मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Srd, पुण्यात अप्पा बळवंत चौकात ही लायब्ररी आहे . Area नुसार त्यांचे दिवस ठरले आहेत . मोठा टेम्पो सदृश्य गाडीतून पुस्तके घेऊन येतात. लायब्ररी सारखी कप्प्यांची रचना असते. आपण पुस्तके निवडून घ्यायची. विशेष कोणती हवी असतील तर आधी फोन केला तर पाठवतात.


ग्रंथ तुमच्या दारी
हा नाशिकला श्री. रानडे यांनी सुरू केलेला उपक्रम आखाती देशा, अमेरिकेत देखील चालतो. कोणीही पुढाकार घेऊन आपल्या परिसरात हा उपक्रम चालू करू शकतो.

एक दुर्लभ स्नेह - श्री. ना. पेंडसे

श्री. ना. पेंडसे यांच्या स्फुट लेखनाचा हा संग्रह आहे. व्यक्ती आणि परिसर, कमी शब्दांत पण तंतोतंत वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करणे यात श्री. ना. पेंडसे यांचा हातखंडा आहे. Happy या पुस्तकात विंदा करंदीकर, महादेव जोशी असे त्यांचे दोन परममित्र, काही कोकणी माणसं, कोकणचा परिसर, मुंबई (त्यातही दादर) आणि परदेशप्रवासात भेटलेली काही माणसं यांच्याबद्दलचं लिखाण आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना त्यांची कादंबरी वाचताना मिळतो तसाच आनंद मिळतो. एकच जाणवलं म्हणजे हे लेख वेगवेगळ्या वेळी लिहिले गेले असल्यामुळे काही गोष्टींची, हकीगतींची पुनरावृत्ती झाली आहे. एका ठिकाणी नाव न घेता एका व्यक्तीचा मोघम उल्लेख आहे, तर दुसऱ्या लेखात त्याच घटनेचा नावानिशी उल्लेख आहे. पुस्तक तयार करताना प्रकाशकांनी याकडे जरा लक्ष द्यायला हवं होतं. 'जुने दादर- काही आठवणी' आणि 'माझी मुंबई' यात तर खूप पुनरावृत्ती आहे आणि ते साहजिकच आहे, पण पुस्तकात घेताना यावर काही तरी उपाय करायला हवा होता. असो. पण लेखन नेहमीप्रमाणे भारी आहे!
श्री. ना. पेंडसे यांचा No nonsense दृष्टिकोन त्यांच्या कादंबऱ्या वाचताना जाणवतो, तो इथे जास्तच जाणवतो. देवधर्म, कर्मकांडं याबद्दलची त्यांची मतं निर्भीडपणे त्यांनी मांडलेली आहेत.
विंदा करंदीकर आणि महादेव जोशी, ही दोन अचाट व्यक्तिमत्त्वं होती. विंदा अर्थातच खूप प्रसिद्ध, पण महादेव जोशी अप्रसिद्ध होते. मराठी माणसांमध्ये अभावाने आढळणारी, उद्योगात धोके पत्करण्याची, जिगरबाज, मोठी स्वप्नं बघण्याची वृत्ती त्यांच्यात होती. तरीही साहित्याची उत्तम जाण असलेला आणि मनाने अतिशय स्वच्छ असलेला हा माणूस होता. पुलं आणि सुनीताबाईंचेही ते अतिशय चांगले मित्र होते. श्री. ना., महादेव जोशी, पुलं आणि सुनीताबाई यांचं एक 'चौकुट'च काही वर्षे जमलं होतं असा उल्लेख श्री. ना. पेंडसे यांनी केलाय Happy पुलं आणि महादेव जोशी साधारणपणे एकाच वयाचे आणि वयाच्या विशीत असल्यापासून ते एकमेकांना चांगले ओळखत होते. मात्र पुलंच्या कुठल्याच लेखनात ( काल्पनिक किंवा खऱ्या व्यक्तिचित्रणात्मक) त्यांची झलक मला तरी आठवत नाही. कदाचित तशी संधी मिळाली नसेल. ( पण त्यांना म्हाळसाकांत पोंबुर्पेकराच्या बाबतीतल्या काही प्रसंगांची कल्पना कुठून सुचली असेल याचा अंदाज आला Wink )

एका जुन्या दिवाळी अंकात (बहुतेक साप्ताहिक सकाळ) जयवंत दळवींचा 'दादरचे दिवस' नावाचा नितांतसुंदर लेख होता. त्यात त्यांनी मुख्यतः दादरचा परिसर आणि खाण्याची ठिकाणं यांचं वर्णन केलं होतं. श्री. ना. पेंडशांच्या दादरवरच्या लेखात मुख्यतः जुन्या काळातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण, तेव्हा समाजावर प्रभाव असलेली माणसं ( यापैकी प्रबोधनकार ठाकरे सोडल्यास मला बाकीची नावं ओळखीची नव्हती) यांचं वर्णन आहे. स्मरणरंजन आहे. जुन्या मित्रांच्या आठवणी आहेत.
'कोकण आणि कोकणी माणूस' हा लेख तर अप्रतिम आहे. श्री. नांच्या कोकणाबद्दलच्या एकूण understanding चं ते सार आहे असं म्हणायला हरकत नाही.
एकंदरीत अतिशय वाचनीय पुस्तक!
हे पुस्तक १९९६ चं आहे. बंगळूर महाराष्ट्र मंडळाच्या वाचनालयात मिळालं.

*एक दुर्लभ स्नेह - श्री. ना. पेंडसे >> +११

मी हे पुस्तक ,2003 मध्ये वाचले होते आणि त्याची वहीत नोंद सापडली. त्यातले लेखकाचे
एक रोचक वाक्य :
“. . . लंडन, पॅरिस, सॅनफ्रान्सिसको या शहरांपेक्षा मला दापोली अधिक सुंदर वाटली आहे. . . “

महादेव जोशी म्हणजे महादेवशास्त्री जोशी ना किंवा अजून कोणी?
( पण त्यांना म्हाळसाकांत पोंबुर्पेकराच्या बाबतीतल्या काही प्रसंगांची कल्पना कुठून सुचली असेल याचा अंदाज आला Wink ) हे काही जमत नाही.

नाही, महादेवशास्त्री जोशी नाही. Happy पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे. म्हाळसाकांत पोंबुर्पेकर>> त्याला त्याने प्रादेशिक कादंबरीत रंगवलेल्या काही पात्रांचा खऱ्या व्यक्तींशी संबंध जुळल्यामुळे मार पडतो. (बटाट्याची चाळ). श्री. ना. पेंडसे यांच्या बाबतीत असं झालं की योगायोगाने त्यांच्या काही पात्रांचा काही खऱ्या व्यक्तींशी (नामसाधर्म्यामुळे किंवा परिसरातल्या साधर्म्यामुळे) संबंध जोडला गेला आणि लोक नाराज झाले! पुलंना यातून कदाचित पोंबुर्पेकराच्या बाबतीतले ते प्रसंग सुचले असतील.

कुमार सर >> हो Happy
अस्मिता धन्यवाद.

>> या कथानकातील व्यक्ती आणि घटनांशी इतर कुठे साधर्म्य सापडल्यास तो योगायोग समजावा>>
एक बंगाली कथा (अनुवाद)वाचली. टागोर किंवा इतर लेखकाच्या लेखनांत एक प्रकारचे साधर्म्य सापडते आणि कंटाळा येतो. मानसिक विश्लेषण करण्याचा उगाच खटाटोप. घटना कमी आणि भालोलोकांची बडबडच फार असते.

वावे मस्त परिचय.

एका ठिकाणी नाव न घेता एका व्यक्तीचा मोघम उल्लेख आहे, तर दुसऱ्या लेखात त्याच घटनेचा नावानिशी उल्लेख आहे. >>> नक्की कुठल्या संदर्भात आहे ते माहित नाही. पण कधी कधी हा फरक माणसात घडणारा बदल, त्याच्यात आलेली निर्भिडता दाखवतो. तो प्रवास बघण्यातही कधीकधी मजा असते.

छान परिचय वावे! वाचण्यात नक्कीच इंटरेस्ट आहे.

महादेव जोशी या नावाचा एक संदर्भ रत्नागिरीत कोणी पाळण्यातल्या नावाने एकमेकांना हाक मारत नाहीत याबद्दल "असा मी असामी" मधे सांगताना महादेव जोशीचा उल्लेख आहे Happy हे तेच नसावेत पण.

फारएण्ड Lol
मला 'झलक' म्हणजे अशा अर्थाने म्हणायचंय की पुलंच्या आजीवरच्या लेखात त्यांनी त्यांच्या आजोबांकडे एक रामदासी यायचे असा उल्लेख केलाय, हे रामदासी म्हणजे कदाचित हरितात्यांमागची प्रेरणा असावेत.
पुलंवरच्या सिनेमातला (मी तो सगळा बघू शकले नाही, पण जेवढा बघितला त्यातला) एवढा एक प्रसंग मला 'जमलाय' असं वाटलं होतं - पुलं हॉस्पिटलमध्ये असताना एक जुना मित्र त्यांना भेटायला येतो, ज्याच्यावरून 'नंदा प्रधान' बेतलाय.
सुनीताबाईंना 'गाईच्या दह्याचा' मालेगावला जो अनुभव आला तो पुलंना 'तुझे आहे तुजपाशी' लिहिताना उपयोगी पडला असं सुनीताबाईंनीच लिहिलंय..अशा प्रकारची झलक म्हणायची आहे मला.

सुदैवाने मला "काही म्हातारे आणि एक म्हातारी " हे श्री वि द घाटे लिखित भन्नाट पुस्तक मिळाले. साध्या भाषेत लिहिणारे मराठीत मोजके लेखक आहेत( आचार्य अत्रे श्री म माटे, चिं वि जोशी, रत्नाकर मतकरी आणि बाबुराव अर्नाळकर) त्यात हे प्रमुख. वाचतोय. पुनःप्रत्ययाचा आनंद ज्याचा त्यालाच ठावे!

ह्या पुस्तकाची लेखकाने लिहिलेली प्रस्तावना अत्यंत वाचनीय आहे. १९३९ साली प्रकाशीत झालेले आहे. म्हणजे प्रताधिकार मुक्त समजायचे का.? तसे असेल तर सरळ कॉपीपेस्ट करायचा मोह होतोय. लिंक मिळाली तर इथेच देईन.
आहा! मिळाली. ही घ्या
https://epustakalay.com/book/184061-kaanhin-mhaataare-by-viththalrav-ghate/

धन्यवाद केशवकूल.
बरीच मराठी पुस्तके OUDL ( osmania university digital library) कडे होती. ती त्यांच्या साईट वरून उतरवता येत होती .( युनिव्हर्सिटी बंद असेल तेव्हा साईट बंद असे.) पुढे ती लायब्ररी त्यांनी archive dot orgकडे वर्ग केली. epustakalay तिकडूनच आणते.

कालच सई परांजपे यांचं ' सय ' माझा कला प्रवास हे आत्मकथन वाचून पूर्ण केलं. अतिशय ओघवत , खुसखुशीत , नर्म विनोदी लेखन...हे आत्मचरित्र नाही .... कथा, दिशा , पपिहा , साज सारख्या चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया अतिशय सुंदर रित्या लिहिली आहे...
खूपसे ज्येष्ठ कलाकार ज्यांना आपण चरित्र भूमिकांमध्ये किंवा एखाद्या छोट्या रोलमध्ये बघितलं आहे..ते एनएसडी मधून शिकलेले आहेत..आणि त्यांच्या काळात ते अतिशय गुणी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते हे माहीतच नव्हतं...उदा. मनोहर सिंग, श्याम अरोडा, सुधा शर्मा...
आवर्जून वाचावं अस आत्मकथन...

वाचू आनंदे या नावाचा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर दर सोमवार व मंगळवारी रा. ८.३० वाजता असतो. त्यात प्रसिद्ध लेखकांच्या लेखनाचे अभिवाचन होते.
या आठवड्यात मी विजय तेंडुलकर यांच्या लेखनाचे अभिवाचन ऐकले.

चांगला कार्यक्रम !

न्युरोसर्जरीच्या पाऊलखुणा हे डॉ.जयदेव पंचवाघ यांचे पुस्तक वाचले.खूप छान आहे.कठीण विषय,पण डॉक्टरांनी सोप्या भाषेत मांडला आहे.विज्ञानाची प्रगती पाहून थक्क व्हायला होते.
वर्ष-दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेत डॉक्टरांचे लेख यायचे.

दुसरे पुस्तक 'झोल्पे विभोर ' हा वाणी बसू यांचा अनुवादित कथा संग्रह काल वाचून झाला.साध्या तरीही ताकदीच्या कथा आहेत.

>>>>>>>>>>>>न्युरोसर्जरीच्या पाऊलखुणा हे डॉ.जयदेव पंचवाघ यांचे पुस्तक वाचले.खूप छान आहे.कठीण विषय,पण डॉक्टरांनी सोप्या भाषेत मांडला आहे.विज्ञानाची प्रगती पाहून थक्क व्हायला होते.
देवकी लिही ना काहीतरी.मेंदू फार रोचक विषय आहे.

सामो,अग कसं लिहिता येईल?थोडक्यात सांगायचे तर न्युरो सर्जरीचा इतिहास, सद्ध्य परिस्थिती आणि मेंदूशी निगडित असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियेबाबत हे पुस्तक आहे.IMG_20240825_190050.jpg

भरत,

पुस्तकात अजून बरेच लेख आहेत.सर्वच्या सर्व लेख लोकसत्तेत आले नसावे.

Pages