मराठी : वाचन घडते कसे ?

Submitted by कुमार१ on 30 April, 2023 - 22:32

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३० किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुंबई-पुणे-नाशिक सारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरात राहाणाऱ्या समृद्ध घरच्या मराठी मुलांना “गेल्या एका वर्षात कोणते “मराठी” पुस्तक वाचले?” असा प्रश्न विचारून बघा. पुस्तक त्यांनी विकत घेतलेलेच असावे असेही नाही.

अक्षरशः हजारो मराठी मुलांनी पाठ्यक्रमात असलेल्या सक्तीच्या मराठी पुस्तकाव्यतिरिक्त एकही मराठी पुस्तक वाचलेले नसते हे कटू सत्य. खुद्द मराठी भाषा शिकणारे- शिकवणारे मराठी पुस्तके वाचत असतील थोडीफार पण त्यांची संख्या ? >>
ही परिस्थिती २५-३० वर्षांपूर्वी ही असावी. माझ्या अनेक मित्र मैत्रिणी पाठ्य पुस्तका व्यतिरिक्त एकही पुस्तक वाचत (त्यावेळी आणि आत्ताही) नव्हते .. बरं हे सर्व चांगली शाळा, उत्कृष्ट वाचनालये, शहरी भाग ह्या गटात मोडणारे... हुशार (पहिल्या दहात येणारे)
मला वाटत की हा प्रश्न फक्त आताचा नाही. आता कदाचित प्रमाण वाढत चालले असेल.

वाचन संस्कृती रुजविणे हे आपल्याकडे दुर्लक्षित राहिले आहे.

कसे वाचावे ह्याचे धडे अमेरिकेतील शाळांमध्ये देतात, वयोगटानुसार , आकलनानुसार ते अधिकाधिक अवघड होत जातात. तसे आम्हाला कधी कुणी शिकवल्याचे आठवत नाही.

**"

माधुरी पुरंदरे यांनी वाचावे नेटके ह्या पुस्तकात तसे केल्याचे ऐकले आहे. पुस्तक मला वाचायला मिळाले / जमले नाही.

Quest या संस्थेतर्फे एक शिबिर झाले होते त्यात त्यांनी मुलांना वाचायला कसे शिकावे हे छान सांगितले. आणि तसे प्रशिक्षण ते शाळेतील शिक्षकांना देतात.

Accountancy accrual system च्या भाषेत बोलायचे तर असलेले पैसे खर्च केल्यावर काय होते? तर ते गुंतवणूक खात्यात जमा होतात किंवा खर्च खात्यात वर्ग होतात. पुस्तकांच्यावरचा खर्च आपण गुंतवणूक खात्यात टाकतो. म्हणजे त्यातून आपल्याला परत परत काही मिळत राहणार आहे ही इच्छा. परंतू सिनेमा नाटक, हॉटेल खादाडी, पर्यटन यांवर खर्च केलेले पैसे ( मोठी रक्कमही) मात्र बिनदिक्कत खर्च खात्यात टाकून मोकळे होतो. पुस्तके नंतर किलोच्या भावाने रद्दीत विकताना फार दुःख होत राहाते.

चांगली चर्चा
सर्वांचे दृष्टिकोन समजल्याने समाधान वाटले.
धन्यवाद.

पुस्तके नंतर किलोच्या भावाने रद्दीत विकताना फार दुःख होत राहाते.

नवीन Submitted by Srd on 24 August, 2025 - 22>>>> मी तो अनुभव काढ घेतला नाही कारण आम्ही पुस्तके कुठल्यातरी वाचनालयाला, कोणा मुलांना, एखाद्या गावाकडच्या शाळेला देऊन टाकतो..

विचार करा की raddivala ती पुस्तक स्वस्तात कुणाला तरी विकतच असेल, कुणा एकाला त्याच्या जवळ पैसे नसतील तर ती स्वस्तात वाचायला मिळतील.

कॉलेज मध्ये मी काही पुस्तक ( फिक्शन्स ) अशी द्यायचे विकत..

कपडे जून झाले तर आपण टाकतोच ना .. ते पण पैसे देऊनच आणलेले असतात...

मुख्य मुद्दा पैसे हा नसून त्याचे आपल्याला वाटणारे महत्व हा आहे.

On a lighter note .

Engineering ची पुस्तके, नोट्स, रद्दी विकताना अतीव आनंद व्हायचा.. कारण ते पैसे pocket मनी मध्ये भर घालायचे. Lol
त्याच्या पण गमती असायच्या ..

>>>>कपडे जून झाले तर आपण टाकतोच ना
नाही गं मी चांगले कपडे, त्या शूज+ कपडे डोनेशनच्या बॉक्स्मध्ये टाकते. फार फार विटके वगैरे टाकून देते.

>> मुख्य मुद्दा पैसे हा नसून त्याचे आपल्याला वाटणारे महत्व हा आहे. >>
अं हो.

डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररी इतर आणखी प्रायोजकांच्या मदतीने पुस्तके बदलून देते तिथून तीन वेळा बदलली मी. अयोध्या संपल्यावर २०२३ फेब्रुवारी मध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला आणि खूप पुस्तके आली. त्यात धार्मिक आणि कादंबऱ्या नव्या कोऱ्या होत्या.

नाही गं मी चांगले कपडे, त्या शूज+ कपडे डोनेशनच्या बॉक्स्मध्ये टाकते. फार फार विटके वगैरे टाकून देते.>>> हो तेच आम्ही पण .. पण म्हणजेच. पैसे दिलेत म्हणून देऊन न
टाकता घरी ठेवून देत नाही.
चांगले आहेत आपल्याला नकोत तर दुसऱ्याला उपयोगी पडतील..
असो हे फार अवांतर होतंय..

डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररीचे अनेक उपक्रम चांगले असतात. वर्षातून एकदा पुस्तक बदलून मिळतं फक्त 10 रु द्यावे लागतात. एकदा फडके रोडवर फुकट पुस्तकं वाटायला ठेवतात, ते प्रदर्शन लावतात. जुनी असतात पण कधी कधी हवी ती मिळतात, चौघीजणी मला असंच मिळालं आहे. या उपक्रमात माझी भाची आणि तिच्या मैत्रिणी रात्रभर पुस्तकं लावायला जातात, विद्यानिकेतन शाळेतर्फे volentier म्हणून. भाचीबरोबर सोबतीला बहीण जाते, ती ही मदत करते.

यंदा हा उपक्रम झाला नाही कारण ज्यावेळी होणार होता त्याच्या जस्ट आधी कश्मीर अतिरेकी हल्ला झाला म्हणून रद्द केला.

इराण बद्दल माहिती घेत असताना उलट सुलट लेख, व्हिडीओ वाचण्या पाहण्यात आले. अलिकडचा इराण कसा आहे याबद्दलची उत्सुकता होती. १९७९ पर्यंत हा तुर्किये प्रमाणेच एक खुल्या विचारांचा मुस्लिम बहुल देश होता जिथे धार्मिक कायदे नव्हते. स्त्रिया आणि पुरूष दोघेही लिबरल होते. जाच नव्हता. तेलाची समृद्धता आणि प्राचीन परंपरा, कलात्मक वस्तूंची रेलचैल , तांब्याची भांडी, दिवे, सिरॅमिकवर असलेली कलाकुसर, गालीचे हे अगदी अलाद्दीनच्या चित्रपटात आहे तसंच. पण एव्हढा समृद्ध देश चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने मागे पडला.

आता काय स्थिती आहे यासाठी मग वेबवर ईपुस्तकं चाळली. त्यातून व्हाईट टॉर्चरचा उल्लेख सतत यायला लागला. किंडल वर पण आहे आणि पेपरबॅक पण आहे. सतरा रूपयांचा तर फरक आहे म्हणून मग पेपरबॅकच मागवलं. या पुस्तकाची ओळख लेखिकेनेच अशी करून दिली आहे

In the heartbreaking preface to this book, Nobel Peace Prize winner Narges Mohammadi writes that she is about to go back to prison (and her fourth round of solitary confinement): “This time I was found guilty because of the book you are holding in your hands — White Torture.”

याला पार्श्वभूमी आहे एका महिलेला पोलिसांनी अडवलं. तिला पकडून नेलं कारण तिने बुरखा नीट घेतला नव्हता त्यामुळं केसांचा काही भाग दिसत होता. यनंतर तिला जेल मधे एव्हढी क्रूर आणि अमानुष मारहाण झाली जेव्हढी एखाद्या खून्याला सुद्धा होत नाही. तिला मग हॉस्पिटलमधे आणून टाकलं. तिथे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमधे असंतोषाचा स्फोट झाला. अनेक महिला रस्त्यावर आल्या. बुरख्यची होळी केली. आता इराणच्या अनेक राज्यात बुरखासक्ती धुडकावून दिलेली आहे.

धाग्याचा विषय आहे त्याला अनुसरूनच आहे. हवी ती माहिती काढण्यासाठी पुस्तकासारखा ऑथेंटिक सोर्स नाही. त्यातून लेखिका नोबेल पुरस्कर विजेती आहे. अशा पुस्तकांचं वाचन गरजेपोटी घडतं, पण वर्थ असतं. पूर्ण वाचलेलं नाही अद्याप.

खाडी देशात काय घडतं हे वाचण्यास उत्सुक होतो पण आता काही देश पूर्णपणे धार्मिक दबावाखाली असलेल्या सरकारच्या ताब्यात गेले आहेत. तिथल्या वातावरणावरची लिहिलेली काही जुनी पुस्तकं आहेत वाचनालयात पण ती मी वाचायचं टाळलं आहे. काही उपयोग नाही.

* हवी ती माहिती काढण्यासाठी पुस्तकासारखा ऑथेंटिक सोर्स नाही. >>>>> +१२३४५६ अगदी !

वैज्ञानिक विषयाबद्दलही माझा असाच अनुभव आहे. एखाद्या नवा विषय समजून घेताना शक्य झाल्यास आधी त्याचे पाठ्यपुस्तक वाचायचे. त्यातून आकलन चांगले होते आणि त्यानंतर ताज्या घडामोडींसाठी जाल-संशोधन करत बसायचे.
. ..

* अलिकडचा इराण कसा आहे याबद्दल >>> माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला.

रानभुली ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

एखाद्या नवा विषय समजून घेताना शक्य झाल्यास आधी त्याचे पाठ्यपुस्तक वाचायचे. त्यातून आकलन चांगले होते आणि त्यानंतर ताज्या घडामोडींसाठी जाल-संशोधन करत बसायचे.>>> खर आहे.
मी पण तसेच करत असे

पण अलीकडच्या तंत्रज्ञाना विषयी जाणून घेण्यासाठी मी तीच पद्धत वापरलेली तेव्हा मात्र ते अयशस्वी झाले.

कारण ते दिवसागणिक बदलत जाते आहे ( विशेष करून क्लाऊड आणि ब्लॉकचेन शिकताना हा अनुभव आला) . या नवीन संस्था / कंपन्या ही सर्व माहिती आंतरजालावर टाकत राहतात जी जास्त authentic info असते.
मला जाणवलेल - खूप वेगाने सगळं बदलतंय.. तेही आमूलाग्र.

हवी ती माहिती काढण्यासाठी पुस्तकासारखा ऑथेंटिक सोर्स नाही >>>> सहमत. काही अपवाद वगळता पुस्तकांमधील माहिती खरी व शास्त्रीय असते. व त्या विषयाची संपूर्ण व एकत्रित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. अजून, जर त्या पुस्तकाचे मान्यवरांनी परीक्षण केले असेल तर त्याची विश्वासाहार्यता अजूनच वाढते.
क्लिकबेट च्या जमान्यात इंटरनेट वरील माहितीची विश्वासाहार्यता खूप कमी झाली आहे.

* विशेष करून क्लाऊड आणि ब्लॉकचेन शिकताना
>>> बरोबर.

वैद्यकीय क्षेत्रातले याबद्दलचे माझे अनुभव संमिश्र आहेत.
एकदा असेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाबद्दलचे चर्चासत्र होते. त्यात हा मुद्दा आला की, झपाट्याने होणारे नवे संशोधन पाहता आता इथून पुढे जाडजूड आकाराची पाठ्यपुस्तके हवीत कशाला? परंतु माझ्यासह अनेक डॉक्टरांचा अनुभव असा होता की विद्यार्थीदशेत जर एखादा विषय थेट जालावरूनच वाचायला घेतला तर विद्यार्थ्यांचा बराच गोंधळ होताना दिसतो. कारण 'संशोधन' इतके उलटसुलट असते की अर्धा तास वाचल्यानंतर विद्यार्थी कपाळावर हात मारून विचारतो,
"भाई कहना क्या चाहते हो ?" Happy

त्यामुळे आजही बहुतेक सर्व पाठ्यपुस्तकांच्या नव्या आवृत्ती दर दोन वर्षांनी छापल्या जात आहेत आणि व्यावसायिक डॉक्टरसुद्धा त्या आपल्या पदरी बाळगताना दिसतात.

विशेष करून क्लाऊड आणि ब्लॉकचेन शिकताना >> व्यावसायिक कौशल्ये शिकणे आणि माहीती मिळवणे यात गोंधळ नको व्हायला.

खरं आहे शिकताना पाठ्यपुस्तके हवीतच! एक कॉमन बेस हवा.

फॉर्मल शिक्षण झाल्यावर जे on the job/ outside of your job/ प्रकारात मोडणारे शिक्षण की जे नवीनच शोधले गेले आहे.. त्यासाठी मुख्यकरून माझा असा अनुभव होता.

क्लिकबेट च्या जमान्यात इंटरनेट वरील माहितीची विश्वासाहार्यता खूप कमी झाली आहे
>> बरीच misinformation ( चुकीची माहिती असते)

मी वापरलेल्या गोष्टी/ तंत्र सांगते.

१. कुठेही तुम्ही काही माहिती वाचलीत, संकेत स्थळ - ब्लॉग, News sites TR तुम्हाला खालती references chi Link Diesel.

थोडा वेळ काढून त्या जर्नल्स/ reference साइट वर जाऊन तपासणे.

२. विशेष करून अगदी नवीन माहिती असेल तर गुगल/ युट्यूब सर्च करून बघणे. त्यात फेक/ चुकीची माहिती उघडी पडते.

३. साईट्स वर स्पॉन्सर टॅग नाही ना ते तपासणे.
४. एखादी माहिती १० ठिकाणी आली पण घुमून फिरून तीच तीच माहिती देत आहेत, मूळ references ( जसे white papers किंवा इतर माहिती ) देत नसतील तर अजून तपास करावा.
मुख्य करून ज्या साईट्स वर ही माहिती मिळते त्यांचे ब्रॅण्डिंग कलर्स/ logos he patterns तपासावे.
हे ऐकायला विचित्र वाटेल पण ह्या गोष्टी थोडे फार clues देतात.

७. शक्यतो mainstream sites वर रेफरेन्सेस मिळतात का ते बघावे.
८. सध्या Chatgpt किंवा तत्सम apps sites ही ह्यासाठी काही अंशी वापरता येतात.
माझा एक अनुभव आहे, जो माझ्यासाठी धक्कादायक होता. तो मी लेखन घडते कसे मध्ये २-३ दिवसात टाकते.

कौशल्ये शिकणे आणि माहीती मिळवणे >>> ते वेगळं नाही करत येत. मला असं वाटतंय .
माहिती/ ज्ञान नसेल तर कौशल्य कसे आत्मसात करणार?

Knowledge is knowing tomato is a fruit. Wisdom is not putting it in a fruit salad. Happy

जालावर प्रसिद्ध होणाऱ्या वैद्यकीय संशोधनाच्या बाबतीत कोविडोत्तर एक फार मोठा अनिष्ट बदल झाला. अनेक संशोधने ‘मी पयला’ या स्पर्धेपोटी जालावर धडाधड प्रसिद्ध होऊ लागली. या उलट छापील विज्ञान पत्रिकांमध्ये एखादे संशोधन प्रकाशित व्हायला त्याला काही टप्प्यांमधून जावे लागते आणि ते अतिशय आवश्यक असते (विशेषतः त्या संशोधनाशी थेट संबंध नसलेल्या इतर अभ्यासकांची मते जाणून घेणे).

थोड्याच कालावधीत अशा अनेक संशोधनांचा खोटेपणा उघड झाला आणि 'शोधनिबंध मागे घेणे' असले उफराटे प्रकारे मोठ्या प्रमाणावर झाले. अजून सुद्धा ती प्रवृत्ती पूर्णपणे गेलेली नाही. फक्त अशी मंडळी ते संशोधन प्रसिद्ध करताना ‘छपाईपूर्व’ अशी एक टीप सुरवातीस टाकतात.
असं काही दिसलं की मी शक्यतो ते वाचत नाही. थोडे थांबावे पण अधिकृत स्त्रोतांतून वाचणे केव्हाही उत्तम.

असं काही दिसलं की मी शक्यतो ते वाचत नाही. थोडे थांबावे पण अधिकृत स्त्रोतांतून वाचणे केव्हाही उत्तम. >> +१
मानव, ऋतुराज, उबो >> +१
छन्दिफन्दि >> असहमतीवर सहमत होऊन थांबूयात.
माहिती, ज्ञान , व्यावसायिक कौशल्ये आणि journalistic informative and literary यावर मायबोलीवर चर्चा घडली तर वाचायला आवडेल. कुमार सरांच्या धाग्यावर शिस्तीत चर्चा होतात, त्यांना वेळ असेल तर उत्तमच.

राभु,
विषयकल्पना चांगली असली तरी सध्या नव्या धाग्याची जबाबदारी माझ्यावर नको.
अन्य कोणीही काढा, मला चर्चेत यायला आवडेलच Happy

रानभुली, चांगली कल्पना.
विशेषतः त्या संशोधनाशी थेट संबंध नसलेल्या इतर अभ्यासकांची मते जाणून घेणे>>>> या प्रक्रियेत संशोधनकर्त्या व्यतिरिक्त त्या विषयातील तज्ञ लोकांची मते लक्षात घेतलेली असतात, परीक्षण केलेले असते. कधी कधी काही अधिकचे किंवा आवश्यक बदल देखील सुचवले जातात.

आता पुन्हा साहित्यिक पुस्तकांकडे येतो. एक रोचक मुद्दा पाहूया.
संदर्भ :
https://www.aksharnama.com/client/article_detail/4774
वरील लेखात असा मजकूर आहे :
"पुनर्वाचनाशिवाय फारसे काही कायमस्वरूपी हाती लागत नाही. एखादे पात्र, कादंबरीतील एकूण वातावरण, एखादा मन हेलावून टाकणारा प्रसंग इतकेच हाती उरते".

पुनर्वाचनाबाबत माझे पूर्वीचे मत आणि आताचे मत यात खूप फरक पडलाय. पूर्वी मला वाटायचे की एखादे पुस्तक दुसऱ्यांदा वाचण्यात असे काय मिळते आपल्याला ? परंतु काही वर्षांपूर्वीपासून मी रात्री झोपण्याआधी संग्रहातील एखादे पुस्तक वाचायचेच असे जेव्हा ठरवले तेव्हा काही पुस्तकांमधील अनेक पानांचे अनेकदा पुनर्वाचन घडले. त्यामुळे मतपरिवर्तन झाले.

साधारणपणे पहिल्या वाचनात सामान्य वाचकाला फक्त गोष्ट अथवा कथानकातच रस असतो आणि पुस्तक जर उत्कंठावर्धक असेल तर आपण कधी एकदाचे शेवटाला नेतो, असे होते. पुनर्वाचनात गोष्ट आधीच माहीत झालेली असल्यामुळे आता आपण लेखकाची भाषा, शैली आणि एकूणच सौंदर्य याकडे बारकाईने पाहू लागतो.

निवडक गोष्टींचे पुनर्वाचन करण्यात आनंद आहे हे आता पटले आहे. इतरांचे अनुभव वाचण्यास उत्सुक !

सुरेख मुद्दा.
पहिल्यांदा वाचताना सगळी पात्रं अनोळखी असतात. वातावरण अनोळखी असतं. शिवाय वाचताना आपला मूड कसा आहे, मनात काय चालू आहे याचा वाचनावर परिणाम होतो. दुसर्‍या वेळी वाचताना कदाचित आतही शांतता असते, अशा वेळी निसटलेल्या जागा दिसतात, आधी भलताच ग्रह करून घेतलेले उतारे आत वेगळे जाणवतात असं झालेलं आहे.

बरोबर.
अजून एक गंमत म्हणजे, वर संदर्भ दिलेला लेख मी पाच वर्षांपूर्वी वाचला होता. परंतु तेव्हा त्यातला पुनर्वाचनाचा मुद्दा अजिबात लक्षात आला नव्हता ! Happy काल तो लेख जेव्हा मी पुन्हा वाचला, तेव्हा बाकी मुख्य सगळं बाजूला ठेवून या मुद्द्यावरच माझं लक्ष केंद्रित झाले.
. .
काही पुस्तकांच्या किंवा जुन्या कात्रणांच्या पुनर्वाचनातून मला काही लेखांसाठी विषय मिळाले हा पण चांगलाच फायदा.

Pages