गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.
हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.
उदाहरणार्थ, आशिया कपमध्ये सहा संघ असल्यास तीन तीन संघांचे दोन ग्रुप बनवले जातात. ज्यात भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात तर उर्वरित तिसरा संघ दुबळा असतो. दुसर्या गटात लंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असतात. परीणामी पुन्हा हे दोघे भाऊ पुढच्या राऊंडला जाऊन पुन्हा सुपर फोर मध्ये अजून एक सामना आपसात खेळतात. दोघे फायनलला पोहोचले तर दोघांना आपसात खेळायची तिसरी संधी मिळते. यावेळी आठ संघ आहेत त्यामुळे दोन्ही गटात अजून एक दुबळा संघ वाढला आहे. पण भारत-पाकिस्तान जोडी कायम आहे.
ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपला १६ संघ असल्यास त्यांचे चार ग्रूप बनवतात. त्यात ८ प्रमुख संघांपैकी २-२ संघाच्या चार जोड्या बनवून त्यांना एकेका ग्रुपमध्ये टाकतात. भारताची जोडी नेहमी पाकिस्तानसोबतच असते. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील काही वेगळे चित्र नसते. स्पर्धेत आठ संघ असो किंवा सोळा, त्यांचे दोन ग्रूप बनवा किंवा चार, पण भारत-पाक जोडी फुटणार नाही याची काळजी घेतली जाते.
नुकतेच चॅम्पियन ट्रॉफी झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवली गेली. पण आपण पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नव्हतो म्हणून आपले सामने दुबईला ठेवले होते. निदान तिथे तरी दोघांना वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवावे. पण नाही, तत्व म्हणजे तत्व!. तिथेही भारत पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये ठेवले आणि यजमान पाकिस्तान आपला देश सोडून भारताशी खेळायला दुबईला आला. सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट फिरत होत्या की बघा आम्ही किती शक्तिशाली आहोत जे यजमान संघाला आपला देश सोडून यायला भाग पाडले. पण प्रत्यक्षात ही आपली देखील लाचारी आहे असेच वाटत होते. आपल्याला सुद्धा त्यांच्याशीच खेळायचे असते. कारण हे सारे सामने नेहमी वीकेंडला प्राईम टाईमवर ठेवून, आणि यांची भरमसाठ जाहिरात करून बक्कळ पैसा कमावला जातो.
जगात सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला पैश्याची तितकी निकड असावी असे वाटत नाही. कारण माझ्या वाचनात आले त्यानुसार, "भारतीय कायद्यानुसार बीसीसीआय ही एक धर्मादाय संस्था मानली जाते, त्यामुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयला आयकर भरावा लागत नाही." - चुकत असेल तर कर्रेक्ट करा.
पण मग काय ती अशी लाचारी असावी जे देशप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला दुय्यम लेखत अगदी ठरवून पाकिस्तानसोबत सामने खेळले जातात. कि असे काही आहे जे कितीही पैसा का असेना, हाव काही सुटत नाही.
आणि असे असल्यास मग स्वतःचे पोट भरणार्या कलाकारांनाच तेवढे टार्गेट का करायचे?
त्यांना वेगळा नियम आणि क्रिकेट बोर्डाला वेगळा नियम कश्याला? तिथे कोण असे सरकारचे जावई बसले आहेत?
चला भारत-पाक क्रिकेटवर बहिष्कार घालू नका. आयसीसी स्पर्धांमध्ये ते आपल्या ग्रूपमध्ये बिलकुल नको असाही हट्ट धरू नका. पण किमान रँकिंगनुसार जर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये येत असतील तर खेळा, आणि शेड्युलनुसार कुठल्याही वीकडेला खेळा. असे ठरवून एका ग्रूपमध्ये राहून, आणि या भारत-पाक सामन्याची जाहिरात करून, त्याला प्राईम स्लॉट आणि महत्त्व देऊन त्यातून पैसा तरी कमावू नका. हि सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी केलेली सामन्यांची फिक्सिंग आहे.
एकीकडे संपूर्ण जगाने पाकिस्तानवर बहिष्कार टाकून आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असणारा भारत, स्वतः मात्र साधे क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालू शकत नाही? किंबहुना दोघे जास्तीत जास्त कसे खेळले जाईल हेच उलट बघतो. त्यासाठी सेटींग करतो आणि पैसे कमावतो. मग कोण सिरियसली घेणार आपल्याला?
पेहेलगाम नंतर आजही सीमाभागात चकमक होत आहेत. समोरील बाजूने हल्ले होत आहेत. आपला विरोध पाकिस्तानी जनतेला नाही. परंतु क्रिकेटचे निर्णय घेणारे पाकिस्तानी सैन्य अधिकारी सीमेवर गोळीबार करण्याचे आदेश देतात. त्यामुळे अशा लोकांना विरोध व्हायला हवा जो देशहिताच्या भावनेतून योग्यच आहे. आपल्या देशातील सरकार जर बीसीसीआय वर दबाव न आणता केवळ पैशाकडे पाहत असेल तर त्यांचे पण कान टोचावे लागतील. कि त्यांचा वाटा त्यांना पोहोचतो म्हणून शांत आहेत?
राजकीय दृष्ट्या जरी विचार केला तरी यातून आर्थिक फायदा दोन्ही देशांना होत असेल. पैश्याची गरज आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. आपण हे सामने खेळून त्यांनाच आर्थिक मदत करत आहोत. म्हणजे फिरून आपणच दहशतवाला पैसे पुरवत आहोत आणि पोसत आहोत. सामान्य जनतेला वेगळे भावनिक आवाहन करायचे आणि आपण मात्र आपला स्वार्थ बघायचा हे धोरण चुकीचेच नाही तर कमालीचे दुटप्पी वाटते.
मध्यंतरी निव्रुत्त क्रिकेटरच्या एका स्पर्धेत आपला भारतीय संघ पाकिस्तान सोबत खेळला नाहीत. चक्क सेमीफायनल सोडून स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा आफ्रिदीसारखे काही पाकिस्तानी क्रिकेटर वल्गना करत म्हणालेले की अश्या बिनमहत्वाच्या स्पर्धाना तुम्ही देशप्रेमाचे नाटक कराल, पण नंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये तुम्ही झक मारत आमच्याशीच खेळायला याल. त्यांचे ते विधान कितीही उद्दामपणाचे वाटले तरी ते बोचरे सत्य होते आणि हे लपलेले नाही.
ईतरांचे माहीत नाही. पुढचे माहीत नाही. पण या स्पर्धेपुरते तरी मी या दोन देशातील सध्याची परीस्थिती पाहता या ठरवून खेळले जाणार्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकून न बघायचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी असा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आपले सरकार घेईल तो सुदिन!
धन्यवाद,
- एक सामान्य भारतीय क्रिकेटप्रेमी नागरीक
(No subject)
बांगलादेश भारतात खेळायला तयार
बांगलादेश भारतात खेळायला तयार नाही म्हणून त्यांचा पत्ता कट केला.
आता पाकिस्तानच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
लेटेस्ट न्यूज
लेटेस्ट न्यूज
Pakistan will boycott their game against India at the 2026 T20 World Cup. A post issued by the Government of Pakistan's official X account said the government had granted permission to the Pakistan team to travel to Sri Lanka for the tournament.
https://www.espncricinfo.com/story/pakistan-to-boycott-t20-world-cup-mat...
आता आयसीसीने पीसीबीला सामना
आता आयसीसीने पीसीबीला सामना बॉयकॉट केल्यास त्याचे काय परिणाम होतील याबाबत सावध केले आहे.
https://www.espncricinfo.com/story/icc-warns-pcb-of-consequences-of-boyc...
Pages