मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनिल अवचट, निळू दामले हे रिपोर्ताज प्रकारचं लेखन करतात/करायचे. मिलिंद बोकीलसुद्धा.

रिपोर्ताज म्हटल्यावर मलाही अनिल अवचट आठवले. मिलिंद बोकिलांच्या लेखनाला रिपोर्ताज म्हटलं तर माझ्या भावना दुखावतील. इतिहास आणि वर्तमान, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक अंगांनी विचार करून ते लिहितात . त्यांनी समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राचा रीतसर अभ्यासही केला आहे. त्यांच्या लेखनाचं संदर्भमूल्य आणि टिकाऊपणा आणि वाचनातून जे काही मिळतं ते, वर्तमानपत्रीय लेखनापेक्षा नक्कीच जास्त असतील. शब्दमर्यादा हा आणखी एक मुद्दा.

रिपोर्ताज - अनिल अवचटांनी सुरुवातीच्या काळात लोकप्रिय केलेला लेखनप्रकार.
ज्या विषयावर लिहायचं त्याच्याशी संबंधित तथ्यांची, तपशीलांची खोदाखोद, शोधाशोध करून, संबंधित माणसांशी बोलून, 'आहे हे असं आहे' अशा स्टाइलने केलेलं लेखन.
वृत्तांतापेक्षा रिपोर्ताजचं कन्टेन्ट, त्याची खोली, त्यातून वाचकांना काय मिळतं, या सगळ्याची पातळी बरीच वरची असते.

तडा : गणेश मतकरी (कथासंग्रह)

अनुभव अंकात मतकरींच्या ’बिनशेवटाच्या गोष्टी’ वाचल्या तेव्हापासून मी त्यांच्या कथालेखनाची फॅन आहे. (या गोष्टींचं नंतर पुस्तक झालं- ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’. ते २-३ वर्षांच्या अंतराने दोनवेळा वाचलं. पुन्हाही कधीतरी वाचू शकते.) त्यानंतर ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हे त्यांचे कथासंग्रह वाचले.

नुकतंच प्रकाशित झालेलं त्यांचं ’तडा’ हे पुस्तक काल वाचून संपवलं. या कथासंग्रहातल्या दोन कथा मला सर्वात आवडल्या. एक शीर्षककथा ’तडा’, त्यापेक्षाही आवडली ती ’ओळख’ कथा. ‘ओळख’ कथेत आपल्याकडचा एक ज्वलंत सामाजिक मुद्दा ज्या प्रकारे गोवलेला आहे ते मला फार आवडलं. एक-दोन कथा जरा ताणलेल्या/पाणी घातलेल्या वाटल्या. कोणती कथा आवडेल हे जरासं व्यक्तीसापेक्ष असू शकतं. त्यामुळे मुद्दा तो नाही.

मतकरी ज्या perspective मधून कोणतीही कथा सुरू करतात आणि पुढे उलगडत नेतात ते note करण्यात मजा येते. टिपिकली कथेत ’पुढे काय होणार?’ किंवा ’शेवटी काय होणार?’ ही वाचकांना उत्सुकता असते, (किंवा तशी असणं अपेक्षित असतं.) पण मतकरींच्या कथांमध्ये destination पेक्षा journey जास्त इंटरेस्टिंग असते. कथांचा जर्म नंतर मनात summarize करायलाही मला मजा आली.

आत्तापर्यंत वाचलेल्या त्यांच्या कथासंग्रहांमध्ये मला आवडल्यानुसार क्रम लावायचाच झाला तर ’खिडक्या अर्ध्या उघड्या’, ’बटरफ्लाय इफेक्ट’, ’इन्स्टॉलेशन्स’, ‘तडा’ असा असेल. पण ते ही दुय्यम आहे.

'कथानक’ याच एकाच गोष्टीवर फोकस न ठेवता कथावाचनाची वर म्हटलेली प्रोसेस आवडत असेल तर हा कथासंग्रह नक्की आवडेल.

हे कुठे लिहावं ते समजलं नाही म्हणून इथेच लिहीत आहे.

एस.एल. भैरप्पा प्रतिष्ठानचा पुरस्कार आज बंगलोरमध्ये उमा कुलकर्णींना देण्यात आला. कार्यक्रमाला ९३ वर्षांचे स्वतः भैरप्पा उपस्थित होते Happy या कार्यक्रमाला जायची संधी मिळाली याचा आनंद झाला.
जवळजवळ सगळी भाषणं कन्नडमध्ये झाली. मला ती बऱ्यापैकी समजली, याचाही आनंद झाला Happy एकच भाषण इंग्रजीत झालं.
उमा कुलकर्णींनी एकूण साठपेक्षा जास्त कन्नड पुस्तकांची मराठीत भाषांतरं केली आहेत. त्यापैकी भैरप्पांची सर्वात जास्त, म्हणजे पंधरा आहेत. उमा कुलकर्णींनी भाषणात सांगितलं की भैरप्पांशी व्यक्ती म्हणून चांगली ओळख झाल्यामुळे भाषांतर करताना मनात आपोआप ' हे त्यांनी मराठीत कसं सांगितलं असतं?' असा विचार होत राहतो, त्यामुळे भाषांतर जास्त चांगलं होतं.
भैरप्पांनीही छोटं भाषण केलं. पण त्यांना खूप विस्मरण होतंय, विशेषतः नावांचं, असं लक्षात आलं. Sad
बाहेर पुस्तकं विक्रीसाठी ठेवलेली होती. त्यातून सार्थ, आवरण, साक्षी ही तीन पुस्तकं घेतली. सार्थ हे मी वाचलेलं भैरप्पांचं पहिलं पुस्तक. तेव्हा ते वाचनालयातून आणलं होतं. आवरण विकत घेतलं होतं पण कुणाला तरी वाचायला दिलं आणि त्याने परत दिलं नाही Proud साक्षी वाचलेलं नाही.
'सार्थ'वर उमा कुलकर्णींची स्वाक्षरी घेतली. तिथे एका कन्नड वाचकाने कन्नडमधलं मूळ पुस्तक (बहुतेक पर्व) आणलं होतं सही घ्यायला. तेव्हा त्या म्हणाल्या की त्या पुस्तकावर सही देण्याचं धाडस मी करणार नाही Happy

मस्त अनुभव, वावे.
भैरप्पा आवडते लेखक. अर्थात उमा कुलकर्णींच्या अनुवादातून.

वावे, अनुवादाच्या दृष्टीकोनातून त्या आणखी काही बोलल्या का?

मी ८-१० वर्षांपूर्वी त्यांचं एक व्याख्यान ऐकलं होतं. https://www.maayboli.com/node/47016 - इथे मी त्याबद्दल लिहिलं होतं.
त्यात त्या म्हणाल्या होत्या- त्यांनी अनुवाद केलेली सगळी पुस्तकं विरुपाक्षांनी त्यांना आधी कानडीतून वाचून दाखवली होती.
हे ऐकल्यावर वाटलं, अनुवाद सहाय्यक म्हणून त्यांनी विरुपाक्षांचं नावही टाकायला हवं होतं सगळीकडे.

मस्त अनुभव, वावे.
भैरप्पा आवडते लेखक. अर्थात उमा कुलकर्णींच्या अनुवादातून...... +१.

वावे, मस्त अनुभव. पर्व आवडत्या पुस्तकांपैकी आहे.

खिडक्या अर्ध्या उघड्या’, ’बटरफ्लाय इफेक्ट’, ’इन्स्टॉलेशन्स’, ‘तडा’ <<>>>> मतकरी छान लिहीतात.

ललिता-प्रीति, तुझा लेख वाचला. तिथले प्रतिसाद वाचून आणि एरवीही मायबोलीवर वाचलेलं आहे त्यावरून मला वाटतं की भैरप्पांच्या अनुवादित पुस्तकांबद्दल, विशेषतः 'पर्व'बद्दल दोन्ही टोकांची मतं ऐकायला मिळतात. मला स्वतःला, माझ्या नातेवाईक-मित्रांना पर्व प्रचंड आवडलेलं आहे. मूळ कन्नड पुस्तक वाचण्याची महत्त्वाकांक्षा मी एकेकाळी बाळगून होते. (आता निदान ऑडिओ बुक ऐकायचा प्रयत्न करून बघू , अशा तडजोडीवर आले आहे) मूळ पुस्तक वाचलेलं नसल्याने अनुवाद किती चांगला झालाय, याबद्दल मी काही मत व्यक्त करू शकत नाही. पण मला तरी ते पुस्तक कुठे अपुरं, तुटक वगैरे वाटत नाही. भैरप्पांचंच 'काठ' वाचताना तो अनुवाद कृत्रिम वाटला होता सुरुवातीला. पण पुस्तक खूप आवडत गेलं नंतर, त्यामुळे मग त्याकडे दुर्लक्ष केलं.
उमा कुलकर्णींनीच अनुवादित केलेलं पूर्णचंद्र तेजस्वी यांचं 'कार्वालो' वाचलं काही वर्षांपूर्वी. बहुतेक अनिल अवचटांनी कुठेतरी खूप तारीफ केली होती या पुस्तकाची. हेही कन्नडमधले एक थोर लेखक आहेत. पण मला ते पुस्तक अजिबात म्हणजे अजिबात आवडलं नाही. काही काळाने परत वाचून पाहिलं (छोटंच आहे) पण तरीही नाही आवडलं. चक्क रटाळ वाटलं. आता मूळ पुस्तकच तसं आहे की lost in translation चा प्रकार आहे, हे माहिती नाही.
उमा कुलकर्णींनी भाषणात अनुवाद करण्याबद्दल विशेष काही सांगितलं नाही. पण सहना शिवकुमार नावाच्या लेखिका आहेत, त्यांनी भाषणात सांगितलं की प्रत्येक भाषेचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व असतं (त्यांनी भाषेची संस्कृती असा शब्द वापरला). कन्नड भाषेतून मराठीत पुस्तक नेताना भाषेच्या या व्यक्तिमत्त्वाचंही भान उमाताईंनी ठेवलं. भैरप्पा महाराष्ट्रातही भरपूर लोकप्रिय आहेत याचं कारण उमा कुलकर्णींनी केलेले अनुवाद. ( हेही खरंच आहे).

वर माझा कार्यक्रमाचा अनुभव आवडल्याचं सांगणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद! Happy वर्षा, जिम कॉर्बेटसाठी धन्यवाद!

आधुनिक वैद्यकीची शोधगाथा- डॉ. शंतनू अभ्यंकर (समकालीन प्रकाशन)
पुस्तकात काय असेल याचा अंदाज नावावरून येतो आणि तो बरोबरच आहे. वैद्यकीय जगातले विविध शोध, ज्यांमुळे क्रांतिकारक बदल घडले, अशा शोधांवरचे हे लेख आहेत. गर्भधारणा कशी होते, या 'मूल'भूत प्रश्नापासून ते गर्भनिरोधक गोळ्या, जलसंजीवनी, स्टेथोस्कोप, एड्सवरचे उपचार अशा विविध शोधांच्या सुरस (आणि चमत्कारिकही) कहाण्या या पुस्तकात आहेत.
डॉ. शंतनू अभ्यंकरांचे लेख मी सर्वप्रथम बहुतेक 'अंतर्नाद'मध्ये वाचले असावेत. त्यातही 'गर्भस्य कथा रम्या' नावाचा त्यांचा लेख मला फारच आवडला होता. वैद्यकीय व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींकडे अफाट आणि अचाट अनुभव गोळा होतात. तसे काही अनुभव त्या लेखात होते. त्यांची लेखनशैली वाचकाला गुंगवून ठेवणारी होती यात शंकाच नाही. या पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या मनोगतात त्यांनी लिखाणाच्या बाबतीत ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांचा उल्लेख केला आहे. पु. ल. देशपांडे, जयंत नारळीकर, कार्ल सेगन, रिचर्ड फाईनमन, रिचर्ड डॉकिन्स असे हे रथी-महारथी आहेत.
'वैज्ञानिक पद्धत ही काही अचानक गवसलेली , साक्षात्काराने उमजलेली, निमिषार्धात सुचलेली युक्ती नाही. करा- चुका शोधा-चुका सुधारा-पुन्हा करा असं ते सुष्टचक्र आहे.' हे या पुस्तकात असलेल्या आणि नसलेल्या सर्वच शोधांचं मर्म आहे.
वैद्यकीय क्षेत्रातले शोध लावणारे शास्त्रज्ञ काय किंवा इतरही कुठल्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ काय, ते समाजाचाच एक भाग असतात. नैतिक-अनैतिकतेच्या स्थळकाळानुसार ज्या कल्पना असतात, त्या त्यांनाही लागू होतातच. शंभर-दोनशे वर्षांमध्ये या कल्पना आमूलाग्र बदलू शकतात. या बदललेल्या नीतिमत्तेच्या आधारे मग भूतकाळातल्या नायकांना कधीकधी खलनायक ठरवलं जातं (कधी उलटंही होत असेल).
जे. मॅरियन सिम्स हा, स्त्रीरोगशास्त्राचा पिता म्हणून गौरवला गेलेला डॉक्टर. त्याने अनेक शोध लावले, पण त्याचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा शोध म्हणजे व्हसायको-व्हजायनल फिश्चुला या आजारा (खरं तर कंडिशन) वरचं ऑपरेशन. त्याने लावलेल्या या शोधामुळे मरणप्राय यातना देणाऱ्या, आयुष्यातून उठवणाऱ्या, पण मृत्यूही न देणाऱ्या भयानक परिस्थितीतून बायकांची सुटका होऊ लागली. पण हा शोध लावताना त्याने प्रयोग केले ते कृष्णवर्णीय, गुलाम स्त्रियांवर. त्या काळी भूल देण्याची पद्धत नव्हतीच, म्हणजे हे सगळे प्रयोग भुलीशिवायच केलेले. एकेका स्त्रीवर पुन्हा पुन्हा केलेले. आज हे वाचून आपल्या अंगावर काटा येतो. पण त्या काळात, अलाबामासारख्या ठिकाणी, जिथे गुलामी हा रिवाज होता, गुलामांना पाळीव प्राण्यांसारखी वागणूक मिळायची, तिथे हे चूक म्हणता आलं असतं का? आज मात्र सिम्सला खलनायक ठरवलं गेलं आहे. अशा काही बाबींची चर्चाही या पुस्तकात आहे.
एव्हिडन्स बेस्ड मेडिसन, म्हणजे पुरावाधिष्ठित वैद्यकी म्हणजे काय, या पद्धतीचा विकास कसा होत गेला, यात संख्याशास्त्राचा उपयोग कसा झाला, माहितीचं विश्लेषण करण्याच्या पद्धतींचा आज कसा फायदा होतो, वगैरे गोष्टींची चर्चा शेवटच्या लेखात आहे. या लेखातली मला आवडलेली उपमा म्हणजे राजहंसाची. 'संख्याशास्त्राचा राजहंस आपल्या बाकदार मानेने आणि टोकदार चोचीने नीरक्षीरविवेक करायला, मोत्याचा चारा तेवढा वेचायला मदत करू लागला. ' हे वाचून मला 'वाहवा!' म्हणावंसं वाटलं Happy
एकंदरीत, अत्यंत सकस, समाधान देणारं पुस्तक. (पुणे पुस्तक महोत्सवातून घेतलेलं हे एक पुस्तक आहे.)

छान सुंदर परिचय.
त्यांचे लेख माहितीपूर्ण असतात.

वावे, छान परिचय.
या पुस्तकाच्या संपादनकामात मी सक्रीय सहभागी होते. (क्रेडिट्समध्ये माझं नावही असेल.)
प्रकाशकांपर्यंत तुझा अभिप्राय पोहचवते.

(शंतनू अभ्यंकर नुकतेच गेले. कॅन्सरने.)

जाई, पराग, अमित, धन्यवाद.
ललिता-प्रीति, हो, नाव बघितलं तुझं.
शंतनू अभ्यंकर नुकतेच गेले. कॅन्सरने. >> हो.

चांगला परिचय, वावे.
नुकतंच 'हेला पेशीं'वरचं एक पुस्तक - आणि त्या निमित्ताने हेन्रिएटा लॅक्स या कृष्णवर्णीय स्त्रीचं छोटेखानी चरित्र वाचनात आलं (माझ्या वहिनीनेच लिहिलं आहे मराठीत) - त्यातही अशा अमानुष प्रयोगांबद्दल माहिती आहे. त्या प्रयोगांची फलितं मानवजातीला वरदान ठरली, पण या स्त्रिया गिनिपिग्जपेक्षाही वाईट पद्धतीने 'वापरल्या' गेल्या होत्या - त्यांच्या इन्फॉर्म्ड कन्सेन्टशिवाय!

सध्या वाचतोय त्या मेझ रनर सिरीज मध्येही असंच आहे. .... स्पॉयलर आहेत...
सूर्यावरील फ्लेअर मुळे पृथ्वीची वाताहात झाली आहे. त्यातून सगळ्या देशांची सरकारं एकत्र येऊन बाहेर पडायला प्रयत्न चालू आहेत. त्यात काही लहान मुलांना जन्मजात या रोगाचा प्रभाव होणार नाही अशी प्रतिकारशक्ती आहे असं समजल्यावर मानवजातीला वाचवण्यासाठी प्रयोग म्हणून ह्या मुलांना त्यांची मेमरी पुसुन एका ठिकाणी पाठवतात. त्यांच्यावर कंट्रोल्ड प्रयोग, अमानुश प्रयोग, एकेक व्हेरिएबल बदलत प्रयोग करतात. एम? मानवजातीला वाचवणे.
आणखी बरेच कंगोरे आहेत. डोकं भेलकांडते काय चूक काय बरोबर. त्या प्रयोगात सामिल झालेली काही मुलेच स्मृती पुसण्यापूर्वी प्रयोगांच्या निर्मितीत कार्यरत होती असे अनेक ट्रिस्ट येत रहातात.

वावे, जिम कॉर्बेट बद्दलचं लिहीलेलं आवडलं. डॉ. शंतनु अभ्यंकारांच्या पुस्तकाची माहितीही मस्त!! भैरप्पा प्रकाशन अनुभवही मस्त.
जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन दोघेही आवडते लेखक. पण अँडरसनच्या कथा कांकणभर जास्तच आवडतात.

इथेच वाचून गणेश मतकरींची तीन पुस्तकं हल्लीच मिळवली आहेत. अजून वाचनयोग यायचाय.

हल्ली वाचलेल्या आणि आवडलेल्या एका वेगळ्या पुस्तकाबद्दल लिहायला आले.

The Frozen River
हल्ली माझा आवडता genre झालाय - historical fact based fictions. खूप मस्त ऐतिहासिक घटना नुसत्या रूक्षपणे वाचण्यापेक्षा (किंवा यातल्या बऱ्याच घटनांनी मोठा जागतिक इतिहास घडवला नसल्याने आपल्याला माहितही नसतात.) गोष्टीत गुंफलेल्या वाचायला मजा येते.

तर ही कथा आहे - मार्था बॅलार्ड या सुमारे २००-२२५ वर्षापूर्वी (इ.स.१७००-१८००) मध्ये अमेरिकेतल्या Massachsets आणि मेन या भागात काम रहाणाऱ्या मिडवाईफ (दाईचं काम करणाऱ्या) स्त्रीची. त्या काळात लिहीता वाचता येणाऱ्या स्रिया जवळपास नव्हत्याच..पण हिच्या नवऱ्याने हिला लिहाय-वाचायला शिकवले. आणि तिने तिच्या रोजच्या बाळंतपण केलेल्याच्या नोंदी डायरीत करायला सुरूवात केली. जवळपास २५ हून अधिक वर्ष तिने ही डायरी मेंटेन केली. ही डायरी तिच्या वंशजांकडून पास होत शेवटी मेन राज्यातल्या सार्वजनिक वाचनालयात गेली.

डायरीतल्या नोंदी तश्या साध्या आणि फार विस्त्रृत नसल्या तरी त्यातून त्याकाळचं समाजजीवन, विशेषत: स्त्रीजीवन, समाजातल्या घरगुती गोष्टी आणि विशेषत: त्याकाळीही घडत असलेले गुन्हे, त्यांचा निवाडा, स्त्रियांना (almost नसलेले) हक्क - हे सगळं चित्र त्या नोंदींमधून साकार होतं. मार्थाबाईने जवळपास १००० बायकांची बाळंतपणं तिच्या कारकिर्दीत केली आणि विशेष म्हणजे तिच्या पेशंटस् पैकी एकही स्त्री बाळंतपणात दगावली नाही. (बालके जन्मताना दगावल्याच्या, मृत जन्माला आलेल्या केसेस आहेत पण आई मात्र एकही दगावली नाही.)

त्या डायरीतल्या नोंदींनुसार गावातल्या एका बाईवर काही पुरूष अत्याचार करतात आणि ती बाई मार्थाजवळ हे सांगते, गावातल्या कोर्टात न्याय मागायला जाते..तिथे साक्ष द्यायला मार्थाला बोलावलं जातं. त्या कोर्ट केसवर हे पुस्तक आहे. पण खऱ्या घटनांमधून त्यावर काही कपोकल्पित रहस्यही गुंफण्याचं स्वातंत्र्य लेखिकेने घेतलंय. पण त्यामुळे पुस्तक whodoneit स्वरूपाचं होऊन खिळवून ठेवतं.

अमेरिकेची राज्यघटना त्याकाळी अगदी नविन होती. छोट्या गावांमधून चालणारे खटले आजच्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने चालत. बायकांना न्याय मिळायची शक्यता शून्यच होती जवळपास. कोर्टात बायकांनी साक्ष द्यायची तरी सोबत पुरूष हवा असे कायदे केवळ २००-२५० वर्षापूर्वी होते यावर विश्वास बसत नाही. पण अश्या अनेक सामाजिक, ऐतिहासिक प्रथा, स्त्रियांचं जीवनमान त्या नोंदीमधून उलगडलंय. आणि अनेकांच्या अभ्यासाचा भाग बनलेय ती डायरी.

आपल्यासारख्यांना त्या डायरितल्या तश्या रूक्ष नोंदींपेक्षा ही कादंबरीस्वरूपातल्या गोष्टीतून साकारणारं त्याकाळचं जग जास्त भावतं.

ललिता-प्रीति, वावे, स्वाती, अमित आणि रायगड - वाचले परिचय, पोस्टी.

कथानकापेक्षा वाचनाची प्रक्रिया जास्त इंटरेस्टिंग असणे हे लगेच लक्षात आले नाही. पण मतकरींचे एखादे पुस्तक वाचले तर कळेल असे दिसते.

वावे - मस्त अनुभव! भैरप्पांचे मी एकही पुस्तक वाचलेले नाही. माबोवर अनेकदा खूप माहिती मात्र वाचली आहे. (त्यांच्या काही कादंबर्‍यांवरची टीकाही इथे वाचली आहे, त्यावरून लखू रिसबुडगिरी करण्याइतकी माहिती झाली होती Happy पण आता तीही विसरलो) आपण राहतो तेथे अशा कार्यक्रमांना सहज जाता येणे हे मोठ्या शहरांत आता दुर्मिळ होत चालले असावे. अगदी २००० पर्यंत पुण्यात मध्यवर्ती भागात आठवड्याच्या मधेच संध्याकाळी असलेल्या कार्यक्रमांना सहज जाता यायचे - आणि तेव्हा मराठी साहित्यिक्/सांस्कृतिक कार्यक्रम किती भरगच्च असत याचे आश्चर्य वाटते. आता विशेषतः बंगलोरमधे अगदी जवळ असेल तरच जाता येत असेल.

वैद्यकीय प्रयोगांबद्दलचा इतिहास वाचताना तेव्हा हे केले गेले असेल यावर विश्वास बसतो. पण आधी तसे डोक्यात आले नव्हते कधी.

Pages