पाकिस्तानशी "आवर्जून आणि ठरवून" क्रिकेट खेळणे गरजेचे आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2025 - 05:33

गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.

हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.

उदाहरणार्थ, आशिया कपमध्ये सहा संघ असल्यास तीन तीन संघांचे दोन ग्रुप बनवले जातात. ज्यात भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात तर उर्वरित तिसरा संघ दुबळा असतो. दुसर्‍या गटात लंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असतात. परीणामी पुन्हा हे दोघे भाऊ पुढच्या राऊंडला जाऊन पुन्हा सुपर फोर मध्ये अजून एक सामना आपसात खेळतात. दोघे फायनलला पोहोचले तर दोघांना आपसात खेळायची तिसरी संधी मिळते. यावेळी आठ संघ आहेत त्यामुळे दोन्ही गटात अजून एक दुबळा संघ वाढला आहे. पण भारत-पाकिस्तान जोडी कायम आहे.

ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपला १६ संघ असल्यास त्यांचे चार ग्रूप बनवतात. त्यात ८ प्रमुख संघांपैकी २-२ संघाच्या चार जोड्या बनवून त्यांना एकेका ग्रुपमध्ये टाकतात. भारताची जोडी नेहमी पाकिस्तानसोबतच असते. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील काही वेगळे चित्र नसते. स्पर्धेत आठ संघ असो किंवा सोळा, त्यांचे दोन ग्रूप बनवा किंवा चार, पण भारत-पाक जोडी फुटणार नाही याची काळजी घेतली जाते.

नुकतेच चॅम्पियन ट्रॉफी झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवली गेली. पण आपण पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नव्हतो म्हणून आपले सामने दुबईला ठेवले होते. निदान तिथे तरी दोघांना वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवावे. पण नाही, तत्व म्हणजे तत्व!. तिथेही भारत पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये ठेवले आणि यजमान पाकिस्तान आपला देश सोडून भारताशी खेळायला दुबईला आला. सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट फिरत होत्या की बघा आम्ही किती शक्तिशाली आहोत जे यजमान संघाला आपला देश सोडून यायला भाग पाडले. पण प्रत्यक्षात ही आपली देखील लाचारी आहे असेच वाटत होते. आपल्याला सुद्धा त्यांच्याशीच खेळायचे असते. कारण हे सारे सामने नेहमी वीकेंडला प्राईम टाईमवर ठेवून, आणि यांची भरमसाठ जाहिरात करून बक्कळ पैसा कमावला जातो.

जगात सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला पैश्याची तितकी निकड असावी असे वाटत नाही. कारण माझ्या वाचनात आले त्यानुसार, "भारतीय कायद्यानुसार बीसीसीआय ही एक धर्मादाय संस्था मानली जाते, त्यामुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयला आयकर भरावा लागत नाही." - चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

पण मग काय ती अशी लाचारी असावी जे देशप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला दुय्यम लेखत अगदी ठरवून पाकिस्तानसोबत सामने खेळले जातात. कि असे काही आहे जे कितीही पैसा का असेना, हाव काही सुटत नाही.

आणि असे असल्यास मग स्वतःचे पोट भरणार्‍या कलाकारांनाच तेवढे टार्गेट का करायचे?
त्यांना वेगळा नियम आणि क्रिकेट बोर्डाला वेगळा नियम कश्याला? तिथे कोण असे सरकारचे जावई बसले आहेत?

चला भारत-पाक क्रिकेटवर बहिष्कार घालू नका. आयसीसी स्पर्धांमध्ये ते आपल्या ग्रूपमध्ये बिलकुल नको असाही हट्ट धरू नका. पण किमान रँकिंगनुसार जर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये येत असतील तर खेळा, आणि शेड्युलनुसार कुठल्याही वीकडेला खेळा. असे ठरवून एका ग्रूपमध्ये राहून, आणि या भारत-पाक सामन्याची जाहिरात करून, त्याला प्राईम स्लॉट आणि महत्त्व देऊन त्यातून पैसा तरी कमावू नका. हि सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी केलेली सामन्यांची फिक्सिंग आहे.

एकीकडे संपूर्ण जगाने पाकिस्तानवर बहिष्कार टाकून आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असणारा भारत, स्वतः मात्र साधे क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालू शकत नाही? किंबहुना दोघे जास्तीत जास्त कसे खेळले जाईल हेच उलट बघतो. त्यासाठी सेटींग करतो आणि पैसे कमावतो. मग कोण सिरियसली घेणार आपल्याला?

पेहेलगाम नंतर आजही सीमाभागात चकमक होत आहेत. समोरील बाजूने हल्ले होत आहेत. आपला विरोध पाकिस्तानी जनतेला नाही. परंतु क्रिकेटचे निर्णय घेणारे पाकिस्तानी सैन्य अधिकारी सीमेवर गोळीबार करण्याचे आदेश देतात. त्यामुळे अशा लोकांना विरोध व्हायला हवा जो देशहिताच्या भावनेतून योग्यच आहे. आपल्या देशातील सरकार जर बीसीसीआय वर दबाव न आणता केवळ पैशाकडे पाहत असेल तर त्यांचे पण कान टोचावे लागतील. कि त्यांचा वाटा त्यांना पोहोचतो म्हणून शांत आहेत?

राजकीय दृष्ट्या जरी विचार केला तरी यातून आर्थिक फायदा दोन्ही देशांना होत असेल. पैश्याची गरज आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. आपण हे सामने खेळून त्यांनाच आर्थिक मदत करत आहोत. म्हणजे फिरून आपणच दहशतवाला पैसे पुरवत आहोत आणि पोसत आहोत. सामान्य जनतेला वेगळे भावनिक आवाहन करायचे आणि आपण मात्र आपला स्वार्थ बघायचा हे धोरण चुकीचेच नाही तर कमालीचे दुटप्पी वाटते.

मध्यंतरी निव्रुत्त क्रिकेटरच्या एका स्पर्धेत आपला भारतीय संघ पाकिस्तान सोबत खेळला नाहीत. चक्क सेमीफायनल सोडून स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा आफ्रिदीसारखे काही पाकिस्तानी क्रिकेटर वल्गना करत म्हणालेले की अश्या बिनमहत्वाच्या स्पर्धाना तुम्ही देशप्रेमाचे नाटक कराल, पण नंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये तुम्ही झक मारत आमच्याशीच खेळायला याल. त्यांचे ते विधान कितीही उद्दामपणाचे वाटले तरी ते बोचरे सत्य होते आणि हे लपलेले नाही.

ईतरांचे माहीत नाही. पुढचे माहीत नाही. पण या स्पर्धेपुरते तरी मी या दोन देशातील सध्याची परीस्थिती पाहता या ठरवून खेळले जाणार्‍या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकून न बघायचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी असा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आपले सरकार घेईल तो सुदिन!

धन्यवाद,
- एक सामान्य भारतीय क्रिकेटप्रेमी नागरीक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> सूर्यकुमार आणि भारतीय संघाने जे केले ते सर्वसाधारणपणे बहुतांश लोकांना आवडले आहे.

एखादे लहान मूल चालताना स्टूल ला अडखळून पडले तर आपण 'अलेले लागलं बालाला ! ललू नको, आपण स्टूल ला मालू हं ' असे म्हणून स्टूल ला एक दोन बुक्क्या मारतो असे आहे हे, 'अलेले ललू नका आपण त्यांच्याशी शेक हँद कलनाल नाही '

माझ्यामते या प्रकरणात खेळाडूंची काही चूक असलीच तर ती अगदी  नगण्य आहे. ते बीसीसीआय सोबत कराराने बांधील आहेत. त्यांच्याकडे फार फार तर 'मी हा सामना खेळणार नाही' असा वैयक्तिक पवित्रा घेऊन करारामधील नियमांचा भंग केल्याने होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याचे स्वातंत्र्य होते. मुदलात इथे उघड चुक बीसीसीआयची आणि त्यांना तसे करण्यास भाग पडणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाची आहे, ज्याची मुळं आयसीसीचे प्रेसिडंट असलेल्या जय शाह आणि त्यायोगे मोदी व अमित शाह यांच्यापर्यंत पोहचते. 

आयसीसीच्या नियमावली नुसार अन्स्पोर्टमनशिप बिहेव्हियरसाठी दंडाची तरतूद आहे. भारतीय संघाचे आणि कप्तानाचे पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलनाला नकार देणे हे आयसीसीच्या नियमावलीच्या आर्टिकल २.२० खाली अन्स्पोर्टमनशिप बिहेव्हियर ठरते. (Article 2.20: Conduct that is contrary to the spirit of the game )आत जय शाह हे आयसीसीचे प्रेसिडंट असून देखील भारतीय संघावर या नियमानुसार कारवाई होऊ देणार नाहीत हे तर उघडच दिसते आहे.

सामना खेळले नसते तर तो निर्णय "पाकिस्तान"विरूद्ध असला असता. हस्तांदोलन केले नाही हा निर्णय "खेळाडूं"विरूद्ध झाला. राग होताच तर खेळायचेच नव्हते. निदान बाणेदारपणा दिसला असता. बाकी मॅचेस जिंकून कप जिंकता आला असता. आणि पुन्हा फायनलला तेच आले असते तरी तोच निर्णय पुन्हा घेऊ शकले असते. आणि नसता जिंकला आशिया कप, who cares! मागच्या ७-८ वर्षांतले आशिया कप कोणी जिंकले हे बहुतेकांच्या लक्षात नसेल.

मात्र खेळून हरले असते तर पूर्ण नाचक्की झाली असती. निदान तेवढे झाले नाही. यात खेळाडूंवर रोख नाही. आपण जेथे करीयर करतो तेथील सिस्टीमविरूद्ध जाणे सोपे नसते. पण उगाच हस्तांदोलन न करण्यात काही अर्थ नव्हता. विजय सैन्याला अर्पण करणे इतपत ठीक आहे.

हस्तांदोलन केले नाही हा निर्णय "खेळाडूं"विरूद्ध झाला.
>>>>>

पहिल्यांदा वाचताना हे पटकन योग्य वाटले. पण थोडा खोलवर विचार करता जाणवले त्या खेळाडूंशी काही यांचे वैयक्तिक वैर नव्हते. ते पाकिस्तानला रिप्रेझेंट करत होते. त्यामुळे त्यांच्याशी हात न मिळवणे देखील पाकिस्तानशी संबंध नको हाच संदेश जातो.

खेळलेच नसते तर हा संदेश अजून चांगल्या प्रकारे गेला असता
पण ते त्यांच्या हातात नसावे. म्हणून त्यांनी ते केले जे त्यांच्या हातात होते. म्हणजे हात न मिळवणे.

हात न मिळवणे देखील पाकिस्तानशी संबंध नको हाच संदेश जातो.>>> जर आपण खेळलो नसतो तर हाच संदेश अजून जोरदारपणे गेला असता ना.
सोडवत ही नाही आणि धरवत नाही, म्हणून या कोलांट्या उड्या,
खेळून आपण सैन्याचा आणि पहलगामच्या व्हिक्तीम्सचा अपमान करत आहोत असे वाटत नाही का?

हस्तांदोलन न करण्याचा निर्णय खेलाडूंनी आपल्या पातळीवर घेतला असणे अशक्य आहे. त्यांना 'वरूनच' तसे आदेश आलेले असणार.

मी सामना प्रत्यक्ष पाहिला नाही, पण कुठलेही रील्स आले नाहीत म्हणजे आपण विनाकारण शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाणे, बीमर टाकणे – असे कोणतेही प्रकार केले नसावेत, हे स्पष्ट दिसते.
टॉसच्या वेळी सूर्या हात मिळवायला पुढे गेला नाही, पण पाकिस्तानी कर्णधारानेही तसा प्रयत्न केलेला नव्हता.

सामना संपल्यानंतर हात मिळवणे हा क्रिकेटच्या कोणत्याही अधिकृत नियमात नाही. वरती कुणीतरी Article 2.20 चा उल्लेख केला आहे, पण त्यातही असा स्पष्ट उल्लेख नाही. त्याशिवाय, सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू पूर्णपणे बाहेर आलेच नाहीत. म्हणजेच, पाकिस्तानी खेळाडूंनी हात पुढे केला आणि आपले खेळाडू खिशात हात घालून उभे राहिले – असा प्रकार झालेला नाही. जर तसं घडलं असतं, तर मात्र तो कदाचित Article 2.20 चा भंग ठरला असता.

तात्पर्य: भारताने फक्त सामन्यातच नव्हे तर सामन्याआधी आणि नंतरही योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली. Well done सूर्या आणि टीम!

आता उरलेला मुद्दा एवढाच – पाक कर्णधाराणे post-match presentation ला गैरहजेरीसाठी कोणते कारण दिले, आणि ते कारण नियमांनुसार ग्राह्य नसेल तर ICC कडे तक्रार करण्याची गरज आहे

PCB chairman Mohsin Naqvi has demanded the "immediate removal" of Andy Pycroft, the match referee for the India vs Pakistan game on Sunday evening in Dubai, from the remainder of the Asia Cup.

The demand from Naqvi, who is also the current president of the Asian Cricket Council (ACC), came a day after the PCB had alleged that Pycroft had "requested the captains not to shake hands at the toss" as is customary.

The BCCI, meanwhile, are the official hosts of this Asia Cup, and might be required to play a part in the matter too

https://www.espncricinfo.com/story/asia-cup-ind-vs-pak-pcb-chief-mohsin-...

रात्रीचे चांदणे +७८६
छान परिस्थिती हाताळली कुठलाही ड्रामा न करता.

पाक कर्णधाराणे post-match presentation ला गैरहजेरीसाठी कोणते कारण दिले
>>>>>
अच्छा हा पण सीन झाला का आणि असा झाला का?
मी आज एकीकडे वाचले की मुद्दाम पाक कर्णधाराला प्रेझेंटेशनला बोलवले नाही Happy

<<मी आज एकीकडे वाचले की मुद्दाम पाक कर्णधाराला प्रेझेंटेशनला बोलवले नाही >>

----- मस्त धडा शिकवला.
या कृतीमुळे पहलगाम पीडितांना न्याय मिळाला?

BCCI , पर्यायाने GOI च्या आदेशावरून गपगुमान क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंना सामना जिंकल्यावर अचानक पाठीचा कणा आला आणी त्यांनी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला असे समजणे भाबडेपणाचे आहे.

घ्या. पाकिस्तान म्हणतंय मॅच रेफरीनेच दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करू नका असं सांगितलं. स्पर्धेचा यजमान बीसीसीआय. आयसीसी प्रमुख अमित शहांचा मुलगा. वरच्या लेखात म्हटलंय तसं प्रत्येक स्पर्धेत भारत पाकिस्तानला एका गटात टाकण्याइतकी आणि त्यांचे सामने सुटीच्या दिवशीच ठेवण्या एवढी पॉवर बीसीसीआयकडे आहे. अमित शहा तर म्हणालेच आहेत की पाकिस्तानलाच आय सीसी बाहेर काढू शकतं, एवढी ही पॉवर.
वर एका प्रतिसादात म्हटलंय की पाकिस्तानी खेळाडू वा कप्तानही हस्तांदोलन करायला आले नाहीत. म्हणजे हा सुद्धा हेडलाइन मॅनेजमेंटचा प्रकार.

सगळ्या पेपरांनी हेडलाइन छापली हस्तांदोलनाला नकार, खेळापेक्षा या सगळ्याचं वर्णन अधिक.

आणि आम्ही बावळट्ट लोक खुष होतो की हस्तांदोलन नाकारून पाकिस्तानची जिरवली, पहलगाम मृतांना श्रद्धांजली दिली.

काल बहिष्कार बहिष्कार म्हणून बोंबलणारी चॅनेल्स आणि सो कॉल्ड फॅन्स आज हस्तांदोलन नाकारलं म्हणून नाचताहेत.

उदय,

त्या पीडितांना न्याय मिळावा यासाठी काय व्हायला हवे ते कृपया वेळ होईल तेव्हा लिहा.

चँपियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळली गेली. पण भारताला पाकिस्तानात खेळायचं नाही, म्हणून भारताचे सामने दुबईत खेळवले गेले.
दुसर्‍या कोणत्या देशाचे असे लाड पुरवले गेले असते का?

समजा ही स्पर्धा भारतात असती आणि पाकिस्तानने म्हटले असते, आम्ही भारतात खेळणार नाही, तर आयसीसीने ऐकलं असतं?

पाकिस्तान यजमान असूनही अंतिम सामन्यानंतरच्या समारंभाला त्यांच्या प्रतिनिधीला बोलावलं नाही. तेच बीसीसीआयचे लोक मात्र काही संबंध नसताना तिथे होते.

"समजा ही स्पर्धा भारतात असती आणि पाकिस्तानने म्हटले असते, आम्ही भारतात खेळणार नाही, तर आयसीसीने ऐकलं असतं?" - ही स्पर्धा भारतातच होणार होती. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान भारतात खेळण्यावरून साशंकता निर्माण झाल्यामुळे, ती यूएई मधे हालवण्यात आली.

एशियन क्रिकेट कौन्सिलचा चेअरमन पाकिस्तानी आहे जर भारताने एशिया कप जिंकला तर त्याच्या कडून स्वीकारावा की नाही?

भारत एशिया कप जिंकला तर नक्कीच स्वीकारावा. आंधळा विरोध काही कामाचा नाही. उगाच कायद्याच्या कचाट्यात सापासून स्वतः च नुकसान करुण घेण्यात काही फायदा नाही. फार फार तर कॅप्टन ऐवजी दुसऱ्या खेळाडूला किंवा सपोर्ट स्टाफ ला पाठवण्याचा पर्याय असू शकतो.
पण महत्वाचं म्हणजे भारतीय संघाने चांगल खेळून आशिया कप जिंकला पाहिजे. भारतीय संघाने त्याच्या वरच फोकस ठेवला पाहिजे.

क्रिकेट हा माझा विषय नाही.
पण जेव्हां कुणी मसाला फिल्म्स बद्दल नाकं मुरडतात, तेव्हां त्यांना पब्लीकची डिमांड म्हणुन यंव करावं लागतं, श्रीमंती दाखवून त्यंव करावं लागतं असं त्या इंडस्ट्रीचा महत्वाचा घटक असल्याने ज्यांच्याकडून अधिकारवाणीने सांगितलं जातं, त्यांना पण कुणी तरी पब्लीकची डिमांड म्हणून असे सामने खेळावे लागतात हे प्रेमाने सांगावं आणि त्यांनीही आनंदाने ऐकून घ्यावं.
फिल्म ही इंडस्ट्री आहे , एखादा पिक्चर चालला तरी मला आनंद होतो असं म्हणणारे नक्कीच त्या इंडस्ट्रीचा आधारस्तंभ असू शकतात. तर मग
क्रिकेट वर सुद्धा अनेकांची पोटं भरतात असं काही जण बोलतातच कि.
आमच्यासारखा मूढांना हे दोन्ही देवासमानच !

फेरफटका, मी ते चँपियन्स ट्रॉफीबद्दल लिहिलंय.
आणि एशिया कपसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात यायला द्यायची भारताची तयारी होती का? पहलगामनंतर पाकिस्तानी कलाकारांचे फेसबुक इन्स्टा अकाउंट बॅन केलेत . (जसं गलवाननंतर टिकटॉकवर बंदी घातली होती Wink )

--
इथे बहिष्काराची ऑड इव्हन स्कीम सुरू आहे.
सामना व्हायच्या आधी बहिष्कार.
सामना चालू असताना गपचूप स्कोर बघायचा. मग हस्तांदोलनावर दळण दळायचं आणि ऊर फुगवायचं.
अरे जरा संतोष जुवेकर सरांकडून शिका. मी त्या सामन्याकडे , त्याच्या बातम्यांकडे बघितलंही नाही असा बाणा हवा.

आपले अमित शहा पुत्र आयसीसीचे बॉस असताना चषक पाकिस्तान्याकडून स्वीकारायची भीती कशाला? आता चँपियन्स कपला पाकिस्तान यजमान तरी त्यांनाच समारंभातून गायब केलं आणि अमित शहापुत्राने ट्रॉफी दिली. आता ऑड इव्हन नियमानुसार जरी एसीसीचा अध्यक्ष पाकिस्तानी असला तरी यजमान बीसीसीआय म्हणून राजीव शुक्लांच्या हस्ते ट्रॉफी द्यायची. आणि समजा पाकिस्तान्याच्या हातूनच ट्रॉफी मिळत असेल तर ट्रॉफी घ्यायची. हस्तांदोलन करायचं नाही. Wink

भारत पाक सामन्यातून पैसे कमवायचे झाल्यास स्पर्धेत पाकिस्तान सुद्धा खेळणे गरजेचे आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारतात येण्यास धोका वाटत असल्यास त्यांचे सामने किंवा पूर्ण स्पर्धा दुसरीकडे हलवण्यावाचून पर्याय नाही.

क्रिकेटर बद्दल वाईट वाटत आहेत.
खेळावे की न खेळावे हा निर्णय त्यांच्या हातात नाही. पण त्यांनी बहिष्कार टाकावा अशी अपेक्षा करणारी जनता त्यांना सुद्धा शिव्या घालणार ज्या फक्त बोर्ड आणि सरकारला पडायला हव्यात.

हस्तालोंदन न करायचे निर्णय सुद्धा त्यांचा स्वतःचा होता की नाही कल्पना नाही पण ज्यांना तो पटला नाही ते थेट शिव्या त्यांनाच घालणार.

तसेच पैश्यासाठी सामना खेळले आणि आता हात न मिळवायचे नाटक करत आहेत म्हणून शिव्या घालणार.

आणि तो निर्णय खरेच त्यांचा स्वतःचा असला तरी त्यात काही गैर नाही. कारण प्रशासनाची इच्छा असल्यास खेळणे गरजेचे होतेच. पण निदान पुढच्या कृतीने आमच्या भावना सुद्धा इतर भारतीयपेक्षा वेगळ्या नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. स्वताला त्यांच्या जागी ठेवून विचार केला तर हे बरोबर वाटते. त्यांनीही असाच विचार केला असावा असे वाटते.

अन्यथा हात मिळवले असते तरी काही हसत हात मिळवतानाचे फोटो वायरल होत त्यांनाच शिव्या पडल्या असता.

एंड ऑफ द डे ते काहीही करोत आणि त्यामागे त्यांचा स्वतःचा निर्णय असो किंवा नसो, शिव्या खायचे काम तेच करणार.

तो धागा सुद्धा वर काढतो वाचनासाठी..
परिस्थिती काही बदलली नाही. तेव्हाही सरकारचे धोरण त्यांच्या सोयीने आणि दुटप्पी होते ज्याचा फटका कलाकार आणि खेळाडू यांनाच पडतो.

खेळाडू हे केवळ प्यादे आहेत.

त्यांना शिव्या घालणारे अज्ञानातून किंवा मग ज्यांना खरेच शिव्या घालायला हव्यात त्यांना घालण्याची इच्छा म्हणा किंवा धाडस म्हणा, नसल्याने घालत आहेत.

शेवटी हा एक खेळ आहे, भारताचे ११ व पाक चे ११ लोक खेळतात. त्यात भारत जिंकला तर फार मोठी अचिव्हमेंट आहे असे नाही , हरला तरी फार काही अपमानास्पद नाही.

मागे एकदा अशाच कोणत्या तरी टूर्नामेम्ट मध्ये भारताने पाक वर मात केली होती तर मुंबईत टीम चा सत्कार केला गेला , स्टेज वर अर्थातच राजकीय नेते पहिल्या रांगेत व खेळाडू मागे होते. गृहमंत्री आर आर पाटील यांनी अफझलखान चा कोथळा कसा काढला होता त्याचे पाल्हाळ लावले.

जो सर्वसामान्य माणूस आहे त्याने त्याला ज्यात आनंद मिळतो त्या गोष्टी कराव्यात. विनाकारण देशभक्तीचा अतिरेक करू नये. त्याच्या बघण्याने न बघण्याने काही एक फरक पडत नाही. त्या मॅचचे हक्क आधीच विकले गेले होते, मोठ्या लोकांचे खिसे आधीच भरले होते. कॉम्प्रमाईझ करणार सामान्य माणूस. एकतर त्या बिचाऱ्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण मोजकेच येतात. हीच गोष्ट दिवाळीची. चीनी कंदील पणत्या घेऊ नका. त्या आधीच देशात आलेल्या असतात, भरणाऱ्याचे खिसे आधीच भरले असतात पण भोगणार सर्वसामान्य.

Pages