गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.
हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.
उदाहरणार्थ, आशिया कपमध्ये सहा संघ असल्यास तीन तीन संघांचे दोन ग्रुप बनवले जातात. ज्यात भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात तर उर्वरित तिसरा संघ दुबळा असतो. दुसर्या गटात लंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असतात. परीणामी पुन्हा हे दोघे भाऊ पुढच्या राऊंडला जाऊन पुन्हा सुपर फोर मध्ये अजून एक सामना आपसात खेळतात. दोघे फायनलला पोहोचले तर दोघांना आपसात खेळायची तिसरी संधी मिळते. यावेळी आठ संघ आहेत त्यामुळे दोन्ही गटात अजून एक दुबळा संघ वाढला आहे. पण भारत-पाकिस्तान जोडी कायम आहे.
ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपला १६ संघ असल्यास त्यांचे चार ग्रूप बनवतात. त्यात ८ प्रमुख संघांपैकी २-२ संघाच्या चार जोड्या बनवून त्यांना एकेका ग्रुपमध्ये टाकतात. भारताची जोडी नेहमी पाकिस्तानसोबतच असते. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील काही वेगळे चित्र नसते. स्पर्धेत आठ संघ असो किंवा सोळा, त्यांचे दोन ग्रूप बनवा किंवा चार, पण भारत-पाक जोडी फुटणार नाही याची काळजी घेतली जाते.
नुकतेच चॅम्पियन ट्रॉफी झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवली गेली. पण आपण पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नव्हतो म्हणून आपले सामने दुबईला ठेवले होते. निदान तिथे तरी दोघांना वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवावे. पण नाही, तत्व म्हणजे तत्व!. तिथेही भारत पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये ठेवले आणि यजमान पाकिस्तान आपला देश सोडून भारताशी खेळायला दुबईला आला. सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट फिरत होत्या की बघा आम्ही किती शक्तिशाली आहोत जे यजमान संघाला आपला देश सोडून यायला भाग पाडले. पण प्रत्यक्षात ही आपली देखील लाचारी आहे असेच वाटत होते. आपल्याला सुद्धा त्यांच्याशीच खेळायचे असते. कारण हे सारे सामने नेहमी वीकेंडला प्राईम टाईमवर ठेवून, आणि यांची भरमसाठ जाहिरात करून बक्कळ पैसा कमावला जातो.
जगात सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला पैश्याची तितकी निकड असावी असे वाटत नाही. कारण माझ्या वाचनात आले त्यानुसार, "भारतीय कायद्यानुसार बीसीसीआय ही एक धर्मादाय संस्था मानली जाते, त्यामुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयला आयकर भरावा लागत नाही." - चुकत असेल तर कर्रेक्ट करा.
पण मग काय ती अशी लाचारी असावी जे देशप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला दुय्यम लेखत अगदी ठरवून पाकिस्तानसोबत सामने खेळले जातात. कि असे काही आहे जे कितीही पैसा का असेना, हाव काही सुटत नाही.
आणि असे असल्यास मग स्वतःचे पोट भरणार्या कलाकारांनाच तेवढे टार्गेट का करायचे?
त्यांना वेगळा नियम आणि क्रिकेट बोर्डाला वेगळा नियम कश्याला? तिथे कोण असे सरकारचे जावई बसले आहेत?
चला भारत-पाक क्रिकेटवर बहिष्कार घालू नका. आयसीसी स्पर्धांमध्ये ते आपल्या ग्रूपमध्ये बिलकुल नको असाही हट्ट धरू नका. पण किमान रँकिंगनुसार जर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये येत असतील तर खेळा, आणि शेड्युलनुसार कुठल्याही वीकडेला खेळा. असे ठरवून एका ग्रूपमध्ये राहून, आणि या भारत-पाक सामन्याची जाहिरात करून, त्याला प्राईम स्लॉट आणि महत्त्व देऊन त्यातून पैसा तरी कमावू नका. हि सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी केलेली सामन्यांची फिक्सिंग आहे.
एकीकडे संपूर्ण जगाने पाकिस्तानवर बहिष्कार टाकून आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असणारा भारत, स्वतः मात्र साधे क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालू शकत नाही? किंबहुना दोघे जास्तीत जास्त कसे खेळले जाईल हेच उलट बघतो. त्यासाठी सेटींग करतो आणि पैसे कमावतो. मग कोण सिरियसली घेणार आपल्याला?
पेहेलगाम नंतर आजही सीमाभागात चकमक होत आहेत. समोरील बाजूने हल्ले होत आहेत. आपला विरोध पाकिस्तानी जनतेला नाही. परंतु क्रिकेटचे निर्णय घेणारे पाकिस्तानी सैन्य अधिकारी सीमेवर गोळीबार करण्याचे आदेश देतात. त्यामुळे अशा लोकांना विरोध व्हायला हवा जो देशहिताच्या भावनेतून योग्यच आहे. आपल्या देशातील सरकार जर बीसीसीआय वर दबाव न आणता केवळ पैशाकडे पाहत असेल तर त्यांचे पण कान टोचावे लागतील. कि त्यांचा वाटा त्यांना पोहोचतो म्हणून शांत आहेत?
राजकीय दृष्ट्या जरी विचार केला तरी यातून आर्थिक फायदा दोन्ही देशांना होत असेल. पैश्याची गरज आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. आपण हे सामने खेळून त्यांनाच आर्थिक मदत करत आहोत. म्हणजे फिरून आपणच दहशतवाला पैसे पुरवत आहोत आणि पोसत आहोत. सामान्य जनतेला वेगळे भावनिक आवाहन करायचे आणि आपण मात्र आपला स्वार्थ बघायचा हे धोरण चुकीचेच नाही तर कमालीचे दुटप्पी वाटते.
मध्यंतरी निव्रुत्त क्रिकेटरच्या एका स्पर्धेत आपला भारतीय संघ पाकिस्तान सोबत खेळला नाहीत. चक्क सेमीफायनल सोडून स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा आफ्रिदीसारखे काही पाकिस्तानी क्रिकेटर वल्गना करत म्हणालेले की अश्या बिनमहत्वाच्या स्पर्धाना तुम्ही देशप्रेमाचे नाटक कराल, पण नंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये तुम्ही झक मारत आमच्याशीच खेळायला याल. त्यांचे ते विधान कितीही उद्दामपणाचे वाटले तरी ते बोचरे सत्य होते आणि हे लपलेले नाही.
ईतरांचे माहीत नाही. पुढचे माहीत नाही. पण या स्पर्धेपुरते तरी मी या दोन देशातील सध्याची परीस्थिती पाहता या ठरवून खेळले जाणार्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकून न बघायचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी असा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आपले सरकार घेईल तो सुदिन!
धन्यवाद,
- एक सामान्य भारतीय क्रिकेटप्रेमी नागरीक
पाकिस्तान विरोधात खेळलो नसतो
पाकिस्तान विरोधात खेळलो नसतो तर आशिया कप आणि बक्षीसाची रक्कम पाकिस्तान कडे गेली असती. परत टीका BCCI आणि भारतीय टीम वर झालीच असती. त्यापेक्षा झालं ते योग्यच झालं. आपल्या संघाने मैदानात आणि मैदानाबाहेरही गोष्टी बरोबर मॅनेज केल्या. ठरवून खेळणे मात्र दुटप्पी पणाच आहे.
पण भारत हरला तर मज्जा येणारे किंवा हायसे वाटणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली.
(No subject)
मज्जा आणि हायसे वाटणारे खुशीत
मज्जा आणि हायसे वाटणारे खुशीत होते २० वर ३ गेले तेव्हा. पण ते तेव्हड्यासाठीच नंतर परत दुःखी झाले. आता सोशल मीडियावर दुःख लपवण्यासाठी स्मायल्या वैगरे टाकताहेत
आपल्या संघाने बरोबर केलं
आपल्या संघाने बरोबर केलं म्हणणाऱ्यांसाठी प्रश्न. क्रिकेट हा अनिश्चितततेचा खेळ म्हणतात. फायनल पाकीस्तान जिंकला असता आणि त्यांच्या संघाने तो विजय पाकिस्तानी सैन्यदलाला समर्पीत केला असं म्हटलं असतं, तर कसं वाटलं असतं?
काल प्राण कंठाशी आणलेच होते. ( फिक्सिंग नसेल तर)
असो. हा धागा बहिष्काराबद्दल आहै आणि बहीष्काराची काडी फुसकी निघाली. क्रिकेटवेड तथाकथित देशप्रेमापेक्षा मोठे ठरले.
हस्तांदोलन केलं नाही, लांब उभा राहिला वगैरे दिल के बहलाने के लिए खयाल अच्छा है.
लंकेसोबतचा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोचूनही त्याची चर्चा नाही. हा धागा मात्र शतकी. म्हणजे लोकांना भारत पाक सामन्यातच जास्त रस आहे.
मोदींचं ट्वीट आता दिसलं.
मोदींचं ट्वीट आता दिसलं.क्रिकेट स्पर्धेला operation sindoor म्हणालेत. त्यांची आणि इथल्या ट्रोलची भाषा एकच आहे, याचं नवल वाटत नाही.
भारतीय क्रिकेट संघानं आशियाई
भारतीय क्रिकेट संघानं आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्षदेखील आहेत.
क्रिकेट सामन्याला ऑपरेशन
क्रिकेट सामन्याला ऑपरेशन सिंदूर म्हणून मोदींनी भारतीय सैन्यदलांचा अपमान केला आहे.
शेंदूर फासलेल्या दगडाकडुन
शेंदूर फासलेल्या दगडाकडुन आणखी कसली अपेक्षा करताय भरत ?
Let me play devils advocate
Let me play devils advocate here !
समजा पाक ने अशी ऑफर दिली की पुढच्या दहशतवादी हल्ल्यानंतर होणार्या मालिकेत आम्ही ३-० असा व्हाईटवॉश स्वीकारू.
दहशतवादी खुष !
पाकी आर्मी खुष !
पाक सरकार खुष ! ( टॅक्स आणी जीडीपी)
पाक खेळाडू खुष ! ( कमी का होईना पण पैसे मिळतात)
भारतीय जनता खुष !
( हे मी उद्वेगाने व उपरोधाने लिहिले आहे)
पाकिस्तान मॅच हारली की त्याचा
पाकिस्तान मॅच हारली की त्याचा आनंद दोन चार दिवस टिकतो. पहिल्या दिवशी भारत जिंकतो त्याचा आनंद आणि नंतरचे दोन तीन दिवस पाकिस्तानी समर्थक आणि भारतातले विरोधक जे काय विव्हळतात की ज्याचे नाव ते. मजा आणतात. दुग्धशर्करा योग.
हा धागा बहिष्काराबद्दल आहै
हा धागा बहिष्काराबद्दल आहै आणि बहीष्काराची काडी फुसकी निघाली. क्रिकेटवेड तथाकथित देशप्रेमापेक्षा मोठे ठरले.
>>>>>>
बाकीच्या जगाचे नाहीत नाही, पण मी भारत पाक तिन्ही सामन्यांवर बहिष्कार टाकला.
माझ्या ओळखीच्या काही जणांनी टाकला.
तुम्हाला काय आकडा अपेक्षित होता?
बाकी माझ्याईतके क्रिकेटवेडे अभावानेच कोणी असेल. त्यामुळे ते कधी देशप्रेमावर भारी पडते असे वाटू शकत नाही. फक्त काही जणांना जाणीव होत नाहीये इतकेच.
लंकेसोबतचा सामना सुपर
लंकेसोबतचा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोचूनही त्याची चर्चा नाही. हा धागा मात्र शतकी. म्हणजे लोकांना भारत पाक सामन्यातच जास्त रस आहे
>>>>>>
उत्तम मुद्दा!
फक्त उलटा मांडला...
या धाग्यावर भारत-पाक सामन्यावर चर्चा नाही झाली तर बहिष्कारावर चर्चा झाली आहे. आणि काहीनी राजकीय चर्चा केली आहे.
पण तेच मायबोलीवर जो क्रिकेटचा धागा आहे तिथे कुठलीच चर्चा झाली नाही.
जणू आशिया कप स्पर्धेतच यंदा कोणाला फारसा रस नव्हता.
आता बोला....
क्रिकेटवेड तथाकथित
क्रिकेटवेड तथाकथित देशप्रेमापेक्षा मोठे ठरले. >> भरत यांच्या संपूर्ण पोस्टशी सहमत
खेळातली हार-जीत आपण वैयक्तिक घेतो आणि त्यात राजकारण आणतो हे फार दुर्दैवी, मग भले ती भारताची बाजू असो किंवा पाकिस्तानची.
त्यांच्या संघाने तो विजय
त्यांच्या संघाने तो विजय पाकिस्तानी सैन्यदलाला समर्पीत केला असं म्हटलं असतं, तर कसं वाटलं असतं?>>>>
त्यांचा प्रश्न, त्यांनी कोणाला समर्पित करायचा ते.
भारताचा विजय भारताने कोणाला समर्पित करायचा हा भारताचा प्रश्न. त्याला जे योग्य वाटते ते तो करणार. त्याच्या मित्राला ते अयोग्य वाटत असेल तर तो कदाचित विचार करेल. त्याच्या शत्रुला ते अयोग्य वाटत असेल तर त्याने भारताचा मित्र बनावे व त्याला समजवावे.
उद्या पाकिस्तानला काय वाटेल म्हणुन भारताने ब्राम्होसची नवी अजुन चांगली आवृत्ती काढु नये असे म्हणतील भारतीय लोक.
भारताचा मित्र किंवा तटस्थ बनुन राहायचा विकल्प त्याच्याकडे आहे. तसे झाले तर त्याला ब्राम्होसची भिती बाळगायचे कारण उरणार नाही. आज ब्रम्हदेश, नेपाळ, श्रीलंकेला ब्राम्होसची भिती बाळगायचे काही कारण आहे का? आणि ते भारताचे मित्रही नाहीत. पाकिस्तान स्वतःला त्यांच्यासारखे करु शकते. करणार का??
आजपासून महिला विश्वचषक
आजपासून महिला विश्वचषक स्पर्धा लंकेत सुरु होत आहे.
५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना आहे. त्यावर बहिष्कार घालण्याचा काही संकल्प आहे का?
सामना संपला तरी कवित्व संपले
सामना संपला तरी कवित्व संपले नाही.
भारतीय संघाने एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक आणि पदके घ्यायला नकार दिला. हे नक्वी पाकिस्तानचे मंत्रीही आहेत. त्यांनी भारत पाक युद्धाबद्दल वक्तव्ये - सोशल मीडिया पोस्ट्स केल्या आहेत - हे कारण दिले . भारतीय संघातल्या परदेशी सपोर्ट स्टाफने ट्रॉफी स्वीकारणे, अमिरातीच्या क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्याने ट्रॉफी देणे हे पर्याय भारतीय संघाने सुचवले. पण नक्वींना ते मान्य नव्हते. भारतीय संघ चषक आणि पदके घ्यायला येत नाही हे कळल्यावर नक्वी निघून गेले. पण जाताना चषक आणि पदके घेऊन गेले.
ट्रॉफी लेके भाग गए - इति सूर्यकुमार यादव.
आता ट्रॉफीसाठी बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार नोंदवणार आहे.
दरम्यान महिलांची विश्वचषक स्पर्धा सुरू होते आहे आणि तिथेही हे नाट्य चालू राहील असं दिसतं.
महिलांच्या विश्वचषकात
महिलांच्या विश्वचषकात प्रत्येक संघ प्रत्येक संघाशी खेळणार आहे. त्यामुळे भारत पाक टाळता येणे शक्य नव्हतेच. किंवा ठरवून एक ग्रुप केला आहे असे म्हणू शकत नाही. अर्थात तिथेही भारत पाक रविवारी आहेच. पण तिथे दर रविवारी भारताचाच सामना आहे. बहुधा आपणच महिलांच्या क्रिकेटला सर्वात जास्त टीआरपी देतो.
मॅचेस खेळायलाच नको होत्या
मॅचेस खेळायलाच नको होत्या असं माझं ठाम मत आहे.
ही नंतरची सगळी नाटकं बघून एवढंच म्हणावंसं वाटतं - बूंद से गयी वो हौद से नहीं आती.
दलजीत दोसांदच्या सिनेमात पाकिस्तानी हिरोईन होती म्हणून तो रिलीज होऊ दिला नाही पण क्रिकेट मॅच चालते खेळली तर. हम्म.
बाकी ऑप सिंदूर आणि क्रिकेट मॅचला एकाच पारड्यात तोलणं म्हणजे...
स्पर्धा सुरू व्हायच्या
स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच्या ऑफिशियल कार्यक्रमांत सूर्यकुमार यादवने नक्वी आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं. त्याचे व्हिडियो आहेत.
शेअर करा ना कामात येतील
शेअर करा ना
कामात येतील
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपल्या
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपल्या मीडियाने पाकिस्तानचं लाहोर बंदर उद्ध्वस्त केलं होतं. इस्लामाबाद ताब्यात घेतलं होतं तोच प्रकार नो हँडशेक , ट्रॉफी न घेणे , नसलेली ट्रॉफी घेण्याचा अभिनय , पाकिस्तानच्या कर्णधारापासून चार हात लांब राहणं यात झाला.
दोन्हीही लोकांना चेकाळवण्याचे प्रकार. पहिल्यालाही सरकारची साथ होती हे मंत्र्यांनी मीडियाचे आभार मानून स्पष्ट केलं. आता तर स्वतः पंतप्रधानच त्यात उतरले.
केवळ पाकिस्तानचा सहभाग आहे
केवळ पाकिस्तानचा सहभाग आहे म्हणून तुम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार नाही का?
ऑलिम्पिक, अथेलेटिकस, हॉकी सर्व खेळातून बाहेर होणार का?
सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की पाकिस्तानशी एकाशी एक कोणताही सामना होणार नाही तसेच पाकिस्तानच्या भूमीवर सामना खेळणार नाही.
बाकी आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानशी खेळणार नाही म्हणून त्यांना वॉकओव्हर देऊन तुम्ही आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार का?
हा सामना खेळू नये किंवा तो बघू नये म्हणणारे इतका मुलभुत विचार करू शकत नाहीत?
कुणी सामना पहावा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.
मुळात क्रिकेट खेळुच नये पासून त्याचे सामने भरवूच नयेत किंवा सगळ्याच मॅचेस फिक्स्ड असतात अशी मते असणारे अनेक लोक आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते.
पण प्रश्न प्रतिष्ठेचा करून सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांतून भारतीय संघानी माघार घेणे आणि पाकिस्तानला वॉकओव्हर देणे हे केवळ आत्मघातकी आहे.
बाकी खेळाडूंनी हस्तांदोलन न करणे किंवा पाकिस्तान न्क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांकडून चषक न घेणे हे वादाचे मुद्दे असू शकतात
आणि
त्याबद्दल आप आपल्या राजकीय मतप्रणाली प्रमाणे लोकांची मते टोकाची असू शकतात. तो प्रश्न अलाहिदा आहे.
पण पाकिस्तानशी कोणताही सामना कधीच खेळू नये त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय खेळातून बाहेर पडावे हीच सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल हे म्हणणे ही फारच अतिशयोक्ती आहे
मज्जा आणि हायसे
मज्जा आणि हायसे वाटणाऱ्यांसाठी अजून एक संधी आहे. तेव्हडीच दुधाची तहान ताकावर. पण त्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत तुळशीच्या लग्नापर्यंत विरोधक विव्हळत बसणार. अशी दिवाळी दसरा पुन्हा होणे नाही.
सुबोध खरे
सुबोध खरे
हा सामना खेळू नये किंवा तो बघू नये म्हणणारे इतका मुलभुत विचार करू शकत नाहीत?
>>>>>>>>
तुम्ही लेख पूर्ण वाचता का?
आपण त्यांच्याशी अश्या स्पर्धात नुसते खेळत नाही तर ठरवून जास्तीत जास्त कसे खेळतो हा मुद्दा सुद्धा तुम्हाला दिसेल.
आणि मग आता तुम्ही आपला मूलभूत विचार त्याच्याशी जोडून बघा.
23-2
23-2
दुधाची तहान ताकावर भागवण्याची संधी पण हुकल्यात जमा.
26-3
26-3
ऐन सणासुदीला विरोधकांची रडारड बघवत नाही. थांबा विरोधकानो पाकिस्तान अमेरिका काय कामाचे नाहीत आता मलाच शस्त्र उचलायला लागेल. मी करतो कायतरी तुमच्यासाठी तुम्हाला बरं वाटण्यासाठी.
भारत ८८ रन्सने विजयी.
भारत ८८ रन्सने विजयी.
अफगानिस्तान क्रिकेट बोर्ड
अफगाणिस्तानने पाकिस्तानवर बहिष्कार टाकला
अफगानिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) ने पुष्टि की कि वे नवंबर में होने वाले टूर्नामेंट में भाग नहीं लेंगे, क्योंकि पाकिस्तान ने ताजा हवाई हमले किए में 10 लोग मारे गए. इसमें तीन क्रिकेटर भी शामिल थे. शुक्रवार शाम को तालिबान के दावे के बाद कि उसके क्षेत्र पर ताजा हवाई हमले किए गए थे, पाकिस्तान ने 48 घंटे के संघर्ष विराम का उल्लंघन किया.
मारे गए लोगों में तीन स्थानीय क्रिकेटर भी शामिल थे. ACB ने उनकी मृत्यु पर शोक व्यक्त किया और यह भी पुष्टि की कि वे आगामी श्रृंखला के लिए पाकिस्तान नहीं जाएंगे. इस रुख का स्वागत T20I कप्तान राशिद खान ने किया, जिन्होंने इसे “बर्बर और अनैतिक” करार दिया. यह उल्लेखनीय है कि दोनों देशों के बीच ताजा तनाव तब आया जब पाकिस्तान और अफगानिस्तान ने कथित तौर पर दोहा में वार्ता के समापन तक 48 घंटे के संघर्ष विराम को बढ़ाने पर सहमति व्यक्त की थी.
एशिया कप इमर्जिंग स्पर्धा
एशिया कप इमर्जिंग स्पर्धा सुरू आहे.
त्यात सुद्धा भारत पाक एकाच ग्रुप मध्ये आहेत.
मागच्या आठवड्यात हाँग काँग सिक्सेस होती. त्यात तर चार ग्रूप होते.
पण भारत पाक एकाच ग्रुप मध्ये होते.
पाकिस्तानसोबत संबंध नाही वगैरे पब्लिकला उल्लू बनवायचे धंदे करतात.
अंडर उन्निस आशिया कपमध्ये
अंडर उन्निस आशिया कपमध्ये नेहमीप्रमाणे भारत पाक एकाच ग्रुपमध्ये असल्याने ठरल्याप्रमाणे रविवारी सुट्टीच्या दिवशी यांचा सामना आहे.
खूप झाला बहिष्कार
कोणाला काही पडली नाहीये
आता बघायला घेऊया सामने
Pages