यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

Submitted by कुमार१ on 17 April, 2023 - 23:33

नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.

काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.

मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:

" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".

यावर अधिक बोलणे न लगे.

खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.

गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.

आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.

प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.

मी पाहिलेली (चित्रित) नाटके:

* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला

*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर

*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय

* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार

* आचार्य अत्रे

तो मी नव्हेच

* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम

* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट

* मधुसूदन कालेलकर
शिकार

* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }

* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू

* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले

* डॉ. शिरीष आठवले
मित्र

* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात

* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली

* मनोहर सोमण
द गेम

* विजय निकम
रघुपती राघव राजाराम

*सुरेश जयराम
डबल गेम

* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख

* शिवराज गोर्ले
बुलंद

* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)

*सुरेश खरे
ती वेळच तशी होती

* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..

मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.

कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा आहे. इतक्या उशिरा बघितला.
YouTube वरातीही आजकाल नाटकं बघितली जातात पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भगवण्या सारखं आहे.
लहानपणापासून खूप नाटकं बघितली आहेत. नाटक एकदम जवळच..

https://youtu.be/aJA2ohby1E8?si=rLZFF9uSpglvp8ns
Ha संच वेगळा आहे.

भक्ती बर्वे, सुकन्या कुलकर्णी, आणि अमृता सुभाष (?) ह्या तिघींनी केलेली फुलराणी बघितलेली.
त्यापैकी अमृता सुभाष थोडी लाऊड होती.

मी सगळ्या कॉमेंट्स नाही वाचल्या...मराठी नाटकांच्या काही लिंक्स .
कदाचित रिपीट झाल्या असतील तर क्षमस्व..

हसवा फसवी
https://youtu.be/k-o-SfCkLuw?si=gZNykhGD0Oc_Bpk_

आसू आणि हसू
रीमा लागू आणि मोहन जोशी उत्कृष्ट अभिनय.
एकच परिस्थितीला तुम्ही कसं बघता यावर तुमचं आयुष्य किती आनंदी असू शकेल हे ठरत.. ही मध्यवर्ती कल्पना

https://youtu.be/yV2fn7JXnpI?si=mOf81gHMDGSTY09y

खर सांगायचं तर..
सुप्रिया पिळगांवकर च कमबॅक नाटकं

https://youtu.be/uMJ9gA2TFrM?si=Xd1Gc3_O83UwFM-Y

Doctor तुम्ही सुद्धा

https://youtu.be/SVY0mq7FO1Y?si=Df4hRZ8WHpxXJbGc

नाटकाच्या संदर्भातील एक छोटी आठवण.. थोड अवांतर वाटेल कदाचित.

पुलंच्या पंचाहत्तरी निमित्त गडकरीला पु.ल. नाट्यमहोत्सव होता, तेव्हा आठवडाभर रोज पुलंची नाटकं होती. आणि सगळी चांगल्या कलाकारां chya संचातली.
तेव्हा मला वाटतं मी सगळी बघितलेली... दहावीला होते आणि एका महिन्यावर परीक्षा, पण आई बाबांनी कोणतीही आडकाठी आणली नाही आणि मला अनुमती दिलेली.
(बाकी त्यांच्या विषयी कितीही तक्रारी नंतर वाटल्या तरी )या एका गोष्टीसाठी त्यांना मनातून मनापासून नेहेमी धन्यवाद देते.

YouTube .. म्हणजे दुधाची तहान ताकावर भगवण्या सारखं आहे. >>>
+१११
पण..
https://www.lokmat.com/editorial/most-experiments-of-dramas-are-in-mahar...

.. ही दुरवस्था वाढतेच आहे .. म्हणून .. नाईलाज
आणि .. इतर मुद्दे लेखात दिलेच आहेत.

अधांतर
जयंत पवार
ज्योती सुभाष, भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, लीना भागवत

*गिरणी कामगारांच्या लढ्याची पार्श्वभूमी.. त्या बंद पडणे ... वैफल्य
* एका विधवेची तीन मुले आणि एक मुलगी
*एक गुंड - सतत टाडा आणि मोकाची भाषा; दुसरा बेकार आणि तिसरा लेखक.

* देशी-विदेशी साहित्यावर तात्विक चर्चा... ती देखील मुद्द्यावरून मुद्यावर येणारी
* मुलगी कुमार्गाला लागलेली

* बहुतेक सर्व संवाद चढया आवाजातील... तीव्र कौटुंबिक कलह.. शोकांतिका
सर्वांचा अभिनय उत्तम !

https://www.youtube.com/watch?v=vT8_9aYGPlU

नाट्यसृष्टीत दबदबा असलेले दि गोवा हिंदू असोसिएशनचे श्री. रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले.
आदरांजली !

या संस्थेतर्फे वसंत कानेटकर, जयवंत दळवी, गिरीश कारनाड या नाटककारांची अनेक नाटके सादर झाली. त्यापैकी ‘अखेरचा सवाल’, ‘बॅरिस्टर’, रायगडाला जेव्हा जाग येते व नटसम्राट ही युट्युबवर उपलब्ध आहेत.

गहिरे रंग
शं. ना. नवरे
दि. : राज कुबेर
गिरीराज, जयंत सावरकर, शकुंतला नरे, शशिकांत गंधे व इ.

एक जोडपे.. नवऱ्यात प्रजननक्षमतेचा दोष.. बायकोवर झालेला बलात्कार आणि गर्भधारणा.. ते 'पापा'चे मूल नको हा पुरुषी अहंकार...अखेर शोकांतिका.
प्रमुख कलाकारांचा अभिनय उत्तम. जयंत सावरकरांचा बेरकी काड्याघालू ‘मामा’ देखील लक्षात राहण्यासारखा.

२ भागांत.
https://www.youtube.com/watch?v=3zkp4YZXNDQ&t=2860s

ओझ्याविना प्रवासी
https://www.youtube.com/watch?v=5KsQA-bP4qQ
कलाकार - तुषार दळवी, भक्ती बर्वे, सुनीला प्रधान, किशोरी शहाणे, संदीप मेहता.
हा एका फ्रेंच नाटकाचा अनुवाद आहे. भूतकाळ विस्मृतीच्या पडद्याआड हरवलेल्या एका तरुणाचं खरं कुटुंब शोधण्याचा प्रयत्न आणि त्यातून उघडकीला येणारे कौटुंबिक कलह अशी साधारण कथा आहे. जुन्या धनाढय फ्रेंच कुटुंबातली एकंदर विचारधारा आणि त्या ओघाने झालेला शेवट दाखवताना, खिळवून ठेवणारे संवाद आणि सर्व कलाकारांचा सुरेख अभिनय यामुळे नाटक प्रभावी वाटलं. मूळ नाटकातली नावं, वेशभूषा वापरल्यामुळे वेगळेपण जाणवलं.

अतिथी देवो भव
दिग्दर्शक : विजय केंकरे
विनय येडेकर, राजन भिसे, लेखा मुकुंद.

दिग्दर्शकांचे नाव बघून बघायला घेतले. ठीक आहे. शेवटच्या पंधरा मिनिटात दिलेली भावनिक कलाटणी चांगली आहे परंतु मुख्य ३/४ नाटक विशेष पकड घेत नाही.

अतिथी म्हणून कुटुंबात आलेल्या एकजण शेवटी ‘भलताच’ निघतो.
दोन्ही पुरुष पात्रे काहीशी आक्रस्ताळी वाटली. त्या मनाने लेखा मुकुंद यांचा वावर सहज आणि चांगला आहे.

https://www.youtube.com/watch?v=1zTZmO6MJ98&t=3859s

माझी आई तिचा बाप
फ्रान्सिस ऑगस्टीन
प्र. भू. : मोहन जोशी, स्मिता जयकर

अनाथालयात वाढलेला एक मुलगा आणि एक मुलगी मोठे झाल्यावर लग्न करतात. आता आपल्याला मूल होण्याआधी आपल्या घरात आजी-आजोबा पाहिजेत हा त्यांचा विचार. दोघेही अनाथ, त्यामुळे त्यांना त्यांचे आई-वडील माहित नाहीत. मग ते जोडपे आपण समाजातून आई-वडीलच दत्तक का घेऊ नयेत असा विचार करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात.

यानंतर घरात त्या चौघांच्या गमती जमती आणि एकंदरीत कौटुंबिक नाटकाचा बाज.
नाटक पूर्वार्धात पारशी पकड घेत नाही. तसेच,
“तिच्या मनात आलं म्हणून तिने चहात आलं घातलं” यासारखे बाष्कळ विनोद अधूनमधून आहेत.

शेवटच्या 25 मिनिटात नाटकाला कारुण्याची छान किनार दिलेली आहे. तसेच एका जोडीचे गुपित उघड झाल्याने कलाटणी मिळते. त्यामुळे नाटक काहीसे वर उचलले जाते.

https://www.youtube.com/watch?v=l97e9JMD3kg

काचेचा चंद्र
सुरेश खरे
* शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर, जयंत सावरकर

कर्मठ कुटुंबातील उपवर तरुणी. आईबाप तिचे लग्न जमवायच्या खटपटीत आहेत. त्या दरम्यान तिला एका चित्रनिर्मात्याकडून चित्रपटात काम करण्याची मागणी येते. त्यावरून घरात वाद होतो. त्यांच्या घरात तिचा एक सावत्र भाऊ देखील नांदत आहे. चित्रपटात जाण्यासाठी आई-वडिलांचा विरोध तर सावत्र भावाचा हट्ट असा तो पेच असतो.

एकंदरीत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून वडिलांना कर्जमुक्त करण्यासाठी ती चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेते. त्या क्षेत्रात वावरताना तिचा सावत्र भाऊ तिचा व्यवस्थापक अर्थात पुरुषी मालक बनतो. पुढे त्याच्या अहंकारापुढे ती पार कोमेजून जाते. तो तिला मद्यव्यसनी बनवतो आणि तिचे पूर्ण दमन करतो.
.... शोकांतिका !
(आवडले होते व ४ वर्षांनी दुसऱ्यांदा पाहिले) : https://www.youtube.com/watch?v=k9Ky18ZS88w

एक शंका :
“काचेचा चंद्र" याचा नक्की अर्थ काय ? काच तडकते त्यावरून काही त्यांना म्हणायचं आहे का ? कोणी सांगावे.

आई शिवाय घर नाही
लेखक : राजन लयपुरी व इतर
कलाकार : विलास व क्षमा राज, आकांक्षा वनमाळी आणि इतर

तरुणांमधील गर्दचे घातक व्यसन या सामाजिक-आरोग्य विषयावर.
उद्योगपती पुरुष आणि त्याची आमदार बायको यांचे आपल्या एकुलत्या एक मुलाकडे लक्ष नसल्यामुळे त्याला लागलेले व्यसन.
शोकांतिका

https://www.youtube.com/watch?v=YFP8uTK7r7Y

काचेचा चंद्र हे नाटक बहुतेक अभिनेत्री शांता आपटे यांच्यावर बेतलेलं आहे.
लहानपणी पाहिलेली पेपरातली जाहिरात लक्षात आहे. श्रीराम लागूंनी भावना ( अभिनेत्री) ला खांद्यावर उचलून घेतलं आहे.

अच्छा ! 'प्रभात 'च्या सुवर्णकाळात त्या गाजलेल्या नटी होत्या.
त्या अविवाहित होत्या परंतु नयना आपटे यांनी आपण त्यांची मुलगी असल्याचा दावा केल्याची विकीनोंद आहे.

आमच्याकडे काचेचा चंद्र चं पुस्तक होतं बरंच जुनं.त्यावर डॉ.लागुंचा तो नायिकेला उचललेला फोटो आहे.
काचेचा चंद्र हा ती काम करत असलेल्या रोमँटिक चित्रपट सेटवर असायचा.खिडकीतून खरा चंद्र म्हणून दाखवायला.त्याबद्दल तिचा एक मोठा मोनोलॉग आहे शेवटी दुःखी.(आता नाटकाचा शेवट पहिला त्यात नाहीये.मग बहुधा तिच्या संसारात सुखी प्रेग मैत्रिणीला ती भेटते तेव्हा असेल.इतकं भकास नाटक पूर्ण पाहिलं तर मला रक्त द्यावं लागेल.आपण डायलॉग पुस्तकात आहे हे नक्की.पुस्तक सापडलं तर बघते)संसाराचं, प्रेमाचं स्वप्न बरबाद होऊन फक्त काचेचा बेगडी चंद्रच नशिबात आला वगैरे.

काचेचा बेगडी चंद्रच
ओह ! आता नाटकाच्या शीर्षकाचा उलगडा झाला.
..
*नाटकाचा शेवट पहिला. त्यात नाहीये. >>>+१

कोर्ट मार्शल हे अनुवादित नाटक (मूळ हिंदी)
>>> याचा पान २ वर उल्लेख आहे.

हीच कथा असलेले 'शौर्यवान' हे मूळ दक्षिणी चित्रपटाचे ( Melvilasom) हिंदी रूपांतर इथे पाहता येईल :
https://www.youtube.com/watch?v=jYuicb9TUe8

‘ती फुलराणी’ हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे हे सर्वांना माहीत असते. परंतु या संकल्पनेचा मूळ उगम बराच प्राचीन असून तो रोचक आहे.

त्या घडामोडी अशा आहेत :
1. ग्रीक पुराणकथेमध्ये सायप्रस देशाचा राजा पिग्मॅलियन हस्तिदंतातून एक स्त्री-शिल्प कोरून काढतो आणि तिच्या प्रेमात पडतो. नंतर Aphrodite या नावाची देवता ते शिल्प Galatea या रूपात जिवंत करते. मग राजा तिच्याशी लग्न करतो.

2. यातून प्रेरणा घेऊन Metamorphoses हे महाकाव्य Ovid ने लिहीले.

3. त्यातून पुढे व्हिक्टोरियन काळातील Pygmalion and Galatea by W.S. Gilbert हे नाटक उभे राहिले.

4. पुढच्या टप्प्यात 1913मध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी त्यावरून पिग्मॅलियन हे नाटक लिहिले.

5. त्यानंतर 1938 मध्ये Pygmalion हा चित्रपट निर्माण झाला. त्यावरुन “माय फेअर लेडी” ही संगितीका 1956 मध्ये करण्यात आली.

. . . अखेरीस याचे मराठीतील रूप म्हणजे ती फुलराणी !

जावई माझा भला
रत्नाकर मतकरी
विक्रम गोखले, अमिता खोपकर, जयंत सावरकर व इ.

कौटुंबिक नाटक. मुलीचे लग्न हा विषय. हास्यविनोद, ताणेबाणे, भावनिकता, इत्यादी.
ठीक.
https://www.youtube.com/watch?v=9r6ewoRKXHg

खरं सांगायचं तर

रत्नाकर मतकरी लेखक
सुप्रिया पिळगावकर, अक्षय पेंडसे, विक्रम गोखले, सविता मालपेकर इत्यादी
विक्रम गोखले वकील आहेत, अक्षय पेंडसेच्या हातून एक खून झालाय किंवा त्यांचेवर आरोप आहे, सुप्रिया त्याची पत्नी.
कोर्ट केस डावपेच आणि खरं खोटं ह्याचे अंदाज असे पुढे सरकते कथानक.
चांगले वाटले. खूप उत्तम नाही. Acting चांगली सगळ्यांची.
क्लायमॅक्स मध्ये बुराई की हार type दाखवणे गरजेचे वाटले नाही.

खरं सांगायचं तर .... रत्नाकर मतकरी लेखक >>>
लेखक उदय नारकर आहेत; मतकरी नाही
( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

चांगले वाटले. +11

कुमार सर लेखक दुरुस्ती सांगितली ते बरे केले.
माझे चुकले असणार लिहिताना.

मोरूची मावशी
श्रीमंत दामोदरपंत हे कधीही बघितले तर मस्त मजा आणतात.

खरं सांगायचं तर प्रत्यक्ष बघितलं होतं. सुप्रियाने खूप छान अभिनय केला होता आणि तिला त्या भूमिकेसाठी बक्षीसही मिळाले होते. अक्षयचे अपघाती निधन झाल्यानंतर खूप दिवस हळहळ वाटत होती की याला आपण स्टेजवर बघितले आहे. आता तर विक्रम गोखलेही नाहीत.

Pages