्यापिण्याच्या वस्तूंचेही सेम. अती साठले की उपभोग कमी, वेस्टेज जास्त. म्हणून आहे त्यातले सर्वोत्तम/ सर्वाधिक आवडीचे वापरावे, दुय्यम-तिय्यम प्रतिचे काढून टाकावे असे मी करतो.
नेहेमी आपल्या आवडीच्या आणि उत्तम वस्तूच वापरण्याचे सुख अद्वितीय असते, त्या संख्येने कमी का असेनात. Believe me, त्याने मिळणारा आनंद आणि वैभवाचे- श्रीमंतीचे फीलिंग is incomparable 🙂
अनिंद्य , तुमच्या सर्व पोस्ट
अनिंद्य , तुमच्या सर्व पोस्ट आवडल्या. मलाही त्या बाईंचे पूर्ण पटले. आहे त्याचा स्वतः उपभोग घ्यावा. पुढच्या पिढी ला आपल्या इतकी काही काही गोष्टी मध्ये attachment नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी विचारून ठेवून बाकीचे काढणे मला छान वाटले.
ऋतुराज, तुमच्या सुभाषिताशी सहमत !! नात्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत , त्यांच्याकडे उत्तम आर्थिक स्थिती आहे. मानसिक इच्छा पण आहे फिरण्याची , पण शरीर साथ देत नाही .
ऋतुराज, तुमचे उद्धरण शब्दश:
ऋतुराज,
तुमचे उद्धरण शब्दश: जगतो. मानवजन्म सजगपणे उत्तम भोग घेण्यासाठीच (आणि शक्य तितके, जमेल तेव्हढे दान करण्यासाठी) मिळालाय असे मानतो.
नाहीतर मनुष्य न होता घोडा-भुंगा-विंचू-मुंगळा नसतो का झालो ?
जुने दागिने , सोने नाणे चांदी
जुने दागिने , सोने नाणे चांदी याबाबतची attachment यावर वेगळा बाफ होईल.
मला बरेचदा वाटतं सोन्या चांदीचे किडूकमिडूक काढून 1-2 घसघशीत वस्तू घ्याव्यात. मला माझ्या साबानी , त्यांच्या आईने दिलेली एक बांगडी दिली आहे. अर्थातच ती locker मध्ये पडून आहे. क्वचितच घरच्या लग्नात घातली आहे. पण पुढे मागे ती मोडून काही करेन असं वाटत नाही , मनाची तयारीच नाही. या उलट , माझ्या आईने तिच्या लग्नात सासरहून मिळालेला बावनकशी सोन्याचा हार काही वर्षापूर्वी मोडला आणि आम्हा बहीणींना रोजच्या वापरासाठी एक एक bracelet बनवलं . " मी आताकाही तो वापरत नाही , माझ्या मागे तुम्ही पण घालणार नाही , उगाचच पडून कशाला ठेवायचा. त्यापेक्षा अस काही वापराल तरी " गेली चार पाच वर्षे ती bracelets सतत हातात आहे आमच्या. हार माझ्या वाट्याला आला असता तर मी कधीच मोडला नसता.
आवरते/ आवरतो पण सातत्य ठेवता
आवरते/ आवरतो पण सातत्य ठेवता येत नाही….
होय, हे सर्वांचेच होत असावे. उपलब्ध मोकळा वेळ, अन्य higher priority कामे, मूड, थकवा, बोअरडम, आळस, या कामाचे दडपण/ overwhelming feeling असे अनेक वाटघेणे-वाटमार टपूनच बसले असतात.
१५ ते ४५ मिनिटांचा स्लॉट ठरवून त्यात पूर्ण होईल इतकेच काम एकावेळी करणे हा उपाय मला कामी येतो. तितक्या वेळात एक कप्पा, एक bag, एक कपाट, एक टेरेस, एक ट्रंक… जे बसेल तेव्हढेच.
फक्त धुळीत हात घालायचा तर तोंडाला फडक्याच्या मुसक्या / मास्क आणि घाणीत- बागेच्या काट्याकुट्यात हात घालायचा तर हातात gloves ! नाही तर पुढचे कांड निस्तरण्यात वैतागवाडीची फुकट सहल हमखास घडते
झंपी यांचा “पसाऱ्याला दारातच अडवण्याचा” मुद्दा is a very powerful thought. पुढची उस्तवार, त्यापोटी मेहनत, द्यावा लागणारा वेळ कमी आणि पुढे होणारी अडगळही कमी.
… अनिंद्य, तुम्हच्या पोस्ट
… अनिंद्य, तुम्हच्या पोस्ट वाचून एक काहितरी खूप छान फिलिंग येते बघा…
यासाठी थँक्यू aashu29 !
मला चांदीची भांडी का उगाच
मला चांदीची भांडी का उगाच मोडली असं वाटलं ते सांगते.
आमच्या वडिलां कडे त्यांच्या पिढीजात चांदीची भांडी होती. ती इतकी वर्ष जुनी असल्याने असे घाट आता बघायला ही मिळणार नाहीत अशी होती. नेहमीची वाट्या भांडी, तांब्या वगैरे होतंच पण ट्रे, फ्लॉवर पॉट , मुलांच्या पाणी प्यायच्या झाऱ्या, ओगराळ, मोठं पातेल अश्या हटके गोष्टी ही होत्या. माझ्या लहानपणाच्या आठवणी ह्या भांड्यांशी ही फार जोडलेल्या आहेत.
पुढे माझ्या वडीलांना अनाथाश्रमाला दान देण्याचं वेड होतं त्यामुळे त्यांच्या सरत्या काळात त्यांनी ती भांडी विकून आलेले पैसे दान द्यायचं प्रपोजल मांडलं, ,"त्यांची इच्छा प्रमाण आणि आम्हाला काही नको " ह्या धुंदी त्यामुळे आम्ही ही त्याला दुजोरा दिला. आता आमच्याकडे ती भांडी नाहीत फक्त आठवणी आहेत, आणि त्या इतक्या स्ट्राँग आहेत की ओगाराळ्यासाठी मी जंग जंग पकडलं तरी मला नवं मिळालं नाही. तीच गोष्ट नातीच्या उष्टावणा साठी शोधलेल्या झारीची. ती भांडी पाहायला , हाताळायला न मिळणे ह्यात आम्ही खूप काही गमावलं आहे असं मला नेहमीच वाटत.
हल्ली तर मला असं वाटत की तेव्हा कसं ही करून तेवढे पैसे मी वडिलांना दिले असते तर सोनाराकडे जाण्या ऐवजी ती घरात राहिली असती, सगळ्यांनाच दर्शन सुख घेता आलं असत. माझ्या वडीलांना ते नक्कीच चाललं असत कारण ते प्रॅक्टिकल होते खूप आणि त्यांचं ध्येय ते पैसे डोनेट करणं हे होतं. मग ते सोनार देतोय की मी देतेय हे त्यांनी बॉदर केलं नसतं. पण तेव्हा हे सुचलं नाही आणि आता वेळ गेली आहे. असो.
चांदीची भांडी विकणे किंवा न विकणे ह्यात चूक बरोबर काही नाही प्रत्येकाचा दृष्टिकोन .
दागिने कधी कधी नाईलाजाने बदलावे लागतात , कारण साईज स्टाईल बदलते आणि वापरले जात नाहीत चांदीच्या भांड्यांबाबत हे होत नाही. असो.
>>>>> मुदत संपलेली औषधे, मलम,
>>>>> मुदत संपलेली औषधे, मलम, क्रीम यांची विल्हेवाट लावली.
कशी लावता?
इथे अमेरिकेत, फार्मसीत जाऊन टाकून देता येतात्/मेडिकल वेस्ट ची विल्वेवाट योग्य रीतीने लावावी लागते.
-----------
संपत्ती आपण उपभोगली नाही तर कोणीतरी दुसरे ती उपभोगतो.
ममो ताई,
ममो ताई,
भांड्यांच्या जुन्या घाटाबद्दल अगदी सहमत.
आताशा अशा घाटांची भांडी दिसत नाहीत कुठे.
@ मनीमोहोर,
@ मनीमोहोर,
तुमचा मुद्दा समजला. विशेष आठवणीची, यूनीक आणि खाशी सौंदर्यपूर्ण वस्तू असेल तर ही भावना मनात येऊ शकते.
.. तेवढे पैसे मी दिले असते तर सोनाराकडे जाण्या ऐवजी ती घरात राहिली असती….
असे प्रत्यक्ष होतांना बघितले आहे. पैतृक संपत्तीचे वाटप करतांना भावंडांची मते वेगवेगळी होती म्हणून त्यापैकी एकानी market rate प्रमाणे अन्य भावंडांना रोख पैसे देऊन विशिष्ट वस्तू थर्ड पार्टीला विकू दिली नाही, स्वत:कडे ठेवली. त्यात जीव गुंतला होता त्याचा.
हा angle थोडा वेगळा आहे पण असा विचार असू शकतो आणि तो अजिबात चुकीचा नाही. मूळ लेखातही क्रमांक ५ चा मुद्दा हाच आहे : जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे.
आपण भारतीय लोक सहसा सोनेनाणे-संपत्तीचे असे मुद्दे कुटुंबियांना सहभागी करूनच ठरवतो ही एक चांगली पद्धत आहे.
मला आठवलं कुठल पुस्तक
मला आठवलं कुठल पुस्तक वाचलेलं वरील लेखाशी मिळतं जुळतं.
ते खुपच मस्त वाटलं. निगेटीव भावना न्हवती त्यात.
इथे नाव देतेय,
“नोबडी वॉन्ट्स युअर शीट“
वाचा जर कोणाला आवड असेल तर..
कधी कधी माझ्या विरक्तीचा वेग
कधी कधी माझ्या विरक्तीचा वेग पाहिला की मलाच भीती वाटते. जगण्यातला रसच संपून जाईल की काय? पण गप्पा टप्पा, श्रमपरिहार अभक्ष भक्षण, अपेय पान, नेटॲडिक्शन अजून व आनंदात टिकून आहे. त्यामुळे तो धोका अजून तरी नाही.
कित्येक वर्षांचा जुना पत्रव्यवहार मी ठेवत आलेलो आहे. एखाद्याला पत्र पाठवले तर त्याची कार्बन प्रत माझ्याकडे ठेवतो.कधीतरी संदर्भ म्हणून उपयोगाला येतो. कधी कधी आयुष्यात आपणच आरोपी, आपणच फिर्यादी व आपणच न्यायाधीश असतो अशावेळी पुरावा म्हणुन ही कागदपत्रे उपयोगी पडतात. 3-4 वर्षांपूर्वी एक जुना कागदपत्रांच्या फायली नष्ट केल्या त्यात एक पुसट मजकुर असलेल्या कार्बनपत्राचा कागदही नष्ट केला. ज्यात त्रासदायक स्मृती होत्या. 35 वर्षांपुर्वीचा कागद नष्ट झाला पण स्मृती तशाच व तितक्याच ताज्या राहिल्या. स्वत:ला व इतरांना माफ न करता येण्याचा दुर्गुण माझ्यात आहे. उगीच ते पत्र नष्ट केले असे वाटत राहते कारण ते मला स्वत:च्याच आरोपपत्रातून मुक्ती द्यायचे.
असो. नुकतेच अनावश्यक असलेले प्रतिष्ठीत कपडे व अन्य बाबी आर क्यूब नावाच्या केंद्राच्या ठिकाणी देउन टाकले. आता स्वत:ला नष्ट करण्याचा विचार आहे. पण अजून वेळ आलेली नाही.
…Nobody wants your shit …
…Nobody wants your shit …
पुस्तकाच्या नावावरूनच लेखकाचा परखडपणा दृष्यमान होत आहे 😀
… विरक्तीचा वेग पाहिला की
… विरक्तीचा वेग पाहिला की मलाच भीती वाटते….
विरक्ती आणि जीवनरसनेचा/लिप्सेचा झुला आपण सर्वच झुलतो अधून मधून. Normal.
आपल्याला सर्वाधिक आनंद ज्यात मिळतो आहे त्याचा यथायोग्य उपभोग घेत रहाणे योग्य होईल असे वाटते.
…आपणच फिर्यादी व आपणच न्यायाधीश असतो…
एक निवाडा केल्यावर जजसाहेब दुसरी केस हातात घेत असतील ना ? पुनर्विचार फार तर एकदाच कारण सुप्रीम कोर्ट आहोत आपण.
गमतीचा भाग निराळा पण मुद्दा विचारणीय आहे तुमचा.
मला 'लिप्सा' शब्द फार आवडला
मला 'लिप्सा' शब्द फार आवडला आहे. याआधी कानांवरून गेला नव्हता.
लालसा म्हणतो आपण मराठीत, पण यात जो 'लिप्तते'चा / ती इच्छा मनाला चिकटून राहिल्याचा फील आहे तो 'लालसे'त नाही!
त्याचा साउंडही छान आहे!
(कुणाचं काय तर कुणाचं काय!
)
कुणाचं काय असेल तर...
कुणाचं काय असेल तर...
आजच एका व्हॉअॅ फॉर्वर्ड मध्ये एक विड्यू आलेला आणि तो चक्क मला पटला. त्यात एक शिष्य गुरूला विचारतो की डिटॅचमेंट म्हणजे काय? तर गुरू त्याला वाडगाभर छान तुपात निथळणारा शिरा खायला देतो. शिष्य खातो. मग गुरू म्हणतो तुझ्या हाताला ते शिर्यातलं तूप लागलं आहे ते हात स्वच्छ धुवून ये. शिष्य हात धुवून येतो. मग गुरू म्हणतो की आता तो शिरा खाताना जीभेला ही सगळं तूप लागलं असेल तर साबणाने ती जीभ पण धुवून ये. शिष्य हसतो आणि म्हणतो की जीभेला लागलेलं शिर्याबरोबर पोटात गेलं.
गुरू म्हणतो हीच डिटॅचमेंट. सर्वसंगपरित्याग ही डिटॅचमेंट नाही तर त्या क्षणात राहुन, जगुन त्या परिस्थितीचा पुरेपुर आनंद घेणे जसा जिभेने चवीचा घेतला आणि तो घेऊन झाला की परत निर्मळ रहाणे जुन्या इच्छेत चिकटुन न रहाता नव्याचा परत तसाच आनंद घेणे हीच डिटॅचमेंट.
>>> परिस्थितीचा पुरेपुर आनंद
>>> परिस्थितीचा पुरेपुर आनंद घेणे आणि तो घेऊन झाला की परत निर्मळ रहाणे
हे मस्त आहे.
त्या सुंदर तरुणीला खांद्यावरून नदीपार करून देणार्या शिष्याची आठवण झाली. (त्यात त्याने पुरेपूर आनंद घेतला की काय ते सांगितलं नव्हतं
, पण तिला खांद्यावरून उतरवल्यावर तो त्या अनुभवातून अलिप्त झाला होता.
)
सॉरी अनिंद्य, फार अवांतर झालं इथे. थांबते.
स्वाती, लिप्सा आणि लालसा च्या
स्वाती, लिप्सा आणि लालसा च्या अर्थछटा सुंदर सांगितल्या तुम्ही. I spot a word genius
आनंद आणि अलिप्तता (पोस्ट आनंद) 😂
अमितव,
शिरा शब्द वाचला आणि पुढचे काही न वाचता लग्गेच शिरा करायला घेतला. झटपट मनोकामनापूर्ती.
इच्छेचे वैपुल्य आणि सुग्रासाचे सौकर्य … (शिऱ्यात जेवढे बदाम नाही घातले तेव्हढे जड शब्द इथे घातले मी 😂 )
खा खा! बदाम घातलेला शिरा खा!
खा खा! बदाम घातलेला शिरा खा!
मी पण रात्री करेन आता. 
शिऱ्यात बदाम हे लिप्सेचे होते
शिऱ्यात बदाम हे लिप्सेचे होते का?
अमित, त्या गोष्टीत शिष्य पुढे म्हणतो की जिभेचे तूप लाळेत एकजीव होऊन जाण्यासाठी मी तोंड न धुता तसेच ठेवले म्हणून ती लाळसा... आपलं... लालसा. पण माझ्या लिप्सवर लागलेलं तूप मला आणखी काळ चाटून खाता यावं म्हणून मी तसंच ठेवलं, ती म्हणजे लिप्सा.
दंडवत स्वीकारावा!
हर्पा!! खूपच हुशार आहात!!!
हर्पा!!
खूपच हुशार आहात!!!
..... लाळसा... आपलं... लालसा.
..... लाळसा... आपलं... लालसा. पण माझ्या लिप्सवर लागलेलं ... 😀
And I spot yet another word genius ! 👍
Pages