मराठी : वाचन घडते कसे ?

Submitted by कुमार१ on 30 April, 2023 - 22:32

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्तमानपत्रं-
फक्त मटा रोज. लोकसत्ता क्वचित, आणि रविवार पुरवण्या. खरं तर बर्‍याच जुन्या रविवार पुरवण्यांचा ढीग जमा झाला आहे. त्या कधी वाचून होतील, देव जाणे. या पुरवण्यांमधलेही काही विषय अणि चर्चा इरिटेट व्हायला लागल्या आहेत. नेटवरची दैनिके कुठून कुणी एखादी आवर्जून लिंक पाठवली तर तेवढ्या लेखापुरती. मटा आणि लोकसत्ता अजून तरी बातम्यांबाबत आब राखून आहेत, आणि पार्शिलिटी करत नाहीत असं वाटतं. मात्र हेही अधूनमधून छोटे छोटे बाँब फोडतातच. मग पेपर फेकून दिला जातो. (नंतर पुन्हा उचलून नीट घडी घालून रद्दीच्या गठ्ठ्यावर ठेवावा लागतो, ते वेगळं).

राजकीय बातम्या करमणुकीसाठी वाचतो. त्या आदल्या दिवशीच (आपली इच्छा असो किंवा नसो) कळलेल्या असतात. मात्र वृत्तपत्रात यांचे वार्तांकन फार करमणुकप्रधान पद्धतीने असते. आपले सगळे प्रश्न सुटले असून आता फक्त करमणुकच काय ती कुठे मिळत नाही- अशी अवस्था. खास 'करमणुक' असं लिहिलेली पानं नि कॉलम मात्र वाचत नाही. क्रिकेट, अर्थ-गुंतवणुक (सेबी, स्टॉक मार्केट, सोन्याचे भाव, जीडीपी यातलं काहीही समजत नाही. याचा फायदा असा- की आपला अर्थमंत्री कुणीही असला तरी आपल्याला त्रास होत नाही), स्थानिक (टोमॅटो महाग, भेंंडी स्वस्त, कर्नाटक आंबा आवक, अधिकार्‍यांच्या बदल्या, काँग्रेस भवनात स्वतःच्याच नगरसेवकांची झाडाझडती इ.), अतिस्थानिक (रागात येऊन डोके फोडले, अपहार, बलात्कार, विनयभंग, कोयता गँग, फेसबुकवणुक इ.) यांच्या मथळ्यांवर फक्त नजर फिरवतो.

साहित्य, इतिहास, संस्कृती, सांस्कृतिक संचित, कला, कलाप्रदर्शने यांबद्दल आवर्जून वाचतो. देवाशी अजिबात संबंध नाही, पण देवळांबद्दल जरूर वाचतो, बघतो. परदेशी घटना, जागतिक राजकारण, विज्ञान, ज्येष्ठ आणि बुद्धिमान लोक काय म्हणतात ते वाचायला आवडतं. मटामध्ये 'डायरी' कॉलम जरूर वाचतो. आज साहित्य-कला-राजकारण-शिक्षण या क्षेत्रांत काय काय कार्यक्रम आहेत- त्याची संक्षिप्त यादी असते.

वाहतुक, नागरी समस्या आणि सोयी, मेट्रो-रिंग रोड-पीएमटी, नवीन पूल आणि इंफ्रास्ट्रकचर बद्दलच्या बातम्या आवर्जून वाचतो. याबरोबरच यांच्या भूमीपूजन, उद्घाटन आणि श्रेयलढाईवीर यांबद्दलच्या बातम्या फुकटच पदरी पडतात. त्यातही करमणुक असतेच. ती गोड मानून घेतो.

छापील दैनिकं ओव्हरऑल सामाजिक कलेक्टिव आकलन आणि अभिरूची यासाठी जगली पाहिजेत. ऑथेंटिसिटी आणि ग्रॅव्हिटी कशात आहे, हे कळण्यासाठी ती महत्वाची आहेत. यात थिल्लर पेपर, बातम्या आणि पार्श्यालिटी हेही सोसणं आलंच, पण तरी ते ठीक आहे. भूतकाळातले थोर संपादक आणि दैनिकांची परंपरा वगैरे सोडा, पण भविष्यात बघितलं, तरी ही आवश्यक आहेत. मात्र कधीतरी वाटून जातंच की हे वाचणारी माझी शेवटची पिढी ठरेल.

नियतकालिकं-
फारशी वाचून होत नाहीत. ललित, अनुभव, सजग, साधना अशी कितीतरी महत्वाची नियत्कालिकं आहेत, ती वाचली पाहिजेत. दैनिकांच्या जोडीला चिंतन आवश्यक आहे. रोजच्या बातम्या आणि कॉलम यांच्या जोडीला या सार्‍यावर बर्ड्स आय व्ह्यू मिळणं आवश्यक आहे. बातम्यांच्या आशय कळला तरी, त्यांचा अर्थ, त्यांचे परिणाम आणि एकुणच आपल्या भवतालातलं त्यांचं महत्त्व आणि उपद्रवमुल्यं यांवर ही नियतकालिकं प्रकाश टाकत असतात, म्हणून तीही जगली पाहिजेत, आणि आपण ती वाचली पाहिजेत. दिवाळी अंक मात्र काही प्रमाणात वाचले जातात. तेही लायब्ररीतून. ते विकत घेणं काही वर्षांपुर्वी बंद केलं.

मराठी संस्थळे-
मायबोली. पुर्वी मिसळपाव, मनोगत, उपक्रम, ऐसी.. इ. वर वावर होता. मात्र यांवर लिहिलं कधीच काही नाही. मायबोलीवर २००८ पासून सक्रिय आहे आणि आजवर इथंच रमलो आहे. इथं आधार मिळाला, मित्र मिळाले, भान मिळालं, ज्ञान मिळालं, माझ्यातच असलेला ह्युमर आणि त्याचा सेन्स सापडला, विचार करण्याच्या अभिनव पद्धती सापडल्या, नवीन परिप्रेक्ष्ये मिळाली, लिहिण्याचा आत्मविश्वास आणि थोडीफार प्रसिद्धीही मिळाली. मी केलेलं बहुतांश लिखाण इथंच आहे, त्यातलं बरचसं नंतर मासिकं-दिवाळी अंकातही प्रसिद्ध झालं. इथलं लिहिणं आता जवळजवळ थांबलं असलं, तरी वाचतो मात्र रोज (ब्रोजरवरच्या बुकमार्क्सचा क्रम जीमेल, मायबोली, फेसबुक, अ‍ॅमेझॉन सेलर, गुगल मॅप्स, मग कामासंदर्भात, आणि मग ओटीटी... वगैरे असा आहे. सकाळी याच क्रमाने सारे टॅब ओपन होतात. या निमित्ताने ''तुमच्या बुकमार्क्सचा क्रम काय आहे?'', असा एक सर्वे सुचवून ठेवतो.). गुलमोहर वाचन कमी झालं आहे. राजकीय चर्चा वाचतो. इथंही हेतू करमणुक हाच असला तरी इथल्या काही लोकांचं लिखाण आणि माझ्या मतांच्या विरुद्ध मतांच्या आणि इन्क्लिनेशनच्या पोस्ट्स सुद्धा काहीतरी नवीन भान, विचार आणि दिशा देऊन जातात. पाककला, क्रिकेट, स्पोर्ट्स, टीव्हीमालिका, अर्थकारण वगैरे विभागांकडे फिरकत नाही. कविता-गझल आता वाचणे होत नाही, मात्र इथंच अनेक नितांतसुंदर आणि आशयघन कविता वाचल्या आहेत, हे विसरलो नाहीय..

पुस्तके-
पुस्तकं वाचणं हा माझा घरातला स्वतंत्र आणि स्वतःचा असा केंद्रशासित प्रदेश आहे (खरंतर तो कुणाचा नसतो?). वाचणं होतंय की नाही हा भाग सोडा, पण उशाशी असलेलं पुस्तक एक प्रकारचा आर्द्र आणि स्नेहाळ असा भक्कम आधार देतं. बाहेरगावी गेलो तरी ते सोबत असतं. वाचून झालं नाही तरी सॅक/बॅगमधलं त्याचं अस्तित्त्वच पाठीवरून हात फिरवणारं असतं. मात्र पुस्तक विकत घेणं आता थांबलेलं आहे. आता फक्त पुणे नगर वाचन मंदिर. रोज ५ पासून ५० पर्यंत कितीही पानं वाचून होतात. कामाच्या आणि जगण्याच्या एकुण रहाटगाडग्यात यापेक्षा जास्त वाचता येत नाही याचं मनापासून वाईट वाटतं. काम बंद कधी करेन ते माहिती नाही, मात्र त्यानंतर पुस्तकांसाठी तरी डोळे शाबूत असावेत ही इच्छा आहे. किती भाषा, किती प्रदेश, किती देश आणि किती विषय.. हे सगळं कधी वाचून होईल- याबद्दल अँग्झायटीही येते कधीतरी. 'चांगली माणसं मोजायला हाताला हजार बोटं असोत, सापडत नाही बिचारी..' असं नेमाड्यांसारखं फिलिंग येतं. वर कुणीतरी महिन्याला २० किंवा जास्त पुस्तकं वाचली जातात- असं लिहिलं आहे- त्यांचा हेवा वाटला. फार पुर्वी मी फेसबुकवर पोस्ट टाकली होती- "मरेपर्यंत २-३ हजार, आणि फारच फाईट मारली तर ३-४ हजार पुस्तकं वाचेन असा अंदाज आहे. म्हणजे एकुण येऊन येऊन किती अक्कल येणार आहे ते दिसतंच आहे!"

किंडल घरात आहे, मात्र ते घरातले इतर लोकच वापरतात. मी कधीच नाही वापरलं. यापुढेही वापरेन असं वाटत नाही. याबद्दल अनेकांनी बरंच लिहिलं आहे, ते पुन्हा लिहित बसत नाही.
कोविड काळात श्राव्य माध्यम (बहुतेक) पहिल्यांदा वापरलं. तेव्हा काही कामच नव्हतं, आणि स्क्रीनवर डोळे किती फोडणार? पण नंतर ते पुन्हा थंडावलं. आधीही जमेल तसं चालत वगैरे होतोच, पण काही महिन्यांपुर्वी एका आजारपणाचं निमित्त होऊन सक्तीचं भरपूर चालणं वाट्याला आलं, आणि हे नवीन जग माझ्यासाठी उघडलं गेलं. इथं मात्र कटाक्षाने मराठी ऐकायचं नाही, असं ठरवलं. (इथलं मराठी कंटेंट तसं न ऐकलं तर बरं असंच जवळजवळ आहे, असं वाटतंय. मात्र याबद्दल कुणी काही सूचना केल्यास आभार). या निमित्ताने हिंदी साहित्यिकांची नव्याने ओळख झाली. हेही साहित्य वाचलं पाहिजे असा घाट घालता आला, हे श्राव्य माध्यमाचं देणं मान्य केलं पाहिजे. यातलं जास्त काय आवडतं- असा प्रश्न आहे; तर त्याला मी, माझी खोली-माझा लँप, हातात पुस्तक, फोन आणि कान बंद- असंच उत्तर आहे.

आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार- हा जरा मोठा विषय आहे, आणि स्वतंत्र लेखाचाही. प्रत्येक जण यावर लेख लिहिल. फिक्शनशी थोडं जवळचं नातं आहे असं वाटतं. कवितासंग्रह क्वचितच वाचलेत (मर्ढेकर, कुसुमाग्रज, दिपु, ढसाळ, सुर्वे). दाभोळकर किंवा कुरूंदकर (लगेच सुचलेली उदाहरणं, असे बरेच) सारख्यांची पुस्तकं मनापासून आवडतात. अनुवादित पुस्तकांत अचानक महान रत्नं सापडतात. गाओ झिंगजिआन नावाचा महान माणूस मला असाच सापडला. आणि असे अनेक. चित्रपट-नाटक आणि त्यांचा इतिहास यावरची पुस्तकंही आवडतात. नावडणार्‍या पुस्तक-लेखक-विषय यांची यादी मोठी आहे. ते असो.

भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहातील का ते माहिती नाही. हा आणखी वेगळा मोठा विषय. माझा जन्म असेतोवर ती राहतील हे स्पष्ट आहे. ज्यांच्या काळात ती समजा राहणार नाहीत, तर देअर लॉस, यू नो.
-----------

फॉर्ममध्ये दिल्याप्रमाणे संक्षिप्त उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. मात्र हा फॉर्म स्वतःच ट्रिगर होता. त्यामुळे हे असं थोडंसं असंबद्ध किंवा मराठीच्या पेपरातल्या उत्तरांसारखं काहीतरी झालं. पण इथं प्रतिसाद ओलांडायची सोय आहे. हे सारं माझ्या नोंदीपुरतं आहे, आणि यासाठी धागाकर्त्याचे आभार..

Google news चा एक अतिशय दुर्गम म्हणुया हवं तर किंवा मर्यादा,
तुम्हाला आवडतील, किंवा तुम्ही वाचलं त्याच बातम्यात किंवत्या पद्धतीने तुमच्या समोर येतात. त्यामुळे बरेचदा subjective ( सापेक्ष) वाचन होत. पैकी वर्तमान पत्रात सगळं सरसकट वाचायला मिळत.

वृत वाहिन्या अमेरिकेच्या किंवा भारताच्या ( निःपक्ष पणे ) बातम्या द्यायच्या ऐवजी त्यांचे viewpoints (मते) तुमच्या गळी उतरवण्याच्या मागे असतात.
त्या मानाने स्थानिक वाहिन्या फक्त बातम्या देतात.

साजिरा
चिंतनस्वरूप दीर्घ प्रतिसाद आवडला.

*दैनिकांच्या जोडीला चिंतन आवश्यक आहे. >>>+११११
*पुस्तकं वाचणं हा माझा घरातला स्वतंत्र आणि स्वतःचा असा केंद्रशासित प्रदेश आहे
>>>
मस्तच!

साजिरा
चिंतनस्वरूप दीर्घ प्रतिसाद आवडला. +१
तुम्ही पुन्हा नियमित लिहायला लागा . Happy

अनिंद्य, पोस्ट आवडली. Happy

साजिरा
चिंतनस्वरूप दीर्घ प्रतिसाद आवडला. .....+१.

साजिरा, प्रतिसाद आवडला.
"हे सगळं कधी वाचून होईल- याबद्दल अँग्झायटीही येते कधीतरी." नियतकालिके , पेपरातल्या बातम्या अशा अनेक मुद्द्यांसाठी +१. शनिवार रविवारच्या पुरवण्या माझ्याकडेही पडून आहेत.
लोकसत्ताची रोजची ओप एड पेजेस बघत जा , असं सुचवेन.

साजिरांकडून मभादि साठी लेखन मागवलं आणि त्यांनी ते दिलं. मला ते लेखन अनुवाद म्हणून सुद्धा विशेष आवडलं. मुद्रितशोधन करताना कादंबरीतील ती प्रकरणे दोन तीन वेळा वाचली गेली आणि खूप आवडली. पण नंतर प्रतिसाद द्यायचा ( मभादिवरच्या सगळ्याच प्रवेशिका आणि लेखांवर प्रतिसाद द्यायचे राहून गेलेत) राहून गेला. पण तिथे एकही प्रतिसाद आला नाही, याचं वाईट वाटलं. ते अनेकांनी वाचलं आहे हे नक्की.

व्वा साजिरा ! एकदम मस्त प्रतिसाद.
या फॉर्मच्या निमित्ताने अशी चर्चा व्हायला हवी हे लक्षात आले. खूप खूप धन्यवाद.

वाचन सध्या होत नाही. पण काळानुसार लेखकांचे विषय कसे बदलत गेले या उत्सुकतेने अजूनही वाचतो. मंटोच्या काळातल्या प्रायॉरिटीज, तत्कालीन वातावरण, फनीश्वरनाथ रेणू यांच्या दृष्टांत कथा. प्रेमचंद यांच्या काळातला आदर्शवाद, मूल्ये. आज यातल्या कोणत्या गोष्टी हरवल्या आहेत , आज अशा कथा नव्याने आल्या तर त्यात काय बदल असतील ही उत्सुकता असते. तीच गोष्ट चित्रपटांबाबत.

मराठीत अजूनही जुन्या लेखकांनाच वाचले जाते. हा काळ सरला आहे. नव्या लेखकांची नावेही माहिती नाहीत. शोध हा चांगला प्रयत्न होता. मुरली खैरनार मित्रच होते. पण कुणाची तरी शैली, घाट जसाच्या तसा उचलला आहे. कथेचा प्लॉट फक्त स्वदेशी आहे. जुन्या लेखकांवर सुद्धा जागतिक कलाकृतींचा प्रभाव जाणवतो. त्याचे देशीकरण केले आहे असे वाटते.

वर्तमानपत्रात लेख लिहीणारे एके काळी देवदूत वाटत असत. इंटरनेट आल्यानंतर इकडून तिकडून कॉपी पेस्ट करून भाषांतर करण्याचे कौशल्य जाणवते. वाचवत नाहीत लेख.

जुन्या लेखकांवर सुद्धा जागतिक कलाकृतींचा प्रभाव जाणवतो.
>>> +111

मध्यंतरी माझे मराठी नाटकांबद्दल बरेच वाचन आणि थोडेफार लेखन झाले. तेव्हा हाच प्रश्न पडला. त्या काळातील पट्टीचे लेखक व नाटककार यांनी आपल्या मातीतली काही नाटके खरोखर चांगली लिहिलीत. परंतु त्या लेखकांना सुद्धा काही परदेशी नाटकांचे रूपांतर का करावेसे वाटले असा एक प्रश्न पडला. या संदर्भात त्या काळातील दोन लेखकांचे मनोगत
“गोष्ट खास पुस्तकाची” ( https://www.maayboli.com/node/82869) या पुस्तकात वाचायला मिळाले. त्यातून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर बऱ्यापैकी मिळाले. २ उदा. देतो..

१. रत्नाकर मतकरी म्हणतात,

“ एखाद्या मराठी लेखकाने भारतीय परंपरेशी फारकत घेणारी रचना मूळ मराठीतच लिहिली तर ती आपल्याकडे सहन केली जात नाही. तसे काही करायचे असेल तर त्यासाठी आपण परदेशी लेखक असलेले बरे !
मुळातच मी आरण्यक नाटक स्वतंत्रपणे मराठीत लिहिल्यावर मराठी साहित्य कसले डोंबलाचे संपन्न होणार?"

२. हमो मराठेनी सुद्धा मराठी समीक्षकांच्या पाश्चात्य धार्जिण्या वृत्तीवर टीका केली आहे :

“ त्या काळी काफ्का, काम्यू इत्यादी पाश्चात्य लेखकांचा धाक दाखवण्याची मराठी समीक्षेत प्रथाच होती. सध्या कोणत्या पाश्चात्य लेखकांचा धाक मराठी समीक्षक दाखवतात हे मला माहित नाही !”
..
परदेशी साहित्याचे अनुवाद जरूर व्हावेत. परंतु समीक्षकांच्या तथाकथित धाकामुळे परदेशी प्रभावाचे मराठी साहित्य तेव्हा लिहीले जात होते का, असाही एक प्रश्न पडला.

परंतु समीक्षकांच्या तथाकथित धाकामुळे परदेशी प्रभावाचे मराठी साहित्य तेव्हा लिहीले जात होते का >>

दूरदर्शनवर एका गाजलेल्या ऐतिहासिक कादंबरीकाराची मुलाखत पाहिली होती. त्यांनी कॉलेजला असताना शेक्सपीअर अभ्यासला होता. त्या वेळी असे काहीतरी आपल्याकडे असावे ही तेव्हांपासूनची इच्छा होती असे सांगितले. त्यांचा जो कॉलेजचा, नंतर साहित्यिक गप्पांचा ग्रुप सांगितला ते सगळेच नंतर लेखक म्हणून नावारूपाला आले. यातल्या बर्‍याच जणांच्या मुलाखतीत कॉलेजच्या काळातला शेक्सपीअर व अन्य पाश्चात्य साहित्यिकांचा प्रभाव हे येऊन गेलं.

यातल्या अनेकांनी भरजरी साहित्यासाठी मग तीनशे साडेतीनशे वर्षांचा परिचित काळ निवडला. त्या काळावर आपल्याकडे भरपूर लिखाण झाले. पण इतर अनेक साम्राज्ये , सम्राट यांच्याकडून दुर्लक्षित राहिली. महाभारतावर सुद्धा लिहीले. आपल्याला चोळ, चालुक्य, मौर्य, गुप्त, यादव, सातवाहन अशा अनेक सम्राटांबद्दल माहिती नाही. अशा वेगळ्या वाटा मराठीत फारशा चोखाळल्या जात नाहीत.

मानधन हा सुद्धा ड्रायव्हिंग फोर्स असावा असे वाटते. ज्या लेखकांना अमाप प्रसिद्धी मिळते, जे प्रथितयश पब्लिशिंग हाऊसचे डार्लिंग असतात त्यांचेच लिखाण पोहोचते.

इंग्रजीतून मराठीत भाषांतरित / रूपांतरित होणाऱ्या साहित्याचा मुद्दा वर आला आहे. इंग्रजी / अन्य युरोपियन नाटककारांची नाटके आणि इतर साहित्य भारतीय भाषांमध्ये बऱ्यापैकी अनुवादित -रूपांतरित झाल्यामुळे विषय, भाषा, कथाबीज, लहेजा, हाताळणी-फॉरमॅट, रूपकं यांची श्रीमंती वाढलीच आहे, कमी झाली नाही.

भारतीय भाषांमध्ये मात्र आपापसात साहित्यिक देवाणघेवाण वाढायला खूप म्हणजे खूपच स्कोप आहे. गिरीश कर्नाडांचे नागमंडल पंजाबीत, अमृता प्रीतमच्या कथा - नागार्जुनांच्या हिंदी-मैथिली कविता मराठीत असे देशी भाषांचे झाले तरी अद्भुत वैविध्य आहे. देश प्रचंड मोठा आणि साहित्यश्रीमंत आहे. अनुवाद, Idea exchange and Adoption वाढल्यास साहित्यातले साचलेपण दूर होऊन वाचकांना आणि भाषाप्रेमींना 'झोळी दुबळी' असे फीलिंग येईल, शंकाच नाही.

असेच मराठीतले सकस साहित्य अन्य भारतीयांना उपलब्ध होईल / व्हावे.

असो.

भारतीय भाषांमध्ये मात्र आपापसात साहित्यिक देवाणघेवाण वाढायला खूप म्हणजे खूपच स्कोप आहे
>> +११
काही मराठी साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.
पटकन आठवणारे नाव म्हणजे 'कोसला' (८ भारतीय भाषांमध्ये).
https://en.wikipedia.org/wiki/Kosala_(novel)

विजय तेंडुलकर यांची काही नाटके अन्य भारतीय भाषांमध्ये गेलेली आहेत.

चांगली चर्चा. वाचतोय.
छापलेल्या पुस्तकांमध्ये वाचलेले खूप वर्षे लक्षात राहते. ऑनलाइनचं तसं होत नाही

आपल्याला चोळ, चालुक्य, मौर्य, गुप्त, यादव, सातवाहन अशा अनेक सम्राटांबद्दल माहिती नाही.
याबद्दलची इंग्रजी पुस्तके आहेत पण मराठीत अनुवाद केल्यावर ती खपतील याची खात्री प्रकाशकांना वाटत नसावी.
उदाहरणार्थ Lords of the Deccan -Challukyas to Cholas - Anirudh Knisetti.
हे मी oudl.ac.in [ osmania university digital library वरून म्हणजे archive.org /openlibrary.org येथून उतरवले आहे. आता ते तिथे दिसत नाही.] 'History of India' search केल्यास बरीच कॉपीराइट फ्री पुस्तके दिसतील.
पण ही मराठीत अनुवादित होण्याची शक्यता नाही.

साजिरांकडून मभादि साठी लेखन मागवलं आणि त्यांनी ते दिलं. तिथे एकही प्रतिसाद आला नाही, याचं वाईट वाटलं. ते अनेकांनी वाचलं आहे हे नक्की.
+1 भरत.
संयोजक टीममध्ये असल्याने त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज व्हावे असे वाटत होते.
-------
चर्चा छान.
आचार्य यांच्या वरच्या पोस्टशी सहमत.

भारतीय भाषांमध्ये मात्र आपापसात साहित्यिक देवाणघेवाण वाढायला खूप म्हणजे खूपच स्कोप आहे
>> +११

प्रश्नपत्रिका फारच मोठी आहे डॉक्टर. शिवाय बराचसा अभ्यास हा ऑप्शनला टाकलेला असल्यामुळे इतके दिवस उत्तरं सुचेनात. शेवटी न राहवून प्रामाणिक उत्तरं लिहायचा प्रयत्न केला आहे:

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
रोज एकही नाही. छापील - वर्षातून एकदा. क्वचित आंतरजालीय. हपिसात प्रचंड काम असेल तर ताणशमनासाठी कधीकधी लोकसत्ता वाचतो. मज्जा येते.
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
दोन्ही. बातम्या आधी दिसतात म्हणून वाचतो.
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
भाषाविषयक सदरे किंवा संपादकीय वाचतो. कधीकधी पेज थ्री बातम्याही वाचतो.
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
बातम्या.
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
नाही. आणि तशी ती चालू राहतील याची शक्यताही कमीच वाटते.

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
कोणतीच नाही. कधी आठवण झालीच तर जुने दिवाळी अंक वाचतो. जुन्या घरी गेलो की पूर्वीचे माझे चांदोबा, किशोर वगैरे काढून वाचतो. ते संग्रही आहेत. अमृत मासिकाचे अगदी थोडे अंक शिल्लक आहेत घरी.
२. त्यातील आवडणारी सदरे
विक्रम वेताळ, रामायण - चांदोबामधील
मुरावि आणि उसंडु - अमृत
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
खूपच. कळतं, पण वळत नाही.

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
माबो.
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
दररोज
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
असे काही विशिष्ट लेखनप्रकार नाहीत. चांगलं लिहिलेलं काहीही आवडतं.
४. नावडणारे विभाग / प्रकार
असे काही विशिष्ट लेखनप्रकार नाहीत. वाईट लिहिलेलं काहीही नाही आवडत. पण अगदी फारच वाईट लिहिलं असेल तर मात्र फार्फार आवडतं कारण त्याखाली लोकांचे प्रतिसाद वाचायला एकदम मज्जा येते. Happy
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
मुख्यतः वाचक. स्वतंत्र लेखन फारच कमी. त्यातल्या त्यात नियमित म्हणजे मी प्रतिसाद लिहितो.

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
सध्या जवळपास शून्य
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
शून्य असल्यामुळे 'यापैकी नाही' हा पर्याय घेतो.
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
वाचन आवडतं पण श्रवण नुकतंच चालू केलं कारण ते जाता येता करू शकतो. मी पहिलं पूर्ण ऐकलेलं पुस्तक - पोन्नियीन सेल्वन भाग १ इंग्रजी अनुवाद (अभिवाचक - अमित भार्गव) - हे फारच आवडलं. त्या आधी मिथॉस नावाचं पुस्तक ऐकायला घेतलं - गाडी चालवता चालवता, पण मला झोप यायला लागली. तडक बंद केलं. नंतर 'सारे प्रवासी घडीचे' ऐकलं. ते पूर्वी वाचलंही होतं. अजित भुरे यांनी छान वाचलं आहे. नंतर 'समुद्र' (मिलिंद बोकील) ऐकलं.
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
तीनही. श्रवणानुभवावरून सांगतो. विकतची अभिवाचनं जितकी दर्जेदार आहेत, तितकीच मोफतची अतिरटाळ, कंटाळवाणी आहेत.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
आवडणारे - इतिहास, ललित, कॉमिक्स (जुने - चाचा चौधरी, डायमंड कॉमिक्स - नागराज वगैरे)
नावडणारे - सेल्फ हेल्प, मॅनेजमेंटचे फंडे, द सिक्रेट टाइप पुस्तके
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
हो.

वा, मस्त !

मुरावि आणि उसंडु - अमृत >>>> +१११ Happy

मराठी पुस्तकं विकत घेत नाही. ती वाचनालयात स्वस्तात वाचायला मिळतात. ठेवायची जागा,खर्चलेले पैसे हा प्रश्न निकालात निघाला.
इंग्रजी पुस्तकंही विकत घेत नाही. ती वाचनालयात फारशी नसली तरी ओनलाइन फुकट मिळतात ती वाचतो.
मराठी इंग्रजी पेपरस घरी घेण्याचं बंद करून पंधरा वर्षं झाली.
एकूण आनंदीआनंद आहे.

महाराष्ट्रदिनी चालू केलेल्या या भागाला आज दीड महिना पूर्ण झाला. आपल्या या छोट्याशा सर्वेक्षणातील “छापील दैनिके आणि छापील पुस्तके” यांच्या भवितव्यासंबंधीच्या मतांचे हे संकलन :
A. एकूण प्रतिसादक २०
B. त्यापैकी छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे ८ जणांचे मत तर ४ जणांनी ती वाचायची केव्हाच बंद केलीत. बाकीच्यांनी यावर मत दिलेले नाही.

ती चालू राहावीत असे वाटणाऱ्यापैकी काहींनी त्याची स्पष्ट कारणे दिली आहेत.
कुणाला रोज सकाळी चहा घेताना मांडी घालून पेपर पसरून वाचण्यातली मजा हवी आहे; तर कुणाला ती एकंदर सामाजिक आकलन आणि अभिरूची यासाठी जगायला हवीत; आणि कुणाला ती कमीतकमी पृष्ठसंख्येची असावीत असे वाटते.
C.
छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे तब्बल १३ जणांनी नमूद केले आहे.

त्यापैकी बहुतेकांना या पुस्तकांचा वास, स्पर्श, मजकूर हवाहवासा वाटतो तर कुणासाठी ती एक ध्यानाचे साधन देखील आहेत ! तर काहींनी छापील व इलेक्ट्रॉनिक अशी दोन्ही पुस्तके कायम असावीत असे म्हटले आहे.
एखाद दुसऱ्या वाचकालाच श्रवण मनापासून आवडते असे दिसले.

आपला बहुमूल्य वेळ खर्चून मराठी वाचनासंबंधीची ही लांबलचक प्रश्नपत्रिका भरभरून सोडवल्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !!

दैनिकातली नवी सुधारणा

सकाळचा स्मार्ट इ पेपर प्रथमच पाहिला.
छापील अंक जालावर वाचताना मांडणी खूप छान दिसते आणि उजव्या कोपऱ्यात खाली पान उलटायची दुमडलेली खूण आहे. ती पण मस्त दिसते.
जरूर बघा !
https://epaper.esakal.com/smartepaper/UI/

"बागेत बसून शांतपणे वाचा"
(Cubbon reads)

हा सुंदर उपक्रम 7 जानेवारी 2023 रोजी बंगळूर येथील कब्बन पार्कमध्ये तरुणांनी चालू केला. आता तो भारतभर आणि परदेशातील काही शहरांमध्ये देखील विस्तारला आहे.

आठवड्यातील एका दिवशी आपापले पुस्तक घेऊन एका विशिष्ट बागेत येऊन आणि पथारी टाकून अनेक लोक शांतपणे वाचत बसतात. वाचायला आणलेले पुस्तक छापील, इ किंवा इयरफोन्सद्वारा श्राव्यसुद्धा चालू शकते.

आताच वसंत आबाजी डहाके यांची मुलाखत दूरदर्शनवर पाहतो आहे.

त्यातील त्यांचे खालील उद्गार रंजक आहेत :

" वर्तमानपत्र हा माझा आवडता वाङमय प्रकार आहे; तो मी कधीही, कुठेही व कितीही वाचत असतो !"

गेले काही महिने रविवारच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये “वाचाल तरच वाचाल” हे सदर प्रसिद्ध होत असते. त्यात दर वेळेस दोन लेखक लिहीत असतात.
आजच्या अंकातील डॉ. सतीश ठिगळे यांच्या लेखातील खाली दोन वाक्ये आवडली :

“.. आज वाचन संस्कृती जपली गेली आहे, रोज सकाळी लाखो घरांमध्ये येणाऱ्या वृत्तपत्रांमुळे. .... मराठीतून वृत्तपत्रे वजा केल्यास नित्यनियमित वाचकवर्ग शोधावा लागेल ही वस्तुस्थिती आहे.. “

Pages