पाकिस्तानशी "आवर्जून आणि ठरवून" क्रिकेट खेळणे गरजेचे आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2025 - 05:33

गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.

हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.

उदाहरणार्थ, आशिया कपमध्ये सहा संघ असल्यास तीन तीन संघांचे दोन ग्रुप बनवले जातात. ज्यात भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात तर उर्वरित तिसरा संघ दुबळा असतो. दुसर्‍या गटात लंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असतात. परीणामी पुन्हा हे दोघे भाऊ पुढच्या राऊंडला जाऊन पुन्हा सुपर फोर मध्ये अजून एक सामना आपसात खेळतात. दोघे फायनलला पोहोचले तर दोघांना आपसात खेळायची तिसरी संधी मिळते. यावेळी आठ संघ आहेत त्यामुळे दोन्ही गटात अजून एक दुबळा संघ वाढला आहे. पण भारत-पाकिस्तान जोडी कायम आहे.

ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपला १६ संघ असल्यास त्यांचे चार ग्रूप बनवतात. त्यात ८ प्रमुख संघांपैकी २-२ संघाच्या चार जोड्या बनवून त्यांना एकेका ग्रुपमध्ये टाकतात. भारताची जोडी नेहमी पाकिस्तानसोबतच असते. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील काही वेगळे चित्र नसते. स्पर्धेत आठ संघ असो किंवा सोळा, त्यांचे दोन ग्रूप बनवा किंवा चार, पण भारत-पाक जोडी फुटणार नाही याची काळजी घेतली जाते.

नुकतेच चॅम्पियन ट्रॉफी झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवली गेली. पण आपण पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नव्हतो म्हणून आपले सामने दुबईला ठेवले होते. निदान तिथे तरी दोघांना वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवावे. पण नाही, तत्व म्हणजे तत्व!. तिथेही भारत पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये ठेवले आणि यजमान पाकिस्तान आपला देश सोडून भारताशी खेळायला दुबईला आला. सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट फिरत होत्या की बघा आम्ही किती शक्तिशाली आहोत जे यजमान संघाला आपला देश सोडून यायला भाग पाडले. पण प्रत्यक्षात ही आपली देखील लाचारी आहे असेच वाटत होते. आपल्याला सुद्धा त्यांच्याशीच खेळायचे असते. कारण हे सारे सामने नेहमी वीकेंडला प्राईम टाईमवर ठेवून, आणि यांची भरमसाठ जाहिरात करून बक्कळ पैसा कमावला जातो.

जगात सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला पैश्याची तितकी निकड असावी असे वाटत नाही. कारण माझ्या वाचनात आले त्यानुसार, "भारतीय कायद्यानुसार बीसीसीआय ही एक धर्मादाय संस्था मानली जाते, त्यामुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयला आयकर भरावा लागत नाही." - चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

पण मग काय ती अशी लाचारी असावी जे देशप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला दुय्यम लेखत अगदी ठरवून पाकिस्तानसोबत सामने खेळले जातात. कि असे काही आहे जे कितीही पैसा का असेना, हाव काही सुटत नाही.

आणि असे असल्यास मग स्वतःचे पोट भरणार्‍या कलाकारांनाच तेवढे टार्गेट का करायचे?
त्यांना वेगळा नियम आणि क्रिकेट बोर्डाला वेगळा नियम कश्याला? तिथे कोण असे सरकारचे जावई बसले आहेत?

चला भारत-पाक क्रिकेटवर बहिष्कार घालू नका. आयसीसी स्पर्धांमध्ये ते आपल्या ग्रूपमध्ये बिलकुल नको असाही हट्ट धरू नका. पण किमान रँकिंगनुसार जर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये येत असतील तर खेळा, आणि शेड्युलनुसार कुठल्याही वीकडेला खेळा. असे ठरवून एका ग्रूपमध्ये राहून, आणि या भारत-पाक सामन्याची जाहिरात करून, त्याला प्राईम स्लॉट आणि महत्त्व देऊन त्यातून पैसा तरी कमावू नका. हि सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी केलेली सामन्यांची फिक्सिंग आहे.

एकीकडे संपूर्ण जगाने पाकिस्तानवर बहिष्कार टाकून आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असणारा भारत, स्वतः मात्र साधे क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालू शकत नाही? किंबहुना दोघे जास्तीत जास्त कसे खेळले जाईल हेच उलट बघतो. त्यासाठी सेटींग करतो आणि पैसे कमावतो. मग कोण सिरियसली घेणार आपल्याला?

पेहेलगाम नंतर आजही सीमाभागात चकमक होत आहेत. समोरील बाजूने हल्ले होत आहेत. आपला विरोध पाकिस्तानी जनतेला नाही. परंतु क्रिकेटचे निर्णय घेणारे पाकिस्तानी सैन्य अधिकारी सीमेवर गोळीबार करण्याचे आदेश देतात. त्यामुळे अशा लोकांना विरोध व्हायला हवा जो देशहिताच्या भावनेतून योग्यच आहे. आपल्या देशातील सरकार जर बीसीसीआय वर दबाव न आणता केवळ पैशाकडे पाहत असेल तर त्यांचे पण कान टोचावे लागतील. कि त्यांचा वाटा त्यांना पोहोचतो म्हणून शांत आहेत?

राजकीय दृष्ट्या जरी विचार केला तरी यातून आर्थिक फायदा दोन्ही देशांना होत असेल. पैश्याची गरज आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. आपण हे सामने खेळून त्यांनाच आर्थिक मदत करत आहोत. म्हणजे फिरून आपणच दहशतवाला पैसे पुरवत आहोत आणि पोसत आहोत. सामान्य जनतेला वेगळे भावनिक आवाहन करायचे आणि आपण मात्र आपला स्वार्थ बघायचा हे धोरण चुकीचेच नाही तर कमालीचे दुटप्पी वाटते.

मध्यंतरी निव्रुत्त क्रिकेटरच्या एका स्पर्धेत आपला भारतीय संघ पाकिस्तान सोबत खेळला नाहीत. चक्क सेमीफायनल सोडून स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा आफ्रिदीसारखे काही पाकिस्तानी क्रिकेटर वल्गना करत म्हणालेले की अश्या बिनमहत्वाच्या स्पर्धाना तुम्ही देशप्रेमाचे नाटक कराल, पण नंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये तुम्ही झक मारत आमच्याशीच खेळायला याल. त्यांचे ते विधान कितीही उद्दामपणाचे वाटले तरी ते बोचरे सत्य होते आणि हे लपलेले नाही.

ईतरांचे माहीत नाही. पुढचे माहीत नाही. पण या स्पर्धेपुरते तरी मी या दोन देशातील सध्याची परीस्थिती पाहता या ठरवून खेळले जाणार्‍या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकून न बघायचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी असा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आपले सरकार घेईल तो सुदिन!

धन्यवाद,
- एक सामान्य भारतीय क्रिकेटप्रेमी नागरीक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तानातील कलाकार, खेळाडू ज्यांना भारतात कलेसाठी मानसन्मान, आर्थिक संधी मिळाल्या त्यांनी कधीही पाकिस्तानात भारतविषयक मते चांगली करण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट पाकिस्तानी क्रिकेटर्सनी सामन्यांच्या निमित्ताने भारतात आले असताना वेळोवेळी चहाचे कप दाखवून अभिनंदन वर्धमानच्या 'tea was fantastic' या वक्तव्याची जाहीर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमी भारतानेच खिलाडू वृत्ती दाखवायची गरज नाही. जर अपार्थिडबद्दल काही दशके द. आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बॅन केले जाऊ शकते तर भारतही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही हे जाहीर करू शकतो.

BCCI केवळ आर्थिक मोहापायी भारत पाकिस्तान सामन्यांना होकार देते हे लाजिरवाणे आहे.

जिथं टाळता येत नाही अशा वेळी पाकिस्तान बरोबर खेळणं योग्य आहे. नाहीतर पाकिस्तान ला त्या मालिकेत गुणांचा फायदा आणि आपल्याला तोटा. पण अशा मालिकेत भारत पाकिस्तान सामने जास्तीत जास्त कसे खेळले जातील हेच बघितले जातेय. अर्थातच ह्यामाघे पैसा हेच कारण असणार.

पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यावरून जितका गदारोळ होतो तितका अतिरेकी अजूनही सापडले नाहीत, त्यांचे बोलाविते धनीही मोकाटच आहेत यावरून होत नाही हे दुर्दैव.
आता सामने होतील, दोन्हीकडचे प्रेक्षक देव पाण्यात बुडवून बसतील, महागडी तिकिटे काढून सामने पहातील, जिंकणारे सोमी वर हरणार्‍यांची टिंगल करतील, ... नूरा कुश्ती !

भारताने पाकिस्तान बरोबर द्विपक्षीय सामने खेळणे बंद करुन अनेक वर्षे झाली. त्याच धर्तीवर आशिया चषक, वर्ल्ड कप (दोन्ही) अशा अनेकदेशीय स्पर्धांमधे जर पाकिस्तान असेल तर भारताने बहिष्कार टाकून जाज्वल्य देशप्रेम जगाला दाखवून दिले पाहिजे.

पैसा पैसा काय हो? तो तर ..आयपीएल मधून कमावता येईलच की. उन्हाळी आणि हिवाळी आयपीएल अशा एकाच वर्षात दोन स्पर्धा भरवल्या की झालं.

सुनिल. सहमत. शिव्वय भारत खेळत नसेल तर इतर देशांचाहि आर्थिक तोटा आहेच. कुणितरी (ऋन्मेष?) शोधून काढा - भारत विरोधी सामन्यांना जस्त पैसे मिळतात की इतर (अ‍ॅशेस धरूनहि).

भारत विरोधी सामन्यांना जस्त पैसे मिळतात की इतर
>>>>>
जेवढा टीआरपी तेवढा थेट आर्थिक फायदा.
आणि सर्वात जास्त क्रिकेटवेडे भारतातच. त्यामुळे भारतच कुठली वर्ल्डकप स्पर्धा खेळला नाही तर पैश्याचे गणित अवघड होईल.
जर आपण आपल्या मर्जीने भारत पाक एकाच गटात घेऊ शकतो तर आपल्या मर्जीने वेगळे सुद्धा ठेवू शकतो. क्रिकेटमध्ये आपणच महासत्ता आहोत. बाहेरचे खेळाडू आपल्याकडे आयपीएल खेळायला येतात. आपले कुठेच जात नाहीत.

थोडक्यात सांगायचे म्हणजे जी आपली इच्छा असेल तसे घडेल. त्यामुळे ठरवायचे आपल्याला आहे. आपल्यावर कसले प्रेशर नाही.

चांगले लिहिले आहे. बरेच मुद्दे आले आहेत.

पण ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?

आय पी एल चे चेअरमन अरुण धुमाळ (हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष , माजी केंंद्रीय मंत्री, भाजप खासदार, गोली मारो फेम अनुराग ठाकुर यांचे सख्खे बंधू - हे अनुराग ठाकुर आणि शाहीद आफ्रिदी दुबईत चँपियन्स चषकातला सामना स्टेडियममध्ये शेजारी शेजारी बसून बघत होते, आताही दिसतील कदाचित ) यांनी सांगितलंय की भारत सरकारने याबद्दलचे नियम स्पष्ट केले आहेत आणि आम्ही सरकारच्या सूचनांप्रमाणेच निर्णय घेतो. पाकिस्तानात खेळायचं नाही किंवा फक्त पाकिस्तानशी मालिका खेळायची नाही , पण आय सीसी, एसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानशी कट्टी नाही.
आता तिथे भारत पाकिस्तान यांना नेहमी एकत्र ठेवलं जातं हे या लेखामुळेच कळलं.

तर आयसीसीचे अध्यक्ष कोण? जय शहा - भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव.

तसंही आता पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर जुनं झालं. आता ट्रंप आणि टॅरिफ. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला ज्या चीनची प्रत्यक्ष मदत होती असं आपल्या लष्करप्रमुखांनी सांगितलं होतं , त्या चीनला आपले विश्वगुरू गेले, त्यांच्या अध्यक्षांशी हास्यविनोद करते झाले. उद्या पाकिस्तानलाही जातील. आजकाल काय ते transactional diplomacy का काय चालतं ना?

खून और एक पानी एकसाथ बह नहीं सकते, असं आम्ही म्हटलं होतं, खून और क्रिकेट नाही काही ; कला क्रीडा या गोष्टी राजकारणापेक्षा मोठ्या असतात असं संघाचे विचारवंत आणि भाजपचे राज्यसभेतले खासदार राकेश सिन्हा यांनी एका जाहीर कार्यक्रमात प्रेक्षकांतून आलेल्या स्पेसिफिक प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आहे.

पण ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?
>>>
भरत मी कुठले भांडे लपवले नाहीये. राजकारणाचे फार कळत नसल्याने कोणाची नावे, कोणाची विधाने हे संदर्भ माहीत नसतात म्हणून लिहिली नाहीत.
पण मूळ पोस्टमध्ये भारतीय सरकारलाच जबाबदार धरले आहे. कुठलीही क्रीडा संस्था इतकी मोठी नाही कि ती स्वतःचे निर्णय सरकारच्या मनाविरुद्ध घेईल. म्हणून जे काही चांगले वाईट घडेल त्याची जबाबदारी सरकारचीच धरतो. त्यांची इच्छाशक्ती काय आहे यावरच शेवटी ठरते.

ते मी माझ्यासाठीच लिहिलंय हो सर. तुमच्यासाठी असं काही लिहायची माझी प्राज्ञा नाही.

अर्थ स्पष्ट होण्यासाठी प्रतिसाद संपादित करून ते वाक्य वेगळ्या परिच्छेदात घेतलं.

ओके Happy

India should not play Pakistan at all, says Gautam Gambhir | ESPNcricinfo https://share.google/pmoLvFXo6GNUBDUTX
पुढे म्हणतो, हे सरकारने आणि बीसीसीआयने ठरवायचं. ते ठरवतील ते मला मान्य असेल. मग भाषण टाळ्या घ्यायला दिलं का? ( तसं नाही, असंही सांगून टाकलं बाब्याने)

फील्ड मार्शल आर्णब गोस्वामी यांनी BCCI sony TV criketers सर्वांच्या नावाने शिमगा केला पण इकडच्या स्वाअरीचे नाव घ्यायचे धादस झाले नाही.

Pak 127/9 in 20 overs
India 92/2 10.2 overs
We will win easily. This is for people who boycott the match Happy

मंदार धन्यवाद
आताच मी एका व्हॉट्सअँप ग्रूपवर एक पोस्ट लिहिली या संदर्भात ती कॉपी पेस्ट करतो.
----------------
स्कोअर इथल्या तिथल्या कुठल्यातरी ग्रूपवर कोणीतरी टाकतो. ते एका अर्थी चांगले म्हणजे न बघणाऱ्यांना स्वतःहून स्कोअर सुद्धा चेक करावेसे वाटू नये. टीआरपी आणि व्यू घसरले की बहिष्कार पोहोचेल. उद्देश साध्य होईल. संबंधितांना जाग येईल. येत्या काळात चित्र बदलेल..
--------------------

पैशापुढे हे असले युक्तीवाद फोल आहेत.
आपण उगाच माथेफोडी करणार..

तोंडाची वाफ ( किबोर्ड बडवून) घालवायला ठिक आहेत. Proud

सामन्यानंतर शेक हँड न करण्याची कृती व विजय पहेलगाम च्या बळींना समर्पित करण्याची कृती यावर विशेष काही लिहित नाही, 'हे विधान प्रशासनाला मान्य आहे का?' वगैरे फाटे फुटतील. Cringe and unsportsmanlike

शेक हँड साठीचा कांय नियम आहे का? का फक्त खिलाडूवृती दाखवण्यासाठी असतंय ते. विजय पहेलगाम च्या बळींना समर्पित केला तर कांय चुकीचं आहे? त्याचे देश बांधव मेले म्हणून केलं असेल तर त्यात कांय चुकीचं आहे. मध्ये BLV साठी ICC च्या का कोणाच्या सांगण्यावरून क्रिकेटर्स गुढग्यावर बसत होते. मला तरी जे झालं ते योग्यच वाटतंय. जेव्हढं खेळाडूंच्या हातात होत त्यांनी केलं. विरोध करणारे match खेळेलो नसतो तरी पाकिस्तान ला दोन गुण दिले म्हणून टीका करत बसले असते.

मला वाटते हे बहिष्काराचेच यश आहे.
या आधी कधी भारतीय संघाने असा प्रकार केला नव्हता.
सामान्य भारतीयांच्या भावना ओळखून खेळाडू वागले असतील तर त्यात काही गैर आहे असे वाटत नाही.
या कृत्याला भारतीय क्रिकेट बोर्डाचे समर्थन असेल तर बहिष्काराने त्यांना सुद्धा जागे केले आहे म्हणू शकतो.
आणि आज झाले नसतील तर उद्या तरी होतीलच.

"Honey, it's all about money"
यापेक्षा खेळाडूंनी मॅच फी घ्यायला नको होती किंवा घेतलीच तर आर्मी वेल्फेअर फंडाला द्यायला पाहिजे होती.
आणि पाकिस्तानी खेळाडूंनी हाताळलेल्या चेंडूला स्पर्श पण करायला नको होता.

मॅनेजमेंटने आम्हाला "असे" करा म्हणून सांगितले म्हणून आम्ही "असे" केले. त्यांनी आम्हाला "तसे" करा म्हणून सांगितले असते तर आम्ही "तसे" केले असते. हा का ना का.

सामना हरले असते तर काय केलं असतं?
---
एकीकडे म्हणायचे कला, क्रीडा राजकारणापलीकडे असतात, सामना खेळायचा आणि शेकहँड करायचा नाही?
---
बरं. उद्या ऑलिंपिक किंवा आशियाई खेळांमध्ये समोर अर्शद नदीम आहे म्हणून नीरज चोप्राला तू बहिष्कार टाक असं सांगतील का?
--
भारत पाकिस्तान सामन्यांना हाइप करणं थांबवायला हवं. गेली काही वर्षे पाकिस्तान क्रिकेट संघ अगदीच कमकुवत आहे. भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात जशी चुरस असते, तशी अपेक्षा पाकिस्तानसोबत अजिबात नसते.

मला बरेच दिवसांनी उद्धवजी यांची या विषयावरील भूमिका पटली.

सरकारचा निषेध!

आणि कालचा विजय म्हणजे operation सिंदूर चा एक भाग म्हणणाऱ्या पत्रकारांची कीव येत आहे

भारताने पाकशी सामने खेळावे की खेळू नये
याबाबत वाद असू शकतो . पण , आवर्जून, ठरवून किंवा नाईलाज म्हणून एखाद्या स्पर्धेत तसं खेळायचा निर्णय झाला की खेळाचे, स्पर्धेचे नियम व शिष्टाचार पाळणं हेही मान्य करणं क्रमप्राप्त आहे व त्यात कसूर करून खेळण्याच्या निर्णयाचं समर्थन करणं मात्र हास्यास्पद वाटतं. जर खरंच भारतीय संघाने मॅच संपल्यावर हस्तांदोलन करणं नाकारलं असेल , तर तसं करणं खेळण्याच्या मूळ निर्णयाशी विसंगत आहे, असं मला वाटतं.

का कुणास ठाऊक पण मला राहून राहून संत्याची आठवण आली. पाकिस्तानी खेळाडूंना काय वाटले असेल. हे एव्हढे जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू! अरेरे पण ह्यांनी आपल्या बरोबर शेक हॅंड केला नाही. आयुष्य वाया गेले.

आणि कालचा विजय म्हणजे operation सिंदूर चा एक भाग म्हणणाऱ्या पत्रकारांची कीव येत आहे
>>>>>>>

पत्रकार या जमातीचीच सध्या कीव करावीशी वाटते. यांना स्वतःचे असे काही वजूद उरले नाहीये. ते स्वतःच सत्तेच्या खेळात आणि पैशाच्या बाजारात विकले गेलेले घोडे आहेत. याला जे अपवाद असतील त्यांचे कौतुक करूया.

शेक हॅन्ड नाकारणे हे इतर केस मध्ये शिष्टाचारानुसार नसले तरी या केस मध्ये जे घडले ते चूक की बरोबर हे असे पटकन इथे बसून सांगणे अवघड आहे.

तसेच दोष द्यायचा झाल्यास तो कोणाला देणार? कारण हा निर्णय खेळाडूंचा स्वतःचा होता की त्यांना कोणी तसे करायला सांगितले होते हे आपल्याला माहित नाही.

ते माहीत नसताना खेळाडूंना याबाबत दोष देणे मला अन्यायकारक वाटते.

असो,
सूर्यकुमार आणि भारतीय संघाने जे केले ते सर्वसाधारणपणे बहुतांश लोकांना आवडले आहे. त्यामुळे आता त्या कृत्याचे श्रेय घ्यायची चढाओढ लागली आहे. लेख फिरू लागले आहेत.

Pages